मुलांचे श्रेष्ठता गाठणे सर्वस्वी पालकांच्या हाती

  मुलं ही देवाघरची फुले असतात. त्याचप्रमाणे त्यांचे बालपणच खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाची सुरवात असते. तसेच वयाचा एक महत्वाचा टप्पा असतो. त्याचप्रमाणे ही सुरवात प्रत्येकाची वेगवेगळी व अडचणींची असते. काही मुले अनाथाश्रमात वाढतात. काहींचे पालन पोषण रस्त्याच्या कडेने होते. कारण ती बेघर कुटूंबात जन्म घेतात. तर काही बेसुमार श्रीमंतीत लहानाची मोठी होतात. तर काहींना जन्मापासूनच गरिबीचे चटके सोसावे लागतात. परंतू माता-पित्याच्या मायेचे छत्र नसलेले व त्यांच्या प्रेमाला मुकलेले बालपण मात्र अत्यंत कठोर असते.

  काही पालकांना अपत्याचे सुख लाभत नाही. परंतू  कधिकधी जिथे पालक व मुले एका छताखाली एकत्र असतात. तिथे मात्र मुले मनाने पालकांपासून दुरावलेली असतात. ही तफावत बर्‍याच ठिकाणी आढळून येते . कारण मुलांना पालकांसमोर मन मोकळे करण्यास वाव मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यात आपसी ताळमेळ सखोल नसतो. मुलं पालकांच्या अपेक्षांना पात्र ठरत नाही. म्हणूनही पालक त्यांच्यावर नाराज असतात. तर पालक मुलांना समजून घेण्यात कमी पडतात म्हणून मुलंही समाधानी नसतात. त्यामुळे त्यांच्यात एक अदृश्य अशी दरी निर्माण होते. ज्याचा सरळ परीणाम त्यांच्यातील नात्यावर होतो. बर्‍याचदा मुलं पालकांशी फटकून वागतांना दिसतात. तसेच पालकांकडे त्यांच्या जबाबदार्‍या व कर्तव्यांमुळे  मुलांसोबत बसून संवाद साधण्यास पुरेसा वेळही नसतो. जेणेकरून ते मुलांची मनं मोकळी करून त्यांच्या समस्या जाणून घेतील. एकंदरीत ह्यातून हेच निष्पन्न होते कि जीवनात समस्यांचा कधिही अंत होत नसतो.

  अशावेळी पालक नवीन पिढीवर दोषारोपण करतांना दिसतात. तसेच मुलांनाही पालकांचे विचार पटत नाहीत. दोघेही आपाआपल्या मतांवर ठाम असतात. कोणिही स्वत:मध्ये बदल आणण्यास तयार नसतात. तसेच बदल नेमका कोठे आणायचा हे ही कळण्यास मार्ग नसतो. अशापरिस्थीतीत पालकांनीच पुढाकार घेवून ह्या समस्येचे निराकरण केले पाहिजे. कारण ह्या मतभेदांमध्ये त्यांच्याच मुलांचे भविष्य पणास लागण्याची शक्यता असते. त्यांच्या जीवनात संभ्रम निर्माण होवू शकतो.

   कधिकधी मुलांच्या मनात इतरांसाठी इर्षा जागृत होते. आपल्या पालकांनी इतर मुलांची केलेली प्रशंषा त्यांना आवडत नाही. कारण बर्‍याचदा पालक त्यांच्या मुलांनी स्वत:मध्ये केलेल्या सुधारणेकडे दुर्लक्ष करतांना दिसतात. तसेच जी मुले उच्च श्रेणीत येतात किंवा विवीध खेळांमध्ये बाजी मारतात. त्यांची उदाहरणे ते आपल्या मुलांना देतात. अप्रत्यक्षपणे ते आपल्या मुलांकडूनही त्याच अपेक्षा ठेवत असतात. आपल्या मुलांसमोर ते त्या यशस्वी मुलांना शुभेच्छा देतात. अशावेळी आपोआपच मुलांच्या मनात तुलना व मत्सर निर्माण होतो. त्यासोबतच त्यांना  स्वत:विषयी कमीपणाही वाटू लागतो. ही अत्यंत गंभीर बाब आहे. तेव्हा पालकांनी त्यावर नक्की विचार करावा. मुलांनी त्यांच्यात  आणलेले सकारात्मक बदल व केलेल्या सुधारणा ह्याकडे पालकांनी बारीक लक्ष ठेवून वेळोवेळी त्यांना प्रोत्साहीत करावे. असे केल्याने मुलांना मानसिक स्तरावर पालकांचे भक्कम पाठबळ लाभते. ते स्वत:चा स्विकार करणे शिकतात. इतरांशी स्वत:ची तुलना  न करता आपल्या क्षमता ओळखून त्यात उत्तम करतात. तसेच स्वत:च्या कर्तुत्वांवर पुर्ण विश्वासही ठेवतात.

   मुलं जसजसी मोठी होतात त्यांचे व्यक्तीगत जग निर्माण होवू लागते. कारण समवयीन सोबत ही त्यांच्या वयाची गरज असते. जर घरात दबावपुर्ण वातावरण असेल तर मुलं पालकांशी मोकळेपणाने संवाद साधू शकत नाहीत. अशावेळी ते त्यांच्या मित्रांमध्ये रमतात. आणि त्यांच्याकडे  आपले मनही मोकळे करतात. परंतू बर्‍याचदा त्यांचे हे स्वतंत्र विश्व ते पालकांपासून लपवून ठेवण्याचा शक्य तितका प्रयत्न करतात. कारण पालकांनी कधिही त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केलेला नसतो.

  मुलांच्या वागन्यात जरा जरी बदल दिसल्यास पालक त्यांना नजरकैदेत ठेवतात. त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करतात. त्यांना धारेवर धरतात. परंतू त्यावेळी मुलांना व त्यांच्या भावनांना समंजसपणे व मायेने सांभाळण्याची आवश्यकता असते. त्यांना जास्तीत जास्त समजून घेण्याची गरज असते. त्यांना शांततेने ऐकुण घेणे तसेच त्यांंच्या व्यक्तीगत जीवनाविषयी कोठेही वाच्यता होणार नाही ह्याची खात्री मुलांना पटवून देण्याचीही आवश्यकता असते. तरच मुलं व पालक ह्यांच्यात उत्तम व पारदर्शक संबंध निर्माण होवू शकतात.

   जेव्हा मुलांकडून काही चुका होतात किंवा त्यांना गुण कमी पडतात. तेव्हा  पालक मुलांवर आपली नाराजी व्यक्त करतात. खुपदा राग अनावर होवून त्यांच्या वर हातही उगारतात. पालकांकडून  ही नकारात्मक प्रतिक्रीया मुलांच्या हातून चुक झाल्या नंतर ताबडतोब दाखविण्यात येते. परंतू जेव्हा मुले प्रशंषनीय कृत्ये करतात, स्वत:मध्ये सुधारणा करतात अशावेळी मात्र पालक निष्क्रीय असतात. ते काहिही प्रतिक्रीया दाखवत नाहीत. त्यामुळे मुलं हिरमुसतात. अशाप्रकारे मुलांना घरातून पाहिजे त्यावेळी व पाहिजे तसे प्रोत्साहन मिळत नाही.

  जर मुलांना त्यांच्या आयुष्यात श्रेष्ठता गाठण्यायोग्य बनवायचे असेल तर त्यांच्याकडून झालेल्या चुकांकडे थोडेफार दुर्लक्ष झाले तरी काही हरकत नाही. परंतू त्यांच्यातील सुधारणा बघूण पालकांनी त्वरीत त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप  दयावी. त्यांना प्रेमाने आलिंगन द्यावे. कारण पालकांकडून झालेला विश्वासाचा स्पर्श मुलांमध्ये दहा हत्तींचे बळ आणत असतो. त्यामुळे मुलांना पालकांच्या त्यांच्या वर असलेल्या विश्वासाची व प्रेमाची उब मिळते. आणि ते चांगल्या गोष्टी करण्याकडे सरसावतात.

   त्याचप्रमाणे पालक आपल्या मुलांच्या बाबतीत जरा जास्तच भावनिक असतात. मुलांना जराही त्रास झालेला पालकांना सहन होत नाही. अशावेळी ते मुलांना संरक्षण देण्याच्या किंवा मदत करण्याच्या हेतूने त्यांना सहज उपलब्ध होतात. मुलांनाही त्याची सवय लागते. अशावेळी जेव्हा त्यांना कोणत्याही अडचणी येतात. तेव्हा ते स्वत: त्यांना सोडविण्याचा प्रयत्न न करता धावत पालकांकडे येतात. पालकांनी ह्या गोष्टीचा मुलांवर होणारा दुरगामी व वाईट परिणाम वेळेत ओळखला पाहिजे. मुलांना पटकण मदत उपलब्ध करून देण्यापेक्षा त्यांना प्रयत्न करत राहण्याचा सल्ला त्यांनी दिला पाहिजे. कारण वारंवार केलेल्या प्रयत्नांनी त्यांच्या  कामात सुधारणा येत जातात. त्यासोबतच त्यांचा स्वत:वरचा विश्वासही दृढ होत जातो.

  पालकांच्या मुलांकडून अतोनात अपेक्षा असतात. प्रतिस्पर्धांच्या युगात त्याने टिकून रहावे व बाजी मारावी अशी त्यांची इच्छा असते. त्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. मुलांच्या मनावर येणार्‍या ताणाचा विचार न करता त्यांना  वेगवेगळ्या शिकवण्यांमध्ये टाकण्यात येते. अशावेळी मुलं भांबावून जातात आणि ते स्वत:ला कशातही सिद्ध करू शकत नाहीत. परंतू पालकांनी आपल्या मुलांच्या क्षमता ध्यानात ठेवून व त्यांच्या इच्छेला प्रादान्य देवून त्यांच्यासाठी पाऊल उचलले तर मुलं स्वत:ला सिद्धही करतील आणि त्यांचा आत्मविश्वासही उंचावेल.

1. पालकांनी मुलांचा विश्वास जिंकावा.

  आजची नवी पिढी तल्लख बुद्धीमत्तेची आहे. कारण नवनवीन तंत्रज्ञानाची झळ त्यांनाही पोहोचली आहे. त्यांच्यात स्वत:साठी योग्य क्षेत्राचे चयन करण्याची क्षमता आहे. त्यासोबत सर्वांगिण विकासाचे महत्वही त्यांना कळलेले आहे. त्यानुसार ते वेगवेगळी कौशल्य अवगत करून घेण्यासाठी धडपडत असतात. कारण आजच्या काळात कौशल्यांनाच जास्त मागणी आहे हे त्यांना कळलेले आहे. असे असतांना उणीव फक्त पालकांनी मुलांवर दाखवीण्याच्या विश्वासाची असते. तेव्हा पालकांनी मुलांच्या आयुष्यात जास्त दखल न देता त्यांच्याशी मैत्री करून त्यांचा विश्वास जिंकावा. जेणेकरून मुलांना पालकांपासून काहिही लपविण्याची वेळ येणार नाही.

2. मुलांच्या प्रयत्नांना पालकांनी प्रोत्साहन द्यावे.

   जेव्हा मुलं प्रामाणिकपणे व मेहनतीने स्वत:च्या कामात सुधारणा आणत असतात. तेव्हा त्यांना पालकांकडून मिळणार्‍या भक्कम पाठबळाची व प्रोत्साहनाची नितांत आवश्यकता असते. प्रामाणिक प्रयत्न कधिही निष्फळ जात नाहीत. तसेच मेहनतीचे फळ नक्की मिळते. हा विश्वास मुलांच्या मनात पालकांनी जागविला पाहिजे. मुलांमध्ये होणार्‍या सुधारणा बघून पालकांनी मनापासून आनंदी झाले पाहिजे. वेळोवेळी त्यांची प्रशंषा केली पाहिजे. त्यांची तुलना त्यांच्या बरोबरच करून झालेली प्रगती निदर्शनात आणून दिली पाहिजे. अशाप्रकारे पालकांची साथ मुलांना मिळाली तर ते आयुष्यात श्रेष्ठता गाठतील.

3. पालकांनी मुलांच्या क्षमतांचा मान राखावा.

   पालकांनी आपल्या अपत्यांवर पुर्णपणे लक्ष केंद्रीत करावे. त्यांच्यावर कोणत्याही अपेक्षा लादण्याअगोदर त्यांच्या क्षमतांचा विचार करावा. त्यांना पाठिंबा द्यावा. आपले कोणतेही मत त्यांच्यावर लादू नये. इतरांशी तुलना करून त्यांनी  उच्च श्रेणी नाही गाठली  तरी काही हरकत नाही. त्यांच्या क्षमतेनुसार ते पासही झाले तरी पालकांनी समाधानी असावे. कारण आयुष्यात त्यांना जिथे पोहोचायचे असेल तिथे ते नक्की पोहोचतील.  ह्यावर पालकांनी विश्वास ठेवावा. परंतू आपल्या दबावाला बळी पडून ते त्यांचे मानसिक स्वास्थ्य गमावणार नाहीत. ह्याची पालकांनी पदोपदी काळजी घ्यावी. जीवनात काही गाठण्यासाठी लागलेल्या शर्यती ह्या जीवनापेक्षा जास्त महत्वाच्या नसतात. तेव्हा पालकांनी मुलांचे कायम समर्थन करावे. तेव्हाच ते श्रेष्ठता गाठू शकतील.

4. मुलांना आवडीचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य असावे.

  मुलं पालकांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग असतात. तेव्हा त्यांच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट पालकांसाठी अत्यंत महत्वाची असली पाहिजे. आणि त्यात त्यांनी जातीने लक्ष घातले पाहिजे. परंतू कधिकधी ते त्याविषयी जरा जास्तच आग्रही होतात. आणि मुलांवर दबाव आणण्याचा प्रयत्नही करतात. पालकांचे असे करणे योग्य नाही. कारण हा सर्वस्वी मुलांच्या आयुष्याचा प्रश्न असतो. जर मुलं स्वत:च्या आवडीचे क्षेत्र निवडतील तर ते भविष्यात त्यात बाजीही मारतील. तेव्हा पालकांनी निर्णय घेतांना मुलांच्या विचारांना प्रादान्य द्यावे. आणि त्यांच्याशी विचारविनीमय करूनच पुढचे पाउल उचलावे. ही मुलांना श्रेष्ठता गाठण्यासाठी केलेली मदतच ठरेल.

   घरात मुलांच्या क्षेत्राचा आदर करणे ही आजची गरज आहे. कारण हा प्रतिस्पर्धांचा काळ आहे. जर काही कारणांनी मुलांची कारकीर्द त्यांच्या मनाप्रमाणे होवू शकली नाही. तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या भविष्यावर होतो. आणि जेव्हा ते त्यांच्या आसपासच्या त्यांच्या वयाच्या मुलांना प्रगती करतांना बघतात. तेव्हा त्यांचे स्वत:विषयीचे मत चांगले राहत नाही. त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो. म्हणूनच पालकांनी मुलांविषयी निर्णय घेतांना सर्व बारीक सारीक बाबी निदर्शनात आणाव्यात. तरच मुलं भविष्यात श्रेष्ठता गाठण्यायोग्य होतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *