उच्च आत्मप्रतीमेतून प्रतिष्ठा

आपल्या नजरेत स्वत:विषयी आदर असणे, आपल्याला स्वत:वर गर्व वाटणे, आपल्यामध्ये मीपणाचा अंशही नसणे तसेच आपल्या व्यक्तीमत्वात विनम्रभाव व मनाचा कणखरपणा असणे ह्या सर्व गोष्टी आपली आपल्या मनात उच्च आत्मप्रतिमा घडवत जाण्यात महत्वाची भूमिका पार पाडत असतात. परंतू ह्या सर्व गोष्टींचे रोपण आपल्या व्यक्तीमत्वात इतक्या स्वाभाविकपणे होत नसते. तर त्यासाठी आपल्या आयुष्याचा पहिला व सर्वात महत्वपूर्ण टप्पा म्हणजे आपले बालपण कशा वातावरणात गेले ह्या गोष्टीने त्यावर विशेष फरक पडत असतो. त्याचप्रमाणे आपल्या कोवळ्या मनावर पैलू पाडण्याकरीता आपल्यावर कसे संस्कार बिम्बावीन्यात आले. आपल्या आस पास वावरणारी माणसे व सजीव निर्जीव सृष्टी कशी होती. आपली तेव्हाची परिस्थिती कशी होती. तसेच आपण आपल्या लहानपणी एखाद्या अशा आघाताचा सामना तर केला नव्हता ना? ज्यामुळे अजूनही आपल्या मनावर लज्जास्पद भाव, आपण दोषी असण्याची भावना किंवा अनाहूत भीतीचे साम्राज्य असण्याची शक्यता आहे. त्याचाही आपल्या आत्माप्रतीमेवर आजीवन पगडा राहतो. ज्यामुळे आपली आत्मप्रतिमा आपल्याच मनात ढासळलेली असते. ज्याचा सर्वात जास्त आपल्या आत्मविश्वासावर वाईट परिणाम होत असतो. किंबहुना हेच महत्वाचे कारण असते कि ज्याने भवितव्यात आपली नाती व आपली कारकीर्द सर्वात जास्त धोक्यात येतात. कारण आपल्या कमकुवत मानसिकतेमुळे नात्यांमध्ये आपण प्रतिस्पर्धा निर्माण करतो. तर आपल्या कारकीर्दीस प्रतिष्ठा प्राप्त करून देवू शकत नाही. तेव्हा आपण आपल्या मनात आपल्याच आत्मप्रतीमेची पाळमूळ बंधनरहीत का झालीत ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणे. तसेच त्या उत्तराचा धाडसाने स्वीकार करून जागरूकतेने त्यामधून बाहेर पडणे. हे आपल्या पुढील आयुष्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे असते.

   आज आपल्या समाजात गृहिणी ह्या पेशाला सर्वात कमी महत्व दिले जाते. किंबहुना गृहीतच धरले जाते. त्यामागे शून्य अर्थार्जन हे एक सबळ कारण तर आहेच. त्याचबरोबर गृहिणींची काही विशिष्ट कारणांनी स्वत:च्या मनात घसरत गेलेली आत्मप्रतीमा हे देखील महत्वाचे कारण आहे. मात्र त्याकरीता बरेचदा इतरांपेक्षा अधिक गृहिणी स्वत:च जबाबदार असतात. कारण आपल्या अजागृकतेमुळे त्यांनी कधी एक माणूस म्हणून स्वत:कडे उमेदीने पाहिलेलेच नसते. त्याचप्रमाणे आपल्या पेशाला देखील त्यांनी उपेक्षित ठेवलेले असते. जोपर्यंत आपले असणे किंवा आपले अस्तित्व आपल्याला महत्वाचे वाटत नाही. तोपर्यंत आपल्याशी जुळलेल्या गोष्टींना किंबहुना आपल्या पेशालाही आपण शंकेने बघत असतो. त्यामुळे इतरांनाही आपल्या मागे स्वत:चा वेळ व महत्वाकांक्षा लावणे आपला वेळ वाया घालविण्यासारखे वाटते. असे निदर्शनात येते कि गृहिणी असलेल्या बहुतेक स्त्रिया ह्या व्यावसायिक, मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या किंवा उत्तम अर्थार्जन करणाऱ्या पुरुषाच्या जोडीदार असतात. त्यामुळे घरात त्यांना आर्थिकदृष्टीने  आरामदायक वातावरण सहजच उपलब्द्ध होते. असे असतांना जोपर्यंत त्यांना स्वावलम्बनाचे महत्व काळात नाही तोपर्यंत घराबाहेर पडून मिळकतीसाठी काही करण्याची त्यांना कधी गरजच भासत नाही. उलट त्यांना आपल्या पेशाअंतर्गत येणारी घराशी निगडीत कामेही स्वहस्ते करणे कमीपणाचे वाटत असते. कारण त्यांना ते समाजातील त्यांच्या स्थानाला व ख्यातीला साजेशे वाटत नाही. अशाप्रकारे त्या गृहीणींना घरात आरामात राहणे जणूकाही एकप्रकारे आपले सौभाग्य वाटू लागते. त्यातल्या त्यात त्यांच्या सेवेस रुजू होण्याकरीता मोलकरीण हा पेशा सुद्धा मोठ्या प्रमाणात उदयास आलेला आहे. कारण कोणत्याही घरी कामासाठी येणाऱ्या मोलकरणींच्या संख्येवरून शेजारीपाजारी त्या कुटुंबाच्या श्रीमंतीचे प्रमाण ठरवत असतात.  परंतू घरात मोलकरीण लावण्या इतपत कोणतेही महत्वपूर्ण व गंभीर कारण नसेल तरीही मोलकरणीकडून कामे केली जात असतील. तर त्यामुळे गृहिणींच्या व्यक्तीगत रिकाम्या वेळेत सहाजिकच भर पडते. परंतू जर गृहिणींनी आपल्या त्या वेळेचा उत्पादनक्षम कामांसाठी सदुपयोग केला नाही. तर त्यांची विचारसारणी बदलत्या काळाअनुरूप  विकसित होवू शकत नाही. अशाप्रकारे त्यांची आत्मप्रतिमा त्यांच्या नजरेत उच्च होत नाही. त्यामुळेच गृहीणी आपल्या अत्यंत कर्तव्यदक्ष पेशालाही आजीवन प्रतिष्ठा प्राप्त करून देवू शकत नाहीत.

   एखादी स्त्रि स्वयंप्रेरणेने गृहिणी नसेल तर तिच्यात घराकामांची मनापासून आवड निर्माण होत नाही. परंतू स्त्रिया देशाच्या पंतप्रधान जरी बनल्या तरी त्यांची घरापासून सुटका होत नसते. कारण घराची संकल्पना सर्वस्वी स्त्रियांच्या योगदानानेच यशस्वी झालेली आहे. म्हणूनच स्त्रियांना गृहलक्ष्मी असे संबोधले जाते. परंतू ज्या स्त्रियांचे घरात मन लागत नाही त्या मनोमन नोकरदार स्त्रियांशी स्वत:ची तुलना करत असतात. कारण त्या फक्त त्यांचे स्वतंत्रपणे उंबरठ्याबाहेरच्या जगात वावरणे बघत असतात. परंतू त्यांची घर व कारकीर्द ह्या दोन्ही गोष्टी सांभाळत असतांना होणारी तारांबळ बघू शकत नाहीत. त्याचप्रमाणे पेशा कोणताही असो तो करत असतांना आपल्याला माणूसपणाची जाणीव झाली नाहीतर आपण त्या पेशाचाही सम्मान करत नाही. त्यामुळेच गृहिणीच्या पेशातील स्त्रियांना नोकरदार स्त्रियांच्या दिनचर्येचे आकर्षण व स्वत:च्या कामांविषयी न्युनगंड वाटत असतो. कारण घरातील आपल्या कर्तव्यदक्ष स्थानाला, आपल्या विश्वासार्य भूमिकेला, आपल्या अत्यंत जबाबदार क्षेत्राला आणि जिथे त्यांना आपली सेवा प्रदान करण्यास भरपूर वाव असतो अशा उत्कृष्ट पेशाला त्या माणुसकीच्या दृष्टीने बघत नाहीत. त्यांनी घराप्रती केलेल्या संपूर्ण समर्पणावर संसार भक्कमपणे उभा असूनही त्यांच्या नजरेत फक्त कोणत्याही पेशातून अर्थार्जन होणे हे अधिक महत्वाचे असते. अशावेळी त्यांच्या दृष्टीने त्यांची आत्मप्रतिमा बळकट होवू शकत नाही. कारण त्या आपल्या कामांना प्रतिष्ठेस पात्र समजत नाहीत.

   प्रत्येक व्यक्ती हा जन्मजातपणे  कलागुणांनी समृद्ध असतो. तेव्हा त्या व्यक्तीचा पेशा कोणताही असला तरी स्वत:मधील कौशल्यांचा छडा लावून तो स्वत:चा छंद जोपासू शकतो. किंवा त्यांना अर्थार्जनाचे माध्यमही बनवू शकतो. गृहिणींच्या पेशातही वेळेचे स्वातंत्र्य तर असतेच त्याशिवाय त्यांच्यावर कोणाचे वर्चस्वही नसते. ही ह्या पेशाची सकारात्मक बाजू आहे. परंतू काही गृहिणी ह्या गोष्टीचा गैरफायदा उचलत असतात. कारण त्यांच्या वेळेला अजिबात शिस्त नसते. त्यामुळे घराप्रती असलेली त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या केवळ ह्यामध्येच अडकून स्वत:ला बिचाऱ्या समजत असतात. म्हणूनच त्यामधून आपले डोके बाहेर काढून निराळा व उत्पादनशील विचार करण्यास कित्येक गृहीणीन्ना आजीवन उसंतच मिळत नाही. तसेच त्याविषयी त्या केवळ आजीवन तक्रारी करत असतात. परंतू त्या दृष्टीकोनातून कोणतेही भक्कम पाउल मात्र उचलत नाहीत. कारण त्यासाठी त्या स्वत:ला नाहीतर सर्वस्वी परिस्थितीला तसेच घरातील कामांना व माणसांना जिम्मेदार ठरवत असतात. परंतू कधीही आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या रॉकेटला  स्वत:च्या जीवनाला घडविण्याचे व आपली ओळख निर्माण करण्याचे इंधन देत नाहीत. कारण त्यांच्या मनात हे विचार रुजलेले असतात कि आपल्या कामातून अर्थार्जन झाले तरच आपण स्वावलंबी होवू शकतो. परंतू स्वावलंबी होणे हे फक्त अर्थार्जन ह्या विषयाशी निगडीत व तेवढ्या पुरतेच सीमित नसते. त्याहीपेक्षा स्त्रियांनी आपल्यात विश्वास जागृत करणे. तसेच आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी झटणे हे अधिक महत्वाचे असते. अशाप्रकारे जसजसे गृहिणी असलेल्या स्त्रीयांचे विचार मिंधेपणास झिडकारून आत्मसम्मानाच्या जगण्यास स्वीकारू लागतील तसतशी त्यांची आत्मप्रतिमा त्यांच्या नजरेत उच्च होत जाईल. त्यामुळे त्यांच्या पेशाचीही प्रतिष्ठा वाढत जाईल.

   गृहीणींनी आपल्या मनात संयम, शब्दात विनम्रता व कार्यात कणखरता जोपासली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या आत्मसम्मानात भर पडत जाते. कारण गृहिणींचा पेशा हा एकप्रकारे सेवेचे व्रत असतो. त्यामुळे इतरांनी त्यांच्याप्रती ऋणी असावे किंवा कृतज्ञतेचे भाव व्यक्त करावे ही अपेक्षा गृहिणींनी कदापि बाळगू नये. परंतू गृहिणींनी आपल्या कर्तव्यदक्ष भूमिकेतून मात्र आपल्या माणसांना निरंतर  साहस प्रदान करावे. आपल्या स्थितप्रज्ञ व्यक्तीमत्वातून त्यांना जीवनात पुन्हा उभे राहण्याचे बळ द्यावे. तसेच आपल्या हसऱ्या चेहऱ्याने निरंतर सुखाची ग्वाही देत राहावे. कारण त्यांनी निस्वार्थपणे निभावलेल्या कर्तव्यांनीच त्यांच्याच मनाचा मोठेपणा सिद्ध होत असतो. त्यांच्या शत प्रतिशत योगदानानेच एक उर्जावान व कर्तबगार कुटुंब निर्माण होवू शकते. तेव्हा जर स्त्रिया आपल्या गृहिणी ह्या पेशाची सखोलता व महत्व समजू शकल्या. तर त्यांच्यासाठी गृहिणीचा पेशा निभावणे हे एक महान कार्य ठरू शकते. कारण आपल्या माणसांची निस्वार्थ व निरपेक्ष सेवा हीच गृहिणींच्या पेशाची महती आहे. त्यामुळे स्त्रियांचे गृहिणी असणे हे त्यांच्याकरीता कमीपणा वाटण्यासारखे किंवा न्युनगंड बाळगण्यासारखे असूच शकत नाही. परंतू जर गृहिणींनी आपल्या व्यक्तीमत्व विकासाकडे दुर्लक्ष केले. तसेच त्या जीवनात आपले ध्येय साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहिल्या नाहीत. तर त्यांच्यासाठी ही गोष्ट त्यांची आत्मप्रतिमा खाली घसरण्यास कारणीभूत ठरू शकते.

   गृहिणींची कामे ही सर्वतोपरी त्यांना शारीरिक व मानसिकरीत्याही थकविणारी असतात. कारण नेहमीच त्या कामांना इतरांकडून स्तुतीपूर्ण प्रोत्साहन मिळत नाही. परंतू स्त्रियांना मात्र त्यांची कार्यक्षमता वाढण्याच्या दृष्टीने आपल्या माणसांकडून भावनिक आधार मिळण्याची अत्यंत आवश्यकता असते. अन्यथा त्या आयुष्यात नेहमीकरिता खिन्नतेच्या शिकार होवू शकतात. त्यासाठी गृहिणींनी आपले शारीरिकरीत्या अती थकणे शक्य तितके कमी केले पाहिजे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या दिनचर्येत अवलंब करून त्यांनी आपली उर्जा वाचविली पाहिजे. कारण आपल्याला आपले आयुष्य अर्थपूर्ण बनवायचे असल्यास आपली उर्जा वाचवून ती उत्पादनक्षम कामात लावणे आवश्यक असते. त्यामुळेच आपले आयुष्य आपल्याला हवा तसा आकार घेवू लागते. त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये आपले घर प्रसन्न व चैतन्याने समृद्ध ठेवण्याची कला असते. किंबहुना ज्या घरास गृहिणीच्या रुपात चोवीस तास एका कर्तव्यदक्ष स्त्रीचा सहवास लाभतो. त्या घराच्या कानाकोपऱ्यास मायेचा स्पर्श असतो. तेव्हा गृहिणींनी आपल्या पेशाप्रती स्वखुशीने दैवी समर्पण केले पाहिजे. तसेच आपल्या व्यक्तीगत वेळेचा उपयोग स्वत:च्या व्यक्तीमत्व उभारणीसाठी केला पाहिजे. मनात तुलनात्मक भाव आणून आपल्या पेशाची महती कधीही कमी करू नये. त्याचप्रमाणे स्वाभिमानाच्या जगण्याला प्रादान्य देवून आपली आत्मप्रतिमा व आपल्या पेशाची प्रतिष्ठा उच्च केली पाहिजे.

1. गृहिणींना आपल्या पेशाद्वारे आनंद पसरविता आला पाहिजे

   आजच्या काळात पैसा केवळ जीवनातील गरजा भागविण्याचे साधनच राहिला नाही तर आपल्या श्रीमंतीची व उच्च स्तरीय जीवनशैलीची खरी ओळख बनला आहे. त्यामुळे बाहेरच्या जगात प्रतीस्पर्धांचे उधाण आलेले आहे. कारण आपण जगण्याचा खरा अर्थ विसरून पैसा कमविण्याचे निर्जीव यंत्र बनत चाललोय. इतरांशी स्वत:ची तुलना करत व  आणखी थोडे म्हणत म्हणत तसेच स्वत:च्या क्षमतांचा विचार न करता सर्वकाही आपल्या पदरात पाडत जातो. परंतू मिळवलेल्या यशाने कधीही समाधानी होत नाही. तसेच आपल्या यशाचा सोहळाही साजरा करत नाही. परिणामस्वरूपी आपण मनावरचा ताण, खिन्नता, दु:ख व निराशेचे शिकार होत जातो. अशावेळी फक्त घरच अशी जागा असते जिथे आपल्याला दिलासा मिळतो. तसेच आपल्या उमेदीला पुन्हा पंख फुटण्याची पूर्ण खात्री असते. ज्याचे संपूर्ण श्रेय घरातील गृहिणीला जाते. कारण जर गृहिणींचा दयाभाव जागृत असेल तर त्या आपल्या माणसांच्या अडचणी स्वत:हून समजून घेवू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या सहयोगाने त्यांचे मनोबल वाढवू शकतात. आपल्या सेवाभावाने त्यांची मनं सुद्धा जिंकू शकतात. ज्यामुळे कठोर जगाचा सामना करत असतांना आपल्या होरपळलेल्या आशांना पुन्हा उभारी येवू शकते. आपल्या निस्वार्थ प्रेमाने त्या घरात असे वातावरण निर्माण करू शकतात. जेणेकरून घराच्या सान्निध्यात घालविलेला प्रत्येक क्षण आपल्याला नवचैतन्य बहाल करू शकतो. अशाप्रकारे गृहिणी आपल्या लहान लहान प्रयत्नांनी आपल्या माणसांच्या जगात आनंद भरू शकतात. ज्यामुळे त्या स्वत:च आनंदाचा महामेरू बनतात. अशाप्रकारे त्यांची आत्मप्रतिमा आपोआपच उच्च होत जाते.

2. गृहिणींनी आपल्या वेळेची किंमत केली पाहिजे

   आपले क्षेत्र कोणतेही असले किंवा पेशा काहीही असला तरी आपण आपल्या व्यक्तीमत्व विकासावर भर दिल्यास त्या पेशाचे सोने करण्याची क्षमता आपल्यात समाविष्ट होत जाते. परंतू व्यक्तीमत्व विकासासंबंधी विचार करण्याअगोदर आपण स्वत:चे आत्मपरीक्षण केले पाहिजे. कारण आत्मपरीक्षणाने आपण कोणत्या मार्गाने स्वत:मध्ये उत्तमरीतीने सुधारणा आणू शकतो ह्यावीषयी स्पष्टता येते. तेव्हा गृहिणींनी आपल्या व्यक्तीमत्वानुसार घराच्या चार भिंतीत राहूनच ऑन लाईन च्या माध्यमातून आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी निरंतर प्रयत्नशील राहिले पाहिजे. परंतू जर त्या चारचौघात जावून शिकणे पसंत करत असतील. तर मात्र त्यांच्याकरीता बचत गट व सखीमंच सारखे महिलांचे समूह शहरांच्या मोठमोठ्या वसाहतींमध्ये अस्तित्वात असतात. ज्यांच्या माध्यमातून स्त्रियांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. स्त्रीयांसम्बंधीत कायदे व सामाजिक नियमांची स्त्रियांमध्ये जागरूकता पसरविली जाते. घरच्या घरी राहून स्त्रियांची करण्याची इच्छा असल्यास कमीत कमी भांडवलात करता येण्यासारख्या व्यवसायांची माहिती सुद्धा दिली जाते. त्याचप्रमाणे त्याकरीता बचत गटांद्वारे मदतही केली जाते. तेव्हा गृहिणींनी सर्वप्रथम आपल्या कामांची किंमत केली पाहिजे. त्यानंतर आपल्या व्यक्तीगत रिकाम्या वेळेला उत्पादनक्षम बनविले पाहिजे. कारण त्यांनी आपल्या व्यक्तीमत्व विकासासाठी केलेले परिश्रम कालांतराने आपोआपच फलद्रूप होत जातात. तसेच त्या त्यांच्याही नकळतपणे उच्च आत्मप्रतीमेने समृद्ध झालेल्या असतात.    

3. गृहिणींनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे

   आज आपल्या समाजात स्त्रियांसाठी मोलकरीण हा विषय अतिशय संवेदनशील झाला आहे. दोन स्त्रियांमधील चर्चेचा महत्वाचा विषय देखील मोलकरीण हाच असतो. कारण गृहिणी असोत किंवा नोकरदार स्त्रिया त्यांनी एकदा का घरातील कामांसाठी मोलकरीण नियुक्त केली कि त्या सर्वस्वी तिच्यावर अवलंबून राहतात. त्यामुळे मोलकरणीने रजा घेण्याचा विचार जरी बोलून दाखविला तरी त्यांच्या मनावरचा ताण वाढत असतो. परंतू मोलकरीण असली तरी आपण तिचा एक माणूस म्हणून विचार करणे हे मात्र माणुसकीला साजेशे असते. कारण आपल्याला सेवा देणे हा तिचा पेशा असला तरीदेखील तिच्या आयुष्यातील अडचणी नगण्य नसतात. म्हणूनच घरातील कामे करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे हा देखील गृहिणी तसेच नोकरदार अशा दोन्ही प्रकारच्या स्त्रियांसाठी एक विश्वासार्य पर्याय ठरू शकतो. कारण त्यामुळे त्यांच्या वेळेची बचत होवू शकते. स्त्रिया आपल्या व्यक्तीगत कामांमध्ये गुंतल्या असल्या तरी त्यांना घरातील कामे पडून असल्याची खंत वाटणार नाही. कारण आपल्या सवडीने नंतर कामे आटोपण्याचे स्वातंत्र्य त्यांच्याकडे असेल. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कामांची गुणवत्ता देखील सुधारते. त्याचप्रमाणे स्त्रियांना आपल्या शरीराला अतिरिक्त कामांमुळे येणाऱ्या थकव्यापासून वाचविता येवू शकते. ज्यामुळे त्यांचे मन प्रसन्न राहण्यास मदत मिळते. तसेच गृहिणींचे मन प्रसन्न असणे ही त्यांची उच्च आत्मप्रतीमा असल्याची ग्वाही असते.

4. गृहिणींनी स्वत: आपल्या कर्तव्यदक्ष पेशाचे महत्व जाणले पाहिजे

   गृहिणी असलेल्या स्त्रियांनी आपल्या पेशाला सेवेच्या महान दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. तेव्हाच त्या आपल्या पेशाला सम्मानास पात्र समजू शकतील. कारण घर हे प्रत्येकासाठी महत्वाचे क्षेत्र असते. त्याचप्रमाणे ह्या क्षेत्राला सांभाळण्यासाठी एका विश्वासार्य व्यक्तीची नितांत आवश्यकता असते. त्यामुळेच हे क्षेत्र सुरक्षित व मायेचा स्पर्श असलेली जागा बनू शकते. कारण स्त्रिया ह्या घराच्या सजावटीसाठी वापरलेल्या रंगबिरंगी वस्तू व पडद्यांसारख्या असतात. ज्यामुळे दगड विटांनी बनलेल्या कठोर भिंतींचेही रूप पालटते. त्याचप्रमाणे स्त्रिया आपल्या भावनिक जगातील असंख्य रंगांची उधळण घर नावाच्या क्षेत्रात करत असतात. ज्यामुळे घरात प्राण फुंकले जातात. तेव्हा गृहिणी असलेल्या स्त्रियांनी आपल्या कर्तव्यदक्ष पेशाचे व आपल्या महत्वपूर्ण भूमिकांचे आपल्या माणसांच्या जीवनात असलेले महत्व स्वत: जाणून घेतले पाहिजे. त्यानंतरच त्या आपल्या पेशाला गृहीत धरणे बंद करतील. तसेच त्याच्या प्रतिष्ठेकरीता स्वत: झटतील. कारण ह्या पेशाच्या सूत्रधार आई, बहीण, बायको, मुलगी अशी जिव्हाळ्याची नाती असतात. जी कायम आपल्या बुद्धीने नाही तर हृदयाने सर्वांचा विचार करत असतात. त्यामुळे जिथे हृदय पणास लागते ते क्षेत्र किंवा पेशा त्याला प्रामाणिकपणे निभावणाऱ्या व्यक्तीस कमीपणा आणणारा ठरू शकत नाही. तेव्हा त्याला केवळ अर्थार्जनाशी जोडून त्याची थोरवी कमी करू नये. कारण काहीही झाले तरी त्या पेशाची प्रतिष्ठा जपणे हेच गृहिणींची आत्मप्रतिमा उच्च करणारे कार्य आहे.

   उच्च आत्माप्रतीमेची पाळमुळ ही सर्वस्वी स्वत:चा मनापासून स्वीकार करण्यात असतात. कारण जोपर्यंत आपण जसे च्या तसे स्वत:ला आवडत नाहीत तोपर्यंत आपल्या मनात स्वत:साठी तुलनात्मक संघर्ष निरंतर सुरू असतो. ज्यामुळे आपण आपल्याशी निगडीत कोणत्याही गोष्टीस प्रतिष्ठा प्राप्त करून देवू शकत नाही. तेव्हा गृहिणी असलेल्या स्त्रियांनी आपला व्यक्तीमत्व विकास करून आपली आत्मप्रतिमा आपल्याच नजरेत उच्च केली पाहिजे. अशाप्रकारे त्यांनी आपल्या पेशाचे मानक वाढविले पाहिजे.   

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *