फटाक्यांची दहशत

आज आपल्या समाजात कालपरत्वे अनेक गोष्टींचे स्वरूप बदललेले आहे. आधुनिकतेने जणूकाही सर्वतोपरी क्रांतीच आणलेली आहे. सणवार हे खरेतर आपल्या संस्कृतीचे प्रतिक मानले जातात. त्यांना जेवढी पारंपारीकतेची झालर असेल तेवढे ते नात्यांमधला दुवा सुद्धा बनतात. परंतू आजचे जग मात्र अतिशय जलद झालेले आहे. पाच दिवसांचा दिवाळ सण जो आरोग्याचे, धनाचे, पतीपत्नीच्या सहजीवनाचे, गायी म्हशींचे तसेच बहिण भावाच्या पवित्र नात्याचे महत्व सांगतो. वर्षाला आलेले हे दिपोस्तवाचे पर्व म्हणूनच सर्वांसाठी अत्यंत शुभदायी असते. ह्या काळात आपआपल्या ऐपतीप्रमाणे सर्वच जण घराची साफसफाई घराची सजावट नवीन कपडे एकमेकांसाठी भेटवस्तू पूजाअर्चना फराळ हे सर्व सोपस्कार आनंदाने पार पाडत असतात. एकंदरीत हा परस्परात आनंद वाटण्याचा सण आहे. ह्या धावपळीच्या युगात मात्र इतकं सगळं साग्रसंगीत करणं प्रत्येकास शक्य होत नाही. तरीही काही गोष्टी सोयीस्कररीत्या वगळून सर्व निभावून नेण्याचा उत्तम प्रयत्न प्रत्येकाचा असतो. त्यातल्या त्यात सामाजिक प्रतिष्ठेची टांगती तलवार प्रत्येकाच्या विचारांना प्रभावीत करतच असते. त्यामुळे एकमेकांशी तुलना करत प्रत्येक गोष्टीचे प्रदर्शन करण्यावर जास्त भर दिला जातो. आज दिवाळीच्या दिवसात जास्तीत जास्त व आधुनिक फटाके वाजविणे हा त्यातलाच एक प्रकार झालेला आहे. खरेतर दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी करणे ही अनादी कालापासून चालत आलेली परंपरा आहे. आपल्या विजयाचा किंवा यशाचा आनंद व्यक्त करण्याची ती एक पद्धत होती. परंतू आता मात्र त्याला भौतिक श्रीमंतीची जोड मिळाल्याने एक विक्राळ रूप प्राप्त झालेले आहे. दिवाळीच्या दिवशी पणत्यांची आरास आणि विविध रंगांनी परिपूर्ण सुबक रांगोळीने रोजच्याच साध्या अंगणाचे सौंदर्य व मांगल्य अपरिमित वाढलेले असते. मात्र काही क्षणातच फटाक्यांच्या विषारी धुराने अंगणातील सात्विक वातावरण अचानक श्वास घेण्यासही योग्य राहत नाही. फटाक्यांच्या प्रचंड आवाजाने कानठळ्या बसतात. एकंदरीत पाहिले असता केवळ मौजमजेच्या नावाखाली आपल्याच महत्वपूर्ण इंद्रियांशी खेळण्याचा हा पोरकट प्रकार असतो.

वायू प्रदूषण : फटाक्यांच्या निर्मितीसाठी विषारी रसायने वापरली जातात. त्याशिवाय ज्वलंत स्फोटके वापरली जातात. जी वायू प्रदूषणात आणखीच भर घालत असतात. दिवाळीच्या त्या काळोख्या रात्री सर्वत्र पणत्या प्रज्वलीत करण्याच्या परंपरेमागे काही विज्ञान सदृश महत्वाची कारणे आहेत. नुकताच पर्जन्याकाळ संपलेला असतो. तेव्हा वातावरणात काही अनावश्यक कृमिकीटकांचे साम्राज्य पसरलेले असते. ज्यांचा आपल्या आरोग्याला अपाय होण्याची शक्यता असते. तेव्हा त्यांच्यापासून मुक्तता होवून आपल्या आसपासचे वातावरण स्वच्छ व्हावे. ह्याकरीता विशेष गुणकारी तेलाच्या वापराने पणत्या प्रज्वलीत केल्या जातात. ज्यामुळे हळूहळू वातावरण शुद्ध होण्यास मदत मिळते. असा जुन्या माणसांचाही विश्वास आहे. फटाक्यातील रसायनांमुळे मात्र काही काळासाठी संपूर्ण जीवसृष्टीस धोका निर्माण होतो. काही निसर्गास उपयुक्त कीटकांच्या जातीही कधीकधी त्यामुळे समूळ नष्ट होतात. फटाक्यांच्या विषारी धुरामुळे वातावरणात तयार होणाऱ्या थरामुळे ऋतूंच्या नैसर्गिक आगमनाला सुद्धा बाधा निर्माण होते. ज्याचे फटके आपण सहन करतच आहोत. आज अति उष्णता अतिवृष्टी दुष्काळ हे सर्व महत्वपूर्ण विषय म्हणूनच सामान्यांच्याही चिंतेचा विषय होत चालले आहेत. अगोदरच जीवनशैलीतील परिवर्तनामुळे व जीवनस्तरही उंचावल्यामुळे आपल्या सवयी निसर्गासाठी अत्यंत अपायकारक झालेल्या आहेत. त्यातल्या त्यात आपल्या क्षणीक आनंदासाठी आपण अल्पावधीतच प्रदीर्घ दुष्परीनामांना स्वत:हून आमंत्रण देत असतो. त्यातूनच आज वायू प्रदूषण हे वाढत्या आरोग्यविषयक समस्यांचे महत्वपूर्ण कारण झालेले आहे.

ध्वनी प्रदूषण : आज फटाक्यांच्या प्रकारात विलक्षण क्रांती आलेली आहे. त्यामुळेच आतिषबाजी करणे हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कित्येकांचा आवडता छंद झालेला आहे. फटाक्यांवर वाट्टेल तितका पैसा स्वखुशीने खर्च करण्याची त्यांची तयारी देखील असते. काही फटाक्यांचे आवाज कानठळ्या बसविणारे असतात. त्यांना वाजविण्यातही अनेकांना विशेष आनंद येतो. एक मनुष्य असून देखील हे म्हणतांना इतकं लज्जास्पद वाटतंय कि आपल्याला स्वत:व्यतिरीक्त अन्य कोणाचीही पर्वा राहिलेली नाही. ह्यावरून हे सुनिश्चित होते कि माणसाइतका स्वार्थी ह्या जीवसृष्टीत अन्य कोणीही नाही. आपल्या आसपास पशुपक्षी वावरत असतात. त्यांना आपल्या अशा गैरजबाबदार गैरवर्तनाचा किती त्रास होत असावा. ह्याचा जरा थांबून विचार करण्याचीही आवश्यकता आपल्याला वाटत नाही. अशारितीने आज आपल्या क्षणिक आनंदासाठी कित्येकांना अत्यंत कठोर किंमत चुकवावी लागत आहे. आपल्या संस्कृतीत सणांचे महत्व आनंद पसरविण्यासाठी आहे. तर मग पशुपक्ष्यांच्या त्रासाचा त्यात का विचार केला जात नाही. घरात राहणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या मानसिकतेवर जर फटाक्यांच्या आवाजाचा इतका परिणाम होतो. बेवारस प्राणी तर अक्षरशा इअकडे तिकडे सैरावैरा पळत असतील. आपला जीव वाचविण्यासाठी केवीलवाणी धडपड करत असतील. कित्येकांना तर आपले प्राणही गमवावे लागत असतील. आज आपल्या हृदयातील करुणा लोप पावतांना दिसतेय. ही मानवीयतेची अत्यंत दयनीय घसरण म्हंटली पाहिजे. काहीही झाले तरी आपल्या आनंदाला इतकं आत्मकेंद्रित करणं योग्य नाही. आपल्या वर्तणुकीच्या परिणामांचा विचार न करण्यात कोठेही माणुसकी दिसत नाही. माणुसकी शिवाय माणूस एक माणूस म्हणून शोभतही नाही. तेव्हा सणांचा आनंद नक्की घ्या. परंतू आपल्या आसपास नजर टाकण्यास विसरू नका. जर कोणाच्या समस्या सोडवू शकत नसाल तर त्यात भर घालण्याचाही आपल्याला काही एक अधिकार नाही. मर्यादांचे उल्लंघन आणि भौतीकतेचे प्रदर्शन अकारणच अशांतता तसेच अराजकतेस नकळतपणे पाणी घालत असते.

आरोग्यास हानिकारक : ऋतू बदलामुळे कित्येक दमा रुग्ण श्वसनाच्या विकाराने अगोदरच त्रासात असतात. नेमकं त्याच कालावधीत दिवाळी येते आणि त्यांच्या वेदनांना आणखी द्विगुणीत करते. कारण फटाक्यांची आतिषबाजी काहींसाठी अगदी स्वर्गसुख असतं. तर काहींच्या प्राणांवर थेट विघ्न म्हणून कोसळतं. कारण फटाक्यांमुळे त्या काळात हवेत प्रदुषणाच्या स्तराने उच्चकोटीचं डोकं वर काढलेलं असतं. कित्येक दमा रुग्ण त्या काळात इस्पितळात दाखल असतात. जीवन मृत्यूशी झुंज देत असतात. जरा थांबून विचार करा. आपली एक अविचारी कृती कोणाचे प्राण हरण्यास कारणीभूत ठरू शकते. तर आपला एक माणुसकीपूर्ण विचार सौजन्याचा प्रसार करण्यास सरसावू शकतो. प्रत्येक गोष्टीचा आनंद आटोक्यात राहून घेता येवू शकतो. तेव्हा अतिरेक करून कोणाच्याही आनंदावर पाणी फेरू नका. पुढच्या पिढीला सामाजीकरणात सणांच्या महत्वाचे प्रमाण देतांना आतिषबाजीला पुढे येवू देवू नका. तर स्वच्छतेचे महत्व एकत्र कुटूंब पद्धतीचे महत्व पारंपारिक व्यंजनांचे महत्व पारंपरिक पेहराव व दागिन्यांचे महत्व पूजा अर्चनेचे महत्व अभ्यंगस्नानाचे महत्व उलगडून सांगा. फटाक्यांची आतिषबाजी हा त्यामधील एक छोटासा भाग असतो. त्याला तितकेच महत्व असू द्यावे. ह्यापेक्षा उलट केल्यास पुढे येणाऱ्या काळात दिवाळीचा आनंद कोणासही घेता येणार नाही. कारण दिवाळीचे मंगलमय पर्व येताच संपूर्ण सृष्टी फटाक्यांच्या आतिषबाजीने भयकंपित होईल. अखेरीस निवड आपली आहे. फटाक्यांची दहशत कि दिवाळीचा निरामय आनंद.

एक माणुसकीपूर्ण निर्णय : मी आणि माझ्या संपूर्ण कुटूंबाने मागील तेरा चौदा वर्षापासून फटाक्यांना आपल्या आयुष्यातून पूर्णपणे हद्दपार केलेले आहे. कारण माझ्या घरातच दमा रुग्ण आहे. तिच्या त्रासात फटाक्यांच्या धुराने पडणारी भर तसेच एकेका श्वासासाठी तिच्या जीवाची होणारी तगमग आम्ही बघू शकलो नाही. तेव्हा आम्ही निदान आपल्यापुरता तरी हा निर्णय घेतला. एक दोघांच्या निर्णयाने परिस्थितीत तिळमात्रही बदल येणार नाही. हे आम्हाला ठाऊक आहे. परंतू स्वत:पुरता निर्बंध लावल्याने आज आम्ही इतरांना त्यासाठी आवाहन नक्कीच करू शकतो. पूर्वी जो खर्च आम्ही फटाक्यांवर करत होतो. त्यातून कोणतेही मानसिक समाधान आम्हाला लाभत नव्हते. उलट आपल्याच माणसाची वेदना बघून नंतर पश्चातापाच होई. आता मात्र आम्ही तो पैसा आपल्या सेवार्थ्यांना दिवाळीनिमित्त भेट म्हणून देण्यास प्रादान्य दिलेले आहे. ह्या शुद्ध विचाराला भविष्यात आणखी भव्य स्वरूप देण्याचा माझा निर्णय आहे. हा बदल स्वत:मध्ये आणल्यानंतर झालेल्या आनंदाचे वर्णन करण्यास आज माझ्यापाशी शब्द नाहीत. ही खरोखरच एक अनोखी दिवाळी आहे. आपणही एखाद्या अशाच भावनिक कारणास्तव माणुसकीपूर्ण कृतीवर शिक्कामोर्तब करून बघा. आपले मन समाधानाने भरून जाईल. ह्याची मला पूर्ण खात्री आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *