स्त्रिजन्म – एक आव्हान

 घरात मुलीचा जन्म होणे तसेच तिच्या बालपणीचा काळ कोणत्याही कुटूंबासाठी एक आनंदाची पर्वणीच असते. कारण त्यांच्यातील खट्याळपणा व निरागसपणा हा कुटूंबियांना वेड लावणारा असतो. त्या गोंडस चिमुकल्या रुपाचे लाड-कौतुक करणे, त्यांना अंगा-खांद्यावर खेळवणे म्हणजे कमालीची सुखावणारी गोष्ट असते. त्यासोबत घरात मुलगी जन्मास येणे म्हणजे तिच्या रुपाने लक्ष्मीचे आगमन होणे असेही मानले जाते. काही धर्मपरंपरेत मुलींना अगदी मानाचे स्थानसुद्धा असते. तसेच मुलींच्याही अंगी जन्मजात सर्वांना जीव लावण्याची व आपलेसे करण्याची किमया देखील असते. त्यांचे हृदय ममता व कारुण्याने ओतप्रोत भरलेले असते. त्यामुळे मुलींचे घरातील वातावरण हसते खेळते ठेवण्यात व घरात प्राण ओतण्यात मुलांच्या तुलनेत मोठे योगदान असते.

  बालपणाचा काळ सरून मुली वयात येवू लागतात. तेव्हा समाजातील मुलींचे स्थान, त्यांच्यावर होणारे अत्याचार त्याचबरोबर त्यांना दैनंदिन जीवनात येणार्‍या समस्या बघून घरोघरी मुलींच्या विषयावरून आई-वडील व घरातील वडीलधार्‍यांच्या चेहर्‍यावर चिंतारूपी काळे ढग आच्छादलेले असतात. कारण मुली कितीही कर्तबगार असल्या तरी त्या मुलीच आहेत असे त्यांना वाटत असते. त्याचप्रमाणे मुलगी असणे हाच त्यांचा एकप्रकारे गुन्हा देखील असतो. तसेच मुलगा व मुलगी ह्यांच्या कर्तबगार असण्यातही खुपच अंतर असते. कारण मुलींच्या कर्तबगार असण्याला तेव्हाच महत्व प्राप्त होते जेव्हा त्या समाजाने बनविलेल्या कठोर नियमांचे काटेकोर पालन करत असतात. कारण त्या मोबदल्यात त्यांचे स्वातंत्र्य त्यांच्यापासून हिरावून घेतल्या जाते. एकप्रकारे त्यांचे पंख छाटून त्यांना उडण्याची परवानगी देण्यात आलेली असते.  

  मुलींचे पंख छाटणे म्हणजे त्यांच्या जगण्यावर बंधणे लावणे. त्याची सुरवात त्या मुलीची जेव्हा एखाद्या मुलाबरोबर मैत्री होते तेव्हापासून केली जाते. मैत्रीचा निर्मळ अर्थ कोणी आपल्या हृदयाला स्पर्श करणे. तर प्रेम म्हणजे हृदयाच्या आत शिरणे असा होतो. परंतू एखाद्या मुलीची मुलाशी मैत्री असण्याचा नेहमी एकच सुसंगत अर्थ काढण्यात येतो. जो समाजाला अपेक्षीत आहे. त्यामुळे मित्राबरोबर मुलगी फिरतांना दिसली कि तिच्या चारीत्र्यावर शिंतोडे उडविण्यात येतात. तसेच मुलीच्या डागाळलेल्या चारीत्र्याचा थेट तिच्या घराण्याच्या वर्षोनुवर्षे जपलेल्या नावलौकिकावर वाईट परीणाम होतो. म्हणूनच घराण्याची अब्रू घालविल्याचे आरोप जास्तीत जास्त मुलींवर केले जातात. घरातील वरीष्ठ स्त्रिया मुलींना हे समजविण्यात लागल्या असतात कि मुलींची अब्रू ही काचे सारखी असते एकदा का त्याला तडा गेला कि पुन्हा जोडणे अशक्य असते. अशावेळी जर एखाद्या मुलीने घरच्यांचा विरोध पत्करून कोणा मुलाबरोबर पळून जाण्याच्या तिच्या निर्णयाला सत्यात उतरविण्याचा प्रयत्न केला. तर ती मुलगी सत्तर वर्षाची म्हातारीही झाली तरी तो कलंक तिच्या कपाळावरून पुसल्या जात नाही.

   समाजाने मुलीचे चरीत्र हे तिच्या शरीराच्या अवयवांच्या अवतीभवती तसेच तिच्या कपड्यांना लागलेल्या लाल डागाशी निगडीत ठेवले आहे. त्यामुळे तिच तिची ओळखही आहे आणि तिला आयुष्यभर जखडून ठेवणारे दोरखंडही आहेत. मुलींनी त्या गोष्टीवर मात करून कितीही उंच भरार्‍या घेतल्या तरी जीवनात कधि ना कधी तरी त्यांना त्याच्याशी सामना करावाच लागतो. मातृत्व, मांगल्य ह्या स्त्रियांना लाभलेल्या इतक्या पवित्र गोष्टी आहेत कि त्यामुळे स्त्रिया सन्मानास पात्र ठरतात. परंतू समाज त्याच पवीत्र गोष्टींमुळे स्त्रियांना कमकुवत ठरवीतो. मुलींनी शिक्षणक्षेत्रात उंची गाठली. स्वबळावर मोठा नावलौकिक मिळवीला. त्याचबरोबर अशी क्षेत्र ज्यात मुलींचे असणे केवळ अशक्य वाटत होते.  अशा क्षेत्रातही त्यांनी पराक्रम गाजवून स्वत:ची छाप निर्माण केली. तरिही त्यांना त्यांच्या आयुष्याचे निर्णय स्वतंत्रपणे घेण्याची परवानगीही नसते. तसेच त्यांचे एकही चुकीच्या मार्गावर पडलेले पाऊल त्यांनी श्रमाने मिळवीलेल्या नावलौकिकास धुळीस मिळवीते.

   युगा युगापासून स्त्रियांची ह्या पुरूषप्रधान समाजात हीच दैना आहे. पूर्वी स्त्रियांना उपभोगाची वस्तू समजून दयनीय अवस्थेत खितपत सोडून देण्यात येत असे. चूल व मूल एवढेच तिचे विश्व असायचे. तिला शिक्षणापासून वंचीत ठेवण्यात येत असे. तिला कायम आपल्या वर्चस्वाखाली ठेवण्यातच पुरूषांना पुरूषार्थ गाजविल्याचा अघोरी आनंद होत असे. आजच्या युगातील स्त्रिया मात्र उंबरठ्या बाहेरील आयुष्य जगत आहेत. परंतू तरिही समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन काही बदलला नाही. आजही स्त्रिया समाजाने लादलेल्या बेड्यांमधून मुक्त होवून स्वच्छंद व स्वातंत्र्ययुक्त जीवनाचा आनंद घेवू शकत नाहीत. कारण ह्या जगात त्यांना कधीही ‘ती मुलगी असूनही कोणास तिची चिंता नाही,’ ‘तिच्या लग्नाच्या काळजीने आई-वडीलांच्या जीवाला घोर नाही’ तसेच ‘मुलगा व मुलगी असा भेद उरलेला नाही’ असे मोकळे वातावरण  मिळणार नाही.

  एखाद्या मुलीने तिच्या आयुष्यात उंची गाठली. तसेच उच्च अधिकारी बनून समाजात स्वत:चा रुतबा जरी निर्माण केला. तरी तीच्यासाठी कोणाच्या प्रेमात पडणे तसेच आयुष्याच्या भावी जोडीदाराबरोबर विवाहबंधनात अडकणे म्हणजे  मोठे आव्हान असते. जर दुर्दैवाने तिच्या वैवाहीक जीवनात अडचणी निर्माण झाल्या. तसेच तिला घटस्फोटाला सामोरे जावे लागले. तर अशावेळी तिला साथ देवून कोणिही तिचे मनोबल वाढवत नाही. त्याउलट तिने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचे तिला व तिच्या कुटूंबास कसे दुष्परीणाम सहन करावे लागले. ह्यावरून तिला बोलणी खावी लागतात. त्याचप्रमाणे तिची फक्त तीच एक गोष्ट सर्वांच्या ध्यानात राहते. परंतू तिने स्वकष्टाने समाजात मिळवीलेला मानमरातब कोणासही लक्षात राहत नाही. तिला एक घटस्फोटीता म्हणून विकृत नजरांनी तिच्याकडे पाहिले जाते.

 तसेच कोणत्याही लग्न झालेल्या मुलीकडे घराण्याला वारसा देणारे किंवा मुले जन्मास घालणारे यंत्र म्हणूनही पाहिले जाते. जर ती मुलगी काही कारणांनी बाळाला जन्म देण्यास सक्षम नसेल तर मात्र तिला तिचे पुढचे  आयुष्य नरकासमान घालवावे लागते. त्या मुलीच्या कपाळी ‘वांझ’ हा नकारात्मक  शब्द लावण्यात येतो. प्रत्येक मुलीचे शरीर, तिचे मन व हृदयातील वात्सल्य हे तिला मातृत्व बहाल करण्यासाठी निसर्गाने केलेली पूर्वतयारी असते. त्यामुळे प्रत्येक मुलीच्या मनात आई होण्याची प्रबळ इच्छा असते. तसेच चिमुकल्या बाळाच्या स्पर्शाची व त्याच्यासाठी फुटलेल्या पान्ह्याची गोड स्वप्न असतात. परंतू दुर्दैवाने ती आई बनण्यास सक्षम नसेल तर तिच्या अंतकरणास सर्वात जास्त दु:ख होते. जे शब्दात व्यक्त करणेही तिला अशक्य असते. परंतू तिचे हे दु:ख समजून घेण्याइतके विशाल हृदय कोणातही नसते. त्याउलट तिच्या ह्या कमतरतेस वांझ असे संबोधून तिची क्षणोक्षणी विटंबना करण्यात येते. कोणतिही मुलगी ही तिच्या हृदयाने जन्मजात एक आई असते. परंतू कधिकधी ती काही कारणांनी त्या सुखापासून वंचीत राहिली. तर अशावेळी तिच्यातील तो वात्सल्याचा सागर ती दत्तक बाळावरही रिकामा करू शकते. परंतू त्यासाठी तिच्याशी जुळलेल्या माणसांकडे मनाचा मोठेपणा असणे गरजेचे आहे. बरेच स्वार्थी लोक त्यावर उपाय म्हणून आपल्या मुलाचे दुसरे लग्न लावून देतात. त्याचबरोबर त्या मुलीस आयुष्यभर वांझ म्हणत डिवचत राहतात. त्यामुळे मुलींना अशा अनिश्चीत व आव्हानात्मक आयुष्याचा कायम सामना करावा लागतो.

  पुरूषप्रधान समाजनिर्मीत ह्या भुरसट विचारांचा व बंधनांचा सामना करत तसेच वेळप्रसंगी त्यांना झुगारून देण्याची हिंमत करत स्त्रियांनी खुप मोठा पल्ला गाठला आहे. परंतू त्या त्यामधून स्वत:ची पुर्णपणे सुटका करून घेवू शकल्या नाहीत. मुलींचे ह्या समाजात लग्न न करता वावरणे शक्य नाही. परंतू लग्न करूनही त्या सुखी नाहीत. आयुष्याच्या कोणत्या वळणावर त्यांना कोणत्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो ह्याचा नेम नाही. फरक फक्त एवढाच पडलाय कि आई आजीच्या मुलींच्या चारीत्र्या विषयीच्या विचारात त्या आता अडकून पडल्या नाहीत. स्वत:ला सक्षम बनवून व आयुष्यात कधी एखादी चूक झालीच. तर तिचे ओझे मनावर जन्मभर न वाहता ती आपल्या आयुष्यातील एक वेळ होती. आता ती पार पडली आहे. त्यासोबत त्यामधून आपल्याला योग्य तो धडाही मिळाला आहे. असे स्वत:ला सांगण्याची हिंमत त्यांच्यात आता आली आहे. त्याचप्रमाणे पुढच्या आयुष्यावर त्याचे पडसाद उमटू ना देता तडा गेलेल्या काचेच्या तुकड्यांना पुन्हा एकत्र आणून जोडण्याचे विचार आजच्या पिढीतील मुलींमध्ये आहेत. तेव्हा त्यांना एक माणूस म्हणून जगण्याची संधी मिळणे गरजेचे आहे. तरच त्या बंधनमुक्त आयुष्याचा मनमुराद आनंद घेवू शकतील.

1. स्त्रियांनी एक माणूस म्हणून त्यांच्या आव्हानात्मक जीवनाकडे बघावे

  स्त्रिया ज्या वातावरणात लहानाच्या मोठ्या होतात त्यात त्यांच्यासाठी वेगळे नियम व अवांतर बंधने असतात. त्यामुळे वयासोबत त्या मनानेही परीपक्व होत जातात. मनात उत्पन्न होणार्‍या इच्छांना ओठांवर येण्यापासून थांबवीण्यात त्यांचा हातखंडा असतो. अशावेळी त्यांच्या जीवनासंबंधीत निर्णय हे सर्वस्वी वडीलधार्‍यांच्या संमतीने घेतले जातात. जर कोणी घरातील वरीष्ठांचा विरोध पत्करून भावनेच्या भरात बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला. तर ती चूक त्यांच्या संस्कारात बसत नाही. हळूहळू त्या केलेल्या चुकीचा त्यांना पश्चाताप होवू लागतो. तसेच त्यासाठी त्या स्वत:ला आयुष्यभर माफ करू शकत नाही. कारण त्या एक स्त्रि म्हणून विचार करत असतात. परंतू एक माणूस म्हणून त्याच घटनेकडे बघण्याचा त्यांचा वेगळा दृष्टीकोन असू शकतो. जर ती एक चूक सिद्ध झाली असेल तर सुधारता येवू शकते. परंतू चुकीतून काही उत्तम झाले असेल तरीसुद्धा मनावर दडपण असणे योग्य नाही. तेव्हा काळाबरोबर पुढे निघून जाण्यालाच अर्थ आहे. कारण स्त्रि असण्याअगोदर त्यांनी स्वत:ला माणूस म्हणून बघावे. तेव्हाच माणसाकडून चुका होतात हे त्या मान्य करू शकतील.

2. पुरूषांनी घरातील स्त्रियांना मानसिक पाठबळ द्यावे.

  घरातील स्त्रिया ज्यात आपली आई बहिण ह्या आपल्याशी एका नात्याने जोडल्या जातात. परंतू एक माणूस म्हणून त्यांचे व्यक्तीगत जग असते. त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात अशा काही घटना घडलेल्या असतात ज्यांना त्यांनी भावनेच्या भरात झालेली चूक समजून त्या चुकीचे ओझे त्या आजतागायत वाहत असतात. त्यांच्या मनावर त्याचे दडपण असल्यामुळे त्या वर्तमानातील त्यांच्या आयुष्याला व आयुष्यातील नात्यांना योग्य तो न्याय देवू शकत नाहीत. अशावेळी घरातील पुरूषांनी पुढाकार घेवून त्यांच्यात पुन्हा विश्वास जागृत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना त्यांचे मन मोकळे करण्यास संधी निर्माण करून दिली पाहिजे. जेणेकरून त्यांच्या मनातील जुन्या गोष्टींचे मळभ दूर होतील आणि त्या आत्मविश्वासाने आयुष्याच्या पुढच्या टप्प्यास  आपल्या कवेत घेतील. आणि मनमुराद जगण्याचा आनंद घेवू शकतील.

3. आव्हानांनीच स्त्रियांच्या जीवनाला कलाटणी मिळते.

  स्त्रिया आणि त्यांच्या जीवनात येणारी आव्हाने ह्यांचे समीकरण असते. कारण त्यांचे आयुष्य अनिश्चीत असते. एका लहानग्या रूपात जन्म झालेल्या स्त्रियांचा आयुष्यात कितीदा तरी पुन्हा नव्याने जन्म होत असतो. लग्नानंतर त्यांना आपले जन्मघर व बालपणीच्या आठवणींना मागे टाकून नव्या घरात, नव्या माणसांसोबत नव्या समस्यांना तोंड देत आयुष्य घालवावे लागते. त्यानंतर त्या त्यांना आई बनवून त्यांची मनोमन असलेली आई होण्याची प्रबळ इच्छा पुर्ण करणार्‍या चिमुकल्यांना जन्म देतात. त्यासोबतच त्यांना कधिकधी आयुष्याचा अत्यंत कठोर चेहरा अनुभवावा लागतो. ज्यात जवळची माणसेही त्यांची साथ सोडतात. अशाप्रकारे कोणतिही स्त्रि अंतर्मनातून खंबीर व कणखर बनत जाते. जीवनातील अव्हानांना पेलण्याची व त्यांच्याशी दोन हात करत पुरून उरण्याची अद्भूत क्षमता त्यांच्यातच असते. म्हणूनच त्या आव्हानांच्या पुढे डगमगून न जाता निश्चलपणे बदलते आयुष्य स्विकारत जातात.

4. आव्हानांना स्विकारूनच स्त्रियांच्या आयुष्याचे सोने होते.

  प्रत्येक स्त्रिची एक प्रेरणादायी गोष्ट असावी अशी निसर्गाचीच इच्छा असते. म्हणूनच त्यांना वेगवेगळी आव्हाने बहाल केली जातात. अनाथांची थोर माय सिंधूताई सपकाळ ह्यांचा हृदय हेलावणारा जीवनप्रवास प्रत्येकास ठाऊक आहे. परंतू त्या आव्हानांसमोर ती माऊली डगमगली नाही. किंवा स्वत:च्या दु:खांना कुरवाळतही बसली नाही. तर इतर दु:खीतांचा सहारा बनून तिने तिच्या आयुष्याचे सोने केले. अशाचप्रकारे स्त्रियांना आयुष्यात कधि ना कधी लहान मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. तसेच आपला आत्मसन्मान जपण्यासाठी प्राण पणास लावावे लागतात. अशावेळी स्वत: निसर्गाने घेतलेली परीक्षा समजून स्त्रियांनी ह्या आव्हानांना पुर्ण तयारीनीशी सामोरे जावे. तरच त्या स्वत:ला सिद्ध करू शकतील. आणि त्यांचे आयुष्य कारणी लागेल.

  माता माउलींची जेवढी थोरवी गायीली जाते तेवढेच त्यांचे जीवन काट्याकुट्यांनी भरलेले व आव्हानात्मक असते. जीवनातील त्या आव्हानांना कणखरपणे सामोरे जावून तसेच पुरून उरल्यामुळे त्या थोर ठरतात. अन्यथा त्यांचे जीवन मातीमोल ठरले असते. परंतू कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमानाचा ध्वज उंच ठेवल्यानेच त्यांच्या आयुष्याचे सोने होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *