पती-पत्नीच्या नात्यात अंतर

 नाती दोन व्यक्तींच्या संबंधांना नावच देत नाहीत तर त्या नावानुरूप एकमेकांना पुरकही असतात. त्याचप्रमाणे एकाची कमतरता दुसरा भरून काढतो व अशाप्रकारे त्या नात्यास परीपुर्ण बनवीले जाते. असेच काहीसे असते पती-पत्नीचे नाते. जे एकमेकांच्या समर्पणाने शेवटपर्यंत निभावले जाते. त्यांच्या एक-दुसर्‍यावरच्या प्रेमाने त्याला कस्तुरीचा सुगंध लाभतो. तर जीवनातील कठिण समयी परस्परांना दिलेल्या अजोड साथीने त्या नात्याचे सोने होते. तसेच एकाचे ध्येय पुर्ण करण्यासाठी दुसर्‍याने केलेल्या त्यागाने त्या नात्याची सखोलता कळते. अशा ह्या पवित्र नात्याचा दुरवरचा प्रवास दोघांच्याही विचारांनी तसेच परस्परांचा आत्मसन्मान राखून पुर्ण होणे महत्वाचे असते.

  पूर्वी स्त्रियांचे आयुष्य चूल व मूल एवढ्यापुरते सिमीत होते. तरी पतीच्या जीवनातील महान हेतू पुर्णत्वास नेण्यासाठी पत्नीचा अर्थातच पतीच्या संमतीने त्यात पडद्द्यामागचा व महत्वाचा सहभाग असायचा. काही जोड्यांनी तर  समाजसुधारणेसारख्या कठिण कामात उडी घेवून इतिहास रचला आहे. अशा जोडप्यांची नावे इतिहासात अजरामर झाली ज्यांनी समाजाचा धर्माचा व कुटूंबियांचा रोष पत्करून तरिही एकत्रीतपणे समाजकार्य केले. थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या महान पती पत्नीचे उदाहरण तर आजच्या पिढीसाठी विशाल ध्वजाप्रमाणे आहे. कारण ज्योतीबांनी सावित्रीबाईन्ना भक्कम पाठबळ देवून तसेच त्यांच्यात शिक्षण घेण्याची आवड निर्माण करून त्यांना सुशिक्षीत बनवीले. त्याचप्रमाणे समाजाच्या विरोधास न जुमानता पतीच्या महान कार्यास तडीस नेण्यासाठी पत्नीने आजीवन त्यागाचे व समर्पणाचे आयुष्य पत्करले. अशाप्रकारे त्यांनी एकमेकांची साथ निभावल्याने त्यांची नावे इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरात लिहील्या गेलीत.

   ह्या थोर जोडप्याच्या उदाहरणावरून एक महत्वपूर्ण गोष्ट शिकायला मिळते कि जेव्हा पती-पत्नी दोघेही जीवनात एकाच हेतू पुरस्सर काम करतात तेव्हा त्यांची उर्जा एकत्र येवून द्वीगुणीत होते. त्यांचे विचार ध्येयाकडे एकाच दिशेने प्रवाहीत होतात. दोघांच्याही विचारात पुर्णता: ताळमेळ असतो. अशी जोडपी अनेकांसाठी यशस्वी उदाहरण ठरतात. कारण त्या दोघांना सृष्टीने एकत्र आणण्याच्या मागचा हेतू त्यांना उलगडलेला असतो.

   जे पती-पत्नी समाजसुधारणेच्या कार्यात किंवा महान हेतू साठी आपले योगदान देत असतात ते त्यांच्यात निर्माण होणारे गैरसमज, किरकोळ वादविवाद तसेच लहान सहान भांडणं ह्यावर जास्त लक्षकेंद्रीत करत नाहीत. तर वेळोवेळी आपसात संवाद साधून त्यावर तोडगा काढतात. परंतू आपल्या व्यक्तीगत जीवनाचा त्यांनी हातात घेतलेल्या कार्यावर परीणाम होवू देत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांच्यातील व्यक्तीगत समस्यांना विचारपूर्वक प्रतिसाद देतात. आपल्या गैरजबाबदार वागन्याने दोघांमध्ये अंतर निर्माण होवून त्यामुळे नुकसान होवू शकते ह्यासाठी ते दोघेही पुर्णपणे जागृक असतात. म्हणूनच जोड्या जर स्वर्गात बनतात असा समज असेल तर त्यांच्या एकत्र येण्यामागे नक्कीच सृष्टीचा काही उद्देश असेल ह्यावर कायम दृढ विश्वास ठेवला पाहिजे. कारण जेव्हा त्या उद्देशाचे आकलन त्या जोडप्यास होते तेव्हा त्या पती-पत्नीत अंतर निर्माण होणे अशक्य असते.

   पती-पत्नी हे एकमेकांना पुरक असतात. त्यासोबत ते परस्परांच्या कमकुवत जागा सामंजस्याने व आपल्या सामर्थ्याने भरून काढत असतात. त्याविषयी त्यांना कोणताही मोठेपणा किंवा अभिमान वाटू नये. कारण ती त्या नात्याची गरज असते. एकमेकांच्या सहवासाने त्यांच्यात आपोआपच स्वारस्य व सलोखा निर्माण होतो. परंतू त्या दोघांच्या काही व्यक्तीगत महत्वाकांक्षा असल्या तर मात्र कधीकधी ते आपल्या जोडीदारास समजून घेण्यात अपयशी ठरण्याची शक्यता असते. कारण अशावेळी दोघांच्याही मनात परस्परांसाठी तुलनात्मक भाव निर्माण होवू शकतो. ज्यामुळे अहंकार दुखावला जावून जोडीदाराच्या क्षणोक्षणी उमटणार्‍या प्रतिक्रीयांच्या मागच्या सखोल व नाजूक भावना हृदयाला भिडू शकत नाहीत. अशाप्रकारे उत्पन्न होणाऱ्या अपेक्षापूर्ण भावनांना एकमेकांकडून शुन्य प्रतिसाद मिळतो. हेच कारण जोडीदाराच्या आत्मसन्मानास वारंवार तडा जाण्यास पुरेसे असते. ज्यामुळे त्यांच्यात अस्पष्ट असे अंतर निर्माण होते. ज्याची जाणीव होण्यास दोघांनाही उशीर लागतो. परंतू नात्याची विण सैल होत जाण्याची ही लक्षणे असतात.

  असे असतांना पती-पत्नी सोबत एका छताखाली राहत असले तरी मनाने मात्र ते दुरावलेले असतात. त्यांच्या डोळ्यापुढे नाते विस्कटत चालले हे त्यांना ठाउक असते. सर्वकाही कळत असूनही अंतकरणात जागृत झालेली महत्वाकांक्षा त्यांना शांत बसू देत नाही. त्यामुळे नाते निरस होवून कोमेजू लागते. कारण त्यांच्यातील मतभेद तुटेपर्यंत ताणल्या जातात. दोघापैकी एकाची जुळवून घेण्याची इच्छा असली तरी तसे करणे त्याच्यासाठी शक्य नसते. अशावेळी दोघांनाही ठरवून नात्यातून बाहेर पडावे लागते कारण त्यातच दोघांचेही हित असते.

   केवळ दोघांचीही विचारधारा व उर्जा विरुद्ध प्रवाहीत झाल्याने त्यांना एकमेकांशी जुळवून घेता येत नाही. कारण प्रेम निभावण्यासाठी दोन हृदयांचे एकत्र येणे महत्वाचे असते. पती-पत्नीचे नाते त्यांच्या आपसातील प्रेम व विश्वासावर तर टिकलेलेच असते. परंतू क्षणोक्षणी त्यांनी एकमेकांना समजून घेतल्याने त्यांचा एकमेकांवरचा विश्वास दृढ झाल्यामुळे तसेच त्यांनी एकमेकांच्या क्षेत्राचा आदर राखल्याने ते आणखीच बळकट होते. परंतू जर ते स्वत:च्या आयुष्याचे निर्णय स्वतंत्रपणे घेत असतील आणि त्यात जोडीदाराच्या मनाचा विचार केला जात नसेल तर मात्र त्या नात्यात हमखास अंतर निर्माण होते.

  जोडीदाराच्या आत्मसन्मानाचा आदर न करणे हे देखील पती-पत्नीच्या नात्यात अंतर निर्माण होण्याचे महत्वाचे कारण ठरू शकते. खासकरून स्त्रियांना ह्याचा तडाखा जास्त बसतो. त्याला कारण पुरूषी अहंकार आहे. त्यातल्या त्यात त्या पुरूषाचे बालपण कशापद्धतीने गेले ह्यावरही मोठे झाल्यावर त्याचा स्वभाव कसा घडतो हे ठरते. असे पुरूष त्यांच्या अनौपचारीक वर्तनाने आपल्या जोडीदाराचे शारिरीक व मानसिक उत्पीडन करतात. आपल्या अधिकाराचा गैरवापर करून जोडीदाराचे जगणे नकोसे करतात. जोडीदारास आपल्या दबावात ठेवल्याने त्यांच्यातील अहंकारास खतपाणी मिळते. पती-पत्नीच्या नात्यात अंतर निर्माण होण्यास कारणीभूत ठरलेले हे अत्यंत घृणास्पद कारण आहे. आजच्या युगातील स्त्रिया सर्वदृष्टीकोनातून स्वावलंबी असल्यामुळे त्या झुंजारू व्यक्तीमत्वाच्या असतात. स्वत:चा अपमान सहन करत आयुष्य व्यतीत करण्यात त्यांचा काळीमात्रही रस नसतो.

   पती-पत्नी दरम्यान असलेले नाते ह्या सर्व कसोट्यांवर सिद्ध झालेले असेल तरच त्यांच्या हृदयांना कायम जोडून ठेवण्यास मदत करते. परंतू ते नातेच सिद्ध होण्यास सक्षम नसेल तर मात्र त्यांच्यात अंतर निर्माण होणे हे निश्चीत असते.

1. व्यक्तीगत महत्वाकांक्षा पती-पत्नीच्या नात्यात अंतर निर्माण करतात.

   पती-पत्नी हे जीवनरूपी रथाची दोन चाके असतात. ही दोन्ही चाके जेव्हा स्वखुशीने एकाच दिशेने चालतात तेव्हा त्यांना एकत्रीतपणे जीवनाचा आनंद घेता येतो. आयुष्याच्या खडतर वाटा एकमेकांच्या साथीने सहज पार करता येतात. परंतू जेव्हा एकाच्या व्यक्तीगत महत्वाकांक्षेमुळे दुसर्‍याची ओढाताण होत असेल तर मात्र त्या रथाचे संतुलन बिघडते. दुसर्‍याची फरफट होते. अशावेळी पती-पत्नीच्या नात्यात अंतर निर्माण होते. महत्वाकांक्षा असणे हे जीवनात प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक आहे. परंतू त्याचे पतीपत्नीच्या सहजीवनावर विपरीत पडसाद उमटणे योग्य नाही. त्यासाठी दोन्हीचे संतुलन साधता आले पाहिजे. त्याचबरोबर व्यक्तीगत महत्वाकांक्षांमध्येही जोडीदाराचा सहभाग मिळवीण्यासाठी वेळोवेळी त्याबद्दल जोडीदाराचे मत जाणून घेणे, त्यात आयुष्याचे हित कसे सामावलेले आहे हे त्यांना पटवून देणे, त्यासोबत केवळ त्यामध्येच गुरफटून न राहता जोडीदाराबरोबर उत्तम वेळ घालवीणे हे देखील महत्वाचे असते. तरच महत्वाकांक्षा पुर्ण होण्याबरोबरच पती-पत्नीचे नातेही तसेच कायम राहण्यास मदत मिळते. तसेच काळासोबत ते आणखीच परीपक्व होत जाते.

2. प्रेम असूनही पती-पत्नी आपल्या वर्तनातून प्रेम व्यक्त करत नाहीत.

   पती-पत्नीचे नाते प्रेम व विश्वासावरच उभे असते. लग्नानंतर नजीकच्या काळात त्यांचे प्रेम अगदी ओसंडून वाहत असते. इतके कि पती- पत्नी दोघांनाही आपल्या आसपासच्या जगाचा विसर पडतो. ते स्वप्नांच्या जगात विहार करत असतात. दोघांनाही एकमेकांत शोधूनही खोट सापडत नाही. परंतू काही काळ लोटल्यानंतर ते आपाआपल्या जगात व्यस्त होत जातात. त्यांच्यातील संवाद आपोआपच कमी होत जातो. लग्नाचा वाढदिवस किंवा त्यांना एकमेकांचे वाढदिवस लक्षात ठेवण्यासही फार कष्ट पडतात. लक्षात असूनही त्याकरीता ते दोघे विशेष काही योजना आखत नाहीत. तसेच आपल्या कामात इतके व्यस्त असतात कि बरेचदा त्या विशेष दिवसावर आपल्या जोडीदारासाठी वेळही काढत नाहीत. ज्याप्रमाणे बॅंकेत पैसे टाकत राहील्याशिवाय आपण एटीएम मधून पैसे काढू शकत नाही त्याचप्रमाणे नात्यातही वेळेचा, भावनांची व पुरेशा पैस्याची गुंतवणूक करणे अनिवार्य असते. कारण सहजीवनात बरेच काही हरून जिंकण्यालाच जास्त महत्व  असते. त्याशिवाय पती-पत्नीच्या नात्यात एकमेकांना समजून घेणे, परस्परांना प्रेमाचा व विश्वासाचा स्पर्श करणे तसेच प्रेमाने व आनंदाने जोडीदारास आलिंगन देणे ह्या गोष्टी केल्याने नात्यातील प्रेम व्यक्त होण्यास मदत होते. अशाप्रकारे नात्याची उब कायम राहते.

3. पती-पत्नी एकमेकांकडून अपेक्षा करतात.

  अपेक्षा कोणत्याही नात्यात असोत कायमच दु:खाचे कारण असतात. पती-पत्नीच्या नात्यातील अपेक्षा ह्या त्या नात्यास दरीत ढकलण्याचे काम करतात. दोघापैकी कोणाच्याही मनात अपेक्षा जागृत झाल्यास तसेच जोडीदार त्या अपेक्षेस समजून घेण्यास व पुर्ण करण्यास पात्र नसेल तर मनात नकारात्मक भावनांच्या लहरी उसळू लागतात. ज्या शब्दांच्या स्वरुपात बाहेर पडण्यास वाव नसेल तर पती-पत्नीत अंतर आणतात. पती-पत्नी दोघांनीही एकमेकांकडून अपेक्षा न करता आपण स्वत: जोडीदाराच्या अपेक्षेस कसे पात्र ठरू ह्याचा नेहमी विचार केला पाहिजे. अपेक्षा नेहमी मनात गैरसमज निर्माण करण्याचेही काम करतात. तेव्हा मनात काही नकारात्मक आल्यास आपल्या जोडीदाराशी संवाद साधून ताबडतोब त्या शंकेचे निराकरण करावे. कारण शंका नात्यास आतून पोखरुन पोकळ करतात. मनात साचत गेल्याने मन गढूळ होत जाते. परंतू संवादातून साचलेल्या व मनास गढूळ करणार्‍या गोष्टींच्या गाठी हळूहळू विरघळत जातात. तसेच नात्यात पडत चाललेले अंतर कमी करतात.

4. पती-पत्नीत मनाचा दुरावा त्यांच्यात अंतर निर्माण करतो.

  जीवनात इतर जबाबदार्‍या पेलतांना काळान्वये आपले आपल्या जोडीदाराकडे दुर्लक्ष होत जाते. तसेच जोडीदार कायम आपल्या डोळ्यांपुढे असल्याने आपण बर्‍याचदा त्यास गृहीत धरणे सुरू करतो. त्याचप्रमाणे कधी पती-पत्नीत काही कारणाने वादविवाद झाले तर ते त्यांनी आपसात न सोडवीता नातेसंबंधीतांच्या मध्यस्तीने सोडविण्याचा प्रयत्न केल्यास त्या दोघांमध्ये कायमचा मनाचा दुरावा निर्माण होवू शकतो. अशावेळी ते एकत्र राहत असूनही सोबत नसतात. ते एकमेकांना प्रोत्साहीत करत नाहीत. त्यांच्या नात्यात हळूहळू निरसता येवू लागते. पती-पत्नीच्या नात्यात ह्या गोष्टी येण्यापासून थांबवीण्यासाठी त्यांनी एकमेकांना पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. त्या दोघांमध्ये कायम एकोपा असला पाहिजे. शक्यतोवर दोघांमध्ये इतरांचा हस्तक्षेप होण्यापासून टाळण्यात यावा. दोघांनीही एकमेकांना जीवनात प्राथमिकता द्यावी. त्यांच्यातील मतभेद वादविवाद चार भिंतींच्या आत असावेत. परंतू चारचौघात एकमेकांचे कौतुक करण्यास नक्की प्रादान्य द्यावे.  अशापद्धतीने ते दोघे ठरवून स्वत:मध्ये बदल आणून दोघांच्या नात्यात अंतर निर्माण होण्यापासून वाचवू शकतात.

  दोन अनोळखी जीवांना एकसुत्र करण्यामागे सृष्टीची दैवी योजना असते. आणि ती योजना पुर्णत्वास नेण्यासाठी पती-पत्नी एकत्र येतात. परंतू दोघांमध्येही असलेल्या काही गुणदोषांमुळे त्यांच्यात अंतर निर्माण होते. हे अंतर कमी करण्यासाठी स्वत:चे गुण व जोडीदारामधले दोष न शोधता स्वत:मधील दोषांचे जाणीवपूर्वक निराकरण करून जोडीदारामधील गुणांचे कायम कौतुक करत राहील्याने आपल्याला पाहिजे असलेले बदल आपल्या जोडीदारात व आपल्यातही येतात. आणि दोघांच्याही प्रयत्नांनी पती-पत्नीच्या नात्यातील अंतर भरून निघते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *