
बालपणाचा काळ सुखाचा असे म्हणणे अगदी योग्य आहे . कारण ती अगदी निरागस रुपात आपल्या जीवनाची सुरवात असते. ज्यावर भविष्यात संपुर्ण अध्याय लिहीला जाणार असतो. बालपण म्हणजे स्वच्छ व चकचकीत कोरी पाटी. बालपण म्हणजे वयाचा असा टप्पा ज्यात जसा सहवास लाभेल, जे कानी पडेल, जे डोळ्यांनी पाहू त्याचेच अनुकरण करत करत एक व्यक्तीमत्व घडण्यास सुरवात होते. बालपण म्हणजे ओली माती जिला ज्या आकाराच्या साच्यात टाकण्यात येईल तसा ती आकार घेत जाते. बालपण म्हणजे एक भक्कम पाया ज्यावर भविष्यात एक विशाल भवन बनणार असते. त्यामुळे आपले बालपण कसे गेले ह्याचा आपल्या आयुष्यावर सहाजिकच फार मोठा प्रभाव पडत असतो.
बालवयातील खट्याळपणा हा सर्वांना वेड लावणारा असतो. दिलखुलास हसणे बागडणे, स्वभावातील निरागसपणा व निखळ मन ह्यामुळे बालरूपाकडे सगळेच आकर्षीत होत असतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या प्रत्येक बाललीलेस अगदी मोकळेपणाने कौतुकाची थाप मिळत असते. कधि कधी तर मोठ्यांनाही त्यांच्या बरोबर पुन्हा एकदा लहान होण्याचा मोह आवरत नाही. परंतू प्रत्यक्षात ते जरी शक्य नसले तरी आपण स्वत:ला ह्या जगात वावरतांना मुखवटा घालण्यापासून अडविले तर आपल्यातील निरागस व निष्पाप भाव जपू शकतो.
पूर्वी जेव्हा डिजीटल युगाची सुरवात झालेली नव्हती तेव्हा बालपणाचे स्वरूप वेगळे होते. तेव्हा मुलं मैदानी खेळांमध्ये पारंगत असायची. शाळा सुटल्यावर किंवा शाळेची सुट्टी असतांना सायकल चालवीणे, कैर्या तोडून आणणे, लपंडाव, लंगडी, गारगोट्या, विटीदांडू व कंचे यासारखे खेळ खेळण्यासाठी मुलं स्वखुशीने एकत्र येत असत. परंतू ज्यांच्या घरात आर्थिक स्थिती बेताची असायची अशी मुले मात्र कामाचा अनुभव घेण्यासाठी दुकानात किंवा अन्य ठिकाणी छोटी मोठी काम करत असत. त्याचा त्यांना मोबदला मिळत असे. अशारितीने बालवयात नाईलाजास्तव सुरू झालेल्या लहान मुलांच्या कामाचे नंतर बालमजूरीत केव्हा रुपांतरण झाले हे कळलेच नाही. त्याचप्रमाणे शेतकरी कुटूंबातील मुले शेतात पालकांना मदत म्हणून काम करत असत. लहान वयापासून शेतकामात निपूण झाल्याने पुढे ते त्यांच्या आयुष्यात शेती व्यवसायाचा वारसा चालवत असत. अशाप्रकारे पूर्वीच्या काळातील बहुतांशी बालपण हे चार भिंतींच्या आत गेले नाही. तर ह्या ना त्या कारणांनी त्यास घराबाहेरच्या जगाचा सामना करावा लागला. त्याचा असा फायदा झाला कि मुलांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेली लहान मोठी कामे शिकण्याची संधी मिळाली. तसेच त्यांच्या अंगी असलेल्या त्या कौशल्यांच्या आधारे त्यांना नोकर्या मिळणे सोपे झाले. तसेच ते त्या जोरावर स्वत:चे छोटे मोठे व्यवसायही उघडू शकले.
डिजीटल युगातील बालपण मात्र फारच निराळे आहे. ह्या युगात मैदानी खेळांचे महत्व कमी झाले. कबड्डी, खोखो ह्या सारखे खेळ शाळेपुरते मर्यादीत राहिले. आता मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रशिक्षण घ्यावयाचे असल्यास घराच्या आरामस्थितीत राहून डिजीटलच्या माध्यमातून त्यांना ते उपलब्द्ध आहे. ऑनलाईन शिक्षणाची सोयही आता आहे. त्या निमीत्ताने मुलं सतत डिजीटल उपकरणांशी जुळलेली असतात. किंबहुना ती काळाची गरजच आहे. त्याचप्रमाणे सोशलमिडीयाच्या माध्यमातून त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्यांना प्रसिद्धी प्राप्त होण्याची संधी सुद्धा त्यांना मिळाली आहे. अशाप्रकारे आताच्या मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात बुद्धी चातुर्य बघण्यात येते. परंतू त्यांच्यात किरकोळ कामांची कौशल्ये शक्यतोवर कमीच असतात. कारण आयुष्यात मोठे ध्येय गाठण्याच्या प्रवासात छोटी मोठी परंतू दैनंदिन जीवनात महत्वपूर्ण असलेली कौशल्य शिकून घेण्यात त्यांना काहीही रस नसतो. अशाप्रकारे समाजात माणसाच्या पेशावरून भेदभाव निर्माण झाले. ज्यामुळे निरनिराळ्या सेवा प्रदान करणारे व्यवसाय देखील अस्तित्वात आले. अशाप्रकारे डिजीटलच्या युगातील बालपण प्रतिस्पर्धांच्या ओझ्यामुळे त्याला निसर्गाचा स्पर्श नसल्यामुळे तसेच मानसिक तणाव व मानसिक अस्वास्थ्यामुळे एकप्रकारे अभिशाप असल्याप्रमाणे वाटते.
प्रत्येक मुलाचे बालपण हे सुखाचे असतेच असे नाही. कारण कित्येक मुलांना वयाच्या त्या सोनेरी काळात दुर्दैवाने जीवनाच्या रौद्र रुपाचे दर्शन होते. तसेच कधीकधी तर संघर्षाच्या सहवासात त्यांचे बालपण दुर्लक्षीतपणे सरूनही जाते. काही मुलांच्या कोवळ्या खांद्यावर नाईलाजास्तव कुटूम्बाच्या अनेक जबाबदार्या अचानकपणे येवून पडतात. त्यांना आपल्यापेक्षा लहान भावंडांचा सांभाळ करावा लागतो. तसेच गरजेनुसार पैसे कमविण्यासाठी कामही करावे लागते. त्यामुळे शिक्षणापासून वंचीत राहण्याचीही वेळ त्यांच्यावर येते. तरिही परिस्थितीने दिलेल्या अनुभवातून ते जीवनाचे धडे गिरवीत असतात. काही मुलांच्या डोक्यावर जन्मताच छत नसते. कारण ते बेघर आई-वडीलांच्या पोटी जन्म घेतात. काहींना जन्म घेवून जगात येताच आई त्यांना पोटाशी बांधून उन्हातान्हात दोन पैसे गोळा करण्यासाठी लोकांपुढे हात पसरत असल्याचे दुर्दैवी दृश्य बघावयास मिळते. त्यामुळे पुढे ती मुले मोठी झाल्यावर स्वत:ही लोकांच्या समोर हात पसरतांना दिसतात. अशाप्रकारे मुलांनी जन्म कोठे घेतला ह्यावरून त्यांचे बालपण कसे जाईल हे ठरते.
बालपण आता मागील दशकांच्या तुलनेत तितके निरागस व निष्पाप राहिलेले नाही. कारण हे माहितीपूर्ण जग आहे. तेव्हा अगदी लहानपणापासूनच मुलांना त्या दिशेने नेण्यासाठी तयार साच्यांमध्ये समरस करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. ज्यामुळे त्यांना बालपणाचा आनंद मनाप्रमाणे घेता येत नाही. मुलांचे बालपण हरवत जाण्यास कारणीभूत असलेले आजच्या काळातील अति सामान्य होत चाललेले तरिही महत्वपुर्ण असलेले कारण म्हणजे निरनिराळ्या कारणांनी त्यांचे कमकुवत झालेले मानसिक स्वास्थ. ज्यासाठी पालक, शिक्षक व हा समाज पुर्णपणे जबाबदार असतात. आई-वडीलांचा त्यात सर्वात मोठा वाटा असतो. कारण मुलांचा आत्मविश्वास व आत्मसम्मान हा पालकांनी त्यांच्या बरोबर केलेल्या वर्तनावर विसंबून असतो. जर पालकांनी दूरदृष्टीने मुलांचे संगोपन केलेले असेल तर लहानपणापासूनच त्यांची आत्मप्रतिमा उंचावलेली असते. मात्र त्यासाठी त्यांची नितीमुल्य दणकट असली पाहिजेत. त्याचप्रमाणे मुलं त्यांच्या आजुबाजूचे जग, सजीव निर्जीव सृष्टी ह्यांच्या कडूनही धडे घेत असतात. परंतू त्यामधूनही काय शिकावे हे पालकच मुलांना सांगत असतात. त्यामुळे मुलं त्यांच्या पुढच्या आयुष्यात किती उंची गाठतील हे देखील कळत नकळतपणे पालकच ठरवीतात. तेव्हा पालकांनी मुलांना मोठेपणाचा सुसंगत अर्थ पटवून देणे गरजेचे आहे. त्याशिवाय आपल्या मुलांना घरातच दूरदृष्टीपूर्ण सहानुभूतीपूर्ण सौहार्दपूर्ण तसेच सामंजस्यपूर्ण असे स्वस्थ वातावरण कसे उपलब्ध करून देता येईल ह्याचा गांभीर्याने त्यांनी विचार केला पाहिजे.
मोठेपणाचा अर्थ आपले नाव नावाजलेले असणे असा होत नाही. तर प्रामाणिकपणे व निर्दोषपणे उन्नती करत राहणे असा होतो. कारण पृथ्वीवर अशा अनेक जागा , ठिकाणं तसेच गोष्टी आहेत ज्या अजूनही रहस्यमय आहेत. ह्याचा अर्थ त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले असा होत नाही. म्हणून पालकांनी उत्तमरीतीने पालकत्व निभावून आपल्या मुलांचे मानसिक स्वास्थ्य जपले पाहिजे. तसेच मुलांच्या व्यक्तीमत्वावर कोणत्याही गोष्टींचा नकारात्मक परीणाम होवू नये. ह्यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे. आज मुलांच्या प्रगतीच्या हेतूने पालक मुलांना अत्यंत लहान वयापासून शिक्षणाची सवय लावतात. त्यामुळे मुलांना समवयीन मुलांची संगत मिळते. पालक स्वत: जगाच्या चढाओढीचा भाग असल्याने कधि कधी ते मुलांवर त्यांच्या कोवळ्या मनाचा विचार न करता दबावही टाकतात. परंतू लहान मुलांचे मन रिकामे व संस्कारक्षम असते. त्या वयात ते त्यांच्या आसपासच्या वातावरणातून कोणताही चांगला वाईट विचार न करता मिळेल त्याचा संग्रह करत जातात. परंतू त्या काळात जर त्यांना आई-वडीलांकडून भरपूर प्रेम मिळाले. तसेच कोणत्याही प्रतिस्पर्धात्मक तसेच तुलनात्मक भावनांशिवाय ते मोकळेपणाने मोठे झाले. तर मोठेपणी त्यांच्या आत्मविश्वासाचा पाया भक्कम असण्याची शक्यता अधिक असते. लहान सहान गोष्टींनी ते कोलमडून जात नाहीत. तेव्हा पालकांनी केवळ शिक्षणाचा ध्यास न घेता. आपल्या प्रेमाने व मायेने मुलांचे मनोबल वाढवावे. आपल्या अनुभवांचे संस्कार त्यांच्यावर करावे. त्यांचे प्रत्येक गोष्टीच्या मागचे कुतूहल जाणून घ्यावे आणि योग्यवेळी त्यांचे मार्गदर्शन करावे.
बालपण हे एखाद्या कोवळ्या रोपट्याप्रमाणे असते. त्याची प्रेमाने निगरानी केली गेली नाही तर ते रानटी झाडांप्रमाणे बेशिस्त वाढते. तेव्हा त्यामागे भव्य दृष्टीकोन असला पाहिजे. भविष्यात त्यांचा विकास होण्याबरोबर ते माणूस म्हणून आदर्श बनावेत ह्या हेतूनेच बालपणीचा काळ अत्यंत जोखमीने सांभाळला गेला पाहिजे. कारण बालपण एक स्वच्छ झरा असतो. तेव्हा त्यांच्या आसपास दुषीत विचारांची माणसे तसेच दुषीत कृत्यांचे साम्राज्य नसावे. ह्याची जाणीवपुर्वक काळजी घेतली गेली पाहिजे. आपल्या अनावधानाने हे स्वच्छ पाणी घाण करणे म्हणजे महापाप करण्यासारखे आहे. हा विचार करण्याची शिक्षकांची व समाजाचीही जबाबदारी आहे.
1. मुलांपासून बालपण हिरावून घेवू नये.
बालपण हे खट्याळ असते. तसेच त्यांचे स्वच्छ व रिकामे मन त्यांच्या निरागस निष्पाप असल्याची ग्वाही देते. अशा ह्या कोर्या पाटीसारख्या मनावर आई-वडील, शिक्षक, आप्तेष्ट, शेजारी व ही सृष्टी लिहीण्यास सुरवात करतात. त्याचबरोबर त्या वयातील मुले जे नजरेत भरेल व मनास भावेल त्या सर्व गोष्टींचा आपल्या मनात स्वत:हून संग्रह करण्यास सुरवात करतात. त्यात चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी असतात. अशाप्रकारे त्यांचे रिकामे मन भरण्यास सुरवात होते. कधिकधी त्यांच्या ह्या संस्कारक्षम वयात प्रतिस्पर्धा, तुलना, अपेक्षा ह्यासारख्या त्यांच्या मनात नकारात्मक तरंग निर्माण करणार्या व त्यांच्या बालमनावर ताण आणणाऱ्या गोष्टींचा त्यांना सामना करावा लागतो. काही मुले ह्या सर्व गोष्टींना पात्रही ठरतात. परंतू ते मात्र त्यांच्या वयातील तो निष्पापपणा गमावून बसतात. तर जी मुले करू शकत नाहीत त्यांच्या आत्मविश्वासाला कायमचा तडा जातो.
त्यामुळे मुलांचे नैसर्गीकपणे खेळणे बागडणे व त्यातूनच अलगदपणे त्यांच्या जीवनाला वळण लागणे महत्वाचे असते. त्यांच्या वयाच्या अतिशय नाजूक काळात त्यांच्या मनावर झालेला कमकुवतपणाचा आघात ते सहन करू शकत नाहीत. ज्यामुळे आयुष्यभरासाठी स्वत:चा आत्मविश्वास गमवून बसतात. त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडविणार्या ह्या क्रूर गोष्टी त्यांच्यात द्वेष व मत्सर भरतात. आयुष्याप्रती त्यांचा दृष्टीकोन कडवट होत जातो. तेव्हा आता पालकांनी व शिक्षकांनी बालमनावर पैलू पाडण्यासाठी स्वत: योग्यतेचे धडे घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा असे दिशाहीन बालपण एका भावनाशुन्य समाजाच्या निर्मीतीस कारणीभूत ठरेल.
2. मुलांच्या संस्कारक्षम वयाला योग्य वळण लावावे.
बालपणाचा काळ हा सर्वात जास्त संस्कारक्षम असतो. तेव्हा ते चांगले किंवा वाईट हे अंतर न करता जे मिळेल त्याचा साठा करत जाते आणि त्याप्रमाणे आकार घेत जाते. ह्या काळात त्यांच्या आसपास कशी माणसे वावरतात, ती आपसात कशी वागतात, बोलतांना ते कशा पद्धतीच्या शब्दांचा वापर करतात, त्यांची दिनचर्या कशी आहे, त्यांच्या आवडी निवडी तसेच त्यांच्या सवयी कशा आहेत त्यानुसार मुलेही अनुकरण करत जातात. अशापद्धतीने कळत नकळतपणे वरिष्ठच मुलांच्या व्यक्तीमत्वाला आकार देत असतात. पुढे जेव्हा मुले मोठी होतात तेव्हा त्यांच्यावर झालेल्या चुकीच्या संस्कारांचे परीणाम त्यांच्या आयुष्यावर दिसू लागतात. त्याक्षणी कितीही इच्छा असली तरिही आपण त्यांच्यात कोणतेही बदल आणू शकत नाही. तेव्हा घरात लहान मुल असतांना त्याच्या समोर अविचाराने वागणे योग्य नाही. ज्या गोष्टी त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. त्या मोठ्यांनी स्वकृतीतून मुलांच्या निदर्शनात आणून द्याव्यात. मुलांना पडणार्या कुतूहलपूर्ण प्रश्नांची उत्तरे पालकांना अचूक देता यावीत. तरच मेणाप्रमाणे असलेल्या बालपणास संस्कारांच्या स्वरूपात कस्तूरीचा सुगंध व हवा तसा आकार देता येईल.
3. डिजीट्लच्या अतिरीक्त वापरापासून बालमनास वळवावे.
आजच्या काळात ज्या प्रमाणात डिजीट्लला महत्व आलेले आहे. ते बघता आज ही काळाची गरज झालेली आहे. तरिही लहान मुलांची मनं त्यापासून वळवीणे हेही तेवढेच आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणास सुरवात झाली आणि लहान लहान मुलं मोठ्या कौतुकाने डिजीटल उपकरणांच्या सहाय्याने शिक्षण घेवू लागली. शिक्षणा सोबत सोबत गेम ख़ेळणे, इंस्टाग्राम, फेसबूक सारख्या तास न तास मन गुंतवून ठेवणार्या गोष्टींमध्ये ही लक्ष देवू लागले. आणि बघता बघता त्या गोष्टी त्यांच्यातील बालपण हरविण्यास कारणीभूत ठरू लागल्या. कारण सोशलमिडीयाच्या माध्यमातून नको त्या गोष्टींचा त्यांच्या मनावर नकारात्मक परीणाम होत गेला. सध्या आई-वडीलांसाठी ही मोठी समस्या झालेली आहे. तरिही त्यांनी त्यामधून मुलांचे मन वळविण्यासाठी त्यांच्यावर कोणताही दबाव न टाकता त्यांच्यासाठी काही अशा पुस्तकांचे चयन करावे ज्या वाचतांना मुलांना मजेशीर वाटतील व त्यामधून त्यांना बोधही होईल. त्याशिवाय त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी वेळ काढावा. त्यांना निसर्गसान्निद्ध्यात घेवून जावे. त्यांच्याशी गप्पा करून त्यांचे मन मोकळे करावे. अशापद्धतीने हळूहळू त्यांचे मन डिजीटलच्या अतिरीक्त वापरापासून वळवीले गेले पाहिजे.
4. मुलांना मोठे करतांना भव्य दृष्टीकोन ठेवावा.
बालपण हे सुंदर फुलाप्रमाणे असते. तसेच मुलांच्या मनात साक्षात देवाचा निवास असतो. परंतू आपण मात्र त्यांना आपल्याला हवा तसा आकार देण्यासाठी व प्रवाहाचा भाग बनविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतो. त्यासाठी त्यांचे स्वातंत्र्य ओरबाडून त्यांच्यावर बंधने लादतो. परंतू साक्षात देवस्वरुपाचाच सांभाळ करण्यासाठी आपल्यातही पवित्रपणा असावा लागतो. आपले स्वाभिमानी असणे, आपल्या वक्तव्यात व कृतीत साम्य असणे ह्यातूनच मुलांना प्रोत्साहन मिळते. अशापद्धतीने मुलांना त्यांच्या जीवनचा हेतू गवसण्यात आपला खारीचा वाटा असू शकतो. मुलांचे आई-वडील बनून त्यांना ह्या जगात आणण्यासाठी आपण माध्यम बनलो असलो तरी त्यांच्यावर अवाजवी वर्चस्व गाजविणे हे आपले काम नाही. आपल्या कोणत्याही अनौपचारीक वागण्याने मुलांचे पवित्र बालपण घाण होता कामा नये. त्याला असलेला देवाचा स्पर्श आपल्याकडून जपला जावा. आजच्या युगातही महापुरूष, थोर महात्मे घडू शकतात. परंतू त्यांना घडविण्यासाठी सर्वप्रथम आपल्या विचारात भव्यता असली पाहिजे. त्यासोबत आपल्या हातांनाही कर्तुत्वाची झालर असणे आवश्यक आहे. मुलांना मोठे करणे हे एक पवीत्र काम आहे. कारण कळत नकळतपणे आपल्या हातून उद्द्याचे श्रेष्ठ नागरीक घडत आहेत. माणुसकीने समृद्ध असलेली पिढी घडत आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे एक पिढी लोप पावून दुसर्या पिढीचा उदय होतो. तेव्हा मागच्यांनी पुढच्यांना आपल्या अनुभवांनी संस्कारांचा व संस्कृतीचा वारसा देवून आपले कर्तव्य पुर्ण करावे. तसेच आपल्या हाती आलेल्या बालरुपातील हिर्यांना तेवढाच भव्य दृष्टीकोन ठेवून मोठे करावे.
बालपण हा व्यक्तीच्या जीवनातील महत्वाचा काळ असतो. बालपणावर पुढच्या आयुष्याची संपुर्ण भिस्त असते. तेव्हा ते कोणाच्या अत्याचारामुळे, कोणत्याही अनौपचारीक कृत्यांमुळे किंवा अन्य कोणत्याही कारणांनी चिरडल्या जावू नये. त्याला जोपासावे, त्याच्यावर संस्कार व्हावे व त्याला शिक्षणाचा लाभ घेता यावा ह्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने त्या दिशेने पावले उचलावीत. जेणेकरून प्रत्येक मुल मग ते कोठेही जन्मलेले असो मोठे होवून आत्मनिर्भर बनावे व त्याला जगण्याची दिशा मिळावी. अशाप्रकारे ह्या पुण्यमार्गाने आपल्याला माणुसकीचे ऋण फेडता येईल.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)