
आपल्या शरीराचा अदृश्य भाग म्हणजे आपले मन. मनातील आंतरीक जगाशिवाय आपले शरीर केवळ यंत्रासम असते. कारण भावनांचा आपल्या व्यक्तीमत्वावर प्रभाव असतो. कधिकधी उत्तम शारिरीक ठेवण असलेली व सुंदर चेहर्याची माणसेही आपल्याला विदृप वाटत असतात. कारण त्यांचे मन स्वच्छ व निर्मळ नसते. त्याचप्रमाणे आपल्या कोणत्याही कृतीस भावनांची जोड नसेल तर आपण कोणाच्याही हृदयाला स्पर्श करू शकत नाही. आपले मन सर्व प्रकारच्या भावनांनी व्यापलेले असते. परंतू आपल्या ज्या भावनांचा इतरांना व स्वत:लाही त्रास होतो ते एकप्रकारचे आपल्या मधील विकार असतात. त्यांच्याप्रती आपण अत्यंत जागृक असणे आवश्यक असते. कोणत्याही प्रसंगाच्या मागणीनुसार भावनांचा जो कप्पा आपल्या द्वारे उघडला जातो त्या भावना आपण व्यक्त करत असतो. किंवा जर भावनांना व्यक्त होता आले नाही तर त्यांचा मनातच संचय होतो.
जेव्हा आपल्या मनात उत्पन्न होणार्या कोणत्याही भावना आपल्याला वाईट मार्गावर नेतात. त्यांच्यामुळे इतरांनाही त्रास होतो. तसेच त्या मनात नकारात्मक इच्छा उत्पन्न करण्यास कारणीभूत असतात. अशा विकृत भावनांच्या प्रती जागृत राहून त्यांना आपण अत्यंत शिताफीने निष्क्रीय करणे महत्वाचे असते. कारण त्या भावना कोणासाठीही हितकारक नसतात. बाहेर व्यक्त झाल्या तर सर्वकाही उध्वस्त करू शकतात. तसेच मनातच साठविल्या तर आपल्या मानसिक आरोग्यावर दुष्परीणाम करतात. अशावेळी आपण स्वत:शी ठरवून त्याहून जास्त प्रबळ सकारात्मक भावनांनी त्यावर मात करू शकतो. त्याशिवाय नकारात्मक भावनांना लिखाणाच्या स्वरूपात एका कागदावर उतरवून नंतर तो कागद नष्ट करण्याच्या हेतूने फेकून दिला किंवा जाळून टाकल्यानेही मनावरचा नकारात्मक भावनांचा ताण कमी होण्यास मदत मिळते.
एखाद्याच्या शरिरयष्टीवरून चारचौघात त्याची थट्टा करणे, हसणे किंवा घालून पाडून बोलणे. तसेच मंचावरून लोकांपुढे बोलण्याची भिती असण्यावरून आपल्यात स्वत:विषयीच कमीपणाची भावना निर्माण होणे. ह्या आणि अशा अनेक गोष्टींमुळे आपल्या मनात विवश किंवा हतबल करणार्या भावना उत्पन्न होत असतात. त्या भावनांचा अतिरेक झाल्यास त्यांचे रुपांतरण स्वत:साठी वाटणार्या तिरस्कारात होते. तिरस्काराच्या भावनांनी मन दु:खी होते. सर्वांसमोर आपला झालेला अपमान वारंवार स्मरणात येवून आपले स्वत:साठी चे मत चांगले राहत नाही. अशावेळी आपल्यातील काही चांगले दिसणे आपल्याच नजरेस बंद होते. मनात उद्भवलेल्या अशा भावनांना शांत होण्यासाठी काही काळ जावू द्यावा लागतो. त्यासोबत आपले प्रभावी व्यक्तीमत्व घडविण्यासाठी कणखर पावले उचलावी लागतात.
प्रत्येक पराक्रमी व्यक्ती भावनाप्रदान असतो. कारण त्याशिवाय त्याला पराकोटीचा पराक्रम गाजवीने शक्य नसते. कारण भावनाच असतात ज्या त्या व्यक्तीच्या मनास त्याच्या आसपास असलेल्या दु:खास बघून पिळवटून टाकतात. त्या भावना त्यास परिस्थिती बदलवून टाकण्यास उत्तेजीत करतात. तसेच ती व्यक्ती आपल्या पराक्रमाने परिस्थितीचा कायापालट करते. त्यासाठी त्याला सर्वप्रथम त्याच्या मनातील युद्ध जिंकावे लागते. कारण त्याचेही व्यक्तीगत जीवन असते. त्या जीवनात जीवाभावाच्या माणसांशी असलेले त्याचे ऋणानुबंध असतात. ज्यामुळे त्यांच्या विरहाने होणारी मनाची उलथा पालथ त्याच्यासाठी जीवघेणी असते. कारण पराक्रम गाजविण्याच्या मार्गावर सर्वप्रथम आप्तस्वकीयांनाच गमवावे लागते. भावनाच मनुष्याच्या हातून मोठमोठे पराक्रम घडवून आणत असतात. कोणत्याही भावनाशुन्य असलेल्या व्यक्तीस अंतर्मनाची कळवळ कळत नाही. म्हणूनच ते इतरांच्याही भावनांना प्रतिसाद देण्यास असमर्थ असतात. त्याचबरोबर आपल्याला त्यांच्याशी जुळवून घेणेही फार कठीण असते.
दैनंदिन जीवनात आपल्याला येणारे निरनिराळे अनुभव आपल्या मनात असंख्य भावनांना जन्मास घालतात. कधी आपण प्रसन्न असतो. कधी आपण मनातल्या मनात प्रतिस्पर्धा व तुलनेच्या भावनेशी झुंजत असतो. कधी आपल्याला राग येतो. तर कधी आपण दु:खी असतो. आपल्या आसपासचे जग इतके व्यस्त असते कि आपल्या मनात चाललेली घालमेल कोणासही कळत नाही. त्यामुळे आपल्या मनात आलेल्या भावनांशी आपल्यालाच एकट्याने झुंजावे लागते. तरिही जगाचा सामना करत पुढे चालत रहावे लागते. अशावेळी मनात भावनांचा संचय होत जातो. कारण त्यांना मोकळे होण्यास वाव मिळत नाही. बाहेरचे जग आपले गुणगान गात असते, आपली उदाहरणे दिली जातात कारण आपण यशाची पायरी चढत असतो. परंतू आपण मात्र आतून विचलीत झालेलो असतो. कारण कोणिही आपल्या मनातील कोवळी भावनीक तार छेडत नाही. अशाप्रकारे आपल्या बाहेर उमटणार्या प्रतिक्रीया बघून आपल्या बद्दल गैरसमज केले जातात. आपण एकटे पडत जातो. नाती आपल्यापासून दुरावली जातात. परंतू कोणासही आपल्या भावनीक जगाची साधी भणकही लागत नाही.
आपल्या माणसांच्या भावना समजून घेण्याची क्षमता आपल्यात नसणे ही आपल्यातील खुप मोठी उणीव असते. कारण भावना समजून घेण्याने ज्या गोष्टी सहज व सोप्या करता येवू शकतात. त्या भावना न समजून घेण्याने क्लीष्ट होत जातात. त्यामुळे नात्यांमधील ओलावा हळूहळू कमी होवू लागतो. गैरसमजांची दरी आणखी आणखी रुंदावत जाते. कारण रागाच्या भरात भांडणे करणे. एकमेकांची मनं दुखावणे. अबोला धरणे तसेच एकमेकांशी गैरवर्तनूक करणे ह्या असभ्य गोष्टी करणे आपल्याला सोपे वाटते. परंतू ज्या गोष्टीचा उलगडा केवळ एखाद्याच्या भावनांना वाट मोकळी करून देण्याने होवू शकतो. ती छोटीशी गोष्ट करण्याचा मोठेपणा मात्र कोणिही दाखविण्यास तयार नसतो. कारण प्रत्येकाचा अहंकार दुखावला गेलेला असतो. त्यामुळे आपली बाजू कशी बरोबर आहे हे सिद्ध करण्यास प्रत्येक जण लागलेला असतो. परंतू नात्यात स्वत:कडे थोडा कमीपणा घेवून व आपल्या माणसांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून मनात कित्येक काळापासून साचलेल्या गैरसमजांच्या भावना अश्रूंच्या स्वरूपात मोकळ्या करता येवू शकतात. त्याचप्रमाणे सगळे ह्याच अपेक्षेत आजीवन वाट बघत असतात. परंतू पुढाकार मात्र कोणिही घेत नाही. आणि जगाचा निरोप घेतांना आपल्या मनावर भारीभरकम ओझे घेवून कायमचे निघून जातात.
भावनाशुन्य माणसे इतरांच्या भावना समजून घेण्यास सक्षम नसतात. त्यामुळे भावनाशील माणसे कळत नकळतपणे त्यांच्याकडून दुखावली जातात. ते स्वत:ही आपल्या मनातल्या गोष्टी इतरांसमोर मोकळेपणाने व्यक्त करू शकत नसल्यामुळे त्यांच्या कृती किंवा बोलण्याने कोणिही प्रेरीत होत नाही. आयुष्यात प्रगती करण्यासाठी आपल्या भावना समजणे, त्यांना न्याय देणे व त्यांना मोकळे होवू देणे महत्वाचे असते. अन्यथा आपण निराशेचे शिकार होतो. त्याचबरोबर त्याचा थेट परीणाम आपल्या कार्यकिर्दीवर होतो.
आजच्या वेगवान युगात प्रत्येक क्षेत्रात चढाओढ निर्माण झाली आहे. पैसा व प्रसिद्धीच्या मोहापायी जे भावनिक आहेत त्यांना कमकुवत ठरवून व मानसिक त्रास देवून खाली खेचण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. त्यांना सहजरित्या हसण्याचा विषय बनविण्यात येत आहे. परंतू जे इतका वरवर विचार करून जास्तीत जास्त प्रगती करतात. ते वेळप्रसंगी तितक्याच वेगाने खालीही कोसळतात. कारण टिकून राहण्यासाठी कौशल्यांबरोबर जीवनमुल्यांची इमारतही मजबूत असावी लागते. भावनशील व्यक्ती मात्र आपल्या मनाचा वेध घेत घेत हळूहळू पुढे जातो. कठीण परिस्थितीतही आपल्या मनाचे संतुलन न गमावता योग्य मार्ग शोधून काढतो. कारण जो स्वत:च्या भावनांचा आदर करतो तो कमकुवत नाही तर कणखर असतो.
भावना मोकळ्या न झाल्याने मनात गैरसमजांच्या गाठी निर्माण होतात. ज्यात राग द्वेष मत्सर असतात. ज्या केवळ बोलून मोकळे होण्याने नाही तर भावनीकरित्या समजून घेण्याने विरघळतात. औपचारीक वागन्याने आपण आपल्या अवतीभवती माणसे गोळा करतो. परंतू जीवाभावाची व बोटावर मोजण्याइतकी माणसे भावनांच्या देवाण घेवाणीनेच आपल्या आयुष्यात येतात. जी हक्काची व निस्वार्थ प्रेम करणारी असतात. औपचारीक नात्यात तो ओलावा कधिही सापडत नाही. भावना म्हणजे अखंड वाहणारा झरा असतो. ज्यात नकारात्मक भावनांचाही संचय होतच असतो. परंतू त्यामधील सकारात्मक भावना म्हणजे प्रेम वात्सल्य दया सेवा ह्या अतुल्य गोष्टी असतात. ज्या मना मनांना समृद्ध करत निर्मळपणे वाहत असतात.
1. भावनांप्रती जागृक असावे
कधिकधी आपण भावनांच्या इतके आहारी जातो कि आपले आपण करत असलेल्या कृतींवर नियंत्रण मिळवणे कठिण होवून जाते. जेव्हा आपण आपल्या आयुष्यात संकटांचा सामना करत असतो. तसेच जेव्हा आपल्या मनात नकारात्मक विचारांचे थैमान उठलेले असते तेव्हा आपली मनस्थिती ढासळलेली असते. अशावेळी सगळे मार्ग आपल्याला निराशेकडे घेवून जातात. आपण त्याच्यामधून लवकरात लवकर स्वत:ची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात असतो. अशाप्रसंगी आपल्या मनाचा तोल जाण्याची शक्यता असते. काही काळापुरते का होईना आपल्यावर कोसळलेल्या परिस्थितीचा आपल्याला विसर पडावा म्हणून व्यसनांच्या आहारी जाणे, आत्महत्येस प्रवृत्त होणे तसेच इतरांना क्षती पोहोचविण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार आपल्या हातून घडू शकतात. म्हणून नेहमी आपल्या भावनांप्रती जागृक असणे व कोणतेही दुर्दैवी पाउल उचलण्या अगोदर त्या भावनांवर नियंत्रण मिळवून त्यांना निष्क्रीय करणे महत्वाचे असते.
2. भावना मोकळ्या कराव्यात
वेळोवेळी मनातील भावना मोकळ्या न झाल्याने नात्यांमध्ये गैरसमजेची दरी रुंदावत जाते. एक माणुस म्हणून आपण कधिही परीपुर्ण नसतो. काही ना काही चुका आपल्या हातून घडतच असतात. त्यामुळे कधी आपण तर कधी आपली जीवाभावाची माणसे दुखावली जातात. अशावेळी चूक कोणाचीही असली तरी मनाचा मोठेपणा दाखवून आपण माफी मागण्याची पहल केल्यास सर्वकाही तेव्हाच सुरळीत होवू शकते. परंतू अहंकारामुळे ही छोटीशी गोष्ट करण्यास आपण मागे पुढे बघतो. तसेच मनात एकमेकांबद्दल गैरसमज घेवून आजीवन जगत असतो. त्यापेक्षा गरजेच्या वेळी बोलून भावना मोकळ्या कराव्यात. तसेच इतरांनाही भावना मोकळ्या करण्यास वाव मिळू द्यावा.
3. भावनांचे संतुलन राखावे
कधिकधी आपण भावना अनावर होवून डोक्यात कोणासाठी राग घालून घेतो. कधी काही कारणांनी इतके आनंदी होतो कि त्या भरात आपल्या आसपासच्या माणसांकडे दुर्लक्ष करतो. तर कधी भूतकाळात झालेल्या गोष्टींच्या वाईट आठवणींनी आपला वर्तमान वाया घालवीतो. अशाप्रकारे मनात उठलेल्या भावनांचे संतुलन राखले गेले नाही तर आपण स्वत:बरोबर इतरांचेही नुकसान करून घेतो. रागाची भावना अनावर होवून आपण असे काही चुकीचे पाउल उचलतो कि त्याचा पश्चाताप आपल्याला आजन्म करावा लागू शकतो. भूतकाळात झालेला घटनाक्रम बदलणे कोणासही शक्य नसते. तेव्हा निदान त्यामधून धडा घेवून पुढे त्याच त्याच चुका करणे टाळता तरी येवू शकते. परंतू होवून गेलेल्या घटनाक्रमाचा आपल्या वर्तमानावर दुष्परीणाम होवू देणे अत्यंत चुकीचे आहे. अशावेळी भावनेच्या आहारी जावून त्यावरचे संतुलन गमावणे आपल्यासाठी नुकसानदायी ठरू शकते.
4. भावनांना न्याय द्यावा.
आपल्या आजूबाजूला अनेक अन्याय अत्याचार घडत असतांना आपण आपल्या डोळ्यांनी बघतो. ते बघून आपल्याही मनात घालमेल होते. त्या विरोधात पाउल उचलण्याची प्रबळ इच्छाही मनात जागृत होते. परंतू त्यानंतर होणार्या परीणामांची चिंता करून आपण आपल्या मनात उठलेल्या भावनांना मनातच थोपवून आपल्या दिनचर्येत व्यस्त होतो. अशा कितीतरी भावनांना आपण मनातच साठवत जातो. ज्यामुळे आपलाच स्वत:वरचा आत्मविश्वास गमावून बसतो. कारण भावनांना न्याय देणे म्हणजे कृतीतून त्यांना व्यक्त होवू देणे. जेव्हा आपण अन्यायाच्या विरोधात आपल्याला जमेल तशी कृती करतो तेव्हा आपल्याला स्वत:चा अभिमान वाटतो. त्यामुळेच ह्यापुढेही अशी पावले उचलण्यासाठी आपल्यात आत्मविश्वास जागृत होतो. तेव्हा एक माणुस म्हणून अन्य माणसावर होणार्या अत्याचाराविरोधात पाऊल उचलण्याच्या भावनेस नक्कीच न्याय द्यावा.
आपले शरीर म्हणजे एक राउळ आहे. त्या राउळातील देव म्हणजे मन आणि भावना म्हणजे देवाचा गाभारा. ज्याप्रमाणे देवाच्या गाभार्यात सुवासीक फुलांची आरास केलेली असते. धूप, उदबत्त्यांचा दर्वळ पसरलेला असतो. त्याचप्रमाणे आपल्या मनातील भावनाही असतात. ज्या अखंडपणे निर्माण होत असतात आणि राउळाच्या भिंतीदरम्यान फळत फुलत असतात. तेव्हा आपल्या राउळाच्या भिंतींना सुसंस्कृत विचारांनी व सात्विक जीवनामुल्यांनी लिंपण करावे. जेणेकरून त्यांच्यातील भावनांच्या अस्तित्वाने आपण पराक्रम गाजविण्यास प्रवृत्त व्हावे. अन्यायाविरोधात पाऊल उचलावे. मनात करुणा जागवून अनेकांचे कल्याण करावे. सेवेचे दान आपल्या पदरात घालून घ्यावे आणि आपल्या मनाचा गाभारा अशा सुंदर भावनांनी दर्वळून टाकावा.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)