
घरामध्ये मुलगी जन्मास येणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट असते. कारण तीची उर्जा जन्मताच स्त्रीत्वाच्या गुणविशेषांनी सकारात्मक असते. त्यामुळे घरात चैतन्य पसरते. अशाप्रकारे मुलीच्या येण्याने घरादारास सुख समृद्धी प्राप्त होते. मुलगी आपल्या चिमुकल्या सोनपावलांनी केवळ आपल्या घरातच नव्हे तर आपल्या आयुष्यात व आपल्या हृदयातही प्रवेश करते. तसेच ती तिच्या लोभसवाण्या बालरूपात प्रत्येकास वेड लावत असते. त्यामुळे तेव्हा पासूनच मुलगी घरातील प्रत्येकाचा श्वास होवून जाते. तिच्या रडण्याने सर्वांच्या तोंडचे पाणि पळते तर तिच्या चेहर्यावर फुललेले निरागस हास्य कायम टिकून रहावे म्हणून प्रत्येक जण धडपडत असतो.
मुलगी ही निसर्गाची अत्यंत देखणी कलाकृती आहे. कारण ति रूपवान असो किंवा नसो परंतू खात्रीशीरपणे निर्मळ मनाची धनी असते. तिच्याकडे उपजतच खास वैशिष्टे असतात. म्हणूनच तिला परिस्थितीची उमग लवकर होते. घरातील माणसे तिच्यासाठी जीव कि प्राण असतात. त्याचप्रमाणे प्रत्येकाला जीव लावणे, समजूतदारपणा, प्रेम, दया, ह्या गोष्टी तिला जन्मजात अवगत असतात. त्यामुळे तिला लहानपणी कशीही संगत लाभली किंवा कशाही परिस्थितीतून जावे लागले. तरी तिच्यात दडलेल्या विशेषता म्हणजे संयम व मनाची कणखरता आपोआपच अस्तित्वात येवू लागतात.
मुलं ही आईच्या काळजाचा भाग असतात. त्यातल्या त्यात मुलगी आईसाठी तर खास असते. आई व मुलीचे नाते जगावेगळे असते. नात्याने त्या आई व मुलगी असल्या तरी एकमेकींना त्या इतक्या सखोल समजून घेतात कि त्यांच्यात आपोआपच घट्ट मैत्री होते. प्रत्येक मुलीला तिची आई जगातील सर्वात उत्तम आई वाटत असते. तर आईला आपली मुलगी सुंदर परी भासत असते. त्यामुळे आईच्या डोळ्यात आपल्या मुलीसाठी असंख्य स्वप्न जागृत होतात.अशाप्रकारे आई व मुलगी शरिराने वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचे मन मात्र एकच असते.
एकीच्या डोळ्यात पाणि आले तर दुसरीच्या डोळ्यांनाही धारा लागतात. एक आनंदी असली तर दुसरी त्याहून आनंदी असते. एक हिरमुसली तर दुसरीचा चेहराही आपोआप कोमेजतो. आई व मुलगी हे दोन स्त्रियांमधील एकमेव असे नाते आहे ज्यात मत्सर, आपसात चढाओढ ह्या नकारात्मक गोष्टींना थारा नसतो. निरागस प्रेम व शुद्ध मैत्री चे हे नाते प्रतिक असते. ह्या नात्यात फक्त गोडवा असतो. त्यांना परस्परांना समजून घेण्यासाठी शब्दांची गरज पडत नाही. असे हे दृष्ट लागावी असे आई व मुलीचे नाते असते.
आपल्या ह्या पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रियांचे काय स्थान होते आणि आता आहे हे आपण जाणतोच. समाजात पसरलेल्या दुषीत विकृतीमुळे पालकांच्या मनात आपल्या मुलींना घेवून भिती असते. त्यामुळे पालक स्वत:च मुला-मुली मध्ये अंतर करतात. पुर्वीच्या काळात मात्र त्यामागचा उद्देश वेगळा असायचा. मुलगा वंशाचा दिवा असतो म्हणून त्याला घरात वेगळा मान, त्याची विशेष देखभाल असायची. त्यामुळे लहानपणापासून मुलांच्या मनात पुरूषी अहंकाराची पाळंमुळं फुटत असत. मुलगी मात्र कायमच घराण्याची पणती असते. तिला सतत आदर्शवादाचे धडे देवून मोठे करण्यात येते. तिच्याशी संबंधीत प्रत्येक गोष्टीमधून तिला काहितरी शिकविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मुली लहानपणापासून समजदार होत जातात. त्यांच्यात एक वेगळी परिपक्वता येवू लागते. त्याचप्रमाणे मुलींना निसर्गाने ज्या देणग्या बहाल केल्या आहेत. त्यांचीही प्रचीती त्यांना वाढत्या वयाबरोबर होवू लागते. त्यामुळे त्या पालकांचा सर्वात मोठा आधार बनतात. कारण त्या पालकांच्या समस्या, त्यांच्या वेदना स्वत: अनुभवतात. म्हणूनच मुली ह्या आई-वडीलांनी उंच माथ्याने मिरवाव्या अशा त्यांचा अभिमान असतात.
अशा ह्या संपुर्ण घराला प्रेमाने सांभाळणार्या व घरातील प्रत्येकाचा प्राण असलेल्या तसेच घरादाराचे चैतन्य असलेल्या मुली जेव्हा लग्न करून सासरी जातात. तेव्हा मात्र आई-वडीलांसाठी तो क्षण असहनीय असतो. शरीर सोडून प्राण निघून जात असल्याचा अनुभव त्यावेळी त्यांना येत असतो. मुलींच्या अस्तित्वाने घराचा कानाकोपरा, निर्जीव भिंतीही बोलक्या असल्यासारख्या वाट्तात. मात्र त्यांच्या जाण्याने त्या पुन्हा अबोल होवून जातात. परंतू मुली मात्र जिथे जातील तिथे आपल्या प्रेमाने व विनम्रतेने नविन माणसातही आपले अमीट स्थान निर्माण करतात. तसेच त्यांच्या नविन आयुष्याची सुरवात करतात. परंतू त्या आई-वडीलांना व आपल्या बालपणाला कधिही विसरत नाहीत. ज्याप्रमाणे तांदळाचे पिक जिथे बियाणे उगवते त्या ठिकाणी होत नाही. त्याला दुसर्या जागेवर हलवावे लागते. त्याचप्रमाणे मुलींचे जीवनही असते. ज्या घरी त्या जन्म घेतात, लहानाच्या मोठ्या होतात आपल्या त्या माणसांना सोडून त्यांना एकदिवस जावे लागते. कितीही कठोर असली तरी हीच समाजाची रीत आहे.
मुलींना परक्याचे धन असेही संबोधतात. कारण मुलगी मोठी झाली कि तिचे लग्न करून सासरी पाठवणी करणे हा समाजाचा नियम आहे. परंतू मुलींप्रती असलेला हा मागासलेला दृष्टीकोन आता बदलला पाहिजे. त्यांना लैंगिक भेदाभावातून पाहण्यापेक्षा एक माणूस म्हणून सर्व हक्क व अधिकार दिले गेले पाहिजे. मुलींनी बाहेरच्या जगात कितीही प्रगती केली तरिही त्या घरातील कर्तव्यांशी कायम बांधलेल्या असतात. कारण घरात त्यांचे कोठेही कमी पडणे कोणीही खपवून घेत नाही. सर्वप्रथम त्यांनी घराला महत्व दिले पाहिजे. त्यानंतरच त्यांना आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटविण्याकरीता आपले व्यक्तीमत्व प्रभावी करण्याची संधी मिळते. कारण त्यांच्या भूमिका व त्यांच्याशी निगडीत कर्तव्य कधीकधी त्यांच्यासाठी अनेक अडचणी निर्माण करत असतात. अशाप्रकारे दोन आघाड्यांवर मुली आजीवन तैनात असतात. तसेच तारेवरची कसरत करत जीवन जगत असतात.
तरिही अजूनही समाजात मुलीचा जन्म नाकारण्यात येतो. आपल्याला जन्म देणारी एक स्त्रिच असते हे ठाऊक असूनही दररोज जगाच्या कानाकोपर्यात मुलींच्या भृणहत्या होत असतात. पोटात मुलगी वाढत आहे हे कळल्यावर कित्येक आयांना सुद्धा जीव गमवावा लागतो. आई, बहिण, पत्नी प्रत्येकाला हवी असते परंतू मुलगी मात्र नकोशी असते. कारण लग्नाच्या पवित्र बेडीस महागड्या भेटवस्तूंच्या मागणीने करारनाम्याचे स्वरूप देवून समाज निर्मित हुंड्या सारख्या वाईट प्रथा दीर्घ कालावधीपासून मुलींचे जीवन नरक बनवीत आहेत. ह्या अत्यंत दुर्दैवी व लाजीरवाण्या प्रथा माणुसकीला काळीमा फासणार्या आहेत. त्याचबरोबर समाजाचे हे विकृत नियमच मुलींना हतबल बनवित आहेत.
दररोज मुलींशी जुडलेल्या अघटीत घटना आपल्या आसपास घडत असतात. त्यामुळे प्रत्येक आईच्या मनाचा आपल्या मुलीचा विचार करून थरकाप उडतो. अशावेळी प्रत्येक घरातून मुलींवर अनेक बंधने लादण्यात येतात. परंतू त्यामुळे मुलींवर होणार्या अत्याचारांवर आळा बसत नाही. कारण अक्षम्य गुन्हे करणारे गुन्हेगार स्वतंत्रपणे समाजात वावरत असतात. आज मुलींवर अत्याचार करणार्या गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा तिही ताबडतोब देण्यात येण्याची गरज आहे. तरच अशा क्रूर कर्म्यांचे विकृत मनसुबे हाणून पाडले जातील व मुलींचे जीवन सुरक्षीत होईल.
मुलींना स्वसुरक्षे संबंधीत शिक्षण प्रत्येक शाळेतून तसेच घराघरातून देण्यात यावे. जेणेकरून मुलींना एखाद्याची विकृत नजर, नकोसा स्पर्श ओळखता आला पाहिजे. आज मुली उच्च शिक्षीत, आत्मनिर्भर तर होतच आहेत. त्याच बरोबर त्या जर स्वत:मध्ये असलेल्या सात्विकतेस व विनम्रतेस आपल्या आचरणात आणू शकल्या. तर ती त्यांची खरी शक्ती असेल. त्याचप्रमाणे त्या जर आत्मसम्मानाच्या जगण्याने प्रेरित असल्या तर त्यांचे खर्या अर्थाने सशक्तीकरण होईल.
1. संस्कार मुलींना कणखर बनवितात.
आजच्या युगात मुलांप्रमाणेच मुलींनाही उच्च शिक्षीत करण्यात येते. कारण शिक्षण घेवून त्यांचे आयुष्यात प्रगती करणे महत्वाचे आहे. शिक्षणाने त्यांच्या विचारात स्पष्टता येते. त्यांची निर्णय घेण्याची क्षमता वाढते. आणि त्या आत्मनिर्भर बनतात. त्याचबरोबर त्यांच्या आत्मविश्वासात भर पडते. परंतू उच्च शिक्षणाच्या जोडीला संस्कारांची सोबतही असली पाहिजे. कारण संस्कार त्यांना विनम्र बनवितात व स्थिरता प्रदान करतात. त्यामुळे त्या कितीही उच्च शिक्षीत असल्या तरीही अहंकाराला बळी पडत नाहीत. मुलींचे घरातील स्थान, त्यांचे घरात हसत मुखाने व प्रसन्न असणे, आपल्या माणसांना स्वयंपाक बनवून खाऊ घालण्याची त्यांची आवड, बोलतांना मोजक्या व महत्वपुर्ण शब्दाचा वापर करणे, शिष्टाचार पाळणे व आत्मसम्मान जपणे हे मुलभूत संस्कार मुलींना कणखर बनवितात. तसेच त्यांनी कितीही ज्ञानार्जन केले तरी त्यांचे पाय मातीशी जुळवून ठेवतात.
2. मुलींचे कायम प्रसन्न राहणे ही आपली जबाबदारी समजावी
समाजाचे मुलींप्रती जे कठोर नियम आहेत. त्याचे एकप्रकारे प्रत्येक आई-वडीलांच्या मनावर दडपण असते. त्यामुळे ते मुलींच्या जन्माने खुश तर असतात. परंतू तरिही कोठेतरी त्यांच्या मनावर ताण असतो. मुलगा असो वा मुलगी दोघेही ह्या सृष्टीचे अंश आहेत. आपल्या घरात जन्म घेण्यासाठी त्यांनी आपल्याला माध्यम म्हणून निवडले आहे व आपल्याला आई-वडील बनविले आहे ह्याचा आपल्या मनात आनंद असला पाहिजे. तसेच आपल्या लेकरांना कायम प्रसन्न ठेवणे, स्फुर्तीदायक ठेवणे हे आपले कर्तव्य असले पाहिजे. त्यातल्या त्यात मुलगी तर आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ठ व खास भेट असते. तिला नाकारणे किंवा तिच्याकडे लक्ष न देणे म्हणजे करंटेपणाचे लक्षण आहे. मुलींनी आपल्याकडे केलेला प्रत्येक हट्ट आपल्या प्रगतीचे मार्ग मोकळे होण्याची ग्वाही असते. मुलींच्या इच्छा आकांक्षा म्हणजे प्रगतीची उंच शिखरे गाठण्याचा मार्ग असतो. हा दैवी संकेत आपल्याला ओळखता आला पाहिजे. जर आपल्या बरोबर असतांना मुलींना मन मारून जगण्याची वेळ आली आहे. तर समजावे कि आपली प्रगती खुंटली आहे. तेव्हा मुलींनी कायम आनंदी असले पाहिजे ही आपली जबाबदारी आहे. कारण हा सकारात्मक विचारच आपल्या उज्वल भविष्याची गुरूकिल्ली आहे.
3. मुलींना स्वाभिमानी बनवावे.
मुलींचे बालपण असे असले पाहिजे कि त्या दिवसांच्या गोड आठवणी आयुष्यभर त्यांच्या लक्षात रहाव्यात. परंतू लाडकौतूकाबरोबर त्यांच्या बालमनावर काही महत्वपुर्ण गोष्टी कायमच्या कोरल्या गेल्या पाहिजे. ज्या त्यांना स्वाभिमानी बनवतील. जसे अशा जागेवर कधीही बसू नये जेथून आपल्याला कोणी उठ म्हणेल. ही वाटायला क्षुल्लकशी गोष्ट आहे परंतू त्यामागे मोठी शिकवण आहे. वस्तू असो, जागा असो किंवा अन्य काही ज्यावर आपला कोणताही हक्क नाही. कोणाच्याही परवानगी शिवाय अशा कोणत्याही गोष्टीचा आपण उपभोग घेण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला अपमानीत व्हावे लागेल. ही शिकवण आजीवन मुलींच्या उपयोगी पडू शकते. त्याचप्रमाणे सुंदर दिसण्यासाठी किंवा शरिराला सुशोभित करण्यासाठी शक्यतोवर खोट्या दागिन्यांचा वापर करू नये. कारण आपल्याला मनुष्य जन्म लाभला आहे. तेव्हा आपण सर्वार्थाने श्रेष्ठ आहोत. आपण आपले शरीर निरोगी राहावे म्हणून त्याची काळजी घ्यावी व त्याला स्वच्छ ठेवावे. परंतू त्याच्या सौंदर्याच्या मोहात अडकू नये. जर आपण काही कारणाने खरे दागिने घालू शकलो नाही तर आपल्या अंतर्मनात डोकावून बघावे. जे कितीतरी बहुमूल्य गोष्टींनी समृद्ध आहे. तसेच त्या गोष्टी आपल्याला आतून देखण्या बनवितात. त्याचप्रमाणे ते खरे सौंदर्यच आपले प्रभावी व्यक्तीमत्व घडवत असते. जे शरिराच्या सुंदरतेपेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. ह्या दोन्ही गोष्टी मुलींना स्वाभिमान शिकवितात.
4. मुलगी क्रांती आणणारी असावी.
कित्येक कुटूंबांमध्ये जुन्या रुढी परंपरांना इतके जोपासले जाते कि त्यापुढे घरातील स्त्रिया व त्यांची होणारी तारेवरची कसरत ह्यांची पर्वा केली जात नाही. स्त्रिया उघडपणे विरोध करू शकत नाहीत आणि त्यांना हतबल होवून सहन करत राहण्यापलिकडे कोणताही मार्ग नसतो. अशावेळी बदल घडवून आणण्यासाठी भक्कम नवविचारांची गरज असते. मुली ह्या माहेर व सासर अशा दोन कुटूंबांचे प्रतिनिधीत्व करत असतात. जर त्यांनी स्वत:ला सिद्ध करून त्यांच्या नवविचारांनी जुन्या व ज्यामागे कोणतेही वैज्ञानिक ठोस कारण नाही. अशा जुनाट परंपरांना ज्या स्त्रियांवर जोरजबरदस्तीने लादण्यात येतात त्यांना खोडून काढले. तर दोन्ही कुटूंबातील स्त्रियांना दिलासा मिळेल. आजवर क्रांतिकारी बदल स्त्रियांनीच घडवून आणले आहेत. तेव्हा मुलींनी स्पष्ट मतवादी असले पाहिजे. त्यांच्यात नकारात्मक गोष्टींना विरोध करण्याचे सामर्थ्य आले पाहिजे. तरच पुढच्या येणार्या पिढ्यांमध्ये क्रांतिकारी बदल आणता येतील.
मुलगी ही घराची शोभा असते. तिच्या निरागस व निर्मळ भावनांना जपणे आपल्याला जमले पाहिजे. मुलीला कधिही परक्याचे धन समजू नये. तिला आपल्या जीवनाचा अत्यंत महत्वाचा भाग समजावे. मुलीला तिच्या जीवनात उंच झेप घेता यावी म्हणून कायम तिच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहावे. कारण विकृत पुरुषी मानसिकता जी आज मुलींच्या भरारी घेण्यावर रोक लावण्यास सज्ज आहे. मुलींना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी अमानवीय मार्गाचा अवलंब करत आहे. आपल्या आई वडीलांचा सर्वतोपरी आधार असलेल्या कर्तबगार मुलींना आपल्या वासनेचे शिकार बनवून कायमचे संपवून टाकण्यात येत आहे. एकप्रकारे आजही स्त्रीजन्म हा लैंगिक भेदभावांच्या बोचऱ्या काट्यांवरून मार्गक्रमण करत आहे. तेव्हा आता प्रत्येक घरातून व्यक्तीगत पातळीवर मुलांची पुरुषी मानसिकता घडत जाण्यापासून थांबविली पाहिजे. त्यांना आपल्या जीवनातील स्त्रियांचे महत्व कळले पाहिजे. स्त्रियांना माणूस म्हणून बघण्याकडे कल वाढला पाहिजे. तरच स्त्री पुरूष हा भेदभाव आपल्या विचारांमधून कायमचा दूर होईल. तेव्हाच खऱ्या अर्थाने मुलींच्या आल्याने घराचे नंदनवन झाल्यासारखे वाटेल. तसेच मुलगा असो वा मुलगी दोघेही फक्त घरासाठीच नाहीतर समाजासाठीही सौभाग्याची नांदी घेवून येतील.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)