विकास आणी त्याचा अर्थ

विकसीत होत जाणे तसेच प्रगती करणे हा सृष्टीचाच नियम आहे. निसर्गाच्या नियमात प्रत्येक अतिसुक्ष्म, सुक्ष्म गोष्टींचाही विचार असतो. त्यात सृष्टी व जीवसृष्टी यांच्यात ताळमेळ असतो. एका गोष्टीमुळे दुसरीचा विकास होण्यास आपोआपच मदत होते. जमीन आईप्रमाणे तिच्यावर वास्तव्य करणार्‍या जीवजंतू, वनस्पतींचा सांभाळ करते. जेव्हा ग्रिष्माच्या रखरखत्या उन्हाने जमिनीच्या पोटातील पाणि दुरवर निघून जाते तरिसुद्धा काही वनस्पती जमिनीवर तग धरून असतात. तसेच पर्जन्यकाळ येताच पुन्हा नव्या जोमाने वाढू लागतात आणि सर्वत्र हिरवळ पसरवितात. सृष्टीचा होणारा विकास हा हळूवार असतो. त्यात कोणतिही घाई नसते मात्र सर्वांचा विचार नक्की असतो.

   मनुष्याच्या जगात मात्र प्रत्येक गोष्टीची घाई असते. म्हणूनच त्याने सृष्टीच्या नियमांवरही मात करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यास आधुनिकीकरण किंवा विकासाचे नाव दिले. परंतू मानवी तल्लख बुद्धीमत्तेची परिसीमा नाही. आज असे कोणतेही क्षेत्र नाही ज्याला आधुनिकीकरणाचा स्पर्श झाला नाही. त्यातही प्रतिस्पर्धा बघावयास मिळतात. प्रत्येक देश एकमेकांच्या चढाओढीने स्वत:चा विकास घडवून आणण्यास पुढे सरसावले आहेत. क्षणाक्षणाला नव्या तंत्रज्ञानाचा शोध लागतोय. तंत्रज्ञानाच्या वाढत्या उपयोगामुळे जीवसृष्टीशी निगडीत अनेक घातक समस्याही उद्भवत आहेत. परंतू विकासाच्या ह्या युगात माणूस मात्र दिवसेंदिवस हरवत चाललाय. त्यासोबत माणुसकीही हरवत चालली आहे. समाजात गरिब श्रीमंतीचा भेदभाव निर्माण झाला आहे. समाजातील एक वर्ग तळागळाच्या गरिबीने ग्रस्त आहे ज्यात मुलभूत गरजांचाही तुटवडा आहे. अशावेळी विकासाची पाळंमुळं खोलवर गेलीत असे ठामपणे म्हणता येणार नाही.

   आदीमानव जे सृष्टीशी ताळमेळ ठेवून व एकरूप होवून जीवन जगत होते त्यांच्यातही विकास होत गेला. त्यांना हळूहळू अंगावर वस्त्र असावे, अन्न भाजून खावे हे अवगत होवू लागले. त्यातूनच माणसाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीत विकास होत गेला. अन्न वस्त्र निवारा ज्या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. त्यांच्या पुर्ततेसाठी त्या दृष्टीकोनातून धान्य उगवणे, त्याचा साठा करणे त्याशिवाय आपसात देवाण घेवाणीची प्रक्रिया सुरू झाली. अशारितीने मानवी जीवन प्रगतीशील झाले. ह्यातून हेच लक्षात येते कि विकास ही सखोल प्रक्रिया आहे तिचे वरवर असणे धोक्याचे आहे. कारण त्याचे दुष्परीणाम लवकरच आपल्या समोर येतात.

   त्याचप्रमाणे विकसनशील देश हे केवळ औद्द्योगिकरण, आधुनिकीकरण तसेच शैक्षणिक पातळीवर समोर असून उपयोगाचे नसते. तर समाजात पसरलेली गरिबी, त्यामागची कारणे तसेच त्यावरच्या उपाययोजना ह्यासाठी ठोस पावले उचलणे हे देखील महत्वाचे असते. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्वदृष्टीकोनातून रयतेचे हित अत्यंत महत्वाचे होते. मराठी साम्राज्य पुर्णपणे रयतेचे होते. त्याचप्रमाणे आजही सामान्य माणसांचे सुखी समाधानी असणे, त्यांच्या जीवनात येणार्‍या मुलभूत अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा काढणे हाच खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाचा महामंत्र आहे.

   समाजात निर्माण झालेले गरीब व श्रीमंत असे भेदभाव माणसाच्या मनावर कायमचे बिंबवीले गेलेत. कारण श्रीमंती ही माणसाकडे असलेल्या भौतिक समृद्धीवर व प्रसिद्धीवर अवलंबून आहे. जर ती माणसातील जीवनमुल्यांवर तसेच माणुसकीवर अवलंबून असती तर समाजात श्रीमंती आपोआपच वाढली असती आणि गरिबी ठरवून हळूहळू संपुष्टात आणता येवू शकली असती. परंतू मुलभूत सेवा प्रदान करणार्‍या पेशांना तसेच त्यांना करणार्‍या माणसांना समाजात कमीपणाची वागणुक मिळाल्यामुळे ते भौतिक संपदेच्या जोरावर श्रीमंत असलेल्यांच्या पुढे स्वत:ला कमकुवत समजतात. तसेच त्यांच्यात स्वत:ला गरीब समजण्याची मानसिकताच विकसीत होत जाते. अशाप्रकारे समाजातील गरीबी व श्रीमंती ही माणसाच्या वैचारीक पातळीवरच घाला घालते. जोवर मानसिकतेवर कोरल्या गेलेली ही भिन्नता अस्तित्वात आहे देशाचा विकास अपुर्ण आहे.

  तसेच बेरोजगारी ही आजच्या युगातील सर्वात मोठी समस्या आहे. कारण ह्यात संपुर्ण तरुण वर्ग ग्रासलेला आहे. भारत हा तरुणांनी समृद्ध देश आहे. परंतू उच्च शिक्षीत असूनही रोजगार नसल्याने तरुणांचे मनोबल दिवसेंदिवस खचत चालले आहे. कारण आपली शिक्षण व्यवस्था  मुलांना पदवीधर तर बनवीते. परंतू रोजगार मिळवीण्यासाठी लागणारे कौशल्य त्यांच्यात विकसीत होत नाहीत. त्यामुळे तरुण वर्गात निराशा तसेच आत्मविश्वासाची कमी प्रकर्षाने जाणवू लागली आहे. तरुणांना ज्या क्षेत्रात त्यांची कारकीर्द व्हावी असे मनापासून वाटते त्या क्षेत्रात रोजगाराची हमी नसल्याने नाईलाजास्तव जास्तीतजास्त रोजगाराची हमी असलेल्या क्षेत्राकडे त्यांना वळावे लागते. अशावेळी नवीन क्षेत्रात आपला ठसा उमटवीण्याचा विचार करणेही त्यांच्यासाठी अत्यंत कठीण असते. अशाप्रकारे जोवर तरुण वर्ग संभ्रमात आहे देशाच्या विकासाला न्याय मिळणार नाही.

  मनुष्यजातीला ग्रहण लावणारी तसेच कलंकीत करणारी आणखी एक समस्या म्हणजे महिलांचे शोषण. महिलांनी समाजात त्यांच्या कर्तुत्वाने जो नावलौकिक मिळवीला आहे तो वाखाणण्या जोगा आहे. आजची महिला खर्‍या अर्थाने रणरागिनी आहे. तरिही पुरूषप्रधान संस्कृतीत महिलांना एक माणुस म्हणून आदर व सम्मान मिळत नाही. त्याउलट महिलांना उपभोगाची वस्तू समजल्या जाते. अगदी घरापासून ते घराबाहेरच्या जगापर्यंत कोठेही महिलांचे आयुष्य सुरक्षीत राहिलेले नाही. बलात्कार, हुंडाबळी, स्त्रिभ्रुणहत्या अशाप्रकारच्या दुर्दैवी मार्गांनी समाजात महिलांचे शोषण होत आहे. शाळेत घेतलेल्या प्रतिज्ञेचा आता सर्वांनाच विसर पडत असतांना दिसतोय. जिच्या पोटी जन्म घेतला त्या आईचीच प्रतिकृती असलेल्या दुसर्‍या स्त्रिवर अत्याचार करणे तसेच तिचा आत्मसम्मान मातीमोल करण्याचा परवाणाच जणूकाही पुरूषांना मिळाला आहे. तेव्हाच पोटाची खळगी भरण्यासाठी महिलांवर देहविक्रीसारखे लाजीरवाणे व्यवसाय करण्याची वेळ आता आली आहे. अशाप्रकारे एका महिलेच्या मांगल्याला व तिच्यातील मातृत्वाला विक्रीचे साधन बनवून तिची फार मोठी विटंबना ह्या समाजाने केली आहे.

  जोवर समाजातील ह्या सर्व ठळकपणे दिसणार्‍या समस्यांकडे कानाडोळा करण्यात येईल. तसेच त्यांना समूळ नष्ट करण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार नाहीत. तोवर कोणताही विकास हा पोकळ ठरेल. कारण विकासाचा अर्थ पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीचे सर्वतोपरी नंदनवन होणे असा होतो. त्याचप्रमाणे माणुसकीला सर्वात श्रेष्ठ धर्म समजून सर्वत्र त्याचे प्रदर्शन व्हावे हीच अपेक्षा आहे.

1. समाजात गरिबी पसरविणार्‍या कारणांवर लक्षकेंद्रीत करणे

  सर्वप्रथम माणुस म्हणून समाजातील प्रत्येक वर्गाच्या मुलभूत गरजा पुर्ण होणे. ह्याकरीता महत्वपुर्ण पाउल उचलण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पैसा कमविण्यासाठी प्रत्येकाने काही ना काही काम केले पाहिजे. कोणतेही काम केल्याशिवाय एखाद्याच्या हातावर मदत करण्याच्या नावाखाली एक, दोन रुपए ठेवणे हे देखील गरिबी पसरविण्यास कारणीभूत ठरू शकते. कारण तसे केल्याने ह्या समस्येवर कायमचा तोडगा निघणार नाही. खेड्यापाड्यांमधून काही लहान तसेच तरुण मुले गरिबीला व आई-वडीलांच्या जाचाला कंटाळून घर सोडून शहरात येतात. शहरांमध्ये अशा मुलांच्या टोळ्या असतात ज्या दुष्कृत्येही करतात. त्याचप्रमाणे काही लोक आपल्या शारिरीक अपंगत्वाचा ढालीसारखा वापर करून निष्क्रीय होवून इतरांपुढे हात पसरतांना दिसतात. जर शासनाने अशा गैरमार्गावर गेलेल्या व इतरांच्या दयेवर जगणार्‍या वर्गाला हेरून तसेच त्यांच्या शारिरीक अपंगत्वाचा विचार करून त्यांना काही कामांचे प्रशिक्षण देवून आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने पावले उचलल्यास ते स्वबळावर निदान त्यांच्या मुलभूत गरजा तरी भागवू शकतील. आणि समाजातील गरिबी हळूहळू कमी होण्यास मदत मिळेल.

2. गरिब श्रीमंतीची भिन्नता असलेल्या मानसिकतेस बदलविणे

   आपली जसी मानसिकता विकसीत होत जाते त्यानुसार आपले आयुष्य आकार घेत जाते. आपल्या बालपणापासून आपल्यावर होणारे संस्कार, आपली जीवनमुल्य तसेच आर्थिक स्थितीमुळे लहानपणापासून करावी लागणारी तडजोड ह्या सर्व गोष्टी आपल्या मानसिकतेवर विपरीत परिणाम टाकतात. पैसा व प्रसिद्धी आपल्या भौतिक श्रीमंतीत भर घालत असल्या. तरी प्रत्येक श्रीमंत माणसात माणूसकी तसेच मनाची श्रीमंती असेलच असे नाही. परंतू गरीब असूनही ज्याची जीवनमुल्य बळकट असतील आणि स्वाभिमानाचे जगणे ज्याला मंजूर असेल असा प्रत्येक माणुस खर्‍या अर्थाने श्रीमंत असतो. तसेच आज समाजाला ह्याच श्रीमंतीची आवश्यकता सुद्धा आहे. कारण ही श्रीमंती इतरांच्या वेदना समजू शकते. त्याचप्रमाणे त्यावर तोडगा काढण्याची हिंमतही त्यांच्यातच असते. तेव्हा केवळ पैसा व प्रसिद्धीला श्रीमंती समजण्याच्या विचारांना मनातून काढून टाकले पाहिजे. कारण जर परोपकाराचे संस्कार नसतील तर ते फक्त आपल्यापुरते सिमीत जग निर्माण करण्याचे माध्यम आहे. तेव्हा गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव निर्माण करणारी मानसिकता बदलवून माणुसकीला महत्व प्राप्त होण्यातच समाजाचा खरा विकास आहे .

3. लघूउद्द्योग तसेच गृहोद्द्योगांना बळकट बनविणे

  आज प्रत्येकाची अशी मानसिकता बनली आहे कि जेवढे जास्त उच्च स्तरीय शिक्षण असेल त्यावर मोठ्यात मोठा रोजगार लाभण्याची शक्यता असते. त्यामुळे क्षमता नसतांनाही आई-वडील मुलांना उच्च शिक्षीत करण्याचा ध्यास घेतात. वेळप्रसंगी जमवून ठेवलेली संपत्तीही त्यासाठी खर्ची घालतात. परंतू जेव्हा ते मुलांना रोजगार मिळविण्यासाठी हवालदील होतांना पाहतात तेव्हा त्यांच्या तोंडचे पाणि पळते. कारण मुलांच्या मागे त्यांचे संपुर्ण आयुष्यही खर्ची पडते. परंतू शेवटी त्यांच्या हाती निराशाच येते. जर काही छोट्या मोठ्या उद्द्योगांना शासनाने आणखी बळकट बनवीले किंवा काही स्त्रिया घरच्या घरी सेवा प्रदान करणारे उद्द्योग चालवत असतात. अशा कामांना आर्थिक मदत करून त्यांचे स्वरूप मोठे केले. तर तरुण वर्गाला रोजगारासाठी पायपीट करावी लागणार नाही. निदान जीवनात त्यांचे पाय स्थिरस्थावर होईस्तोवर तरी त्यांना ह्या कामांमध्ये स्वत:ला गुंतवून ठेवणे शक्य होईल. त्यामुळे ते मानसिक निराशेला सामोरे जाण्यापासून वाचतील. तसेच त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी ते शांत मनाने विचार करू शकतील.  

4. महिलांच्या सर्वतोपरी सुरक्षेसाठी कठोर कायद्यांचे पालन करणे

   महिलांनी स्वत: स्वावलंबी होवून तसेच आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होवून स्वत:च्या आत्मसन्मानाच्या व अस्तित्वाच्या रक्षणार्थ खुप मोठे पाउल उचलले आहे. तरिही आज समाजात महिलांची स्थिती तितकीशी चांगली नाही. मुलींचे कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडणे आई-वडीलांच्या चिंतेचे कारण बनले आहे. ह्या चिंतेतून मुक्त होण्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे मुलींचे लग्न करून मोकळे होणे असा समज आहे. परंतू आता लग्न ही व्यवस्थाही सुरक्षीत राहिलेली नाही. कारण संपत्तीच्या लालसेपोटी सासरच्यांकडून बर्‍याच घरांमध्ये नवविवाहितेचा छळ होत आहे. मुलगी नुसती शिकलेली असून चालत नाही तर तिला सरकारी नोकरीही असावी अशी अट आता ठेवली जावू लागली आहे. त्यामुळे लग्नाला आता व्यवसायाचे रुप आलेले आहे. जर अटी मान्य केल्या नाही तर मुलींचे जगणे दुर्भर होण्याची वेळ येते. मुलींच्या जन्मावर आळा बसविण्यासाठी तिला आईच्या पोटात असतांनाच संपविण्यात येते. किंवा मुलींना जन्म दिला म्हणून त्या मातेसच अनेक यातनांना सामोरे जावे लागते. जर शासनाने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडक कायद्यांचा अवलंब केला व कठोरातले कठोर शासन क्रुरकर्म्यांना दिले तर काही प्रमाणात तरी महिलांच्या शोषणावर आळा बसेल.  

    आधुनिकीकरणाच्या भरवश्यावर होणारा विकास पुढच्या दिशेने पावले टाकणारा आहे. त्याचे स्वरुप काळान्वये आणखी आणखी मोठे होत जाईल. परंतू त्याचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा मनुष्यजातीला दु:खात लोटणार्‍या गरीबी, माणसा माणसात निर्माण झालेली भिन्नता, रोजगारीच्या समस्या तसेच समाजात महिलांचे स्थान व त्यांची सुरक्षा ह्या समस्या नजरेआड न करता त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. तसेच त्यावर जाणीवपूर्वक कायापालट करणार्‍या उपाययोजना अंमलात आणण्यात येतील.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *