
आपले आयुष्य क्षणा क्षणांनी पुढे जात असते. कारण वेळेला गती आहे. वेळेला कदापि आपल्या मुठीत आणता येत नाही. एकदा हातून निसटलेला क्षण कधीकधी आपली इच्छा असूनही पुन्हा जगता येत नाही. त्याचबरोबर कोणत्या क्षणाच्या पोटात आपल्यासाठी काय साठवीलेले आहे हेही आपल्याला ठाऊक नसते. म्हणूनच प्रत्येक क्षणांची गम्मत अनुभवणे गरजेचे असते. प्रत्येक क्षण हा तठस्थ असतो. परंतू आपण त्यात आपल्या भावना गुंतवून त्या क्षणाला सुख दु:खाचे नाव देतो. कारण त्या क्षणाने कधी आपल्यापासून काही हिरावले असते. तर कधी भरभरून दिले असते. म्हणूनच प्रत्येक क्षणापासून जीवनाचा धडा गिरवणे आवश्यक असते. तसेच आपल्या जीवनातील एकूण एका क्षणाचे आपल्याला महत्व असले पाहिजे. परंतू आपण मात्र आपल्या जीवनात जास्तीत जास्त पैसा कसा मिळवता येईल. तसेच समाजात आपले स्थान कसे निर्माण करता येईल. ह्यासाठी कायम प्रयत्नशील असतो. कारण भौतिक श्रीमंती शिवाय समाजात आपल्याला मानमरातब मिळत नाही. पैस्याशिवाय आपण कोणतेही सुख भोगू शकत नाही. आपली जीवनशैली उंचावू शकत नाही. असा आपला समज आहे. त्यामुळे आपण पैस्याला आपले सर्वस्व समजून तो जास्त प्रमाणात व वेगवेगळ्या मार्गांनी कमविता यावा ह्यासाठी आपला बहुमूल्य वेळ त्यात गुंतवित असतो.
जीवन जगण्यास पैसा हा महत्वाचाच आहे. त्याचप्रमाणे जसजसा आपल्या जीवनशैलीचा स्तर उंचावत जातो. तसेच तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे झालेले सुवीधाजन्य व आरामदायक जीवन जगण्यासाठी असलेल्या आधुनिक उपकरणांचा मोह आपल्याला आवरता येत नाही. अशाप्रकारे आपल्या ह्या वाढत्या गरजाच आपल्याला पैस्याची अतोनात किंमत करण्यास भाग पाडतात. त्यामुळेच आपल्या जीवनात पैस्याचे महत्व इतके वाढले आहे कि तो कमविण्याच्या मार्गात जो कोणी आड येईल त्याची आपण पर्वा करत नाही. त्यासाठी आपण आपले आरोग्य, आपल्या माणसांसाठी असलेला आपला गुणवत्तापूर्ण वेळ आणि आपल्या जीवनातील बहुमूल्य क्षणांचे मोल आपण पणास लावतो. आपण एखाद्या यंत्राप्रमाणे दिवस रात्र एक करून पैसे कमविण्यासाठी कठोर परिश्रम घेत असतो. त्यासाठी आपण जी काही पावलं उचलतो त्यामागे केवळ जास्तीत जास्त पैसे कमवीन्याचाच हेतू असतो.
आपल्या घरात लहान लहान चिमुकल्यांचा जन्म होतो. त्यांच्या लहानपणीचा लाड पुरविण्याचा, कोड-कौतुक करण्याचा काळ आपल्या डोळयात साठवीन्यासाठीही आपल्यापाशी पुरेसा वेळ नसतो. आपली इच्छा असूनही त्यासाठी आपण अपुरे पडतो. कारण पैसे कमविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आपल्या खांदयांवर असते. एकीकडे आपल्याच मुलांचे ते मोलाचे क्षण जे पुन्हा कधीही आपल्याला अनुभवता येणार नाहीत. तर दुसरीकडे त्यांच्याच सुखी व सुरक्षित जीवनाखातर पैसे कमविण्याची आपली जबाबदारी ह्यापैकी आपल्याला फक्त एकाचीच निवड करावी लागते. मुलांना मोठे करत असतांना तसेच त्यांना शिक्षण देत असतांनाही आपण केवळ त्यांच्या भविष्यातील उत्तम कारकिर्दीचे ध्येय आपल्या मनात ठेवतो. जेणेकरून तेही त्यांच्या जीवनात उच्च स्तरीय जीवन जगण्यासाठी जास्तीत जास्त पैसे कमवू शकतील. त्यामुळे सर्वप्रथम त्यांच्या मनावर मोठ्या मानधनाची नोकरी मिळविण्याचे ध्येय बिम्बवीण्यात येते. अशाप्रकारे पैस्याच्या मोहामागे धावून आपणच आपल्या मुलांची नोकरी करण्याची मानसिकता घडवीत असतो. आणि आपणच त्यांना प्रवाहाचा मार्गही दाखवितो.
अशाप्रकारे आज आपण आपल्याच मुलांना एखाद्या यंत्राप्रमाणे घडवत आहोत. परंतू जर त्यांना आपण त्यांच्या लहानपणीच ह्या सीमित जीवनाचा अर्थ समजावून सांगितला तर त्यांचा जीवनाप्रती दृष्टीकोन निराळा राहू शकतो. यदाकदाचित त्यांना पैस्याच्या तुलनेत वेळेचे महत्व कळू शकते. ते त्यांच्या वर्तमान क्षणांना जगण्यास आतुर होवू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या क्षणा क्षणांना अर्थपूर्ण बनविण्यास धडपडू शकतात. तसेच ते आपल्या जीवनात केवळ पैसा कमवीन्याचा व स्वार्थी जीवन जगण्याचा हेतू ठेवणार नाहीत. तर जीवनाचा सार कशात लपला आहे ह्याचा शोध लावू शकतात. तेव्हा आता मुलांना केवळ प्रवाहाचा भाग बनवून चालणार नाही. तर त्यांच्या बरोबर उत्तम वेळ घालवून, त्यांच्याशी संवाद साधून, त्यांची मन मोकळी करून, त्यांचा विविध विषयातील रस जाणून घेवून आपण त्यांच्यातील विशेषातांची प्रशंसा केली पाहिजे. परंतू ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्यापाशी वेळ असला पाहिजे. आपण जर असेच पैसा कमविण्याचे यंत्र बनून जगत राहिलो तर आपल्याला आपल्या बहुमूल्य वेळेचे महत्व कधीही कळणार नाही. आपण आपल्या मुलांनाही तोच मार्ग दाखवू आणि अशाप्रकारे पिढ्या न पिढ्या मध्ये त्याच गोष्टींची पुनरावृत्ती होत राहील.
आपल्याला कोणत्याही गोष्टीचे महत्व तेव्हा कळते जेव्हा त्याचा संबंध पैस्याशी जोडला जातो. म्हणूनच जर आपण वेळेला पैसा समजलो तर गुणवत्तापूर्ण वेळेची किंमत आपल्याला कळेल. कधीही आपल्याकडून वेळेचा अपव्यय होणार नाही ह्याची दक्षता आपण बाळगू. आपला वेळ विनाकारण कोठेही खर्च होणार नाही ह्यासाठी प्रयत्नशील राहू. महत्वपूर्ण कामात त्याची गुंतवणूक करून त्याला सत्कारणी लावू. प्रत्येक क्षण हा मौल्यवान असून तो वाळूच्या कनांप्रमाणे आपल्या हातून निसटत चालला आहे. तसेच त्याचे खरे रहस्य तर ह्यात आहे कि त्या क्षणात काय होणार आहे ह्याची आपल्याला पूर्वकल्पनाही नसते. आपला कोणाला भेटण्याचा व कोणाशी बोलण्याचा कोणता क्षण शेवटचा ठरेल ह्याचीही आपल्याला जाणीव नसते. परंतू त्या बहुमूल्य क्षणास आपण एखाद्या निर्थक कामासाठी टाळले तर पुढे कितीही पश्चाताप केला तरी पुन्हा तो क्षण परत येवू शकत नाही. आणि गमावलेली व्यक्तीही आपल्याला पुन्हा भेटू शकत नाही. कारण जीवन सीमित आहे. शरीर रूपात कोणीही आपल्याबरोबर कायमस्वरूपी राहत नाही. एक असे वळण येते जेव्हा ती व्यक्ती आपल्याबरोबर चालत असूनही आपण तिला बघू शकत नाही. ह्या शाश्वत सत्याचा सखोल अर्थ आपण समजू शकलो तर जीवनात वेळेचे महत्व आपल्याला नक्की कळेल.
वेळेचे मुल्य आपण जाणले तर आपले आचरण सभ्यतेच्या मार्गावर जाईल. ज्यात प्रेम, दया, सेवा माणुसकी ह्या अंतर्मनातील विशेषतांना महत्वाचे स्थान असेल. कारण आज आपण अशी संपत्ती गोळा करण्याच्या कामात इतके व्यस्त आहोत कि ज्यामुळे आपल्यात केवळ अहंकार वाढत चालला आहे. ज्यामुळे माणसा माणसात गरीब-श्रीमंती, चांगला-वाईट असा भेदभाव निर्माण झाला आहे. ज्यामुळे माणुसकी लोप पावत चालली आहे. ज्यामुळे माणसांच्या पेशावरून त्यांची गणना केली जात आहे. ज्यामुळे नाते संबंधांमध्ये औपचारिकता वाढीस लागली आहे. परंतू आपले सभ्यतेचे आचरण माणसाच्या मनात ओलावा टिकवून ठेवते. तिरस्कार, द्वेष मत्सराच्या विषारी वेलींना समूळ नष्ट करते आणि माणुसकीला जिवंत ठेवते. त्यामुळे निसर्गातील जीवनदायी घटकांप्रमाणे, विशाल पर्वतरांगांप्रमाणे, हिरव्यागार राना -वनांप्रमाणे, अथांग समुद्राप्रमाणे हे जगही सुंदर होते.
जीवनात अवाजवी अपेक्षा, व्यक्तीगत महत्वाकांक्षा, प्रतिस्पर्धा तुलनात्मक भाव हे आपल्यातील अहंकारास खतपाणी घालतात. कारण त्यामुळे आपली अनुलम्बीत वाढ होते. परंतू तरीही भावनिक बुद्धीमत्तेशिवाय आपण माणुसकीचे धडे गिरवू शकत नाही. जे क्षणोक्षणी आपल्याला आपल्या आचरणा विषयी जागृक ठेवतात. आणि हे तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण वेळेला महत्व देतो. जेव्हा आपल्याला वेळेचे महत्व कळते तेव्हा आपण त्या क्षणांचा किंवा त्या वयाचा मजा घेत नाही. तर आंतरिक जागरूकतेने त्या क्षणांना आनंदी बनवितो. आणि त्या आनंदात आपल्यासोबत इतरही आनंदी होतात. परंतू ही संधी पुन्हा मिळणार नाही हा विचार करून संधीचा मजा घेणे म्हणजे नकारात्मक मार्गाचा अवलंब करून त्या क्षणाला आपल्या व्यक्तीगत स्वार्थी आनंदासाठी वापरणे. ज्याचे दुष्परिणाम लवकरच आपल्यासमोर येतात. कारण त्यात मादक पदार्थांचे सेवन करून नशा करण्याचा प्रकार असतो. सोशल मिडीयावर विनाकारण वेळ वाया घालविणे असते. शारीरिक आकर्षानावर आधारीत प्रेम प्रकरणे असतात. पैस्याचा अपव्यय करणे असते. अशाप्रकारे आपला वेळ घालविल्याने क्षणाचा आनंद तर मिळतो परंतू काही वर्षातच आपण मानसिकरीत्या पूर्णपणे कोलमडून जातो. कारण आपल्याला स्वत: बद्दल अभिमान वाटत नाही. आपल्याला मिळालेल्या स्वातन्त्र्याचा आपण असा उपभोग घेतो कि ते स्वातंत्र्यच पुढे आपल्या पायातील बेडी बनते. त्यामुळे आपण आपल्या वयाचा कोणताही काळ आनंदात घालवू शकत नाही. कारण एका वयात केलेल्या चुकांचे दुष्परिणाम आपल्याला समोरच्या वयात सहन करावे लागतात.
आपल्या वेळेचा सदुपयोग करणे ही आपल्या जीवनातील सर्वात किमती गुंतवणूक असते. आपल्या घरातील लहान मुले ज्यांचे पुढे एक स्वतंत्र व्यक्तीमत्व घडणार आहे. तेव्हा त्यांचे लहानपणापासून व्यक्तीमत्व एखाद्या सुंदर फुलाप्रमाणे खुलत जाईल हा विचार आपण त्यांना मोठे करत असतांना केला गेला पाहिजे. त्यांना उत्तम सवयी लागाव्यात ह्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे. कारण बालवय हे जास्तीत जास्त गोष्टी आत्मसात करण्याचा काळ असतो. आणि सवयीच आपल्या जीवनाला आकार देत असतात. आपल्या जीवनात वेळ महत्वाची आहे. तसेच त्यामुळे वेळेची शिस्त पाळणेही महत्वाचे आहे हे लहानवयातच मुलांना कळले तर त्यापेक्षा उत्तम संस्कार आपल्या मुलांसाठी आणखी कोणते असू शकतात. अशाप्रकारे ज्याने वेळेचे महत्व जाणले त्याच्या पाशी भरपूर वेळ असतो. परंतू जो आयुष्यभर पैस्याला महत्व देत राहिला त्याच्यापाशी नेहमी पैस्यासोबत वेळेचीही कमतरता असते. त्यामुळे तो आपल्या वेळेस कोणत्याही महान हेतू पुरस्सर गुंतवू शकत नाही. तसेच आपल्या जगण्याने समाधानीही होवू शकत नाही. म्हणूनच वेळ मौल्यवान आहे कि पैसा हे ठरविण्याची वेळ आता आली आहे.
1 . आपल्या वेळेस शिस्त लावावी.
आपला जीवनकाळ सीमित असतो. त्यात जर आपल्याला आपल्या मनासारखे आयुष्य घडवायचे असेल तर सर्वप्रथम त्याची सुरवात आपण आपल्या वेळेस कडक शिस्त लावून केली पाहिजे. कारण आपल्याला किती आयुष्य लाभले आहे हे आपल्याला ठाऊक नसते. परंतू आपल्या वर्तमान क्षणांचा आपल्याला हवा तसा उपयोग करून घेणे हे मात्र सर्वस्वी आपल्याच हातात असते. त्या क्षणांना योग्य ठिकाणी गुंतवून आयुष्य सत्कारणी लावायचे कि त्यांचा दुरूपयोग करून आयुष्य वाया घालवायचे हे आपल्या व्यतिरीक्त अन्य कोणीही ठरवू शकत नाही. बरेच लोक आयुष्यात मोठ मोठी ध्येय ठरवितात. परंतू त्यासाठी त्यांच्या कडे कोणत्याही योजनांची आखणी केलेली नसते. तसेच आपला वेळ कोठे विनाकारण वाया जातोय ह्याचीही त्यांना पर्वा नसते. अशी ध्येय म्हणजे केवळ हवेत मारलेल्या पोकळ गोष्टी असतात. कारण ज्याचे ध्येय जेवढे विशाल ती व्यक्ती त्या ध्येयाप्रती तेवढी एकाग्र असली पाहिजे. त्याचप्रमाणे सामान्य दिनचर्येपासून, सामान्य गोष्टी करण्यापासून त्या व्यक्तीने स्वत:ला दूर ठेवले पाहिजे. आणि आपला एकूण एक क्षण शिस्तबद्ध पद्धतीने ध्येयाप्रती समर्पित केला पाहिजे. तरच ती व्यक्ती जीवनात महान हेतूस काबीज करू शकते. कारण आपण आपल्या वेळेची किंमत केल्याशिवाय वेळही आपली किंमत करत नाही.
2 . भावनांनी आपल्या वेळेचे सिंचन करावे.
आपण जर गरीब परिस्थितीत किंवा पैस्यांची कमतरता असलेल्या कुटुंबात लहानाचे मोठे झालो. तर त्यामधून पैसा कमाविण्यासाठी छोटी मोठी कामे करून हात पाय हलविण्याचा धडा आपण शिकतो. आणि आयुष्यात खूप पैसे कमवून श्रीमंत होण्याचे व आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचे स्वप्न आपण ठरवितो. परंतू आपला केवळ पैसे कमविण्याचा उद्देश असेल तर मात्र आपण एखाद्या यंत्रा प्रमाणे आपल्या आरोग्याची तसेच आपली माणसे आपल्यामुळे आनंदी समाधानी आहेत कि नाही ह्या सर्व गोष्टींची पर्वा न करता आजीवन मेहनत करत असतो. आयुष्याच्या शेवटी मात्र त्याचा विचार करून पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हातात काहीही उरत नाही. म्हणूनच गरीबीचे ते दिवस आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. तसेच ते दिवस बदलवून टाकण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मानसिकतेत बदल आणला पाहिजे. कारण गरीबी आपल्या आयुष्यात नाही तर आपल्या विचारात असते. त्याचबरोबर आपली माणसे जी आपल्या प्रगतीकडे डोळे लावून बसलेली असतात. त्यांच्या त्यामागच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजे. आपल्या जीवनात त्यांची साथ असे पर्यंत त्यांच्या इच्छेखातर जेकाही करता येईल ते आपण करू शकलो पाहिजे. कारण भावनिक ध्येय ठेवून आपण जी प्रगती करतो. त्यामुळे आपल्याला आपल्या माणसांच्या आशीर्वादाचे पाठबळ लाभते. म्हणूनच आपण आपल्या वेळेची किंमत केली पाहिजे.
3 . आपल्या वेळेस निर्मितीक्षम बनवावे.
आपल्याला आपल्या वेळेचे महत्व कळत नाही. कारण त्यासाठी आपल्याला वेळोवेळी पैस्याच्या स्वरूपात किंमत चुकवावी लागत नाही. प्रत्येकास रोज सारखाच वेळ मिळतो. परंतू काही त्याचा सदुपयोग करून त्यास निर्मितीक्षम बनवितात. तर काही त्याचा दुरूपयोग करून त्याचा अपमान करतात. काळ कोणासाठीही थांबत नाही तो कायम गतिमान असतो. आपण त्याचा कसा वापर करतो ह्याचा त्याला काहीही फरक पडत नाही. परंतू आपण जर वेळेचा अपमान केला व त्याला निरर्थक कामात वाया घालविले तर त्याची खूप मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागते. जी पैस्याच्याही तुलनेत खूप जास्त असते. जर आपण आपल्या कुटूम्बास पुरेसा गुणवत्तापूर्ण वेळ देवू शकलो नाही तर आपले कुटूंब आपल्यापासून दुरावते. जर आपण आपल्या जीवनात वेळेला अनुसरून काही करू शकलो नाही तर आपली प्रगती थांबते. आणि जर आपण वेळेत आपल्या जीवनातील महान हेतूचे आकलन करू शकलो नाही तर आपला मनुष्यरूपी जन्म आपण असाच वाया घालवितो. कारण वेळ म्हणजे आपली जागीर नाही. वेळेचे मुल्य जाणून व वेळेला निर्मितीक्षम बनवून वेळेला आपण सत्कारणी लावले नाही. तर वेळ काळ बनून आपल्यावर हावी होते. म्हणून वेळेची किंमत करणे गरजेचे असते.
4 . वेळ हातून निघून जाण्याअगोदर वेळेचे महत्व जाणावे.
आपण आपल्या जीवनाशी इतके संलग्न होतो कि जीवन जगतांना आपण इथे सीमित कालावधी साठीच आहोत ही गोष्ट आपण जाणीवपूर्वक आपल्या मनातून काढून टाकतो. कारण त्या गोष्टीच्या आठवणीने आपले मन विचलीत होते. परंतू जीवनाचा शेवट होण्याला आपण सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. कारण वेळेचे बंधन हे एकप्रकारे आपल्याला प्रेरणा देण्याचेच कार्य करत असते. म्हणूनच आपल्या ध्येयास तारखेमध्ये निश्चित करून आपण आपली कार्यक्षमताच वाढवितो. परिक्षेत प्रश्नपत्रिका सोडवितांना वेळेचे बंधन लावल्यामुळे आपल्या लिखाणास वेग येतो. आपल्या जीवनाला वयाच्या स्वरूपात वेळेचे बंधन असल्याने आपल्या वयाचा प्रत्येक टप्पा निश्चित कार्यासाठी उपयोगात आणावा लागतो. अशाप्रकारे वेळेचा कधीही अंत होत नसतो परंतू आपल्या आयुष्याला मात्र सृष्टीने सीमा आखल्या आहेत. त्या सीमा संपण्याअगोदर आपल्याला आपले आयुष्य अर्थपूर्ण बनविले पाहिजे. वेळ हातून निघून जाण्याअगोदर वेळ किती मौल्यवान आहे हे आपल्याला कळलेच पाहिजे.
जेव्हा आपली प्रिय व्यक्ती तिच्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असते. जेव्हा आपल्या बाळाचा जन्म होणार असतो. जेव्हा आपल्याला शिक्षणासाठी, नोकरीनिमित्ताने आपल्या माणसांपासून लांब जावे लागते. जेव्हा आपल्या लाडक्या मुलीची सासरी पाठवणी करण्याची घटिका जवळ येते. अशा सर्व भावनिक प्रसंगी आपल्याला एक एका क्षणाचे महत्व कळते. कारण ह्यापैकी काही प्रसंगी आपण त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो. तर काही प्रसंगी ती वेळ कधीही येवू नये असेच आपल्याला मनापासून वाटत असते. परंतू काळ मात्र तठस्थ राहून पुढे सरसावत असतो. एकीकडे पैसा हा आपल्या जगण्याचे साधन म्हणून उपयोगात येतो. फक्त म्हणून त्याला आपल्या जीवनप्रवासात महत्व असते. परंतू काळाइतका तो बलशाली नसतो. कारण वेळेनुसार आपण जन्मास येतो, वेळेनुसार आपल्यात परिपक्वता येते आणि वेळ येताच आपण मृत्यू पावतो. ज्याची घटिका संपली तो अतोनात पैसा ओतून कितीही प्रयत्न केले तरी क्षणभरही जास्त काळ जिवंत राहत नाही. म्हणूनच वेळ पैस्याच्या तुलनेत जास्त मौल्यवान असतो.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)