प्रतिस्पर्धा आणि मानसिक स्वास्थ्य

 आपण लहानपणी आपल्या वडीलधार्‍यांकडून तसेच पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून अनेक प्रतिस्पर्धांच्या गोष्टी ऐकल्या आहेत आणि त्यातून बोधही घेतला आहे. जसे ससा आणि कासवाची प्रसिद्ध गोष्ट. कासवाच्या निरंतर प्रयासाने ससा, जो चपळ आणि वेगवान होता त्यालाही हरवीले. त्या दोघांच्या पळण्याच्या वेगात प्रचंड तफावत असूनही त्या स्पर्धेत कासव जिंकले. कारण कासवाने स्वत:ला व स्वत:च्या क्षमतांना पुर्णपणे स्विकारले होते. त्याला हेही माहीत होते कि तो सस्याला हरवू शकणार नाही. ह्याची त्याला पुर्णपणे जाणीव असतांनाही त्यावेळी त्याने सगळे लक्ष स्वत:वर केंद्रीत केले. तसेच एकदाही न थांबता निरंतर आपल्या क्षमतेनुसार धावत राहीला. सस्याला मात्र त्याच्या वेगवान पळण्यावर अभिमान होता. त्याचा स्वत:वरचा अति आत्मविश्वास आणि  वेग मंद असलेल्या  कासवाबरोबर लावलेली स्पर्धा ह्या दोन्ही गोष्टी ससाच जिंकणार हे दर्शवीत होत्या. परंतू तरीही ससा हरला. कारण अतिहुशारी व प्रतिस्पर्ध्यास कमी लेखल्यामुळे  त्याच्या प्रयासात खंड पडला. तो बेसावध राहीला. आणि तो स्वत:च त्याच्या हरण्यास कारणीभूत ठरला.

   ह्यावरून हा बोध होतो कि कोणत्याही स्पर्धेत इतरांना कमकूवत समजू नये. त्यामुळे आपण अति आत्मविश्वासास बळी पडतो. जे आपल्यासाठी सर्वार्थाने घातक ठरते. त्यापेक्षा आपण आपले संपुर्ण लक्ष स्वत:वर केंद्रीत केले पाहिजे. जेणेकरून आपल्यातील क्षमतांसोबत कमतरतांचीही कल्पना आपल्याला होईल. त्यासोबत स्वत:मध्ये कोठे सुधार आणला पाहिजे हे देखील आपल्या लक्षात येईल. इतरांबरोबर स्पर्धेत उतरण्याअगोदर आपण स्वत:ची स्पर्धा स्वत:शीच लावली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक दिवशी आपल्यात थोडी थोडी करून सुधारणा होत जातील. तसेच आपल्याला नित्यदिन सराव करण्याची उत्तम सवय लागेल. जी शिस्त आपली स्पर्धेच्या दृष्टीकोनातून उत्तम तयारी करून घेईल. त्यानंतर आपल्या क्षमतांमध्ये झालेली प्रगती आपला आत्मविश्वास वाढवेल. त्यावेळी आपण कोणत्याही स्पर्धेत उतरण्यास पुर्णपणे तयार असू. आपले पूर्ण तयारीनीशी स्पर्धेत उतरणे तसेच निरंतर प्रयास आणि त्यास लाभलेली कठोर परिश्रमांची जोड ह्यामुळे आपण हमखास बाजी मारूच त्याचबरोबर आपल्या मानसिक स्वास्थ्यावरही विपरीत परीणाम होणार नाही. परंतू जेव्हा आपण अपूर्ण तयारीनिशी प्रतिस्पर्धांमध्ये स्वत:ला झोकून देतो. तेव्हा मात्र स्वत:पेक्षा इतरांच्या क्षमतांवर जास्त लक्ष केंद्रीत करतो. तसेच स्वत:च्या परिस्थितीची पुर्ण कल्पना असल्यामुळे मनोमन त्यांच्याशी तुलना करू लागतो. शिवाय त्यांच्या बरोबरीत राहण्यासाठी किंवा त्यांच्या पुढे निघण्यासाठी स्वत:ची दमछाक करून घेतो. तर कधि कधि स्वत:वरच्या अति आत्मविश्वासाचे शिकार होतो.  

  आपण कोणाचीही प्रगती होण्यापासून थांबवू शकत नाही. परंतू आपली प्रगती सर्वस्वी आपल्या हातात असते. ती इतरांबरोबर स्पर्धा लावून करण्यापेक्षा स्वत:मध्ये आवश्यकतेनुसार परिवर्तन आणून करावी. आपला आज कालच्या तुलनेत उत्कृष्ठ करत जावा. त्यासाठी शिकत राहण्यावर भर द्यावा. जेणेकरून आपण कायम अद्दयावत राहू. आपल्यातील कमतरतांचा जागृकतेने स्विकार करावा. तसेच आपण नेहमी आपल्या अस्सल व्यक्तीमत्वात जगावे. आपला प्रामाणिकपणा व सरावाची अखंडता ह्यावर दृढ विश्वास ठेवावा. प्रतिस्पर्धा आपल्याला सतत कशाचा तरी पाठलाग करावयास लावतात. त्याचबरोबर आपण स्वबळावर मिळवलेल्या यशाचे मानसिक समाधानही लाभू देत नाहीत. आपल्या विचारांना नकारात्मक करतात. आणि आपल्याला स्वत:पासून लांब घेवून जातात.

  तेव्हा आपण आपले चित्त स्वत:वर एकाग्र करावे आणि आपल्याला काय करण्यामध्ये रस आहे ह्याचा विचार करून त्या दिशेने पावले उचलावीत. इतरांशी प्रतिस्पर्धा लावून नावडत्या क्षेत्रात मेहनत करू लागलो. तर आपल्याला त्यात यश येणार नाही. तसेच त्या मागे घालवीलेला वेळही वाया जाईल. तेव्हा आपल्याला जमतील त्या गोष्टी करण्याकडे लक्ष केंद्रीत करावे. त्यामुळे आपला आत्मवीश्वास वाढेल. प्रतिस्पर्धा आपल्या मनाचे खच्चीकरण करतात. कारण आपण मिळवीलेल्या यशाने कधीही समाधानी होत नाही. कारण आपण कोठेतरी कमी पडलो ही भावना आपले मनस्वास्थ्य बिघडवीते.

1. आपले स्वत:विषयी चांगले मत नसते.

  जेव्हा आपण प्रतिस्पर्धांचा भाग बनतो तेव्हा त्यात स्वत:ला टिकवीण्यासाठी धडपडत असतो. कोणी आपल्या पुढे निघून जाण्याची भिती आपल्या मनाला सतत विचलीत करते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपण शक्य तितकी मेहनत घेत असतो. परंतू ती आपल्याला पुरेशी वाटत नाही. काहीतरी राहून गेल्याचा आभास आपले स्वत:बद्दलचे मत दुशीत करते. आपल्याला स्वत:मध्ये काहीही चांगले दिसत नाही. आपण केलेली प्रगती आपल्याला इतरांच्या तुलनेत कमीच वाटते. अशावेळी आपली मानसिक अवस्था नाजूक असते. त्याचा मानसिक स्वास्थ्यावर वाईट परीणाम होतो.

2. कामाचे आणि जीवनाचे संतूलन बिघडते.

  प्रतिस्पर्धांमुळे कधिकधि आपला स्वत:वरचा विश्वास डळमळीत होतो. मेहनत करून जे यश आपण प्राप्त केलेले असते. त्याचा मनापासून आनंदही आपल्याला होत नसतो. कारण त्या यशाचीही  आपण इतरांशी तुलना करत असतो. अशाप्रकारे आपण प्रतिस्पर्धांमध्ये पुरते अडकतो आणि आपले आपल्या कामावरून लक्ष विचलीत होते. नकारात्मक विचारांमुळे मनावरचा ताण वाढतो आणि आपण आपल्या जीवनात चिंता आणि नैराश्याला आमंत्रण देतो.  थेरपी घेण्याची वेळही आपल्यावर येवू शकते. एकंदरीत आपल्या जीवनाचे संतूलनच बिघडते.  

3. मनात नकारात्मक विचार येतात.

  प्रतिस्पर्धा आपल्या जीवनात चिंता आणि नैराश्य घेवून येतात. त्यांना आपण थांबवू शकत नाही. अशावेळी आपले एखाद्या विश्वासू माणसाकडे व्यक्त होणे गरजेचे असते. नाहीतर कित्येकदा पाऊल चुकीच्या मार्गावर पडण्याचीही शक्यता असते. मानसिक तणावामुळे कित्येक तरुण मुलांना व्यसनाधीन होतांना बघण्यात येते. अशावेळी त्यांना सल्ले देण्याची नाही तर त्यांच्या मनातील सल जाणून घेण्याची गरज असते. कधी कधी नैराश्य मनावर इतके हावी होते कि आत्महत्येसारखे दुर्दैवी विचारही मनाला शिवून जातात. अशारितीने प्रतिस्पर्धा एखाद्याचे जीवन संपवीण्यासही कारणीभूत ठरतात.

4. मिळवीलेल्या यशाचा आनंद साजरा करत नाही.

   जेव्हा आपण प्रतिस्पर्धांमध्ये उतरतो तेव्हा आपल्या कामाची गुणवत्ता सुधारते. कारण इतरांना टक्कर देण्यात कोठेही कमी पडू नये ह्या हेतूने आपण आणखी उत्कृष्ठ होत जातो. हेतू कितीही श्रेष्ठ असला तरीही प्रतिस्पर्धेचे गालबोट त्याला लागलेले असते. त्यामुळे स्वत:मधील चांगले बदल आपल्याला दिसेनासे होतात. मिळालेले यश मानसिक समाधान लाभू देत नाही. स्वत:वर अमर्याद अपेक्षा लादल्या जातात. आपण आपल्या क्षमतेनुसार मिळवीलेले यश आपल्याला नको असते. इतरांशी तुलना करून मिळवीलेल्या यशाची आपल्याला अपेक्षा असते. त्यामुळे आपल्याला यशाचा आनंद साजरा करता येत नाही.

   प्रतिस्पर्धांच्या ह्या युगात काहीही झाले तरीही आपले मानसिक स्वास्थ्य आपल्यासाठी महत्वाचे असले पाहिजे. आणि ते टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या विश्वासू माणसांशी संवाद साधावा. त्यामुळे मन मोकळे होते व आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर स्वत:मध्ये आत्मप्रेम जागृत करावे. काहीही झाले तरी आपल्या जीवनास पहिले प्राधान्य असले पाहिजे. कारण मनाची व क्षमतांची तयारी नसतांना प्रतिस्पर्धांना सामोरे जाणे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडविण्यास कारणीभूत ठरते. तेव्हा मेडिटेशन सोबत शारिरीक व्यायामाची सवय लावावी. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धांना सकारात्मक दृष्टीकोनातून बघावे. कारण प्रतिस्पर्धा आपल्याला जीवनात प्रगतीचा ध्यास घेणे शिकवितात. त्या आपल्यात आवश्यक सुधारणाही आणतात. आपल्यातील कमतरता भरून काढण्यास मदत करतात. म्हणून प्रतिस्पर्धांना नेहमी नकारात्मक दृष्टीकोनातून न बघता त्यांच्यामुळे आपल्यात आलेले सकारात्मक बदल बघावे. कारण प्रतिस्पर्धा वाईट नसतात तर त्यामागचा एखाद्याला मागे टाकण्याचा किंवा एखाद्याला धडा शिकवीण्याचा स्वार्थी हेतू वाईट असतो. प्रतिस्पर्धांमध्ये उतरूनसुद्धा पुढच्याच्या क्षमतांचा व यशाचा आपल्याला आदर व अभिमान राखता आला पाहिजे. तरच प्रतिस्पर्धा आपल्या मानसिक स्वास्थ्यास हितकारक ठरतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *