वारसा

आजच्या आधुनिक युगातील पिढीने नव्याचा ध्यास घेतलेला आहे. ज्यात परप्रांतीय पेहरावा पासून खाण्यापिण्याच्या सवयीपर्यंत सर्वकाही बदलले आहे. पूर्वी जे पेहराव दैनंदिन जीवनाचा भाग होते ते आता विशेष कौटूंबिक कार्यक्रमासाठी किंवा इतरही सांस्कृतीक कार्यक्रमात खास पोषाख म्हणून वापरले जावू लागले आहेत. घरात लहान मुलांना मातृभाषेऐवजी इंग्रजी बोलण्याचे शिकवण्यात येवू लागले आहे. जेणेकरून ते इंग्रजी बोलण्यात तरबेज व्हावेत. त्याशिवाय घरांमध्ये आपसात संवाद साधतांना इंग्रजीचाच जास्तीत जास्त वापर होवू लागला आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून पदार्थ बनवीणे शिकण्याच्या ह्या युगात घरातील आई-आजींच्या हातून बनवीले जाणारे पारंपारीक पदार्थ त्यांच्या पुरतेच मर्यादीत राहू लागले  आहेत. जीवनात प्रगती करण्याची परिभाषा बदलली आहे. आजच्या पिढीला प्रगती म्ह्णजे भरपूर पैसा व प्रसिद्धी असे वाटू लागले आहे. त्याचप्रमाणे आपल्या विचारांना, आपल्या मतांना तसेच आपल्या कृतीला समाजाकडून मान्यता मिळणे आणि आपले नाव प्रत्येकाच्या तोंडी असणे म्हणजे प्रगती करणे असेही आजच्या पिढीला वाटू लागले आहे. 

   अशारितीने आता मोठ्या प्रमाणात परप्रांतिय संस्कृती आत्मसात केली जावू लागली आहे. कारण आताचे जीवनमान हे गतिशील आहे. आपल्याला गतिमान करण्यास मदत करणार्‍या कौशल्यांचा आपण अंगीकार केला नाही तर आपण इतरांच्या साथीने वेग पकडू शकणार नाही. आणि मागे पडत जावू. त्याचा परिणाम थेट आपल्या आत्मविश्वासावर होत जाईल. त्या दृष्टीकोनातून जुन्या रुढी परंपरामध्ये फसून राहणे म्हणजे आपला वेळ वाया घालविण्यासारखे आहे असा आताच्या पिढीचा समज झाला आहे. अशाप्रकारे काही चालिरिती हळूहळू जुन्या पिढीसोबतच संपुष्टात येवू लागल्या. कारण नव्या पिढीस जुन्या गोष्टी वेळ खर्ची पाडणार्‍या तर जुन्या पिढीस जुनं तेच सोनं वाटू लागल्याने दोन पिढ्यांमध्ये कायमचे अंतर निर्माण झाले. अशावेळी दोन पिढ्यांमध्ये दुवा बनणार्‍या किंवा त्यांना जोडून ठेवणार्‍या आठवणी ज्या दागिण्यांच्या स्वरुपात, वास्तूच्या स्वरुपात तसेच जमिनीच्या तुकड्याच्या स्वरुपात असतात. ज्यांना पिढ्या न पिढ्यांचा वारसा लाभलेला असतो.

    जेव्हा सणवार किंवा लग्न समारंभाच्या निमीत्ताने घराण्याच्या दोन ते तीन पिढ्यांना एकत्र येण्याची संधी मिळते तेव्हाही त्यांच्यातील विचारांचे तसेच मतभेदांचे अंतर कायम असते. परंतू तरिही वारसा स्वरुपात असलेल्या आठवणी जसे पिढीजात दागिने व वास्तू त्यांच्यातील अंतर कमी करण्यास मदत करतात. कारण त्यांच्याशी मागे पडत गेलेल्या पिढ्यांच्या सुंदर आठवणी जुळलेल्या असतात. आताच्या युगात दागदागिने भौतिक श्रीमंतीत भर घालण्यासाठी संग्रहीत केले जातात. कोणिही ते अंगावर घालून मिरवत नाहीत. तसेच ते घरात ठेवणेही धोक्याचे असते. त्यामुळे नव्या पिढीतील बहुतांशी स्त्रियांना दागिन्यांची फार हौस नसते. परंतू पूर्वी स्त्रियांच्या अंगावर नेहमी दागिने असायचे. आणि काही खास क्षणांसाठी त्या विशेष दागिने घडवून घेत असत. तसेच नटून थटून हौसमौज करत असत. इतर वेळी त्या सर्व दागिने एका खास डब्यात सांभाळून ठेवत असत. वर्षातून एकदा लक्ष्मीपुजनाच्या निमीत्ताने तो खास डबा तिजोरीतून बाहेर काढण्यात येत असे. ते दागिने जुन्या कलाकुसरीचे, शुद्ध सोन्याचे तसेच पिढ्यांचा वारसा लाभलेले असायचे. त्या घराण्यात होवून गेलेल्या कित्येक सुनांनी त्यांच्या सुनांच्या हाती घराण्याचा वारसा म्हणून स्वाधीन केलेले व तितक्याच सन्मानाने जपलेले ते धन असायचे. त्या दागिन्यांच्या डब्याबरोबर आठवणींचा वारसाही मोठ्या अभिमानाने सांगितला जात असे. खास औचित्य साधून त्या पिढीतील आजी किंवा पणजींच्या हातून दागिने स्वरुपातील तो वारसा पुढच्या पिढीच्या स्वाधीन केला जात असे.

   त्याचप्रमाणे पिढीजात शेतजमीन जिच्या मागेही कित्येक वर्षांचा इतिहास तसेच आठवणी असतात. कितीतरी पिढ्या येतात जातात, कित्येकांनी त्या जमिनीवर घाम गाळलेला असतो. कष्ट करून त्या जमिनीस आणखी उपजावू बनवीले असते. वडिलोपार्जीत जमिन म्हणजे जणूकाही अप्रत्यक्षपणे वडीलच पाठीशी उभे असतात. त्यामुळे त्या कुटूंबावर कधिही उपाशी राहण्याची वेळ येत नाही. शेतजमिन म्हणजे आशिर्वादांचा वारसा तिला सांभाळणे, कष्टाने तिला उपजावू बनवीणे म्हणजे काळ्या आईचा उद्धार करणे होय. परंतू आपल्या स्वार्थ बुद्धीने तिला विकूण पैस्याची लालसा ठेवणे म्हणजे साक्षात आईला विकण्यासारखे आहे. तेव्हा हा अविचार आपल्या हातून घडण्याची वेळ येवू देवू नये. त्यापेक्षा आपल्या कर्तुत्वात भर घालून स्वबळावर जीवन जगण्यावर विश्वास ठेवावा. कारण जमिनीच्या हक्कावरून भावा-भावांमध्ये कितीही वितुष्ट आले तरी जमिनीला कोणिही तिच्या जागेवरून हलवू शकत नाही. ह्यावरून हे लक्षात येते कि निसर्गाच्या भव्यतेपुढे आपल्यातील  स्वार्थाने आपण आणखीच खुजे होत जातो. जमिनीच्या स्वरुपातील आठवणींचा वारसा हा बहुमोलाचा असतो. कारण त्यामागची दुरदृष्टी, त्यासाठी केलेली तडजोड आणि त्याचा केलेला सांभाळ हा त्यास विशाल स्वरुप प्रदान करतो.

   एखादी पिढिजात जुन्या बांधकामाची वास्तू ज्यात कितीतरी पिढ्या उदयास आल्या व लोप पावल्या असतात. सणसमारंभ, विवाहसोहळे संपन्न झालेले असतात. कितीतरी मुलांचे बालपण तिथे गेलेले असते. त्या घरातून तरुण मुले त्यांची आयुष्ये घडवीण्याच्या दृष्टीकोनातून बाहेर पडलेली असतात. म्हातारे झालेले आई-वडील मुलांच्या परतण्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. अशा कितीतरी भूतकाळातील घटनाक्रमांना त्या वास्तूच्या अनुभवी व निर्जीव भिंतींनी पाहिलेले असते. ती वास्तू म्हणजे जणूकाही आईची मायाच असते. आपण जगाच्या पाठीवर कोठेही असलो तरी संधी मिळताच तिथे परतण्यासाठी आसुसलेले असतो. कारण त्या वास्तूशी आपले अजोड नाते असते. जुन्या आठवणींचा वारसा घेवून ती आपल्याला तिच्याकडे परत फिरण्यास सांगत असते. आठवणींच्या वारस्याने त्या साध्या वास्तूसही इतके महत्व प्राप्त करून दिलेले असते कि तिच्यापुढे आलिशान घरेही क्षुल्लक वाटतात. आयुष्यातील नकारात्मक काळात आठवणींच्या जगात  विहार केल्याने आपल्या मनाला दिलासा मिळतो. तसेच अशा पुरातन वास्तू, दागदागिने व पिढीजात जमिनींना डोळ्यांनी बघणे व त्यांना स्पर्श केल्याने आपल्यात उमेद जागृत होते.

  अशा सर्व पुरातन व आठवणींचा वारसा असलेल्या वस्तू आपल्याकडून जोपासल्या गेल्या पाहिजे. त्यावर मालकी हक्क दाखवून त्याचे पावित्र्य आपल्या हातून भंग होता कामा नये. प्रत्येक येणार्‍या पिढ्यांनी त्यात आपल्या कर्तुत्वांनी भर घालावी. तसेच अत्यंत निस्वार्थ भावनेने तो वारसा पुढच्या पिढीच्या स्वाधीन करावा. त्यामुळे संपत्तीच्या मोह मायेतून आपली सुटका होईल आणि आपल्याला समाधान लाभेल. वारस्याच्या रुपात आपले पूर्वज आपल्या आठवणीत कायम जिवीत राहतील. अशाप्रकारे दोन पिढ्या एकमेकांना आपसात सामावून घेतील.

1. वारसा सन्मानपूर्वक जपावा.

   वारसा म्हणजे दोन पिढ्यांना जोडणार्‍या आठवणी ज्या भौतिक संपत्तीच्या स्वरुपात आपल्या पाशी असतात. आपल्या पूर्वजांनी अत्यंत कष्टाने त्यांच्या आयुष्यात त्याची उभारणी केलेली असते. त्यासाठी त्यांनी तडजोडी केलेल्या असतात. त्याचबरोबर त्याच्या उभारणीच्या मागे समोरच्या पिढीच्या सुरक्षीत आयुष्याचा विचार असतो. ज्यात त्यांचे प्रेम सामावलेले असते. त्यामुळे त्याचे मुल्य कशानेही होवू शकत नाही. म्हणूनच ते सन्मानपूर्वक जपावे. त्याचबरोबर ते पुढच्या पिढीच्या स्वाधीन करतांना त्यामधून आपले स्वारस्य काढून टाकावे. शिवाय त्यात आपल्या कर्तुत्वांनी नक्की भर घालावी. जेणेकरून आपणही आठवणींच्या स्वरुपात पुढच्या पिढीच्या हृदयात वास करू. वारसा म्हणजे पूर्वजांच्या आठवणींचा मौल्यवान ठेवा. तो असाच पुढे जात रहावा व त्याने घराण्याचे नाव लौकिक वाढतच जावे.

2. मालकी हक्काचा वापर करू नये.

  पिढीजात संपत्ती बघूण कधिकधी आपल्या मनात लालसा निर्माण होण्याची शक्यता असते. स्वार्थीपणात आंधळे होवून आपण त्या संपत्तीवर हक्क दाखवू लागतो. त्यामधून भावंडांमध्ये वादविवाद निर्माण होतो. त्यासोबत त्यांच्यातील प्रेम संपुष्टात येवून ते एकमेकांच्या जीवावर उठतात. परंतू आठवणींच्या वारस्यावर मालकी हक्क नाहीतर मनाचा मोठेपणा दाखविण्याची आवश्यकता असते. त्या संपत्तीस व्यक्तीगत समजून तिला उपयोगात आणण्यापेक्षा त्यात आपल्या कष्टाने व कर्तुत्वाने आणखी भर घातल्यास तिचे आठवणींनी समृद्ध मौल्यवान ठेवा म्हणजे वारसा ह्यात रुपांतरण होते. आणि त्यामधून पुढच्या पिढीला स्वबळावर आपले आयुष्य उभे करण्याचा संदेशही मिळेल.

3. वारसा उदारमनाने सुपूर्द करावा.

  आपल्या पूर्वजांनी अत्यंत कष्टाने व स्वबळावर उभे केलेले धन पुढच्या पिढीकडे सुपूर्द करतांना उदार मनाने करावे. त्यात कोणताही आकस किंवा मनात लोभ नसावा. कारण आपले चरीत्र्य हेच आपल्यासाठी मोठी संपत्ती असते. जगाचा निरोप घेतांना कोणत्याही प्रकारची भौतिक श्रीमंती आपल्या सोबत जात नाही. तेव्हा ती पुढच्या पिढीला सुपूर्द करतांना त्या धनाचा त्यांना लाभ मिळावा तसेच त्यांची उन्नती व्हावी त्यासोबत त्यांनीही त्यात भर घालण्यासाठी कष्ट घ्यावे हीच सदीच्छा आपल्या मनात असली पाहिजे. देण्याच्या ह्या शुद्ध हेतूने घेणार्‍याच्या मनालाही मोठेपणा येतो. त्यामुळे त्या संपत्तीचा तो व्यय करणार नाही. आपल्या स्वकर्तुत्वावर कायम विश्वास ठेवेल. तसेच सदैव त्या संपत्तीशी जोडल्या गेलेल्या पूर्वजांच्या आठवणींशी बांधला राहील.

4. वारसा अखंड ठेवावा.

   वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांचे आपल्याला लाभलेले आशिर्वाद असतात. तसेच आशिर्वादांची तुलना कितीही मोठ्या धनसंपत्तीशी होवू शकत नाही. ज्याप्रमाणे आई-वडीलांचे विभाजन होवू शकत नाही त्याचप्रमाणे त्यांनी दिलेला भौतिक संपत्तीच्या स्वरुपातील वारसा हा देखील अखंड जोपासला गेला पाहिजे. वारसदार बनणार्‍याच्या मनाला स्वार्थाचा लवलेशही नसला पाहिजे. त्याने कायम स्वकर्तुत्वावर मोठे होण्याचा ध्यास घ्यावा. त्याने स्वत:ला  वारस्याचा मालक नव्हे तर रक्षक समजावे. तरच तो त्या संपत्तीस अखंड ठेवण्यासाठी झटत राहील. कारण त्या संपत्तीस तो लक्ष्मीचे स्वरुप समजेल. आणि योग्य वेळ येताच उदार मनाने आपल्या पेक्षा लहानांच्या स्वाधीन करेल.

  आठवणींचा वारसा हा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे मोठ्या सन्मानाने सुपूर्द करण्यात यावा. त्याक्षणी त्याचे महत्व व त्यामागील इतिहास मोठ्या गौरवाने सांगण्यात यावा. कारण वारसा निर्माण होत असतांना त्यामागे मोठा त्याग असतो. तसेच अत्यंत तडजोडीने व कष्टाने त्याची उभारणी होत असते. त्याची भरपाई आपण काही केल्या करू शकत नाही. केवळ त्याच्याप्रती मनात कायम आदर ठेवून, त्याला अखंड ठेवून तसेच योग्य वेळ येताच त्याला मोठ्या मनाने पुढच्या पिढीच्या स्वाधीन करून त्याची शोभा अबाधीत ठेवू शकतो.   

3 thoughts on “वारसा”

  1. अप्रतिम लेख
    सॅल्यूट👌
    पण हे वाचलं आहे का?
    👇👇👇
    गायत्री बिरादार यांचा विद्यार्थी आणि शेतकरी यांच्या समस्यांना वाचा फोडणारा अतिशय गाजत असलेला लेख. ग्रुपमधील सर्व बांधवांनी आवर्जून वाचावे. तसेच शेतकरी आणि विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा.
    https://avirat2021.blogspot.com/2024/12/blog-post_9.html

    1. धन्यवाद.
      आपला लेख वाचला. त्यामधून सामाजिक पातळी वरच्या समस्या कशा प्रत्येकाच्या व्यक्तीगत जागरूकतेने नियंत्रित करता येवू शकतात. ह्यासाठी प्रोत्साहन मिळते.
      आपल्या सारख्या लेखकांची आज खरेच खूप आवश्यकता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *