
स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू असतात हे आपण केवळ ऐकलेलेच नाही तर काही ना काही प्रमाणात प्रत्येकाने अनुभवलेले सुद्धा असते. कारण घर असो किंवा कार्यालय स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला त्यांचे काही मुख्य गुणधर्म बघावयास मिळतातच. जसे मनातल्या मनात एकमेकींचा मत्सर करणे. ज्यात त्यांचे सौंदर्य, बौद्धिक उच्चांक तसेच कारकिर्दीतील उच्च स्थान ह्या गोष्टीमधील चढाओढ समाविष्ट असते. त्याचप्रमाणे दोन स्त्रियांनी मिळून तिसऱ्या स्त्रीच्या चुगल्या करणे. स्त्रियांच्या ह्या पोरकट सवयीमुळे त्यांच्या मनात ज्या स्त्रीला त्यांनी आपल्या चर्चेचा विषय बनविलेले असते. तिच्याप्रती नेहमीकरिता एकप्रकारचा नकारात्मक भाव राहतो. ज्यामुळे त्यांच्यात कधीही मैत्री होवू शकत नाही. कारण तिच्यासाठी बनविलेल्या पूर्वमतांचा ह्या दोघींच्या मनावर प्रभाव असतो. त्यामुळे त्या तिच्या समस्या समजून घेण्यास व तिच्याशी संबंधीत सत्य जाणून घेण्यास तयारही नसतात. तसेच स्त्रिया ज्यांचे ज्यांचे विचार आपसात जवळपास जुळतात अशा स्त्रियांचा एक समूह तयार करतात. एवढेच नाहीतर जि स्त्री ह्या समूहाला वगळून आपल्या स्वतंत्र व्यक्तीमत्वात राहून जगणे पसंत करते तिला त्या एकटे पाडतात. किंबहुना दुरून दुरून तिला त्रास देण्याचा प्रयत्नही त्यांच्या करवी केला जातो. त्याचप्रमाणे स्त्रिया आपल्या भूमिकेचाही बऱ्याचदा आपल्या हाताखालच्या स्त्रियांवर वर्चस्व गाजवीन्याकरीता गैरवापर करत असतात. जसे कामाच्या ठिकाणी जर एक स्त्री मुख्य अधिकारी म्हणून नियुक्त असली तर ती तिच्याशी सहमत असलेल्या इतर सहकारी स्त्रियांशी विशेष नाते निर्माण करते आणि अन्य स्त्रियांशी दुजाभाव करतांना दिसते. तसेच घरात सासूच्या स्थानावर असलेली स्त्री बरेचदा घरात येणाऱ्या सुनांवर नकारात्मकरीत्या वर्चस्व गाजवीतांना दिसते. त्यातल्या त्यात पुरूषांबरोबर असलेल्या नात्यावरूनही स्त्रियांमध्ये ताणतणाव सुरू असतात. जसे मुलगा जर त्याच्या लग्नानंतर पत्नीच्या मागे पुढे करतांना दिसला. तर त्याची आई त्याकरीता आपल्या सुनेला जबाबदार धरत असते. तसेच सून देखील सासूची आपल्या संसारातील अतिरिक्त लुडबूड खपवून घेत नाही. त्याचप्रमाणे भावजय आल्यावर भावामध्ये आलेले बदल बहिणींना सहन होत नाहीत. त्यामुळे नणंद भावजयीचे नाते बहुतांशी वाद विवादाने ग्रस्त असे पाहिले जाते. सख्ख्या बहिणींमध्ये देखील आपसात तुलनात्मक भाव उत्पन्न झाल्यास ते यांच्या नात्यात वितुष्ट आणण्यास सबळ कारण ठरते. अशाप्रकारे स्त्रियांच्या मनातील नकारात्मक भावना, त्यांच्या भूमिका तसेच त्यांची आपसातील नाती त्यांच्या दरम्यान मैत्रीपूर्ण बंध प्रस्थापित होवू देत नाहीत.कारण त्यांच्यावर अपेक्षांचे अदृश्य ओझे असते. परंतू मैत्रीचे बंध मात्र त्यांच्या मध्ये आपसात जिव्हाळा, आदर, निस्वार्थ प्रेम तसेच त्यांच्या नात्यास मजबूतपणा प्रदान करत असतात. त्याशिवाय स्त्रियांमधील मैत्रीपूर्ण बंध हा घरात तसेच समाजातही संपूर्ण स्त्रीवर्गाच्या उत्थानाकरीता एक सक्षम आवाजही ठरू शकतो.
घराच्या चार भिंतींच्या आत स्त्रियांमधील शत्रुत्वाची व स्त्रियांनीच स्त्रियांच्या केलेल्या छळाची उदाहरणे फार पूर्वीच्या काळात अधिक प्रमाणात बघायला मिळत असत. कारण तेव्हा बालविवाहाचे चलन अस्तित्वात होते. जाचक रूढी परंपरांना महत्व प्राप्त होते. त्याशिवाय स्त्रियांचे क्षेत्र मर्यादित होते व त्यांना शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्यही नव्हते. त्यामुळे ज्या स्त्रीया ह्या कठोर बंधनांना झुगारून स्वातंत्र्याच्या विचारांना आत्मसात करण्याचा प्रयत्न करत होत्या. तसेच त्यांच्या त्या धाडसाला जर त्यांच्या पतीनेही समर्थन दिलेले असेल तर मात्र अशा स्त्रियांना घरातील वरिष्ठ स्त्रिया शारीरिक व मानसिक त्रास देत असत. त्याचप्रमाणे हुंडा ह्या प्रथेतही घरातील कित्येक वडीलधारी स्त्रियांनी पुरूषांना मदत करून संपत्तीच्या लालसेपोटी कितीतरी नवविवाहित मुलींचा बळी घेण्याचे दुष्कृत्य करण्यात सहभाग घेतला आहे. तसेच नवविवाहित मुलगी आई बनण्यास सक्षम नसल्यास मुलाचे दुसरे लग्न लावण्यातही स्त्रियाच जास्त प्रमाणात अग्रेसर असतात. पतीस परमेश्वर समजून त्याला आपल्या आत्मसम्मानापेक्षा जास्त आदर देण्याच्या परंपरेचे स्वत:ही निष्ठेने पालन करून घरातील इतर स्त्रीयांवरही त्याकरीता बळजबरी करण्याचे कामही स्त्रियाच करत असतात. अशाप्रकारे स्त्रियांच्या मनात एकमेकींसाठी असलेले वैर घराचे रणांगण बनविण्यास सक्षम असते. कारण स्त्रिया भावनाप्रदान असल्यामुळे त्या स्वत:मध्येच सर्वशक्तीमान असतात. म्हणूनच जर दोन स्त्रियांची उर्जा एकमेकींच्या विरोधात प्रवाहित होत असेल तर त्या दोघीही परस्पराकरीता केवळ अडथळा बनतात. त्याचबरोबर त्या आपली उर्जा एकमेकींना खाली पाडण्यात वाया घालवत असतात. त्यामुळे तिला सत्कारणी लावू शकत नाहीत. तेव्हा एका स्त्रीची उर्जा दुसरीच्या दिशेने जातांना त्यात सहृदयता, समंजसपणा व मैत्रीचे अतूट बंध असले पाहिजे. कारण स्त्रियांचा जीवनप्रवास हा काटेरी मार्गावरून होत असतो. त्यामुळे त्यांना क्षणोक्षणी त्यांच्या जागेवर येवून समजून घेणाऱ्या तसेच हक्काने जीच्यापाशी आपले सुख दु:ख वाटता यावे अशा मैत्रिणीची गरज भासत असते. म्हणूनच स्त्रियांनी आपसात नात्यांची औपचारिकता पाळण्यापेक्षा मैत्रीपूर्ण बंध जोपासले पाहिजे.
स्त्रिया आपल्या संसाराच्या रहाटगाडग्यात पूर्णपणे गुंतून त्यांच्या स्वप्नांचा अनाहूतपणे बळी घेत असतात. त्याशिवाय घरातील वातावरण जर पुरूषप्रधान संस्कृतीच्या मानसिकतेने ग्रसित असेल. तर पुरूष कर्तुत्ववान नसले किंवा त्यांच्या सवयी कितीही वाईट असल्या तरी देखील स्त्रियांना त्यांची सेवा करावीच लागते. अजूनही काही राज्यात स्त्रियांना लांब पदराच्या मागे आपला चेहरा झाकून सर्वत्र वावरावे लागते. पतीच्या मोठ्या आयुष्यासाठी स्वत:ला त्रास देवून व्रतवैकल्ये करावी लागतात. त्याचप्रमाणे पुरुषांच्या शब्दाच्या मर्यादेत राहून आपले जीवन व्यतीत करावे लागते. ह्या तंत्रज्ञानाच्या युगात जग प्रगती पथावर असतांना आजतागायत स्त्रियांची अशी दुर्दशा असणे म्हणजे खऱ्या अर्थाने मानव जातीच्या अधोगतीचे प्रमाण आहे. तेव्हा अशाठिकाणी स्त्रियांमध्ये क्रांतीची ठिणगी पडणे अत्यावश्यक आहे. कारण स्त्रियांच्या कौशल्यांना अशाप्रकारे दुर्लक्षित करणे म्हणजे केवळ स्त्रिवर्गाच्या प्रगतीतच नाहीतर देशाच्या प्रगतीत देखील बाधा आणण्यासारखे आहे. ज्या स्त्रियांना सौभाग्याने स्वत:ला सिद्ध करण्याच्या संधी उपलब्ध होवू शकल्या त्यांनी अत्यंत कठीण परीस्ठीतीतही मिळालेल्या संधीचे सोने करून देशाच्या सम्मानातही भर घालून दाखविली असल्याची उदाहरणे अस्तित्वात आहेत. त्यामुळे जर घरातील वातावरण स्त्रियांच्या पुढे येण्यास सहकार्य करणारे नसेल तर स्त्रियांनी आपसात मैत्रीपूर्ण बंध निर्माण केले पाहिजे. त्याद्वारे एकमेकींच्या इच्छा आकांक्षा व स्वप्न पूर्ण करण्यासाठी सामूहिकरीत्या आवाज उठवला पाहिजे. स्वकर्तुत्वाने आपल्या नावाचा ठसा उमटविला पाहिजे. एकमेकींना प्रोत्साहित करून हिम्मत प्रदान केली पाहिजे. जर त्या एकमेकींच्या विरोधात कटकारस्थाने करत राहिल्या किंवा हेव्यादाव्याने स्वत:ला व इतर जणींनाही कमजोर करत राहिल्या तर आपल्या आयुष्यात क्रांतीपूर्ण परिवर्तन आणण्यात नक्कीच असफल ठरतील. तेव्हा स्त्रियांमधील मैत्रीपूर्ण बंध इतके मजबूत असले पाहिजे कि तो पुरुषी मानसिकतेच्या विरोधात स्त्रीशक्तीच्या एकजूटीचा सशक्त लढा ठरला पाहिजे.
आज स्त्रियांचे उंबरठ्याबाहेरचे विश्व हे स्त्रियांची आपल्या अस्तित्वाची ओळख निर्माण करण्याची प्रबळ इच्छा, आर्थिकरीत्या सबळ होण्याची इच्छा तर कधी आत्मसम्मानाचे जीवन जगण्याची इच्छा असे भिन्न भिन्न हेतू साध्य करण्यासाठी वाढतच चालले आहे. त्यासाठी स्त्रिया आपले कौटूम्बीक जीवन, आपले व्यक्तीगत जीवन तसेच आपले सुखचैन देखील पणास लावत असतात. त्याचप्रमाणे घरातूनही त्यांना सुदैवाने क्वचितच सहकार्य लाभत असते. कारण घरातही कधी पुरुषी मानसिकता त्यांना आव्हान करत असते. तर कधी घरातील स्त्रियांमध्ये आपसात शितयुद्धे सुरू असतात. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणीही बहुतेक ठिकाणी स्त्रियांना पुरूष अधिकारी अश्लील नजरेने बघतात. किंवा मानसिक त्रास देवून त्यांचे भावनिकरीत्या खच्चीकरण करत असतात. त्यामुळे कित्येक स्त्रियांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था होते. अशावेळी त्या आत्महत्येसारखे धारिष्ट करण्यासही सहज तयार होतात. कारण एकमेकींवर मात करून पुढे निघून जाण्याच्या चढाओढीत सहकर्मचारी स्त्रियांच्या दरम्यानही मैत्रीपूर्ण बंध निर्माण होवू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या त्रासाविषयी त्या इतर स्त्रियांजवळ वाच्यता करू शकत नाहीत. म्हणूनच नोकरदार स्त्रियांनी कामाच्या ठिकाणी एकजुटीने राहिले पाहिजे. whats app द्वारे मैत्रिणींचा समूह तयार केला पाहिजे. एकमेकींशी तुलना, एकमेकींचा मत्सर व एकमेकींच्या पाठीमागे चुगल्या करणे थांबविले पाहिजे. एकमेकींच्या संपर्कात राहून सौहार्दतेने विचारपूस करत राहिले पाहिजे. त्याचबरोबर आपल्या प्रोत्साहनाने एकमेकींचे मनोबल वाढविण्यावर भर दिला पाहिजे. कामावर येणाऱ्या अडचणींविषयी ताबडतोब इतर जणींना माहिती पुरविली पाहिजे. काही उलट सुलट आढळल्यास त्वरीत कारवाई देखील केली पाहिजे. अशाप्रकारे स्त्रियांमधील एकजूट व त्यांच्यातील मैत्रीपूर्ण बंध हे स्त्रियांकडे वाईट नजरेने बघणाऱ्या नराधमांकरीता एकप्रकारचा धाक झाला पाहिजे.
घरात आई व मुलीचे नाते हे नात्यातील औपचारीकतेच्या वर उठू शकले तर आई आणि मुली दरम्यान मैत्रीपूर्ण बंध निर्माण होतात. अशावेळी आई आपल्या वयाच्या चौकटीतून जरा बाहेर येवून मुलीच्या वयाशी संबंधीत समस्या, गरजा व सजगता समजू शकते. तसेच मुलगीही आपल्या आईशी मोकळेपणाने संवाद साधून तिच्या व्यक्तीमत्वाबद्दल सखोल जाणून घेण्यास इच्छुक होते. अशारितीने त्या दोघींमध्ये विश्वासाचे बीज पेरले जाते. नात्यामधील हा विश्वासच त्यांना कायम एकमेकींच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे सामर्थ्य देत असतो. म्हणूनच घरा घरात आई व मुलीचे नाते मैत्रीपूर्ण असले पाहिजे. तेव्हाच घरात सुनेच्या रूपात येणाऱ्या कोणाच्या तरी लाडक्या मुलीसही त्या दोघी आपल्यात उत्तम रीतीने सामावून घेवू शकतात. ज्यामुळे एका नवीन कुटूम्बाचा हिस्सा बनतांना त्या मुलीस कोणत्याही अडचणी येणार नाहीत. अशाप्रकारे सर्वप्रथम प्रत्येक घरातून स्त्रियांच्या एकजुटीचा भक्कम पाया रचला गेला पाहिजे. त्यांच्या आपसातील नात्यात हक्क व मैत्रीचे बंध असले पाहिजे. त्यामुळे घराच्या चार भिंतीत स्त्रियांवर पुरुषांकडून होणारे अत्याचार उघडकीस येवू शकतात. त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधात सबळ पावलेही\उचलली जावू शकतात. तसेच आई मुलीच्या सहकार्याने, मुलगी आईच्या प्रोत्साहनाने, तर कधी सून सासूच्या मदतीने एक वेदनादायी नाते व भूतकाळ मागे टाकून आत्मविश्वासाने एका सुखद नव्या जीवनाची सुरवात करण्याचे धाडस करू शकते. तेव्हा आता स्त्रियांनी आपल्या आत्मसम्मानाच्या जगण्याला सर्वस्वी प्रादान्य दिले पाहिजे. कारण त्यामुळेच त्या पुढच्या पिढीतील स्त्रियांच्या मनात स्वत:साठी सम्मान बघू शकतील. अशारीतीने स्त्रियांमधील मैत्रीपूर्ण बंध हा पिढ्या न पिढ्यांचा वारसा त्यात समाविष्ट होणाऱ्या प्रत्येक स्त्रीची खरी ओळख बनला पाहिजे.
1. स्त्रियांमध्ये मैत्रीपूर्ण बंध असल्यास पिढ्यांमधील अंतर कमी होईल
पिढ्यांमध्ये अंतर निर्माण होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्याचप्रमाणे नात्यांमधील औपाचारीकतांचा कळस हे देखील दोन पिढ्यांमध्ये अंतर निर्माण करण्यास सबळ कारण ठरते. कारण औपचारिकता ह्या अपेक्षांना जन्म देतात. तसेच अपेक्षा ह्या नात्यांना दु:खात लोटत असतात. जसे सासू सुनेचे नाते त्यांच्यातील अतोनात अपेक्षांमुळे कायम क्लेशपूर्ण राहते. सासू जर गृहिणी असेल व सून नोकरदार असेल तर सून कशी घरातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात कमी पडते ही गोष्ट सासू क्षणोक्षणी निदर्शनात आणून देते. तर सासू कशी तिला अजिबात सहकार्य करत नाही ही सासूच्या विरोधात सुनेची तक्रार असते. अशाप्रकारे काही ना काही प्रमाणात त्यांच्यात शीतयुद्ध सुरू असते. ह्यामधून हा संदेश जातो कि दोन पिढ्या एकमेकांना समजून घेण्यात कमी पडत आहेत. त्यांच्यात समंजसपणाचे वर्तन केले जात नाही. ज्यामुळे त्यांच्या विचारधारा जुळून येत नाहीत तर त्यात अंतर पडत जाते. म्हणून स्त्रियांमध्ये मैत्रीपूर्ण बंध प्रस्थापित झाले पाहिजे. जेणेकरून त्यामुळे त्यांच्यात एकमेकींना त्यांच्या स्थानावर जावून समजून घेण्या इतपत संवेदनाशीलता तरी येईल. त्याचप्रमाणे त्यांच्यात मनमोकळेपणाने वार्तालाप होवू शकेल. कारण त्यामधूनच त्या एकमेकींना सखोल जाणून व समजून घेवू शकतील. तसेच अंतकरणाने एकमेकींच्या हळूहळू समीप येत जातील. अशाप्रकारे जेव्हा त्यांना एक माणूस म्हणून परस्परांच्या व्यक्तीमत्वाची बारकाईने पारख होईल तेव्हा त्यांच्यात नकळतपणे पिढ्यांचे व वयाचे देखील अंतर अस्पष्ट होत जाईल. कारण तेव्हा त्या शुद्ध मैत्रीपूर्ण बंधनाने समृद्ध झालेल्या असतील.
2. स्त्रियांमध्ये मैत्रीपूर्ण बंध असल्यास जाचक रूढीपरंपरांच्या विरोधात स्त्रियांची एकजूट दिसेल
स्त्रियांच्या एक किंवा दोन पिढ्या ह्या पूर्णपणे जाचक रूढी परम्परांकरीता स्वखुशीने आपले जीवन खर्ची घालत असतात. परंतू जसजसा शिक्षणाचा व आधुनिकतेचा प्रभाव पडत जातो तसतशी क्रांतीची एक लाट येणाऱ्या पिढ्यांच्या विचारात काही प्रमाणात परिवर्तन आणत जाते. तेव्हा पासून थोड्या फार प्रमाणात स्त्रीयांमध्येच संघर्षाची सुरवात होत असते. अशावेळी जर स्त्रिया नात्यांच्या भूमिकेतून गोष्टींना वळविण्याचा अट्टाहास करत असतील तर त्यांच्यातील नाते हे तुटेपर्यंत ताणले जाण्याची शक्यता असते. परंतू त्यांच्यात वैचारिक मतभेद असूनही जर मैत्रीपूर्ण बंध असतील तर मात्र त्या गोष्टींच्या तळाशी जावून, त्यांचे महत्व समजून घेवून त्यानंतर त्यासाठी एकमेकींची मदत करण्यासही तयार होतात. अशाप्रकारे स्त्रियांचे मैत्रीपूर्ण बंध हे स्त्रियांच्या उत्थानासाठीच एकजूट निर्माण करू शकतात. ज्यामुळे स्त्रियांची ताकद कितीतरी पटीने द्विगुणीत होते. त्याचप्रमाणे द्विगुणीत झालेल्या ताकदीनिशी त्या जाचक रूढी परंपरांचा जबर विरोध करू शकतात. विशेष म्हणजे तेव्हा घरातील आई आजी ह्या वरिष्ठ स्त्रियाच त्यांची खरी शक्ती बनतात. म्हणूनच स्त्रियांमध्ये कोणतेही औपचारिक नाते असले तरी त्यांनी एकमेकींसमोर कायम मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे. एकमेकींच्या सुखदु:खात वाटेकरी बनले पाहिजे. त्याचप्रमाणे येणाऱ्या पिढ्यांना जुन्या परंतू सोन्यासारख्या मूल्यांचे महत्व समजावून त्यांच्या नवविचारांनाही दिशा दिली पाहिजे.
3. स्त्रियांमधील मैत्रीपूर्ण बंध हे पुरुषी मानासिकातेस थेट आव्हान ठरेल
पुरुषी मानसिकतेस बळी पडलेल्या स्त्रिया आपला आत्मविश्वास गमावून बसतात. त्यांना आपले अस्तित्वच नगण्य वाटू लागते. तसेच त्या मनाने पूर्णपणे खचलेल्या असतात. कारण घरातील वातावरण औपचारीकतेने ग्रस्त असल्यामुळे घरातील इतर स्त्रिया फक्त स्वत:पुरता विचार करत असतात. इतरांच्या आयुष्यात जास्त दखल देत नाहीत. त्याचप्रमाणे त्या वरवर नाते निभावण्यासाठी औपचारिकता पाळत असतात. परंतू एकमेकींना भावनिक आधार देवून मनात साचलेल्या दु:खाच्या तळाशी जाण्याची तयारी दाखवीत नाहीत. त्यामुळे ही केवळ आपली समस्या आहे असे समजून पिडीत स्त्रिया स्वत:चा कोंडमारा करून घेतात. त्याचप्रमाणे आपल्या परीने आयुष्यभर लढत राहतात. परंतू आपल्या सोबत एकाच छताखाली राहत असलेली स्त्री आपल्या वेदना आपल्याशी वाटू शकत नाही. ही गोष्ट इतर जणीसाठी लाजिरवाणी असली पाहिजे. तेव्हाच त्या त्यांच्या दरम्यान असलेले वैचारिक मतभेद, औपचारिकता, तंटे व हेवेदावे अशी नकारात्मकतेने युक्त त्यांनी स्वत:च निर्माण केलेली टणक भिंत माणुसकीच्या ताकदीने पाडून व तीला पार करून एकमेकींच्या दु:खाला वाचा फोडण्याकारीता एकमेकींच्या निकट पोहोचतील. अशाप्रकारे जेव्हा स्त्रियांमधील मैत्रीपूर्ण बंध सर्व बंधने झुगारून एकमेकींच्या बचावा करीता एकसंध व एकजूट होतील. तेव्हा त्या पुरुषी मानसिकतेने ग्रसित पुरुषास चांगलाच धडा शिकवू शकतील. म्हणूनच घरा घरातील स्त्रियांनी आपसात एक असे नाते निर्माण केले पाहिजे जे त्यांना शक्ती प्रदान करेल. जेणेकरून त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रसंगी त्या एकट्या पडल्याचा आभास होणार नाही.
4. स्त्रियांमध्ये मैत्रीपूर्ण बंध असल्यास कुप्रथा व वाईट चलन प्रचलीत होण्यास आळा बसेल
समाजात हुंडा व स्त्रीभ्रूण हत्येसारख्या कुप्रथांना अजूनही स्थान आहे. त्याचप्रमाणे विवाहबाह्य संबंधांसारखे वाईट चलन अतिरिक्त प्रमाणात प्रचलीत होत चालले आहे. ज्याचा सर्वात जास्त परिणाम स्त्री वर्गावरच होत आहे. तसेच काही स्त्रियांचाच त्यात सक्रीय सहभाग देखील आहे. ह्याचा अर्थ हा होतो कि स्त्रिया कळत नकळतपणे पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करत असतात. त्याचप्रमाणे पुरुषाचे मन जिंकण्याच्या उद्देशानेही स्त्रियांच्या मनात एकमेकींसाठी आकस असतो. त्यामुळे त्या चुकीचे पाउल उचलण्याचे धाडस करत असतात. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्याच सारख्या अन्य स्त्रीचे सौख्य ओरबाडून घेतात. अशाप्रकारे स्त्रियाच स्त्रियांसाठी खड्डे खोदण्याचे काम करत असतात. ज्यामुळे पिढ्या न पिढ्या ह्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या प्रथा व चलन मोडकळीस येत नाहीत. कारण स्त्रियांचा त्यात असलेला सहभागाच त्यांना खतपाणी घालत असतो. म्हणूनच स्त्रियांमध्ये मैत्रीपूर्ण बंध निर्माण झाले पाहिजे. तेव्हाच त्या इतर स्त्रीचे मन समजू शकतील. तसेच त्यांच्या मनात जागृत झालेल्या प्रत्येक इच्छेस पूर्ण करण्याचा ध्यास न घेता त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा त्या विचार करतील. आपल्या ह्या समंजसपणामुळे कित्येक घरांचे दार होण्यापासून त्या वाचवू शकतील. अशारितीने माणुसकीचे धोरण अवलंबून त्या समस्त स्त्री वर्गाचा ह्या कुप्रथा व वाईट चलनांपासून बचाव करू शकतील.
स्त्रिया आपल्या आयुष्यात प्रगती करण्यासाठी जे काही प्रयत्न करत असतात. त्यांच्या त्या परिश्रमांना काही स्त्रिया विरोध करतात तर काही त्यांचा मत्सर करतात. काही त्यांचे पाय ओढण्यास प्रयत्नशील असतात. तर काही शितयुद्धाद्वारे त्यांचे मनोबल खचवीन्याचा प्रयत्न करतात. परंतू तरीही एक तरी स्त्री त्यांच्या पाठीशी अशी असते. जी आपली मूल्य व आपल्या आशीर्वादाची सकारात्मक उर्जा प्रेरणेच्या स्वरूपात त्या स्त्रीयांच्या यशस्वी होण्याच्या दिशेने प्रवाहित करत असते. त्या उर्जेला मैत्रीचे नाव देण्यात आले पाहिजे. त्याचप्रमाणे अशाप्रकारच्या स्त्रियांमधील मैत्रीपूर्ण बांधांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)