रेशमाचे बंध

नात्यांच्या विश्वात पवित्र प्रेमाच्या रेशमी धाग्यांनी विणलेले नाते म्हणजेच बहिण-भावाचे नाते असते. कारण हे दोघेही एकाच घरात व एकाच आई-वडीलांच्या पोटी जन्म घेतात आणि सोबतच लहानाचे मोठे होतात. त्यामुळे त्यांच्यात प्रेम तर असतेच त्यासोबत एकमेकांच्या खोड्या काढणे, आपसात रुसवे-फुगवे, एकमेकांचे अनुकरण करणे, आणि एकमेकांची मदत करणे ह्या गोष्टीही चालत असतात. तसेच त्यांच्या दरम्यान स्वारस्यही असते. भावाचा पुरुषार्थ केवळ बहिणीचे संरक्षण करण्यासाठीच नाहीतर तिला सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी देखील महत्वाचा असतो. त्याचप्रमाणे बहिणीची स्त्रीत्वाची सकारात्मक उर्जा भावाच्या हितार्थ आयुष्यभर सद्भावनेच्या स्वरूपात अगदी सहजरीत्या कार्यरत होत असते. भाऊ मोठा असेल तर तो बहिणीला आपल्या अपत्याप्रमाणे जपत असतो. तसेच बहिण मोठी असेल तर ती भावाला आईच्या मायेने सांभाळत असते. असे हे बहिण भावाचे सर्वश्रेष्ठ नाते नात्यांच्या जगाला शुद्ध व सात्विक बनवत असते.

  आईच्या माघारी मोठा भाऊ किंवा मोठी बहिणच लहान भावंडांना आईच्या प्रेमाने सांभाळू शकतात. कारण ते आईचीच प्रतिकृती असतात. आपल्या लहान भाऊ किंवा बहिणीस ते स्वत:च्या अपत्याप्रमाणे जपतात. तसेच त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची हिंमतही ह्या नात्यात असते. त्याचप्रमाणे आपल्या लहान बहिण भावांना आयुष्यात उभे करण्याचे श्रेष्ठ कामही हे नाते करते. त्यामुळे ह्या नात्याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात.

   आपल्या संस्कृतीत बहिण-भावाच्या नात्याची महती दर्शविणारा सण साजरा करण्यात येतो. श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेस हा सण येतो. ज्याचे नाव आहे रक्षाबंधन किंवा राखी. ह्या दिवशी बहिण भावाच्या हाताला रेशमाचा धागा बांधून आशिर्वाद देते. तर भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. ही परंपरा मोठ्या उत्साहात आजतागायत पाळली जाते. आणि ह्यापुढेही अशीच सुरू राहील.

   परंतू कोणतेही नाते सणाच्या औपचारीकते पुरते मर्यादीत न ठेवता त्या नात्यास आपल्या हृदयात स्थान दिले पाहिजे. त्याचप्रमाणे भावनांनी जोपासले पाहिजे. बहिण-भाऊ एकाच घरात जन्म घेत असले तरी ते आजीवन वेगवेगळ्या कुटूंबात आपले जीवन व्यतीत करतात. तसेच त्यांच्या आपाआपल्या कुटूंबाप्रती  जबाबदार्‍याही असतात. अशाप्रकारे दोघांचीही वेगवेगळी आयुष्ये असतात.

   कधि कधि निरनिराळ्या कारणांनी त्यांची मने दूरावली जावू शकतात. किंवा नाजूक भावना दूखावल्या जातात. ज्यामुळे नात्याची विण सैल होण्याची शक्यता असते. कारण त्यात गैसमजांची भर पडते. अशावेळी बहिण भावाच्या नात्यातील भावनीक जग संपुष्टात येवून त्यांच्यात फक्त रक्षाबंधनाच्या दिवसापुरत्या औपचारीकता उरतात.

    आपण आपल्या शालेय जीवनात राष्ट्रगीतानंतर  जी प्रतिज्ञा घेत होतो. त्यात हे वाक्य होते कि ‘ह्या देशाचे सर्व नागरीक माझे बंधू आणि भगिनी आहेत’. ह्या वाक्याचा आपल्याला जीवनात कधिही विसर पडता कामा नये. कारण देशबंधू व देशभगीनींच्या आत्मसम्मानाच्या रक्षणार्थ प्रत्येकाने पाउल उचलले तरच देश सुसंस्कृत होण्यास वाव आहे. परंतू आताच्या जगात पैसा आणि प्रसिद्धीस नात्यांच्या तुलनेत जास्त महत्व दिले जाते. त्यामुळे नात्यांना भावनांपेक्षा जास्त औपचारीकतेचा स्पर्श आहे.

  त्याचप्रमाणे आजच्या स्त्रिया सक्षम असल्या तरीही त्यांना ह्या जगात वावरतांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. दुषीत नजरांमुळे आणि अश्लील प्रवृत्तींमुळे त्यांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी प्रवास करणे अवघड होवून जाते. त्यामुळे स्त्रियांना लहान पणा पासून स्वसुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते. जेणेकरून त्या रस्त्या वाटेत अडचणीच्या समयी स्वत:चा बचाव स्वत:च करू शकल्या पाहिजे. परंतू जर लहानपणी घेतलेली ती प्रतिज्ञा  सर्वांनी लक्षात ठेवली तर स्त्रिया मोकळेपणाने सगळीकडे वावरू शकतील. त्यांना कसलीही भिती वाटणार नाही. तसेच त्या त्यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या ह्या समाजात निर्धास्तपणे आपले ध्येय गाठू शकतील. कारण प्रत्येक स्त्रिच्या पाठीमागे एक भाऊ उभा असेल.

  रेशमाच्या धाग्या प्रमाणे नाजूक अशा ह्या बहिण – भावाच्या नात्याला तितकेच हळूवारपणे सांभाळले पाहिजे. कारण आई – वडीलांच्या माघारी हे नातेच त्यांचे प्रतिनिधीत्व करत असते. कारण आई-वडीलांसोबत घालविलेल्या क्षणांच्या गोड आठवणी दोघांच्याही हृदयात जपून ठेवलेल्या असतात. तेव्हा कोणत्याही सबबीने बहिण – भावाच्या प्रेमळ आणि निरागस नात्याला तडा जाता कामा नये.

  कारण ह्या नात्यात बालपणीच्या खोड्या आहेत, एकमेकांची पुस्तके वापरून पुर्ण केलेले शालेय शिक्षण आहे. लहानपणीची आजारपणं आणि आईने केलेली सुशृषा आहे. ही मौल्यवान आठवणींची पुंजी आयुष्यभर दोघांच्याही अंतकरणात जपलेली असते. जी बहिण – भावाच्या  नात्यातील दुवा बनते.

1. बहिण – भावाच्या नात्यात औपचारीकता नसावी

  बहिण – भावाचे नाते एकमेकांवर हक्क गाजविण्याचे असते. परंतू जेव्हा ते मोठे होतात व आपाआपल्या आयुष्यात तसेच त्यांच्या व्यक्तीगत जीवनात  व्यस्त होतात. तेव्हा त्यांचे वास्तव्य वेगवेगळ्या शहरात, किंवा देशातही असू शकते. अशावेळी मनात कोणताही गैरसमज न बाळगता शक्य त्या मार्गाने त्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहिले पाहिजे. परस्परांपासून लांब राहूनही त्यांनी मनाची जवळीक कायम जपली पाहिजे. एकमेकांच्या प्रगतीने प्रोत्साहीत आणि निरपेक्षपणे आनंदी झाले पाहिजे.कधिही चढाओढीची भावना त्यांच्या मनात घर करता कामा नये.

  एकमेकांवर असलेले रुसवे फुगवे त्यांनी स्पष्ट शब्दात बोलून दाखविले पाहिजेत. कोणत्याही तक्रारी मनात साचवून न ठेवता आपसात संवाद साधून सर्व गैरसमज दूर करावेत. परंतू काहीही करून नात्यावर आच येवू देवू नये. बहिण – भावाच्या नात्याचा प्राण जपायचा असेल तर त्यात औपचारीकतेला थारा देवू नये. हे नाते कोमेजू नये असे वाटत असेल तर त्यातील हक्काची गोडी कायम टिकवून ठेवली पाहिजे.

2. सुरक्षीत अंतर ठेवून नाते आजीवन जपावे.

  बहिण – भाऊ जेव्हा आई – वडीलांबरोबर एका घरात एकत्र राहतात. त्यावेळी ते कित्येकदा आपसात भांडतात. अबोले धरतात. तर कित्येकदा हाणामारीही करतात. परंतू वेळ आली कि त्यांच्यातील एकी आणि जिव्हाळा दिसतो. ज्याक्षणी त्यांची लग्ने होतात आणि दोघांच्याही आयुष्यात जोडीदाराचे आगमन होते त्याक्षणी त्यांचे दोन वेगवेगळ्या कुटूंबात विभाजन होते. अशावेळी त्यांना आपाआपल्या कुटूंबियांचा विचार करावा लागतो. तेव्हा मात्र हे नाते आपसात सुरक्षीत अंतर ठेवून आणखीच चांगले जपता येवू शकते.

  नात्यात असलेली ओढ हळूहळू कमी करून प्रेम कायम टिकवता येते. त्यासाठी वारंवार एकमेकांच्या भेटीस जावू नये. तसेच आणिबाणीच्या प्रसंगी बोलविण्याची वाट बघू नये. शिवाय आपण काय मदत करू शकतो हा विचार सर्वप्रथम करावा. परंतू आनंदाच्या क्षणी मात्र आमंत्रणाशिवाय जावू नये. दुरूनच एकमेकांच्या सुखात मनापासून सामील व्हावे. आपल्या बहिण – भावाच्या जोडीदाराचा नेहमी आदर ठेवावा. अशा पद्धतीने अंतर ठेवून ह्या नात्याची उब कायम राखता येवू शकते.

3. एकमेकांच्या वेळेचा सम्मान करावा.

  बहिण – भावाच्या खांद्यावर आपाआपल्या कुटूंबाच्या जबाबदार्‍या असतात. त्या पार पाडण्यासाठी ते त्यांच्या नोकरी किंवा व्यवसायात व्यस्त असतात. तसेच त्यांच्या कौटुंबीक वेळा आणि व्यक्तीगत वेळा ह्यांची दखल घेवूनच  एकमेकांच्या घरी जावे व जाण्या अगोदर कळवूनच जावे. त्यामुळे कोणाचिही तारांबळ  उडणार नाही. आणि एकमेकांना वेळ देण्यासाठी महत्वाची कामे बाजूला ठेवावी लागणार नाहीत.

  तसेच भेटीच्या वेळी ते मनापासून एकमेकांबरोबर राहू शकतील. तसेच कोणत्याही कारणाने त्यांचे लक्ष विभाजीत होणार नाही. तसेच भेटून दोघांचीही मनं मोकळी होतील. त्याचप्रमाणे वेळेचा सम्मान केल्यामुळे मनात परस्पराविषयी आदर टिकून राहील. परंतू वर्तनात अरेरावी आणि असमंजसपणा असल्यास हळूहळू नात्याची पकड सैल होत जाईल. त्यामुळे नात्यातील हक्क कमी होत जावून औपचारीकतेची सुरवात होईल.

4. एकमेकांकडून कोणत्याही भेटवस्तूची अपेक्षा नसावी.

  बहिण – भावाला एकमेकांविषयी असलेले प्रेम व स्वारस्य शब्दात व्यक्त करण्याची गरज पडत नाही. ते त्यांच्या डोळ्यातून आणि एकमेकांशी केलेल्या वर्तनातून सिद्ध होते. बहिण – भाऊ एकमेकांसाठी आपल्या ऐपतीप्रमाणे आयुष्यभर काही ना काही करत असतात. बहिणीने नेहमी ह्याकरीता ऋणी असावे कि भावाच्या रूपात तिला आई – वडीलांच्या आठवणीत रमण्यासाठी आणि काही काळ विसाव्यासाठी माहेरपण लाभलेले आहे.

  आपले माहेर नेहमी समृद्ध आणि धन -धान्याने भरलेले असावे असा आशिर्वाद तिच्या मनातून निघला पाहिजे. रक्षाबंधनाच्या निमीत्ताने मोठ मोठ्या भेटवस्तूची अपेक्षा तिने भावाकडून करू नये. अपेक्षा करणे ही नात्यास पोख्रणारी वाळवी आणि नात्याला दु:खात लोटणारी गोष्ट असते. ति मनात जागृत होताच तिला नष्ट करावे. त्याचप्रमाणे ह्या सुरेख नात्याला शेवटच्या क्षणापर्यंत जपण्याचा ध्यास घ्यावा.

  समाजात वाढ्लेली असभ्यता स्त्रियांच्या जीवनाला लागलेले ग्रहण आहे. घरी-दारी स्त्रियांना मिळणारी अपमान  आणि अवमानाची वागणूक त्यांच्या आत्मसन्मानाला आणि आत्मविश्वासाला पिळवटून टाकत आहे. तेव्हा आता राखीच्या निमीत्ताने प्रत्येक भावाने बहिणीला दिलेले वचन पाळण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक बहिणीच्या मागे एक भाऊ निर्धाराने उभा राहील्यास त्यांची हिंमत द्वीगुणीत होईल. ज्यामुळे त्या आपल्या आयुष्यात निर्धास्तपणे आवडत्या क्षेत्राचे चयन करून त्यात बाजी मारण्याचे धाडस करू शकतील. तसेच सक्षम पणे आपल्या पायावर उभ्या राहतील. तसेच आपल्या अंतर्मनातून भावास आशिर्वाद देतील. अशाप्रकारे रेशमाचे धागे बहिण – भावाच्या हृदयांना जोडणारा कायमचा दुवा बनतील. त्याचप्रमाणे बहिण – भाऊ दुर राहूनही माणुसकी व मैत्रीच्या स्वतंत्र नात्याने कायम एकमेकांबरोबर राहतील.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *