
पूर्वी लोकात मिसळणे हा सर्वस्वी मानापमानाचा विषय होता. त्यामुळे लग्न समारंभ ह्यात जास्तीत जास्त लोकांना आदरातिथ्याने आमंत्रित करून. आपल्या आयुष्यात मधुर संबंधांचा विस्तार केला जात असे. कारण तेव्हा सामाजीकरण हे एकात्मतेचे किंवा एकजुटतेचे प्रतिनिधीत्व करत असे. मग ते एका गावाचे असो एका वसाहतीचे असो किंवा विशिष्ट जाती धर्माचे असो. कोणत्याही निमित्ताने लोकांनी एकत्र येवून. आपले एकीचे बळ दाखवीन्याचा तो अत्यंत सभ्यतापूर्ण व औपचारिक मार्ग होता. आजही शहरांच्या तुलनेत गावांमध्ये असे दृश्य अधिक बघावयास मिळते. एखाद्या घरगुती शुभकार्याचे निमीत्त साधून. किंवा सार्वजनिक जसे मूर्तीची स्थापना देवळाचा जिर्णोद्धार अशाप्रकारची कार्ये संपन्न झाल्यानंतर गाव जेवण घालण्यात येते. ज्यात संपूर्ण गाव आनंदाने सहभागी होत असते. खरेतर असे सामाजीकरण आपल्या मानसिक स्वास्थ्या साठीही उपयुक्त आहे. कारण त्यात सम्मान तर आहेच शिवाय औपचारिकतेचे प्रमाणही कमी असते.
अति औपचारिकता हे देखील आपल्या मनात लोकात मिसळण्याचे दडपण निर्माण करत असते. कारण आता लोक अत्यंत आत्ममुग्ध व आत्मकेंद्री झालेले आहेत. समारम्भांच्या माध्यमातून त्यांना केवळ आपला आनंद विस्तारीत करायचा असतो. त्यासाठी त्यांना परिचित लोकांची आवश्यकता असते. तेव्हा ते अगदी आपल्या सभ्यतापूर्ण आचरणाने लोकांना कायम स्मरणात राहील. अशी त्यांची तेवढ्यापुरती सन्मानाने आवभगत करत असतात. परंतू त्यांच्या त्या औपचारीकतेचा जरासाही अतिरेक झाला. तर मात्र त्या ठिकाणी आपल्याला कोरडेपणाची जाणीव होवू लागते. कारण त्यात अगोदरच आंतरिक ओलाव्याची उणीव असते. आज ह्या सर्व गोष्टी आपल्याला न मागताही भरभरून मिळतात. परंतू आपुलकीची विचारपूस व मायेची नजर जी थेट मनापर्यंत पोहोचते. त्याची मात्र अत्यंत कमतरता जाणवते. औपचारिकता ह्या आपल्याला मनातील वेदनांना बाहेर व्यक्त होवू देत नाहीत. त्याचबरोबर त्या औपचारिक वातावरणात आपल्यावर आपले दु:ख लपवून खोटे खोटे आनंदी असल्याचा अभिनय करण्याचे दडपणही असते. कारण एकटे पडण्याच्या भीतीने आपण कशीतरी ती वेळ निपटवून नेण्यासाठी नाटकीयरीत्या वागण्यास स्वत:हून सज्ज होत असतो. अशा परिस्थितीत काहीजण सराईतपणे सर्वकाही निभावून नेतात. परंतू काहींच्या मानसिक स्वास्थ्यावर मात्र ह्या औपचारिक वातावरणात जबरदस्त विपरीत परिणाम होतात. म्हणून त्यांना पुन्हा तशा परिस्थितीत स्वत:ला ढकलण्याची व लोकांमध्ये मिसळण्याची भीती वाटत असते.
सामाजिक प्रतिष्ठा हा देखील आज आपल्या जगण्याचा महत्वाचा भाग झाला आहे. कारण सामाजिक प्रतिष्ठेच्या आकर्षणाने लोक अनुलम्बीत प्रगतीकडे मोठ्या प्रमाणात सरसावतात. त्यांना आपला जीवनस्तर उंच करण्याचे वेध लागतात. उच्च शिक्षण विदेशात जाण्याचे वेध मोठ्या पदाच्या नोकऱ्या व्यवसाय विदेशात स्थायिक झालेली मुले. ह्या सर्व गोष्टी त्यांना ह्या सर्वसामान्य जगात मिरावीन्यास व आपली सामाजिक प्रतिष्ठा प्रस्थापित करण्यास अत्यंत आवश्यक वाटत असतात. त्यातही ते आपल्याच मित्रांशी बहीण भावांशी तसेच शेजाऱ्यांशी स्पर्धा करून त्यांच्यापेक्षा पुढे राहण्यात धन्यता मानत असतात. जेणेकरून लोकांत मिसळण्याची संधी लाभताच. ते त्यांच्याशी संवादातून आपल्या प्रगतीचे सखोल वर्णन करून त्यांच्यावर आपला प्रभाव पाडू शकले पाहिजे. किंबहुना आता तर पाच स्टारांकीत दवाखान्यामधून उपचार घेणे हे सुद्धा सामाजिक प्रतिष्ठेत गणले जाते. त्यामुळे त्याचाही उल्लेख आवर्जून बोलण्यातून केला जातो. अशाप्रकारे सामाजिक प्रतिष्ठा ही सर्वसामान्यांमध्ये असमानता निर्माण करत असते. कारण त्यावरून ते एकमेकांविषयी मत बनवत असतात. किंवा इतरांच्या मान सम्मानास पात्र होत असतात. जर कोणी ह्या स्पर्धेत स्वत:ला टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला नाही. किंवा काही कारणाने आयुष्यात मागे पडला. तर मात्र त्याच्या मनात लोकांत मिसळतांना तो उत्साह संचारत नाही. कारण तो आपोआपच मनातून त्यांच्या बरोबर स्वत:ची तुलना करून स्वत:ला कमी लेखत असतो. किंबहुना तत्सम अनुभवही त्याने आयुष्यात घेतलेले असतात. ज्यामुळे अर्थातच अशा लोकांना लोकांत मिसळण्याचे आपोआपच दडपण येते.
अंतर्मुखी व्यक्तिमत्वाच्या लोकांना त्यांच्या विषयी मतं बनविली जातात. तसेच त्यांच्या विषयी गैरसमजही मोठ्या प्रमाणात होत असतात. हे उत्तमरीतीने ठाऊक असते. काहीजण अंतर्मुखी असूनही आपल्या लोकांत मिसळण्याच्या भीतीवर काहीप्रमाणात विजय मिळवून. तसेच काही औपचारिक कौशल्य पारंगत करून आपल्या त्या भीतीला पृष्ठ भागावर येवू देण्यापासून थांबवितात. तर काहीजण अंतर्मुखी असून स्वाभिमानीही असतात. त्यांना मात्र आपल्याच स्वभावामुळे आपली चारचौघात झालेली फजिती सहन होत नाही. त्यामुळे ते शक्यतोवर लोकांत मिसळण्याचे टाळतात. तसेच स्वत:बरोबर एकटे राहून आपला आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीकोनातून स्वत:ला उत्तम उत्तम बनवत जातात. त्यातूनच त्यांचे एक विशेष व्यक्तीमत्व घडत जाते. अंतर्मुखी लोकांसाठी त्यांनी निवडलेला हा मार्ग कितीही यथायोग्य असला. तसेच त्याद्वारे त्यांनी आपल्या आत्मविश्वासात भर घातली असली. तरी सामाजीकरण हे अनेक कारणांसाठी प्रत्येकाला काही प्रमाणात का असेना परंतू आवश्यक असते. तेव्हा त्यांनी निदान मिळत्याजुळत्या विचारांच्या लोकांसोबत तरी आपले एक सामाजिक वर्तूळ नक्की बनवावे. अन्यथा त्यांच्यात लोकांत मिसळण्याच्या भीती सोबत एकटे पडण्याच्या भीतीनेही घर केलेले असेल. अशाप्रकारे अंतर्मुखी लोक प्रत्येक क्षणी आपल्या त्या क्लिष्ट समस्येशी झुंजत असतात. जिथे त्यांना लोकांशी सामना करावा लागतो. कारण त्यांच्या त्या भीतीला हे जग समजू शकत नाही. म्हणूनच आज असंख्य अंतर्मुखी लोक आपल्यातील त्या विशेषतेला समस्या समजू लागले आहेत. एक अशी समस्या ज्यावर काहीही उपाय नाही. त्यामुळे स्वत:चाच मनातून तिरस्कार करू लागले आहेत. त्यातूनच काहीजण इतरांचे अवलोकन करून आपले एक खोटे व्यक्तिमत्व बनवितात. ज्याला ह्या जगात सहज स्वीकारले जाते. अशाप्रकारे लोकांत मिसळण्याची भीती असलेले लोक आता आपल्या खऱ्या व्यक्तीमत्वाला सर्रास सोडून देवून. व्यवहार ज्ञानाने आपल्या आत्मविश्वासात व आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत भर तर घालत आहेत. परंतू ह्या निष्ठूर जगात स्वत:ला सामावून घेण्याच्या प्रयत्नात मात्र त्यांनी आपले अस्सल व्यक्तीमत्वच गमावले आहे.
अशाप्रकारे आज आपण लोकांच्या महासागरात वावरत आहोत. कारण एकटे पडण्याच्या भीतीने आपले सामाजिक वर्तूळ असणे. आपल्याला आवश्यक वाटत असते. त्यात जर आपण स्वत:ही काही कारणाने अडथळा बनत असलो. तर ते आपण खपवून घेत नाही. परंतू आपण स्वत:ला प्रश्न करून पाहिला पाहिजे. कारण महासागरात असल्याने आपण त्याचा भाग बनत नाही. अनेक मापदंडांवर खरे उतरल्यावरच आपल्याला त्यात प्रवेश करता येतो. परंतू आपण जर आपला आत्मसम्मान वाऱ्यावर सोडून देवून. तिथे टिकून राहण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबत असलो. तरी आपल्याला त्या महासागराने स्वीकारल्याची अनुभूती होत नाही. त्या गर्दीचा भाग असूनही आपण पूर्णपणे एकटेच असतो. कारण ती गर्दी भावनाशुन्य असते. ती आपले वरवर अवलोकन करून आपली पातळी ठरविते. त्याचप्रमाणे त्यानुसारच आपल्याशी व्यवहार देखील करत असते. अशाप्रकारे गर्दीत असूनही एकटेपणाच्या अनुभवाने आपले जीवन जगणे अत्याधिक कठीण होते. आपल्याला प्रेम आपुलकी करुणा केवळ ह्या गोष्टीच कोठेही बांधून ठेवू शकतात. त्यांचा अभाव असल्यास औपचारीकतांचा आपोआपच कळस होतो. जिथे व्यावहारिकतेलाच अधिक प्रादान्य असते. म्हणूनच आज ह्या लोकांच्या महासागात असूनही एका खऱ्या मित्रासाठी आपण आजीवन तडपत असतो. कारण तिथे आपल्या भावना मोकळ्या होण्यास कदापि वाव नसतो. कोणाकडे आपल्याला देण्यास वेळ नसतो. कोणी आपली आपुलकीने विचारपूस करत नाही. अशाप्रकारे आज खऱ्या अर्थाने लोकांना जाणवू लागले आहे. कि ते कितीही लोकांत मिसळण्याचा प्रयत्न करत असले. तरी एकटेच जीवनप्रवास कंठत आहेत.
1. मानसिक समस्यांचा उद्रेक होतो
संबंध ह्या सुंदर शब्दाची सुरवातच समानतेने होते. त्यामुळे संबंधात एकमेकांना परस्पर सम्मान एकसारखे असल्याची जाणीव दिली गेली पाहिजे. परंतू आज संबंधांचे स्वरूप इतके साधे सरळ राहिलेले नाही. अनेक मापदडांवर त्यांना पारखले जाते. कारण ते संबंध आपल्याला सामाजिक दर्जा प्राप्त करून देतात असे आपल्याला वाटते. त्यामुळे विचारातील साम्य भौतिक संपन्नता सामाजिक प्रतिष्ठा ह्या गोष्टींनी संबंध तोलले जातात. किंबहुना त्या इतमामात कमी पडत असलेल्यांना कळत नकळतपणे आपोआपच कमतरतेची वागणूकही दिली जाते. अशाप्रकारे संबंधांमध्ये असमानता निर्माण होते. ज्याचा आपल्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. कारण त्यामुळे आपल्या आत्मसम्मानाच्या स्तरावर आपले मनोबल खचते. कमीपणाच्या भावनेने आपण ग्रासित होतो. ज्यामुळे आपल्यातील लोकांमध्ये मिसळण्याची भीतीवर आपण आयुष्यात कधीही मात करू शकत नाही.
2. एकटे पडत जातो
लोकांत मिसळण्याची भीती आपल्याला हळूहळू एकटे पाडत असते. कारण त्यामागे इतरांपासून काहीतरी लपवीन्याचा आपला उद्देश असतो. परंतू एकटे पडणे हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी एका मर्यादेपर्यंतच योग्य असते. त्याचा अतिरेक हा आरोग्यास हानिकारक ठरत असतो. कारण मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. त्याला जगण्यासाठी केवळ अन्नपाणीच नाहीतर समाजाचे संरक्षणही पाहिजे असते. आपली सुख दु:खे वाटण्यासाठी आसपास लोक पाहिजे असतात. एकंदरीत सामाजीकरनामुळे आपले जीवन जगणे सुसह्य होत असते. परंतू जेव्हा आपण लोकांत मिसळण्याची भीतीने ग्रस्त असतो. तेव्हा आपल्याला सामाजीकरणाचे फक्त तोटेच दिसत असतात. आपण लोकांमध्ये केवळ दोषच पाहणे शिकतो. कारण आपण स्वत:च असुरक्षित मानसिकतेत अडकलेले असतो. अशाप्रकारे लोकांमध्ये मिसळण्याची भीती आपल्या आयुष्यात अनेक दुष्परीणाम घडवून आणत असते.
3. अनेक गैरसमज पसरत जातात
आपण जेव्हा लोकांमध्ये मिसळण्याचे टाळत असतो. तेव्हा कोणीही हे जाणून घेण्यास उत्सुक नसतो. कि त्यामागचे नेमके कारण काय आहे. आपल्या मनातील घालमेल आपल्या हालचालीतून तसेच चेहऱ्याच्या हावभावावरून स्पष्ट दिसत असली. तरी तिच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपल्या विषयी मनात लाख गैरसमज बाळगले जातात. आपल्या कमतरतांवर मुद्दाम बोट ठेवले जाते. जेणेकरून आपला मजाक बनावा. कारण ह्या जगात कमजोर व्यक्तीस खाली पाडूनच आपली विजय घोषित केली जाते. त्यामुळे तो कसा कमी बोलतो. तो अहंकारीच वाटतो. तो रागात असल्यासारखा दिसतो. अशी स्वत:हून मते बनविली जातात. अशाप्रकारे चुकीच्या मार्गाने आपल्या व्यक्तीमत्वातील वेगळेपण कसेही करून प्रकाशात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. जे अखेरीस आपले व्यक्तीमत्व म्हणून घोषित होते.
4. स्वत:वर टीका करण्याची प्रवृत्ती वाढते
जेव्हा आपल्याला आपल्या आसपासच्या लोकांप्रमाणे सामान्यपणे वागणे बोलणे जमत नाही. तेव्हा आपल्या मनात स्वत:विषयी अनेक प्रश्न उद्भवत असतात. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत. आपण इतरांमध्ये समरस होवू शकत नाही. आपल्यात नक्कीच काहीतरी कमतरता आहे. असे विचार आपल्याला मनातून पोखरत असतात. आपण अशा नकारात्मक विचारांसोबत आणखी आणखी स्वत:मध्ये गुरफटत जातो. आपल्याला स्वत:मध्ये काहीही चांगले पाहता येत नाही. आपण स्वत:ला कशातही पुरेसे समजत नाही. जर माझ्या आयुष्यात काहीही उत्तम होत नाहीतर त्यासाठी मी स्वत:च जबाबदार. असेच आपण गृहीत धरून चालत असतो. इतकेच नाहीतर स्वत:चा तिरस्कार करण्या इतपत आपण नकारात्मक झालेले असतो. अशाप्रकारे लोकांमध्ये मिसळणे आपल्यासाठी सोपे नसल्याने स्वत:वर टीका करणे हा आपोआपच आपला स्वभाव बनत जातो.
5. स्वभावात क्रोधाचे प्रमाण वाढते
आपण जेव्हा इतरांप्रमाणे सामान्य वर्तन करत नाही. किंवा आपल्या वयानुसार वागत नाही. तेव्हा आपल्या आसपासचे लोक आपल्याला शंकांच्या नजरेने बघत असतात. तसेच आपल्यावर थट्टा मस्करीचे ताशेरे ओढत असतात. आपल्यावर दमदाटी करण्याचा त्यांचा उद्देश असतो. किंवा आपल्या कृतीतून आपल्याला कमीपणा आणण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट सहाजिकच आपल्या आत्मसम्मानाला पटणारी नसते. सुरवातीला आपण त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्षही करतो. आतल्या आत राग येत असूनही स्वत:ला कित्येकदा थांबवितो. परंतू भावना दाबल्या गेल्याने कधी ना कधी त्यांचा विष्फोट होतोच. त्यातून आपल्याकडून तीव्र प्रतिक्रिया बाहेर पडतात. परंतू त्याचेही लोकांमध्ये गैरसमजच पसरतात. अशाप्रकारे लोक कमी बोलणाऱ्यांची मनात भीती बाळगु लागतात. कारण त्यांच्या रागाचा कधी भडका उडेल ह्याची शाश्वती नाही. असे त्यांना वाटते.
आज आपण आपल्या आसपास वावरणाऱ्या लोकांप्रती इतके बेपर्वा होत चाललो कि सर्रासपणे हा त्याचा विषय आहे. असे समजून सहज दुर्लक्ष करतो. परंतू ज्या मानसिक आरोग्या विषयीच्या समस्या. केवळ आपल्या असंवेदनशील वागण्यामुळे भावनाशुन्यतेमुळे कोणास छळण्याच्या दृष्टीकोनातून मुद्दाम त्याला दुर्लक्षितपणे वागणूक दिल्यामुळे उद्भवत असतील. तर ही माणुसकीची खूप मोठी हार आहे. कारण आपल्या कळत नकळतपणे तसे वागल्याने लोकांना स्वत:च्या व्यक्तिमत्वावर प्रश्न पडू लागले आहेत. लोक स्वत:ला एकटेपणाच्या खाईत स्वत:हून ढकलत आहेत. लोक स्वत:च्या अस्सल व्यक्तीमत्वाला नाकारून समाजात आपली खोटी प्रतिमा घेवून जगण्यास विवश झाले आहेत. लोक अत्यंत औपचारिक होत चालले आहेत. लोक आपल्या भौतिक संपदेचे अतोनात प्रदर्शन मांडू लागले आहेत. त्यातूनच लोक लोकांमध्ये मिसळण्याचे दडपण घेवून जगत आहेत. कारण मिसळणे आवश्यक आहे. एकटे पडणे योग्य नाही. ह्या विरोधाभासात मात्र लोकांचे मानसिक आरोग्य पणास लागत आहे. तेव्हा कोरड्या औपाचारीकतांना जरा बाजूला ठेवून. आपुलकीने लोकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन कमी पडले तरी चालेल. परंतू मनाच्या सखोलतेने लोकांना जवळ केले पाहिजे. एकमेकांच्या आयुष्यातील समस्यांना तुलनात्मक नाहीतर माणुसकीच्या नजरेने पाहिले पाहिजे. त्यावर समजदारीने चर्चा केल्या पाहिजे. तेव्हाच आपसात हृदयालगतचे ऋणानुबंध निर्माण होतील. त्याचप्रमाणे काही विशेष समस्यांमुळे ज्यांना लोकांत मिसळण्याची भीती वाटते. असे लोकही आपल्याच मनातील बेड्यांमधून मुक्त होवून सामाजीकरणाचा मनमुराद आनंद घेवू शकतील.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)