स्त्रिया आणि वस्तू ठरलेल्या जागेवर ठेवण्याची शिस्त

घराला घरपण तेव्हा येते जेव्हा बाहेरून आलेल्या व्यक्तीने अंगणात पाय ठेवता क्षणी त्याला त्याच्या अवती-भोवती सकारात्मक व मनास प्रसन्न करणारे वातावरण अनुभवास येते आणि त्यामुळे त्याला एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा तिथे यावेशे वाटते. कारण घर लहान आहे किंवा मोठे,  झोपडी आहे किंवा बंगला ह्या गोष्टीचा तिळमात्रही फरक पडत नाही. त्यापेक्षा घरातील निट-नेटकेपणा तसेच घराची स्वच्छता  ह्या गोष्टी कोणत्याही घरात फार महत्वाच्या वाटतात. घर लावणे ही देखील एक कला आहे. ज्या स्त्रिला ती अवगत असते ती स्त्रि त्या घराचे घरपण कायम जपून ठेवते.

   कधी संधी मिळाल्यास गावातील एखाद्या घरी जावून बघावे. अंगणात शेणाचा सडा असतो. घर सारवलेले असते आणि घरातील वस्तू निटनेटक्या लावलेल्या असतात. घर लहान असल्यामुळे प्रत्येकासाठी खोल्या नसतात. त्यामुळे माणसांमध्ये जवळीक असते. घरात प्राणि असल्यामुळे घराच्या कानाकोपर्‍याला जीवंतपणा असतो. त्यामुळे अशा घरांमध्ये फारच प्रसन्नता वाटते. कारण घर कितीही मोठे असले तरी त्या घरात माणसांचा वावर नसला आणि घर अस्ताव्यस्त व अस्वच्छ असले तर त्या चार भिंतींना घराची सर येत नाही. एकप्रकारे ती एक बेशिस्त आणि दुर्लक्षीत जागा असते.

  घरातील स्त्रि  ही त्या घराचा प्राण असते. कारण ती त्या घराला संपुर्ण समर्पीत असते आणि घरासाठी रात्रंदिवस झटत असते. तिच्या असण्याने त्या घरास देवालयाचे रूप येते. कारण घराचा पवीत्रपणा आणि सात्वीकता जपणे एका स्त्रिलाच उत्तम जमते. स्त्रियांचे अंगणापासून ते स्वयंपाक घरापर्यंत अगदी बारीक लक्ष असते. त्या घराच्या स्वच्छते विषयी आणि वस्तू ठरलेल्या जागी ठेवण्याविषयी विशेष आग्रही असतात. कारण त्या स्वत: त्याचे काटेकोर पालन करतात. त्यांच्या ह्या नियमामुळे घरच्यांना चांगली शिस्त लागते. एखादी वस्तू पाहिजे असल्यास खात्रिशीरपणे ती कोठे ठेवली असेल हे आपल्याला ठाऊक असते. त्यामुळे शोधाशोध करण्यात आपला वेळ जात नाही. त्याचप्रमाणे कोणतिही वस्तू योग्य ठिकाणी ठेवली असेल तर ती सुरक्षीत व योग्य दशेत असेल ह्याविषयी खात्री देखील असते. तसेच वस्तू जागेवर असल्या तर घर छान आवरलेले असते.

1. अंधारातही वस्तू सापडतात.

  रात्रीच्या वेळी दिवे गेल्यानंतर आपण जेवण करत असल्यास घास तोंडाच्या ऐवजी नाकात जात नाही. त्याचप्रमाणे कोणतीही वस्तू कोठे ठेवली आहे हे खात्रीशीरपणे ठाऊक असल्यास अंधारातही चाचपडण्याची वेळ आपल्यावर येत नाही. आणि नकळतपणे आपला हात योग्य ठिकाणी जातो. तसेच वस्तू ठेवलेल्या जागी हमखास सापडते. वस्तू जागेवर ठेवण्याची ही शिस्त जेव्हा जीवनात अंधकार झाल्याचा भास होतो त्यावेळी खात्रिशिर मार्ग शोधून त्यामधून बाहेर पडतांना उपयोगी पडते.

2. वेळ आणि कष्ट दोन्ही वाचतात.

  कधी कधी आपल्याला ज्या वस्तूची गरज असते ती काहि केल्या सापडत नाही. त्याचप्रमाणे त्यावेळी डोक्यावर कितीही ताण दिला तरीही आठवत नाही. अशावेळी आपण कात्रीत सापडतो. महत्वाची कामे बाजूला ठेवून वस्तू शोधण्यात आपला वेळ खर्च करतो. कारण त्या वस्तूची आपल्याला नितांत गरज असते. वस्तू कोठे ठेवली आहे हे निश्चीत माहित नसल्यामुळे शोधाशोध करण्यात घरात अवाजवी पसारा देखील घालतो. घर डोक्यावर घेतो. त्यानंतर वस्तू सापडली तरीही आपल्या पुन्हा घर आवरावे लागते. ह्या सगळ्या कटकटीतून सुटकारा हवा असल्यास वस्तू ठरलेल्या जागेवर ठेवण्याची शिस्त लावावी.

3. वस्तू सुरक्षीत राहतात.

   वस्तू ठरलेल्या जागेवर ठेवल्या असल्यास त्या योग्य अवस्थेत राहतात. वर्षातून एकदा तरी वस्तूंना नीट स्वच्छ करून आणि कोरडे करून तिच्या योग्य जागेवर ठेवावे. त्यामुळे वस्तू उत्तम अवस्थेत जास्त काळ  टिकतात. त्यांचा दर्जा उत्तम राहतो आणि शेवटपर्यंत उपयोगी असतात. वस्तू जागेवर ठेवण्याची ही शिस्त आपल्याला हे शिकवीते कि वस्तू असो वा माणसे त्यांना लक्षपूर्वक सांभाळले आणि प्रेमाने जोपासले तर त्यांंच्या व आपल्यातील नात्याची गुणवत्ता टिकून राहते आणि गरजेच्या वेळी कामीही येतात.

4. सफलता प्राप्तीची गुरूकिल्ली

  घरातील निटनेटकेपणा आणि स्वच्छता ह्या वरवर क्षुल्लक वाटणार्‍या गोष्टी असतात. परंतू घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवर त्याचा सकारात्मक परीणाम होतो. त्यामुळे आपले आयुष्य सुनियोजीत होते. आणि भविष्यासाठी पुर्वनियोजन असल्यामुळे आपल्या आयुष्यात चिंता तसेच काळजी ह्यांना स्थान राहत नाही. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याचा हेतू उंच असेल तर लहानात लहान बदल स्वत:मध्ये आणणे ही सफलता प्राप्तीच्या मार्गातील गरज असते. तेव्हा आपल्या रूम पुरता निटनेटकेपणा आणि स्वच्छता करण्याची सवय स्वत:ला लावली पाहिजे. त्यामुळे जीवनात जबाबदारी घेण्याची उत्तम सवय आपल्याला लागते. आपण केलेल्या चुका मनापासून स्विकारण्याची सवय लागते. आणि हे सफलता प्राप्तीच्या मार्गातील पहिले पाऊल असते.

   आपल्याला लहान लहान आणि क्षुल्लक वाटणार्‍या गोष्टींचा सखोल अर्थ अचूक कळला. तर त्या गोष्टी करण्यासाठी कोणाच्याही सांगण्याची आपल्याला गरज पडणार नाही. आपल्या हातून त्या सवयीत असल्याप्रमाणे घडत जातील. आणि ह्या चांगल्या सवयी आपल्याला असणे म्हणजे आपण स्वत:च प्रगतीचे द्वार स्वत:साठी उघडण्यासारखे असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *