प्रेम

प्रेम ह्या दोन अक्षरी वाटणार्‍या  शब्दात विश्वाची भव्यता सामावलेली आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात  म्हणून ते भावनेने व्यक्त केले जाते. प्रेमात बोलणे कमी आणि समजणे जास्त असते. प्रेमाचा अर्थ प्रगाढ आणि सखोल असतो. प्रेमाशिवाय सगळेच निरर्थक असते कारण प्रेम चराचरात बहरलेले आहे. वृक्षवेलीत सामावलेले आहे. प्रेम म्हणजे आई. जिच्या प्रेमास आपण वात्सल्य माया असे संबोधतो. आईचे प्रेम सर्वात श्रेष्ठ मानल्या जाते. कारण त्यात निस्वार्थ भाव असतो. प्रेम म्हणजे जन्मभूमी. ही काळीमाती जी स्वातंत्र्य विरांच्या पावन स्पर्शाने पवित्र झाली आहे. ह्या काळ्या मातीचे प्रेम अबोल असते. तिच्या उदरात पडलेल्या एक-एका दाण्याला ती आपल्या प्रेमाची उब देते. आणि शेतकर्‍यांच्या घरात धान्याच्या राशी लागतात. प्रेम म्हणजे देशप्रेम. ज्या देशाचे आपण नागरीक आहोत आणि  जिथले आपण मिठ खातो त्यास नेहमी जागले पाहिजे. आपले प्रत्येक पाऊल देशाच्या प्रगतीसाठी पडले पाहिजे. इथे राहणार्‍या प्रत्येक माणसाच्या मुलभूत गरजा भागाव्यात ह्यासाठी आपला खारीचा वाटा असला पाहिजे.

     प्रेम हे त्याग,  बलिदान, विश्वास तसेच श्रुंगार ह्या सुंदर गोष्टींचे एकमेव प्रतीक असते. प्रेम म्हणजे मनाला जपणे असते. प्रेम म्हणजे पालनपोषण आणि विकास असतो. आपल्यावर प्रेम करणार्‍यांच्या आयुष्यातील आपले मौल्यवान स्थान म्हणजे प्रेम असते. जेव्हा आपण निसर्गावर प्रेम करतो तेव्हा त्यात रममाण होतो. जेव्हा आपण मातृभूमी वर प्रेम करतो तेव्हा तिच्यासाठी प्राण पणास लावण्यास तत्पर असतो. जेव्हा आपण प्राणिमात्रांवर प्रेम करतो तेव्हा आपल्याला दगडातही देव दिसतो. ही संपुर्ण सृष्टीच प्रेमाने चिंब झालेली अनुभवास येते.

1. प्रणय-प्रेम

   प्रणय प्रेम म्हणजे दोन प्रेम करणार्‍या जीवांचे मिलन असते. जे सहचर- सहचारिणी यांच्यातील दयेने येते. प्रणय प्रेम नविन जीवनास जन्म देते. प्रणयात दोन अंतर्मन एकमेकात गुंतून जातात. त्यांना कोणीही वेगळे करू शकत नाही. त्यांच्यातील विश्वास इतका मजबूत असतो. कि एक-दुसर्‍या शिवाय राहण्याची ते कल्पनाही करीत नाहीत. एका जादूई दुनियेत असल्याचा भास प्रेमात असलेल्यांना होतो. जिथे आपल्या जोडीदाराच्या रागावान्यामागाचे आपल्यावरचे घनिष्ट प्रेम व त्याच्या हसण्यामागे दडलेल्या वेदना आपण समजू शकतो. तिथे प्रणय प्रेमाची अनुभूती फक्त शारीरिक स्तरावर मिळवण्याचा आग्रह नसतो. तर आपल्या सहवासाने जोडीदाराचा आत्मसम्मानही जपला जातो. जोडीदाराचा सम्मान चारचौघात तसेच एकांतातही राखला जातो. कारण जोडीदाराची वारंवार थट्टा मस्करी करून त्याचा अपमान करण्याला प्रेम म्हणत नाहीत. एकमेकांच्या व्यक्तीगत वेळेचा व व्यक्तीगत क्षेत्राचा मान राखून तसेच परस्परात माणुसकीचे अंतर ठेवूनही प्रेम जपून ठेवता येते.

2. कुटूंब-प्रेम

   आपल्याला कुटूंबाचे प्रेम लाभणे म्हणजे आपले अहोभाग्यच असते. कुटूंब प्रेम हे निस्वार्थ आणि विनाअट असते. जे आपले पालनपोषण करते. तसेच आपला विकासही करते. ते आपल्याबद्दल कोणतेही मत बनवत नाही. आपल्या जीवनातील उतार-चढावाच्या क्षणात कुटूंब प्रेमच आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे असते. कुटूंबीय आपल्या प्रगतीकडे नजर लावून बसलेले असतात. ते पाण्याप्रमाणे आपल्यातील उणीवरूपी भेगा भरून काढतात. तसेच आपले आयुष्यही घडवितात. कुटूंब प्रेम हे आपल्या सभोवताल असलेले एक असे सुरक्षा कवच आहे. जे आशीर्वाद सद्भावना विश्वास माया प्रोत्साहन मोलाची साथ मोलाचे मार्गदर्शन अशाप्रकारच्या विविध स्तरांनी बनलेले असते. एकप्रकारे त्यात देवाचे अस्तित्वच सामावलेले असते. म्हणूनच आयुष्यात आपल्याला पदोपदी कोणीतरी अलगद उचलून संकटातून पार केल्याची अनुभूती होत असते.

3. मित्र-प्रेम

   खर्‍या मित्राची साथ ज्याला लाभली. तो अत्यंत श्रीमंत मनुष्य असतो. जो आपला खरा मित्र असतो तोच आपल्यावर सगळ्यात जास्त रागवतो. कारण तो आपल्यातील आणि आपल्याविषयी काहीही वाईट बघू शकत नाही. जो आपल्या कठीण काळात आणि अत्यंत आनंदाच्या क्षणातही आपल्या बरोबर असतो. आपला मित्र आपलीच प्रतिकृती असतो. दोन मित्रांमध्ये अपेक्षांना जागा नसते. निरपेक्ष आणि निस्वार्थ नात्यालाच मैत्री म्हणतात. जेव्हा कठीण समयी मित्र आपल्या बरोबर उभा असतो. तेव्हा आपली हिंमत द्वीगुणीत होते. मैत्रीत मित्राने कशाही प्रसंगी आपल्याला आवाज दिल्यास धावून गेले पाहिजे. मैत्रीत मित्र वाईट मार्गावरही असला तरी त्याची साथ अजिबात सोडू नये. तर त्याचा हात धरून त्याला योग्य मार्गावर आणण्यास आपल्या हृदयाचा कस लावावा. मैत्रीत गरीब श्रीमंत तसेच जातधर्म असा भेदभाव मनात नसावा. तर मैत्रीने माणुसकीला जन्म द्यावा.

4. भाऊ-बहिणीचे प्रेम

   भाऊ-बहिणीचे प्रेम आपल्या अंतर्मनासारखे निरागस आणि शुद्ध असते. भाऊ-बहिणीचे नाते रेशमी धाग्यांप्रमाणे नाजूक असते. एकाच घरात जन्म घेतात. परंतू तरिही एकमेकांपासून लांब राहून व सुरक्षित अंतर त्या नात्यातील प्रेम आजीवन जपायचे असते. माफ करणे आणि स्विकारणे ह्या दोन्ही गोष्टीची वरची पातळी ह्या गोड नात्याने गाठलेली असते. हे प्रेम सहायक असते. ह्यात अपमान जनक काहीही नसते. भाऊ बहिणीतील अतूट प्रेमाने स्त्री पुरुषातील संबंधाला निकोप शुद्धता आणली. ज्यामुळे समाजात स्त्रीयांप्रती सभ्य आचरण व नजरेत आदर असण्याला महत्व प्राप्त झाले.

5. आत्म-प्रेम

   आत्मप्रेम सर्वात महत्वाचे असते. जेव्हा आपण स्वत:वर प्रेम करतो तेव्हाच आपल्यातील त्रुटींना सुंदर आणि अद्वीतीय बनवीतो. कारण तेव्हा आपल्याला त्या त्रुटींची लज्जा वाटत नाही. तर त्यांना मिरवतांना अभिमान वाटतो. आपण स्वत:वर प्रेम करण्यास असमर्थ असलो किंवा आत्मप्रेम म्हणजे स्वार्थीपणा वाटत असल्यास. आपण अन्य व्यक्तीच्या  प्रेमाचाही स्विकार करू शकत नाही. तसेच इतरांच्या भावना समजण्यात कमकूवत ठरतो. आत्मप्रेम आपल्याला माणुसकीच्या उच्च स्तराला गाठण्याचे सामर्थ्य देत असते. तेव्हा स्वत:विषयी नकारात्मक बोलणे थांबवावे. जे घडण्यापासून थांबवू शकत नाही त्याचा अतिविचार करू नये. आणि आत्मप्रेमाने सर्वत्र आनंद पसरवावा.

    प्रेमाची महती सर्व दिशांना व्यापून टाकते. प्रेमाने अशक्य वाटणार्‍या  गोष्टी सहज शक्य होतात. प्रेमाची शक्ती वाईट प्रवृत्तींचा नायनाट करण्यास समर्थ आहे. प्रेमाने सर्व प्राणिमात्रास एकत्र बांधून ठेवले आहे. प्रेमच आपल्याला योग्य मनुष्य बनण्यास प्रवृत्त करते. प्रेमाइतके सुंदर जगात काहीही नाही. तेव्हा आपल्या कणा-कणात प्रेमास भिनवावे. प्रेम समजावे. तसेच सर्वत्र प्रेमाचा प्रसार करावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *