प्रोत्साहन व शिस्त

प्रोत्साहन व शिस्त ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आयुष्य यशस्वीरित्या पुढे नेण्यासाठी प्रेरक हेतू पाहिजे असतो. अन्यथा आपल्या जीवनाला काहिही अर्थ उरत नाही. एखाद्या व्यक्तीस दररोज कामावर जाण्यासाठी कोणाकडून प्रेरणा घेण्याची आवश्यकता नसते. कारण कुटूंबाप्रती असलेल्या त्याच्या जबाबदार्‍या व त्याची कर्तव्ये त्याच्यासाठी प्रोत्साहनाचे काम करतात. परंतू त्याला त्याच्या कामात उन्नती करावयाची असेल तर मात्र एका भावनिक कारणाबरोबर त्याला स्वत:ला शिस्तही लावावी लागते. त्याचप्रमाणे एखाद्या गृहिणीस तिची सामान्य दिनचर्या पाळण्यासाठी कोणतेही विशेष प्रोत्साहन लागत नाही. परंतू तिला जर आयुष्यात तिच्या स्वप्नांचा मागोवा घ्यावयाचा असेल तर सर्वप्रथम तिला तिच्या वेळेप्रती शिस्तप्रिय झाले पाहिजे. त्याचप्रमाणे रोजची कामे करून दमल्यावरही पुन्हा प्रोत्साहन मिळविण्यासाठी आपल्या स्वप्नाचे छायाचित्र डोळ्यापुढे आणलेच  पाहिजे.

   जेव्हा आयुष्यात आपल्यावर संकटं येतात तेव्हा आपण काही काळासाठी डगमगून जातो. होवून गेलेला घटनाक्रम आपल्या मनातून व विचारातून काही केल्या निघत नाही. आपल्या सोबत आपली जवळची माणसेही आपली अवस्था पाहून स्तब्ध होतात. तसेच आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी ह्या ना त्या मार्गाने प्रयत्न करत असतात. पूर्वी मिळवलेल्या यशाची पदोपदी आठवण करून देतात. कारण त्यांना आपल्या सामर्थ्याची पुर्ण जाणीव असते. त्यामुळे आपले त्या अवस्थेत असणे त्यांना बघवत नाही. अशावेळी ते आपल्याला निरनिराळ्या मार्गांनी प्रेरीत करतात व आपली मदतही करतात. अशाप्रकारे आपल्याला प्रोत्साहन अन्य व्यक्तीच्या मार्फतही मिळू शकते.

  त्याचबरोबर जीवनात स्वाभिमानाने जगण्याची आसही आपल्याला प्रोत्साहीत करते. आपल्या आत्मसम्मानाला मातीमोल करून त्या मोबदल्यात मिळालेले सुख आपल्या आत्मविश्वासाला पोखरून टाकते. जीवंत असूनही आपल्याला क्षणोक्षणी मरणयातना भोगाव्या लागतात. अशावेळी स्वाभिमानाचे जगणे जे कितीही खडतर असले तरी हवेहवेशे वाटते. जेव्हा स्वाभिमान हा प्रेरक हेतू असतो. त्यावेळी मार्गात येणारे अडथळे पार करण्याची हिंमत कितीतरी पटीने वाढते. स्वाभिमानाचा मार्ग बलिदान मागतो. तरिही त्यावरून चालतांना मान अभिमानाने उंच होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य विचार हा स्वाभिमानावर आधारीत होता. त्यामुळे सामान्य माणूस जो सर्वात जास्त होरपळला होता. त्यांच्यातूनच महाराजांचे शूरवीर मावळे जे स्वराज्याच्या अग्नीकुंडात प्राणांची आहूती देण्यास तत्पर झाले. परंतू त्यांनी आपल्या राजाच्या जीवनावर आचही येवू दिली नाही.

   काही जणांचे आयुष्य इतरांना प्रेरणा देणारे असते. कारण ते त्यांच्या हृदयात परोपकाराची भावना घेवून जगतात. त्यांना आयुष्याचा अर्थ पुरेपूर कळलेला असतो. आपले जीवन कायमस्वरूपी नसते. तेव्हा आपल्यामुळे इतरांचे जगणे सुसह्य व्हावे. तसेच निरपेक्ष मनाने आयुष्य व्यतीत करून वेळ आल्यानंतर शांतपणे ह्या जगाचा निरोप घ्यावा हाच त्यांचा हेतू असतो. ज्याप्रमाणे आपण कितीही सुगंधीत उदबत्ती लावली तरी अखेरीस तिचे राखेतच रुपांतरण होते. तसेच राखेला सुगंध नसतो. त्याचप्रमाणे मानवी जीवनाचेही असते. देहातून प्राण निघून गेल्यानंतर केवळ कलेवर उरते. त्यामुळे ज्यांना जीवनाचा खरा अर्थ कळतो ते स्वार्थ सोडून जीवनाचे सोने करण्यास निघतात. आपल्या शरिराची राख होण्या अगोदर आपण जीवंतपणी केलेल्या सुकर्मांची मधूर फळे जेव्हा आपल्या मागेही इतरांना चाखायला मिळतात. तेव्हा अशी व्यक्तीमत्वे पिढ्या न पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत बनतात.

  आपण जेव्हा आपल्या आयुष्यात काही करण्यासाठी धडपडत असतो. तो आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ असतो. कारण तेव्हा आपले ध्येय निश्चीत झालेले नसते. मनात कल्लोळ माजलेला असतो. कोठूनही योग्य मार्गदर्शन मिळण्यास पर्याय नसतो. अशातच कोठेतरी काहितरी करण्याचा आपला प्रयत्न चालू असतो. अशावेळी इतरांकडून आपल्याला बर्‍याचदा अत्यंत कठोरपणे अपमानीत करण्यात येते किंवा घालून पाडून बोलण्याचे अनुभव येतात. त्या गोष्टी आपल्या मनाला खुप बोचतात आणि तेथूनच आपल्या मनात उठून उभे राहण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. अशाप्रकारे अपमानातूनही आपल्याला प्रोत्साहन मिळते.

    अशाप्रकारे सर्वसाधारणपणे आपल्याला प्रेरक हेतू, प्रोत्साहीत करणारी आपली माणसे, इतरांचे प्ररणादायी जीवन तसेच आपला झालेला कठोर अपमान ह्या गोष्टी जीवन सार्थक करण्यास कारणीभूत ठरतात. परंतू जोवर आपल्याला त्यातून स्वत:हून उत्तेजना मिळत नाही तोवर कोणतेही प्रोत्साहन आपल्यावर असरकारक ठरत नाही. आपल्या माणसांनी आपल्यासाठी पाहिलेली स्वप्न, त्यांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा आपल्या मनापर्यंत पोहोचत नाहीत. ते आपला राग व्यक्त करतात. परंतू त्यांचा त्यामागचा निस्वार्थ हेतू आपल्याला कळत नाही. आपण भावनाशुन्य  होवून त्यांच्या मागण्या पुर्ण करणारे केवळ एक निर्जीव यंत्र बनतो. त्यामुळे त्यांच्या हृदयाला स्पर्श करू शकत नाही. अशाप्रकारे कोणत्याही प्रोत्साहनाने  आपल्याला काहिही फरक पडत नाही.

  जेव्हा कशातूनही प्रोत्साहन मिळत नसेल तर स्वत:शी निर्धार करून शिस्तबद्ध जीवन जगणे अपरिहार्य असते. आपण स्वत:शी प्रामाणिक राहून अखंडपणे आपल्या कामात लक्ष देणे म्हणजे स्वत:ला शिस्त लावणे आहे. आपल्यावर चोवीस तास कोणीही लक्ष ठेवू शकत नाही. परंतू आपण केव्हा काय करतो हे आपल्याला पक्के ठाऊक असते. जर आपल्या कृतीने आपण समाधानी आहोत. तसेच आपल्याला स्वत:वर अभिमान आहे तर अति उत्तम आहे. अन्यथा शिस्त लावून आयुष्याला योग्य वळण देणेच चांगले असते. कारण शिस्त आणि सराव ह्या दोन गोष्टी माणसाला परिपूर्ण बनवितात.

   जेव्हा घरातील मोठे स्वत: शिस्तप्रिय जीवन जगतात व स्वकृतीतून आपल्यापेक्षा लहानांच्या मनावर ठसा उमटवितात. तेव्हा आपोआपच तेही त्याच मार्गाने चालू लागतात. आयुष्यात बर्‍याच गोष्टी आपल्या सातत्याने निदर्शनात येत राहिल्याने आपण त्या शिकत जातो. तसेच आपण स्वत:हून लावलेली शिस्त ही आपल्याला प्रेरीत करते. त्याचप्रमाणे आपल्याला मानसिक व शारिरीक दृष्ट्या ध्येय प्राप्त करण्याकडे वळवीते. जीवनात ध्येय गाठण्यासाठी  शिस्त पाळणे व सराव करणे तसेच आपल्या आवडत्या गोष्टींचा ठराविक काळासाठी त्याग केल्याने आपले मन ध्येयाप्रती एकरूप होते. अशावेळी ध्येय गाठणे निश्चीत झाले असे समजावे. कारण त्या गोष्टी आपल्याला  वारंवार आपल्या ध्येयाची आठवण करून देतात. अशाप्रकारे शिस्त आपल्या मनाला विचलीत होवू देत नाही. म्हणून जेथे प्रोत्साहनाचे सर्व प्रयत्न असफल ठरतात तेथे स्वत:ला शिस्त लावून पाहिजे ते मिळवीता येवू शकते.

1. प्रोत्साहनाचा प्रभाव आपल्यावर काही काळच असतो.

  जेव्हा आपण जीवनात एक विशीष्ट ठिकाण गाठायचे ठरवितो. तेव्हा त्यासंबंधीत माहिती घेण्यासाठी तसेच तिथे पोहोचण्यास प्रोत्साहन मिळवीण्यासाठी त्याच्याशी निगडीत पुस्तकांचे वाचन करतो. तसेच काही सेमिनार मध्ये उपस्थित राहतो. हे सर्व आपण त्या वरिष्ठांच्या सांगण्यावरून करतो ज्यांनी त्या क्षेत्रात स्वत:चा मोठा नावलौकिक मिळवीलेला असतो. त्यामुळे ते आपले मार्गदर्शक असतात. परंतू जेवढा काळ आपण त्यांच्या सहवासात असतो. तसेच त्यांच्या सल्ल्यानुसार काम करत असतो आपल्यात उत्साह असतो. सेमिनार व पुस्तकांचा प्रभावही काही काळच आपल्यावर असतो. परंतू जर त्यामधून आपल्याला स्वअनुभूती झाली नाही. तर पुन्हा आपल्या खर्‍या विश्वात परतल्यावर त्यामधून मिळालेले प्रोत्साहन हळूहळू कमी होवू लागते. बर्‍याचदा त्यातून काहिही निष्पन्न होत नाही. कारण सेमिनार दरम्यान ज्या स्वप्नांची आपण कल्पना करतो. ती खर्‍या आयुष्यात प्राप्त करणे वाटते तितके सोपे नाही ह्याची आपल्याला जाणीव होते. त्यामुळे आपली मानसिक शांतताही भंग पावते.

2. मनात तुलनात्मक भाव निर्माण होण्याची शक्यता असते.

   जेव्हा प्रोत्साहन घेण्यासाठी एखाद्या  यशस्वी व्यक्तीचे उदाहरण आपल्या समोर ठेवण्यात येते. तेव्हा आपण नकळतपणे स्वत:ची तुलना त्या व्यक्तीबरोबर करू लागतो. त्याचबरोबर आपोआपच आपल्या मधील व आपल्या आयुष्यातील कमतरता आपल्या निदर्शनात येवू लागतात. कधिकधी स्वत:विषयी कमीपणा वाटू लागतो. कारण आपण त्यांच्या यशाकडे बघतो परंतू त्यांच्या प्रवासाचा संघर्ष आपल्याला ठाऊक नसतो. आज ते ज्या ठिकाणी पोहोचले आहेत ती उंची आपल्याला सुद्धा गाठायची असते. परंतू आता आपली क्षमता बघता अचानक मनात शंकेची पाल चुकचूकू लागते. त्यामुळे स्वत:वरचा विश्वास डळमळीत होतो. मनात निर्माण झालेले तुलनात्मक भाव आपल्याला कमजोर बनवितात. परंतू जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले मनोबल खचता कामा नये ही काळजी नेहमी घेतली पाहिजे. मानसशास्त्रानुसार आपल्या मनात तुलना निर्माण होणे सहाजिक आहे. परंतू जीवनात प्रगती करायची असेल तर आपल्या नजरेत उठणे गरजेचे असते तरच प्रोत्साहन मिळत राहील.

3. ध्येयपूर्तीसाठी लावण्यात आलेल्या तारख़ांमुळे प्रोत्साहन मिळत नाही

   आपण कोणतेही ध्येय ठरवून त्याला एका तारखेत सिमीत करतो. ही अत्यंत उत्तम गोष्ट आहे. परंतू त्याक्षणी आपल्यापाशी कार्यरत योजना नसेल तर आपल्या मनावर त्याविषयी दडपण येते. त्यामुळे आपली धरपकड होते. तसेच ध्येय पुर्ण होवू शकले नाही तर दु:खही होते. अशावेळी आपल्याला प्रोत्साहन मिळत नाही. परंतू तरिही स्वत:चे मानसिक स्वास्थ्य जपणे अत्यंत गरजेचे असते. तेव्हा काहिही झाले तरी मन स्थिर ठेवले पाहिजे. त्यानंतर ध्येयावर मन एकाग्र करून मनोमन ते पुर्ण झाल्याची कल्पना करत राहणे व सोबत आपल्या ध्येयासाठी आवश्यक त्या घडामोडी करणे सुरू ठेवावे. अशाप्रकारे सकारात्मकपणे जसजसे आपण सामोर जावू लागतो. आपल्यासामोर आणखी मार्ग उघड होत जातात. त्यासोबत आपल्या आत्मविश्वासातही भर पडते आणि त्यातूनच आपल्याला प्रोत्साहन मिळत जाते.

4. आपण स्वत:ला लावलेली शिस्त आपल्याला कायम प्रेरीत करते.

   जेव्हा आपण कोणतेही ध्येय पुर्णत्वास नेण्यासाठी स्वत:ला शिस्त लावतो तेव्हा त्या ध्येयाप्रती  सकारात्मक विचार करतो. तसेच आपल्या मनाच्या कोपर्‍यात कोठेतरी त्याच्या पुर्ण होण्याची शाश्वती असते. कारण आपण त्या ध्येयाप्रती समर्पीत झालेलो असतो. त्यासाठी आपल्या वेळेला निर्मीतीक्षम बनवीलेले असते. त्याच्याशी निगडीत कारगर योजनांवर आपले काम करणे सुरू असते. शिस्त लावल्यामुळे आपण मानसिक व शारिरीकदृष्ट्या ध्येय गाठण्यासाठी तयार असतो. तसेच मनातून आनंदी असतो. रोज च्या रोज सरावाची शिस्त आपल्याला परिपुर्ण बनवित जाते. अशाप्रकारे शिस्तप्रिय असल्याने आपल्याला जास्त प्रोत्साहन मिळते. आणि ध्येय काबीज करण्याची हमीही असते.  

  आपल्याला पदोपदी प्रोत्साहनाची गरज भासत असते. कारण दैनंदिन जीवनातील निरनिराळ्या समस्यांमुळे आपल्यातील उर्जा लोप पावत जाते. कधि जरासा आराम करून. कधि आपल्या माणसांच्या चेहर्‍यावरील समाधान बघून. तर कधी आपल्याच नजरेत स्वत:साठी सन्मान बघून आपल्याला पुन्हा ताजेतवाने होण्यास मदत मिळते. आपल्याला प्रोत्साहीत करणार्‍या ह्या अत्यंत सुरेख गोष्टी आहेत. त्यासोबत आपल्या अंतर्मनाचा आवाज व आंतरीक शक्ती कायमच आपले मार्गदर्शन करत असते. त्यानुसार स्वत:ला शिस्त लावल्यास कोणतेही ध्येय आपण गाठू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *