मैत्री

 ज्याच्या जवळ बोलतांना व आपल्या मनातील भाव व्यक्त करतांना लज्जा किंवा संकोच वाटत नाही. ज्याच्याशी कधीही खोटे बोलावेसे वाटत नाही. ज्याला फसवावेसे वाटत नाही. ज्याच्या जवळ पाप पुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही. ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो. ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघड करण्यास कमीपणा वाटत नाही. ज्याच्या सुख दु:खाशी आपण खऱ्या अर्थाने एकरूप होवू शकतो तो खरा मित्र.

   मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे. मन निकोप राहण्यासाठी तसेच आपल्या कर्तुत्वाला प्रोत्साहन मिळण्यासाठी जीवनात एक तरी खरा मित्र हा हवाच. कारण आपल्या आयुष्यात बरेच लोक असतात जे आपले प्रियजन असतात. परंतू प्रत्येकाला खर्‍या मित्राची साथ लाभेलच असे नाही. फारच कमी आणि भाग्यशाली लोकांच्या आयुष्यातच सखोल मैत्रीचे बंध निर्माण होत असतात. खर्‍या मैत्रीची उदाहरणेही बोटावर मोजण्याइतकी आहेत. जसे आपल्या गौरवशाली इतिहासातील अजरामर उदाहरण म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि कविराज. ज्यांनी मरणाच्या दारात असतांनाही त्यांच्या शेवटच्या क्षणांपर्यंत एकमेकांची साथ सोडली नाही.

    खरी मैत्री म्हणजे असे प्रेम जे कोणत्याही अटीशिवाय उभे राहते. जे आपल्या विषयी कोणतेही मत बनवत नाही. आपल्या खर्‍या स्वरूपाचा स्विकार करते. खरा मित्र आपल्या भल्यासाठी आपल्यावर हक्काने रागवतो. पण कधिही विनाकारण आपले मन दुखवत नाही. एकमेकांना मदत करून व प्रोत्साहीत करून दोन मित्र जीवनात प्रगती करतात. आपल्या जीवनातील कोणत्याही आणिबाणीच्या प्रसंगी  आपला खरा मित्र आपल्या सोबत असतो. म्हणूनच आपल्या आयुष्यातील संकटमय काळातच आपल्या मैत्रीची खरी पारख होते. कारण जेव्हा आपण आयुष्यात काही नविन करायला घेतो  तेव्हा खरा मित्रच सर्वप्रथम आपल्यावर विश्वास ठेवतो. त्याचप्रमाणे आपला उत्साह वाढविण्यातही अग्रेसर असतो. अशाप्रकारे आपण आयुष्यातील आपल्या  जिवलग नात्यांमध्येही निरपेक्ष  मैत्रीच शोधली  पाहिजे. कारण जी नाती  आपल्या कशाही काळात आपली कधिही साथ सोडत नाहीत ती शुद्ध मैत्रीत रुपांतरीत झाल्यास अधिकच मनमोकळी होत जातात. त्याचप्रमाणे जिथे माणुसकी जपली जाते त्या प्रत्येक नात्यात मैत्रीचीच झलक दिसून येते.

   खरा मित्र आपल्याला खोलवर समजून घेतो. कारण त्याला  आपल्या बळकट आणि कमकुवत बाजू चांगल्याप्रकारे ठाऊक असतात. तो आपल्याबद्दल असलेले त्याचे मत मनापासून व्यक्त करतो. आपण कितीही बदललो कोठेही असलो तरीही त्याचे प्रेम आपल्या हृदयावर कायमचे कोरलेले असते. कधिही न पुसण्यासाठी. खरे मित्र हिर्‍या – माणकांप्रमाणे दुर्मीळ असतात. ते ज्यांना लाभले त्यांच्या हृदयाच्या श्रीमंतीत भर घालतात. म्हणूनच आपणही त्यांच्या आयुष्यात मदतीचा भक्कम खांब बनले पाहिजे. त्यांच्यात आणि आपल्यात कधिही वाद-विवादास थारा देवू नये. मैत्रीत नेहमी सहानुभूती आणि दयेची भावना असली पाहिजे. ज्यांच्या सहवासात आपल्याला आपल्या अस्सल व्यक्तीमत्वातही आरामदायक वाटते. जिथे आपल्यावर कोणत्याही अपेक्षांचा तणाव नसतो. ज्यांच्या सोबत असतांना आपल्यातील कमतरतांचा आपल्याला  न्युनगंड वाटत नाही. ज्यांच्या मध्ये द्वेष व मत्सरास जागा नसते. श्रीमंती गरीबीस थारा नसतो. जिथे प्रेम देवून परतफेडीत प्रेमच मिळते तिथे शुद्ध मैत्रीची प्रचीती येते.  

   खरा मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असेलच असे नाही. परंतू खर्‍या मैत्रीतील शुद्ध प्रेम आपण आपल्या आसपासच्या नात्यात, प्राण्यांच्या सहवासात, निसर्गात अनुभवू शकतो. तसेच खर्‍या  व बेजोड मैत्रीचा आनंद घेवू शकतो.

1. आपल्या आयुष्यातील नात्यांमध्ये मैत्री आणावी.

   नाती प्रेमाने आणि विश्वासाने जपली जातात. परंतू तरीही त्यांच्यात निर्माण होणार्‍या अपेक्षांमुळे दोन नात्यात कायम न दिसणारी एक दरी असते. त्याचप्रमाणे ह्या अपेक्षांमुळे नात्याची नेहमी परवड होत असते. परंतू जर नात्यांना निरपेक्षतेने जपले आणि त्यांना मैत्रीची झालर लावली तर ही न दिसणारी दरी कायमची भरून निघू शकते. त्यासाठी आपण नात्यात एकमेकांना पुरेसा व उत्कृष्ठ वेळ देणे गरजेचे असते. कारण वेळोवेळी विवीध विषयांवर मनमुराद गप्पा मारल्याने आपसात विचारांची देवाण घेवाण होते. एकमेकांच्या जागेवर जावून एकमेकांना समजून घेतल्याने नात्यातील सलोखा कायम टिकतो. कधी एखाद्या ट्रीपचे आयोजन केल्याने दुरावलेल्या मनांना पुन्हा जवळ आणता येवू शकते. गरजेच्या वेळी एकमेकांची मदत केल्याने नाते घट्ट होण्यास मदत मिळते. एकमेकांच्या व्यक्तीगत वेळेचा सम्मान केल्याने एकमेकांप्रती आदराची भावना वाढते. त्याचप्रमाणे एकमेकांच्या क्षेत्राचा सम्मान राखल्याने नात्यातील माणुसकी जपली जाते. अशाप्रकारे आपल्या आणि आपल्या माणसांच्या एकेका क्षणांना आनंदाने व सामंजस्याने भरून नाते मैत्रीपूर्ण  करता येवू  शकते.

2. मुलांशी मैत्री करावी.

   मुलं लहान असतांना आई-वडील आपल्या व्यस्त जीवनामुळे त्यांना पुरेसा वेळ देवू शकत नाहीत. तसे करण्याची इच्छा असूनही त्यांना आपले मन मारावे लागते. परंतू तरीही कधी त्यांनी आपल्या कामांमधून वेळ काढून मुलांच्या विश्वात रमले पाहिजे. त्यांच्या बरोबर पुन्हा एकदा लहान होण्याचा गोड अनुभव घेतला पाहिजे. त्यामुळे मुलांचे लहानपण आणखीच लोभस होते. ते मनाने मोकळे होत जातात आणि आई-वडीलांसाठी त्यांच्या मनात खास स्थान निर्माण होते. जेव्हा ते जाणत्या वयात येतात. तेव्हा त्यांना त्यांच्या वयाच्या मित्रांची सोबत हवी असते. मुलांच्या ह्या वयातही आई-वडीलांना  त्यांच्या आयुष्यात जास्त हस्तक्षेप न करता तसेच त्यांना विचारांचे स्वातंत्र्य देवून त्यांच्याशी मैत्री करता येवू शकते. जेणेकरून मुलं त्यांच्या आयुष्यात काही  समस्यांना तोंड देत असतील तर घर हे त्यांच्यासाठी असे ठिकाण असेल जिथे ते आपल्या आई-वडीलांशी मोकळेपणाने बोलू शकतील. त्याचप्रमाणे आई-वडीलही राईचा पर्वत न करून घेता  मुलाना समजून घेतील. अशाप्रकारे वयाचे खुप मोठे अंतर असलेली आई वडीलांनी आपल्या मुलांशी केलेली ही मैत्री त्यांच्या नात्यामधील अवघडलेपणा दूर करते. त्याचबरोबर त्यामुळे सर्वकाही सहज व सोपे होवून जाते.

3. प्राण्यांशी मैत्री करावी

   प्राणि हे मनुष्याचे मित्रच असतात. हे सिद्ध झालेले आहे. कारण माणसाने वेगवेगळ्या प्राण्याचा आपल्या हितासाठी उपयोग करून घेतला आहे. दूध, अंडी, मांस, लोकर असे विविध जीवनावश्यक घटक प्राण्यांपासूनच आपल्याला मिळतात. त्यासाठी आपण नेहमी कृतज्ञ असले पाहिजे. आणि आपण त्यांच्या सुरक्षेसाठी झटणे आपले कर्तव्य समजले पाहिजे. रस्त्यावर बेवारस तसेच रोगग्रस्त प्राणि उपाशी, तहानलेले कचर्‍याच्या ढिगार्‍यात काहितरी खाण्यासाठी शोधत असतांना दिसतात. त्यांच्या वेदना आपल्या हृदयाला भिडल्या पाहिजे. तेव्हाच त्यांच्यासाठी काही करण्याची समज आपल्याला येईल.

  अशा प्राण्यांना प्राणि शेल्टर्सच्या सुपूर्द करण्याची जबाबदारी आपण उचलली पाहिजे. भारतीय संविधानात प्राण्यांच्या बचावा करीता माणुसकीला धरून असलेले नियम अधोरेखित आहेत. तरीही  कुत्रा दिसता क्षणी तो चावेलच असे खात्रीशीरपणे आपल्याला वाटत असते. म्हणून आपण त्याच्यावर दगड भिरकावतो. त्याचप्रमाणे ह्या गोष्टी मुलांनाही शिकवतो. परंतू प्रेमाची भाषा प्रत्येक प्राणिमात्रास कळते हे विसरून चालणार नाही. दगड भिरकावण्या ऐवजी प्रेमाने पोळी किंवा अन्य खाण्याचा पदार्थ त्यांना खाण्यास देण्याची उत्तम सवय आपण स्वत:ला लावली पाहिजे. असे दररोज केल्याने आपण त्यांचा विश्वास संपादन करू शकतो. त्याचबरोबर नकळतपणे  त्यांच्यात व आपल्यात एका शुद्ध मैत्रीची सुरवात होवू शकते.

4. सृष्टीशी मैत्री करावी

   सृष्टी ही जीवनदायी आहे. तिने पृथ्वी वरील सर्व जीवसृष्टीचे पालकत्व स्विकारले आहे. त्याचप्रमाणे अनेक जीवनावश्यक संसाधने मुबलक प्रमाणात आपल्याला बहाल केली आहेत. निसर्गाचे सौंदर्य पाहून आपल्या डोळ्यांचे पारणे फिटते. परंतू हे सगळे जसेच्या तसे टिकून राहण्याकरीता आपली निसर्गाप्रती काही कर्तव्य आहेत. जी प्रत्येकाने व्यक्तीगत पातळीवर पार पाळणे ही आपली जबाबदारी आहे. तेव्हा आपण  नैसर्गीक संसाधनांचा नेहमी  सम्मान केला पाहिजे. तसेच त्यांचा अपव्यय होण्यापासून वाचविणे हे आपले कर्तव्य समजले पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या गोष्टी केल्याने निसर्गाला अपाय होतो त्या गोष्टी करण्यापासून स्वत:ला थांबविले पाहिजे.

  नैसर्गीक स्थळांना भेटी देतांना आपण काही नियमांचे सक्तीने पालन केले पाहिजे. त्या जागांना जो निसर्गाचा स्पर्श आहे तो आपल्या कोणत्याही वर्तनाने भंग पावता कामा नये ही द्क्षता आपण घेतली पाहिजे. त्याशिवाय आपल्यामुळे कोठेही कचरा होणार नाही किंवा नुकसान होणार नाही ह्याची जातीने काळजी घेतली पाहिजे.

  ज्याठिकाणी शिवकालीन गडकोट किल्ले आहेत तेथे अजूनही त्या काळातील घडून गेलेल्या घटनांच्या जागोजागी खुणा  आहेत. तेव्हा अशा पवीत्र ठिकाणांवर पाय ठेवताच आपल्या हृदयात नतमस्तक होण्याचे भाव असले पाहिजे. तिथल्या कोणत्याही वस्तूंना किंवा  तटा बुरूजांना आपल्या हातांनी स्पर्श करू नये. तसेच भिंतींवर काहीही लिहिण्याचा प्रयत्न करू नये. अशा पवित्र स्थळांचा कोणतीही अनैतिक कृत्य करण्यासाठी गैरवापर करू नये. कारण हा शिवकालीन वारसा जपण्यातच आणि त्यांचा सम्मान राखण्यातच महान इतिहासाप्रती आपली आदरांजली आहे. अशा पद्धतीने आपण सृष्टी प्रती आपली मैत्री सिद्ध करू शकतो.

   शुद्ध मैत्रीची परिभाषा ज्याला कळली त्याने मनाच्या श्रीमंतीची सिमारेषा पार केली असे समजावे. कारण मत्सर, द्वेश, प्रतिस्पर्धा मनात ठेवून आपली प्रगती नक्कीच होते. परंतू प्रेम, मैत्री, समजूतदारपणा ह्या गोष्टी आपण अंगीकारल्यास सर्वांची प्रगती होते. मैत्रीत मदत घेतांना आभार मानन्याची व मदत करतांना उपकारांची जाणीव ठेवण्याची औपचारिकता पाळायची नसते. कारण मैत्री फक्त समजूनच घेत नाही तर मित्राच्या जागी स्वत:ला ठेवून त्याच्या वेदना अनुभवू शकते. त्यामुळे शुद्ध मैत्रीतून आपण माणुसकीच्या दिशेने झेप घेवू शकतो. ह्या जगात आपण कायम राहण्यासाठी आलेलो नाही. तेव्हा ह्या सिमीत जीवनास शुद्ध मैत्रीच्या अलंकारांनी सजवावे. कारण इतरांच्या हितासाठी झटण्यातच खर्‍या मैत्रीचे सार आहे.    

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *