मनातील वेदनांवर नैसर्गिक उपचार

आपल्या जीवनात जन्मताच आपल्याला अनेक नात्यांशी ओळख करून दिली जाते. आई-वडील  व बहिण-भाऊ अशा विवीध नात्यांनंतर आपले बालपणीचे व शालेय जीवनातील मित्र आपल्या आयुष्याला दस्तक देतात  आणि जेव्हा आपण मोठे होवून आपल्या खर्‍या जीवनाला सुरवात करतो तेव्हा ह्या समाजाशी आपली ओळख होते. जन्मापासून मोठे होईस्तोवर जे जे लोक जीवनाच्या प्रवासात आपल्या संपर्कात येतात ते आपल्या मनावर त्यांची छाप सोडून जातात. परंतू काहींचे आपल्या जीवनात असणे व त्यांचे आपल्या जीवनातील स्थान आपल्याला मानसिकरित्या दुबळे बनविणारे असते. कारण त्यांचा सहवास आपल्या मनावर दबाव आणणारा असतो. तर कधि कधि एखाद्या व्यक्तीमुळे आपल्या निरागस बालपणावर विपरीत परिणाम झालेले असतात. कोवळ्या व निरागस मनावर नकारात्मक आठवणींच्या रेघोट्या ओढल्या गेलेल्या असतात. किंवा त्या वयातील इच्छा काही कारणाने पूर्ण न होता आपण मोठे होतो. त्याचे परीणाम आपल्या मनाला आपण मोठे झाल्यावरही यातना देतात. कारण आपल्या मनावर उपचार झालेले नसतात. 

   पुढील जीवनात त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या तरी त्याचा फारसा आनंद आपल्याला होत नाही. कारण आपल्याला जेव्हा जे हवे असते ते तेव्हा न मिळाल्याची भरपाई कधिही होवू शकत नाही. जेव्हा आपले मन त्या गोष्टीसाठी आतूर झाले होते तेव्हाचा तो सोनेरी क्षण आपण गमावलेला असतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात जर आपला जोडीदारही आपल्याला स्वातंत्र्य बहाल करणारा नसेल किंवा तो आपल्याला वेळोवेळी समजून घेत नसेल तर काही काळानंतर आपल्या त्या व्यक्तीगत नात्यामध्येही आपोआपच दरी निर्माण होते. कारण तिथे मनं मोकळी होण्यास वाव नसतो. त्यामुळे  एकप्रकारे त्या नात्याची फरफट होत असते. अशाप्रसंगी आपल्या मनाला ज्या यातना होतात त्या कोणी आपल्या शरिराचा एखादा अंग कापावा इतक्याच वेदनादायी असतात. 

   जीवन म्हणजे सुख-दु:ख हे समीकरण आलेच. त्यांना आपण टाळू शकत नाही. परंतू जी नाती आपल्याला मोकळेपणाने जगू देत नाहीत. नेहमी आपल्यावर वरचढ राहण्याचा प्रयत्न करतात. शक्य असल्यास त्यांना आपल्या आयुष्यातून दूर केलेलेच बरे. कारण ती वरवर कितीही आरामदायक वाटत असली तरीही त्यांच्यामुळे आपले जगणे दुर्भर झालेले असते. तसेच आपले असणे महत्वहीन होते. जेव्हा आपण आपल्या जीवनात अशाप्रकारच्या वेदनांना सामोरे जात असतो तेव्हा त्यांना पुर्ण जागृकतेने व सामंजस्याने जगले पाहिजे. कारण त्यातूनच आपल्याला बाहेर निघण्याचा मार्गही सापडेल. तसेच त्या दरम्यान  आलेले अनुभव आपल्याला संयमी बनवतील व साहस प्रदान करतील. त्याचबरोबर त्यातून आपले नवे व्यक्तीमत्व उजळून निघेल. जे पूर्वीपेक्षा जास्त शक्तीशाली व समजदार असेल. आपण नात्यांप्रती सर्व कर्तव्य निभावण्याचा यथासांग प्रयत्न केला पाहिजे तोही अत्यंत निरपेक्ष भावनेने. त्यामुळे आपल्या मनाला काही प्रमाणात तरी दिलासा मिळेल. त्याचबरोबर आपण मनावर उपचार करण्याच्या दिशेने अशी कणखर पावले उचलली पाहिजे जेणेकरून आपल्या सोबत समोरच्या व्यक्तीच्या मनावरही उपचार होतील.

1. अन्य व्यक्तीच्या वर्तनाची  समज असली पाहिजे

   एखाद्या व्यक्तीचा सहवास हा आपल्याला मनमोकळेपणाने वावरू देणारा आहे कि त्या व्यक्ती बरोबर असतांना आपल्याला मानसिक त्रास होतो ह्याची वेळोवेळी खात्री पटवून घेतली पाहिजे. तसेच त्या व्यक्तीबरोबर असतांना आपल्या मनावर एकप्रकारे अदृश्य दडपण असल्यासारखे वाटते किंवा राग द्वेषाने भावना अनावर झालेल्या असतात हे अत्यंत बारकाईने अनुभवावे. एकदा हे स्पष्ट झाले कि आपण समंजस पणे पुढे काय पावले उचलावयाची ते ठरवू शकतो.

2. परस्पर अंतर ठेवून वागावे

    एकदा आपल्याला त्या व्यक्तीच्या स्वभावाविषयी खात्री पटली कि त्यांच्या आणि आपल्या नात्याला हळूहळू करून मर्यादा लावणे आवश्यक असते. पुर्ण हिमतीने आपल्याला त्यांच्या न आवडणार्‍या गोष्टींना नकार देता आला पहिजे. कारण त्यांच्याशी असलेली भावनीक संलग्नता कमी करणे गरजेचे असते. त्याचबरोबर आपले त्यांच्यावर विश्वासाने सर्वतोपरी विसंबून राहणे शक्य तितक्या लवकर कमी केले पाहिजे.

3. आपल्यावर अपराधीपणाचे  दडपण आणतील. 

   आपण जसजसे त्यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करू तसतसे ते त्यांच्या चांगुलपणाच्या वर्तनाने आपल्या मनात अपराधीपणाची भावना जागृत करतील. आपल्याला आणखी राग यावा ह्यासाठी प्रयत्न करतील. किंवा आपल्यातील कमजोर्‍यांवर बोट ठेवण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या आपल्याला मानसिक त्रास देण्याच्या प्रयत्नात आणखीच भर पडेल. परंतू आपण न डगमगता  स्थिर राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे. सुरवातीला आपल्याला ह्या गोष्टींमुळे खुपच त्रास होवू शकतो. तरिही दुरदृष्टीने विचार केला तर भविष्यात त्याचे चांगलेच परिणाम निदर्शनात येतात.

4. आपले व्यक्तीमत्व स्वप्रयत्नांनी उभारावे

    आपण आपल्याला मानसिक वेदना देणार्‍या व्यक्तीच्या वागण्यावर प्रतिक्रीया देत राहिलो तर त्यात आपली उर्जा वाया घालविण्यासारखे होईल. परंतू तिच उर्जा आपण स्वत:ला कणखर बनविण्यासाठी लावली तर आपल्या कमजोर आणि धास्तावलेल्या मनाला बळ येईल. आणि ते स्वत:ला उभे करण्यासाठी उचललेले पहिले पाऊल असेल. आपण आपल्यामधील विशेषतांना ओळखले पाहिजे. आणि त्यांंच्या सहाय्याने जीवनात स्वत:ची ओळख निर्माण केली पाहिजे. अशापद्धतीने आपण स्वत:वर उपचार  करू शकतो.

5. स्वत:ची काळजी घ्यावी

    आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावयाची असेल तर सर्वप्रथम आपल्याला सर्वतोपरी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. त्यात शारिरीक तसेच मानसिक ह्या दोन्ही स्तरावर प्रयत्न व्हावे. बदलत्या काळाबरोबर जमेल तसा बदल स्वत:मध्ये आणणे आवश्यक आहे. वाचनातून तसेच ऐकण्यातून उत्तम विचार आत्मसात करावे. आपल्या पेहरावात व दिसण्यात सुयोग्य बदल आणावेत. स्वत:ला अद्द्ययावत ठेवावे. त्यामुळे आपला आत्मविश्वास उंचावेल. तसेच नकारात्मक  माणसे व नकारात्मक परिस्थीती किंवा कोणत्याही नकारात्मक गोष्टी स्वत:पासून लांब ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघावे. त्यामुळे होवून गेलेल्या ,त्रासदायक गोष्टींपासून आपण स्वत:ला मानसिकरित्या लांब ठेवण्यात यशस्वी होवू.

6. विश्वासू व्यक्तीकडे  मन मोकळे करावे

      आपल्या भावना अनावर होवून  गोष्टी असह्य होत असतील तर एखाद्या विश्वसनीय माणसाकडे आपले मन मोकळे करावे. त्यामुळे मन शांत आणि हलके होईल. परंतू गोष्टीची गोपनियता राखली जाईल ह्याची खात्री करून घेणे जरूरीचे आहे. तिथून एखादा सुयोग्य मार्ग आपल्या समोर येण्याचीही शक्यता असते.

7. योग- साधना करावी

   स्वत:ला योग-साधना करण्याची सवय लावावी. त्यामुळे आपले मन शांत राहिल आणि आपल्या विचारांना स्थिरता येईल . त्त्याचबरोबर आपण कोणत्याही प्रकारच्या मानसिक त्रासांमुळे विचलीत होणार नाही. तसेच आपले मन उपचारांना पुर्णपणे सहयोग करेल.

8.   ह्या परिस्थीतीतून धडा घ्यावा

   आपण ज्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांच्यावर अवलंबून असतो  तसेच त्यांच्यावर पुर्णपणे विश्वास टाकलेला असतो त्यांचे जेव्हा असे स्वरूप आपल्या समोर येते  तेव्हा आपण पुरते हादरून जातो. आपल्या पायाखालची जमीन सरकते. आणि मानसिक वेदनांना सामोरे जावे लागते. त्यामधून सावरत असतांना अशी परिस्थीती पुन्हा आपल्यावर ओढवू नये, हाच धडा आपण ह्यातून गिरवायला पाहिजे. जेव्हा आपले अंतर्मन आपल्याला खुणावते  त्याला प्रतिसाद द्यावा. त्यामुळे मनावर खोलवर जखमा होण्यापासून आपण स्वत:ला वाचवू शकू.

    मित्रांनो, नैसर्गिक उपचार प्रक्रियेचा काळ हा ह्यावर अवलंंबून असतो कि आपल्याला  झालेल्या जखमा किती खोल आहेत. तसेच आपले व्यक्तीमत्व  कसे आहे. तेव्हा त्याला कधि महिना कधि वर्ष तर कधि संपुर्ण आयुष्य लागण्याची शक्यता असते. ही इतक्या सहज होणारी प्रक्रीया नाही. आज काही बिघडले आणि दुसर्‍या दिवशी ठीक झाले. त्या प्रक्रियेला मनापासून पुर्णपणे शरण जावे लागेल.  तेव्हाच आपण आपल्या आणि दुसर्‍यांच्या ही मनावर उपचार करण्यात यशस्वी होवू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *