
घरात मुलीचे आगमन झाल्यावर आई-वडीलांना आनंद होण्यासोबतच एका मोठ्या जबाबदारीची व कर्तव्याची जाणीव होते. कारण आई-वडील मुलीला परक्याचे धन मानतात. समाजनियमानुसार मुली आई-वडीलांच्या घरात पाहुण्याच असतात. आपल्या आयुष्याचा काही काळ तिथे घालवून त्या दिल्या घरी निघून जातात. आणि तेच त्यांचे खरे आयुष्य व घर असते. परंतू आई-वडीलांना आपल्या मुली प्राणांहून प्रिय असतात. त्यांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपून लहानाचे मोठे केल्यावर घरातून त्यांची पाठवणी करणे आई-वडीलांसाठी अत्यंत कठीण काम असते. परंतू समाजाने बनवीलेल्या नियमांपुढे त्यांचा नाईलाज असतो.
आई-वडील मुलींच्याप्रती असलेले त्यांचे निस्वार्थ प्रेम व्यक्त करण्यात तसेच कर्तव्य पुर्ण करण्यात कोठेही कमी पडत नाहीत. मुलींना सर्वतोपरी आनंदी ठेवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न असतो. मुलींचे लाडकौतूक करण्याबरोबरच संस्कारांचे बाळकडूही त्यांच्या मनावर बिंबवीण्यात येतात. त्यांच्या इच्छा आकांक्षा प्राथमिकता देवून पुर्ण करण्यात येतात. त्यांना शिक्षणाचे पाठबळ देवून स्वावलंबनाकडे नेण्यात येते. त्यासोबतच आणखी एक महत्वाचे काम आई-वडील करतात ते म्हणजे आपल्या मुलींना जीवनात कोणतीही उणीव भासू नये तसेच संकटांचा सामना करतांना त्या आर्थिकरित्या सक्षम असाव्यात म्हणून काटकसर करून मुलींसाठी संपत्तीची जमवाजमवही करतात. जी मुलींच्या नावाने बँकेत साठवीलेली रोख रक्कम तसेच दागिन्यांच्या स्वरूपात असते. मुलींसाठी हे धन अति मौल्यवान असते. कारण त्यात आई-वडीलांचे आशिर्वाद असतात. त्याचप्रमाणे त्यांच्या अजोड मायेचा स्पर्शही असतो. अशाप्रकारे स्त्रिधनाची उभारणी केली जाते व त्यामागे असलेला दृष्टीकोन व दुरदृष्टी त्याला बहुमूल्य बनवीतात.
मुलींना निसर्गत: लाभलेली संपत्ती म्हणजे त्यांचे सुंदर व निरागस मन असते. ज्याची खोली अथांग सागराप्रमाणे असते व त्यात साठवलेली माया आभाळाएवढी असते. मुलींच्या हातांना असलेली दानत त्यांना लक्ष्मीचे रूप प्रदान करते. कारण मुली जेव्हा आर्थिकदृष्टीने सबळ होतात तेव्हा त्या कुटूंबाचा मोठा आधार बनतात. त्यांच्या मनातील करुणा त्यांना संपुर्ण जगाला सामावून घेण्याचा मोठेपण बहाल करते. परंतू ह्या लालची विचारांनी ग्रासलेल्या जगाकडे मुलींचे सात्विक रूप बघण्याची दृष्टी नसते. त्यामुळे त्यांच्याकडून त्यांना निर्जीव वस्तूप्रमाणे वागणूक देण्यात येते. जन्मताच त्यांचा पायगुण पाहिला जातो. तर लग्न करतांना त्यांचे बाह्यरूप व सौंदर्य पाहिले जाते. तसेच त्यांच्या मार्फत घरात पैसा यावा ही अपेक्षा केली जाते. परंतू त्यांच्या अंतरंगातील सौंदर्य व निसर्गदत्त देणग्यांनी भरलेली त्यांची ओटी स्वार्थी व अतिसामान्य माणसांसाठी अतिशय क्षुल्लक गोष्ट असते. त्यामुळे ते तिच्याकडून सर्वकाही ओरबाडून घेण्यासाठी तुटून पडतात. तरिही मुलींमधला चांगुलपणा कोणिही हिसकावून घेवू शकत नाही.
मुली निरंजनातील वातीप्रमाणे कायम तेवत असतात व स्वयंप्रकाशीत असतात. त्यांच्यापाशी ते सर्वकाही असते जे त्यांच्या पंखांना बळ देण्यास पुरेसे असते. केवळ त्यांना त्यांच्या आंतरीक शक्तीस जागवीण्याची आवश्यकता असते. मुली कोमल हृदयाबरोबर खंबीर मनाच्या धनीही असतात. जेव्हा त्या लग्न करून एका नवीन कुटूंबात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ होते. जीवनातील त्या लढायांना त्या एकट्या सामोरे जातात. घराघरात मुली अनेक समस्यांशी झुंजत असतात. ज्यात त्यांना शारिरीक व मानसिक जाचासही सामोरे जावे लागते. त्या आर्थिकदृष्ट्या परावलंबी असतात. त्यांना पराकोटीचा त्याग करावा लागतो. त्यांच्याकडून अतोनात अपेक्षा केल्या जातात तसेच त्यांना आदराची वागणूक देण्यात येत नाही. जेव्हा ह्या सर्व गोष्टींची परिसीमा होते तेव्हा मुलींमधली आंतरीक शक्ती जागृत होते. आणि त्या त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी जिकरीचे प्रयत्न करतात. हा संघर्ष प्रत्येक मुलीच्या वाट्याला येतो. जीवनात त्यांना कधी ना कधी त्याचा सामना करावाच लागतो.
अशावेळी त्यांच्या पाठीशी दोन गोष्टींचे पाठबळ हवे असते. एक भावनीक आधार देणारी जीवलग व्यक्ती आणी दुसरे जगाला ज्याची भाषा कळते ते म्हणजे धन. जे आई-वडील त्यांच्या क्षमतेप्रमाणे साठवीतात आणि कष्टाळू व स्वाभिमानी मुली स्वकष्टानेही त्याची जुळवाजुळव करतात. जीवनातील संकटसमयी हे स्त्रिधन मुलींचा मोठा आधार असते. त्या बळावर योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याचे धाडस त्या करू शकतात. स्वत:ला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्यासाठी एखादा कोर्स करू शकतात. अपूर्ण राहिलेले शिक्षण पुर्ण करू शकतात. तसेच आत्मसन्मानाच्या जीवनाच्या मानकरी होवू शकतात.
मुली त्यांच्या आयुष्यात संघर्षाचे आगमन झाल्यावर त्याच्यापुढे हतबल होवून हात टेकतात कि स्वत: सक्षम होवून संघर्षांच्या डोक्यावर ताठ मानेने उभ्या राहतात हे महत्वाचे असते. जीवनसंघर्षात तावून सुलाखून निघालेल्या मुली आणखीच तेजस्वी होतात. कर्तुत्ववान मुलींना स्त्रिधनाचा योग्यवेळी आधार मिळाल्यास त्या आपल्या जीवनास एक उदाहरण बनवू शकतात आणि पुढच्या पिढीसाठी पुन्हा स्त्रिधनाची निर्मीती करून त्यात आपल्या कर्तुत्वाचा एक जास्तीचा मणी वाढवू शकतात. जेव्हा आयुष्यात मुलींना त्यांच्यातील निसर्गदत्त देणग्यांना उजाळा देण्याची संधी लाभते तेव्हा त्या आपल्या उज्वल व्यक्तीमत्वाने अजरामर होतात. पुढच्या अनेक पिढ्यांना त्यांचा अभिमान वाटतो आणि प्रोत्साहनही मिळते. तेव्हा स्त्रिधनावर केवळ स्त्रियांचाच अधिकार असतो. ते कसे व केव्हा उपयोगात आणावे किंवा तसेच सांभाळून ठेवावे ह्याचा निर्णय केवळ त्यांचा असतो. त्यावर कोणिही हक्क दाखवीणे, त्याचा गैरवापर करणे तसेच हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे भ्याडपणाचे लक्षण आहे. त्यात पुरूषार्थ व माणुसकी ह्या दोन्हीची झलक नाही.
स्त्रियांना आपला जोडीदार कर्तुत्ववान पुरूष असावा अशी इच्छा असते. स्वत:ला सिद्ध करण्याच्या मार्गात कधिकधी त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. जेव्हा पती-पत्नी आपल्या नात्याला मैत्रीची झालर लावतात तेव्हा अडीअडचणीच्या समयी त्यांना कोणत्याही बाहेरच्या माणसाची गरज पडत नाही. कारण ते एकमेकांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असतात. तसेच स्त्रिया पतीच्या प्रगतीसाठी कायम प्रयत्नशील असतात. जोडीदारावर तत्सम वेळ आलीच तर त्या अत्यंत निस्वार्थभावाने स्त्रिधनाचा त्याग करतात. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असतो. कारण त्यांना स्त्रिधनाविषयी आसक्ती ठेवण्यापेक्षा ते धन आपल्या माणसाच्या प्रगतीसाठी उपयोगी पडणे फार महत्वाचे वाटते. अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे स्त्रिधनाचे पाठबळ देवून स्त्रियांनी जोडीदाराला जीवनात पुन्हा उभे राहण्याचे बळ दिले आणि जोडीदारानेही त्या मदतीचा सन्मान राखत व पत्नीच्या बेलाख इच्छेसाठी यशाची उंची गाठली.
घरादारात स्त्रियांचे महत्वाचे स्थान असते. स्त्रिया प्रेमाने काळजीने व संस्काराने घरास एकसंध बांधून ठेवण्याचे महत्वाचे काम करतात. स्त्रियांच्या मनात शुद्ध हेतू असतो तो म्हणजे आपल्याशी जुळलेल्या माणसांचे सर्वतोपरी कल्याण व्हावे. त्यांना धनसंपत्तीचे आकर्षण नसते तर प्रेमाबरोबर जरास्या सम्मानाची आवश्यकता असते. त्या प्रगती करण्याचे व आयुष्यात पुढे जाण्याचे विचार आपल्या जोडीदारावर केंद्रीत करतात. आणि जोडीदाराच्या प्रगतीकडे डोळे लावून आयुष्य व्यतीत करतात. अशा ह्या सत्वशील स्त्रियांचे स्त्रिधनही किती व कोणत्याही स्वरुपात असले तरी घराच्या उत्कर्षासाठी समर्पीत असते. त्यात कोणताही बडेजाव नसतो तसेच अभिमानाची झळाळीही नसते. तर त्यात विनम्रता असते, स्वाभिमान असतो, त्याग असतो तसेच निस्वार्थपणे मदतीची भावना असते. तेव्हा स्त्रिधनावर डोळा ठेवून त्यास लालसेचे गालबोट लावू नये. स्त्रियांच्या मर्जीशिवाय स्त्रिधनाचा वापर करणे टाळावे. स्त्रिधनाचे पावित्र्य जपले गेले पाहिजे. कारण ती एका कर्तुत्ववान स्त्रिची जमापुंजी पुढच्या पिढीतील स्त्रियांसाठी एक उत्कृष्ठ भेट असते. स्त्रिसामर्थ्याचा वारसा असतो. तो तसाच जपला गेला पाहिजे. तसेच तो स्त्रियांचे जीवन घडविण्यास उपयोगी पडला पाहिजे.
1. स्त्रिधन ही केवळ जमापुंजी नाहीतर आशिर्वाद असतात.
स्त्रिधनाची उभारणी करतांना काटकसर केली जाते. परंतू ती काटकसर करतांना मनात ह्या गोष्टीचा आनंद असतो कि आपण शरीर रुपात असलो किंवा नसलो तरिही आपल्या आशिर्वादाने समृद्ध असे हे धन आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर कायम असेल. तिचा आधार बनेल व तिला सुरक्षाही प्रदान करेल. त्यात सामावलेली माया अमर्याद असते. त्यात दुरदृष्टीही असते. एका स्त्रिने दुसर्या स्त्रिसाठी केलेला सखोल विचार असतो. तसेच मायेचा स्पर्शही असतो. त्यामुळेच माता-पित्याच्या कष्टाचा, आशिर्वादाचा व प्रेमाचा एकाच ठिकाणी संगम असलेला तो ऐवज त्याच्या किंमतीहूनही जास्त बहुमूल्य असतो. हीच त्याची विशेषता असते.
2. स्त्रिधनाचा स्त्रियांना मोठा आधार असतो.
स्त्रियांचे जीवन संघर्षमय असते. कधिकधी समाजनिर्मीत लग्नव्यवस्थाच त्यांच्या जीवनात उलथापालथ निर्माण करते. अशावेळी आई-वडीलांनी केलेले संस्कार, शिक्षण व स्त्रिधन ह्या तीन गोष्टी त्यांना त्यांच्या जीवनात पुन्हा स्थिरता आणण्यास मदत करतात. जेव्हा स्त्रिया परावलंबी असतात तेव्हा त्यांना आपल्या गरजा भागवीण्यासाठी पतीसमोर हात पसरावे लागतात. पती समंजस नसला तर स्त्रियांच्या आत्मसम्मानास डिवचल्याशिवाय तो त्यांची कोणतिही मदत करत नाही. अशावेळी आपला आत्मसम्मान राखण्यासाठी स्त्रिया पैस्या पैस्यासाठी त्रस्त होतात. परंतू स्त्रियांना स्त्रिधनाचा आधार असला तर त्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करू शकतात. आणी आपले जीवन स्वबळावर व आत्मसम्मानाने जगू शकतात.
3. स्त्रिधन स्त्रिसामर्थ्याचा गौरव करण्यास उपयोगी पडते
स्त्रियांचे सामर्थ्य त्यांच्या अंतरंगात असते. ज्या स्त्रियांना त्याची जागृती होते त्यांना त्यास गौरवास्पद बनवीण्यासाठी संघर्षाचा मार्ग अवलंबावा लागतो. अशावेळी कधि परिस्थिती विपरीत असते तर कधी आसपासची माणसे त्यांच्या विरोधात उभी असतात. त्यासोबत अपेक्षांचा भडीमारही त्यांच्यावर होत असतो. अशापरिस्थितीत स्थिर उभे राहण्यासाठी स्त्रियांना एक भक्कम आधार पाहिजे असतो. त्यावेळी त्या स्त्रिधनाकडे आशेने बघतात. कारण काही करण्यासाठी हातपाय हलवायचे असल्यास आपल्यापाशी निदान धनाची तरी सोय असावी लागते. अशापद्धतीने स्त्रिधन स्त्रियांमधील सामर्थ्य जगापुढे आणण्यास उपयोगी पडते.
4. स्त्रिधन हे संस्कारांचा वारसा असते
घरात आईचे स्त्रिधन तिच्या मुलीच्या सुपूर्द करण्यात येते. मुलीने तिच्या आयुष्यात कितीही प्रतिष्ठा व भौतिक श्रीमंती मिळवीली तरी आईने आपल्या अंगावर कधी ल्यालेले दागिने जेव्हा मुलीच्या हातात असतात तेव्हा आईच्या आठवणींनी तिचा उर भरून येतो. त्या दागिन्यांना स्पर्श करून तसेच त्यांना अंगावर घातल्यावर आई आपल्या आसपासच असल्याची सुखद जाणीव मुलींना होते. त्यामुळे स्त्रिधनाविषयी मुली अंतर्मनाने संलग्न असतात आणि आजीवन त्याला जीवापेक्षा जास्त जपतात. जेणेकरून हा संस्कारांचा वारसा असाच पुढे पुढे जात रहावा. त्याचप्रमाणे प्रत्येक आईने आपल्या कर्तुत्वाचा आणखी एक मणी त्यात गुंफावा.
स्त्रिधन म्हणजे संस्कारांचा धागा असतो. ज्यात स्त्रिसामर्थ्याचा स्त्रिकर्तुत्वाचा एक एक मणी प्रत्येक आईने गुंफलेला असतो. तेव्हा प्रत्येक मुलीच्या पाठी स्त्रिधनाचे भक्कम पाठबळ देवून त्यांना पराक्रमी बनवावे. तसेच स्त्रियांनीच स्त्रिसामर्थ्याला गौरवशाली बनवीण्यास प्रेरीत करावे. स्त्रिधनाचा याहून उत्तम उपयोग आणखी कोणता असू शकतो.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)