स्वाभिमान हा स्त्रियांचा अलंकार

  मुलींची कल्पनाशक्ती ही प्रबळ असते. त्याद्वारे त्या भविष्यात आपल्या जीवनाच्या जोडीदाराबरोबरची अनेक सुखस्वप्ने बघत असतात. त्याचप्रमाणे त्याच सुखद भावनांच्या साथीने वेळ आल्यावर कल्पनेतील नविन जीवनाची खरीखुरी सुरवात देखील करतात. त्यांच्या स्वप्नांच्या जगात  दु:खाला कोठेही थारा नसतो. अशाप्रकारे त्यांच्या स्वप्नातील जग एकेदिवशी प्रत्यक्षात साकार होते. जीवनातील त्या आनंदापुढे त्यांना आकाशही ठेंगणे वाटू लागते. तसेच  त्या सुखद अनुभूती समवेत त्यांच्या जीवन कथेची मोहक सुरवातही होते. जोडीदाराच्या साथीने व त्याच्या प्रेमाने त्या मोहरून बहरून जातात. त्यांच्या प्रेमाच्या वेलीवर चिमुकली फुलेही लागतात. प्रत्येक मुलीचे आयुष्य इतके सुरेख व दृष्ट लागावी इतपत आनंददायी असावे. असेच आपल्या पैकी प्रत्येकास वाटत असते.

   परंतू बहुतांशी मुलींना मात्र दुर्दैवाने अचानक एकेदिवशी त्या स्वप्नांच्या जगातून बाहेर पडावे लागते. कारण त्यांच्या जीवनात असे काही घडते कि त्या खळबळून जाग्या होतात. तसेच त्यांचे ते सुखद स्वप्न भंग पावते. त्यासोबत त्यांच्या खर्‍याखुर्‍या विश्वात मात्र त्यांच्यासाठी काहितरी वेगळेच वाढून ठेवलेले असते. ते बघून त्यांना जोरदार धक्का पोहचतो व पायाखालून जमीन सरकल्याचा भास होतो. ज्याच्या बरोबर त्या स्वप्नांच्या दुनियेत हरविल्या होत्या. जो त्यांचा सर्वस्व होता त्याचेच नकारात्मकपणे बदललेले रूप पाहून त्यांच्या अंगात बळ उरत नाही. कारण कोणी व्यसनांच्या आहारी गेल्याचे आढळून येते. कोणी विवाहबाह्य अनैतीक संबंधांमध्ये असल्याचे सामोर येते. तर कोणी पुरुषी मानसिकतेने ग्रासित असतो. तसेच कोणामुळे त्या मुलीचे जगणेच दुर्भर होवून जाते. अशाप्रसंगी मुलींना त्यांनी जन्मताच आपल्या अंतरंगात धारण केलेल्या स्वाभिमान ह्या अलंकाराची खऱ्या अर्थाने जाणीव होते.

  आजच्या युगात स्त्रियांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे आहेत. परंतू त्यांच्या भंग पावलेल्या सुखस्वप्नांना सावरणारा तसेच कोलमडून गेलेल्या मनाला धैर्य देणारे कोणतेही नियम नाहीत. स्त्रिया ह्या कितीही नाजूक मनाच्या असल्या किंवा भावनाशील असल्या तरी त्या अशा अटितटीच्या प्रसंगात अत्यंत कणखर असतात. त्यासोबत त्या धिराने व समजदारीने निर्णय घेतात. हीच स्त्रियांची विशेषता आहे. कारण त्या स्वाभिमानी असतात. हा स्वाभिमानच त्यांना ढासळून जाण्यापासून वाचवतो. तसेच पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्याचे सामर्थ्यही त्यांना देतो.

  वेळेच्या गरजेनुसार त्या संसाराचा मोह सोडून व सर्वकाही मागे टाकून एकटीने घराबाहेर पाडतात. त्यासोबत त्यांच्यात हा टोकाचा निर्णय घेण्याची क्षमता होती हे त्यांनाही नव्यानेच कळते. प्रत्येक स्त्रि तिच्या आयुष्यात वेळ पडल्यास अशा कठोर निर्णयांना सामोरे जावू शकते. कारण तिच्यापाशी स्वाभिमान नावाचा बहुमूल्य अलंकार असतो.

    जेव्हा ती पहिल्यांदा घराचा उंबरा ओलांडते. तेव्हा तिचे हात रिकामे असतात व मन शुन्य झालेले असते. ही बोचणार्‍या दगडांची कठोर वाट आपल्याला कोठे घेवून जाणार आहे हे ही तिला ठाऊक नसते. चालतांना रस्ते आणखीच लांब झाल्यासारखे वाटू लागतात. दूर दूर पर्यंत मुक्कामाचे ठिकाण तिच्या दृष्टीक्षेपास पडत नाही. तिची अवस्था त्या पक्ष्याप्रमाणे झालेली असते. ज्याला अनेक वर्ष पिंजर्‍यात राहण्याची सवय झालेली आहे. मात्र एके दिवशी अचानक त्याला पिंजर्‍यातून मुक्त करण्यात येते. तेव्हा क्षणभर त्याला काय करावे कळत नाही. कारण पिंजर्‍यात बसून त्याने ज्या निरभ्र आकाशात स्वतंत्रपणे उडण्याची स्वप्न पाहिली असतात. ती वेळ प्रत्यक्षात त्याच्यावर आल्यानंतर मात्र का कोणास ठाऊक त्याला उडता येत नाही. त्याचप्रमाणे त्या मुलीची पावले देखील जड होतात. कारण तिचे मन अजूनही जोडीदाराबरोबर घालविलेल्या त्या सोनेरी क्षणांमध्ये गुंतलेले असते. परंतू अखेरीस तिचा स्वाभिमानच तिला द्विधा मनस्थितीत अडकण्यापासून वाचवितो. तसेच कणखरपणे निर्णय घेवून ती आपले पाऊल पुढे टाकते.

   त्यानंतर ती स्वत:चे अवलोकन करते. ज्याची तिला आजवर कधिही गरज पडलेली नव्हती. परंतू आता स्वाभिमानाने उभे रहायचे असेल तर स्वत:मधील क्षमतांना व शक्यतांना आव्हान करावेच लागेल ह्या गोष्टीची तिला जाणीव होते. तेव्हा तिच्या लक्षात येते कि तिचे शिक्षण अपुर्ण आहे. तिला कोणत्याही कामाचा अनुभव नाही. तसेच ती जगाच्या तुलनेत  व काळान्वये खुप मागे पडलेली आहे. परंतू तिच्याकडे काही कौशल्य असतात. ज्यांना कधिही कोणाकडून प्रोत्साहन मिळालेले नसते. मनोमन ती त्यावर नजर टाकते आणी तिच्या डोळ्यापुढे पसरलेल्या अंधारात तिला एक आशेचा किरण दिसतो. तो आशेचा किरणच तिचा एकमेव आधार बनतो. तेथून तिच्या स्वाभिमानाच्या प्रवासाला सुरवात होते. त्याचप्रमाणे कोणतीही सुरवात कधिही सोपी नसते. तो तिच्यासाठी एक कठोर संघर्ष असतो.

    जुन्या आयुष्याचे तिच्या आताच्या आयुष्यावर उमटलेले पडसाद मिटवीता येणे तिच्यासाठी सोपे नसते. परंतू तरिही ती निर्भीडपणे व कणखरपणे आलेल्या परिस्थितीला सामोरे जाते. त्यासोबत जन्मास येते एका स्वाभिमानी स्त्रिच्या संघर्षाची  गोष्ट जी जगाचे डोळे दिपवून टाकणारी असते. ही कर्तुत्ववान स्त्रि अनेकांसाठी उदाहरण बनते. कारण एक सामान्य स्त्रि असूनही ती जीवनसंघर्षात तावून सुलाखून व यशस्वी होवून बाहेर पडलेली असते. संघर्षांनी तिला जगणे शिकवलेले असते. तिच्या अंगी असलेल्या कौशल्यांना प्रोत्साहन दिलेले असते. तसेच तिच्या स्वाभिमानरूपी अलंकाराला जपलेले असते.

  आजही रूढी परंपरांच्या नावाखाली समाजात पुरूषप्रधान संस्कृती मान्यता प्राप्त आहे. ज्यात स्त्रियांना घरातील निर्जीव वस्तूप्रमाणे वागणूक देण्यात येते. पतीस देवाचा दर्जा देवून त्याची सेवा करणे हाच पत्नीचा धर्म आहे. ह्या विकृत विचारांना जोपासले जाते. स्त्रियांचा पदोपदी अपमान करण्यात येतो. पुरूष आपला अहंकार जपण्यासाठी स्त्रियांवर बंधने लादतांना दिसतात. अपशब्द वापरून  तसेच त्यांच्यावर हात उगारून स्त्रियांना धाकात ठेवण्यात येते. त्यांना घरापुरते सिमीत ठेवून त्यांच्यातील कौशल्यांना प्रोत्साहनापासून वंचीत ठेवण्यात येते. असे असतांनाही काही स्त्रिया क्षितीजाकडे झेप घेतात. तसेच आकाशाला गवसणी घालतात. कारण त्या पुरूषांनी केलेल्या अपमानाला  एखाद्या ठिणगीप्रमाणे मनात ठेवतात. जर त्यांच्या जीवनात दुर्दैवाने तशी वेळ आलीच तर त्या ठिणगी पासून ज्वाला बनतात. तसेच खंबीरपणे सिमा ओलांडण्याचे धाडस करतात. कारण त्यांच्यात स्वाभिमान असतो.

1. स्वाभिमान स्त्रियांना संयम शिकवीतो

   स्वाभिमान हा स्त्रियांना लाभलेला जन्मजात अलंकार आहे.  स्त्रि जन्म म्हणजे एक लढा असतो आणि हा लढा प्रत्येक स्त्रिचा वेगवेगळा असतो. स्त्रियांचे आयुष्य कठिण असते. जगासामोर प्रत्यक्षपणे येत नसली तरिही प्रत्येक स्त्रिची संघर्षाची गोष्ट ही असतेच. स्त्रिया स्वत:चा स्वाभिमान जपण्यासाठी संयम बाळगतात. गरज पडल्यास अपमान सहन करतात. त्याचबरोबर घरादाराचा त्याग करण्याची हिंमतही  दाखवितात. परंतू आपल्या स्वाभिमानाला धक्का लागू देत नाहीत.

  शब्द पाळणे, कामाप्रती प्रामाणिकपणा, संयम व चिकाटी, कठोर मेहनत घेण्याची तयारी आणि बोलण्याअगोदर करून दाखविण्याची हिंमत ही स्त्रियांची खास वैशिष्टे असतात. जेव्हा एखादी स्त्रि स्वत:साठी ठामपणे काही निर्णय घेते. तेव्हा तिच्या त्या निर्णयाला देवही बदलू शकत नाही. घेतलेल्या निर्णयाला सत्यात उतरविण्यासाठी ती आपले चित्त एकाग्र करते व संयमाची परिसीमा गाठते. तसेच गोष्टी सत्यात उतरविते. म्हणून स्त्रियांच्या स्वाभिमानाला चुकूनही डिवचू नये.

2. स्वाभिमान स्त्रियांना क्षमतेपेक्षा जास्त मेहनत घेण्यास प्रवृत्त करतो.

   स्त्रिया   त्यांच्या कुटूंबियांवर विनाअट प्रेम करतात. त्यांच्या प्रती मनात  सेवाभाव ठेवतात. तसेच घरादाराला स्वर्ग  बनवितात. त्या मोबदल्यात त्यांच्या कुटूंबियांकडून नाहिच्या बरोबर अपेक्षा असतात. त्यांच्या भावनांना समजून घेणे, त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवणे त्यांच्यासाठी मनापासून केलेल्या क्षुल्लक गोष्टींनीही त्या प्रसन्न होतात. परंतू त्यांच्या भावनांच्या आवेगाला वस्तू, पैसा व संपत्तीच्या मोहाशी जोडून जेव्हा त्यांचा अपमान करण्यात येतो. तेव्हा मात्र त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. स्वाभिमान दुखावला गेलेली स्त्रि मागचा पुढचा विचार न करता स्वबळावर उभी राहण्यासाठी सर्वस्व पणाला लावते. कठोर मेहनत करते. तसेच तिच्या मनाला बोचणार्‍या गोष्टीवर तोडगा काढल्या शिवाय स्वत:ला शांत बसू देत नाही. त्यासाठी ती आपल्या क्षमतांच्याही सिमा पार करते.

3. स्वाभिमानी स्त्रिया ध्येय गाठतात.

  स्वाभिमान हा स्त्रियांच्या आत्मविश्वासाला चालना देतो. ज्या स्त्रिचा आत्मविश्वास जागृत होतो ती तिच्यातील कमतरतांवरही मात करते. परंतू ज्या स्त्रियांमध्ये आत्मसम्मानाची कमी असते त्या अनुकूल वातावरणात व कौशल्यांनी परिपुर्ण असूनही स्वत:ची प्रगती करू शकत नाहीत. तर आपले आयुष्य वाया घालवितात. परंतू स्वाभिमानी स्त्रिया कोणतेही विशेष गुण नसतांनाही मनोमन ध्येय ठरवितात व पुर्णत्वास नेतात. कारण त्यांच्या हृदयात जी सल निर्माण होते ती त्यांना शांत बसू देत नाही. अशाप्रकारे प्रत्येक स्त्रीने त्यांच्या मनाला बोचणारी गोष्ट शोधून काढली पाहिजे. कारण त्यामुळेच स्त्रियांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचेल व त्या सुसंगत यशाला त्यांच्या पायाशी लोळण घालावयास लावतील.

4. स्वाभिमानी स्त्रियांना स्वातंत्र्याचा अर्थ कळतो.

  जर एखादी स्त्रि गृहिणी आहे व घरात तिच्या स्थानाला तसेच क्षेत्राला महत्व आहे. तसेच ती घरात जी सेवा प्रदान करते त्यासाठी घरातील माणसे कृतज्ञ आहेत. तिचे मांगल्य व मातृत्व वंदनीय आहे. तिने घेतलेल्या निर्णयांना तसेच तिच्या शब्दाचा आदर राखण्यात येतो. असे असल्यास ती स्त्रि गृहिणी असूनही स्वातंत्र्याचे सुख उपभोगत आहे. परंतू ज्या स्त्रियांना घरात निर्जीव वस्तू प्रमाणे वागविण्यात येते. त्यांच्या कष्टांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्यात येते. त्यांच्या भावनांचा चुकीचा अर्थ काढण्यात येतो. त्यांच्या इच्छा आकांक्षांना महत्व दिले जात नाही. स्त्रियांच्या घरच्या कामांना कमी लेखण्यात येते. ते करण्यासाठी कोणाचेही मदतीचे हात पुढे येत नाहीत. असे असतांना स्वतंत्र देशात राहूनही स्त्रियांचे पारतंत्र्य काही संपले नाही असे म्हंटले पाहिजे. कारण त्या समाजनिर्मीत पोकळ परंपरांच्या जाळ्यात अडकल्या आहेत. परंतू स्वातंत्र्याचे जगणे हा माणूस म्हणून प्रत्येकाचा अधिकार आहे. तेव्हा प्रत्येक स्त्रीने स्वत:च्या स्वातन्त्र्याचा सुसंगत अर्थ ओळखला पाहिजे. त्याचप्रमाणे स्वाभिमानाच्या जगण्याने प्रेरित होवून आपल्या अस्तित्वाला आपल्या भूमिकांना व आपल्या कारकिर्दीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली पाहिजे.

  जेव्हा कुटूंबातील एकाही स्त्रिचा स्वाभिमान जागृत होतो तेव्हा ती कुटूंबातील अन्य स्त्रियांच्या मनातही स्वातंत्र्याचे बिज पेरते. तसेच त्यांना जागृत करण्यासाठी प्रयत्नशील असते. अशाप्रकारे जेव्हा स्त्रियांमध्ये आत्मसम्मानाची क्रांतीज्योत पेटत जाईल तेव्हा एक स्त्रि नाही, एका कुटूंबातील स्त्रिया नाही तर समाजातील संपुर्ण स्त्रिवर्ग स्वाभिमानाने झळाळून निघेल व जगाला आपले महत्व पटवून देईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *