प्रयत्नार्थी परमेश्वर

       

 ” प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे” ह्या म्हणीच्या संदर्भांप्रमाणे आपल्या जीवनात आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टींनाही सत्यात उतरवू शकतो. कारण गोष्टींचे घडून येणे किंवा न घडणे हे जरी कोणाच्याही हातात नसले तरीही त्यापूर्वीचा काळ हा मात्र आपल्या प्रयत्नांचा असतो. जर आपण आपल्या प्रयत्नांप्रती जागरूक असलो. प्रयत्नांना आपल्या आंतरिक ठिणगीने तेवते ठेवले. त्याचबरोबर प्रयत्नांना यश प्राप्तीच्या दृष्टीकोनातून भावनिक कारणांची जोड दिली. तर आपल्या प्रयत्नांना सृष्टीच्या उच्च स्तरीय उर्जेचे पाठबळ लाभते. कारण दैवी मदतही त्यांनाच मिळते जे आपल्या प्रामाणिक प्रयत्नांवर पूर्ण विश्वास ठेवतात. प्रयत्न हे आपली कोणत्याही परिस्थितीत तग धरून ठेवण्याची क्षमता व आपली कार्यक्षमता ह्यांचे प्रतिनिधीत्व करत असतात. कारण कधीकधी प्रयत्न करत असतांना आपल्या संयमाची परिसीमा होते. त्याचप्रमाणे अथक प्रयत्न करूनही जेव्हा वारंवार पदरात अपयशाचे दानच पडते. तेव्हा आपले मन पुन्हा अपयश येण्याच्या केवळ विचारांनीच खचलेले असते. तरीही आपल्याला पुन्हा उठून नव्या उमेदीने व धैर्याने पुढच्या वाटचाली कडे लक्ष केंद्रित करावे लागते. म्हणूनच जर जीवनात प्रयत्नांची कास धरली तर आपण पूर्वीपेक्षा अधिक कणखर व स्वत:मध्येच उत्तमोत्तम होत जातो. त्याचप्रमाणे प्रयत्न आपल्याला परिस्थितीचा दटून सामना करणेही शिकवितात. कारण प्रयत्न करत असतांना आपल्या मनात कायम आशेचा सूक्ष्म अंकुर जीवित असतो. जीवनात कधी ना कधी आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची चव नक्कीच चाखायला मिळणार ही खात्री असते. तर कधी जीवनात आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना आपल्या क्षमते व अपेक्षेपेक्षा जास्त यश प्राप्त झाल्याचा अनुभवही प्रत्यक्षात आपल्याला घ्यावयास मिळतो. ह्याचा अर्थ हा होतो कि प्रयत्न करतांना आपण प्रामाणीकपणा, अखंडता व एकाग्रता ह्या तीन महत्वपूर्ण गोष्टींचे पालन केले तर आपल्या प्रयत्नांना परमेश्वराचे पाठबळ नक्की लाभते. तेव्हा आपण नेहमी आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला पाहिजे व आपल्या कर्तव्यांचे पालनही केले पाहिजे. 

   आपण करत असलेल्या प्रयत्नांच्या मागे नेहमी आपला सकारात्मक दृष्टीकोन व यश प्राप्तीची जिद्द असली पाहिजे. त्यामुळे प्रयत्नांना बळकटी येते व इतरांचाही आपल्यावर विश्वास बसतो. त्याचबरोबर इतरही आपल्याला सहकार्य करण्यास स्वत:हून तयार होतात. अशाप्रकारे जेव्हा कोणतेही कार्य करण्यास एकजुटीने व निस्वार्थ भावनेने प्रयत्न केले जातात. तेव्हा ते प्रयत्न प्रभावी ठरण्याकरीता परमेश्वराचे म्हणजेच सृष्टीच्या दैवी उर्जेचे विलक्षण योगदान आपल्याला लाभत असते. त्यामुळेच प्रयत्नांचा प्रवास हा कितीही अवघड असला तरीही त्या प्रवासाचा शेवट मात्र आपल्याला हवा तसा होत असतो. परंतू प्रत्येकच वेळी सुदैवाने आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईलच ही खात्री नसते. त्याचप्रमाणे प्रयत्न करण्याचा काळ हा आपल्या तर्क वितर्कानुसार अगदी सुरळीत पार पडेलच असेही नसते. कारण कधीकधी प्रयत्नांचे स्वरूप अतिशय क्लिष्ट व आपल्याला आतून हलवून टाकणारे असते. अशावेळी यदाकदाचित आपल्या त्या कष्टांमधून आयुष्यात मनासारखे घडू शकले नाही. तरीही त्याचे शल्य आपल्या मनाला तितके बोचत नाही. कारण त्याक्षणी आपण आपल्या क्षमतांना आव्हान करून प्रयत्नरूपी लढा हिमतीने गाजावील्याचा आनंद आपल्या मनाला उत्साहीत करत असतो. त्याचबरोबर प्रयत्नांच्या त्या उतार चढाव दाखविणाऱ्या प्रवासातून आपण जे जीवनोपयोगी शिक्षण घेतलेले असते. त्याचा आपल्या पुढील आयुष्यातही आपल्याला उपयोग होत असतो. कारण त्यामधून तावून सुलाखून निघालेले आपले व्यक्तीमत्व आणखीच सखोल व परिपक्व झालेले असते. जे भविष्यात येणाऱ्या अपयशरूपी आणखी कठोर वादळांचा नेटाने सामना करण्यास सज्ज असते. 

   एखाद्या व्यक्तीच्या जीवनाची कहाणी आपल्यासाठी प्रेरणादायी तेव्हाच ठरते. जर त्या व्यक्तीने त्याच्या जीवनाचा अत्यंत कठीण काळ हिमतीने पार केलेला असतो. त्याचबरोबर आपल्या अथक प्रयत्नांनी सार्थक बनविलेला असतो. त्याचप्रमाणे जगासाठी निरर्थक असलेली परंतू त्याच्याकरीता मात्र हृदयाच्या अगदी निकट असलेली गोष्ट त्याने प्रयत्नांच्या पराकाष्ठेने मिळविली असते. कारण ज्याप्रमाणे उजाडण्या पूर्वीची रात्र अधिक काळोखी असते. त्याचप्रमाणे आपले आयुष्य एकप्रकारच्या सकारात्मक परिवर्तनाने तेजाळन्यापूर्वी अनेक अनपेक्षित व कठीण समस्यांनी व्यापलेले असते. परंतू त्या दरम्यान आपल्या जीवनात घडलेली एखादी मनासारखी घटनाही आपल्याला वाळवंटाच्या रखरखत्या उष्णतेत दुरूनच दृष्टीक्षेपास पडणाऱ्या व आपल्या मनात खोटी का होईना परंतू आशा निर्माण करणाऱ्या  मृगजळाप्रमाणे दिलासादायक असते. कारण त्याक्षणी आपले सर्व प्रयत्न चुकीच्या दिशेने जात असल्याचा अनुभव आपण घेत असतो. त्यामुळे आपल्या आत्मविश्वासातही दृढता जाणवत नाही. आपल्या जीवनातील तो काळ व आपली नाती सर्वात वाईट परिस्थितीतून जात असल्याचे आपल्याला पदोपदी जाणवत असते. अशावेळी आपल्या बरोबरच का? किंवा आपणच का ? असे प्रश्न व निराशाजनक विचार आपल्या मनास अतिशय भेडसावत असतात. परंतू आपल्या तशाही अवस्थेत आपला स्वाभिमान जागृत असल्यास तसेच आपण स्वत:शी प्रामाणिक असल्यास आपल्या हेतूच्या दिशेने करत असलेल्या आपल्या प्रयत्नांना खात्रीशीरपणे यश येते. कारण ज्या कामात आपण आपले इमान ओवाळून टाकतो तिथे देवाचेअस्तित्व हमखास असते. म्हणूनच जेव्हा आपण कोणाचेही आपल्याकडे लक्ष नसतांना फक्त स्वत:शी प्रामाणिक राहून कष्ट घेत असतो. त्याचप्रमाणे परिस्थितीला घाबरून मैदान सोडण्याचा विचारही करत नाही. तेव्हा मात्र आपण त्यात आपल्या आंतरिक विश्वासाची भर घातली पाहिजे. कारण आपले ते सारे प्रयत्न सृष्टीच्या क्यामेऱ्याने अचूक टिपलेले असतात. परंतू त्याचे प्रमाण मात्र अन्य कोणाकडेही नसते. अशाप्रकारे तो कठीण काळ आपल्याला निस्वार्थपणे साथ देणाऱ्या माणसांच्या मोलाच्या साथीने देखील अगदी जादू झाल्याप्रमाणे स्वप्नवत पुढे जात असतो.  

   एखादा मोठ्या अपघातात, किंवा भूकंपा सारख्या नैसर्गिक आपत्तीत जीवन मरणाचा संघर्ष करणार्यांचे प्राण वाचविण्यासाठी चाललेले प्रयत्न हे वेळेची मर्यादा व त्यासोबत त्यांची तुटत चाललेली उमेद ह्या दोन गोष्टींचे पूर्णपणे भान ठेवून सुरू असतात. कारण धोक्यात असलेले लोक त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना वाचविले जाण्याकरीता कसोसीने प्रयत्न सुरू असल्याच्या आशेने जिवंत असतात. अशावेळी प्रयत्नांच्या स्वरूपात उचलले गेलेले कोणतेही अविचारी व उतावीळ पाउल शेकडो लोकांना मृत्युमुखी पाडण्यास कारणीभूत ठरू शकते. परंतू विचारपूर्वक, शांत चित्ताने व संयमपूर्वक घेतले गेलेले निर्णय व केले गेलेले प्रयत्न हे मात्र परमेश्वराच्या भक्कम पाठबळाने अलंकृत असतात. त्यामुळे ते अथक प्रयत्न यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणूनच आपल्या प्रयत्नांना नेहमी योग्य दिशा व सकारात्मक विचारांची जोड तर हवीच. त्याचबरोबर प्रयत्न कोणत्याही कारणाने व कोठेही कमी पडता कामा नयेत. कारण प्रयत्नांचा तो कालावधी पार पडल्यानंतर एकतर प्रयत्न यशस्वी झाल्यामुळे कित्येकांचे जीवन जीवावरच्या संकटातून मुक्त झाल्याचे समाधान व त्यामुळे द्विगुणीत होत असलेला आपला आनंद संपूर्ण आसमंत व्यापत असतो. किंवा मग आपल्या प्रयत्नात कोठेतरी कसर उरली म्हणून त्याचे परिणाम समाधानकारक आले नाहीत. त्यामुळे कित्येक निर्दोशांना अनाहूतपणे आपला जीव गमवावा लागला.  ह्या गोष्टीच्या पश्चातापाचे ओझे आजीवन आपल्या मनाला बोचत राहते.

  आपले प्रयत्न हे आपल्या भल्यासाठी असले तरी इतरांना हाणून पाडण्याच्या मनसुब्याने किंवा इतरांवर मात करण्याच्या निकृष्ठ हेतूने युक्त नसले पाहिजे. किंबहुना त्यात सर्वांच्या सेवेचा व बचावाचा सर्वसमावेशक दृष्टीकोन असला पाहिजे. त्याचप्रमाणे प्रयत्नांच्या महत्वपूर्ण कालावधीत आपल्यातील अहंकार व विश्वासघातकी प्रवृत्ती आपल्या प्रयत्नांना दर्जा प्राप्त होवू देत नाही. कारण आपल्या प्रयत्नांना मनासारखे यश येत नसल्यास आपण त्या वाईट प्रवृत्तींच्या मागे लपून स्वत:ला वाचवीत असतो. परंतू जर प्रयत्न करीत असतांना आपण आपली विनम्रता व सदसदविवेकबुद्धी जागृत ठेवून जीवनात वारंवार येणाऱ्या अपयशाला पचविले. त्याचप्रमाणे प्रत्येकवेळी त्यामधून काहीतरी नवीन शिकून आपल्या हातून होणाऱ्या चुका दुरुस्त करत गेलो. तर आपल्याकडे आशेने बघणाऱ्या माणसांचा आपल्या वरचा विश्वास हा कोणत्याही परिस्थितीत तठस्थ राहतो. त्यामुळे तेही पदोपदी आपली साथ देण्याकरीता तत्पर असतात. अशाप्रकारे एकमेकांच्या सकारात्मक उर्जेने व एकजुटीने केले गेलेले प्रयत्न यशस्वीरीत्या तडीस जातात. कारण तिथे परोपकाराच्या शुद्ध हेतूने प्रत्येकजण खारीचा वाटा उचलत असतो. तसेच कर्तव्यदक्षतेपोटी आपले काही ना काही योगदान देण्यास तयार होत असतो. अशाठीकानी सृष्टीची उच्चस्तरीय उर्जा आपले दैवी पाठबळ हमखास देत असते. त्याचबरोबर सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नांना विजयश्री बहाल करते.   

   प्रयत्न हे आपल्यात यश गाठण्याची जिद्द निर्माण करत असतात. कारण कधीकधी यश सहजा सहजी पदरात पडत नाही. परंतू प्रत्येकवेळी आपल्यात यशाप्रती आपली आसक्ती व आपला स्वत:वरचा विश्वास ह्या दोन्ही गोष्टी वाढतच जातात. त्याचबरोबर आपल्या मनात आत्मसम्मानावरही  प्रश्न निर्माण होत असतो. अशावेळी आपल्या निरंतर सुरू असलेल्या प्रयत्नांना परमेश्वराचे आशीर्वाद लाभतात. म्हणूनच प्रयत्नांचा अर्थ थेट परमेश्वराच्या अस्तित्वाशी जोडला जातो.

1  प्रयत्नांना प्रामाणीकपणाची झळाळी पाहिजे 

   प्रयत्न हे नेहमी कोणत्याही प्रकारच्या परीस्ठीतीरूपी चिखलातून बाहेर पडून स्वत:ला सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यासाठी केले जातात. काहीतरी असे साध्य करण्यासाठी केले जातात. ज्यामुळे आपल्या साम्मानात भर पडेल. त्याचप्रमाणे कोणाच्या जीवनाची ज्योत विझू नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. अशाप्रकारे प्रयत्नांचा प्रवास हा लहान लहान स्त्रोतांमधून निरंतर वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे असतो. ज्याला यशाच्या महासागरात स्वत:ला सामावून घ्यावयाचे असते. म्हणूनच हा प्रवास स्वत:शी प्रामाणिक राहून करणे आवश्यक असते. कारण प्रामाणीकपणा हा आपला सर्वात महत्वाचा गुणधर्म असतो. जेव्हा आपण स्वत:बरोबर एकटे राहून प्रामाणीकपणाने आपले कर्म करीत असतो. तेव्हा आपल्या त्या प्रयत्नांचा दर्जा उत्तमोत्तम होत जातो. त्याचबरोबर प्रामाणीकपणाने आपल्यातील माणूसही विविध मापदंडावर  तावून सुलाखून निघतो. अशाप्रकारे आपल्या प्रयत्नांना प्रामाणीकपणाची झळाळी असल्यास आपली आभा तेजस्वी होत जाते आणि आपण सृष्टीच्या ऊर्जेशी संरेखीत होतो. 

2 प्रयत्नांना योग्य दिशा असली पाहिजे 

   आपला जीवनकाल हा सीमित असतो. त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनातील उद्देशाचे योग्यप्रकारे आकलन होणे आवश्यक असते. तेव्हाच आपण आपल्या प्रयत्नांचा रथ योग्य दिशेने पुढे नेवू शकतो. अन्यथा दिशा भटकण्याचे असंख्य दुष्परिणाम आपल्या जीवनाच्या विविध पैलूंवर आपल्याला सहन करावे लागतात. त्याचप्रमाणे आपण आपल्या प्रयत्नांची दिशा वारंवार बदलत असल्यास आपला वेळही विनाकारण वाया जातो. ज्याची आपल्याला आपल्या पुढील आयुष्यात मोठी किंमत चुकवावी लागु शकते. परंतू जर आपल्या प्रयत्नांची दिशा योग्य असेल तर मात्र त्यामधून येणाऱ्या परिणामांविषयी आपल्याला काळजी करावी लागत नाही. कारण त्याचे परिणाम उत्तमच येणार ह्याची आपल्याला पूर्ण खात्री असते. त्याचबरोबर आपली वेळ, उर्जा व दिशा ह्या महत्वपूर्ण बाबींकडे आपण आपले लक्ष केंद्रित केल्यामुळे सृष्टीचेही पाठबळ आपल्या प्रयत्नांच्या दिशेने कार्यरत होते. 

3 प्रयत्न हे शिस्तबद्ध असले पाहिजे 

   आपण प्रयत्न हे विशिष्ट हेतू पुरस्सर करत असल्यामुळे त्यांचे शिस्तबद्ध असणे फार महत्वाचे असते. तेव्हाच आपण त्यांच्या प्रती गंभीर होतो. त्याचबरोबर इतर लोकही आपण करत असलेल्या प्रयत्नावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. त्याशिवाय शिस्तबद्धतेमुळे आपल्या वेळेची बचत होते. तसेच आपल्याला पुढील पाउल टाकण्यापूर्वी विचार करण्यास वेळही मिळतो. त्यामुळे कोणतेही कार्य निर्विघ्न पार पडते. कारण प्रयत्नात आपली यश गाठण्यास आतुर असलेली उर्जा समाविष्ट असते. त्या उर्जेस आपण आपल्या शिस्तबद्ध प्रयत्नांनी आणखी बळकट केल्यास आपल्याला विजयाची अनुभूती नक्की येते. जर आपण प्रयत्नांप्रती जागरूक असलो, त्यांना आपल्या आंतरिक आकांक्षेने सकारात्मक केले व शिस्तबद्ध केले तर ते प्रयत्न परमेश्वराच्या संमतीने सार्थकी लागतात.  

4 प्रयत्न हे एकाग्रतेने केले पाहिजेत 

   प्रयत्न करत असतांना आपल्यातील प्रामाणीकपणा आपल्यावर पाळत ठेवून असतो. त्यामुळे प्रयत्नांचा प्रत्येक पैलू नैतिकतेच्या आधारे तोलला जातो. अशावेळी जर आपण अत्यंत गरिबीतून येवून शिक्षण घेण्यासाठी धडपडत असलो तर मोजक्या अन्नावर किंवा गरज पडल्यास उपाशी राहून देखील अभ्यास करण्यास तयार असतो. आपल्या सर्व गरजा सीमित करून ध्येयाप्रती एकरूप होतो. त्याचबरोबर स्वाभिमानाच्या जगण्यावर विश्वास ठेवतो. अशाप्रकारे स्वत:प्रती कठोर व्यवहार केल्याने आपला आत्मसम्मान उंचावतो. आपल्यातील संयम व चिकाटीची मर्यादा वाढते. कारण आपण आरामस्ठीतीच्या क्षेत्राचा स्वत:हून परित्याग केलेला असतो. अशारितीने आपण आपल्या उद्देशावर पूर्णपणे आपले ध्यान एकवटले व प्रयत्नांप्रती एकाग्र होवून मार्गक्रमण करत राहिलो. तर आपल्याला आपल्या पाठीशी एका अशा ताकदीची अनुभूती होते, ज्यामुळे आपला स्वत:वरचा विश्वास द्विगुणीत होतो. त्याचबरोबर आपण यश संपादन करणारच ह्याविषयी आपल्या मनात खात्री निर्माण होते. 

   प्रयत्न करण्याकरीता आपले भावनिक कारण जितके मजबूत असेल तितकी आपल्या प्रयत्नांना धार येत असते. मग आपली परिस्थिती किती बिकट आहे किंवा प्रयत्नांचे स्वरूप किती कठोर आहे ह्यापैकी कोणतेही कारण तसेच बहाना आपल्यासाठी महत्वाचा राहत नाही. त्यावेळी आपण आपल्या प्रयत्नात इतके तल्लीन झालेलो असतो कि जणूकाही ती आपली समाधीतील अवस्था असते. त्याक्षणी आपल्या चेहऱ्यावरची चमक व आनंदविभोरता न्याहाळल्यास परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव होत असते. म्हणूनच प्रयत्न शुद्धतेचा मार्ग अवलंबूनच केले गेले पाहिजे.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *