मितभाषी स्वभावाविषयी गैरसमज

माणसाचा स्वभाव हा माणसाची ओळख असतो. जर आपण एखाद्या व्यक्तीविषयी कोणाकडे माहिती काढली तर त्याच्या स्वभावाबद्दल आवर्जून बोलले जाते. जर कोणी जास्त बोलणारा असेल तर त्याच्याविषयी सकारात्मक बोलले जाते. जसे तो मनमिळाऊ आहे, त्याच्या मनात काही राहत नाही, साफ मनाचा आहे, बोलून मोकळा होतो. परंतू जो शांत स्वभावाचा असतो, लाजरा असतो तसेच सहज कोणाशी काही बोलण्यास ज्याला कष्ट पडतात. अशांबद्दल मात्र लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. जसे आतल्या गाठीचा आहे, घमंडी आहे, मिळूनमिसळून वागत नाही, एकलकोंड्या आहे असे त्याच्याविषयी नकारात्मक बोलले जाते. त्या व्यक्तीच्या त्या विशेष स्वभावाला कमकूवत समजून संवादाचा विषय बनवीले जाते. त्याला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जातो. बर्‍याचदा काहीजण अशा व्यक्तीच्या तोंडावरच आता तरी बोलायचे शिक किंवा हा पूर्वीपासूनच कमी बोलतो असे म्हणून सर्रास त्याचा अपमान करत असतात. त्यामुळे त्या व्यक्तीच्या मनात स्वत:साठी आणखीच न्युनगंड निर्माण होतो. ज्याचा त्याच्या आत्मविश्वासावर देखील दुष्परीणाम होतो.

   सर्वांनाच पार्टी, लग्नसमारंभात सहभागी होणे तसेच लोकांशी ओळखीपाळखी करण्यास आवडत असते. परंतू मितभाषी स्वभावाच्या माणसांचे मात्र ह्या सर्व गोष्टींच्या नावानेच हृदयाचे ठोके तीव्र होत असतात. त्यांच्या स्वभावातील लाजरेपणामुळे ओळखीतील किंवा अनोळखी व्यक्तींशीही गाठीभेटी करणे म्हणजे त्यांच्यासाठी मृत्यूला सामोरे जाण्यासारखे असते. लोकांच्या नजरेला नजर भिडवीण्यापासून ते स्वत:ला वाचवीतात. ते जांच्याशी थोडेफार जूळवून घेवू शकतात. अशा कमीत कमी लोकांच्या संपर्कात येतात. किंवा स्वत:हून कोणाशिही बोलायला जात नाहीत. तसेच कोणि सामोरून बोललेच तर कमीत कमी शब्दात उत्तर देतात. त्यांच्यावर सहजा सहजी कोणाचीही नजर पडूच नये अशी त्यांची इच्छा असते. म्हणून ते तशीच जागा बसण्यासाठी निवडतात. कोणि त्यांच्याशी अचानक बोलले तर त्यावर काय प्रतिक्रीया द्याव्यात हेही त्यांना कळत नाही. अशावेळी ते आप्तस्वकीयांच्या गराड्यात असूनही स्वत:बरोबर एकटेच असतात. लोकांमध्ये मिसळण्याच्या प्रक्रियेतच खऱ्या अर्थाने त्यांना त्यांच्यातील ह्या मितभाषीपणाची प्रकर्षाने जाणीव होते. कारण त्यांना ती स्वत:मधली एकप्रकारची खुप मोठी उणीव वाटू लागते. ते स्वत:वर टिका करतात आणि आतल्या आत त्या जाणिवेशी स्वत:च झुंजत असतात. त्यांच्या मनात वादळ उठलेले असते परंतू वर सर्वकाही शांत असते. त्या शांततेला बघूणच विकृत मानसिकतेचे  लोक त्यांना नावे ठेवण्यास व त्यांना हसण्याचा विषय बनविण्यास तयारच असतात.

  मितभाषी व्यक्तींना आयुष्यात नेहमीच अशा अनुभवांना सामोरे जावे लागते. किंबहुना त्यांच्या मनात इतकी भिती भरलेली असते कि ते स्वत:च अशाप्रकारच्या परिस्थितीला नेहमी आकर्षीत करत असतात. त्यांच्या मनात न्युनगंडाची भावना घर करून बसते. अशावेळी ते विनाकारण कोणाच्याही संपर्कात राहण्यापासून स्वत:ला वाचवीतात. इतरांसारखे मोकळेपणाने बोलता न येणे ही त्यांच्यातील खुप मोठी कमतरता आहे असे त्यांना वाटू लागते. त्या कमतरतेपुढे त्यांच्यातील इतर उत्तम गोष्टी ज्या त्यांना अद्वीतीय बनवीतात त्या ते बघू शकत नाहीत. कारण ते इतरांच्या नजरेने स्वत:चे आकलन करू लागतात. परंतू मितभाषी व्यक्तींनी हे लक्षात ठेवले पाहिजे कि निसर्गातील दर्‍याखोर्‍या, उंच डोंगर, नद्या तसेच समुद्र हे बोलू शकत नाहीत. तरिही त्यांचे अस्तित्व व त्यांचे महत्व कमी होत नाही. ते स्वत:मध्ये परीपुर्ण आहेत म्हणूनच निसर्गाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्याचप्रमाणे निसर्गातील त्यांच्या स्थानाला कोणिही नाकारू शकत नाही. तेव्हा मितभाषी व्यक्तीने त्यांच्या मनातील लोकांशी बोलता न येण्याची भीती हळूहळू कमी करण्यासाठी स्वत:वर काम करत रहावे. तसेच स्वत:मधील विशेष गुण जे त्यांना खास बनवीतात त्यावर लक्षकेंद्रीत करावे.

   मितभाषी व्यक्ती ह्या उत्तम ऐकुण घेणार्‍या असतात. कारण कमी बोलण्याच्या स्वभावामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वावर नेहमीच प्रश्नचिन्ह ठेवले जाते. म्हणूनच त्यांच्या मनात स्वत:साठी करुणा जागृत होते. कारण ते स्वत:ला इतरांपुढे व्यक्त करू शकत नसल्याने त्यांच्या मनातील भावनांना मोकळे होण्यास वाव मिळत नाही. त्याचे दु:ख ते जास्त चांगल्याने समजून घेवू शकतात. अशावेळी जेव्हा त्यांच्यापाशी कोणी आपल्या समस्या किंवा आणखी काही बोलून दाखवत असेल. तर ते त्या व्यक्तीस कोणतिही आडकाठी निर्माण न करता शांततेने ऐकुण घेतात. कधिकधी कोणाच्या मनातले मनापासून ऐकुण घेतल्यानेही त्या व्यक्तीच्या मनात आपल्यासाठी महत्वपुर्ण स्थान निर्माण होते. तसेच हेच कारण कधीकधी त्याला आपला जीवलग मित्र बनवीण्यास कारणीभूत ठरते. कारण बोलत राहणे प्रत्येकासच आवडते जेव्हा मनापासून व समजूतदारपणे ऐकुण घेणारा आपल्या समोर असतो. परंतू आजच्या धावपळीच्या जगात अशा ऐकुण घेणार्‍यांची संख्या बोटांवर मोजण्याइतकी झालेली आहे. तेव्हा मितभाषी व्यक्तींविषयी कोणतेही गैरसमज मनात बाळ्गून त्यांच्यातील ह्या अती महत्वाच्या गुणाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मोठी चूक ठरेल.

  कधिकधी एखाद्या व्यक्तीचे दुरूनच निरीक्षण करून आपण आपल्या मनात त्याच्याविषयी ठोकताळे लावत असतो. त्याच्या पाठीमागे त्याला नावे ठेवतो. आणि त्याच्यासाठी एक विशीष्ट मत बनवून घेतो. कारण त्या व्यक्तीचे वागने आपल्याला इतरांपेक्षा निराळे वाटते. मितभाषी स्वभावाच्या माणसांना त्यांच्या दैनंदीन आयुष्यात काहीसा असाच दृष्टीकोन ठेवून पाहिले जाते. ते इतरांना गर्वीष्ठ असल्याप्रमाणे वाटतात. कारण ते त्यांच्यातील ही खास गोष्ट असूनही तिला एकप्रकारची उणीव समजून लपवीण्यासाठी इतरांशी सुरक्षित अंतर ठेवून राहतात. खरे पाहता त्यांच्यावर अशी वेळ आप्तस्वकीयांमुळेच आलेली असते. कारण कळत नकळतपणे तेच वारंवार त्या व्यक्ती पुढे त्याला बोलता येत नसल्याचा उल्लेख करत असतात. त्याचप्रमाणे बोलता न येणे ही त्याच्यातील इतकी महत्वाची उणीव आहे. हे त्याच्या मनात प्रकर्षाने भरवीले जाते. त्यामुळेच ते अशा सर्वजण एकत्र येण्याच्या क्षणांमध्ये सहभागी होण्याचे टाळू लागतात. कारण पुन्हा त्याच गोष्टीवरून त्यांचे हसे होण्याची त्यांना भिती वाटत असते. तसेच ती गोष्ट त्याच्या आत्मसम्मानाला पटत नाही. म्हणूनच मितभाषी व्यक्ती एकटे राहणे पसंत करतात. परंतू लोक त्यांना गर्वीष्ठ म्हणून मोकळे होतात.

   मितभाषी व्यक्तींना औपचारीक पद्धतीने कोणाची आवभगत करणे किंवा कोणत्याही गोष्टीची सुरवात करण्यास सामान्यपणे बोलणार्‍या व्यक्तींच्या तुलनेत कष्ट पडतात. परंतू एकदा का ते त्या वातावरणात स्थिर झाले कि त्यानंतर ते उत्तमरितीने बोलू शकतात. कोणताही गंभीर व गहन विषयावर उत्तम संवाद साधू शकतात. त्यांच्या आवडीच्या विषयावर तर त्यांचा चांगलाच आत्मविश्वास असतो. परंतू सुरवातीलाच झालेली तारांबळ बघून त्यांच्यावर कोणिही विश्वास ठेवत नाहीत. त्यांना कमकूवत समजून दूर सारले जाते. त्यांना वारंवार लहान लहान गोष्टींच्या सुचना केल्या जातात. परंतू कोणिही एक माणूस म्हणून दुसर्‍या माणसाची अडचण समजून घेण्यास तयार नसतो.

   ह्या जगाची ही रितच आहे कि जो कमजोर पडतो त्याच्यावर दबाव टाकून त्याचे खरे व्यक्तीमत्व बदलवून टाकण्याचा प्रयत्न केल्या जातो. कारण ते व्यक्तीमत्व अद्वीतीय असते. ते समाजनिर्मीत साच्यात तंतोतंत बसत नाही. त्यामुळे ह्या वेगळेपणाला समाज सहजरित्या स्विकारत नाही. अशावेळी त्याला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्षाची परीसीमा गाठावी लागते. त्याच्यातील कलाकौशल्यांना दुर्लक्षीत  केले जाते. त्याच्या माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या हृदयाला कवडीमोल समजले जाते. फक्त आणि फक्त त्याच्यातील वेगळेपणास केंद्रबिंदू बनवीले जाते. जर त्या व्यक्तीने त्याच्या अद्वीतीय गुणांमध्ये श्रेष्ठता गाठली तर त्याला गगनचुंबी यश मिळवीण्यापासून कोणिही थांबवू शकणार नाही ह्याची सर्वांना कल्पना असते. म्हणूनच पाताळयंत्री लोक त्याच्या उणींवाना त्याच्या नजरेत उजागर ठेवण्याचा कायम प्रयत्न करत असतात. जेणेकरून ती व्यक्ती संभ्रमात राहून व स्वत:विषयी कमीपणाचे विचार घेवून सामान्यपणे जीवन व्यतीत करेल.

  मितभाषी व्यक्तींनी नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे कि आपल्यात ही उणीव आहे, आपण हे करू शकत नाही, आपण इतरांसारखे नाही असे विचार करणे म्हणजे स्वत:च्याच मनात मोठ्मोठ्या अशा भिंती उभ्या करण्यासारखे आहे. ज्यांना ओलांडण्याचे धाडस आपल्याला आजीवन होत नाही. परंतू जर सुदैवाने मनातील ह्या भिंती पाडण्यात ते यशस्वी झाले तर मात्र कोणिही त्यांना थांबवू शकणार नाही. ते आत्मविश्वासाने जगाचा सामना करू शकतील.  तसेच इतर सामान्यांच्या तुलनेत असामान्य यश पदरात पाडून घेवू शकतील.

1. मितभाषी स्वभावाच्या व्यक्तीविषयी मत बनवीणे थांबवावे.

  स्वभावातील लाजरेपणा, शांतपणा हा काही गुन्हा नाही. तरिही मितभाषी व्यक्तीच्या मनात स्वत:बद्दल न्युनगंड निर्माण होणे किंवा स्वत:चा तिरस्कार वाटणे. त्याचप्रमाणे स्वत:वर टिका करण्याची वेळ का येत असावी. तसेच आयुष्यभर आपल्यातील ही खुप मोठी उणीव आहे असे समजून त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता का जाणवावी. हे अत्यंत आश्चर्यकारक आहे. त्यामागे आप्तस्वकीय, शेजारीपाजारी तसेच मित्रमंडळींचाही हात आहे. कारण ते त्यांना सर्वसामान्यांप्रमाणे वागनुक देत नाहीत. त्यांच्या दुवीधेवर वेळोवेळी हसतात. त्यांच्याबद्दल विशिष्ट मत बनवून कायम तसेच वागतात. कारण ते त्यांना कमकुवत समजतात. त्यामुळे मितभाषी कधिही त्यांच्या स्वभावावर मात करण्याचे धाडस करू शकत नाहीत.

2. मितभाषी स्वभावाच्या व्यक्तींवर विश्वास दाखवावा.

   मितभाषी स्वभावातील व्यक्ती कोणत्याही समारंभात जिथे नात्यातील, ओळखीतील माणसांशी नजरानजर करून औपचारीकता पाळावयाची आहे. अशा परिस्थितीचा सामना करण्याचे दडपण घेतात. त्यामुळे ते अशा ठिकाणी जाण्यापासून वाचण्यासाठी सतत काही ना काही बहाने देत असतात. त्यापेक्षा त्यांना स्वत:बरोबर वेळ घालवीणे जास्त आवडते. परंतू मैदानात उतरल्याशिवाय ते स्वत:वर विजय मिळवू शकणार नाहीत. अशावेळी त्यांच्यावर विश्वास दाखवीणारा कोणीतरी विश्वासू व्यक्ती त्यांच्या आसपास असला पाहिजे. जो त्यांना मनापासून प्रेरीत करत राहील. आणि त्यांच्यातील प्रगती बघून पाठीवर शाब्बासकीची थापही देईल.

3. मितभाषी स्वभावातील व्यक्तीचा आत्मविश्वास जागवावा.

  आपलाच भाऊ किंवा बहिण तसेच मित्र जर मितभाषी आहे. तर त्यांच्या जागेवर राहून त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांच्यातील इतर उत्तम गुणांची अगदी मनापासून प्रशंषा केली पाहिजे. त्यामुळे त्यांच्यात चैतन्य जागृत होईल. त्याचप्रमाणे त्यांच्याशी सामान्य वर्तन करावे. जेणेकरून त्यांची ती खासियत जी त्यांना उणीव वाटते. पुन्हा पुन्हा त्यांच्यापुढे उजागर होणार नाही. त्यांच्यावर अशा जबाबदार्‍या सोपवाव्यात ज्यामुळे त्यांना महत्वपुर्ण असल्यासारखे वाटेल. त्यांच्याशी नेहमी खरेपणाने व मायेने वागावे. त्यांच्याकडून काही चुकल्यास शांतपणे चूक समजवून सांगावी. रागावून त्यांचा अपमान करू नये. आपण जर त्यांना अशाप्रकारे महत्व दिले तर ते त्यांच्या शांत स्वभावातही आत्मविश्वासाने जीवन व्यतीत करू शकतील.

4. मितभाषी व्यक्तींवर सहानुभूती न दाखवीता पाठीशी उभे रहावे.

  जर आपण मितभाषी व्यक्तीवर सहानुभूती दाखवीली तर ते आपल्यासमोर मोकळेपणाने वागू शकणार नाहीत. कारण ती गोष्ट त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवेल. त्याचप्रमाणे आपण त्यांच्यासमोर आपल्या सामान्यपणे बोलता येण्याच्या स्वभावाचे प्रदर्शन केले तर ते आपल्यापासून आणखीच दूर जातील. कारण ते आपल्याशी जुळवून घेवू शकणार नाहीत. तेव्हा मितभाषी व्यक्तीमध्ये विश्वास जागवीण्यासाठी त्याच्या पाठीशी उभे रहायचे असल्यास अत्यंत साधा मार्ग अवलंबला पाहिजे. ”तू हो पुढे काही कमी जास्त झाल्यास मी आहे पाठीशी” असे मायेने व काळजीपोटी सांगावे. स्वत:मध्ये आत्मप्रेम जागृत करून तसेच आपण जसे आहोत तसा स्वत:चा स्विकार करून त्यातच धाडसी होवू शकतो. हे त्यांना समजवून सांगावे. आणि त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी स्वत:हून पुढे यावे.

  मितभाषी स्वभावाविषयी कोणतेही गैरसमज मनात न बाळगता वारंवार केलेल्या निरीक्षणातून त्यांच्या मनात चाललेली घालमेल आपण समजून घेवू शकतो. जर आपली समजून घेण्याची तयारी असेल तर अन्यथा आपल्यातील माणुसकी विसरून त्यांचे हसे करण्यास आपल्याला काहीच वेळ लागत नाही. जर आपल्या आसपास शेजारीपाजारी असे कोणी आढळल्यास त्यांच्यातील वाखाणण्याजोग्या गोष्टींवर लक्षकेंद्रीत करावे. त्यांना त्यांच्याच स्वभावात आत्मविश्वासू बनविण्यासाठी आपण माणुसकीच्या नात्याने त्यांच्यावर विश्वास दाखवून खारीचा वाटा उचलावा.   

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *