पन्नाशीनंतरचे जीवन

जीवन जगण्याचा मोह हा आयुष्याचा शेवटचा क्षण उरलेला असतांनाही माणसाला आवरता येत नाही. कारण जगण्याचा अर्थच मुळात संलग्नतेशी जुळलेला आहे. परंतू वयाची पन्नाशी हा जीवनाचा असा पाडाव असतो. जिथून आपण आपल्याद्वारे ह्या जगात झालेला पसारा आवरण्यास सुरवात केली पाहिजे. आपल्या हातून अनावधानाने तसेच हेतूपूर्वक घडलेल्या चुकांचे परिमार्जन केले पाहिजे. स्वत:ला माफ करण्याच्या प्रक्रियेतून घेवून गेले पाहिजे. आपल्या मनात नव्याने उत्पन्न होणाऱ्या भौतिक सुख उपभोगण्याच्या इच्छांना जाणीवपूर्वक बंधने लावली पाहिजे. आयुष्यात मिळविलेला नावलौकिक व प्रसिद्धी ह्यांचा मोह सोडून एक माणूस म्हणून साधे जीवन अंगिकारले पाहिजे. पन्नाशी ह्या पाडावा नंतर पदरात पडलेला कोणत्याही प्रकारचा व्यक्तीगत लाभ समाजाच्या कल्याणासाठी अर्पण करण्याचा मोठेपणा आपल्या मनाशी बाळगला पाहिजे. त्याचप्रमाणे जीवनाच्या कटूसत्याच्या आणखी आणखी नजदीक जात असतांना आपल्या मनात सर्वतोपरी समाधानाचा गारवा असावा ह्या सदिच्छेने आपण प्रेरित असले पाहिजे. एकंदरीत आपले पन्नाशीनंतरचे जीवन मानसिक शांततेने समृद्ध असावे ह्याकरीता आपणच आजीवन प्रयत्नशील असले पाहिजे.

जीवन जगतांना आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे कि जीवन हे सर्वस्वी क्षणभंगुर असते. कोणता क्षण आपला जीवनप्रवास कायमचा थांबविण्यास कारणीभूत ठरेल ह्याची आपल्याला जाणीवही नसते. परंतू आपण जर सर्वदृष्टीकोनातून समाधानकारक जीवन जगलो असलो. तर मात्र जगण्याकडे बघण्याची आपली एकप्रकारे स्वस्थ मानसिकता असते. तेव्हा वाढत्या वयाचा आपल्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. उलट वयाबरोबर आपल्या व्यक्तीमत्वातही परिपक्वता येत जाते. कारण आपण आतापर्यंतच्या जीवनात आपल्या जीवनातील नाती आपली सामाजिक प्रतिष्ठा आपले आरोग्य तसेच आपला जीवनस्तर उच्च पातळीवर जोपासलेला असतो. अशावेळी वयाची पन्नाशीही आपल्यासाठी आनंददायी ठरू शकते. परंतू आपण जर जीवनात आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीपुढे तसेच आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या इच्छांपुढे सहज नतमस्तक होवून आपल्या निरागस अस्सल व्यक्तीमत्वाला मारून टाकले असल्यास आपल्याला जगण्याचे समाधान लाभत नाही. कारण आयुष्यभर खोट्या चेहऱ्याच्या आड राहून वावरल्यामुळे आपण स्वत:च्या अंतकरणाचा प्रवास करून आपल्याच आत्म्याशी एकरूप होवू शकत नाही. तेव्हा आपण जीवन जगत असतांना इतकेही भ्रष्ट होवू नये. जेणेकरून वयाच्या एका टप्प्यानंतर इच्छा असतांना स्वत:मध्येही विसावू शकणार नाही.

आपण आपले जीवन सर्वतोपरी नियोजनबद्ध पद्धतीने घालविले असल्यास आपले नातेसंबंध सुमधुर तसेच आपल्या प्रियजनांचे आपल्याबरोबर मैत्रीपूर्ण बंध असतात. कारण जीवनप्रवासात आपण त्यांना आपल्याद्वारे सुखकारक अनुभव, मोलाची साथ, भौतिक पातळीवर समाधान तसेच सामाजिक प्रतिष्ठेचे कवच प्रदान केलेले असते. त्यामुळे त्यांच्या मनात आपल्यासाठी सम्मान व अत्यंत आदराचे स्थान असते. परंतू आपण जर मीपणाच्या आवेगात येवून त्यांच्या भावना व त्यांच्या व्यक्तीगत क्षेत्राची निष्ठूरतेने कळत नकळतपणे पायमल्ली केलेली असेल. तर मात्र त्यांच्यात आणि आपल्यात कधीही आदर्श नाते निर्माण होवू शकत नाही. अशावेळी त्यांच्या मनातील आपल्या आदरणीय स्थानाला आपण मात्र पुरेपूर न्याय देवू शकत नाही. त्याचप्रमाणे त्याचे दुष्परिणाम आपल्या पन्नाशीनंतरच्या आयुष्यात आपल्याला नक्की सहन करावे लागू शकतात. कारण आपसात मना मनाची तार घट्ट जुळली नसेल तर दुराव्याची अस्पष्ट दरी नात्यांना पोकळ करत जाते. त्याचबरोबर आपल्याला आपोआपच आपल्या निवृत्तीनंतरचा काळ एकटेपणाने घालविण्याची कठोर सजा मिळते.

आपल्या पन्नाशीनंतरच्या आयुष्यात आपल्या स्वभावातील विनम्रता हाच कायमस्वरूपी आपला मोठेपणा असतो. त्याचबरोबर त्याच्या जोडीला आपल्या माणसांची मन राखण्याकरीता स्वत:कडे कमीपणा घेणे. तसेच त्यांच्या पुढेआपल्या ज्ञानाचे अवाजवी प्रदर्शन न करता सामंजस्याने दोन पावले मागे घेवून त्यांच्या कडूनच काही नवीन गोष्टी माहित करून घेण्याचा आग्रह धरणे. अशाप्रकारे त्यांना जिंकण्यास प्रोत्साहित करणारे मनापासून केलेले लहान लहान प्रयत्नच खऱ्या अर्थाने आपल्याला समाधानी बनवत असतात. कारण आपल्या माणसांचा सहवास व त्यांचे आपल्या आसपास असणेच आपल्याला खरा आनंद देत असते. तसेच हाच आनंद आपल्याला मानसिक शांतताही बहाल करत असतो. तेव्हा नात्यांची निगराणी करत असतांना त्यांच्यावर आपला मालकी हक्क नाहीतर त्यांच्या स्वातंत्र्याची दुरदर्शीता असली पाहिजे. कारण त्यांचे स्वतंत्र व्यक्तीमत्व हीच त्यांची खरी ओळख असते. आपण फक्त त्यांचे सहप्रवाशी किंवा त्यांच्या पेक्षा जरा जगण्याचा जास्त अनुभव घेतलेले असतो. म्हणूनच आपण करुणामयी हृदयाने आजीवन समृद्ध असले पाहिजे. तसेच हीच मौल्यवान पुंजी आपली सुद्धा ओळख बनली पाहिजे.

आपले पन्नाशी नंतरचे आयुष्य आपल्या मुलाबाळांसाठी व शक्य असल्यास समाजासाठीही प्रेरणादायी असले पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या जीवनात घेतलेले शिक्षणरूपी ज्ञान तसेच आपल्या अंगी असलेली कलाकौशल्य उपयोगात आणली पाहिजेत. कारण वाढत्या वयाचा विचार करून केवळ आपल्या निवृत्तीलाच प्रादान्य दिल्यास आपण निरुपयोगी झाल्याच्या भावना आपल्या मनात घर करू लागतील. ज्यामुळे जीवनातून आपला रस कमी कमी होत जाईल. परंतू आपण जर प्रशिक्षित आहोत किंवा कोणत्याही कौशल्यात निपुण आहोत तर केवळ पैसा कमविण्यासाठीच नाहीतर लोकांना सेवा प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून पन्नाशी नंतरही स्वत:ला क्रियाशील ठेवू शकतो. त्याचप्रमाणे समाजकार्यासाठीही स्वत:ला वाहून देवू शकतो. जेणेकरून आपला जनसंपर्क उत्तम राहील. त्याशिवाय आपण आता पर्यंत कमाविलेल्या प्रतिष्ठेतही आणखी भर पडेल. तसेच आपण जर एखाद्या सेवा प्रदान करणाऱ्या ओर्गानायझेशनशी जुळलो तर आपल्या हातून सेवेचे कार्यही घडू शकते. अशाप्रकारे आपले पन्नाशी नंतरचे आयुष्य आपण निराशेच्या व एकटेपणाच्या गर्तेत घालविण्यापेक्षा आपण आपल्या कर्तुत्वान्नी इतरांच्या हृदयात स्थान निर्माण करू शकलो पाहिजे.

आपल्या कोणत्याही वयात आपले शारीरिक आरोग्य हे आपल्यासाठी सर्वात महत्वाचे असते. त्याशिवाय आपल्याला जीवनाचा पुरेपूर आनंद घेता येत नाही. परंतू अर्ध शतकानंतर मात्र आरोग्य उत्तम नसेल तर तो काळजीचा विषय ठरतो. कारण आयुष्यभर आपण आपल्या मुलभूत गरजा आपली स्वप्न तसेच इच्छा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी कष्ट उपसलेले असतात. ज्यामुळे आपल्याला स्वत:बरोबर निवांत असा वेळच मिळालेला नसतो. परंतू जीवनात व्यस्त राहणे हे मात्र आपल्याला सवयीचे झालेले असते. त्यामुळे निवृत्तीनंतरचा रितेपणा आपल्यासाठी सर्वदृष्टीकोनातून कष्टप्रद ठरू शकतो. त्यातही जर आपण आपले आरोग्य जपलेले नसेल तर आपल्या जीवनशैलीनुसार आपल्याला विविध रोगांना सुद्धा सामोरे जावे लागू शकते. जे आपल्याला आर्थिक दृष्टीने व आपल्या मानसिक शांततेच्या दृष्टीनेही महागाचे ठरू शकते. तेव्हा योग्यवेळी हव्या त्या शारीरिक तपासण्या आपण केल्या पाहिजे. आपला आहार संतुलित असला पाहिजे. आपल्या दिनचर्येत योगासनांना महत्व असले पाहिजे. त्याचप्रमाणे साठविलेल्या पदार्थांचे सेवन न करता आपण आपल्या आरोग्यासाठी सात्विक आहाराचे महत्व जाणून घेतले पाहिजे. तेव्हाच आपण निरोगी दीर्घायुष्याचा आनंद घेवू शकतो.

पन्नाशीनंतर आपल्या मनास जास्त भेडसावणारा प्रश्न म्हणजे आपले वाढते वय आणि लवकरच निवृत्तीसोबत येणार असलेला रितेपणा हा असतो. जर आपण आयुष्यभर स्वत:मध्ये फक्त अहंकारालाच खतपाणी दिलेले असेल तर आपली नाती ही विश्वासाने बांधली गेलेली नसतात. त्यामुळे जेव्हा एका काळानंतर आपण आपल्या नात्यांकडून अपेक्षा ठेवू लागतो किंवा त्यांच्या सहवासाची इच्छा बाळगत असतो. तेव्हा मात्र आपण त्यांच्यात आयुष्यभर भावनांची गुंतवणूक केलेली नसल्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला मनासारखा प्रतिसाद मिळत नाही. अशावेळी आपले मानसिक आरोग्य पणास लागण्याची शक्यता असते. कारण आपल्या विचलीत झालेल्या मनाच्या वेदना आपण कोणासमोरही उलगडून मोकळ्या करू शकत नाही. तेव्हा आपण शक्यतोवर वर्तमान काळातील घटनांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्यातील अहंकाराला मूठमाती देवून विनम्र झाले पाहिजे. सर्वांना सामंजस्याने व सहृदयतेने एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या आवडीनिवडी व छंद जोपासले पाहिजे. जेणेकरून निवृत्तीनंतर येणार असलेला रितेपणा हा योजनाबद्ध व मनाला विरंगुळा देणारा असला पाहिजे. अशाप्रकारे आपले मानसिक आरोग्य आपण सांभाळले पाहिजे.

जीवन जगतांना आपण अनेक जबाबदाऱ्या व कर्तव्यांनी वेढलेले असतो. त्यामुळे कधीकधी इच्छा असूनही स्वत:च्या आध्यात्मिक प्रगतीच्या दिशेने पावले उचलू शकत नाही. परंतू पन्नाशी नंतर मात्र आध्यात्मिक अभ्यास हा आपल्या दिनाचार्येचा भाग असला पाहिजे. त्याकरीता आपल्या सवडीनुसार शिबिरात सहभागी झाले पाहिजे. कारण शिबीर हे नैसर्गिक व एकांत अशा ठिकाणावर होत असतात. जिथे योगाभ्यासाकरीता पुरेशी शांतता मिळते. शिबिरांचे कडक नियम देखील असतात. त्यामागचा उद्देशही हाच असतो कि आपला जीवन प्रवास हा सर्वस्वी स्वत:बरोबर एकट्याने असतो. परंतू प्रवासात अनेक सहप्रवाशी आपल्या सोबतीला येतात. आपण त्यांच्यात भावनिकरीत्या गुंतत जातो. परंतू तरीही आयुष्यात कधी न कधी आपण एकटे पडतो. तेव्हा स्वत:च्या सहवासातही आपण आनंदी राहू शकलो पाहिजे. जेणेकरून एकटेपणा आपल्या करीता समस्या नाहीतर आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा स्त्रोत बनला पाहिजे. आध्यात्मिक प्रगतीने आपल्या आत्म्याचा अपभ्रंशही होणार नाही. त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनाच्या उद्देशा पर्यंत सहज पोहोचू शकू. तेव्हा पन्नाशी नंतर आपण आध्यात्मिक जगात आवर्जून पदार्पण केले पाहिजे.

आपल्या पैकी प्रत्येकालाच जीवनाविषयी नात्यांविषयी भौतिक समृद्धीविषयी ओढ असते. हे माझं ते माझं करण्यातच आपण संपूर्ण आयुष्य व्यतीत करत असतो. परंतू सत्य तर हे आहे कि आपल्या शरीरावर सुद्धा आपला हक्क नसतो. मृत्यू नंतर आपला निष्प्राण देह इतरांच्या स्वाधीन झालेला असतो. तेव्हा आपण केवळ निरर्थक मोह मायेच्या जाळ्यात अडकलेलो आहोत हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. जे आपल्या दु:खाचे खरे कारण असते. कारण मायेसोबत भीती सुद्धा जन्म घेत असते. काहीतरी गमावण्याची किंवा काहीतरी सुटण्याची भीती. त्याचप्रमाणे भीती ही मानसिक अशांतता देखील निर्माण करते. अशाप्रकारे संलग्नता ही अशा श्रुंखलेची निर्मिती करत असते जिचा कोठेही अंत होत नसतो. तेव्हा वयाच्या एका मर्यादेनंतर आपण स्वार्थ मोह माया ह्यांना आपल्या जीवनातून हद्दपार केले पाहिजे. तसेच निर्विकार निरामय जीवन अंगिकारले पाहिजे. जेणेकरून आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ कळेल. कारण कशात तरी अडकून राहण्याला आयुष्य म्हंटले जात नाही. तर आयुष्याचा अर्थ स्वतंत्र होणे असा होतो. म्हणूनच पन्नाशी नंतर आपण संलग्नतेतून बाहेर पडून जीवनाचा खरा आनंद घेतला पाहिजे. ज्या निसर्गात आपल्याला सामावायाचे आहे व ज्या मातीच्या कुशीत विसावायचे आहे तिच्या पर्यंत जाण्यासाठी साधा सरळ मार्ग निवडला पाहिजे.

पन्नाशी हा आपल्या वयाचाच नाहीतर आपल्या परीपक्वतेचाही महत्वाचा टप्पा असतो. निरनिराळ्या अनुभवांचा परिपाक असतो. तेव्हा त्या टप्प्याला आपण सार्थक बनविले पाहिजे. कारण तेथून पुढे आपल्याकडून संयमाची समझदारीची तसेच सर्वतोपरी प्रगतीची अपेक्षा केली जाते. परंतू अपेक्षित गोष्टी आपल्यात आढळल्या नाहीत तर मात्र इतरांकडून आपले प्रमाणीकरण केले जाते. म्हणूनच आपले पन्नाशी नंतरचे जीवन कसे राहील ह्या विषयी युवावस्थेतच आपल्या विचारात दूरदृष्टी असली पाहिजे. तेव्हाच आपण आपल्या पन्नाशी नंतरच्या उर्वरीत जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेवू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *