
पूर्वीच्या काळात शेती हाच मुख्य व्यवसाय होता. तेव्हा माणसाचे निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते होते. आधुनिकीकरणाची झळही माणसापर्यंत पोहोचली नव्हती. शेती व्यवसायास पोषक हवामानही होते. त्या काळात स्वमालकीचा शेती करण्यायोग्य जमीनीचा तुकडा असणे म्हणजे मोठी गोष्ट असायची. आणि ज्याच्याकडे जेवढी जास्त जमीन असेल तो सावकार किंवा जमीनदार असायचा. समाजात तेव्हा शेतीशी निगडीत सणवार आणी त्यासंबंधीत रुढीपरंपरांना महत्व असायचे. त्या माध्यमातून संस्कृती जपण्यात येत असे. पुढे शेतकर्यांना सरकार दरबारी शेतसारा जमा करण्याची सक्ती करण्यात आली. शेतसारा जमा करणे शक्य झाले नाहीतर शेतकर्यांच्या पोटाचा आधार म्हणजे त्यांच्या जमिनी जप्त करण्यात येवू लागल्या. अशाप्रकारे शेतकर्यावर व शेतीव्यवसायावर उतरती कळा आली. त्यामुळे शेतकर्यांची पुढची पिढी नोकरीच्या शोधात व शिक्षणाच्या निमीत्ताने शहराकडे धाव घेवू लागली. त्याचबरोबर जमिनीचा मालक असल्याची त्यांची मानसिकता नोकराची झाली. खेडी हळूहळू ओस पडू लागली. आणी शहरीकरणाचे प्रमाण वाढतच गेले.
समोरच्या काळात आधुनिकीकरणाचे वारे जोमात वाहू लागले. शहरात वाढत्या औद्द्योगिकरणामुळे कामांची मुबलकता असल्याने मोठ्याप्रमाणावर तरुणवर्गातील लोक खेड्यांकडून शहराकडे येवू लागले. शहरे मोठी होवू लागली. गावाकडे आई-वडील, आजी-आजोबा अशी वयस्क मंडळी शेतीकडे जमेल तसा रस घेवू लागली. कारण तरुण वर्ग जो शहराकडे वळला तो आता शहरातच स्थायिक होवू लागला होता. कारण त्यांचा उच्च शिक्षणाकडे, मोठ्या पदाच्या नोकर्या करण्याकडे, बोलभाषा सुधारण्याकडे त्याच प्रमाणे राहणीमान उंचवण्याकडे कल वाढला. त्यामुळे शेतात उन्हातान्हात कष्ट करणे त्यांना नकोसे वाटू लागले. त्याचबरोबर शेती व्यवसायावर हवामानातील असंतूलनामुळे विपरीत परीणाम होत असल्यामुळे त्याद्वारे येणारी मिळकतही स्थिर नव्हती.
आताच्या युगात शहरीकरणाचा वेग एवढा वाढला आहे कि शहरानजीकचा सुपीक भागही त्यात समाविष्ट झाला. त्यामुळे शेतजमिनी आता दुर्गम भागातच आहेत. त्याचबरोबर शहर व दुर्गम भाग ह्या दोन्हीतील हवामानात पराकोटीचे अंतर आहे. शहरात वाढत्या औद्द्योगिकरणामुळे व वाहनांमुळे उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. सोबत पेट्रोल, डिझेलच्या अति वापरामुळे हवेतील प्रदुषण वाढले आहे. जे श्वसनांच्या आजारासाठी तसेच वाढत्या हृदयसंबंधीत समस्यांसाठी कारणीभूत आहे. शहरात लोकसंख्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.
तेव्हा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जमिनीच्या आतून गटारांचे जाळे पसरलेले असते. कधि जर त्यात लिकेज आल्यास पिण्यायोग्य पाणिही प्रदुषीत होण्याची शक्यता असते. खासकरून पावसाळ्यात पाणि प्रदुषणामुळे बहुतांशी लोक आजारपणाला सामोरे जातात. उष्णतेपासून बचावासाठी ए सी व रेफरीजरेटर सारखी उपकरणे फक्त शहरातच मोठ्या प्रमाणात वापरली जातात. शहरात सिमेंटची घरे, सिमेंटचे रस्ते बघायला मिळतात. परंतू त्याप्रमाणात वृक्षांचे प्रमाण कमी असल्यामुळे नागरीकांना असहनीय उष्णतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे बरेच लोक शहरीय वातावरणाला कंटाळले आहेत. तसेच निवृत्तीनंतरच्या काळात गावाकडे राहणे पसंद करू लागले आहेत.
दुर्गम भागात शहरांच्या तुलनेत प्रदुषणाचे प्रमाण फारच कमी आहे. कारण खेड्यांची लोकसंख्या कमी असते. तिकडे वाहनांचे प्रमाणही कमी असते. त्याचबरोबर त्या भागात औद्द्योगिकारणाचा थेट संपर्क नाही. गावांच्या आजूबाजूला दाट वनराई असते. आधुनिक उपकरणांच्या वापराचे प्रमाण त्याभागात कमी असते. प्रवास करण्यासाठी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे वाहनांच्या कर्कश आवाजांऐवजी पक्ष्यांच्या किलबिलाटाने तसेच नद्यांमधून वाहनार्या पाण्याच्या मंजूळ आवाजाने तिकडचा परिसर दुमदुमतो. गावाकडची हवा शुद्ध असते व त्यात गारवा जाणवतो. त्यासोबत फळांचे बगीचे, पिकांनी बहरलेली शेते आणि पदोपदी असलेला निसर्गाचा स्पर्श लोकांना पुन्हा गावांकडे परतण्याच्या मोहात पाडत आहे.
तेव्हा आता शेती करणे, फार्महाउस बांधणे हे विषय अनेकांच्या आवडीचे झाले आहेत. कारण माणूस काहिही झाले तरी निसर्गरम्य वातावरणात जास्त रमतो. शिवाय आता सुदृढ आरोग्याच्या दृष्टीकोनातून लोकांमध्ये जागृकता बघावयास मिळते. आजच्या युगात शेती व्यवसायातही क्रांती आलेली आहे. कारण सुशिक्षीत बेरोजगारीचे वाढते प्रमाण तरुणवर्गास हक्काच्या जमिनीवर नविन प्रयोग करून बघण्यास प्रवृत्त करत आहे. शेतीसोबतच शेतीशी निगडीत जोड व्यवसायही युवकांना आकर्षीत करत आहेत. त्यामुळे त्यांच्यात मालक प्रवृत्ती तसेच जबाबदार्या उचलण्याची हिंमत वाढू लागली आहे. जी नोकरीत विकसीत होवू शकत नाही. भारत हा युवकांनी समृद्ध देश आहे. जर त्यांनी मातीशी इमान राखून तिला समृद्ध करण्याचा निर्णय घेतला तर हा आधुनिक भारत पुन्हा एकदा सोन्याची खाण बनेल. गरिबीला येथे थारा राहणार नाही. शिवाय प्रत्येकाच्या मुलभूत गरजा पुर्ण होतील.
शेती व्यवसाय आपल्याला मातिशी जोडून ठेवतो. आपण कितीही आकाशाकडे झेप घेतली तरी साधे जेवण, साधे राहणीमान व साधे विचार हेच आधुनिकीकरणाच्या ह्या जगातही आपल्याला क्रियाशील ठेवतात. शेती करणे ही अभिमानाने मिरविण्यासारखी गोष्ट आहे. निसर्गाच्या कुशीत निवांत होण्याची इच्छा असेल तर शेती व्यवसायाकडे वळणे महत्वाचे आहे. कारण काळ कितीही झेपावला तरिही ज्यांची मुळे मातीशी जुळली राहतील तेच आकाशाला गवसणी घालू शकतील.
1. शेती करण्यासाठी शिक्षण मर्यादेची व कोणत्याही पदवीची अट नसते.
आजच्या युगात उच्च शिक्षण घेण्याला फार महत्व आहे. मोठमोठ्या पदव्या हस्तांतरीत करूनही सुशिक्षीत बेरोजगारीचे प्रमाण वाढत चाललेले आहे. त्यामुळे तरुणांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. आणि त्याचा त्यांच्या मानसिकतेवरही दुष्परीणाम होतांना दिसत आहे. शेती हा असा व्यवसाय आहे ज्यात शिक्षणासंबंधीत कोणतिही अट नाही. ज्याला शिक्षण घेण्याची आवड नाही किंवा काही कारणांनी शिक्षण घेण्यापासून वंचीत रहावे लागले असे सगळे शेती व्यवसायात आपले कौशल्य दाखवू शकतात. पारंपारीक पद्धतीने तसेच इंटरनेट च्या आधाराने माहिती मिळवून नव्या विचारांनी शेती करता येवू शकते. कोणी सुविद्द्य व्यक्ती शेती करण्यास सज्ज झाला असेल तर तो त्याच्या ज्ञानाच्या आधारे ह्या व्यवसायात क्रांती आणू शकतो. आधूनिक उपकरणांचा वापर करून तसेच नविन तंत्रज्ञानाच्या आधारे शेती व्यवसायाला भरघोष उत्पन्नाचे साधन बनवीता येवू शकते.
2. शेती कराणार्याचे कुटूंबही शेतात काम करू शकते.
शेती व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतलेला इच्छूक त्याच्या कुटूंबियांच्या पाठबळाने त्या निर्णयाचे सोने करू शकतो. शेतजमिनीवरच फार्महाऊस बांधून कुटूंबासमवेत शेतावरच वास्तव्य असेल तर वेळेची बचत तर होईलच त्याचबरोबर कुटूंबातील सदस्यही शेतावर काम करू शकतात. शेतावर कोणती पिके काढायची, त्यात किती गुंतवणूक करायची, आधुनिक उपकरणांचा वापर कसा करावयाचा हे सर्व निर्णय एकमेकांच्या विचारांच्या मदतीने घेता येवू शकतात. आणि शेती व्यवसायाला भरघोष उत्पन्नाचे साधन बनविता येवू शकते.
3. पारंपारीक पद्धतीला आधुनिकीकरणाची जोड देवून शेती व्यवसायाला वेगळे वळण देता येवू शकते.
शेती हा जुना व पारंपारीक व्यवसाय आहे. काळानुसार शेती करण्याच्या पद्धतीत हळूहळू बदल येत गेलेत. जास्तीत जास्त उत्पन्न काढणे हाच त्यामागचा उद्देश होता. पुर्वी शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून होता. परंतू पावसाच्या लहरीपणामुळे उत्पन्नावर दुष्परिणाम होवू लागले. शेतीतून आलेले उत्पन्न कमी व दर्जेदार नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होवू लागला. कर्जाच्या ओझ्याखाली येवून शेतकर्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले. परंतू आता सरकारनेही शेतकर्यांसाठी व शेती व्यवसायाच्या उद्धारासाठी उपाययोजना राबविल्या आहेत. त्यानुसार शेतात पाण्याच्या सोयी करण्यात आल्या. त्यामुळे शेतकर्याला मोठा दिलासा मिळाला. कारण शेतकरी आता पावसावर विसंबून राहिला नाही. त्यामुळे त्याला शेतात दुहेरी उत्पन्न काढता येणे शक्य झाले. त्यासोबत आता आधुनिक ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेताची नांगरणी करून जमिनीत खोलवर उलथा पालथ करता येते. वेळेचीही बचत होते. त्याचबरोबर जमीन सकस बनविण्यासाठी पोषणांचाही वापर करण्यात येतो. अशापद्धतीने आज शेती व्यवसायाचे दिवस पालटले आहेत. आणि आधुनिकीकरणामुळे तरुणांमध्ये शेतीविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
4. कृषीप्रधान भारत ही ओळख आता पुन्हा साध्य होत चालली आहे.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेती व्यवसायाचे आधुनिकीकरण करून आज पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली आहे. वाढती महागाई व आजची जीवनशैली बघता जास्तीत जास्त पैसा कमविणे ही खरी गरज आहे. अशावेळी आपल्याकडे शेतजमीनी असल्यास त्यांना उपजावू बनवावे. त्याशिवाय शेतीव्यवसायाशी निगडीत जोड व्यवसाय जसे कुक्कूटपालन, दुधाचा व्यवसाय, गांडूळखत, कंपोस्टखत निर्मीती, मत्स्यपालन, भाजीविक्री असे निरनिराळे व्यवसाय करण्यासही मुबलकता आहे. शेती करणे म्हणजे काळ्या आईचे आशिर्वाद घेवून निसर्गापुढे नतमस्तक होण्यासारखे आहे. लोकांमध्ये आता शेतीविषयी जागृकता निर्माण झाली आहे तसेच शेती व्यवसायाचे महत्वही कळले आहे. त्याचप्रमाणे आजचा शेतकरी सुविद्द्य व सुजाण झाला आहे. आणि तो शेती व्यवसायात क्रांती आणण्यासाठी धडपडत आहे. हिच इथल्या मातिची ओळख आहे.
शेती हे आईचे रूप असते. ज्याप्रमाणे आपली आई आपल्यावर जीवापाड माया करते तसेच काळ्या मातीचेही आपल्यावर प्रेम असते. तिची योग्य निगरानी करून तिला उपजावू बनविले तर तिच्या गर्भात पेरलेल्या दाण्याला ती भरघोष उत्पन्न देते. अशा पद्धतीने तिचे आशिर्वाद आपल्याला मिळतात. तेव्हा आधुनिकीकरणाच्या नावाखाली व जास्तीत जास्त उत्पन्नाच्या लालसेपोटी जमिनीवर कृत्रीम खतांचा अतोनात मारा करणे थांबवावे. कारण त्यामुळे उत्पन्न तर येईल परंतू मातीची श्रेष्ठता टिकून राहणार नाही. त्याऐवजी शेणखत व आयुर्वेदीक जैवीक खतांचा वापर केल्याने केवळ बाळालाच नाही तर आईलाही जपता येईल. आणि आधुनिकीकरणाच्या ह्या युगातही जमिनीशी असलेले आपले ऋणानुबंध असेच कायम टिकून राहतील.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)