
जीवनाचा प्रवास हा एखाद्द्या ट्रेन सारखा असतो. आपण सगळे मिळून हा प्रवास करीत असतो. ह्या प्रवासात आपण एकमेकांची सुख-दु:खे वाटून घेतो. त्यात सहभागी होतो. एकमेकांना समजून घेतो. त्यामुळे आप-आपसात स्वारस्य निर्माण होते. नाती-गोती निर्माण होतात. मैत्रीचे सुंदर बंध निर्माण होतात, जे असे वाटते की कधिही तुटू नयेत. त्यांच्या सहवासाच्या आनंदात आपल्याला स्वत:लाही विसरून जावेसे वाटते. त्यामुळे आपण त्यांच्या साथीने प्रवासाचा आनंद घेत पुढे पुढे जात राहतो. परंतू ह्या जगात काहीही कायमस्वरूपी नसते. मग एके दिवशी अचानक एक स्टेशन येते, क्षणार्धात गाडी थांबते आणि ज्या कोणाचे ते असेल त्याला तिथेच उतरावे लागते. त्याचा प्रवास तिथेच कायमचा संपतो. मात्र गाडी पुन्हा धावू लागते आणि जो गाडीतून उतरला त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जावे लागते. पुन्हा गाडी थांबते पुन्हा कोणाचा तरी प्रवास संपतो आणि हे चक्र असेच सुरू राहते निरंतर……
ज्या व्यक्तीचा प्रवास संपला त्या व्यक्तीच्या जाण्याने रिती झालेली जागा कोणिही भरून काढू शकत नाही. आपण त्याच्या सोबत प्रवास केल्याच्या आठवणी पुढे आपले स्टेशन येईस्तोवर आपल्या मनातून क्षणभरही दूर होत नाहीत. कधी कधी आपण त्या आठवणींनी अतिशय व्याकूळ होतो. आपल्याला आपले दु:ख व्यक्त करावेसे वाटते. गुडघ्यावर वाकून आकाशाकडे बघत ओरडावेसे वाटते. आपला जीव घाबरा-घुबरा होतो. मग कधीतरी आपण सावरतो. कारण लोक आपल्याला काय म्हणतील ह्याची आपल्याला जाणीव होते. कारण ह्या परिस्थितीतून आपण एकटेच जात नसतो. तर प्रत्येकानेच आपल्या जीवनप्रवासात कोणाच्या न कोणाच्या जाण्याचे दु:ख पचविलेले असते. हे विसरून चालत नाही. तरिही आपले मन मानत नाही. आपली ही अवस्था किंवा आपल्याला होणारे दु:ख आपल्या व्यतिरीक्त कोणिही समजून घेत नाही. अशावेळी लोक आपल्याला विवीध सल्ले देतात. आपली मनस्थिती नकारात्मक झाली आहे ह्याची आपल्याला जाणीव करून देतात. मन घट्ट करा असे सांगत आपले सांत्वन करतात. आपल्याला इतरांची उदाहरणे देवून समजविण्याचा प्रयत्न करतात. परंतू आपण शांत का व्हावे? लोकांची पर्वा न करता गेलेल्या माणसासाठी आपले मनात उचंबळून येण्यार्या भावना व्यक्त करणे हे सहाजिक आहे. अन्यथा भावनांचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही.
आपल्याला हवा तितका काळ आपण त्यातून निघावयास घेणे आवश्यक असते. त्यात काहिही चुकीचे नाही. परंतू आपल्या आयुष्यातून गेलेली व्यक्ती पुन्हा कधिही परत येणार नाही हे कटूसत्य पचविण्याची मात्र आपली तयारी असली पाहिजे. काही लोक संवेदनशील असतात ज्यांना हे कळून चुकलेले असते की ही वेळ प्रत्येकावरच येणार आहे. तेव्हा ह्याक्षणी ज्या कोणावर ही वेळ आलेली आहे त्याला त्या मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी आणि मनसोक्त रडून मोकळे होण्यासाठी ते आपला बळकट खांदा समोर करतात. जेणेकरून ते आपल्या दु:खद भावनांना वाट मोकळी करून देवू शकले पाहिजे. त्याचबरोबर गेलेल्या व्यक्तीशिवाय आता आपल्याला पुढचा प्रवास करावयाचा आहे ह्या गोष्टींचा पुर्णपणे स्विकार करून व दु:ख आपल्या मनाच्या कोपर्यात आजन्म ठेवून ते धीराने पुढच्या प्रवासाला लागतात. जसजसा काळ पुढे सरकत जातो. मनातील तीव्र वेदना नीवू लागतात. कारण काळच प्रत्येक गोष्ट भरून काढण्यास मदत करतो. जाणारा कितीही जवळचा असला तरी त्याच्या जाण्याने आपल्या जीवनाचा अंत होत नसतो. तेव्हा आपण आपल्या जीवनाचा उद्देश शोधून काढला पाहिजे. आपल्या जगण्यास अर्थ प्राप्त करून दिला पाहिजे. आपण ह्या जगात एकटे आलो होतो. परंतू जीवनप्रवासात आपल्याला प्रेमाची आपुलकीची माणसे भेटली. त्यांच्या आपल्या आयुष्यात येण्या मागेही काही सखोल अर्थ दडला होता. आयुष्यात त्यांच्या सहवासाने आपल्या नश्वर देहातील जीवन उर्जा विकसित होण्याची ती प्रक्रिया होती. परंतू आपल्या मनातील भावना ह्या सर्व गोष्टी स्वीकारत नाहीत. कारण त्यांना नाती जोडणे व त्यांच्याशी भावनिक रित्या संलग्न होण्याची भाषा कळते. त्यामुळे विरहाचे दु:ख त्यांना सहन करता येत नाही. त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्यातून वजा झालेल्या आपल्या जीवलगान्च्या जाण्याचे दु:ख सहजा सहजी पचवू शकत नाही. परंतू आज आपण कोणासाठी तर उद्या कोणी आपल्यासाठी ह्या दु:खाला सामोरे जाणारच आहोत. हे जीवनाचे कटुसत्य कोणीही बदलू शकत नाही. तेव्हा ह्या दु:खाच्या सावटा बरोबरच आपल्याला ह्या कटुसत्याचाही विसर पडता कामा नये. तरच आपण आपले उर्वरीत आयुष्य इतरांच्या उपयोगी पडून आनंदात घालवू शकतो.
1. शोकाकूल भावनांना पुर्णपणे मोकळीक द्द्यावी.
जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या जाण्याचे दु:ख अनुभवतो. तेव्हा आपल्याला आपल्या सभोवतालचे लोक धिराने घेण्याचे सल्ले देतात. कणखर राहण्याबद्दल सांगतात. परंतू आपण त्यांनी दिलेल्या सल्ल्यांच्या दबावात येवू नये. ते आपल्या काळजीपोटी बोलत असतात. परंतू त्याक्षणी आपल्याला झालेल्या दु:खाचे शब्दात वर्णन करता येत नाही. आपले प्रिय माणूस आता आपल्या आसपास नाही हे बदलता न येणारे सत्य अत्यंत जीवघेणे असते. त्या व्यक्तीबरोबर घालविलेल्या कटू, गोड आठवणींनी आपला जीव कासाविस होतो. काळ पुन्हा मागे यावा व पुन्हा त्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभावा असे खोल अंतरातून आपल्याला वाटत असते. हे आता शक्य नाही हे कळत असूनही वेडे मन स्वत:ला समजवत असते. तेव्हा आपल्याला इतरांना ह्या बाबतीत काहिही स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नसते. आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गमावण्याच्या दु:खाने अनेक रात्री जागून काढल्या असतात. त्या व्यक्तीच्या जाण्याने आपल्या जीवनात आलेला रितेपणा कशानेही भरून काढता येण्यासारखा नसतो. तेव्हा आपल्या भावनांना वेळेच्या स्वाधीन करून व हवा तितका वेळ घेवून हळूहळू मोकळे होवू द्यावे. त्यांना मनात कोंडून ठेवण्याची चूक करू नये.
2. दु:ख व्यक्त केल्याने आपण कमजोर होत नाही
जेव्हा आपण जीवनातील कटूसत्याचा सामना करत असतो तेव्हा आपल्याला गमावलेल्या व्यक्तीशिवाय जगणे निरर्थक वाटू लागते. जगण्याबद्दल आपल्या भावना नकारात्मक होतात. तरिही आपण स्वत: बद्दल एकही नकारात्मक शब्द काढू नये. गेलेल्या व्यक्तीच्या पाठीमागे उरलेल्यांना होणारा त्रास आपल्यालाही होणारच. अशावेळी मित्रांना भेटा व नविन लोकांशी ओळख पाळख करा, कितीदिवस असे निपचीत पडून राहणार, असे सल्ले काही लोक देतात. कारण त्यामुळे आपण लवकर सामान्य स्थितीत येवू असे त्यांना वाटते. परंतू हा आपल्या जीवनातील कटू प्रसंग असतो. आपल्या प्रिय व्यक्तीच्या जाण्याने आपण पार खचून गेलेलो असतो. तेव्हा त्यामधून सामान्य स्थितीत येण्यासाठी घाई करणे योग्य नाही. त्याचबरोबर त्या गोष्टींचा आपल्याला विसर पडणे तर आयुष्यात कधिही शक्य होत नाही. आता पुन्हा कधिही आपण त्या प्रिय व्यक्तीस मिठी मारू शकणार नाही. त्याचा आवाज ऐकू शकणार नाही. ह्या विचारांनी आपल्या दु:खाचा आवेग आणखीच वाढतो. परंतू दु:खाला मनातून मोकळे होवू देणे आपल्याला कमजोर बनवत नाही. त्या दु:खातून वाट काढतच आपल्याला पुढे जावे लागते. त्याक्षणी ही आपली अत्यंत कठीण परिक्षा असते.
3. काळ मनावरच्या जखमा भरून काढतो.
काही काळ जावू दिल्यानंतर मोठ्यातले मोठे दु:ख भरून निघते. त्याचबरोबर त्यामुळे आपल्या मनाला झालेल्या खोलवर जखमाही हळूहळू बर्या होवू लागतात. परंतू जेव्हा ती तारीख किंवा दिवस पुन्हा येतो. जेव्हा ती दुर्दैवी घटना आपल्या आयुष्यात घडली होती. तेव्हा मात्र पुन्हा त्याच दुखद आठवणी मनात दाटून येतात. पुन्हा त्याच मानसिकतेतून आपण जातो परंतू त्याकरीता स्वत:ला थांबवू नये. कारण त्या भावनांमधून पार झाल्यावरच मनावरचा ताण कमी होण्यास मदत होते. अशावेळी डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली पाहिजे. एकांतात बसून आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या मनास समजविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रिय व्यक्तीचा दुरावा कितीही असहनीय असला तरीही परिस्थितीत बदल येणे आता शक्य नाही. तेव्हा एकटेपणाचे दु:ख गिळून पुढचा जीवनप्रवास निरंतर सुरू ठेवला पाहिजे. परंतू त्यातून आपल्याला हळूवारपणे सामान्य स्थितीकडे वळायचे आहे हे ही ध्यानात ठेवणे गरजेचे असते. असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास आपण पुन्हा जगायला लागतो. परंतू जरा बदललेल्या स्वरूपात कारण जीवनाचे नियम कठोर असतात. तरिही कटूसत्याला पचवून जगणे सोपे नसते.
4. भावना बोलून दाखवाव्यात
आपल्या प्रिय व्यक्तीच्या जाण्याला काही काळ लोटल्यानंतर आपले सगेसोयरे व आपले जीवलग मित्र ह्यांच्याशी संपर्क करावा जे आपल्याविषयी कोणतेही मत बनविल्या शिवाय आपल्याला ऐकूण घेतील. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे कि आपण एकटेच असे नाही जे प्रिय व्यक्तीच्या विरहाने कोलमडून गेले आहोत. प्रत्येक जण ह्याच मार्गाने आपले दु:ख व्यक्त करित असतो. कोणी रडतो तर कोणी पार कोलमडून जातो. ह्याचा अर्थ हा होतो की आपल्या मनात जाणार्या साठी अपार प्रेम होते. त्याचे असे आपल्या आयुष्यातून अचानक निघून जाणे आपल्यासाठी मोठा आघात असतो. परंतू तरिही दु:खाच्या समयी आपण स्वत:ची काळजी घेणे विसरू नये. स्वत:बरोबर सौम्यतेने वागावे. आपल्या मनाची आणि शरिराची काळजी घ्यावी. मृत्यू हे शाश्वत सत्य आहे तेव्हा गेलेली व्यक्ती पुन्हा परत आपल्या आयुष्यात येणार नाही. तेव्हा स्वत:ला अती त्रास करून घेणे म्हणजे आपला वेळ वाया घालविण्या सारखे आहे. त्यामधून काहिही निष्पन्न होणार नाही. जो ह्या सृष्टीचा एक कण होता तो सृष्टीकडे परत गेला ह्या गोष्टीचा लवकरात लवकर स्विकार करण्यातच सर्वांचे भले असते.
मित्रांनो, मानसिक वेदना ह्या शरिरावरील जखमांसारख्याच असतात. फक्त त्या डोळ्यांनी दिसत नाहीत. परंतू भरून निघण्यासाठी मात्र तितकाच किंबहूना त्याहून जास्त वेळ घेतात. अशावेळी आपण स्वत:ला कोठेतरी गुंतवणे गरजेचे असते. जसे आपल्या आवडीचे छंद जोपासले पाहिजे. त्याचप्रमाणे निसर्ग सान्निध्यात वेळ घालवीला पाहिजे. ज्यामुळे मनाला पुन्हा उभारी येण्यास मदत मिळेल. जेणेकरून आपण गमावलेल्या आपल्या माणसांच्या दु:खातून बाहेर पडणे तसेच जीवनात सामान्य स्थितीत परतणे आपल्यासाठी सोपे होईल. काळाबरोबर कठिन वेळाही पार पडतात आणि एके दिवशी सर्वकाही सामान्य स्थितीत येते.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)