भीतीवर विजय कसा मिळवावा

 जीवन सुंदर आणि सीमित आहे. आपण आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण उत्साहीतपणे, आनंदाने व विपरीत परिस्थितीतून धाडसाने मार्ग काढत जगाला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या प्रत्येक क्षणास स्मरणीय व अर्थपूर्ण बनविले पाहिजे. तरच आपल्या मनाचा प्रत्येक कप्पा मोकळा होतो. तसेच आपले जीवन इतरांसाठी एक उत्कृष्ठ उदाहरण ठरते. आपण मात्र जीवनभर पैसे कमविण्याचे मशीन बनून रडत कुढत व तक्रारी करत जगत असतो. कारण अनेक जबाबदार्यांचा डोंगर आपल्या खांद्यांवर असतो. त्याखाली दबून आपण मोकळा श्वास देखील घेवू शकत नाही. आपल्या मनातील स्वप्नांचे  साहसपूर्ण विश्व आपण प्रत्यक्षपणे जीवनात निर्माण करू शकत नाही. कारण आपले पाय अपेक्षांच्या चिखलात रुतलेले असतात. त्यामुळे आपल्या मनालाही कडवटपणा आलेला असतो. असे असतांना दिलखुलासपणे जगणे तर सोडाच कोणास समजून घेवून त्याच्या पर्यंत मदतीचा हात पुरविण्याची साधी तसदीही आपण घेत नाही. अशाप्रकारे आपण अत्यंत आत्मकेंद्री होवून जीवन जगत असतो. आपली भौतिक श्रीमंती, आपला कोरडा आदर्शवाद आणि आपण इतरांपेक्षा दोन पावले सामोर आहोत हेच काय ते आपले मीपणाचे वर्तुळ असते. बाकी कोणाच्याही भावनांसंबंधीत, परोपकारासंबंधीत, समस्यांसंबंधीत आपले केवळ दूरचे नाते असते. वेळ पडल्यास केवळ बघ्याची भूमिका घेवून इतरांच्या परिस्थितीवर हसणे किंवा जास्तीत जास्त टिप्पणी देणे हे आपल्याला उत्तमरीतीने जमत असते. आपलेच पाय स्थिर नसतांना आपण इतरांची मदत करणार तरी कशी? कारण कधीही तशा प्रकारचा दृष्टीकोन ठेवून आपण स्वत:ला घडविलेले नसते. त्यामुळे आपल्यातील साहस, धाडस, पराक्रम, विश्वास, हिम्मत ह्या विशेषतांना कधीही चालना मिळू शकत नाही. जेव्हा कधी आपल्या आसपास आपल्याच माणसांना अशाप्रकारच्या मदतीची आवश्यकता पडते. तेव्हा विविध कारणे देवून आपण तेथून पळ काढतो. किंवा गरजू व्यक्तीसच दोषी सिद्ध करण्याचा सहज व सोपा मार्ग अवलंबतो. तसेच पैस्याच्या स्वरूपात मदत पुढे करून त्या आड आपल्या कमतरता लपवीन्याचाही प्रयत्न करतो. परंतू पैसा हे केवळ एक माध्यम आहे जोपर्यंत त्याला भावनांची व समंजसपणाची जोड लाभत नाही तोपर्यंत फक्त ती कोरडी मदत ठरते. 

   परंतू कधीकधी  निस्वार्थ प्रेम करणारी व निकोप मनाची तसेच कोणत्याही नात्याच्या स्वरूपात एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात अचानकपणे प्रवेश करते. त्या व्यक्तीस आपल्या विषयी सर्वकाही जाणून घ्यायचे असते. आपल्या समस्यांच्या मुळापर्यंत पोहोचायचे असते. आपल्याला भावनिक आधार देवून आपल्या दु:खावर फुंकर घालायची असते. अशी व्यक्ती आपल्यासाठी एखाद्या देवदूताप्रमाणे असते. कारण त्या व्यक्तीच्या सोबतीने व सहवासाने आपण आपल्या मनातील भीतीवर विजय मिळवू शकतो. तसेच एक उत्तम जीवनही जगू शकतो. त्या अद्भूत व्यक्तीच्या पाठबळाने व तिच्या मोलाच्या सहकार्याने आपण आपल्या मनातले साहसपूर्ण स्वप्न जीवनात साकार करू शकतो. कारण ती व्यक्ती आपल्या काही कारणाने खचलेल्या मनास विविध मार्गांनी प्रेरित करण्याचा प्रयत्न करत असते. आपले मनोबल वाढविण्याचा तिचा मूळ हेतू असतो. ती व्यक्ती आपल्याला आपल्याच भूतकाळातील यशांची आठवण करून देते. ज्यांचा आपल्या बिघडलेल्या मानसिकतेमुळे आपल्यालाच विसर पडलेला असतो. त्या व्यक्तीच्या त्या स्वच्छ निर्धारापुढे आपणही नतमस्तक होतो. कारण अशा व्यक्तीची आपल्याला साथ लाभणे हे सुद्धा एक मोठे यशच असते. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या आपल्या जीवनातील भूमिकेस आपण समजू शकलो ह्या मागेही दैवी संकेत असतो. कधीकधी अशा व्यक्तीच्या साथीने आपण आयुष्यात अशा एखाद्या ध्येयास गाठतो कि ज्यामुळे आपल्या आयुष्यास एक वेगळेच वळण लाभते. अशी व्यक्ती आपल्यासाठी आजीवन अवीस्मरनीय असते. कारण ती आपल्या मनातील भीतीवर विजय मिळविण्याचे धैर्य प्रदान करून आपल्याला मोकळेपणे जगणे शिकविते. त्याचप्रमाणे ती व्यक्ती आपल्या आयुष्यात प्रत्यक्षपणे असो किंवा नसो तिचे मोलाचे मार्गदर्शन मात्र कायम आपल्याला दिशानिर्देश करत असते.  

1 . आपल्या मनात विश्वास जागवितात 

   जेव्हा आपण आपल्या जीवनात काहीतरी मोठे गमावीन्याच्या दु:खास सामोरे जात असतो. किंवा नजीकच्याच काळात आपल्या जिवलग माणसाचा हात कायमचा आपल्या हातून सुटलेला असतो. तेव्हा आपले मन आघाताचा सामना करत असते. अशावेळी काही लोक आपल्याला सल्ले देत असतात. घडलेल्या घटने मागचे तर्क वितर्क समजावून सांगत असतात. आपण त्यातून लवकरात लवकर बाहेर यावे व जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून  बघावे अशी त्यांची तीव्र इच्छा असते. परंतू जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते. ती अशा प्रसंगी आपल्यात विश्वास जागविते. तसेच पुन्हा नव्याने उभे राहण्याचे बळ देते. आपल्या क्षमतांना जागविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करते. आपल्या मनातील भीती पासून आपल्याला परावृत्त करण्याचा तिने ध्यास घेतलेला असतो. आपल्याला प्रोत्साहित करून क्षणोक्षणी आपल्या ध्येयाची आठवण करून देते. अशा व्यक्तीमुळे आपल्या जीवनातील त्या भावनिक उलथा पालथीच्या काळात आपल्या मनात नव्याने निर्माण झालेला विश्वास हा संजीवनी प्रमाणे असतो. कारण तो आपल्या जीवनातील अत्यंत बिकट काळात आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवितो.

2 .  आपल्याला हिम्मत प्रदान करतात 

   आपल्या आयुष्यात घडलेल्या एखाद्या वाईट घटनेमुळे आपले मन आघाताग्रस्त झालेले असतांना व धास्तावलेले असतांना पुन्हा कोणत्याही गोष्टीचे साहस करणे आपल्याला जड जाते. अशावेळी आपल्या मनातील भीतीवर मात करण्यासाठी आणि आपल्याला हिम्मत प्रदान करण्यासाठी आपल्याला अशा व्यक्तीची मदत घ्यावी लागते. जीच्या मनात आपल्यासाठी निस्वार्थ भाव असतात. अशा व्यक्ती आपल्याला आपल्यातील क्षमतांची आठवण करून देतात. आपण आपल्या आतापर्यंतच्या जीवनात मिळविलेल्या यशाची यादी आपल्या डोळ्यांसमोर ठेवतात. त्याचप्रमाणे आपण आपल्यातील क्षमतांना पूर्ण न्याय द्यावा. अशी त्या व्यक्तीची तीव्र इच्छा असते. त्यासाठी ते आपल्याला पुरेसे पाठबळ देतात. जेणेकरून आपली स्थिती पुन्हा पूर्ववत व्हावी ह्या दृष्टीने त्यांचे आटोकाट प्रयत्न सुरू असतात. त्यांच्या ह्या आवेगपूर्ण वर्तनाने आपण प्रेरीत होतो. तसेच आपल्यात जागृत झालेली प्रेरणाच आपल्याला पुन्हा क्रियाशील होण्याची हिम्मत देते. 

3 .  आपल्याला सकारात्मक दृष्टीकोन देतात 

   जेव्हा आपल्यावर बिकट परिस्थिती ओढवलेली असते. तेव्हा आपल्या नाउमेद विचारांनी व मनातील भीतीने आपण तिला आणखीच बिकट बनवत असतो. आपल्याकडे कशाची कमतरता आहे. आपण काय करू शकत नाही. आपण हे करू शकणार नाही. अशाप्रकारच्या नकारात्मक विचारांनी आपल्या मनातील भीती आणखीच पुष्ठभागावर येते. त्यामुळे परिस्थिती आणखीच चिघळत जाते. आपण आपल्या विचारांनाही थांबवू शकत नाही. आपली जिवलग माणसे मात्र आपल्याला त्याही पलीकडे बघू शकतात. ते आपल्या पुढे पाउल टाकण्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नांचे भरभरून कौतुक करतात. त्यांच्या त्या प्रशंसनीय शब्दांनी आपले मनोबल वाढते. ते आपल्याला आपण खास असल्याचे भासवून देतात. जोपर्यंत आपण यश पदरात पाडून घेत नाही तोपर्यंत अत्यंत सकारात्मक भावनेने ते आपला पाठपुरावा करत असतात. 

4 .  आपल्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात 

   आपल्या मनावर कोणत्याही प्रकारचा तणाव येवू नये म्हणून प्रत्येक ठिकाणी स्वत: पुढाकार घेवून नेतृत्व करतात. क्षणोक्षणी त्यांचा मदतीचा हात आपल्या समोर असतो. आपल्याला धीर देण्याची मक्तेदारी त्यांनी उचललेली असते. ते वेळोवेळी आपले मार्गदर्शन करत असतात. आपल्या सहानुभूतीपूर्ण व विनम्र शब्दांनी आपले मन जिंकून घेतात. आपल्याला जागृत ठेवतात. आपल्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात. परंतू काहीही करून आपल्याला हार मानू देत नाहीत. आपले लक्ष आपल्या ध्येयापासून विचलीत होवू नये म्हणून आपल्याशी सर्व प्रकारे संपर्क साधून असतात. आपल्या मनात निर्माण होणाऱ्या शंका, टीकात्मक भाव ह्यांना पाळमूळ फुटू देत नाहीत. अशाप्रकारे आपली माणसे आपल्या मनातील भीती विरुद्ध लढण्यास आपली पक्की तयारी करून घेतात. आणि आपल्या यशस्वी होण्यासाठी कायम प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. 

5.   शेवटचे धाडसी व निर्णायक पाऊल उचलण्याचे धाडस 

   आपल्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्तीने अथक प्रयत्न करून आपले मनोबल इतके वाढविलेले असते कि आपण आपल्या मनातील नकारात्मक विचारांवर विजय मिळविण्यात सफल झालेलो असतो. परतू यश प्राप्त करण्यासाठी शेवटचे निर्णायक पाउल उचलण्याकरीता व संकटांचा सामना करण्याकरीता आपल्याला आपल्या दृढ निर्धाराशी मैत्री करावी लागते. आपल्या संघर्षमय प्रवासात आपल्याला मोलाची साथ देणारे आपल्या बरोबर प्रत्यक्षपणे नसले तरी त्यांनी केलेले मार्गदर्शन, त्यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास आपल्याला धाडस देत असतो. आपण आपल्या मनातील भीतीवर विजय मिळविल्या शिवाय एकही पाऊल पुढे सरकू शकत नाही. कारण शेवटी हा लढा करा नाहीतर मारा किंवा आता नाही तर कधीच नाही ह्या स्तरावर पोहोचला असतो. त्यावेळी आपण स्वत:बरोबर एकटेच असतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा निर्णायक क्षण म्हणजे आपल्यासाठी कसोटीचा काळ असतो.  कारण आपल्या एका निर्णयाने परिस्थितीत अमुलाग्र बदल येणार असतो. मनातील भीतीला कवटाळून बसण्यापेक्षा पूर्ण तयारीनिशी शेवटचा घाव घालायचा असतो. कारण त्यावरच आपले अस्तित्व टिकून राहणार असते. एकदा पाउल उचलल्यावर मार्गात येणाऱ्या अडथळ्यांच्या डोळ्यात डोळे घालून व जी स्थिती उद्भवेल त्याचा नेटाने सामना करत मनातील भीतीला आपल्या निर्धारावर विजय मिळविण्यापासून थांबवायचे असते. त्याचबरोबर शेवटी आपल्या यशावर शिक्कामोर्तब करायचा असतो. 

   आपल्या जीवनप्रवासात आपल्या मनात भीती निर्माण करण्यास अनेक गोष्टी कारणीभूत असतात. तसेच भीती ही आपल्या वर्तमान क्षणांतील घडामोडींवर नकारात्मक परिणाम करत असते. कारण भीतीमुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता ढासळते. आपला आत्मविश्वास डगमगतो. आपण स्वत:वरच टीका करू लागतो. भीतीमुळे आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य क्षतिग्रस्त होते. भीती आपल्या आनंदावर पाणी फेरते व आपल्याला चिंता करण्यास भाग पाडते. तेव्हा सर्वप्रथम आपण आपल्या मनात भीतीचे सावट कशामुळे पसरले आहे हे शोधून काढले पाहिजे. आणि त्या कारणांना आपल्या आयुष्यातून कायमचे हद्दपार केले पाहिजे. कारण भीती आपल्या हाता पायातील बळ हिरावून घेत असते. एकदा का आपल्याला आपल्या मनातील भीतीवर विजय मिळविता आला. तसेच तिला आव्हान देता आले तर आपल्याला आणखी कोणीही थांबवू शकत नाही. त्यानंतर अंधुक झालेले मार्ग पुन्हा स्पष्ट होवू लागतात. नवनवीन कल्पनांनी आपला मेंदू तेजस्वी होतो. मग परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्यावर मात करण्याचे बळ आपल्याला आपल्या आतूनच मिळत असते. अशावेळी आपण आपल्या आपबितीस कोणालाही जबाबदार धरत नाही. उलट त्यामधून शक्य तितक्या लवकर बाहेर पाडण्याकरीता जीवाचे रान करतो. आयुष्यात मोठे काहीतरी करण्याचे ध्येय असल्यास पहिली लढाई ही आपली स्वत:बरोबरच असते. कारण स्वत:ला सर्व पैलूंनी जिंकल्याशिवाय आपण काहीही साध्य करू शकत नाही. तेव्हा आपल्या मनातील भीतीने आपल्या जीवनास व्यापन्या अगोदर आपण तिला हरविले पाहिजे आणि स्वत:चा विजय घोषित केला पाहिजे.    

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *