मदतीचा हेतू व पद्धत

माणुसकी हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. प्रत्येकाने तो एक माणुस म्हणून अन्य माणसाशी वागतांना पाळणे अनिवार्य आहे.त्याचप्रमाणे आपला कोणाची मदत करण्याच्या मागचा हेतूही माणुसकीचाच असला पाहिजे. आपण कोणा गरजूस केलेली निरपेक्ष मदत आपल्या आणि गरजूलाही समाधान देवू शकली  पाहिजे. त्यामुळे मदत करतांना आपल्या मनात करुणेचे भाव असणे महत्वाचे असते.

   बर्‍याचदा आपल्या घरात जुन्या वस्तू, कपडे साठतात. आणि आपल्याला प्रश्न पडतो कि त्याचे काय करावे. कारण त्यामुळे घरात अवाजवी गर्दी झालेली असते. नव्या वस्तूंसाठी जागा राहत नाही. अशावेळी आपल्या मनात त्या वस्तू कोणाला तरी देवून टाकाव्यात हा विचार येतो. जेणेकरून त्यांनी व्यापलेली जागा रिकामी होईल व वस्तू ठेवल्या ठेवल्या खराबही होणार नाहीत. परंतू जर आपला वस्तू कोणाला देण्याच्या मागचा हेतू तेवढ्यापुरता सिमीत असेल तर त्याला मदत करणे असे म्हणता येणार नाही. कारण इथे आपण फक्त आपल्यापुरता विचार केलेला आहे. तेव्हा जर आपण अशा वस्तू ज्या आता आपल्या उपयोगाच्या नाहीत त्यांना इतर कोणाच्या उपयोगी याव्या ह्या हेतूने वेगळ्या काढून ठेवल्या. तसेच त्यामधून आपले पुर्ण स्वारस्य काढून टाकले. त्याचप्रमाणे त्या वस्तूंमुळे इतरांना चिरकाळ लाभ व्हावा ही करुणापुर्ण भावना आणि मनापासून देण्याची इच्छा ठेवून त्या वस्तू नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या स्वाधीन केल्या. तर त्या देण्याचे मदतीत रुपांतरण होते. कारण त्या देण्यामागे आपण सखोल विचार केलेला असतो.

   जेव्हा आपण माणुसकीच्या नात्याने व मनात करुणा ठेवून कोणाची मदत करतो. तेव्हा त्या व्यक्तीकडून मोबदला म्हणून काहिही अपेक्षा ठेवत नाही. तसेच मदत करून विसरूनही जातो. त्याचप्रमाणे आपण केलेल्या मदतीची त्या व्यक्तीला वारंवार आठवणही करून देत नाही. परंतू काही लोक एखाद्यावर ओढवलेल्या वाईट परिस्थितीचे हित आपल्या पदरात पाडून घेत असतात. तसेच त्याला मदत करणे असे म्हणतात. मदत मिळण्याच्या आशेने गरजू व्यक्ती मदत करणार्‍यासाठी काहिही करण्यास तयार होतो. कारण तो त्याच्या उपकारांच्या दबावात असतो. अशावेळी जर मदत करणारा त्या व्यक्तीच्या विनम्रतेचा गैरफायदा उचलत असेल. त्याचा अपमान करत असेल. तर त्याने गरजूला केलेल्या मदतीला काहिही अर्थ उरत नाही. कारण त्यावेळी मदत करणार्‍याच्या मनात दयाभाव नसतो. समोरच्यावर ओढवलेली परिस्थिती त्याच्यासाठी तेवढी महत्वाची नसते. त्याचप्रमाणे त्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्याच्याकडे वेळही नसतो. अशाप्रकारे त्याच्याकडून काम काढून घेणे व त्या मोबदल्यात जमेल ती मदत करणे अशा वाईट हेतूने केलेल्या कोणाच्याही वर्तनाला मदत म्हणता येणार नाही.

   काही जण त्यांच्या भौतिक श्रीमंतीला सर्वस्व समजतात व त्याचा त्यांना खुप अभिमान असतो. त्या अविर्भावात ते त्यांना सेवा प्रदान करणार्‍यांना व हाताखाली काम करणार्‍या कर्मचार्‍यांना माणूस म्हणून सम्मानाने वागवत नाहीत. त्यांच्यासाठी पैसा व प्रसिद्धी ही त्या माणसाच्या तुलनेत जास्त महत्वाची असते. ते त्यांच्या कर्मचार्‍यांना व सेवा देणार्‍यांना कमकूवत समजून तुच्छतेची वागणूक देतात. त्यांना स्वत:च्या दहशतीत ठेवतात. आणि त्यांच्या आत्मसम्मानाचा विचार न करता मदतीच्या नावाखाली पैस्यांचा मोह दाखवितात. तसेच त्यांच्याकडून आपली व्यक्तीगत कामे करून घेतात. ते त्यांच्या श्रीमंतीत इतके आंधळे झालेले असतात कि त्यांच्या सारख्याच असणार्‍या त्या माणसाला माणुसकीच्या नजरेने बघू शकत नाहीत. हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. तेव्हा अशाप्रकारच्या श्रीमंतीमधून मनाच्या श्रीमंतीचे नाही तर आंतरीक गरिबीचे प्रदर्शन होते.

  काहीजण त्यांच्या पदरात पुण्य पाडून घेण्यासाठी तसेच त्यांच्यापाशी देण्याची क्षमता आहे म्हणून दानधर्म करतांना दिसतात. त्या मार्गानेही गरजूंना मदत मिळत असली तरिही मदत करणार्‍याच्या मनात गरजूंसाठी करुणेचे भाव असतीलच असे नाही. बर्‍याचदा दान करण्याच्या मागे त्यांचा व्यक्तीगत स्वार्थ असू शकतो. असे लोक गोरगरीबांच्या शोधात असतात जेणेकरून त्यांना पुण्य केल्याचे समाधान प्राप्त करता येईल. कोणत्याही माणसाने असे विचार मनी बाळगण्यापेक्षा आपल्या प्रमाणेच सर्व बांधव मुलभूत गरजांचे धनी असावेत. तसेच त्यांना आत्मसम्मानाने त्यांचे जीवन व्यतीत करता यावे. अशा श्रेष्ठ विचारांनी आपण समृद्ध असले पाहिजे. ज्यामुळे माणसा- माणसातील गरिब श्रीमंतीचा भेदभाव नष्ट होईल. तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या आसपासच्या आपल्या बांधवांना समानतेची वागणूक दिली पाहिजे. तथा त्यांच्या वेदनांचीही जाणीव ठेवली पाहिजे. ही देखील एक मदतच आहे.

  कधि कधी आर्थिक दृष्टीकोनातून कमकुवत असलेल्यांना गृहीत धरण्यात येते. त्यांच्या आत्मसम्मानाचा व भावनांचा विचार करणे आपल्याला महत्वाचे वाटत नाही. त्यांच्या जागी येवून त्यांच्या जीवनातील वेदनांना जाणीवपूर्वक समजून घेण्याचीही आपली इच्छा नसते. त्यामुळे त्यांच्या गरजा जाणून न घेताच त्यांना मदत करण्याच्या हेतूने आपल्या कडून पावले उचलण्यात येतात. परंतू प्रत्येकवेळी त्यांना आर्थिक किंवा वस्तूंच्या स्वरूपात असलेल्या मदतीचीच आवश्यकता असते असे नाही. तर कधी त्यांचे म्हणणे मनापासून ऐकुण घेणे. त्यांना आपल्या पाठबळाने दिलासा देणे. हे ही कमी नसते. जेव्हा आपण ह्या सर्व गोष्टींची सहानिशा न करता त्यांना मदत करण्यासाठी आपला हात पुढे करतो. तेव्हा त्यांचा स्वाभिमान दुखावण्याची शक्यता असते.

  जेव्हा आपण बेघर बांधवांना तसेच रस्त्यावर काही कारणाने भिक मागणार्‍यांना वेगवेगळ्या स्वरूपात मदत करण्यास सरसावतो. तेव्हा आपल्या मनात त्यांच्यासाठी भिन्नतेची भावना येता कामा नये. जर आपण त्यांची मदत करण्याचे माध्यम बनलोय तर ते आपले भाग्यच समजावे. आणि माणुसकीच्या नात्याने व मनात करुणा ठेवून नक्की मदत करावी. तसेच आपले कोणतेही बांधव अन्न पाण्याविना राहू नयेत. त्याचबरोबर त्यांच्या अंगावर वस्त्र असावेत. हीच प्रबळ इच्छा आपल्या मनात असावी.

   आज समाजात गरीब श्रीमंतीवरून भेदभाव तर आहेच त्याचबरोबर वैचारीक दारिद्र्यही वाढतच चालले आहे. ज्यांची श्रीमंत व मध्यमवर्गीय म्हणून गणना होते त्यांच्यापाशी सर्व विशेषाधिकार असतात. त्यांना चार भिंतींचे संरक्षण, कौटुंबिक सौख्य तसेच संरक्षण लाभते. परंतू जे ह्या विशेषाधिकारांपासून वंचीत असतात त्यांच्यासाठी कोणीही फार काही विचार करत नाही. जर अशा मुलांना प्राथमिक स्तराच्या शिक्षणासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. त्यासोबत त्यांना लहान मोठ्या कौशल्यात पारंगत करण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात आले. तर तेही त्यांच्या आयुष्याला वळण लावू शकतील. असे झाल्यास रस्त्यावर राहणार्‍या लोकांच्या संख्येत घट होईल. तसेच त्यातीलच कितीतरी कुमारीका माता असतात. ज्या शारिरीक दृष्ट्या सुदृढ असूनही कोणतेही काम न करता केवळ लोकांपुढे हात पसरतात. जर अशा मुलींना संरक्षण देवून त्यांनाही काही कामांचे प्रशीक्षण दिले गेल्यास. त्याही आत्मनिर्भर होवू शकतात. माणुसकीच्या नात्याने जर आपण ह्या कामात खारीचा वाटा उचलला तर आपल्याच असंख्य बांधवांचे जीवन सुरक्षीत होण्यास मदत मिळू शकते. अशी मदत व त्यामागचा हेतू हे दोन्हीही माणुसकीचे प्रतिनिधीत्व करणारे आहेत.

1. मदत करण्यामागे अत्यंत निस्वार्थ भावना असावी. 

   जेव्हा आपल्याला कोणाची मदत करण्याची संधी लाभते तेव्हा त्या संधीला आपण आपले भाग्यच समजले पाहिजे. आणि त्यासाठी आपली निवड झाली म्हणून सृष्टीचे मनापासून आभार मानले पाहिजे. मदत करतांना गरजूचे समाधान, त्याचा आनंद, त्याची सुविधा हाच हेतू असला पाहिजे. त्यात आपला किंचीतही स्वार्थ असू नये. कोणतिही अपेक्षा तसेच पुण्य कमविण्याचे समाधान ह्या गोष्टीचा विचार न करता केवळ परोपकाराची भावना असावी. मदत केल्याची वाच्यता आपल्या तोंडून वारंवार होता कामा नये. गरजूच्या चेहर्‍यावरचे भाव प्रसन्नतेचे असले पाहिजे. ह्याची मदत करतांना नेहमी काळजी घेतली गेली पाहिजे. गरजूस मदतीवर विसंबून राहण्याची सवय लागू नये ह्याकरीता मदत करतांना गरजूच्या मनात स्वावलंबी होण्याचे विचारही बिंबविले पाहिजे. जेव्हा गरजवंताच्या वेदना समजून घेवून आपल्या मनात करुणेचे भाव जागृत होतात. तसेच त्याच्यासाठी काहितरी करण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. किंबहुना आपल्या हातून गरजूस मदतही मिळते. तेव्हा ही अत्यंत निस्वार्थपणे केलेली मदत असते.  

2. मदत करतांना गरजू व्यक्तीचा आत्मसम्मान जपला जावा.

  जेव्हा कोणत्याही दीनदुबळ्या व्यक्तीस बघून आपल्या मनात त्याच्यासाठी सहानुभूती निर्माण होते. तसेच त्याची काहिही करून मदत करण्यास आपण आतूर होतो. तेव्हा ही सहानुभूती पोटी व भावनेच्या भरात मदत करणे कधि कधी गरजूच्या आत्मसम्मानास धक्का पोहोचवू शकते. कारण अशावेळी आपण बर्‍याचदा गरजूस नेमकी कशाची गरज आहे ह्याकडे दुर्लक्ष करून आर्थिक स्वरूपात मदत देवू करतो. गरजू स्वाभिमानी असल्यास तो ती नाकारतो. स्वाभिमान माणसास कठिण परिस्थितीतही तठस्थ ठेवतो. शक्यतोवर कोणाकडून सहजा सहजी मदत स्विकारणे त्यांना पटत नाही. शिवाय घेतलेल्या मदतीची भविष्यात परतफेड करण्याचा तणावही त्यांच्या मनावर येतो. तेव्हा मदत करणार्‍याने मदत करण्यापूर्वी ह्या महत्वपूर्ण गोष्टींचा सारासार विचार नक्की करावा. त्याचबरोबर गरजूस माणुसकीच्या नात्याने बघावे. त्यामुळे गरजूची मदतही करता येईल व ती करतांना त्याचा आत्मसम्मानही राखता येईल.

3. मदत करतांना आपल्या श्रीमंतीचा बडेजाव नसावा.

बरेच लोक मदत करण्याच्या नावाने गोरगरीबांमध्ये दानधर्म करतांना दिसतात. त्यामुळे कित्येकांना फायदाही होतो. परंतू कधि कधी त्यात श्रीमंतीचा बडेजाव बघण्यात येतो. श्रीमंत लोक त्यांच्या नोकरांच्या हाताने हे कार्य घडवून आणतात. त्यांना गरजूंच्या वेदनांची पर्वाही नसते. गरजूंपर्यंत मदत पोहोचली किंवा नाही ह्याचे भानही ते ठेवत नाहीत. तेव्हा कोणाचीही मदत करण्यासाठी श्रीमंतीची नाही तर मनाच्या मोठेपणाची आवश्यकता असते. कधी कोणाचे मन मोकळे करणे म्हणजेही एकप्रकारची मदतच असते. जेव्हा मदत माणुसकीचा विचार करून करण्यात येते. तेव्हा ती स्विकारतांना गरजूस कमीपणा वाटत नाही. कारण त्यात सामोरच्याचा आदर ठेवण्यात आलेला असतो. मदत करण्याच्या मागचा हेतू स्वच्छ व त्यात निस्वार्थभाव असल्यास देणार्‍याच्या मनाची श्रीमंती दिसून येते. तसेच मदत करण्यासाठी त्याचीच आवश्यकता असते.

4. मदत करून विसरून जाण्यातच मोठेपणा आहे.

   एका हाताने केलेली मदत दुसर्‍या हाताला कळता कामा नये. कोणालाही मदत करण्याची ही पद्धत माहित असली पाहिजे. कारण ती माणुसकीला धरून आहे. कधि कधी एकदा कोणास केलेली मदत आपण आजन्म लक्षात ठेवतो. त्याचप्रमाणे त्याची वाच्यता वारंवार प्रत्येकाजवळ करत असतो. त्यामागे आपला मदतीचे प्रदर्शन मांडण्याचा अविर्भाव असतो. अशावेळी मदत स्विकारणार्‍यावर नकळतपणे दबाव निर्माण होतो. तो मदत करणार्‍याच्या उपकारांच्या ओझ्याखाली असतो. तसेच कायम त्याच्या पुढे नतमस्तक राहतो. त्यामुळे ही मदत असली तरिही त्यात माणुसकी आढळून येत नाही. मदत करण्याच्या मागचा आपला हेतू नेहमी शुद्ध व निरपेक्ष असलाच पाहिजे. त्याचप्रमाणे कोणालाही केलेली मदत विसरून जाणेच योग्य आहे. ती लक्षात ठेवणे म्हणजे माणुसकीची किंमत कमी करण्यासारखे आहे.

   एक माणुस म्हणून गरजेच्यावेळी अन्य माणसाच्या उपयोगात पडणे म्हणजे देवकार्य आहे. मनात सेवाभाव, निस्वार्थभाव व प्रेम ठेवून मदत करणे म्हणजे देवाची प्रार्थना आहे. तसेच केलेली मदत गरजूपर्यंत पोहोचली किंवा नाही ह्याची खात्री करणे म्हणजे देवाच्या चरणी फुले वाहन्यासारखे आहे. तेव्हाच सुगंधीत उदबत्त्यांच्या सुवासाप्रमाणे माणुसकीचा दर्वळ सर्वत्र पोहोचेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *