पुरूष हा कुटूम्बाचा प्रदाता असला पाहिजे

 पुरूषप्रधान संस्कृती अनुसार पुरूष हा घरात कुटुंबप्रमुखाची भूमिका निभावत असतो. त्यामुळे घरातील इतर सदस्यांसाठी त्या स्थानावर असलेला पुरूष म्हणजे नवरा, वडील किंवा भाऊ हे सन्मानीय असतात. कारण त्या स्थानावर विराजमान असलेला पुरूष आपल्या कुटूम्बाचे सर्वतोपरी संरक्षण करत असतो. कुटूंबाचे भरण पोषण करणे. त्यांना भावनिक आधार देवून त्यांच्या सोबतच्या आपल्या नात्यात स्निग्धता आणणे. त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून त्यांचे मानसिक आरोग्य जपणे. त्याचबरोबर आजीवन आपल्या कुटूम्बियांचा भक्कम आधार बनणे. अशाप्रकारे एक कुटुंबप्रमुख पुरूष एखाद्या नेतृत्वकर्त्याप्रमाणे आपल्या माणसांच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावत असतो. म्हणूनच घरातील करता पुरूष समजूतदार प्रगतीशील व आपल्या आयुष्यातील माणसांना कायम प्रोत्साहित करणारा असला. तर त्याच्या केवळ आपल्या बरोबर असण्यानेच आपल्या सर्व चिंता मिटतात. तसेच आपण शांत मनाने जीवन व्यतीत करतो. त्याच्या तोंडून आपल्यासाठी निघालेले ‘मी आहे तुझ्या पाठीशी’ हे उद्गार आपल्यात नवचैतन्य आणतात. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या हातून काही चुका घडतात. तेव्हाही आपल्याला एका अशा हक्काच्या आधाराची तसेच त्याच्या अनुभवातून आलेल्या शहाणपणाची पूर्णपणे खात्री असते. जेणेकरून तो हात आपल्या पर्यंत पोहोचेल आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करून दिशाही दाखवेल. जेव्हा आपण आपल्या घरात कौटूम्बिक फोटो लावतो. तेव्हा त्या मधील कुटुंबप्रमुखाच्या छायाचित्राशिवाय आपल्याला आपल्या कुटूम्बाची कल्पनाही करवत नाही. म्हणूनच आपल्या अंतर्मनातून सदैव त्याच्या जीवनाच्या सुरक्षेसाठी तसेच सुखी व दीर्घायुष्यासाठी मनोकामना निघत असतात. अशाप्रकारे कुटूम्बियांच्या मनपूर्वक मिळालेल्या आशीर्वादामुळेच   त्याच्या सभोवताल एक सुरक्षा वलय बनते. ज्याच्या मुळे तो त्याच्या कारकिर्दीत येणाऱ्या अडचणींवर व त्याच्या जीवावरच्या संकटांवर यशस्वीरीत्या मात करू शकतो. तसेच सहीसलामत त्यामधून बाहेरही पडतो. त्यासोबतच जीवनात त्याच्या करीता प्रगतीची अनंत द्वारेही उघडी होतात. 

   एक जबाबदार व आपल्या कुटूम्बाप्रती संवेदनशील असलेला कुटूम्बप्रमुख रात्री आपल्या कुटूम्बाला शांत व समाधानाने झोपलेले पाहून सुखावतो. त्याचप्रमाणे त्यांच्या पासून थोडं लांब येवून त्यांचे निरीक्षण करतो. तेव्हा त्याला ह्या गोष्टीची जाणीव होते कि मी ह्यांच्या आयुष्यात खंबीरपणे उभा असल्यामुळे माझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकून ते स्वत:ला सुरक्षित समजत आहेत. म्हणूनच चिंतामुक्त होवून त्यांना सुखाची झोप लागलेली आहे. परंतू उद्या जर मी ह्यांच्यातून वजा झालो. तर हे असेच शांत झोपू शकतील का? हा प्रश्न स्वत:ला विचारतो आणि त्याचे मन कासावीस होते. म्हणूनच कोणत्याही कुटूम्बासाठी एक समजदार व विश्वासू तसेच आपल्या कुटूम्बाला सर्व दृष्टीकोनातून सुरक्षितता प्रदान करणारा प्रदाता पुरूष देवापेक्षा कमी नसतो. कारण त्याच्यामुळे त्या कुटूम्बाची मानसिक शांतता जपली जाते. त्याचप्रमाणे एक मानसिक स्थैर्य लाभलेले व जागरूक कुटुंब समाजासाठीही सर्वतोपरी हितकारक असते. तेव्हा प्रत्येक कुटूंबप्रमुख पुरुषाने आपल्या भूमिकेचे व स्थानाचे महत्व तसेच गांभीर्य जाणले पाहिजे. तसेच आपल्या कुटूम्बाप्रती  असलेली आपली जबाबदारी व कर्तव्य अत्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे तसेच विनम्रतेने पार पाडली पाहिजे. कारण कुटुंब हे केवळ मालकी हक्क दाखविण्यासाठी नसून. आपल्या अजोड प्रेमाने व निस्वार्थ भावनेने जपलेले आपले व्यक्तीगत जग असते. त्याचप्रमाणे एक अशी बाग असते जिचे सिंचन त्याने आपल्या हृदयातील ओलाव्याने केले. तरच त्या बागेतील विविधता रंगबिरंगी फुलांप्रमाणे जगासमोर उजागर होवू शकते. अन्यथा पाण्याविना  कोरड्या पडलेल्या जमिनीप्रमाणे नात्यांमधील जवळीक, ओलावा व आपुलकी नष्ट होवून त्या जागी शंका, गैरसमज व दुराव्याचे साम्राज्य पसरल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या मनात असलेल्या अहंकाराच्या आगीमुळे नात्यांमध्ये पडलेल्या भेगा आयुष्यात कधीही भरून निघत नाहीत. 

   एका कुटूंब प्रमुख पुरुषाचे विनम्र प्रदाता असण्याचे मुख्य लक्षण म्हणजे त्याने आपल्या जोडीदाराच्या विश्वासास सर्वतोपरी व सर्वदृष्टीकोनातून पात्र असले पाहिजे. कारण पती पत्नीचे नाते हे त्यांच्या आपसातील दृढ विश्वासावरच आजीवन टिकून राहते. त्याचप्रमाणे जेव्हा हा विश्वास त्यांच्यात असलेल्या पारदर्षकतेने एकमेकांवरील श्रद्धेत परिवर्तीत होतो. तेव्हाच त्यांचे सहजीवन व्यक्तीगत स्वार्थावर व मीपणावर मात करून डौलाने उभे राहते. परंतू त्यासाठी त्यांच्यात होणारा विविध विषयावरील मनमोकळा संवाद हाच एक महत्वाचा दुवा असतो. जिथे कोणत्याही कारणाने पती पत्नी मधला संवाद ठप्प होतो तिथे त्यांच्या दरम्यान एकमेकांविषयी शंका कुशंका निर्माण होण्यास वाव मिळतो. तसेच ती त्यांच्या नात्याला सुरुंग लागल्याची खरी नांदी असते. कारण स्त्रिया आपल्या जोडीदाराप्रती फारच भावनिक असतात. त्यामुळे जोडीदाराच्या आयुष्यात चाललेल्या कोणत्याही असामान्य गोष्टी ज्या त्यांच्या पासून ठरवून लपवीन्याचा प्रयत्न केला जातोय. ही पुसटशी शंका जरी त्यांच्या मनात उत्पन्न झाली. तरी गोष्टीच्या तळापर्यंत जावून त्यांचा छडा लावल्याशिवाय त्या शांत बसत नाहीत. त्याचप्रमाणे स्त्रिया आपल्या जोडीदारास स्वत:च्या जिवापेक्षा जास्त जपत असतात. त्यामुळे आजीवन निष्ठेने त्यांच्या पाठीमागे कशाही परिस्थितीत पडद्यामागची भूमिका निभावण्यास तयार असतात. त्याचप्रमाणे जोडीदाराच्या संकटकाळात त्याच्या बरोबरीने उभ्या राहून मोलाची साथ देत असतात. तसेच आयुष्यभर त्याच्या प्रगतीच्या आशेने त्याला पदोपदी विविध मार्गांनी प्रोत्साहित करत असतात. त्याच्या लहान सहान यशालाही सोहळ्याचे स्वरूप देतात. त्याचबरोबर आपल्या इच्छा आकांक्षा व व्यक्तीगत अडचणी त्याच्या प्रगतीच्या मार्गात अडसर बनणार नाहीत ह्याविषयी कायम जागृत असतात. एव्हढेच नाही तर पतीने दिलेल्या आश्वासनांवर मनापासून विश्वास ठेवत असतात. अशाप्रकारे स्त्रियांचे आपल्या जोडीदाराबरोबर आपले आयुष्य वाटून जगण्याचे तंत्र व जोडीदाराप्रती असलेले पराकोटीचे समर्पण ही त्या पुरूषाची सर्वात भक्कम बाजू असते. त्यामधूनच त्याला आपले आयुष्य पणास लावून आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण बनविण्याची प्रेरणा मिळत असते. जेव्हा कोणताही पुरूष त्याच्या जोडीदाराने त्याच्यासाठी आयुष्यात केलेल्या त्यागाला क्षणोक्षणी स्मरणात ठेवून जोडीदाराच्या आपल्या बरोबर असण्याला सर्वाधिक प्राथमिकता देत असतो.  तेव्हा त्याच्यात आलेली ती जागृती त्याला स्वत:च्या आयुष्याचे मोल करणे शिकविते. त्याचप्रमाणे जेव्हा तो जोडीदारास शारीरिक सौंदर्याच्या आकर्षणापलीकडे जावून तिच्या अंतर्मनाचे सौंदर्य सखोल समजू शकतो. तसेच तिला एक माणूस म्हणून जाणून घेतो. तेव्हा तो एक आदर्श पुरूष ठरत असतो. कारण त्याला कळलेले असते कि शारीरिक सौंदर्य कायम टिकून राहत नाही. परंतू अशा अतुल्य नात्याच्या स्वरूपात जीवनात लाभलेली जोडीदाराची बेजोड साथ हीच त्याच्या आयुष्यातील खरी धरोवर आहे. कोणत्याही पुरुषास ह्या गोष्टीची जाणीव होताच तो आपल्या जोडीदारास त्याच्या जीवनात असे महत्वपूर्ण स्थान देतो कि ते जोडपे इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. त्याचप्रमाणे आपल्या कोणत्याही प्रकारच्या कृत्याने जोडीदाराच्या आपल्यावरच्या विश्वासाला तडा जाणार नाही ह्या गोष्टीची तो प्रकर्षाने काळजीही घेतो. 

   एका कुटूंबप्रमुख पुरुषाला आपल्या कुटूम्बीयांना क्षणोक्षणी भावनिक आधार देणे जमले पाहिजे. कारण तो जर त्याच्या कुटूम्बावर दबाव किंवा मालकी हक्क दाखवत असेल. तर त्याला कौटूम्बीक सुख लाभणार नाही. परंतू त्याने त्याच्या कुटूम्बाबरोबर उत्तम वेळ घालविला. वेळोवेळी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनातील खास क्षण त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू देवून स्मरणीय बनविण्यासाठी स्वत:ला आर्थिक स्वरूपात तयार ठेवले. तर कुटूम्बातील सदस्य हृदयाने त्याच्या जवळ येतात. त्यामुळे त्यांच्या आपसातील प्रेमाचे, एकमेकांच्या विचार व क्षेत्राचा आदर करण्याचे आणि नात्यांमध्ये असलेल्या मैत्रीचे भक्कम खांब त्या कुटूम्बाचे आधारस्तंभ बनतात. कारण भावनिक आधार हा आपल्याला कितीही बिकट परिस्थितीतून सावरण्यास व परिस्थितीला स्वीकारण्यास मदत करत असतो. जेव्हा आपल्यावर कोणतेही संकट येते. तेव्हा काळानुसार त्याला सामोरे जाण्याची हिम्मत आपल्यात येत जाते. परंतू त्या दरम्यानच्या नाजूक काळात आपल्याला आपल्या माणसाचा भावनिक आधार मिळाला नाही. तर आपल्या मनावर झालेल्या जखमा कधीही भरून निघत नाहीत. शिवाय त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा देखील निर्माण होतो. खरे तर आपल्या मनात निर्माण झालेल्या अपेक्षाच त्यास कारणीभूत असतात. परंतू तरीही त्याक्षणी घरातील वडील, नवरा, मुलगा किंवा भाऊ ह्या कुटूंब प्रमुखाच्या स्थानावरील पुरुषाने आपल्या माणसांना त्यांच्या स्थानावर येवून समजून घेतले. त्याचप्रमाणे त्यांच्या अनावर झालेल्या भावनांना आपल्या समंजस बोलण्याने, मनापासून काळजी घेतल्याने व विनम्र वागणुकीने शांत व मोकळे करण्यास मदत केली. तर त्यांच्या आघातग्रस्त मनावर हळूवारपणे उपचार होवून ते मानसिकरीत्या त्यामधून बाहेर पडू शकतात. अशाप्रकारे त्या कुटूम्बातील सदस्यांमध्ये भावनिक बंध निर्माण होतात. तसेच ते एकमेकांच्या आधाराने व एकजुटीने जीवनात प्रगतीच्या वाटा यशस्वीरीत्या पादाक्रांत करतात. त्याचप्रमाणे ते आयुष्यात कधीही स्वत:ला एकटे समजत नाहीत. कारण एक निस्वार्थ प्रेमाचा स्त्रोत त्यांच्या दिशेने अखंड वाहत असतो. 

   कुटूंबप्रमुख पुरुषास आपल्या कुटूम्बातील सदस्यांचा आत्मसम्मान राखता आला पाहिजे. त्या गोष्टीची सुरवात त्याने आपल्या जोडीदारापासून केली पाहिजे. जर घरातील स्त्री कमावती किंवा आर्थिक दृष्टीने सबळ नसेल. तर त्याने तिचा असा सांभाळ करावा जेणेकरून तिला आपण पैसा कमावत नसल्याचा कधीही कमीपणा वाटू नये. त्याने तिच्या इच्छा आकांक्षांची पूर्तता मनाच्या मोठेपणाने करावी. कधीकधी पुरूष स्त्रियांना थेट बोलत नसले तरी आपल्या दबावपूर्ण वागण्यातून ते स्त्रियांना त्यांची जागा दाखवून देत असतात. त्यासाठी त्यांना गृहीत धरणे, त्यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणे, क्षणोक्षणी त्यांना घालून पाडून बोलून त्यांच्या भावना दुखावणे त्याशिवाय अन्य नवीन विकृत गोष्टींचाही अवलंब केला जातो. ज्यामुळे बहुतांशी स्त्रिया पुरुषांकडून होत असलेल्या अशाप्रकारच्या मानसिक छळास बळी पडतात. परंतू आर्थिकरीत्या स्वावलंबी नसल्याने त्या सोशिक होत जातात. आपल्याच जोडीदाराकडून नियमितपणे होणारा छळ ज्यात शारीरिक मारहाण देखील असण्याची शक्यता असते. त्या विरोधात आवाज उठविण्याचे धाडस त्या करू शकत नाहीत. म्हणूनच एका सुजाण पुरुषाने आपल्या जोडीदाराने कायम आनंदी व हसतमुख राहावे ह्या गोष्टीला आपल्या जीवनात प्राथमिकता द्यावी. तरच तो त्या दृष्टीकोनातून विविध मार्ग शोधून काढतो. तसेच त्या मार्गांचा कटाक्षाने अवलंबही करतो. त्याने आपल्या जोडीदाराच्या विशेषता व तिच्या अंगी असलेली कौशल्ये जगासमोर उजागर व्हावीत म्हणून सर्वप्रथम स्वत: त्यांची स्तुती करून जोडीदारामध्ये आत्मविश्वास जागृत करावा. त्याचप्रमाणे आपले प्रोत्साहन व पाठबळ देवून अर्थातच जोडीदाराच्या संमतीने  ती कौशल्ये जोडीदारासाठी आर्थिक स्त्रोत म्हणून उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. जेणेकरून गृहिणी असलेल्या जोडीदाराला अर्थार्जनाचे सुख व समाधान प्राप्त होईल. त्याचप्रमाणे पुरुषाने जोडीदाराचा घरातील तिच्या क्षेत्राचा, तिच्या मी टाईमचा व तिच्या भूमिकेचा नेहमी आदर करावा. कारण कोणत्याही स्त्रीला प्रेमासोबतच एक माणूस म्हणून मिळत असलेल्या पुरेशा सम्मानाचीही आवश्यकता असते. तरच त्या स्त्रीचा आत्मसम्मान राखण्यात तो पुरूष यशस्वी होतो.

त्याचप्रमाणे घरातील मुलांच्या कला गुणांना त्यांच्या लहानपणापासूनच वाव मिळावा. त्यांच्या कल्पनेतील विश्व भविष्यात प्रत्यक्षपणे साकार करण्याचे बळ त्यांच्यात यावे. तसेच त्यांच्या विचारांना प्रादान्य असावे. जेणेकरून त्यांना चालना मिळून मुलांच्या वाढत्या वया बरोबर त्यांचे विचारही परिपक्व होत जातील. ह्या महत्वपूर्ण गोष्टींचे स्वातंत्र्य वडीलांच्या स्थानावर असलेल्या पुरुषाने आपल्या मुलांना द्यावे. त्याचप्रमाणे मुलांना लहानाचे मोठे करतांना मोठेपणी त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या माणसांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य पार पाडण्याच्या हेतूने सर्वदृष्टीकोनातून त्यांची मानसिकता घडवावी व त्यांना सक्षमही बनवावे. त्याशिवाय समाजाप्रती व देशबांधवांप्रती माणुसकीचा धर्म पाळण्याची मूल्य त्यांच्या हृदयावर बिम्बवावी. आताची पिढी तंत्रज्ञानाच्या व प्रजासत्ताक युगात वाढत असल्यामुळे निर्मितीक्षम व तेजस्वी आहे. तेव्हा त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासाठी उपलब्ध आहे. म्हणूनच वडीलांनी स्वत:हून त्यांच्या दिशेने मैत्रीचा हाथ पुढे करून विनम्रतेने त्यांच्याकडून नवीन युगाच्या काही गोष्टी शिकण्याची तयारी दाखवावी. त्यामुळे मुलांसोबतचे नाते घट्ट होण्यास मदत होईल. त्याशिवाय मुलांनाही काही जुन्या गोष्टींचे महत्व पटवून द्यावे. त्यामुळे त्यांचे आपसातील पिढ्यांचे अंतरही कमी होत जाईल. अशाप्रकारे कोणत्याही पुरुषाने कौटूम्बिक जबाबदाऱ्याना आपल्यावरची ओझी नाहीतर आपला सम्मान मानावा. त्याचप्रमाणे त्या पुरुषाने स्व:ला आपल्या कुटूम्बाच्या आत्मसम्मानाचा प्रदाता समजावे.  

1 कुटूंबप्रमुखाने एकटे व रहस्यमय जीवन जगणे टाळावे 

   कौटुंबीक वातावरणात गैरसमज व शंका कुशंकांचे विष पसरण्यापासून वाचवीन्याकरीता घरातील सदस्यांमध्ये सर्वतोपरी पारदर्शकता असणे नितांत गरजेचे असते. त्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकास आपली मत व विचार स्वतंत्रपणे मांडण्याचे स्वातंत्र्यही असले पाहिजे. तेव्हाच त्यांच्यातील आपसी बंध भावनिकरीत्या घट्ट होत जातात. परंतू त्यासाठी घरातील मुख्य पुरुषाने सर्वप्रथम पाउल उचलले पाहिजे. बहुतांशी घरांमध्ये पुरूष हे पुरुषी मानसिकतेने ग्रसित असतात. त्यातल्या त्यात घरातील स्त्री ही त्यांच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त कमावती असल्यास घरातील त्यांच्या कुटूंब प्रमुख ह्या स्थानास भागीदार निर्माण होण्याची भीती पुरुषांच्या मनात उत्पन्न होण्याची शक्यता असते. जी पुरुषांच्या अहंकारास आणखीच खतपाणी घालण्यास कारणीभूत ठरते. म्हणूनच हे एकमेव कारण पती पत्नीच्या दरम्यान दुरावा आणण्यास पुरेसे असते. त्याचप्रमाणे पुरूष जर एकटाच कमावता असल्यास बर्याचदा तो आपल्या जोडीदारास व मुलांना देखील आपल्या दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ह्याही परिस्थितीत कुटूम्बातील सदस्य त्याच्या पासून भावनिक व मानासिकारीत्याही दुरावली जातात. अशावेळी पुरूष एकटा पडतो आणि एकप्रकारचे रहस्यमय जीवन जगण्यास प्रवृत्त होतो. त्यातूनच त्याचे व्यसनांच्या आहारी जाणे तसेच त्याच्या जीवनात विवाहबाह्य संबंधांचा उगम होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. ह्या सर्व प्रकारांमागे त्याच्यातील मीपणा हे सर्वात सबळ कारण असते. त्याचप्रमाणे त्याच्या मनातील प्रेम व आपुलकीचे स्थान त्याने कुटूम्बाकडून ठेवलेल्या अवाजवी अपेक्षांनी घेतल्यामुळे सर्वांचेच जगणे कठीण होवून जाते. तेव्हा आपले कौटूम्बिक जीवन सावरण्यासाठी प्रत्येक पुरुषाने आपल्या कुटूम्बास पुरेसा वेळ दिला पाहिजे. आपल्या समस्या आपल्या जोडीदारास उघडपणे सांगितल्या पाहिजे. घराशी व कारकीर्दीशी निगडीत प्रत्येक गोष्टीची आपसात पारदर्शकता ठेवली पाहिजे. एक वेळ निश्चित करून घरातील लहान मोठ्यांनी एकत्र बसून महत्वपूर्ण गोष्टींवर आपसात सल्ला मसलत केली पाहिजे. त्यामुळे विचारांची आदान प्रदान होवून बऱ्याच समस्यांचे निराकरण सहज होवू शकते. त्यासोबत त्यांच्या नात्यांमधील ओलावा आजीवन टिकून राहू शकतो. म्हणून कोणत्याही पुरुषाने त्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या घरात व आपल्या माणसांमध्येच शोधली पाहिजे. त्यासाठी त्याने कधीही बाहेरची माणसे व बाहेरचा मार्ग पत्करू नये.    

2 कुटूंबप्रमुखाने कुटूम्बियांच्या मनातील त्याच्या प्रती असलेल्या साम्मानास पात्र ठरावे. 

   कुटूंबप्रमुख ही उपाधी कोणत्याही सुजाण व सुज्ञ पुरुषासाठी एक सम्मान असतो. एक जबाबदारी असते. त्याचप्रमाणे एक नेतृत्व असते. आपल्या कुटूम्बातील सदस्यांची मनं जिंकूनच त्याला त्या पदाचा मान टिकवून ठेवावा लागतो. त्यासाठी आपल्या कारकिर्दीत प्रतिष्ठा प्राप्त करणे. आपल्या जोडीदाराच्या इच्छा आकांक्षांप्रती जागरूक राहून त्यांची मोठ्या मनाने पूर्तता करणे. आपल्या जीवनात जोडीदारास प्राथमिकता देणे. समाजात एक प्रतिष्ठीत नागरिक म्हणून सन्माननीय असणे. स्वत: प्रगतीचे टप्पे पादाक्रांत करून मुलांना प्रोत्साहित करणे. आपल्या कुटूम्बाचे मानसिक स्वास्थ्य जपणे. त्यांच्यासाठी भावनिक आधार बनणे. जोडीदारा बरोबरचे आपले वैवाहिक नाते दर्जेदार बनविणे. अन्याय व अत्याचाराला वाचा फोडून त्यांचा कठोर विरोध करणे. ह्या आणि अशा अनेक गोष्टी ज्या एका आदर्श पुरूषाची ओळख असतात. त्यांचा आपल्या जीवनात अंगीकार करूनच कुटूंब प्रमुख पुरूष त्याच्या कुटूम्बियांच्या नजरेत सन्मानास पात्र ठरत असतो. परंतू तो जर त्याच्यातील पुरुषी मानसिकतेस बळी पडला. किंवा त्याने अनैतिक मार्गांचा आपल्या आयुष्यात अवलंब करून आपल्या चारित्र्याचे हनन केले. त्याचप्रमाणे तो त्याच्या कुटूम्बातील सदस्यांना शारीरिक व मानसिकरीत्या प्रताडीत करीत असल्यास. कुटूम्बियांच्या मनातील त्याची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे ते त्याला आपल्या आयुष्यात मनापासून प्रेम व इज्जत देवू शकत नाहीत. आपल्या वडीलांच्या किंवा पतीच्या आपल्या मनातील स्थानाला अशाप्रकारे धक्का लागणे आपल्यासाठीही एकप्रकारे धर्मसंकटात टाकणारे असते. त्यामुळे नात्यांमध्ये दरी निर्माण होते. तेव्हा कुटूंबप्रमुखाने त्याच्या जीवनात कोणतेही अपरिहार्य पाउल उचलण्याअगोदर त्यामुळे त्याच्या कुटूम्बावर होणाऱ्या दुष्परिणामांचा दूरदृष्टीने नक्की सखोल विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे त्याने स्वत:ला प्रगतीशील ठेवावे. आपल्या विचारांना व स्वत:मधील शैक्षणिक पात्रतेस साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याप्रमाणे सीमित न ठेवता त्यांना चालना देवून निरंतर गतिमान ठेवावे. नव्या पिढीकडून नवनवीन गोष्टींचे ज्ञान घेवून तसेच जुन्याचा हट्ट काहीप्रमाणात तरी सोडून बदलत्या युगाबरोबर वाटचाल करण्याची आवड दाखवावी. सदैव आपल्या अहंकाराला कुरवाळत न बसता निरपेक्ष प्रेम व आपुलकीचे आपल्या कुटूम्बासमवेतच्या जीवनात काय महत्व असते ते अवश्य जाणून घ्यावे. तेव्हाच तो कुटूम्बियांच्या मनातील खऱ्या साम्मानास पात्र ठरू शकतो. 

3 कुटूंबप्रमुखाने आपल्या निरपेक्ष प्रेमाने व आपुलकीने घराला एकसंध ठेवावे. 

   पुरुषांमध्ये असलेल्या पुरूषत्वाला  जगासमोर आपल्या क्षमता सिद्ध करण्याची तसेच काहीतरी कर्तुत्व गाजावीन्याची आवश्यकता भासत असते. त्यामुळे पुरूष त्यांच्या शारीरिक वाढी विषयी तसेच जीवनात काहीतरी बनण्याच्या हेतूने इतरांशी तुलना करत एकाग्रतेने प्रयत्नशील असतात. त्याचप्रमाणे तशा दृष्टिकोनातूनच त्यांना लहानाचे मोठेही करण्यात येत असते. म्हणूनच नात्यांमधील भावनिक जगाशी त्यांची फारशी ओळख  नसते. परंतू ते मोठे झाल्यावर त्यांच्या आयुष्यात जेव्हा जोडीदाराच्या स्वरूपात एका स्त्रीचे पदार्पण होते. तेव्हा मात्र तिच्या भावनांशी जुळवून घेणे, त्यांना जाणून व समजून घेणे त्यांना जरा जड जाते. परंतू जर त्या पुरुषाला आपल्यातील मीपणावर मात करता आली. व आपल्या कुटूम्बावर निरपेक्ष प्रेम करता आले. तरच तो आपल्या जोडीदाराच्या हृदयात कायमचे आपले स्थान निर्माण करू शकतो. अशा पुरुषाला जोडीदाराचीही सर्वतोपरी साथ मिळत असल्यामुळे तो आपल्या कौटूम्बिक जीवनात आनंदी व समाधानी असतो. त्याचप्रमाणे त्याला त्यातूनच आपल्या कारकिर्दीत प्रगती करण्याची प्रेरणाही मिळत असते. अशे पुरूष घरातील आपल्या जोडीदारासमवेत इतर स्त्रियांनाही त्यांच्यातील क्षमतांना पारखन्यास प्रोत्साहित करत असतात. तसेच त्यासाठी त्यांना आपल्याकडून पूर्णपणे सहयोग देखील करत असतात. त्यामुळे स्त्रियांच्या अंगी असलेल्या कला गुणांनाही वाव मिळतो. त्याचप्रमाणे घरातील लहान मुलांना आपले वडील कोणते काम करतात. त्याहून जास्त ते कामावरून परत आल्यावर त्यांना आपला पुरेसा वेळ अगदी आनंदाने देतात. हे जास्त सुख देणारे वाटते. कारण वडीलांच्या सान्निध्यात लहान मुलांना सुरक्षेचा आभास होतो. त्याचप्रमाणे आई वडीलांचे आपसातील सुमधुर संबंध व ते दोघे ज्या पद्धतीने एकमेकांच्या क्षेत्राचा व भूमिकेचा सम्मान राखतात. ह्या गोष्टी मोठ्या मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावर खोलवर परिणाम करत असतात. तसेच वडील जेव्हा मोकळ्या मनाने आपल्या आयुष्यातील अपयशाचे किस्से न अडखडता आपल्या मुलांच्या कानावर टाकतात. व त्यामधून ते कसे बाहेर आले हे ऐकवितात. तेव्हा मुलांसाठी ते सर्वोत्तम वडील होतात. त्याचप्रमाणे वडीलांच्या त्या लहान लहान गोष्टींमधून मुलांनाही आपल्या आयुष्यात आलेल्या अपयशामधून मार्ग काढत  पुढे जाण्याचे धैर्य प्राप्त होते. अशाप्रकारे कोणत्याही पुरुषाने बाहेरच्या जगात किती यश प्राप्त केले. त्यासोबतच त्यांनी आपल्या कुटूम्बावर आपला जीव ओवाळून टाकला किंवा नाही. त्याचप्रमाणे कुटूम्बियांच्या मनात तो कधीही पुसल्या न जाणारे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला किंवा नाही. हे त्या घराच्या एकसंध राहण्यासाठी अत्यंत महत्वाचे असते. 

4. कुटूंबप्रमुख पुरुषाने आपल्यातील अहंकारास मूठमाती द्यावी 

   पुरूषांचा हा गैरसमज असतो कि त्यांच्यातील अहंकार हाच त्यांचा खरा बाणा असतो. त्याचप्रमाणे ते अहंकाराच्या बळावर सर्वांवर आपले वर्चस्व गाजवू शकतात. परंतू हा त्यांच्या मनाचा पूर्णपणे गैरसमज असतो. कारण कोणताही माणूस अहंकाराने सर्वप्रथम स्वत: आतून उध्वस्त होत असतो. आणि असा माणूस स्वत:बरोबर त्याच्याशी जुळलेल्या इतर माणसांची आयुष्येही उध्वस्त करत असतो. कारण त्याची मानसिक शांतता भंग करणाऱ्या भूतकाळातील विपरीत गोष्टी त्याच्याही नकळत त्याच्या अंतर्मनात ठाण मांडून बसलेल्या असतात. ज्यांच्यावर विचार व काम करणे त्याने थांबविलेले असते. त्यामुळे त्याच्यातील आत्मसम्मानाचा स्तर कमकुवत होवून त्याजागी अहंकार बढावलेला असतो. त्याचप्रमाणे त्या अहंकाराने तो त्याच्या वर विसंबून असलेल्यांची व त्याच्या वर्चस्वाखाली असलेल्यांची मनं पोळत सुटलेला असतो. ज्यामुळे सर्वप्रथम त्याच्या जोडीदाराच्या भावना निर्दयीपणे चिरडल्या जातात. घरातील मूलं दबावाखाली लहानाची मोठी होतात. ज्याचे दुष्परिणाम त्यांच्या पुढच्या आयुष्यावरही होत असतात. अशाप्रकारे घरातील आनंदी वातावरणाला सुरुंग लागते. तेव्हा कोणत्याही पुरुषाने आपल्या अहंकाराला बढावा देण्याऐवजी आपला आत्मसम्मान उच्च करण्यासाठी स्वत:वर काम केले पाहिजे. त्यासाठी त्याच्या मागे पडलेल्या आयुष्यातील जुन्या नकारात्मक गोष्टींची ओझी आयुष्यभर वाहत बसण्यापेक्षा त्याकरीता स्वत:ला आणि त्याकरीता जबाबदार असणाऱ्या इतरांनाही माफ करावे. आपल्या वर्तमान क्षणांवर मन एकाग्र करावे. कोणतीही चुकीची पावले उचलण्या अगोदर आपल्या माणसांच्या आयुष्यावर त्यामुळे काय परिणाम होतील ह्याचा विचार नक्की करावा. आपल्या शिस्ती व सवयीत आवश्यक ती सुधारणा करावी. स्वत:ला सर्वस्वी आपल्या कुटूम्बाचा भाग समजावे, आपण कमावता असल्याचा नाहक अभिमान बाळगू नये. त्याने आपले कुटूंब आपल्यामुळे सर्वतोपरी सुखी आहे किंवा नाही ह्याची वेळोवेळी शहानिशा करत राहावे. सर्वतोपरी आपल्या कुटूम्बाचा भक्कम आधार बनावे. अशारितीने कोणत्याही पुरुषाने आपला आत्मविश्वास व आत्मसम्मान वाढवावा. त्याचबरोबर आपल्या अहंकाराला मुळातून नष्ट करावे. 

   पुरूषांना त्यांच्यावरच्या कुटूम्बाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी बऱ्याचदा इतरांकडून होणारी मानहानी व अपमान सहन करावा लागतो. तर कधी आपल्या स्वप्नांना मूठमाती द्यावी लागते. कारण ह्या कठोर जगाचा सामना करत आपल्या कुटूम्बाच्या गरजा भागविणे आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणे कधीकधी त्यांच्या साठी ही कठीण गोष्ट असते. अशावेळी कुटूम्बाला आपण पुरे पडत नसल्याचे शल्य कोठेतरी त्यांच्या मनाला व त्यांच्यातील पुरूषत्वाला सारखे बोचत असते. तसेच त्यांना स्वत:विषयी कमीपणा वाटत असतो.  त्यामुळेही  ते आपला अहंकार मोठा करतात. परंतू त्याऐवजी त्यांनी खऱ्या परिस्थितीचा स्वत: स्वीकार करून त्याचप्रमाणे आपल्या माणसांशी त्याविषयी पूर्णपणे पारदर्शकता ठेवून त्यांचा विश्वास जिंकला. तर त्यांची मोलाची साथ व कुटूम्बाच्या  एकजुटीचे बळ त्याला लाभू शकते. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढून तो पुन्हा त्याच्या कुटूम्बासाठी एक धाडसी प्रदाता बनू शकतो. त्याप्रमाणे आपल्या उच्च आत्मसम्मानाने व विनम्र सेवाभावाने आपल्या कुटूम्बाचा आधार बनून त्यांच्यासाठी एक सर्वोत्तम वडील व एक सवोत्तम जोडीदार ठरतो.    

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *