स्त्रियांना पुरुषांचे पाठबळ आवश्यक का?

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचे निरपेक्ष योगदान व पडद्यामागची भूमिका ही असतेच. त्याशिवाय त्या पुरुषाचे यशस्वी होणेच अशक्यप्राय आहे. कारण स्त्री मग ती कोणत्याही भूमिकेच्या माध्यमातून का असेना ज्या पुरुषाच्या आयुष्याशी जोडली जाते त्या पुरुषाप्रती कायम कृतज्ञ असते. त्याचप्रमाणे त्या पुरुषाच्या प्रगतीची मनोमन कामना करते. त्याच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या गोष्टींप्रती सतर्कता बाळगते. त्याची काळजी घेण्या सोबतच वेगवेगळ्या मार्गांनी त्याचे मनोबल वाढविते. त्याला सर्वतोपरी आनंदी ठेवते. आपली स्वप्न व महत्वाकांक्षांचा मोठ्या मनाने त्याग करून त्याच्या ध्येयाशी एकरूप होते. म्हणूनच आजवर होवून गेलेल्या थोरामोठ्यांनी देखील त्यांच्या जीवन संगीनीस सर्वार्थाने आपल्या यश प्राप्तीच्या प्रक्रियेचे मानकरी घोषित केले. कारण पुरुषांच्या आयुष्यात मुख्यत्वे करून आई व पत्नी ह्या दोन स्त्रियांचे विशेष योगदान असते. त्यापैकी एक त्या पुरुषाला जन्म देते. तसेच आपल्या संस्काररूपी दूरदृष्टीने त्याचे संगोपन करून त्याच्या व्यक्तीमत्वाला आकार देते. तर दुसरी पुरुषाच्या त्या तयार व्यक्तीमत्वाचा पूर्णता स्वीकार करून त्याच्यात आपल्या बहुमूल्य भावना प्रेम व आशा आकांक्षा गुंतवीते. त्याचबरोबर त्याला आजीवन मोलाची साथ देवून आपली एकनिष्ठता सिद्ध करते. अशाप्रकारे स्त्री पुरुष हे एकमेकांना पूरक असतात. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात राजमाता जिजाऊ आईच्या भूमिकेत. संत ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात मुक्ताई बहिणीच्या भूमिकेत. प्रभू श्रीरामांच्या आयुष्यात देवी सीता पत्नीच्या भूमिकेत अजरामर झाल्या.

आजच्या युगातील स्त्रिया ह्या पुरूषांना केवळ घरापुरते मर्यादित राहूनच मोलाची साथ देत नाहीत. तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा आर्थिक भार वाटून घेण्याकरीताही जोमाने पुढे सरसावत असतात. अशाप्रकारे आता त्यांच्यावर दुहेरी जबाबदाऱ्या आलेल्या आहेत. कारण घर हे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्वस्वी स्त्रियांच्या प्रतीनीधीत्वाखालीच असणे अनिवार्य असते. म्हणूनच घरातील माणसे घरातील कर्तव्ये प्रसंग सणवार तसेच घराशी निगडीत कोणतेही व्यवहार स्त्रियांच्या उपस्थितीशिवाय पार पडत नाहीत. त्यामुळे हे सर्व सांभाळल्या नंतरच स्त्रियाही घराबाहेर पडण्यास मानसिक रीत्या तयार होत असतात. अशारितीने दोन आघाड्यांवर तैनात होवून का होईना आजची स्त्री स्वावलंबी व स्वतंत्र मात्र झालेली आहे. परंतू ह्या स्वतंत्र झालेल्या स्त्रियांना कशे जपले पाहिजे हे त्यांच्या कुटूम्बांना अजून तरी जमलेले नाही. कारण आपल्यावर पुरूष प्रधान संस्कृतीचे प्रचंड वर्चस्व आहे. त्यानुसार घरात सर्वप्रथम लैंगिक भेदभावाप्रमाणे कामांचे वाटप झालेले असते. अशाप्रकारे हे काम स्त्रियांचे व हे काम पुरुषांचे अशा बिनबुडाच्या मान्यतांचा पगडा मनामनांवर अजूनही राज्य करत आहे. त्याचप्रमाणे पुरुषांच्या मनात पुरुषी मानसिकता जड पकडून बसलेली आहे. ज्यामुळे स्त्रियांना घरातच मानसिक त्रासाला व शारीरिक हिंसाचारालाही सामोरे जावे लागु शकते. घरातील स्त्रियांचीही आपसात शितयुद्ध्ये सुरू असतात. त्यामुळे वरिष्ठ स्त्रियांकडून घरातील नोकरदार स्त्रीस कोणतेही सहकार्य मिळत नाही. अशावेळी स्त्रियांना घरातील पुरुषांनी विशेषता जोडीदाराने सामंजस्याने पाठबळ दिले पाहिजे. कारण जोडीदाराचे पाठबळ मिळाल्याने स्त्रियांमध्ये आत्मबळ संचारते. ज्यामुळे त्या आपल्या मनातील कोणत्याही प्रकारच्या भीतीवर सहज विजय मिळवू शकतात. तेव्हा आता पुरुषांनी आपल्या जीवनसंगीनीस सर्वतोपरी पाठबळ देण्यास सज्ज झाले पाहिजे. कारण एक माणूस म्हणून त्यांच्या सम्मानार्थ सहकार्य व समर्थनाचा पाठीम्बा देण्यातच पुरूषांचा खरा पुरुषार्थ दडलेला आहे.

समाजात आज जे स्त्रियांवरील अत्याचारांचे अराजक माजलेले आहे. त्यावरून स्त्रियांच्या असुरक्षेचे आपोआपच प्रमाण मिळते. चीमुकल्यांपासून ते वयस्क स्त्रियांपर्यंत प्रत्येकीला समाजातील निर्घुण अमानवी पाशवी दुष्कृत्यांचा धोका निर्माण झाला आहे. परंतू ह्या धोक्यामुळे स्त्रिया आपली स्थिरस्थावर झालेली कारकीर्द सोडून तसेच पुन्हा एकदा आपले स्वातंत्र्य हिरावून घेवून चार भिंतींच्या आड तर बसणार नाहीत ना. कारण स्त्रियांचे असे प्रत्येक क्षेत्रात बाजी मारणे. त्यांना जोडीदारापेक्षा उच्च पदाची व जास्त वेतन असलेली नोकरी असणे. स्त्रियांच्या ह्या आणि अशा अनेक किरकोळ वाटणाऱ्या परंतू पुरुषी मानसिकतेस तुलनात्मकभावाने डीवचणाऱ्या गोष्टी बहुतांशी पुरुषांच्या मनात द्वेषाची भावना निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असतात. त्याच द्वेष भावनेतून आज स्त्रियांवर घर व बाहेर दोन्ही ठिकाणी अत्याचाराच्या शक्यता अतिशय वाढलेल्या आहेत. तसेच ह्या सर्व दृष्टीकोनातून स्त्रियांचे जीवनच एकप्रकारे असुरक्षेच्या खाईत गेलेले आहे. कारण स्त्रियांना त्यांची जागा दाखवून देण्याकरीता पुरुषांच्या रुपात जणूकाही राक्षसच सर्वत्र मोकाट फिरत असतात. परंतू स्त्रियांना त्यांची ओळख इतक्या सहजा सहजी पटणे अशक्य आहे. अशाप्रकारे आता स्त्रियांचे जगणे फार कठीण झालेले आहे. तेव्हा प्रत्येक समंजस पुरुषांनी आपल्या घरातील स्त्रिया जसे मुलगी बहिण पत्नी ज्या शिक्षणानिमित्ताने किंवा नोकरी निमित्ताने नियमितपणे घराबाहेर पडत असतात. त्यांच्या साठी घरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करावे. जेणेकरून त्यांना प्रवासात व कारकीर्दीच्या ठिकाणी होणारे त्रास त्या मोकळेपणे बोलून दाखवू शकतील. त्यांना घरात सहकार्य करावे. जेणेकरून त्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. घरातील पुरुषांनी समजदारी दाखविण्याची आता खरी वेळ आलेली आहे. कारण स्त्रिया म्हणजे काही यंत्र नाहीत. तेव्हा त्यांचे भावनिक स्वास्थ्यही जपणे महत्वाचे आहे. त्यासाठी पुरुषांनी त्यांच्याशी सखोल संवाद साधला पाहिजे. त्यांच्या त्रासांची त्यांना जाणीव असली पाहिजे. त्या दृष्टीकोनातून त्यांनी स्त्रियांच्या दिशेने स्वत:हून मदतीचा हात पुढे केला पाहिजे. पुरुषांनी स्वत:मधील मीपणा घालविण्यासाठी स्वत:मध्ये जागरूकता आणली पाहिजे. कारण मीपणा हा घराच्या सौख्याचा घास घेत असतो. त्यापेक्षा पुरुषांमध्ये सामंजस्य मदतीसाठी तत्पर तसेच प्रत्येक गोष्टीत मनाचा मोठेपणा असावा. अशाप्रकारे स्त्रियांना पुरुषांकडून भावनिक पाठबळ मिळणे अत्यावश्यक आहे. कारण आता गृहलक्ष्मीने कर्तुत्वाच्या क्षेत्रात पदार्पण केलेले आहे. तेव्हा तिच्या शुभ पावलांचे पावित्र्य जसेच्या तसे राखण्यासाठी पुरुषाचे सामर्थ्य पणास लागलेच पाहिजे.

स्त्रिया आपल्या भावनिक जगात त्यांच्याशी जुळलेल्या पुरुषाला सर्वात उच्च दर्जा देत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी त्या पुरुषांचे त्यांनी घेतलेल्या निर्णयात तसेच त्यांच्या विचारांशी सहमत असणे सर्वाधिक महत्वाचे असते. कारण जोडीदाराची साथ स्त्रियांना संपूर्ण जगावर त्यांचे साम्राज्य प्रस्थापित झाल्याचे सुख देत असते. म्हणूनच जर पुरूष त्यांच्यापासून कोणत्याही कारणाने दुरावला तर स्त्रिया पूर्णपणे कोलमडून जातात. तेव्हा स्त्रियांच्या कर्तुत्वाचा आलेख समाजात वाढता ठेवावयाचा असेल तर स्त्रियांना घरातून पुरुषांचे भावनिक पाठबळ मिळालेच पाहिजे.

स्त्रिया सर्वथा सामर्थ्यशाली असतात. परंतू त्यांचा स्वत:वरचा विश्वास हा हललेला असतो. कारण त्यांना त्यांच्या जोडीदाराचे त्यांच्या विषयीचे मत हे अधिक महत्वपूर्ण वाटत असते. तेव्हा जोडीदाराने आपल्याला पसंत करावे तसेच त्याने आपली स्तुती करावी ह्यासाठी त्या सर्वकाही करत असतात. कारण जोडीदाराच्या एका स्तुतीपूर्ण शब्दाने त्यांच्यात आत्मबळ संचारत असते. त्या जोडीदाराच्या नजरेने स्वत:ला बघत असतात. तेव्हा पुरुषांनी आपल्याशी जुळलेल्या स्त्रिचे भावनिक जग जपले पाहिजे. कारण प्रत्येकच गोष्टी माणसाला एकट्याने करणे शक्य होत नाही. त्यासाठी त्याला जोडीदाराची आवश्यकता पडते. परंतू त्यावेळी जोडीदार जर मदत करण्यास तयार नसेल तर त्यांच्यातील नाते तुटे पर्यंत ताणल्या गेल्याची ती खुण असते. म्हणूनच पुरुषांनी नात्यात अशी पावले उचलली पाहिजे ज्यामुळे त्यांच्याशी जुळलेल्या स्त्रीचा आत्मविश्वास जागृत होईल. तसेच त्या आपल्यातील सामर्थ्याला सिद्ध करू शकतील. त्याचप्रमाणे त्यांना आपले अस्तित्व महत्वपूर्ण असल्याची जाणीव होईल.

पती पत्नी संसाररूपी रथाची दोन चाके असतात. परंतू त्यांच्यावर जबाबदाऱ्या मात्र वेगवेगळ्या निर्धारित असतात. तरीही ते आपआपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असतांना एकमेकांना सहकार्य करत जातात. अशाप्रकारे त्यांच्या रथाचे आयुष्यभर संतुलन साधले जाते. त्यातही काही गोष्टी ज्याच्या त्यालाच पेलाव्या लागतात. कारण ते सृष्टीने केलेले नियोजन असते ज्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. अशावेळी मात्र जोडीदाराचे मनापासून सहकार्य त्याचे पाठीशी भक्कमपणे उभे असणे त्याचे तिच्यात उमेद जागवीने. पुरुषांचे अशाप्रकारचे पाठबळ स्त्रियांच्या त्या क्षणांना सहज सोपे व आनंदी बनवीण्यास मदत करत असते. ज्यामुळे एक स्त्री स्वत:मधील क्षमतांना व शक्यतांना बघण्याचे धाडस करू शकते. कारण जोडीदाराच्या समजदारीने तिच्यात विश्वास जागवीलेला असतो. त्याचबरोबर त्यांच्यातील नाते साम्मानास पात्र झालेले असते.

आपल्याला समाजात सर्वत्र हे बघावयास मिळते कि ज्या स्त्रिया महत्वाकांक्षी असतात किंवा बाहेरच्या जगात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी झटत असतात. त्यांना घरातून वेगवेगळ्या पद्धतीने विरोध केला जातो. पतीच्या पुरुषी मानसिकतेला त्यांना वारंवार सामोरे जावे लागते. त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. तर कधी ह्या संघर्षात त्यांना आपला जीवही गमवावा लागतो. परंतू जिथे सुदैवाने स्त्रियांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. त्यांच्या संघर्षात त्यांचा जोडीदार पडद्यामागची भूमिका स्वखुशीने निभावत असतो. जिथे त्या पुरुषात मीपणाचा अंशही उरत नाही. जिथे अपेक्षांनी युक्त नाते नाही तर शुद्ध मैत्रीचे बंध दिसतात. अशा वातावरणात मात्र स्त्रियांच्या विशेषता ज्या त्यांच्या अंतकरणात सामावलेल्या असतात. ज्या स्त्रीत्वाचे प्रतिक असतात. त्या प्रत्यक्षपणे आयुष्यात प्रकट होवू लागतात. कारण स्त्रियांचा जो स्थायी भाव असतो. तो स्वत:हून बाहेर येण्यासाठी तिथे त्यांना पुरुषी पाठबळा सोबत सम्मानपुर्वक वागनुकही मिळालेली असते. ज्याकरीता स्त्रिया आयुष्यभर तळमळत असतात.

सर्वप्रथम स्त्री पुरूष हा भेद विसरून फक्त माणूस ह्या दृष्टीकोनातून पाहिले. तर आपण सर्व ह्या जीवनात केवळ सहप्रवाशी आहोत. तेव्हा आपल्या सहप्रवास्यास सहकार्य करणे त्याला पाठबळ देणे हे माणुसकीच्या नात्याने आपण आपले कर्तव्य समजले पाहिजे. परंतू इतकी सोपी गोष्ट जेव्हा स्त्री पुरूष भेदभावाच्या नजरेने पाहिली जाते. तेव्हा तिथे माणुसकी कमी व मीपणा जास्त झळकत असलेला दिसतो. समाजाचे नियम इतके निष्ठूर कसे असू शकतात. त्याचप्रमाणे त्यातून साध्य तरी काय होवू शकते. कारण स्त्रियांच्या विकासाशिवाय देश प्रगती करणे अशक्य आहे. स्त्रियांचा भावनिक दृष्टीकोन कोणत्याही गोष्टीस वेगळे वळण देण्यास सक्षम असतो. तेव्हा ज्या स्त्रिया कर्तुत्वाच्या पथावर मार्गक्रमण करण्यास तयार आहेत. त्यांना सर्वप्रथम घरातून त्यांच्या जोडीदाराच्या व घरातील इतर मंडळींच्याही सहकार्याची नितांत गरज आहे. कारण त्या एक स्त्री असण्यासोबतच आई सुद्धा आहेत. जर त्यांना ते पाठबळ व विश्वास घरातूनच मिळाला तर त्यांच्या करीता आयुष्याची वाटचाल करणे जरा सोपे होवू शकते. त्याचबरोबर त्यामुळे समाजात स्त्रियांच्या सशक्तीकरणास वेग देखील निर्माण होवू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *