
स्त्रियांचे सक्षम होणे म्हणजे त्यांचे केवळ आर्थिकरीत्या सबळ होणेच नाही. तर त्यासोबत त्यांच्यात आत्मसम्मान जागृत होत जाणे. त्यांचे त्यांच्या जीवनात येणाऱ्या अनुभवांनी सुज्ञ व सुशिक्षित होत जाणे. एक माणूस म्हणून सम्मानास पात्र ठरणे. त्यांना आत्मविश्वास व आत्मप्रेमाची प्रचीती होणे. त्यांना स्वत:ची किंमत कळणे. हे देखील अत्यंत महत्वाचे असते. कारण आपल्या पुरुषप्रधान संस्कृती अनुसार एक स्त्री म्हणून त्यांची शारीरिक दुर्बलता व चारित्र्याच्या सुरक्षेला प्रमाण मानूनच त्यांना वेशभूषेच्या व क्षेत्र निवडण्याच्या मर्यादा ठरवून दिल्या जातात. त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या पुरुषांच्या आधाराने, त्यांच्यावर विसंबून राहून किंवा त्यांच्याच सल्ल्यानुसार स्त्रियांनी आपल्या आयुष्याशी निगडीत महत्वाचे निर्णय घ्यावेत. अशी त्यांची मानसिकता घडविली जाते. त्यामुळे स्त्रिया आजीवन स्वत:वर विश्वास ठेवू शकत नाहीत. स्त्रियांच्या जीवनावर अशाप्रकारे पुरुषांचे वर्चस्व स्थापित होण्यामागेही अनेक कारणे अस्तित्वात आहेत. कारण स्त्रियांच्या अशाप्रकारे मुक्त व स्वच्छंदपणे वावरण्यास व स्वत:साठी स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास घराच्या उंबरठ्या बाहेरचे जग सुरक्षित राहिलेले नाही. स्त्रियांशी निगडीत प्रतिदिन घडणाऱ्या अघटीत घटनांचे दिवसेंदिवस वाढणारे प्रमाण ह्यावरून त्याचा अंदाजा येतो. तसेच मनाचा थरकापही उडतो. त्यामुळे प्रत्येक आई वडीलांची आपल्या मुलींच्या सुरक्षेच्या व हिताच्या दृष्टीकोनातून एक अतिसामान्य व चाकोरीबद्ध विचारधारा आपोआपच घडत जाते. त्या अनुसार मुलींनी शिक्षण क्षेत्रातील पदव्या आत्मसात करून स्वबळावर उभे रहावे. तसेच समाजाने ठरविलेल्या एका ठराविक वयोमर्यादेत आपल्या जोडीदाराची निवड करून लग्नाच्या बेडीत स्वत:ला बांधून घ्यावे असे त्यांना वाटत असते. कारण कुमारिकांच्या तुलनेत विवाहित स्त्रिया समाजातील दुष्ट प्रवृत्तींना कमी बळी पडतात. असा त्यांचा समज असतो. त्यामुळे आजही लग्न व्यवस्थेस सर्वतोपरी सुरक्षित मानले जाते. त्याचप्रमाणे काही कारणाने जर पतीसोबतच्या सहजीवनात वादळ निर्माण झाले. तरी एक आत्मनिर्भर स्त्री उत्तमरीतीने स्वबळावर स्वत:ला सांभाळूही शकते. परंतू ज्या स्त्रिया सर्वस्वी आपल्या जोडीदारावर अवलंबून असतात. त्यांना मात्र त्या नात्यात कितीही अपमान सहन करावा लागला. तरीही त्यांना त्या नात्यामधून बाहेर पडण्याचे धाडस काहीही करून करता येत नाही. अशाप्रकारे मुलींना मोठे करतांना विचारांचे स्वातंत्र्य दिले गेले नाही. तसेच त्या सक्षम मानसिकतेने मोठ्या झाल्या नाही तर बाहेरच्या जगातील अनेक कारणांनी त्यांच्या आयुष्यात आजीवन उलथा पालथ होतच राहते.
स्त्रिया ह्या निर्जीव वस्तू नसून त्याही हाडा मासाचे एक शरीर असतात. ज्यात सर्व प्रकारच्या भावना, इच्छा आकांक्षा, क्षमता व कौशल्ये दडलेली असतात. तरीही प्रत्येकीलाच आपल्या क्षमता जगासमोर आणण्याची तसेच आपली स्वप्न पूर्ण करण्याची संधी प्राप्त होवू शकत नाही. परंतू त्यासाठीही नेहमीच परिस्थिती व त्यांच्या जीवनप्रवासात येणाऱ्या अडचणी कारणीभूत नसतात. तर कधीकधी स्त्रियांमधील आत्मविश्वास व आत्मसम्मानाची कमतरताही त्यांच्यासाठीच एक मोठी बाधा बनत असते. त्याचप्रमाणे स्त्रियांना जर त्यांची किंमत कळलेली नसेल तर त्या आपल्या जोडीदाराच्या बरोबरीने उभे राहण्यापेक्षा त्याच्या दोन पावले मागे राहण्यावर जास्त विश्वास ठेवत असतात. कारण त्यांच्या मते पुरूष हा सर्वतोपरी त्यांचा रक्षणकर्ता असतो. तेव्हा त्याचा सन्मान राखणे व आपल्या सभ्य आचरणातून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे त्या आपले कर्तव्य समजत असतात. त्यासाठी त्या कायम स्वत:कडे कमीपणा घेत असतात. त्यामुळे आपण स्वत:ही स्वत:चे रक्षण करू शकतो. ह्याची त्यांना कधी जाणीवच होत नाही. परंतू कोणत्याही सुज्ञ पुरुषास आपल्या जोडीदाराने तसेच घरातील इतर स्त्रियांनीही कायम आनंदी राहावे. आपल्या दैनंदिन जीवनात स्वत:ला सक्षम बनविण्यासाठी संधी शोधाव्यात. तसेच स्वत:बरोबरच्या आत्मसंवादात मी हे करू शकते असे नियमितपणे स्वत:ला सांगत राहावे. किंबहुना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगतीही करावी. असे वाटत असते. त्यासाठी ते कायम प्रयत्नशीलही असतात. परंतू जोपर्यंत ज्याची त्यालाच उपरती होत नाही तोपर्यंत बाहेरून केले गेलेले प्रयत्न असफल ठरतात. म्हणूनच कोणाचीही त्याच्या आत्मसम्मानापलीकडे प्रगती होवू शकत नाही. कारण जेवढे आपले स्वत:विषयी मत चांगले होत जाते तेवढी जास्त आपली यशस्वी होण्याची शक्यताही वाढत जाते. परंतू ज्याचे स्वत:विषयी मत चांगले नसते त्याला इतर कोणाकडून मिळालेल्या सम्मानाचा अर्थ व महत्वही कळत नाही. म्हणूनच स्त्रियांनी कायम स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे. तेव्हाच त्या खऱ्या अर्थाने सक्षम म्हणून गणल्या जातील. त्याचप्रमाणे त्या आपल्या ध्येयाशी एक होत असतांना त्यांना मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्यात यशस्वीही होतील.
स्त्रियांना त्यांच्या व्यक्तीगत जीवनात आलेल्या अनुभवांमधून योग्य ते धडे घेवून परिपक्व व सुशिक्षित होता आले पाहिजे. कारण जीवनाकडून मिळालेले शिक्षण हे आपल्याला सर्वात जास्त अनुभवी बनवत असते. तसेच ते आपल्या नकळतपणे इतरांसाठीही प्रेरणास्त्रोत ठरू शकते. म्हणूनच सुशिक्षित होण्याचा अर्थ केवळ पुस्तकी ज्ञानाशी निगडीत नसतो. तर आपल्याला जीवनात आलेल्या अनुभवांना ध्रुव ताऱ्या प्रमाणे प्रमाण मानून आपल्या आयुष्याला दिशा देत जाण्यातही असतो . कारण आज असंख्य स्त्रिया उच्च विद्या विभूषित आहेत. त्याचप्रमाणे त्या मोठ मोठ्या पदांवर कार्यरत असूनही त्यांच्या व्यक्तीगत जीवनात आलेल्या वादळांना त्या एक वाईट स्वप्न समजून सहजा सहजी सोडून देवू शकत नाहीत. तर त्यामध्ये अडकून पडत असतात. स्त्रियांनी सुशिक्षित होणे म्हणजे आपली सत्वशीलता जपणे. आपल्या आतील व्यक्तीस दुषित होण्यापासून वाचविणे. स्वत:बरोबरचे नाते सर्वतोपरी सौहार्दपूर्ण ठेवणे. आपल्यातील निरागसपणा जपणे. आपल्या उन्नतीवर लक्ष केंद्रित करणे. आपल्यातील क्षमतांप्रती जागरूक असणे. त्याचप्रमाणे आपले मातृत्व व स्त्रीत्व नेहमी सन्माननीय राहील ह्याचे भान राखणे. आपले हक्क मिळविण्यासाठी आग्रही असणे. तसेच आपल्यावर होणारा अन्याय निमुटपणे सहन न करणे. जर स्त्रिया सुशिक्षितपणाचा अर्थ अशारितीने समजू शकल्या तरच त्या सक्षम होवू शकतील. स्त्रिया ह्या घरादाराचा महत्वाचा भाग असतात. कारण त्या एकाचवेळी अनेक नात्यांना न्याय देत असतात. तेव्हा त्यांच्या सहनशीलतेतील कणखरता, त्यांच्या आईपणात असलेली एक उत्कृष्ट नेतृत्वकर्ती, त्यांच्या संस्कारातून पुढच्या पिढीतील स्त्रियांसाठी ज्वलंत संदेश, त्यांचे आत्मसम्मानाने भरपूर व्यक्तीमत्व, त्यांच्या केवळ असण्याने इतरांना मिळणारी मोलाची साथ, त्यांनी वेळोवेळी स्वत:साठी उचललेले आत्मविश्वासपूर्ण बळकट पाउल ह्या गोष्टींनी त्यांचे व्यक्तीमत्व कोणत्याही जडजवाहीरांपेक्षा जास्त मौल्यवान होत जाते. जर प्रत्येक कुटुंबात अशी एकही स्त्री असली तर पुढच्या पिढीतील स्त्रियाही आपोआपच आत्मजागृकतेने स्वत:च्या व्यक्तीमत्वात तेजस्वी होत जातात. त्यामुळे त्या कोणत्याही अशा आधाराशिवाय जगू शकतात जो त्यांना सक्षम नाहीतर कमकुवत बनवितो. आपला मित्र समजत नाहीतर गुलाम समजतो. स्त्रियांनी आपल्या अशाप्रकारच्या सुशिक्षितपणास समस्त स्त्रीवर्गासाठी उभारलेला ध्वज समजले पाहिजे. त्याचप्रमाणे त्या ध्वजाला सांभाळणे ही आपली व्यक्तीगत जबाबदारी समजून तिला पार पाडले पाहिजे. तरच स्त्रियांचे खऱ्या अर्थाने सुशिक्षित झाल्याचे प्रमाण मिळेल.
स्त्रियांच्या अंतरंगात असलेल्या भावना व जन्म घेताच त्यांच्यात भिनलेला निस्वार्थभाव ह्या गोष्टींना त्यांनी कधीही आपली कमजोरी किंवा भावनिक मूर्खपणा ठरू देवू नये. त्याउलट हेच त्यांच्या आसपास शक्तीशाली वलय असले पाहिजे. जे इतरांना क्षमा करू शकेल. जे इतरांची काळजी घेण्यास सक्षम असेल. जे इतरांना मोलाची साथ देवून त्यांना आयुष्यात ठामपणे उभे राहण्याचे बळ देईल. तरीही स्वत:च्या व्यक्तीमत्वात पुरून उरेल. आपल्या जन्म घेण्यामागच्या महान उद्देशाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवेल. तसेच त्याच्यासाठी आजीवन लढा देत राहील. तेव्हाच स्त्री मानव जातीला एकसंध ठेवू शकेल. कारण स्त्रियांची स्वखुशीने सोबत लाभल्याशिवाय कोठेही एकजूट दिसून येत नाही. म्हणूनच स्त्रियांचे हे भावनारूपी शस्त्र स्त्रियांच्या उन्नतीसाठीच एक मजबूत अस्त्र बनले पाहिजे. त्याकरीता स्त्रियांनी स्वत: स्वत:ची एक माणूस म्हणून किंमत केली पाहिजे. मग ती घराला समर्पित असलेली एक गृहिणी का असेना तिने आपल्या कामातील सेवाभावाने व आपल्या व्यक्तीगत वेळेस स्वत:ला सक्षम बनविण्यासाठी उत्पादनक्षम बनविले पाहिजे. त्यासोबत आपल्या त्या पेशाचा आदर राखून त्याला प्रतिष्ठेला प्राप्त केले पाहीजे. कारण स्त्रियांच्या अंगी असलेल्या कौशल्यांचा व त्यांच्या क्षमतांचा तोपर्यंत कोणीही गैरवापर करू शकत नाही. जोपर्यंत त्यांचे सोने करण्याचा त्यांनी स्वत:शी ठाम निश्चय केलेला असतो. अशाप्रकारे कोणत्याही स्त्रीमध्ये स्वत:प्रती आलेली ही आत्मजागृती हेच तिचे सक्षम होणे असते. अशापद्धतीने जेव्हा स्त्रिया सक्षम होत जातील तेव्हाच ह्या पुरूष प्रधान संस्कृतीतही स्त्रियांच्या स्थानाला पुष्टी मिळेल. त्यांनी केलेल्या सहकार्याचा व त्यांच्या शब्दांचा मान राखला जाईल. म्हणूनच समस्त स्त्रियांच्या सन्मानाकरीता प्रत्येक स्त्रीने सक्षम झाले पाहिजे.
1 आपले अस्सल व्यक्तीमत्व जपण्यासाठी
ज्या स्त्रियांच्या व्यक्तीमत्वात साधेपणा असतो त्या कायम आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहतात. आजीवन त्याला क्षणोक्षणी कोणत्याही प्रसंगात मोलाची साथ देत असतात. कायम त्याच्या प्रगतीची मनोकामना करत असतात. अशाप्रकारे स्त्रिया आपल्या जोडीदाराच्या आयुष्याशी जन्मभरासाठी एकरूप होवून जातात. परंतू कधीकधी पुरूषच आपल्या जोडीदाराच्या आंधळ्या समर्पनास सखोल महत्व देत नाहीत. त्याला गृहीत धरून त्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे आपल्या जोडीदाराला अंधारात ठेवून विवाहबाह्य संबंधांना आपल्या आयुष्यात स्थान देतात. विवाहबाह्य संबंध हे आजच्या युगाचे एकप्रकारे चलनच झालेले आहे. परंतू जेव्हा घरातील गृहलक्ष्मी समोर तिच्या जोडीदाराचे हे धक्कादायक रूप येते. तेव्हा मात्र तिला तिच्या पायाखालची जमीन सरकल्याचा भास होतो. कारण तिच्या एकनिष्ठतेला तिच्याही नकळतपणे विश्वासघाताची वाळवी पोखरू लागलेली असते. त्यामुळे हे दु:ख तिच्यासाठी असहनीय असते. अशावेळी ती उद्वेगाने पेटून उठते. त्यावेळी त्या एका साध्या स्त्रीमध्येही आपल्याला दुर्गेचा अवतार बघावयास मिळतो. त्यावेळी प्रक्षोभामुळे तिच्याकडून असे काही पाउल उचलले जाण्याची जास्त शक्यता असते. जे तिच्याच आयुष्याला उध्वस्त करू शकते. परंतू जर ती स्त्री विचारांनी व भावनिकरीत्या सक्षम असेल. तर ती तिच्या आयुष्यात आलेल्या त्या वादळातून धडा घेते. त्याचप्रमाणे स्वत:ला त्यात जास्त काळ गुंतवून न घेता आपल्या आयुष्यात पुढे निघून येण्याचा स्वत:शी ठाम निश्चय करते. कारण जोडीदाराने आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी निवडलेला हा वाममार्ग त्या स्त्रीला तिच्या अस्सल व्यक्तीमत्वात जे निरागस, संयमी व सहनशील आहे त्यापासून परावृत्त करण्यास निश्चितच कारणीभूत ठरू शकतो. हे तिला उत्तमरीतीने ठाऊक असते. कारण तिने जोडीदारात आपल्या भावना गुंतवलेल्या असतात. परंतू अशा प्रसंगी जर त्या स्त्रीने पूर्णपणे स्वत:वर लक्ष केंद्रित केले तर मात्र ती स्वत:मधील अद्वितीय गुणांसोबत उंच उठू शकते व कायम सन्मानास पात्र ठरू शकते.
2 स्त्रित्वाचा सम्मान राखण्यासाठी
स्त्रिया त्यांच्या आयुष्यात विविध नात्यांचे प्रतिनिधीत्व करत असतात. त्याचप्रमाणे त्या त्या नात्यांशी केलेली वचनबद्धता इमाने इतबारे आजीवन निभवत असतात. परंतू कोणतीही नाती निरपेक्षपणे उभी राहत नाहीत. काही ना काही अपेक्षांनी ती व्यापलेली असतात. खास करून स्त्रियांना तर कायमच अपेक्षापूर्तीचा सहज प्रवेश मिळणारा मार्ग समजण्यात येत असते. त्यामुळे आपल्याला पाहिजे तेव्हा व पाहिजे त्या कारणासाठी स्त्रियांना आज्ञा केली कि त्यांनी ती निमुटपणे पाळावी अशीच सर्वांची अपेक्षा असते. परंतू जर स्त्रियांनी एखाद्या निर्जीव कटपुतली प्रमाणे आपल्या तालावर नाचण्यास विरोध केला तर मात्र त्यांना वाईट ठरविण्यात येत असते. त्यावेळी ती स्त्री एक माणूस म्हणून सर्वतोपरी कितीही योग्य असली तरी तिच्या त्या गुणांची मात्र दखल घेतली जात नाही. एकंदरीत स्त्रियांना चांगले किंवा वाईट ठरविले जाणे हे सर्वस्वी त्यांच्या निरपेक्षपणे समर्पित राहण्यावर आणि आपल्या भावनांना आपल्या मनाच्या पृष्ठभागावर न येवू देण्यावर अवलंबून असते. स्त्रियांबरोबर होत असलेल्या ह्या अशाप्रकारच्या व्यवहारात त्यांच्या एक स्त्री असण्याचा, त्यांच्यातील आईपणाचा व निसर्गाने जिच्या ठायी मातृत्वाचे लेणे बहाल केले त्या स्त्रित्वाचा सम्मान केला गेल्याचे कोठेही निदर्शनात येत नाही. म्हणूनच स्त्रियांना आत्मजागृकता असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांना स्वत:प्रती आदर व प्रेमही असले पाहिजे. तेव्हाच त्या इतरांकडूनही त्याची अपेक्षा करू शकतात. त्यांना स्वत:ची किंमत कळली तर त्या स्वत:चा इतर कोणाकडूनही त्यांच्या मना विरुद्ध गैरवापर होण्यापासून थांबवू शकतात. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे बंधन ठेवण्याच्या हेतूने वर्चस्व गाजविन्याअगोदर इतरांना जरा थांबून विचार करण्याची गरज भासते. त्याचप्रमाणे त्यांचा वेळ व क्षमता ह्या दोन्हीवर त्यांच्या संमतीशिवाय कोणीही हक्क दाखवू शकत नाही. अशाप्रकारे स्त्रिया विचारांनी सक्षम झाल्या तर त्या स्वत:चाच भक्कम आधार बनू शकतात. त्याचबरोबर स्वत:मधील बाईपण मिरवू शकतात व त्याचा सम्मानही राखू शकतात.
3 स्त्रियांच्या अंगी असलेली कौशल्ये बाहेर पाडण्यासाठी
प्रत्येक स्त्री ही प्रगती करण्याच्या मानसिकतेने परिपूर्ण असते. तिची आयुष्यात प्रगती करण्याची ही भूक ती काही अनपेक्षित कारणांनी स्वत: शमवू शकली नाही. तर आपल्या पतीच्या माध्यमातून किंवा मुलाबाळांच्या माध्यमातून तरी पूर्ण व्हावी ह्यासाठी ती उतावीळ होते. म्हणूनच जेव्हा घरातील कोणताही सदस्य प्रगतीच्या मार्गावर मार्गक्रमण करत असतो. तेव्हा स्त्रिया अत्यंत उत्साहाने व मोठ्या मनाने त्याच्या मागे पडद्यामागची भूमिका शिताफीने निभवत असतात. त्याचप्रमाणे सर्वच स्त्रिया नोकरदार नसल्यातरी प्रत्येकीच्या अंगी काही ना काही खास कलाकौशल्य दडलेली असतात. काही पाककलेत, काही शिवणकामात, काही स्वच्छता करण्यात तर काही आणखी कशात निपुण असतात. आजच्या जगात स्त्रिया स्वतंत्ररीत्या अशाप्रकारची कामे करून सक्षमपणे स्वबळावर उभ्या देखील आहेत. परंतू खास करून गृहिणी असलेल्या स्त्रियांना मात्र बऱ्याचदा ‘घर कि मुर्गी दाल बराबर’ ह्या हिंदीतील अर्थपूर्ण वाक्याप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचे आढळून येते. तसेच त्यांना घरातच गुंतवून ठेवून त्यांच्या कला गुणांना त्यांच्या उन्नतीच्या दृष्टीकोनातून प्रोत्साहन दिले जात नाही. त्यामुळे कित्येक जणी त्यांच्यात क्षमता असतांनाही त्या दिशेने पावले उचलण्याचे धाडस करू शकत नाहीत. कारण उमेदीचा काळ घरातच घालविल्याने त्यांच्यात घराबाहेर पडून काही हालचाली करण्यासाठी आत्मविश्वास उरलेला नसतो. म्हणूनच स्त्रियांनी कायम आपल्या पेशाला न्याय देण्यासोबतच दूरदृष्टी ठेवून स्वत:वर आपल्या उज्वल भवितव्याच्या दृष्टीने गुंतवणूक करणे सुरू ठेवले पाहिजे. आपल्या व्यक्तीगत वेळेत आपल्यातील कौशल्यांना आणखी उत्तमोत्तम बनविण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. जेणेकरून आपल्या चोवीस तासातील कमीत कमी काही तास तरी त्यांना कौशल्यांच्या आधारे आर्थिक उत्पन्न निर्माण करता येवू शकले पाहिजे. त्यामुळे हळूहळू करून त्यांचा स्वत:वरचा विश्वास वाढत जाईल आणि जीवनात कधीतरी त्या मोठे पाउल उचलण्याची हिम्मत करून त्या आपल्या आयुष्याला मोठे वळण देवू शकतील.
4 स्त्रियांना स्वाभिमानाने जगण्यासाठी
स्वाभिमान म्हणजे स्वत:प्रती स्वत:च्याच मनात असलेला उच्च दर्जा. तेव्हा जर स्त्रिया आजीवन आपल्या जोडीदारावर खरे व निस्वार्थ प्रेम करत असतील तर त्या स्वाभिमानी आहेत. जर त्या आपल्या ध्यानीमनी कायम त्याच्या प्रगतीची कामना करत असतील तर त्या स्वाभिमानी आहेत. जर त्या त्यांचाच विश्वासघात करणाऱ्या जोडीदाराप्रती कोणत्याही प्रकारची आसक्ती न ठेवता त्याला जगण्याचे स्वातंत्र्य देत असतील तर त्या स्वाभिमानी आहेत. जर त्या आपल्या जोडीदाराशी वचनबद्धता पाळण्यासाठी कोणत्याही अटी आकारत नाहीत तर त्या स्वाभिमानी आहेत. तेव्हा आपल्या स्वाभिमानी बाण्यावर स्त्रियांना गर्व असला पाहिजे. कारण ज्यांना उच्च स्तरीय व दैवी प्रेमाचा अर्थ कळला तेच खऱ्या अर्थाने सक्षम असतात. केवळ बाहेरच्या जगाच्या सक्षमतेच्या नियमात बसणाऱ्या पैसा, पद, रुतबा, प्रतिष्ठा ह्या गोष्टींनीच आपण सक्षम होत नाहीतर प्रेम, दया, त्याग ह्या गोष्टी आपल्याला अंतकरणातून बळकट बनवत असतात. तसेच आपण जर अंतकरणातून बळकट नसलो तर आपण बाहेर कमावलेली सक्षमतेची कितीही मोठी इमारत जास्त काळ टिकून राहू शकत नाही. तेव्हा स्त्रियांनी स्वाभिमानाच्या जगण्याला आपलेसे केले पाहिजे. त्यामुळे त्यांच्यात सकारात्मक उर्जा जागृत होईल. जी त्यांना दिपवून टाकेल. ज्यामुळे त्यांच्या मनाला शांतता लाभेल. त्या जर त्यांच्या आयुष्यातील माणसांच्या वाईट कर्मांना आपल्या आयुष्यात स्थान देत राहिल्या तर त्यांच्या कर्मात त्याही नकळतपणे सहभागी होतील. परंतू जर त्या आपल्या माणसांना स्वातंत्र्य देवून त्यांच्या कर्मांचे ओझे आपल्या खांद्यांवर न घेता आजीवन त्यांच्यावर प्रेम करू शकल्या. तसेच त्यांना माफही करू शकल्या. तर अशा स्वाभिमानाने परिपूर्ण कृतीनेच त्यांना त्या सक्षम असल्यासारखे वाटेल. तेव्हा स्त्रियांनी आपल्या स्वाभिमानी असण्याला आपल्या सक्षमतेचे प्रमाण मानले पाहिजे.
स्त्रियांचे सक्षम असणे हे सर्वस्वी त्यांचे त्यांच्या भावनांवर असलेले नियंत्रण ह्यावर अवलंबून असते. जर त्यांनी आपल्या भावनांपुढे गुडघे टेकून हार मानली तर त्या त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देवू शकणार नाहीत. त्यासाठी त्यांना त्यांच्यात कोणत्याही कारणाने उत्पन्न होणाऱ्या रागाला प्रतिक्रियांच्या स्वरूपात न दर्शविता. मनात ठिणगी च्या स्वरूपात जिवंत ठेवून त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात त्या उर्जेला योग्यरीतीने मार्गस्थ करता आले पाहिजे. आपल्या मनातील निरागस प्रेम समर्पित करण्यापूर्वी त्यांना व्यक्तीची योग्य पारख करता आली पाहिजे. त्याचप्रमाणे कोणाच्या आयुष्यात त्यांनी केलेल्या त्यागाला मुल्य प्राप्त व्हावे असे जर त्यांना वाटत असेल तर ती व्यक्ती आज एक माणूस म्हणून कशी आहे ह्याकडे त्यांनी अगदी तठस्थपणे पाहिले पाहिजे, ती उद्या काय बनु शकते ह्या गोष्टीला महत्व देवू नये. अशाप्रकारे स्त्रियांचे आपल्या भावना व्यक्त करण्याचे मार्ग सुशिक्षित होत जातील व त्यांना दर्जा प्राप्त होईल तेव्हाच स्त्रिया सक्षम होतील.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)