
विश्वास ही आपल्या अंतकरणातील अशी संपत्ती आहे. जीचे आपल्या माध्यमातून कोणास पाठबळ देणे म्हणजे त्याच्यात प्राण फुंकण्यासारखे असते. परंतू हे जग मात्र शिष्टाचारांच्या व कठोर नियमांच्या धारधार शस्त्रांच्या टोकावर एकमेकांशी व्यवहार करत असते. औपचारीकतेच्या निष्ठूर शब्दांनी कोमल हृदयाची चाळण करत असते. कारण आपण आपसातील विश्वासाची एक अदृश्य परंतू बळकट तार अक्षरशा नष्ट करून टाकलेली आहे. त्यामुळे विश्वास ह्या शब्दावरच आपला आता विश्वास बसत नाही. कोणातील चांगुलपणा हा आपल्यासाठी विश्वासार्य राहिलेला नाही. त्यालाही वेगवेगळ्या तपासण्यांमधून व कसोट्यांमधून जावे लागते. इतके आपण विश्वासाला चुरचूर करून टाकले आहे. खरेतर विश्वास ही देण्याची गोष्ट नाही. तर तो आपल्या उपस्थितीतून आपल्या डोळ्यांमधून आपला मदतीचा हात पुढे करून तसेच दोन आपुलकीपूर्ण शब्दांनी कोणाच्या हृदयातील वेदनांना हळूवार स्पर्श करून संयमाने जागवावा लागतो. कारण आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात आलेल्या कटू अनुभवांवरून स्वत:च्या मनात जो अविश्वासाचा दणकट खांब उभा केलेला आहे. त्याला कोसळवीणे वाटते तितके सोपे काम नाही. तेव्हा कोणात विश्वास जागवीने हे एकप्रकारे सर्वश्रेष्ठ दान आहे. ज्यामुळे हारलेल्या मनास नव्याने उभारी येते. आशा उत्पन्न होतात. ज्यामधून सकारात्मक उर्जा सर्वत्र पसरू लागते. तसेच आपल्या आयुष्यात आपल्याला असे चमत्कार पहावयास मिळतात. ज्यांचा आपण स्वप्नातही विचार केलेला नसतो. म्हणून आपण इतरांच्या जीवनात विश्वासाचे दान वितरीत करत राहण्याचा स्वत:शी विडा उचलला पाहिजे.
आज वेळेच्या अभावामुळे आपण कोणतीही आणि कितीही महत्वपूर्ण गोष्ट केवळ एक काम म्हणून उरकत असतो. कारण आता जग फारच जलद झालेले आहे. तरीही माणुसकी ही विचारपूर्वक व वेळ घेवून घडून येणारी प्रक्रिया आहे. परंतू त्याकरीता देखील कोणीही क्षणभर थांबण्याची तयारी दाखवत नाही. कारण स्वार्थाने बरबटलेले आपले मन पूर्णपणे अविवेकी झालेले असते. त्यामुळे आपले भले करण्याच्या नादात इतरांना आपल्यामुळे किती झळा पोहचत आहेत ह्याची शहानिशा करणे देखील आपल्याला गरजेचे वाटत नाही. इथूनच अविश्वासाचे बीज अगदी नकळतपणे आपल्या अंतर्मनात पेरले जाते. ज्यामुळे माणसा माणसा मधील संबंध औपचारिकतापूर्ण होत जातात. कारण मनात उत्पन्न झालेल्या राग द्वेष व इर्षेच्या भावना आतल्या आत धगधगत असतात. तरीही सामाजिक दबावामुळे डोक्यावर बर्फ व ओठांवर साखर ठेवून इच्छा नसतांना एकमेकांशी शांततापूर्ण व्यवहार करावा लागतो. अशाप्रकारे आता कोणात विश्वास जागविण्यासाठी राखावयाचा संयम हा वरवर व्यावहारिक सलोख्याचे संबंध बनविण्यासाठी दाखवावा लागतो. म्हणूनच विश्वासाचे तर आता जगच उरलेले नाही असे शब्द अगदी सहजच आपल्या तोंडून बाहेर पडत असतात. तसेच त्या गोष्टीचा स्वीकार करूनच आपण इतरांसाठी आपली मतं बनवत जातो. त्याचप्रमाणे आपल्या व्यवहारातूनही तशाच प्रकारचे प्रदर्शन करतो. अशारितीने आपल्यापैकी प्रत्येकजण विश्वासाला जपण्यास नाही, त्याला जागवीन्यास नाही तर तोडण्यास निघालेला आहे.
जेव्हा एखाद्यावर आपातकालीन संकट अचानकपणे येते. किंवा एकाएकी त्याला गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागते. तेव्हा बरेचदा माणुसकीच्या नात्याने कोणाकडून मदतही मिळणे सुद्धा कठीण होते. परंतू जर मिळालीच तर त्या मदतीची सुद्धा एक मर्यादा असते. त्याशिवाय त्याही क्षणी बरेच जण दोन दिलासा देणारी औपचारिक वाक्ये संकटातून जात असलेल्या व्यक्तीच्या तोंडावर फेकून पुन्हा स्वत:च्या विश्वात परत फिरतात. औपचारिक दृष्टीकोनातून पाहिले तर त्यांचे वर्तन अगदी योग्य आहे. कारण ज्याच्यावर संकट कोसळलेले असते त्यालाच सर्वस्वी त्या संकटातून बाहेर येण्यास झटायचे आहे. हे सर्वांना ठाऊक असते. ह्या झाल्या व्याहारिक जगाच्या मर्यादा. परंतू माणुसकीच्या सभ्यतापूर्ण आचरणास व मनातील दयाभावास मात्र कोणत्याही सीमा नसतात. तेव्हा त्या अनुषंगाने संकटसमयी आपले कोणाबरोबर उभे राहणे हे आपल्याद्वारे केलेले केवळ औपचारिकतेचे प्रदर्शन नसले पाहिजे. कारण त्यावेळी संकटातून जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात अनेक गोष्टींची घालमेल सुरू असते. त्याच्या डोळ्यासमोरून कित्येकदा पुढे येणाऱ्या भयावह काळाचे चित्र जात असते. कित्येकदा तो आपल्याच विचारांनी हतबल होत असतो. त्याक्षणी त्याला एकटेपणा प्रकर्षाने जाणवत असतो. अशावेळी त्याला एका अशा आधाराची प्रकर्षाने आवश्यकता जाणवत असते. जो त्याला सहानुभूतीपूर्ण नाहीतर करुणामयी वाटावा. परंतू यदाकदाचित सुदैवाने तो आधार त्याला मिळालाच तर त्याची कितीही वाईट परिस्थिती असली तरी त्यावर विश्वास ठेवणे त्याच्याकरीता कठीण असते. कारण कोणी आपल्याकरीता इतके का करेल अशा शंका सर्वप्रथम त्याच्या मनात त्यावेळी उद्भवतात. तेव्हा तो त्या आधाराची त्याला त्याक्षणी आवश्यकता असूनही औपचारिक पद्धतीने तिला नाकारतो. कारण कोणाचे माणुसकीपूर्ण वर्तन त्याला आपल्या व्यक्तीगत आयुष्यात विनाकारण नाक खुपसणे वाटू लागते. अशाप्रकारे आज माणुसकीची व एकमेकांवरच्या विश्वासाची दयनीय अवस्था झालेली आहे. भावनिक मदत कोणास करणे व कोणाकडून घेणे आपल्यासाठी फारच कठीण झालेले आहे. उलट व्याहारिक संबंधच आपल्याला अधिक सुमधुर वाटत असतात. म्हणूनच जग औपचारिकतेने कोरडे पडत चाललेले आहे.
पूर्वी आपल्या स्वकर्तुत्वाने प्रेरित करून आपल्या पेक्षा लहानांमध्ये किंवा आपल्या जोडीदारामध्ये विश्वास जागविला जात असे. त्यांना त्यांच्यातील क्षमतांची जाणीव करून दिली जात असे. ज्यामधून स्त्री शिक्षणाचा प्रसार संस्कारांचे बाळकडू स्त्रियांचा सम्मान ह्या महत्वपूर्ण गोष्टी थेट पुढच्या पिढीच्या मानसिकतेवर बिम्बावील्या जात असत. ह्याचा अर्थ हा होतो कि विश्वासाचे एक बीज पेरून पिढ्या न पिढ्या ते पीक आपल्या पदरात पाडून घेण्याकरीता विचाररूपी जमिनीची वारंवार मशागत करत असत. परंतू आता मात्र स्वकर्तुत्वाने व्यक्तीमध्ये अशाप्रकारच्या विनम्रतेचा नाहीतर अहंकाराचा जन्म होतो. जो इतरांना विश्वासाचे पाठबळ देत नाहीतर आपल्यापेक्षा कमकुवत असल्याची जाणीव करून देतो. ज्यामुळे सहाजिकच आपसात तुलना द्वेष मत्सराचे साम्राज्य पसरते. जे माणसातील माणुसकीलाच धोका निर्माण करत असते. कारण त्यात सर्वसमावेशक विचार नसतात. आपल्याद्वारे निरपेक्ष योगदानाची भावना नसते. सेवाभाव सुद्धा नसतो. केवळ आपल्या नावापुढे लागलेल्या भरमसाठ उपाध्यांचे मिरवण्याच्या दृष्टीकोनातून प्रदर्शन मांडलेले असते. जे केवळ आपल्याच नावलौकिकात भर घालते. तसेच समाजात आपल्याला दर्जा प्राप्त करून देते. परंतू आपण आपल्या जगण्याने इतरांमध्ये विश्वास तेव्हाच निर्माण करू शकतो जेव्हा आपण स्वत: स्वत:च्याच नजरेत उठतो. आपले व्यक्तीमत्व आपले कर्तुत्व आपले जीवन पोकळ प्रतिष्ठेने नाहीतर आपल्या पेशाद्वारे सेवा देण्याच्या विचारांनी समृद्ध होते. आपण आपल्या स्वार्था पलीकडे इतरांचा विचार करू शकतो. आपल्याला आपल्या जन्म घेण्यामागचा अर्थ उमगतो. अशाप्रकारे जेव्हा आपण मीपणाच्या अविर्भावातून बाहेर येवून स्वत:ला ह्या सृष्टीचा एक सूक्ष्म कण समजू लागतो. तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या असण्याची जाणीव होते. त्याचप्रमाणे ह्या जाणिवेतूनच आपण विश्वासाचे दान इतरांच्या झोळीत टाकू शकतो.
एकमेकांवर विसंबून असणे हे सुद्धा आपल्याला आपण ह्या भव्य सृष्टीचा एक भाग असल्याची जाणीव करून देत असते. कारण निसर्गातील प्रत्येक घटक हा एकमेकास पूरक असतो. त्यातूनही आपसात विश्वास निर्माण होतो. परंतू आपण मात्र विसंबून असणाऱ्यांना कमकुवत समजून मोकळे होत असतो. तसेच त्यांच्यावर आपला मालकी हक्क गाजवून त्यांना आपल्या वर्चस्वाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतो. ज्यात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसलेल्या स्त्रिया, लहान मुले , समाजातील दीनदुबळे बंधू भगिनी, निम्न जातीजमातीतील लोक तसेच वृद्धमंडळी ह्या सर्वांचा समावेश असतो. समाजातील हा स्तर कायम कोणाच्या ना कोणाच्या अहंकारास बळी पडत आलेला असतो. कारण एखाद्याने आपल्या कामातून अर्थार्जन न करणे हे त्याला त्याने महापाप केल्याप्रमाणे दाखवून दिले जाते. जणूकाही ह्या जगात त्याहून पुण्याचे अन्य कोणते काम नाही. आपण कोणत्याही कामाची त्यामधून मिळणाऱ्या पैस्याच्या स्वरूपातील मोबदल्यावरून पात्रता ठरविलेली असते. परंतू असे करणे म्हणजे एकप्रकारे भेदभाव निर्माण करण्यासारखे आहे. कारण आपल्या पेशाद्वारे प्रामाणिकपणे सेवा प्रदान करणे हे देखील सर्वात महत्वाचे असते. मग ते स्त्रियांचे घरातील योगदान असो, घरात वृद्ध मंडळींचे एका ठिकाणी बसून असणे असो, घरात लहान मुलांचा निरागस वावर असो, समाजात खालच्या दर्ज्याची कामे करणारे बांधव असो ह्या सर्वांचे केवळ अस्तित्वही अतुलनीय आहे. ज्याचा अर्थार्जनाशी तिळमात्रही संबंध नाही. कारण त्यांच्या निरपेक्ष योगदानाने ते कित्येकांना त्यांचा आधारस्तंभ असल्याची जाणीव करून देत असतात. तेव्हा जर कोणी आपल्यावर विसंबून आहे तर आपली त्याच्याप्रती जबाबदारी आहे. जी आपल्याला जीवनात कायम प्रगती करण्यास प्रेरित करत असते. तरीही स्वावलंबन कधीही उत्तमच असते. परंतू कोणाचे विश्वासाने आपल्यावर विसंबून असणे हे देखील आपल्यातील छुप्या क्षमता व शक्यतांना उजाळा देण्यास सबळ कारण ठरू शकते. तेव्हा कोणीही ह्या जगात विनाकारण आलेला नाही. प्रत्येकाच्या असण्यामागे काही ना काही हेतू हा असतोच. ह्या विश्वासाने आपण जगाकडे पाहिले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांच्याप्रती कर्तव्यांचे पालन करून विश्वास प्रस्थापित केला पाहिजे.
आजच्या युगात कोणाचा विश्वास कमविणे हे अर्थार्जनापेक्षा जास्त कठीण झाले आहे. कारण आपल्या आसपास आपण जी अमानवीय उदाहरणे बघत असतो. त्याचा आपल्या मानसिकतेवर इतका नकारात्मक प्रभाव पडतो कि अविश्वासाने आपल्या मनात अर्थातच घर केलेले आहे. परंतू विश्वसनीय गोष्टी आपण इतरांमध्ये शोधण्यापेक्षा त्यांची सुरवात स्वत:पासून केली पाहिजे. सुरवातीला नाही बसणार विश्वास आपल्यावरही कोणाचा. परंतू आपण आपल्या विचारांवर ठाम राहिले पाहिजे. तेव्हाच अविश्वासाचे सावट दूर होवून विश्वासाची सोनेरी किरणे प्रत्येकाच्या मनामनात प्रतीबिम्बीत होतील. परंतू त्याची सुरवात मात्र स्वत:पासूनच झाली पाहिजे.
- करुणामयी हृदयाचा व्यक्ती आपल्या पेशातून विश्वास निर्माण करतो.
पेशा हा कोणासाठीही मुख्य म्हणजे अर्थार्जनाचे साधन असतो. कारण अर्थार्जनाशिवाय आपले ह्या जगात जीवन व्यतीत करणे अशक्य असते. तरीही काही पेशे हे अर्थार्जनाच्या मुख्य हेतू व्यतिरीक्त आपल्याला मानसिक समाधानही देत असतात. जसे डॉक्टर व मानसोपचारतज्ज्ञ हे लोकांवर उपचार करण्याच्या त्यांच्या कौशल्यामार्फत कित्येकांना शारीरिक व मानसिक गंभीर आजारातून मुक्तता देत असतात. त्यातही ते जर करुणामयी हृदयाचे धनी असले तर त्रासातून जात असलेल्या रुग्णास ते देवाप्रमाणे भासतात. कारण त्यांच्या उपचारातून रुग्ण रोग मुक्तच होत नाहीतर त्यांच्या सहवासातून त्याला एक सकारात्मक उर्जा देखील मिळत असते. ज्यामुळे रुग्णांच्या अंतर्मनास सांत्वना व शांततेचा लाभ होतो. जे त्यांच्याकरीता दिलासादायक असते. कारण ते आपल्या मनात साचलेले दु:ख व पराकोटीच्या वेदना त्या पेशेवरांसमोर मोठ्या विश्वासाने मोकळ्या करू शकतात. तसेच त्यांच्या विश्वासाला ते देखील भरभरून प्रतिसाद देत असतात. अशाप्रकारे त्यांच्या दरम्यान जो विश्वास प्रस्थापित होत असतो तो माणुसकीचे प्रमाण देतो.
2. आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्यांना सेवेचे स्वरूप देवून आपण विश्वास प्रस्थापित करतो.
समाजात काही पेशांना अत्यंत गृहीत धरले जाते. कारण त्यांच्याशी निगडीत कामांना दर्जेदार समजले जात नाही. तसेच महत्वाचेही मानले जात नाही. ज्यात गृहिणींची घराशी निगडीत कामे असतात. ज्यांना आर्थिक स्वरूपात मोबदला नसतो. त्याचप्रमाणे कचरा उचलण्याचा पेशा कित्येकांना फारच निम्न स्तराचा वाटत असतो. परंतू एका प्रामाणिक गृहिणीस आपल्या माणसांच्या वेळेचे महत्व उत्तमरीतीने ठाऊक असते. तिला त्यांच्या आरोग्यात आलेले चढउतार न सांगताही कळतात. त्यांच्या मनाची घालमेल ती स्वत: अनुभवू शकते. अशाप्रकारे एक गृहिणी घरातील माणसांचा मानसिक आधारस्तंभ असते. तसेच कचरा उचलणाऱ्या माणसांना बघून आपल्या कितीही घाण वाटत असले. तरी त्यांच्या शिवाय आपल्या आसपासचा परिसर आपण स्वच्छ ठेवू शकत नाही. त्याचप्रमाणे घाणीच्या साम्राज्यात आपण आपले सणसमारंभ देखील साजरे करू शकत नाही. तेव्हा हे दोन्ही पेशे आपल्या कर्तव्यांना सेवेचे स्वरूप देवून सर्वांच्या मनात एक विश्वास निर्माण करत असतात. म्हणून त्यांना सम्मान देवून आपणही त्यांच्या विश्वासाचे ऋण फेडले पाहिजे.
3. आपल्या माणुसकीपूर्ण वर्तनातून आपण विश्वास प्रस्थापित करतो
कोणाच्या परिस्थितीचा गैरफायदा उचलणे हे अक्षरशा अमानवीय कृत्य आहे. परंतू परिस्थितीची गरज ओळखून वर्तन करणे हे मात्र कोणाच्या विश्वासास पात्र ठरण्यासारखे आहे. एका आजीबाईस रात्रीच्या काळोखात तिचा थांबा आल्यावर रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या तिच्या गावात बसच्या कंडक्टरने तिचा हात धरून सुखरूपपणे घरापर्यंत सोडले. तसेच एका वृद्ध स्त्रीने प्रवासात तिच्या शेजारी बसलेल्या इसमास तो नकोनको म्हणत असतांना जवळ असलेल्या शिदोरीतील चटणी भाकरी प्रेमाने खाऊ घातली. ही दोन्ही उदाहरणे आपल्याला जगात माणुसकी जीवित असल्याचा विश्वास देतात. परंतू एका सत्तर वर्षीय आपल्या आईच्या वयाच्या महिलेवर एका तीसीतील तरुणाने दुष्कृत्य करून तिला जीवानिशी संपविले. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना एका शहराने प्रत्यक्षात पाहिली. तर काहीजण रस्त्यावर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या अंगावरचे मौल्यवान दागिने लंपास करतांना दिसतात. अशा घटना मात्र आपल्या मनात भीती उत्पन्न करतात. कारण विश्वास व अविश्वास ह्या दोन विरोधाभासात आज आपले जीवन पूर्णपणे अडकलेले आहे. तेव्हा निदान आपल्या मार्फत तरी आपण माणुसकीपूर्ण वर्तन करून माणसाचा माणसावरचा विश्वास टिकवून ठेवला पाहिजे.
4. आपल्या हृदयात दयाभाव जागृत करून आपण विश्वास प्रस्थापित करतो
कुत्रा दररोज घरासमोर भुंकतो म्हणून त्याला खाद्य पदार्थातून विष टाकून कायमचे संपविले. मजा म्हणून कुत्र्याच्या शेपटीला फटाके बांधून त्यांना आग लावली. अशा हृदयविदारक घटना आपण नियमितपणे ऐकतो किंवा वृत्तपत्रांमधून वाचत असतो. किंवा आजच्या युगातील अत्यंत लहान मुले जी केवळ उच्च जीवनशैलीचा भाग म्हणून हातात सतत आयप्याड किंवा फोन घेवून असतात. तसेच अगदी सुरेख इंग्रजी भाषेत बोलतात. परंतू त्यांच्या कोवळ्या मनात मात्र प्राण्यांप्रती दयाभाव दिसून येत नाही. I DONT LIKE DOG असे म्हणून ते त्या मुक्या प्राण्यांवर हसतात. कारण त्यांच्या पालकांनी त्यांना अमाप भौतिक सुखसुविधा तर प्रदान कलेली असते. प्राण्यांचे सजीव जग मात्र केवळ पुस्तकांच्या निर्जीव पानांवरच दाखविलेले असते. तसेच एवढ्या लहान वयात अशाप्रकारे डिजिटल साधनांचा वापर मुलांकरीता भिन्न भन्न दृष्टीकोनातून अपायकारक ठरू शकतो. परंतू त्या निरागस वयात त्यांच्या अंतर्मनात जागृत झालेला दयाभाव मात्र भविष्यात एका सहृदय व माणुसकीने परिपूर्ण समाजाची पायाभरणी करण्यास नक्कीच मदत करू शकतो. त्याचप्रमाणे प्राण्यांच्या जगात माणसांसाठी विश्वास प्रस्थापित होवू शकतो. जो आज दुर्दैवाने आपण गमावलेला आहे. तेव्हा आपल्या घरातील लहान मुलांच्या मनात प्राण्यांप्रती व निसर्गाप्रती दयाभाव जागृत करण्यास पालकांनी कसोसीने झटले पाहिजे.
जेव्हा एक फुलपाखरू एका झाडाच्या कोवळ्या फांदीवर येवून बसते. तेव्हा त्याला त्या फांदीपेक्षा जास्त आपल्या चिमुकल्या पंखातील उडण्याच्या क्षमतेवर जास्त विश्वास असतो. तसेच आपणही सर्वप्रथम स्वत:वरचा विश्वास बळकट केला पाहिजे. स्वत:ला जिंकले पाहिजे. तेव्हाच आपण आपल्या आसपास पसरलेल्या अविश्वासाच्या सावटावर मात करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून सर्वत्र विश्वास प्रस्थापित करू शकतो. आज आपसातील विश्वासाच्या अभावामुळेच माणसे एकमेकांपासून दुरावत चालली आहेत. तसेच त्यांच्यातील आपुलकी जिव्हाळा मैत्रीपूर्ण बंध ह्या गोष्टी लोप पावत आहेत. तेव्हा आता विश्वासाचे पिक भरघोष यावे असे वाटत असेल तर सर्वप्रथम प्रत्येकाच्या विचारात व मनात त्याचे बीज सखोल पेरावे लागेल.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)