मी पासून आम्ही पर्यंतचा प्रवास

एका सुंदर टवटवीत व पुर्ण आकार घेतलेल्या फुलाला बघून जसे आपले मन मोहरून जाते. त्याचप्रमाणे त्या फुलाच्या सुवासात व मनमोहक सौंदर्यात आपण असे रेंगाळतो कि आपल्याला आपल्या आसपास काय चालले आहे ह्याचाही काही क्षणांकरीता विसर पडतो. तसेच एखाद्या सुंदर नात्याची सुरवात ज्यात कोमलता असते, हळूवार केलेल्या स्पर्शाला महत्व असते, मनाला मनाची भाषा कळते, एकमेकांची वाट बघण्यात तल्लीन होणे असते व नजरेत प्रेम असते. ते नाते बघणार्‍याच्या नजरेस सुद्धा भूरळ पाडते. कारण ते नाते म्हणजे जणूकाही एकप्रकारे एका मोहक कळीपासून फुल बनण्याचा प्रवास असतो.

   जोपर्यंत नात्यात नवीनपणा व सहजता असते तोपर्यंत त्याची ओढही गुलाबी असते. परंतू जेव्हा दोघांच्या नात्यात जवळीक वाढते आणि एकमेकांची सर्व रहस्य आपसात उलगडू लागतात. तेव्हा परस्परांना गृहीत धरण्यापासून मीपणास सुरवात होते. कोणत्याही हळूवारपणे उमलणाऱ्या नात्यात मीपणा म्हणजे असे जहाल विष असते. जे त्यांच्यातील कोवळ्या प्रेमालाच क्षणात भस्मसात करण्यास कारणीभूत ठरत असते. जेव्हा दोन प्रेम करणार्‍यांमध्ये एकमेकांकडे दुर्लक्ष करणे, जोडीदाराच्या भावनांची पर्वा न करणे, एकमेकांच्या सवयी खटकू लागणे, तसेच आपल्या जोडीदाराला बदलविण्याच्या हेतूने प्रयत्न करणे ह्या गोष्टींना महत्व येवू लागते. तेव्हा ते नाते कोमेजू लागते. नात्यात प्रेम तर असतेच परंतू त्यावर मात करणारा अवाजवी अपेक्षांचा डोंगरही असतो. ज्यात भावनांचा ओलावा नसतो तर मीपणाचा कोरडेपणा असतो. त्यामुळे दृष्ट लागावी असे असलेल्या त्या नात्यातील प्राण हळूहळू करून निघत जातात.  

   आजच्या काळात तरुणाईमध्ये लिव्हइन रिलेशनशिप्सचे चलन प्रचलीत आहे. ज्यात तरुण मुले मुली परस्परांना सखोल जाणून घेण्यासाठी विवाह बंधनाशिवाय सोबत राहतात. रात्रंदिनीच्या सहवासातून एकमेकांना  आणखी आणखी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या भावी जोडीदाराच्या सवयी, वैचारीक पातळी व त्याच्या जीवनाविषयीच्या महत्वाकांक्षा कळतात. त्यावरून पुढील आयुष्यासाठी जोडीदार म्हणून कायमस्वरूपी त्याची निवड करावी कि नको ह्याचा ते निर्णय घेवू शकतात. जर ह्या दरम्यानच त्यांचे आपसात खटके उडू लागल्यास एकमेकांशी लग्न करून आयुष्य सोबत काढण्याच्या निर्णयाला काहीच अर्थ नसतो. अशाप्रकारे एकमेकांना जाणून घेण्यासाठी लग्नपूर्व संबंधांचे चलन असूनही समाज निर्मीत लग्न ही व्यवस्था आजच्या स्थितीतही तेवढीच कोलमडीस जात असल्याचे दिसून येते.

   घरा-घरांमध्ये पति-पत्नी च्या नात्यातही काही ना काही बिनसलेले आढळून येते. त्यामागचे मूळ कारणही मीपणा हेच असते. तरिही भारतात इतर देशांच्या तुलनेत घटस्फोटाचे प्रमाण कमी आहे. कारण इथे कायमस्वरूपी पुरूषप्रधान संस्कृती आहे. जी युगा नु युगे चालत आली आहे. त्यामुळे आजतागायत मुलींची  मानसिकता लहानपणापासून अशी घडविण्यात येते कि  त्या मोठ्या होत असतांना आपोआपच सहनशील होत जातात.  पति परमेश्वर असतो तेव्हा त्याची सेवा करणे हेच स्त्रिचे भाग्य असते. त्याने केलेला अपमान अवहेलना मुकाट्याने सहन करत राहणे. तरिही आयुष्यभर त्याच्या सोबत राहणे. हाच एका स्त्रिचा धर्म असतो ही शिकवण मुलींना देण्यात येते. जर कोणी पति पासून होणार्‍या त्रासाविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास त्या स्त्रिस कोणाकडूनही मदत मिळत नाही. ‘ तो तुझा पति आहे तेव्हा थोडाफार त्रास होणारच सहन कर’ असे सल्ले स्वत: आई-वडीलच मुलींना देतांना दिसतात. त्यामुळे कितीही त्रास होत असला तरी पतिपासून विभक्त होणे वाटते तेवढे स्त्रियांसाठी सोपे नसते. फार कमी स्त्रिया  त्यांच्या ह्या निर्णयाला न्याय देवू शकतात. परंतू ज्या स्त्रिया असे करण्यात यशस्वी होतात. त्यांना समाज सहज स्विकारत नाही. दोष कोणाचाही असल्यास खापर मात्र स्त्रियांवरच फोडल्या जाते. जेव्हा पतिपासून होणारा अत्याचार परिसीमा गाठतो. तसेच स्त्रियांचा स्वाभिमान जागृत होतो. तेव्हाच त्या स्वबळावर ह्या टोकाच्या निर्णयाला सत्यात उतरवितात. परंतू अशा स्त्रिया मात्र बोटांवर मोजण्याइतक्याच असतात. अन्य मात्र जीवनाचा संघर्ष समजून त्यातून आपल्या पद्धतीने मार्ग काढत असतात.

  पती-पत्नीचे नाते हे जुन्या झालेल्या व मुरलेल्या लोणच्याप्रमाणे असते. खरेतर लोणचे जेवढे जास्त मुरलेले असेल तितके ते एकजीव झालेले व अप्रतीम चवीचे होते. तसेच पति-पत्नीचा सहवासही जेवढा जास्त तेवढीच त्यात परीपक्वता येणे अपेक्षीत असते. परंतू सर्वच जोडप्यामध्ये असे बघण्यात येत नाही. कारण मीपणा जो त्यांचा सर्वात मोठा शत्रू असतो. तो तसे होवू देण्यात बाधा आणत असतो. अहंकारामुळे ते एका छताखाली असूनही सोबत नसतात. सोबत असूनही त्यांचा जीवनप्रवास एकाकी सुरू असतो. त्यांच्यातील नाते एकमेकांवर दबाव टाकणारे असते. अवांतर अपेक्षांमुळे त्यांचे नाते कधिही मैत्रीत रुपांतरीत होत नाही. त्यांची उर्जा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने प्रवाहीत होत असते. त्यामुळे त्यांच्या एकत्र असण्यातून काहिही निष्पन्न होत नाही.

    स्त्रि पुरूषांना घडवितांना सृष्टीनेच अंतर ठेवले आहे. तेव्हा पुरूष हे मुळातच अहंकारी व पराक्रमी असतात. त्यांच्यातील मीपणा हा त्यांना जीवनात पराक्रम गाजविण्यास मदत करतो. परंतू पुरूषप्रधान संस्कृतीत बरेच पुरूष आपल्या अहंकाराचा वापर अयोग्य ठिकाणी करतांना दिसत असतात. आपल्याच आयुष्याच्या  जोडीदारावर वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने अत्याचार करणे, तिचा अपमान व अवहेलना करणे, घराचा प्रमुख ह्या नात्याने घरात धाक निर्माण करणे अशा प्रकारांना ते पुरूषार्थ गाजवीणे असे समजतात. त्याचप्रमाणे आजच्या काळातील स्त्रियाही सर्वदृष्टीकोनातून आत्मनिर्भर होत आहेत. उच्च शिक्षण घेण्यापासून ते स्वबळावर जीवन जगण्यापर्यंतचा  पल्ला त्यांनी गाठला आहे. त्या मुळे त्याही पवित्र स्त्रित्वाचा नकारात्मक अर्थ लावून मीपणाच्या अविर्भावात जगत आहेत. अशावेळी पति-पत्नी दोघेही आपआपल्या स्थानावर ठाम राहून कदापि एकमेकांपुढे नमते घेण्यास तयार नसतात. नात्यात लागलेली मीपणाची आग विझविण्यासाठी त्यांच्यापैकी कोणिही पुढे येत नाही. दोघेही आपाआपल्या दिशेने नात्याला खेचण्याचा प्रयत्न करतात. त्याचे परिणाम म्हणजे अर्थातच नाते दुभंगते.

    पति-पत्नीचे नाते कायम हिरवेकंच रहावे व त्यात परीपक्वता यावी असे वाटत असल्यास सर्वप्रथम दोघांनीही मीपणाला मुठमाती देवून आम्ही झाले पाहिजे. आम्ही म्हणजे त्यांचे एकजीव झालेले रूप जिथे वेगळेपणाला थाराच उरणार नाही. विचार, उर्जा, दिशा सर्वकाही एकरूप. मी पासून सुरू झालेला प्रवास आम्हीत रुपांतरीत होण्यालाच जोड्या स्वर्गात बनणे असे म्हंटले पाहिजे. पति-पत्नी हे एकमेकांचे सोबती असले पाहिजे. त्यांनी एकमेकांच्या कमतरतांवर बोट दाखवून हसण्यापेक्षा त्या उणीवांना आपल्या कर्तुत्वाने भरून काढण्याचा मोठेपणा दाखवला पाहिजे. आपल्या जोडीदारास कधिही एकटेपणाची जाणीव होवू देवू नये. तरिही त्याच्या व्यक्तीगत क्षेत्राचा आदर राखला पाहिजे. त्यांच्या एकत्र येण्याने त्या नात्यात परीपुर्णता यावी. एकाची महत्वाकांक्षा पुर्ण करण्यासाठी दुसर्‍याने भक्कम पाठबळ द्यावे. दोघांचे विचार कायम जुळतीलच असे नाही परंतू एकमेकांच्या विचारांना नेहमी समजून घ्यावे व प्रादान्य द्यावे. जीवनाच्या संघर्षात त्यांनी कधिही एकमेकांची साथ सोडू नये व नेहमी एकमेकांची साथ मिळविण्यासाठी प्रयत्नशील रहावे. आपसातील मतभेद नेहमी शक्यतोवर दोघांनीच सोडवावे. आपल्या जोडीदाराला आपलाच एक भाग समजून त्याला स्वत: इतकेच महत्व द्यावे. जोडीदाराला दिलेली साथ हृदयाच्या तळापासून असावी. जेणेकरून आपण शरीर रूपात अस्तित्वात नसतांनाही ती कायम अतूट राहील.

1. प्रत्येक क्षण एकमेकांच्या साथीने हसत खेळत जगावा.

  जेव्हा दोन जीवांच्या मनात प्रेमाची कळी उमलते तेव्हा त्यांना वार्‍या बरोबर तरंगत असल्याप्रमाणे वाटते. त्यांचे मन फुलपाखराप्रमाणे इकडून तिकडे भरार्‍या घेत असते. त्यांच्या नजरेच्या टप्प्यात केवळ सौंदर्य असते व जगणे त्यांना स्वप्नवत वाटू लागते. प्रेमाची जादू त्यांच्या आयुष्याला कलाटणी देते. परंतू जेव्हा जीवनात कायमस्वरूपी जोडीदार म्हणून स्विकारण्याची वेळ येते तेव्हा मात्र ‘दुरून डोंगर साजरे’ वाटू लागतात.  कारण जवळीक वाढल्यावर एकमेकांच्या गुणांसोबत दोषही निदर्शनात येवू लागतात. त्याचप्रमाणे दोषांवरच नजर जास्त खिळून बसते. अशावेळी आपसात खटके उडू लागतात. लहान सहान गोष्टी मोठ्या भांडणात परीवर्तीत होतात. त्यामुळे नाते निष्प्राण होवू लागते. तेव्हा नात्याला वाचविण्यासाठी दोघांनीही मीपणा सोडून नात्यात आलेले अंतर कमी करण्याच्या दिशेने पावले टाकली पाहिजेत. जोडीदारामधील उत्तम गुणांची यादी तयार करावी. तसेच स्वत:मध्येही आपणहून काही आवश्यक ते सकारात्मक बदल करावेत. जेणेकरून दुरावलेली मनं पुन्हा जवळ येवू लागतील. एकमेकांच्या सोबतीने प्रत्येक क्षण प्रेमाने व आपुलकीने सजवावा. आणि हसत खेळत आयुष्य घालवावे.

2. दोघांचीही उर्जा एकरूप होवून एकाच ध्येयावर स्थिर व्हावी.

   पति-पत्नीत मीपणा असेल तर त्यांच्यात कायम न दिसणारा दुरावा राहतो. तसेच ते फक्त स्वत:वर लक्ष केंद्रीत करतात. त्यांच्यात स्पर्धा निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ते एकमेकांना पाठबळ न देता व्यक्तीगत पातळीवर स्वत:ला उठविण्याचा प्रयत्न करतात. कोणाजवळ बोलतांना ते स्वत:विषयी सांगतात आम्ही असा उल्लेख करून काहिही बोलत नाहीत. परंतू जर त्यांनी जाणीवपूर्वक त्यांच्यातील अहंकाराला बाजूला ठेवले आणि दोघांनी मिळून एक ध्येय ठरवीले. तर ते त्या ध्येयासाठी एकत्र येवून मेहनत घेवू लागतील. त्या दृष्टीकोनाने त्यांची विचारधारा व उर्जा एक होईल. अशावेळी सृष्टीही त्यांच्या निर्दोष प्रयत्नांना तथास्तू म्हणेल आणि ते त्या ध्येयाला काबिज करू शकतील.

3. दोघांच्या एकत्र येण्यातून महान हेतू साध्य व्हावा.

   पति-पत्नीचे नाते अत्यंत सुरेख व पवित्र असते. निसर्गनियमाप्रमाणे एक जोडपं जे सृजन व नवनिर्मीतीचे कार्य पार पाडत असते. त्यामुळे त्यांच्यावर सृष्टीचे विशेष आशिर्वाद असतात. जेव्हा ते एकत्र येतात त्यांची उर्जा द्वीगुणीत होते आणि ते अत्यंत प्रभावशाली होतात. इतिहासात अशा जोडप्यांची नावे सुवर्णाक्षरात कायमस्वरूपी कोरल्या गेली ज्यांनी एकत्रीतपणे समाजात सकारात्मक बदल घडवून आणले. अशाप्रकारे प्रत्येकाने आपल्या जोडीदाराच्या आपल्या आयुष्यात येण्याला सृष्टीचा दृष्टांत मानावा. तसेच जोडीदाराची साथ मिळविण्यासाठी स्वत:मध्ये आवश्यक ते परीवर्तन आणावे. आपला जोडीदार म्हणून ज्या व्यक्तीची निवड सृष्टीने आपल्यासाठी केली आहे. त्यामागे सृष्टीच्या असलेल्या हेतूवर नेहमी चिंतन करावे. ज्या कामात दोघांचीही संमती असेल व मनापासून साथ मिळत असेल त्या कामाला आपल्या आयुष्यातील महान हेतू समजावा.

4. मी पासून आम्ही पर्यंतचा प्रवास म्हणजे कायमची साथ

   जेव्हा पति-पत्नी दोघेही नात्याला पोखरणार्‍या अहंकाराला आयुष्यातून हद्दपार करतात. एकमेकांचा मनापासून तसेच कायमस्वरूपी स्विकार करतात. तेव्हा त्यांची आजन्म सोबत राहण्याची हमी असते. कारण ते अंतकरणाने एक होतात. त्यावेळी सृष्टी त्यांच्या एकत्र येण्याची साक्षीदार असते. त्यांचे सखोल प्रेम शारिरीक सौंदर्याच्या आकर्षणापुढे गेलेले असते. त्यामुळे त्याचे शब्दात वर्णन होणे अशक्य असते. तिथे मीपणा गळून पडतो. तसेच आम्हीला महत्व प्राप्त होते. एका जोडप्याचे अशाप्रकारे आम्ही होणे म्हणजे एकजूट, एक शक्तीशाली उर्जा, एक महत्वपुर्ण ध्येय, जगासमोर एक भव्य आदर्श, आणि एक विशाल विचारधारा जी अनेकांना स्फुर्ती देते. ज्यात प्रगती होते. कारण तिथे कोणा एकाचे अस्तित्व उरत नाही. कोणतेही जोडपे जेव्हा मीपणा सोडून आम्ही होते तेव्हा त्यांच्यावर सृष्टीच्या आशिर्वादांचा वर्षाव होतो. त्यांनी ठरविलेले मनसूबे पुर्ण करण्यास त्यांना सृष्टीचे पाठबळ लाभते. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचे सोने होते.

    मीपणा म्हणजे अहंकार जो आपल्याला एक माणूस म्हणून खुजे बनवितो. आपल्या विचारांना खुंटीत करतो. अशी प्रगती जी मार्गात येणार्‍यांची मनं छिन्न विछिन्न करते तिला काळिमात्रही अर्थ उरत नाही. परंतू जी प्रगती जोडीदाराच्या सहयोगाने होते. जिथे दोघांचाही खारीचा वाटा असतो. तसेच मिळवलेल्या यशाने पती पत्नी दोघेही आनंदी असतात. ते आम्ही होणे असते. ज्यात ध्येय हे मनांना एकत्र आणण्याचे माध्यम बनते. त्याचप्रमाणे आपसात स्वारस्य निर्माण करते. परंतू मीपणा हा जोडीदारावर दबाव टाकून त्याची साथ मिळवीत असतो. परंतू आम्हीच्या प्रवासात मात्र एकमेकांची साथ हेच मर्म असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *