
आजचे युग गतिमान आहे आणि पैस्याचे मूल्य अतोनात वाढलेले आहे. त्यामुळे जीवनव्यापन करण्यासाठी पैसा अर्जीत करत असतांना कधिकधी स्वत:कडेही आपले लक्ष नसते. आरोग्या संबंद्धीच्या लहान-सहान समस्यांकडे आपण तोवर दुर्लक्ष करत राहतो जोपर्यंत त्यांचे स्वरूप मोठे होत नाही. त्याचप्रमाणे गोष्टी हाताबाहेर जात नाहीत. त्यानंतर आपण स्वत:वर अनाठायी औषधांचा मारा सुरू करतो आणि त्यामुळे आपल्या आरोग्यात अपेक्षेप्रमाणे सुधारणाही होते. परंतू त्याबरोबर औषधांचे आपल्या शरिरावर होणारे दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागतात. ह्या व्यस्त दिनचर्येत स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष देण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही. अशावेळी अवेळी जेवण करणे किंवा जेवणाऐवजी फास्ट्फूड चे सेवन करणे, जेवतांना मन दुसरीकडेच भटकत असल्याने काय खातोय हेही माहित नसते. त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या पोषक तत्वांची आपल्या शरीरात कमतरता होत जाते. बर्याचदा आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशमक औषधांचे सेवन आपल्या गरजेनुसार करत असतो. तसेच नियमितपणे मादक पदार्थांच्या सेवन केल्यानेही आपल्या शरिरीवर वाईट परीणाम होतात. जे वाढत्या वयानुसार आपल्या समोर येतात. ह्याचा अर्थ हा होतो कि आपण आपल्या आरोग्याप्रती अत्यंत बेपर्वा झालेलो असतो.
आदर्श आरोग्याची संकल्पना आपल्याला माहित असणे अनिवार्य आहे. त्यात शारिरीक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही जपले जाते. ज्याप्रमाणे आपण आपल्या शरिरासाठी पोषक तत्व व व्यायाम ह्यांचे महत्व जाणतो, त्याचप्रमाणे त्यांचे नित्यनियमाने पालनही करतो. त्याचप्रकारे मेडीटेशन करणे, चांगल्या सवयी असणे, सकारात्मक विचारसरणी ठेवणे हे सर्वही आपल्या मनाचे आरोग्य जपण्यासाठी महत्वाचे असते. आपल्या आरोग्याविषयीच्या प्रश्नांना आपण सहज समजू नये. कारण आपले शरिर हे सृष्टीने घडविलेले यंत्र आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातील वाहनांची किंवा उपकरणांची सर्विसींग करतो. जेणेकरून त्यांचा आपल्याला जास्त काळ लाभ मिळावा. त्याचप्रमाणे आपण आपल्या शरिराचीही निगा राखली पाहिजे. त्याला नित्यनियमाने पोषक तत्वे मिळतील असा आहार दररोज घेतला पाहिजे. जर आपण वेळ हातात असतांनाच सावधगिरी बाळगली तर आपले आरोग्य दुर्लक्षीत होणार नाही आणि आपल्याला उत्तम व निरोगी जीवन जगता यईल. त्यासोबत सुदृढ आरोग्याची साथ संपुर्ण आयुष्यभर लाभेल. सृष्टीच्या सर्वच गोष्टी आपल्या कल्पनाशक्तीच्या पल्ह्याड्च्या असतात. जसे आपल्या केसांचा रंग व त्वचेचा रंग हा आपण ज्या हवामान क्षेत्रात राहतो त्याप्रमाणे प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. त्याचप्रमाणे आपण राहत असलेल्या ठिकाणावरील वातावरणातील बदलांनुसार आपल्या आरोग्यात येणारे बदलही आपण नजरेखालून घालणे गरजेचे असते. कारण जेव्हा आपण स्वत:ची योग्य ती काळजी घेतो तेव्हा इतरांची काळजी घेण्यास समर्थ बनतो.
आपले सुदृढ शरिर आणि निर्मळ मन एकत्र येवून जीवन प्रवासात अशा काही मार्गांचा शोध लावतात कि ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो. परंतू जेव्हा आपण आपल्या मनात उठणार्या भावनांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा आपण आदर्श आरोग्याची स्वप्ने बघण्यास योग्य नसतो. कारण मनातील भावनांचा समतोल साधता येणे हे उत्तम आरोग्य राखण्यासाठी लाभदायक असते. त्याचप्रमाणे सुदृढ आरोग्य प्राप्त करण्यासाठी आपल्या दिनचर्येस शिस्तही लावली पाहिजे.
1. स्वत:च्या पोषणाकडे लक्ष असावे
काहीजण इतरांच्या तुलनेत स्वत:ला कमी महत्व देतात. कारण त्यांना ते स्वार्थीपणाचे वाटते. खास करून ही प्रवृत्ती स्त्रियांमधे जास्त बघावयास मिळते. घरातील स्त्रियांवर संपुर्ण घराची जबाबदारी असते. जर त्यांनी वेळेत काही खाल्ले नाही तर त्यांच्या शरीराला पोषण मिळणार नाही. तसेही नैसर्गीक सायकल मुळे त्यांच्या शरीरात आवश्यकतेपेक्षा कमी हिमोग्लोबीनचे प्रमाण असते. तेव्हा त्यांनी आपल्या खाण्याच्या वेळा चुकवीने त्यांच्यासाठी महागात पडू शकते. आपल्या समोर जर रिकामे ताट असेल तर ते कोणाच्याही कामाचे नसते. म्हणून आपले पहिले कर्तव्य स्वत:प्रती असले पाहिजे. त्यासोबत ताटातील अन्न सेवन करतांना आपण तेथे मनाने उपस्थित असले पाहिजे. त्याचप्रमाणे आपला दररोजचा संतुलीत आहार आणि त्यामधून मिळणारे पुर्ण पोषण ह्याकडे आपले जास्त लक्ष असले पाहिजे. त्याचप्रमाणे सुदृढ आणि स्वस्थ जीवन ही आपली निवड असली पाहिजे. ह्या सर्व गोष्टींचा आपण आनंद घेवू शकत आहोत ह्यासाठी कृतज्ञ असणे हे आपले प्राथमीक कर्तव्य असले पाहिजे.
2. गोठवलेल्या अन्न पदार्थांचे सेवन करू नये.
आपल्या आहारात ताज्या अन्न पदार्थांचा समावेश असला पाहिजे. तरच त्यामधून आपल्याला पोषक तत्वांसोबतच उर्जा ही मिळेल. ज्यामुळे संपुर्ण दिवस आपण न थकता आपली कामे करू शकतो. परंतू हे स्पर्धांचे युग आहे. प्रगती करण्यासाठी प्रत्येकाची चढा-ओढ लागलेली आहे. त्या धावपळीत आपले आपल्या खाण्या-पिण्या कडेही लक्ष नसते. आणि आपल्याकडे वेळेचीही उणीव असते. अशावेळी आपल्याला जे लवकर आणि सहज उपलब्ध होईल ते खाण्याकडे आपला झूकाव वाढतो. परंतू त्याचे दुष्परिणाम आपल्याला लवकरच आपल्या आरोग्यावर बघायला मिळतात. आवश्यक ते पोषण न मिळाल्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो. आपण जास्त मेहनत करू शकत नाही. जर प्रतिस्पर्धांमधे स्वत:ला टिकवून ठेवायचे असेल तर नेहमी ताजे अन्न खाण्याचाच हट्ट धरावा.
3. मनाला सकारात्मक विचारांचे पोषण द्द्यावे.
आपला आत्मसंवाद सकारात्मक असला पाहिजे. नकारात्मक विचारांना आपल्या मनात थारा देवू नये. आपण सृष्टीने घडविलेली अद्भूत निर्मीती आहोत. तेव्हा आपला मेंदू प्रकाशाने आणि उर्जेने भरून टाकला पाहिजे. आपण स्वत:वर दोषारोपण न करता आपले मन स्वच्छ ठेवावे. आपले मन शांत ठेवण्यासाठी पाहिजे ते उपाय करावे. योगसाधना करावी. फारच गरज असल्यास पेशेवर डॉक्टरांची मदत घेवून मानसिक आरोग्य जतन करावे. आपले मानसिक आरोग्य आपल्यासाठी सर्वप्रथम महत्वाचे असले पाहिजे. आपले मन निर्मळ असते तेव्हाच आपल्या मनाला शांतता लाभते. जर आपल्या विचारात स्पष्टता नसेल आणि आपण आपल्या भावना व्यक्त करू शकलो नाही तर दैनंदीन जीवनात येणारे अडथळे आपण पार करू शकत नाही. परंतू जर आपले विचार सकारात्मक असतील तर कितीही मानसिक दडपण आले तरी आपण स्थिर असतो.
4. शारिरीक व्यायाम हितकारक ठरेल.
आपल्या दिनचर्येत व्यायामासाठी वेळ काढणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपले शरिरही फीट राहील आणि मनही. सुदृढ शरीराचे धनी असल्यामुळे आपला आत्मविश्वासही वाढेल. शारिरीक व्यायामाची सुरवात करणे आपल्याला कठीण जात असेल तर व्यायामाचे असे प्रकार शोधून काढावे जे मजेशीर असतील. ज्यामुळे आपला हेतूही साध्य होईल आणि कंटाळाही येणार नाही. शरिराची निष्काळजी करणे म्हणजे स्वत:हून आजारपणं लादून घेण्यासारखे आहे. आपल्या शरिराला क्रियाशील ठेवण्यासाठी व्यायाम केलाच पाहिजे.
5. आत्मप्रेम जागृत करा.
आपण आनंद बाहेर शोधतो. परंतू कधिही अंतर्मनात डोकावून बघत नाही. अंतर्मनाचा प्रवास केल्यानेच आपण खर्याखुर्या आनंदाचे धनी होतो. आपल्या सभोवतालची माणसे आपल्यातील उर्जेला नकारात्मक बनवित असतात . त्यामुळे आपल्या भावनांना कडवट्पणा येतो. अशा लोकांना आपल्या पासून शक्यतोवर लांब ठेवावे. त्याचबरोबर स्वत:वर प्रेम करणे महत्वाची गोष्ट आहे. कारण आत्मप्रेमच आनंदाचे मूळ असते.
रोज एक छोटेसे पाऊल उचलावे आरोग्याच्या दिशेने आणि सुदृढ व निरोगी आयुष्य जगावे. जीवनात आपण आणी आपली माणसे निरोगी असणे. याहून आनंदाची गोष्ट काय असू शकते.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)