स्त्रियांच्या आयुष्यातील ते अवघड पाच दिवस

 निसर्गाने स्त्रियांना विशेष घडविले आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीत त्यांना खास मानही आहे. स्त्रिया घरा-दाराची शोभा वाढवितात. त्यांच्यावर निसर्गाने सृजनाचे महत्वपूर्ण कार्यही सोपविले आहे. त्यामुळे त्यांना लाभलेल्या अनेक विशेषतांमध्ये त्यांचे मांगल्य आणि मातृत्व हे वरदानच समजले पाहिजे. कारण त्यास जोपासण्यासाठी त्यांच्या हृदयात माया, ममता, वात्सल्य हे विलक्षण आईपणाचे गुणधर्म जन्मताच रुजविले गेलेले असतात. तसेच त्यांना भविष्यात ज्या मातृत्वाला सामोरे जावयाचे असते त्याची तयारीही त्यांच्या नकळत्या  लहान वयात म्हणजे शालेय जीवनापासूनच सुरू होते. तेच हे स्त्रियांच्या आयुष्यातील अवघड पाच दिवस असतात. 

   हे पाच दिवस कोणत्याही मुलीस नकोसे असतात. कारण त्या दिवसात होणारा शारिरीक त्रास, हॉर्मोंनल असंतुलना मुळे होणारी स्वभावातील चिडचिड तसेच मानसिकतेत अचानक येणारा बदल ह्या गोष्टींमुळे जगणे कठीण झाल्याप्रमाणे वाटते. त्याचबरोबर दैनंदिन दिनचर्येत येणार्‍या अनेक अडचणी मुळे सगळेच दुर्भर होवून जाते. परंतू हे नैसर्गीक चक्र एकदा सुरू झाले कि कोणीही  त्यास थांबवू शकत नाही. मुलींना त्या पुढचे आयुष्य तोपर्यंत ह्या नैसर्गीक चक्राबरोबर घालवायचे असते. जोपर्यंत काळान्वये ते चक्र थांबत नाही. परंतू स्त्रियांनी मात्र ह्या क्लिष्ट वाटणार्‍या समस्येवरही मात करत स्वत:चे पाऊल प्रगतीपथावर  टाकले आहे. असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही ज्यावर स्त्रियांनी विजय मिळविला नाही. 

    पूर्वी ह्या अवघड पाच दिवसांना रूढी परंपरेशी आणि अंधश्रद्धेशी जोडण्यात येत असे. त्यामुळे त्यावरून स्त्रियांना अनेक दिव्य पार करावी लागत असत. त्या काळात त्यांना वेगळे ठेवण्यात येत असे. शिवाशिव आणि विटाळ पाळण्यात येत असे. कोठेही स्पर्श करण्यास मनाई केली जात असे. देवघरात जाण्यास तसेच स्वयंपाक खोलीत जाण्यास ही बंदी असायची. परंतू हे कठोर नियम मात्र स्त्रीयांकरीता आरोग्याच्या दृष्टीकोनातून फायदेशीरच होते. कारण त्या निमीत्ताने स्त्रियांना त्या काळात आराम करण्यास वेळ मिळायचा. ज्याची त्या अवस्थेतील स्त्रियांना नितांत गरज असायची. त्याचबरोबर त्या कालावधीत घ्यावयाची शारीरिक स्वच्छतेची काळजी सुद्धा एकांतवासामुळे शक्य होत असे. एकंदरीत त्या पाच दिवसात पाळावयाचे कठोर नियम हे काहीप्रमाणात स्त्रियांच्या फायद्याचेच होते. अशाही क्लिष्ट परिस्थितीत कोणत्याही रूढी परंपरांना न जुमानता स्त्रियांना शिक्षणाचे महत्व समजवून. त्यासाठी त्यांना तयार करण्याचे काम अनेक पुरूषांनी त्या काळात केले. अशाप्रकारे अनेक स्त्रियांच्या समस्या सोडविण्यासाठी आपल्याशी जुळलेल्या एका स्त्रिची मानसिकता घडवीण्यास  पुरूषांनी घेतलेला पुढाकार. पुढे स्त्रियांच्याच मोलाच्या योगदानाने यशस्वी ठरला.  

  स्त्रिया ह्या गृहिणी असो अथवा नोकरी निमीत्ताने घराबाहेर पडणार्‍या असो त्यांना घर कामा पासून पळ काढणे शक्य नाही. त्यातल्या त्यात नोकरी किंवा व्यवसायीक स्त्रियांच्या धाडसाची तर दादच द्याविसी वाटते. कारण त्या घर आणि मिळकतीचे ठिकाण अशा दोनही आघाड्यांना एकाच वेळी न्याय देत असतात. परंतू ते करतांना मात्र त्यांची तारेवरची कसरत सुरू असते.  त्यातच त्यांना  ह्या दर महिन्यातील पाच अवघड दिवसांना सामोरे जावे लागते. तसेच त्यात होणार्‍या शारिरीक त्रासाने स्त्रियांना जास्त थकवा जाणवतो. 

   अशा स्थितीतही स्त्रिया आपली कामे प्रामाणिकपणे करतात. ज्या स्त्रिया गृहिणी आहेत, त्यांना तास न तास स्वयंपाक घरात उभे राहून स्वयंपाक करण्यासोबतच इतरही कामे करावी लागतात. अशावेळी त्यांची शारिरीक त्रासा बरोबर मानसिक चिडचिडही होते. त्याचप्रमाणे प्रत्येक वेळी त्यांना ती व्यक्त करणेही शक्य होत नाही. तेव्हा शांततेने आपली कामे करण्यावाचून त्यांना पर्याय नसतो. 

   मिळकतीसाठी काम करणार्‍या स्त्रियांना दररोज घराबाहेर पडणे आणि प्रवासाला सामोरे जाणे अनिवार्य असते. अशावेळी अवघड दिवसांच्या त्या शारिरीक त्रासात त्यांची केविलवाणी अवस्था होते. दिवसभर्‍याच्या थकव्यानंतर पुन्हा घरातील जबाबदार्‍या त्यांची वाट बघतच असतात. एका स्त्रिला तिला लाभलेल्या मातृत्वाच्या देणगीसाठी किती सहन करावे लागू शकते. ह्याची कल्पना करणेही इतरांना अवघड गोष्ट आहे. परंतू स्त्रिया अगदी सवयीचे असल्या प्रमाणे ह्या सर्व त्रासांना सहन करतात. तसेच तेवढ्यावरच त्या थांबत नाहीत तर स्वत:च्या प्रगतीसाठीही आवर्जून पुढाकार घेतात. त्यांना भरारी घेण्यापासून काहिही आणि कोणिही थांबवू शकत नाही. 

   परंतू आजच्या काळात स्त्रियांच्या ह्या अवघड पाच दिवसांविषयी अगदी उघडपणे वाच्यता केली जाते. त्याचप्रमाणे त्या संबंधीचे ज्ञान आणि त्याच्याशी निगडीत समस्यांबद्दल पुरूषांनाही जागरूकता आलेली आहे. हे विशेष सांगावेसे वाटते. त्यामुळे त्या विषयाची लपवा-छपवी आता राहिलेली नाही. ”पॅडमॅन” सारख्या सिनेमांनी हा विषय सविस्तरपणे पुढे आणला. तसेच त्या दिवसात पाळली न जाणारी स्वच्छता, त्याविषयी असलेले अपूरे ज्ञान आणि त्यामुळे स्त्रियांच्या जीवालाही असलेला धोका हे सर्वकाही पडद्यावर दाखवून समाजाची कान उघडणी केली आहे. 

    त्यामुळे आता मोठ्या कंपन्यांमध्ये स्त्रियांच्या ह्या विषयासाठी सुविधांची अंमलबजावणी केली जाते. तिथे काम करणार्‍या महिला कर्मचार्‍यांना ह्या अवघड दिवसात आराम करता यावा ह्याकरीता विशेष रजा देण्यात येते. आणि त्या रजेचा त्यांना पगारही मिळतो. हे स्त्रियांच्या समर्थनार्थ उचलण्यात आलेले खुप मोठे पाऊल आहे. ज्यात स्त्रियांच्या मातृत्वाचा सम्मानही आहे. 

1. त्या दिवसात स्त्रियांची मानसिकता सांभाळली पाहिजे 

  त्या अवघड पाच दिवसात शारिरीक त्रासाबरोबर स्त्रियांच्या स्वभावातही लहरीपणा दिसून येतो. त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता भासते. स्वभावात नकारात्मक भाव आणि चिडचिडपणा जाणवत असतो. उर्जेच्या कमतरतेमुळे काहिही करण्याची त्यांची मनापासून इच्छा नसते. वागन्या आणि बोलण्यात विनाकारण उदासिनता वाढते. त्या दिवसात हार्मोनल असंतुलनामुळे अशी लक्षणे दिसणे स्वाभाविक आहे. 

   अशावेळी घरातील सदस्यांनी लक्षपूर्वक वागले पाहिजे. तसेच घरातील स्त्रियांमध्ये अशी लक्षणे दिसताच त्यांच्याशी वागतांना स्वत:चे डोके शांत ठेवले पाहिजे. स्त्रियांना त्या काळात एखादी छोटीशी चूकही फार मोठी समस्या वाटू लागते. त्यात त्यांचा काहिही दोष नसतो. त्यांच्या मनाची घालमेल वेगळ्याच कारणांनी होत असते. अशावेळी त्यांचे म्हणणे इतरांनी शांततेने ऐकुण घेणेही त्यांच्यासाठी फार महत्वाचे असू शकते. त्यांना होणार्‍या त्रासांना त्यांच्या जागेवर जावून समजून घेणे म्हणजे त्यांच्या भावनांवर केलेली सौम्य सुश्रुषा ठरू शकते. तसे करून आपण त्यांचा विश्वास आणि मन दोन्ही जिंकू शकतो. तसेच त्यांना मन मोकळे करण्यास प्रवृत्त करू शकतो. 

2. घरात मोकळे वातावरण असले पाहिजे.

  स्त्रियांच्या ह्या अवघड पाच दिवसात त्यांना शारिरीक वेदनांना सामोरे जावे लागते. हे सत्य कधिही बदलणारे नाही. परंतू तरीही आता त्या विषयाची जागरुकता प्रत्येकास आलेली आहे. त्यामुळे घरात त्या बद्दल अवघडलेपणा दिसून येत नाही. स्त्रियांच्या प्रगतीचा वेग बघता ही आजच्या काळाची गरजही आहे. त्यामुळे प्रत्येक घरातील स्त्रिया ज्यात पत्नी, मुलगी, बहिण ह्या आज कर्तुत्ववान आहेत. 

   घरातील जबाबदार्‍या  सांभाळून घरा बाहेरही पडत आहेत. त्यांना ह्या पाच दिवसातील कठिण दिवसात कोणतेही मानसिक दडपण येणार नाही ही काळजी मात्र घरातील पुरूषांनी घेतली पाहिजे. तसेच घरातील वातावरण हलके फुलके कसे राहील ह्याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. स्त्रियांना अशा कोणत्याही कठोर नियमात बांधून ठेवू नये जे त्यांच्या आरोग्यापेक्षा वरचढ असतील. त्याचप्रमाणे घरातील आनंद टिकवून ठेवण्यासाठी कोणा एका व्यक्तीचीच फरफट होता कामा नये. तसेच त्यासाठी त्या व्यक्तीस खुप मोठी किंमतही चुकवावी लागू नये. 

   एखादे विशेष काम घरातील स्त्रियांनीच करावे. कोणत्याही स्थितीत पुरूषांनी त्या कामास हात लावू नये. असे न बदलणार्‍या आणि डोईजड विचारांना ताबडतोब मुठमाती देण्यात यावी. आपल्या घरातील स्त्रियांच्या सुरक्षेपेक्षा जास्त महत्वाचे काहिही नसले पाहिजे. घरातील स्त्रिया आनंदी तर घर आनंदी आणि त्यांच्यामुळे घराला घरपण असते. तेव्हा हा आनंद कायम टिकवून ठेवण्यासाठी कितीही मोठी किंमत चुकविण्याची आपली तयारी असली पाहिजे. 

3. घरातील कामात हातभार लावावा. 

  आधुनिक युगातील स्त्रिया सर्व दृष्टीकोनातून प्रगतीशील आहेत. नविन तंत्रज्ञानाचा वापर करणे शिकून त्यांनी मोठाच पल्ला गाठला आहे. त्यामुळे त्या एकाच वेळी अनेक कामांना न्याय देवू शकतात. दिवसा ऑफिसमध्ये काम करणार्‍या स्त्रिया तेथूनच घरातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवू शकतात. जणुकाही अष्टभुजाधारी देवीचे स्वरूपच आजच्या स्त्रियांमध्ये बघावयास मिळते. असे जरी असले तरीही त्यांच्या मागे जबाबदार्‍यांचा आणि डोक्यात विचारांचा व्याप असतो. 

   तेव्हा ह्या अवघड पाच दिवसात त्यांची विशेष देखभाल करण्याची आणि त्यांना जपण्याची गरज असते. कारण कामांची चिंता आणि त्या दिवसात होणारी चिडचिड तसेच मानसिक असंतूलन ह्यामुळे त्यांना कमालीचा थकवा जाणवतो. त्यासाठीच घरातील कामांना सर्वांनी मिळून करण्याचा नियम प्रत्येक घरात अंमलात आणला गेला पाहिजे. त्यामुळे स्त्रियांच्या अवघड दिवसात त्यांची फार दमछाक होणार नाही. तसेच त्यांना आराम करण्याची संधी मिळेल. त्यानंतर त्या जास्त जोमाने आपल्या जबाबदार्‍या पार पाडू शकतील. 

4. स्त्रियांची देखभाल ही संपुर्ण कुटूंबाची जबाबदारी आहे. 

  मुली, स्त्रिया ह्या आपल्या घरादाराचे आणि आपल्या संस्कृतीचे उज्वल भविष्य आहेत. त्यांना निसर्गाने विशेष घडवून विशेष उद्देशाने जन्मास घातले आहे. त्या जेवढ्या भावनाशिल, नाजूक असतात तेवढ्याच आंतरिक कणखरतेणे समृद्धही असतात. त्यांचे पावित्र्य त्यांना सत्वशील बनवीते. आपल्या माणसांसाठी त्या कितीही काबाडकष्ट करण्यास तयार असतात. वेळप्रसंगी संपुर्ण कुटूंबाची जबाबदारी पेलण्याची हिंमतही त्यांच्यात असते. तेव्हा आता स्त्रियांना आपल्या अंगावरचे ओझे नाही तर भक्कम आधार समजण्याची वेळ आली आहे. 

   कर्तुत्वाच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास स्त्रिया आणि पुरूषात आता अंतर उरलेले नाही. अशा ह्या कर्तृत्ववान स्त्रियांच्या खांद्यांवर मातृत्वाचीही जबाबदारी आहे. आपल्या घरातील लेकी सुना पिढ्यांना समोर नेण्याचे श्रेष्ठ कार्य करणार आहेत. तेव्हा त्यांच्या आरोग्याची आणि शारिरीक व मानसिक देखभालीची जबाबदारी संपुर्ण कुटूंबाने उचलली पाहिजे. कारण सर्वतोपरी सुदृढ असलेली एक माताच पुढच्या पिढीसही सुदृढ बनविते. स्त्रियांच्या भावना जपल्याने आणि त्यांच्या इच्छांचा मान राखल्याने कोणताही पुरूष कमकुवत ठरत नाही. त्याउलट तो एक आदर्श पुरूष ठरतो. कारण त्याला स्त्रियांच्या मातृत्वाचा सम्मान करणे जमले  असा त्याचा अर्थ होतो.

   त्या पाच अवघड दिवसांचे महत्व स्त्रियांना कळले आहे. त्यामुळे त्या त्यासंबंधीत सगळे शारिरीक त्रास आणि मानसिक उलथा-पालथ त्या सहन करतात आणि त्यांच्या बरोबर जगणे शिकतात. त्याचबरोबर त्याच्या वरही मात करून स्वत:ची प्रगती करण्यासही मागे हटत नाहीत. स्त्रिया कधिही समस्ये पुढे हात टेकत नाहीत. त्यांच्या वर पाय ठेवून सक्षमपणे उभ्या राहतात. हा आजवरच्या सर्व कर्तुत्ववान स्त्रियांचा इतिहास आहे. तरीसुद्धा घरातील इतर सदस्यांनी खासकरून पुरुषांनी स्त्रियांच्या संयमाची वेळोवेळी दाद दिली पाहिजे. कारण पराकोटीची मानसिक उलथा पालथ सुरू असतांना त्या घर घरातील सदस्य तसेच कारकीर्द अशा बहु आघाड्यांवर प्रामाणिकपणे तैनात असतात. म्हणूनच प्रत्येक स्त्री रणरागिणी आहे. स्त्रियांच्या धाडसीपणाची कमाल आहे आणि त्यांच्यातील हरहुन्नरीपणास सलाम आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *