
आपण सगळे जाणतो कि ‘पाणी’ हे सर्व जीवसृष्टी साठी जीवनदायी आहे. पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणे देखील अवघड आहे. पाण्याची तहान आणखी कशानेही भागवता येत नाही. त्यामुळे तहानेने व्याकुळ झालेले जीव पाण्याच्या एक-एका थेंबासाठी कासावीस होतात. तेव्हा पाण्याचे महत्व आपल्यापैकी प्रत्येकाने जाणने महत्वाचे आहे. पृथ्वीवरचा बराच मोठा भाग पाण्याने व्यापला असला तरिही ते पाणि वापरण्यायोग्य नाही. म्हणूनच उन्हाळ्यात पाणी जपून वापरणे गरजेचे असते. त्यामुळे पाणि निसर्गाचा महत्वपुर्ण भाग आहे. त्याचप्रमाणे निसर्ग आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी अनेक जीवनापयोगी गोष्टी शिकवत असतो. ज्या आपल्या आयुष्याला लागू पडतात व उपयोगीही ठरतात.
दर्याखोर्यातून वाहणारे पाणि आपला मार्ग स्वत:च बनवत पुढे जाते. त्याचप्रमाणे उथळ जागेवरून वाहणारे पाणि आवाज करत वाहते. पाण्याचे स्वत:चा मार्ग स्वत: बनवत वाहने आपल्या अस्तित्वाची ओळख निर्माण करण्याकडे दिशा निर्देश करते. कारण जोवर आपण स्वत:च्या विचारांवर ठाम राहून आपण निवडलेल्या मार्गावर चालण्याचा पक्का निर्धार करत नाही. तोवर आपल्यावर कोणिही विश्वास ठेवत नाही. तसेच सपाट भागावरून वाहणारे व वाहतांना आवाज करणारे पाणि बेताचीच विद्वत्ता असलेला मनुष्य उगाचच मोठेपणा मिरवतो. ह्या गोष्टीला दुजोरा देते. त्याचप्रमाणे पाण्याच्या वाहण्याने आपल्या मनाला तल्लीन करणारे सुमधूर संगीत निर्माण होते. त्याचप्रमाणे वाह्ते पाणी आपल्याला प्रोत्साहीतही करत असते. ज्या भूभागातून पाणी नद्यांच्या माध्यमातून वाहते. तेथील आजू-बाजूचा प्रदेश हिरवागार असतो. तसेच जंगलांनी व्यापलेला असतो. त्याचप्रमाणे नदी काठाची जमीन सुपीक असते. हे पाण्याच्या निस्वार्थ भाव आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. आपल्याला निसर्गाने जे बहाल केले आहे. ते तेवढ्याच मोठेपणाने व शुद्ध भावनेने आपण निसर्गाकडे सोपवू शकलो पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. पाण्याच्या प्रत्येक थेंबात ताकद असते. त्याचे उदाहरण म्हणजे एखाद्या दगडावर पाण्याचा एक-एक थेंबही निरंतर पडत राहिला. तरी त्या कठीण दगडाची कालांतराने झीज होते. ह्यामधून आपल्याला हे शिकायला मिळते कि यश मिळविण्यासाठी आपण मनापासून जी मेहनत घेतो. त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण कितीही वेळ लागला किंवा परिस्थिती आपल्या कितीही विरोधात असली. तरी यश आपल्या पदरात पडणारच एवढे निश्चीत असते. पाण्यापासून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात ज्या आपल्या जीवनात बहुपयोगी असतात.
1. पाण्याने भेगा भरून निघतात.
उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची पातळी खोल जाते. तेव्हा जमीनीला खोलवर भेगा पडतात आणि जमिनीची उष्णता वाढते. पावसाळ्यात मात्र पावसाच्या सरी कोसळतात. ज्यामुळे कोरडी झालेली जमीन पुन्हा ओली होते. त्याबरोबर जमिनीस पडलेल्या भेगाही भरून निघतात. तसेच तव्यावरील भाकरीला पाण्याचा हात लावल्याने त्यावरच्या सूक्ष्म पोकळ्याही भरून निघतात. त्यामुळे भाकर सलग मऊ आणी सुरेख होते. त्याचबरोबर ती करपतही नाही. पाण्याचा हा भेगा भरून काढण्याचा गुणधर्म आपण स्वत:च्या अंगी भिनवीला पाहिजे. जिथे माणसांची हृदये कोरडी पडलेली आहेत. त्यात पुन्हा प्रेमाचा व आपुलकीचा ओलावा निर्माण झाल्यास दुराव्याच्या पोकळ्या भरून काढण्यास मदत होवू शकते. जिथे नात्यांना द्वेष, मत्सर, गैरसमज, रागाच्या भेगा पडलेल्या आहेत. त्यात आत्मीयता व विश्वास जागवून त्या कायमच्या नष्ट करता येवू शकतात.
2. पाण्याप्रमाणे पारदर्शक व्हावे.
पाणि पारदर्शक आणि निर्मळ असते. त्यामुळे पाण्यात डोकावून पाहिल्यास त्यात आपले प्रतिबिंब स्पष्ट्पणे दिसते. त्याचप्रमाणे आपण पाण्यातून आर-पार पाहू शकतो. पाण्याचा हा गुणधर्म निर्मळ आणी साफ मन ह्याकडे दिशानिर्देश करतो. निर्वीकार व निर्मळ मन राउळाची प्रतीकृती असते. ज्यात प्रेम दया माया ह्यांचे वास्तव्य असते. निर्मळ मन आपल्याला असे सौंदर्य बहाल करते जे वयाच्या कोणत्याही टप्प्यात संपुष्टात येत नाही. त्याउलट वाढत्या वयाबरोबर त्यात परीपक्वताही येत जाते. मनाची निर्मळता माणसाच्या चेहर्या वर आरस्याप्रमाणे उमटते. त्याचबरोबर साफ मन हे कमकुवतपणाचे नाही तर खंबीरपणाचे प्रतिक असते.
3. पाण्याचा निस्वार्थ भाव घ्यावा.
पाण्याला रंग आणि गंध नसतो. त्यामुळे आपण पाण्यात जे मिसळू त्याचे ते प्रतिनिधीत्व करते. ह्यामधून आपल्याला त्यागाचे प्रतीक दिसते. इतरांना महत्व देण्यासाठी स्वत:च्या स्वपणाचा त्याग इथे बघायला मिळतो. त्याचबरोबर एखाद्या उंच डोंगरावरून खाली दरीत कोसळणार्या पाण्याच्या झोतात आपल्याला वेडेपणा बघायला मिळतो. तो वेडेपणा त्याला सौंदर्य बहाल करतो. तसेच त्याचे उंचीवरून खाली कोसळणे म्हणजे नम्रपणाने निसर्गात विलीन होण्यास आतुर होणे असते. जीवनात कितीही यश मिळवले. तरीही आपण मनाने विनम्र राहीलो व आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही. तरच खर्या अर्थाने यशस्वी होवू शकतो.
4. वाहत्या पाण्याप्रमाणे बनावे, साचलेल्या नाही.
पाण्याचे साचने दुर्गंधी निर्माण करते. त्याचबरोबर त्यामुळे रोगराईसही आमंत्रण मिळत असते. त्याचप्रमाणे आपल्या मनात गोष्टी किंवा भावना साचत गेल्यास व मन मोकळे होण्यास वाव मिळाला नाही तर मनावरचा ताण वाढतो. त्यामुळे आपले मानसिक आरोग्य त्याचबरोबर शारिरीक आरोग्यही धोक्यात येते. तेव्हा साचने हे धोक्याचेच असते. पाण्याचेही आणि आपल्या मनातील भावनांचेही. परंतू वाहते पाणि डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. ते सगळीकडे हिरवळ पसरवीते. वाटेत जे येईल त्याला सोबत नेण्याची क्षमता त्यामध्ये असते. त्याचप्रमाणे जे लोक प्रगतीच्या मार्गावर सतत कार्यरत असतात. त्यांना बघून इतरांचेही मनोबल वाढते. आपल्या आयुष्यात आपण पाण्याप्रमाणे निरंतर प्रवाहीत राहीलो तर प्रगतीचे असंख्य मार्ग आपोआप आपल्या पुढे प्रकट होत जातात.
मित्रांनो, निसर्ग निर्मित कोणत्याही गोष्टीत आपल्याला देण्याची प्रवृत्ती दिसते. नजरेत जागरुकता आणल्यास अनेक गोष्टी आपण निसर्गाकडून शिकू शकतो. त्याचप्रमाणे पाण्याचे गुण आपल्याला सजग बनवितात. आपण आपले जीवनही असे घडवावे. जेणेकरून ते इतरांच्या आयुष्यात जीवन भरणारे असेल. वेग-वेगळ्या कारणांनी मानवी जीवनात निर्माण झालेली उग्रता ही पाण्याचा शितलता हा गुणधर्म आपल्या अंतरात रूजवून शांत करता येवू शकते.
Categories
- आत्मप्रेम (19)
- जनरल (42)
- मानसिक स्वाथ्य (28)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (15)
- होममेकर (9)