
आजच्या काळात एखाद्द्या व्यक्तीची श्रीमंती ही भौतिक सुख-सुविधा देणार्या वस्तु आणि संपत्ती तसेच प्रसिद्धीशी जोडली जाते. किंबहुना वरवर दिसणार्या महागड्या गाड्या, मोठा बंगला, प्रचंड जमापुंजी, धन-दौलत असणारे आणि ज्यांच्या नावापुढे मोठ-मोठ्या पदव्या आहेत. जे विदेशात मोठ्या वेतनाच्या नोकर्या करत आहेत. अशा लोकांना समाजाने श्रीमंत घोषीत केलेले आहे. त्यांना समाजात प्रतिष्ठा असते. त्यांच्या शब्दाला मान असतो. आणि जो मनुष्य मनाने श्रीमंत असतो, जो नेहमी नीतीला धरून असतो, ज्याच्या हृदयात समाधान आणि उदारता असते, जो आपल्यामुळे इतरांना कोणतिही असुविधा होवू नये ह्याची दक्षता पाळतो, ज्याच्या मध्ये माणुसकी ओतप्रोत भरलेली असते अशा व्यक्तीस मात्र साधे कोणी ओळखतही नाही. तेव्हा आता जो प्रश्न मला पडलाय आपल्यापैकी कित्येकांना पडला असणारच ह्याची मला खात्री आहे.
श्रीमंत असणे हा गुन्हा नाही परंतू भौतिक सुख-सुविधांमध्ये लोळत पडणे आणि फक्त आपल्यापुरते जगणे हे योग्य नाही. जर आपण एक माणूस म्हणून इतरांचा विचार करू शकत असलो तरच श्रीमंतीला विशेषाधिकार समजले पाहिजे. आपल्या सारखीच माणसे जी बेघर असतात, रस्त्याच्या कडेला उघड्यावर बसलेली असतात आणि तिथेच आपला संसार थाटतात. त्यांची अवस्था धुळीने आणि गाड्यांच्या धुराने माखलेल्या रस्त्याप्रमाणे झालेली असते. आपण आपल्या मुलांना फुलासारखे जपतो. परंतू त्यांची मुले रस्त्यावरच लहानाची मोठी होतात. शिक्षणापासून वंचीत असतात. आपल्यापैकी कित्येकजण हे त्यांचे भाग्य समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जातात. कित्येकजण आपल्याच जीवनातील समस्यांमध्ये इतके गुरफटलेले असतात कि लक्ष जावून सुद्धा त्यांच्यासाठी कोणतेही पाऊल उचलण्यास सक्षम नसतात. जे आपल्या वातानुकूलीत गाडीत बसून अशी दृश्ये बघून पुढे निघून जातात ते त्यांच्या जागेवर जावून त्यांच्या समस्या समजू शकत नाहीत. मग ते श्रीमंत असूनही त्याचा समाजाला काही उपयोग नसतो. कारण अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. हे आपण लहानपणीच शिकलो आहोत. जर प्रत्येकाने गरजेपेक्षा जास्त संपत्ती साठविण्याची प्रवृत्ती सोडली आणि ते इतर माणसांच्या वेदना समजू शकले तर पैसा ह्या कारणावरून समाजात निर्माण झालेली गरीब-श्रीमंतीची दरी नष्ट होईल. तेव्हा साठविण्यापेक्षा योग्य ठिकाणी वापरल्याने प्रत्येक व्यक्तीच्या निदान मुलभूत गरजा तरी पुर्ण होतील. असा विचार प्रत्येक भौतिकरित्या श्रीमंत असलेल्या माणसाने करणे गरजेचे आहे.
1. आपल्या वर्तनाने इतरांच्या मनस्वास्थ्यावर परिणाम होवू नये ही पर्वा करणे.
बरेच लोक आपल्या भौतिक श्रीमंतीचा तसेच आपल्या मोठ्या पदावर कार्यरत असण्याचा समाजात बडेजाव मिरवतांना दिसतात. हे करतांना ते कोणावर त्याचा काय परिणाम होईल ह्याचा विचार सुद्धा करत नाहित. परंतू हे मोठे पद किंवा ही श्रीमंती आपल्या कडून काढून घेतल्यावर आपण एक माणूस म्हणून किती उरतो ही गोष्ट फार महत्वाची असते. तेव्हा आपल्या कोणत्याही वर्तनामागे माणुसकीची झलक असली पाहिजे. आपल्यामुळे कोणालाही मानसिक त्रास होणार नाही ही काळजी नेहमी घेतली पाहिजे. आपल्या वागन्यात नम्रपणा असला पाहिजे. आपल्या श्रीमंतीचा दिखावा करण्यापेक्षा कोणाच्या गरजेस धावून गेले पाहिजे. आपल्यामध्ये समाधानी वृत्ती असली पाहिजे. आपल्यामुळे कोणाच्याही मनात न्युनगंड येवू नये तसेच प्रतिस्पर्धा निर्माण होवू नये. ह्या सर्व गोष्टींचा विचार करून वर्तन करण्यातच श्रीमंती असते आणि आपला आत्मसन्मानही असतो.
2. आणिबाणी च्या प्रसंगी आपला हात सर्वप्रथम मदतीस पुढे यावा.
कित्येकदा कोठे अपघात झालेला असतांना किंवा एखादा विपरीत प्रसंग घडलेला असतांना घटनेच्या ठिकाणी तातडीच्या मदतीची नितांत गरज असते. जेणेकरून पिडीतांना वेळेत मदत मिळू शकेल. अशावेळी गर्दीतील बरेच लोक बघ्याची भूमिका घेतात. त्यातले काही स्वत:च्या मोबाईल वर घटनेचा व्हिडीओ बनवितांना दिसतात. फार कमी लोक असे असतात जे अशा ठिकाणी मदतीला धावून येतात. पिडीतांना मदत मिळण्याअगोदर घटनेचा व्हिडीओ मात्र व्हायरल झालेला असतो. परंतू अशा संकटसमयी एखाद्याचा मौल्यवान जीव वाचवीण्यास सर्वप्रथम प्रादान्य देणे महत्वाचे असते. जो त्याच्या कुटूंबियांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. त्यास वाचविण्यासाठी आपण पहिले पाऊल उचलण्यातच खरी माणुसकी असते. त्याचप्रमाणे अशाप्रसंगी आपली कर्तव्यदक्षता दाखवीण्यातच खरी श्रीमंती असते.
3. इतरांना त्यांच्या जागेवर जावून समजण्यात श्रीमंती आहे.
आपलेच कित्येक बांधव बेघर आहेत. त्यात स्त्रिया व लहान मुले यांना कोणतीही आडोस्याची जागा नसल्याने त्यांच्या होणार्या असुवीधेची आपल्याला जाणीव असली पाहिजे. कारण श्रीमंती आपल्याला सुविधा प्रदान करत असली तरी आपले जीवन वाचवू शकत नाही. भविष्यात आपल्याला कोणत्याही अडचणीस सामोरे जावे लागू नये म्हणून आपण जास्तीत जास्त संपत्तीची तरतूद करण्यासाठी धडपडत असतो. परंतू इतरांचे वर्तमान स्थितीतील असुविधाजनक जीवन बघून आपल्या मनाला पाझरही फुटत नाही. ह्यात कोठेही माणुसकी दिसत नाही. त्यापेक्षा आपल्या मिळकतीचा एक हिस्सा समाजाच्या सेवेसाठी तसेच लोकांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थांना दान करावा. मदत करतांना आपण ती का करतोय ह्याची जाणीव ठेवून करावी. तरच माणुसकी जपली जाते. हीच खरी श्रीमंतीची परिभाषा आहे.
4. आपले एक जागरूक कुटूंब असावे.
आपल्या कुटूंबातील सदस्यांमध्ये समाधानी प्रवृत्ती असावी. संकटसमयी तसेच गरजेच्या ठिकाणी मदत करण्यासाठी आपला पुढाकार असला पाहिजे. रस्त्यावर आपल्या वाहनांचा वेग सामान्य असावा जेणेकरून आपल्यामुळे कोणालाही अपघात होणार नाही. रुग्णवाहीकांना वाट मोकळी करून द्द्यावी ज्यामुळे जीवनमरणाच्या दारात असलेल्या व्यक्तीचा जीव वाचू शकेल. कित्येकांना पैस्याअभावी योग्य इलाज करता येत नाही. त्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागतात. अशाठिकाणी पुढाकार घेवून आर्थिक मदत करावी. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाचा जीव तेवढाच महत्वाचा असतो. मग तो वाचविण्यासाठी धडपडही सारखीच झाली पाहिजे. अशाप्रकारे गरीब-श्रीमंतीची दरी संपविण्यातच श्रीमंती असते.
मित्रांनो, भौतिक श्रीमंती बरोबरच मनाची श्रीमंतीही असेल तरच त्याला अर्थ प्राप्त होतो. श्रीमंतीची लालसा ठेवण्यापेक्षा समाधानाने राहणे आपल्याला श्रीमंत बनविते. परंतू तरिही आजच्या जगाला पैसा व प्रसिद्धीची भाषा कळते. पैसा आपल्याला समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देतो. ज्या व्यक्तीपाशी योग्य विचार नाहीत, ज्याच्या जगण्याला योग्य दिशा नाही त्याच्यापाशी पैसा नसला तरी चालतो परंतू ज्याचे हृदय दया, प्रेम, सेवाभाव ह्या गोष्टींनी समृद्ध आहे तो मनुष्य पैस्यानेही समृद्ध असला पाहिजे. कारण त्याच्यापाशी असलेल्या समाजव्यापी विचारांना आचरणात आणण्यासाठी तो सर्वतोपरी सक्षम असला पाहिजे. त्याच्या विचारांना प्रत्यक्षात घडवून आणण्यासाठी लागणार्या संसाधनांची गरज पैसाच पुर्ण करू शकतो. त्याचबरोबर आपल्या जीवनाचा उद्देश पुर्णत्वास नेण्यासाठी पैसा हेच एक माध्यम असते. आपला उद्देश जीवनव्यापी असल्यास त्यामधून अनेक लोक सुखी होतात आणि हीच श्रीमंतीची परिभाषा आहे.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)