
आपणही ऐकले असेलच कि हंस पक्षी जीवनात एकदाच जोडा बनवितो. तसेच आपल्या जोडीदारासोबतच्या नात्याला त्याच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत निभवतो. इथे आपल्याला खरे प्रेम आणि त्याला आयुष्यभर निभावल्या गेल्याचे मुर्तीमंत उदाहरण बघायला मिळते. कधी एखाद्या वयोवृद्ध जोडप्यास एकमेकांचा हात हातात घेवून एकमेकांना आधार देत रस्त्याने जातांना बघा. त्यांनी त्यांच्या तरुणपणातील त्या दिवसात एकत्र येवून एकमेकांप्रती व्यक्त केलेले प्रेम आणि ते आजीवन सांभाळल्याचे हे प्रतिक आहे. जीवनात एकमेकांसोबत त्यांनी अनेक संकटांना तोंड दिले असणार. अनेक खडतर वाटा पार केल्या असणार. अनेक आनंद देणार्या आठवणींनी त्यांची झोळी भरलेली असणार. कित्येकदा ते भांडले असणार. एकमेकांच्या इच्छा व आकांक्षा पुरविल्या असणार. एकमेकांच्या साथीने जीवनाचे चढउतार पाहिले असणार. एकमेकांचा गुण-दोषां सकट मनापासून स्विकार केला असणार. त्यांचे नाते परस्परांची साथ निभवल्याचे यशस्वी उदाहरण आहे. तेव्हाच ते इथवर पोहोचले आहेत.
कोणाकडे आपले प्रेम व्यक्त करणे ही एक सुखावणारी गोष्ट आहे. त्याहून जास्त महत्वाचे आहे प्रेमाचा सखोल अर्थ समजून घेणे. कारण प्रेम ही कोमल व सुंदर भावना असते. एक उगम असतो. परंतू प्रेमाच्या प्रवाहाचा प्रवास मात्र खडतर असतो. तेव्हा त्यास वरवर घेवू नये. कारण जीवनातील कठीण काळातच प्रेमाची खरी परीक्षा होते. तसेच शारिरीक सौंदर्याच्या आकर्षणाला कधीही प्रेम समजू नये. प्रेम ही अंतर्मनाची कळवळ असते आणि ती अंतर्मनालाच कळते. एवढ्या मोठ्या जगात कोणीतरी आपली निवड केली आहे. ही कल्पनाच मनाला उभारी देणारी असते. त्यासाठी कोणत्याही विशेष दिवसाची गरज पडत नाही. त्याचप्रमाणे प्रेम व्यक्त करण्यास शब्दांचीही आवश्यकता नसते. प्रेमाचा स्पर्श विश्वास निर्माण करणारा असतो. प्रेम डोळ्यातून व्यक्त होते. तसेच त्याला मनाची भाषा कळते. आपल्या जोडीदाराला त्याच्या कठीण काळात दिलेली निरपेक्ष साथ म्हणजे प्रेम असते. आपल्या जोडीदाराचे अनोखे गुपीत आजीवन आपल्या मनात जपून ठेवणे म्हणजे प्रेम असते. ज्यात कितीही कठिण समयी टिकून राहण्याचे सामर्थ्य असते ते म्हणजे प्रेम असते. जे कोणत्याही अटीशिवाय उभे राहते ते प्रेम असते. प्रेम ही सुंदर अनुभूती आहे. ती फक्त अनुभवायची असते. त्याचप्रमाणे त्यातून बरेच काही शिकत जायचे असते. आकंठ प्रेमात बुडालेल्या दोन जीवांनी एकमेकांचा हात घट्ट पकडला कि आयुष्यात येणारी वादळं आपोआप शांत होतात.
जेव्हा प्रेमात मनाचे पावित्र्य पाहिले जाते. तसेच जीवनातील कठिण काळात जोडीदारास भक्कमपणे साथ दिली जाते. तेव्हा त्याला प्रेम निभावने म्हंटले पाहिजे. कारण प्रेमाचा कधिही अंत होत नाही. ते कायम अजरामर होते. म्हणूनच शारिरीक सौंदर्याच्या तसेच संपत्तीच्या आसक्तीला प्रेमाची उपमा देणे योग्य नाही. प्रेम दोन अंतर्मनांना कायमचे जोडते. खर्या प्रेमाची ताकद संपुर्ण सृष्टीला व्यापते.
1. प्रेम मनोबल वाढविते
प्रेम शक्ती प्रदान करते. मनाचे खच्चीकरण होवू देत नाही. आपल्या महान इतिहासात अशा जोडप्यांचा उल्लेख आहे. ज्यांनी समाजाच्या कठोर नियमांना झुगारून तसेच घरच्यांचा राग पत्करून. आपल्या जोडीदारास पाठींबा देण्यासाठी त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आपल्या जोडीदाराला आयुष्यात स्वावलंबी करण्यासाठी वेळप्रसंगी कडक शिस्त लावली. त्यासाठी ते कठोर झाले. ते करण्यासाठी त्यांना आपल्या जोडीदाराची कधी आई तर कधी वडील व्हावे लागले. समाज व्यवस्थेच्या प्रवाहा विरुद्ध जावून त्या जोडप्यांनी एकत्रितपणे अशी समाजकार्ये केली. कि आजही आजच्या युगासाठी ते खर्या जीवनातील नायक-नायीका आहेत. त्यांची नावे घेतांना आपल्याला अभिमान वाटतो. भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी. ज्या पतीच्या उच्च शिक्षण घेण्याच्या आग्रहा खातर आणि नंतर स्वत:च्या इच्छेने विदेशातून डॉक्टर झाल्या. अशा काळात जेव्हा स्त्रि शिक्षणावर बंदी होती. रमाबाई महादेव रानडे ज्यांना त्यांच्या पतीने घरच्यांचा विरोध पत्करून शिक्षण दिले. इंग्रजीचे शिक्षण दिले. तसेच पुढे त्या दोघांनी सोबत आणि पतीनिधनानंतर रमाबाईन्नी एकट्याने समाजकार्य पुढे निरंतर सुरू ठेवले. हे सर्व त्यांना प्रेमाला शेवटपर्यंत निभवल्याने तसेच समर्पीत झाल्याने शक्य झाले.
2. प्रेम आपल्याला बदलण्याचे धाडस देते.
प्रेमात कोणतीही अट नसते. प्रेम स्वातंत्र्य बहाल करते. ज्यांना प्रेमाचा सखोल अर्थ कळत नाही ते एकमेकांवर बंधने लादतात. एकमेकांकडून अपेक्षा ठेवतात. आणि आपल्या जोडीदारात आपल्या हिशोबाने बदल आणण्यास निघतात. परंतू खरे प्रेम एकमेकांना पुर्णपणे समजून पुढे जाते. आपल्या जोडीदाराच्या आवडी-निवडी व त्याचे विशेष गुण तसेच त्याची जोडीदाराविषयी असलेली स्वप्न ह्या सगळ्या गोष्टींचा सम्मान राखते. प्रेमात आपण एकमेकांच्या प्रगतीसाठी झटतो. इतरांसमोर आपल्या जोडीदारास कमीपणा येवू नये म्हणून आयुष्यात कधिही न केलेल्या गोष्टी शिकून घेतो. प्रेमा खातर इतके बदलतो कि आपले स्वतंत्र अस्तित्वच उरत नाही. पुर्णपणे एकरूप होवून जातो.
3. प्रेम त्यागातून जन्म घेते.
प्रेमाच्या मार्गात खाचखळग्यांचा सामना करावा लागतो. परिकथेतील गोष्टींप्रमाणे काहीही होत नाही. प्रेम निभवल्याने प्रेमासाठी केलेल्या त्यागातही प्रेमाची प्रचीती येते. आपल्या महान इतिहासातील थोर उदाहरण म्हणजे, छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेनंतर त्यांच्या प्रिय पत्नी महाराणी येसूबाईंनी स्वराज्याची धुरा आपल्या हातात घेतली. एकीकडे पतीच्या अटकेचे दु:ख तर दुसरीकडे पतीला दिलेले वचन. ह्यात त्यांनी पतीला दिलेल्या वचनाचा मान राखला. स्वराज्याच्या छत्रपतींवर जीवाचे संकट आले असतांना त्यांच्या माघारी दुरदृष्टीने राज्यकारभार केला. आणि त्याच काळात त्यांनी स्वराज्याचे नवे छत्रपती घोषीत केले. त्यानंतर आपल्या आयुष्याचा बराच मोठा उर्वरीत काळ महाराणी येसूबाईंनी मुघलांच्या बंदीवासात काढला. हे त्यागाचे मुर्तिमंत उदाहरण आहे. प्रेम मनापासून निभवल्याने त्या पुढेही चालत राहण्याची हिंमत करू शकल्या.
4. प्रेमाची साथ देण्यासाठी जगाचा विरोध पत्करण्याची हिंमत येते.
प्रेम ही भावनाच हिंमत देणारी आहे. परंतू त्यात पोरकट्पणा नाही तर गांभिर्य असले पाहिजे. जोडीदाराची मनापासून साथ निभवल्याने दोघांचीही उर्जा एक होते. तसेच हाती घेतलेल्या कार्यात यश प्राप्त होते. युगा-युगा पासून प्रेमाचा विरोध होतांना आपण बघतो. परंतू शेवटी विजय मात्र प्रेमाचाच होतो. एकीकडे प्रेम करणारे दोन जीव तर दुसरीकडे जग. तरिही न घाबरता समाजाच्या विरोधाला सामोरे जाण्याचे बळ त्यांना येते. कोणीही आपल्या जोडीदाराचा केलेला अपमान आपण सहन करू शकत नाही. जोडीदाराचा आत्मसम्मान जपण्यासाठी स्वत:कडे वाईटपणा घेवून एकटे पडण्याचीही तयारी असते.अशावेळी प्रेमाचा विरोध करणारे आपले माणुस असले तरी त्याच्याशीही लढा देण्याची तयारी असते . ज्यांनी आपल्या अंतर्मनात प्रेमाचा नंदादिप प्रज्वलीत केलेला असतो, त्यांना कशाचीही भिती वाटत नाही.
खरे प्रेम हे अथांग सागरा प्रमाणे असते. त्याच्या सखोलतेचा अंदाज लावणे सोपे नाही. तेव्हा वर्षातून एकदा येणार्या विशेष दिवसापुरते ते मर्यादित राहत नाही. त्या दिवसासाठी होणारी जय्यत तयारी, महागड्या भेटवस्तू, मोबाईल वरील प्रेमाचे संदेश, आना-भाका एवढ्यापुरते मर्यादीत न राहता प्रेमाची खरी परिभाषा समजून घ्यावी. प्रेम कोणत्याही अटीशिवाय उभे राहत असले तरी ते आयुष्यभर निभावणे म्हणजे त्यास अजरामर करणे होय.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)