स्त्रियांची पडद्यामागची भूमिका

स्त्रियांना नैसर्गिकपणे लाभलेली भावनांची सखोलता, त्यांच्यातील दयाभाव तसेच त्यांच्या हृदयातील अलौकिक वात्सल्य ह्या मौल्यवान गोष्टी त्यांना आंतरिक सौंदर्याने व कणखरतेने समृद्ध करत असतात. त्याचबरोबर ह्या गोष्टी त्यांची खरी ताकद व त्यांनी स्वबळावर आपल्या जीवनाचे शिल्पकार होण्यास आवश्यक असलेली पुंजी देखील असते. स्त्रियांच्या अजोड क्षमता ह्या त्यांच्यातच सामावलेल्या असतात. परंतू कधीकधी परिस्थितीमुळे, माणसांमुळे त्यांना चालना व प्रोत्साहन मिळू शकत नाही. किंवा स्त्रीयांमध्येच आत्मजागृकता नसल्याने त्या क्षमतांना योग्य दिशा मिळू शकत नाही. त्याशिवाय त्यांना जगासमोर येवू देण्यापासून थांबविण्याच्या हेतूने कडक विरोध देखील केला जातो. कारण मत्सर व द्वेषाच्या भावनेने ग्रासित असलेल्यांना स्त्रियांची प्रगतीच्या दिशेने केलेली वाटचाल कदापि मान्य नसते. युगानुयुगे ह्याच जख्खड मानसिकतेने समाजाची जडण घडण होत आलेली आहे. त्यासाठी स्त्रियांवर मर्यादांची बंधने लावून त्यांची मानसिकता व त्यांची प्रगतीची क्षेत्रे सीमित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. स्त्रियांना लहानपणापासूनच एका विशिष्ट मानसिकतेत ह्यासाठीच मोठे करण्यात येते. जेणेकरून त्यांच्या साठी आखून दिलेल्या मर्यादांचे त्यांनी कधीही उल्लंघन करू नये. त्यामुळेच अधिकाधिक स्त्रीवर्ग सामाजिक नियमांच्या आवाक्यात राहूनच स्वत:ला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतो. परंतू स्वत:मधील विशेषतांचा व असीमित क्षमतांचा शोध घेण्याचे कधीही धाडस करत नाही. त्यामुळे त्या ज्या कुटूम्बाचा त्या भाग असतात त्यांच्याशी प्रामाणिक राहून. तसेच त्यांनाच आपल्या आयुष्यात सर्वाधिक महत्व देवून त्यांच्या मर्जीप्रमाणे आपल्या जीवनाचे ध्येय ठरवितात. त्याचप्रमाणे ते ध्येय साध्य करण्यासाठी आयुष्यभर स्वत:ची तारांबळ करून घेत असतात. किंवा स्वत:कडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आजीवन कोणाच्या तरी मागे राहून प्रामाणिकपणे व निष्ठेने पडद्यामागची भूमिका निभावत आपले आयुष्य व्यतीत करतात. तसेच त्यातूनच जगण्याचे मानसिक समाधान मिळवत असतात. काही बोटावर मोजण्याइतक्या स्त्रिया मात्र सामाजिक बंधनांना झुगाराण्याचे धाडस करतात. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याची सर्व सूत्र हिमतीने आपल्या हाती घेवून. आपल्या विशाल हृदयातील सुंदर स्वप्नांचा मागोवा घेत घेत जीवनाची साहसपूर्ण वाटचाल करतात. अशा शूर स्त्रियांसाठी आकाशाची भव्यता ही सीमा असते. तर त्यांचा व्यापक दृष्टीकोन हा क्षितीजाला स्पर्श करण्याचा असतो.   

   `सर्वाधिक स्त्रिया आपल्या पडद्यामागच्या भूमिकेला आपल्या जीवनात विशेष  महत्व देत असतात. कारण स्त्रियांच्या ठायी समर्पणाचा गुण हा उपजतच असतो. त्यांच्या आयुष्यात असलेले पुरूष जे वेगवेगळ्या नात्यांनी त्यांच्याशी जुळलेले असतात. त्यांची प्रगती व्हावी ह्या आपल्या इच्छेला त्या त्यांच्या जीवनाचे ध्येय बनवितात. त्याचबरोबर त्या ध्येयाला आपल्या हृदयात नेहमी जागृत ठेवून. त्यासाठी पराकोटीचा त्याग करण्याची त्यांची तयारी असते. आपल्या आत्मसम्मानाला दूर सारून. आपल्या क्षमातांकडे दुर्लक्ष करून. तसेच आपल्या व्यक्तीगत स्वप्नांना मुरड घालून त्या आपल्या माणसांच्या प्रगतिशी निस्वार्थ भावाने संलग्न झालेल्या असतात. त्यामागे त्यांचा हेतू शुद्ध असतो. परंतू कधीकधी तो इतरांच्या सीमित विचारसरणीला एक भावनिक मूर्खपणा किंवा त्यांचा कमकुवतपणाही वाटत असतो. म्हणूनच ते अशाप्रकारच्या शुद्ध व निस्वार्थ मदती मागचा विशाल हेतू समजून घेवू शकत नाहीत. तसेच त्यांना गृहीत धरू लागतात. त्यामुळे स्त्रियांच्या पडद्यामागच्या भूमिकेला तेव्हाच अर्थ प्राप्त होतो. तसेच त्यांचे समर्पण तेव्हाच सत्कारणी लागते. जेव्हा समोरच्याला त्याचे महत्व व त्या मागच्या स्त्रियांच्या भावना पुरेपूर कळतात. त्यासोबत त्या व्यक्तीस आयुष्यभर स्त्रियांच्या कष्टांची जाण राहते. अन्यथा स्त्रियांनी दिलेला तो मोलाचा पाठीम्बा पुरुषी मानसिकतेला केवळ त्यांचे एक कर्तव्य वाटते. त्याचप्रमाणे त्यांच्या दृष्टीने स्त्रियांनी ते निभावणे त्यांचा धर्म असतो. अशाप्रकारे पुरूष स्त्रियांना सर्वतोपरी सांभाळण्याची मक्तेदारी आपल्या शिरावर घेवून त्यांना आपल्या वर्चस्वाखाली ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. पदोपदी त्यांच्यावर मालकी हक्क दाखवून त्यांच्या भावनांशी खेळतात. स्त्रियाही पुरुषांच्या दबावाला त्यांचे प्रेम व काळजी समजून त्याला बळी पडतात. त्यामुळे त्यांना कधीही स्वत:मधील क्षमतांची जाणीव होवू शकत नाही. 

   कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीची पडद्यामागची भूमिका मोलाची असते. त्याचप्रमाणे एखादी स्त्री जेव्हा आपल्या कर्तुत्वान्नी आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न बघते. तेव्हा तिच्या पाठीशी तिच्या जोडीदाराचे भक्कम पाठबळ, सहयोग, प्रोत्साहन व वेळोवेळी मनापासून केलेली स्तुती ह्या गोष्टींचे सर्वाधिक महत्व असते. परंतू तरीही स्त्रियांच्या अंगी असलेले सामर्थ्य व त्यांच्यातील छुपा योद्धा तोपर्यंत बाहेर येत नाही. जोपर्यंत त्यांची प्रबळ इच्छाशक्ती व स्वाभिमान जागृत होत नाही. त्यासाठी त्यांचे भावनिक रीत्या कणखर असणे आवश्यक असते. सर्वच स्त्रियांना आयुष्यात उंची गाठणे व जगासमोर आपले अस्तित्व सिद्ध करणे शक्य होत नाही. कारण त्यांना घरातूनच प्रोत्साहन व पाठींबा मिळत नाही. त्यांना नात्यांच्या बंधनात अडकवून वेळोवेळी त्या नात्यांप्रती असलेल्या कर्तव्यपुर्तीची आठवण करून दिली जाते. त्यामुळे स्त्रिया आपोआपच औपचारिक जगाचा भाग बनून स्वत:कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करू लागतात. त्याचप्रमाणे त्या जागरूकतेने जगत नसल्यामुळे स्वत:ला सांसारिक रहाटगाडग्यात गुंतवून घेतात. परंतू ज्या स्त्रियांनी त्यांच्यातील विशेषतांना पारखले व त्यांना सिद्ध करण्याचा विडा उचलला त्या आपल्या आंतरिक दैवी शक्तीने समृद्ध होवू शकल्या. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनकालात अशी महत्वपूर्ण कार्ये पार पाडलीत कि त्यांचे जीवन सर्वसामान्यांसाठी एक आदर्श उदाहरण ठरू शकले.

   स्त्रियांना सक्षम बनविण्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात. अनेक नियमही लागू केले जातात. स्त्रियांनी शिकावे, प्रगती करावी व आपल्या जीवनात उन्नती करावी हा त्यामागचा हेतू असतो. परंतू स्त्रियांना निसर्गानेच ज्या क्षमता बहाल करून सक्षम बनविले आहे. त्यांच्या त्या आंतरिक शक्तीची मात्र त्यांना जाणीव होवू दिली जात नाही. कारण ती एक स्त्री असल्यामुळे तिने सामाजिक मर्यादांच्या वर्तुळात राहूनच स्वत:चा विचार केला पाहिजे असा समाजाचा अट्टाहास असतो. परंतू स्त्रियांच्या असामान्य क्षमता अशाप्रकारे लपवीन्याचा कितीही प्रयत्न केला गेला. तरी त्या सूर्याच्या किरणांप्रमाणे आपले तेज पसरविल्यावाचून राहत नाहीत. मग ती एका यशस्वी पुरुषाच्या मागे प्रामाणिकपणे निभावलेली गेलेली पडद्यामागची भूमिका का असेना त्यामाधूनही इतिहास घडतो. डॉ भीमराव आंबेडकर हे नाव संपूर्ण विश्वात दुमदुमले. कारण त्यांनी केलेल्या सुकार्यांनी समाजातील वंचित वर्गास माणूस म्हणून जगण्याचे हक्क प्राप्त झाले. जातीभेदाच्या नावाखाली माणसाला माणूस न समजणाऱ्या दुनियेत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी लढण्याचे सामर्थ्य त्यांनी दीनदुबळ्यांच्या मनात जागृत केले. भीमराव एक सामान्य मुल म्हणून जन्मास आलेले असले तरी त्यांच्यातील बुद्धिचातुर्य  बघून त्यांच्या आई वडीलांना त्यांच्यात एक आशेचा किरण दिसू लागला. त्यामुळे त्यांनी भीमरावांच्या मनात क्रांतीचे बीज पेरले जे त्यांच्या वाढत्या वयाबरोबर त्यांचे एका योद्ध्यात रूपांतरण करू लागले. पुढे त्यांच्या आयुष्यात पत्नीच्या रुपात रमाबाईचे आगमन झाले. रमाबाई ह्या जीवनाचे कठोर रूप पाहिलेल्या साध्या सरळ स्त्री असून देखील त्यांनी भीमरावांच्या आयुष्यात पडद्यामागची भूमिका इतकी धीरोदात्तपणे निभावली कि एका युगपुरूषाच्या आयुष्यातील मोठी समर्थक व योगदानकर्ती म्हणून रमाबाईन्चे नाव देखील थोर व कर्तुत्ववान स्त्रियांच्या यादीत नमूद झाले. कारण त्या थोर पती पत्नी पैकी दोघांनाही सारखाच संघर्ष करावा लागला. फक्त त्यांची क्षेत्रे वेगवेगळी होती. त्याचप्रमाणे त्यांना एकमेकांच्या संघर्षाची पूर्णपणे स्पष्टता, जाणीव व आदर असल्यामुळे त्यांना व्यक्तीगत पातळीवर आयुष्यात काय गमवावे लागले ह्याचा त्यांनी कधी विचारही केला नाही. कारण त्यांच्या संघर्षामागे एक महान हेतू हे एकमेव लक्ष्य होते. 

   स्त्रियांनी त्यांच्यातील मुलभूत गुणधर्मानुसार पुरुषांच्या आयुष्यात पडद्यामागची भूमिका पार पाडणे ही अत्यंत उत्कृष्ट प्रक्रिया आहे. परंतू ती निभावतांना त्यांचा कोणताही स्वार्थ नसून त्यांच्या त्या समर्पणामागे उदात्त हेतू असावा. त्याचबरोबर व्यापक दृष्टीकोन व दूरदृष्टी असावी. तेव्हाच त्यांनी निष्ठेने बजावलेली ती महत्वपूर्ण भूमिका सार्थकी लागते. त्याचप्रमाणे ज्या पुरुषासाठी कोणतीही स्त्री आपले संपूर्ण जीवन पणास लावते. त्याला त्या समर्पणामागच्या निखळ भावना हृदयातून कळल्या पाहिजे. त्याला त्या कष्टांची वेळोवेळी मोठ्या मनाने दखल घेता आली पाहिजे. त्या मोलाच्या साथी शिवाय आपले निर्देशित लक्ष्य साधणे केवळ अशक्य होते. ह्या गोष्टीची त्याला जाणीव झाली पाहिजे. जेव्हा अशाप्रकारे अहंकाराशिवाय स्त्रियांच्या पडद्यामागील भूमिकेचा सन्मान राखला जातो. तेव्हा नकळतपणे त्या स्त्रीच्या स्त्रित्वाला नम्रपणे वंदन केले जाते. जेव्हा पुरूष जीवनात संघर्ष करत असतो. तेव्हा त्याच्या जोडीदाराच्या डोळ्यात त्याच्याप्रती विश्वास बघून त्याला आणखी प्रगती करण्यास प्रोत्साहन मिळत असते. परंतू ज्याक्षणी त्याचा तील पुरुषी अहंकार जागृत होतो त्या क्षणापासून पत्नीच्या त्याच्या पुढे मागे करण्याने त्याच्या अहंकारास खतपाणी मिळू लागते. त्यामुळे तिचे कोणत्याही कारणाने ते करणे थांबविणे त्याला आवडत नाही. त्यावेळी त्याची वैचारिक क्षमता खुंटीत होवून त्याच्या अधोगतीस सुरवात होते. पत्नी मात्र कधीही निराश होत नाही, तर तिने ज्याला आपला अविभाज्य अंग मानलेले असते. त्या जोडीदाराच्या प्रगतीच्या शुद्ध हेतूने ती प्रामाणिकपणे आजीवन पडद्यामागची भूमिका निभावत असते.

   पडद्या मागची भूमिका निभावत असतांना स्त्रिया स्वत:च्या अंतर्मनात डोकावून बघणे विसरतात. त्यामुळे त्यांना त्यांच्यात दडलेल्या अनंत सम्भावनांची कधीही जाणीव होवू शकत नाही. परंतू जेव्हा त्यांचा जोडीदार त्यांना आपल्या आयुष्यात महत्व देणे कमी करू लागतो. तेव्हा मात्र त्या पुरत्या हादरून जातात. त्यांनी जोडीदाराकडून लावलेल्या आशा हळूहळू निराशेत बदलू लागतात. जेव्हा पती त्यांच्या स्वप्नांवर सहज पाणी फेरतो. तेव्हा मात्र त्यांना त्यांच्या आयुष्याचा मौल्यवान काळ निर्थक गेल्याचे दु:ख होते. कोणतीही स्त्री भूतकाळात समाविष्ट झालेल्या त्या दिवसांना पुन्हा जगू शकत नाही. परंतू त्यामधून तिने नक्कीच उत्तम धडा घेतला पाहिजे. कारण जीवन पुन्हा पुन्हा लाभत नाही. तेव्हा ते भावनांच्या जाळ्यात अडकून अशाप्रकारे एका माणसाच्या मागे वाया घालविणे म्हणजे जीवनाचा अनादर करण्यासारखे असते. तो पुरूष आपला जोडीदार असला तरी त्याच्यासाठी एवढी मोठी किंमत चुकविण्याअगोदर त्याची तेवढी पात्रता आहे किंवा नाही ह्याची स्त्रियांनी आवर्जून पडताळणी केली पाहिजे. कारण कोणास सुधरवीन्याचे किंवा त्याच्यात सुयोग्य बदल घडवून आणण्याचे कार्य आपले नाही. ही उपरती ज्याची त्यालाच होणे गरजेचे असते. 

   स्त्रियांनी आपल्या अंतर्मनाच्या मार्गदर्षानाकडे कायम लक्ष दिले पाहिजे. कारण त्यांना अंत:प्रेरणेने आपोआपच कोणत्याही धोक्याचा इशारा फार पूर्वीच मिळत असतो. परंतू स्त्रिया भावनांना जास्त महत्व देत असल्यामुळे त्या आपल्याच मनाला खोटा दिलासा देत राहतात. त्याचप्रमाणे नात्याप्रती आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवून त्या व्यक्तीस वारंवार संधी देत जास्त काळ त्याच्यात गुरफटून राहण्याची चूक करतात. परंतू स्त्रियांनी आपल्या जोडीदाराच्या मनास खटकणाऱ्या गोष्टी ज्या काहीतरी मनाविरुद्ध होत असल्याचे सूचित करत असतात. त्याकडे अशाप्रकारे दुर्लक्ष करू नये. कधीकधी स्त्रियांना जोडीदाराकडून माणूस म्हणून सम्मान मिळत नाही. तरीही त्या भावनेच्या आवेगात येवून आपले आयुष्य पणास लावतात. त्यामागे एका पत्नीचे कर्तव्य व आपल्या डोक्यावर छत धरल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो एकमेव मार्ग त्यांना वाटतो. परंतू तसे करून त्या कोणाबरोबरही न्याय करू शकत नाहीत. तेव्हा त्यांनी त्या नात्याशी संलग्न होण्यापेक्षा त्या व्यक्तीविषयी मनात सद्भावना बाळगल्या पाहिजे. कारण आजीवन त्या नात्याकडून अपेक्षापूर्ती न झाल्याची सल मनात ठेवून त्या व्यक्तीबरोबर एका छताखाली राहण्यापेक्षा, नात्याला स्वतंत्र करून त्या व्यक्तीच्या प्रगतीचा प्रवास दुरूनच बघणे. हे देखील पडद्यामागे राहून आपली भूमिका पार पाडल्याचे सर्वश्रेष्ठ स्वरूप ठरू शकते

1 स्त्रियांनी स्वत:मध्ये आत्माप्रेम जागृत करावे

   स्त्रियांमधील स्त्रीत्वाची भावना हीच त्यांची खरी ओळख असते. त्या भावनेचा सम्मान करत त्या लहानाच्या मोठ्या झाल्या तर त्यांच्यात उच्च कोटीचा स्वाभिमान जागृत होतो. तसेच त्यांचा स्वत:कडे व जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन व्यापक होत जातो. एका स्वाभिमानी स्त्रीने सर्वप्रथम स्वत:चे व्यक्तीमत्व घडविण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. त्याकरीता स्वत:मध्ये दयाभाव आणून, स्वत:ला उत्तम सवयी लावून, शिस्तबद्ध जीवन जागून, आजीवन एक अभ्यासक बनून तसेच स्वपरीक्षण करून स्वत:वर गुंतवणूक केली पाहिजे. त्याचबरोबर तिने स्वत:ला कालच्या तुलनेत आज एक माणूस म्हणून उत्तम बनविले पाहिजे. आपल्या विचारांना प्रगाढ बनविले पाहिजे. हेच एका जागृत स्त्री मध्ये निर्माण झालेले आत्मप्रेम असते. जेव्हा त्या स्त्रीचे स्वत:सोबतचे नाते व स्वत:विषयीचे मत चांगले होत जाते. तसेच ती स्वत:चा सम्मान करू लागते. तेव्हाच ती कोणत्याही नात्यास परिपक्व नजरेने बघू शकते. त्याचप्रमाणे त्या नात्याच्या वर्चस्वाखाली न येता त्या नात्याला उत्तम पाठबळ देवून त्याच्याप्रती एका समर्थकाची भूमिका यशस्वीपणे पार पाडू शकते. 

2 स्त्रियांनी स्वानुभावातून धडा घेवून आपले उरलेले जीवन सावरावे

   स्त्रिया त्यांच्याशी जुळलेल्या पुरुषाच्या स्वप्नांचे संरक्षण करणे, स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्यात विश्वास जागवीने व कठीण काळात त्यांना भक्कम साथ देणे. ह्या गोष्टींना आपल्या जीवनातील महत्वपूर्ण कार्य मानत असतात. परंतू ते करत असतांना त्यांनी त्या पुरुषाच्या मनात आपल्याविषयी हळवा कोपरा आहे किंवा नाही हे जाणून घेतले पाहिजे. तो आपल्या भावनांचा आदर करतो कि त्यांच्याशी खेळण्याचा प्रयत्न करतो ह्याची प्रचीती करून घेतली पाहिजे. जर दैनंदिन जीवनात त्यांना वारंवार असा अनुभव येत असेल. तसेच आपले मन आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे असे जर त्यांना वाटत असेल. तर स्त्रियांनी त्याग करण्याच्या विचारातून ताबडतोब बाहेर आले पाहिजे. कारण ज्याच्यासाठी त्या हे करण्यास निघालेल्या असतात तो तितक्या पात्रतेचा असणे महत्वाचे असते. म्हणून त्याच्यामागे आपले जीवन व्यर्थ वाया घालविण्यापेक्षा स्त्रियांनी आपल्या त्यापुढच्या जीवनाला स्वबळावर सावरण्याचा नक्की ध्यास घेतला पाहिजे. 

3 स्त्रियांनी आपल्या आत्मसम्मानास ग्राह्य धरूनच पडद्यामागची भूमिका निभावावी   

   स्त्रियांचा आत्मसम्मानच त्यांची खरी ताकद असतो. जर त्यांची कोणी इज्जत करावी असे जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी सर्वप्रथम स्वत:ची इज्जत करणे शिकले पाहिजे. आरास्यासमोर उभे झाल्यावर त्यांना स्वत:च्या नजरेत नजर घालून बघता आले पाहिजे. परंतू हे तेव्हाच शक्य होवू शकते जेव्हा स्त्रिया आपल्या खऱ्या व्यक्तीमत्वात जगु शकतील. जगात वावरत असतांना आपल्याला आपल्या व्यक्तीमत्वाची छाप इतरांवर पाडण्यासाठी आपला नकली चेहरा समोर करून वावरावे लागते. परंतू जेव्हा त्या स्वत:बरोबर एकट्या असतात तेव्हा मात्र त्यांना स्वत:शी खरे राहता आले पाहिजे. त्यांनी स्वत:च्या व्यक्तीमत्वाचा स्वीकार केला पाहिजे. त्यांनी आपल्या कामांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली पाहिजे. त्याचबरोबर कायम आपल्या आत्मसम्मानास ग्राह्य धरून चालले पाहिजे. कारण स्वत:च्या आत्मसम्मानाच्या चिंधड्या उडवून त्या कोणासही पुरेपूर साथ देवू शकत नाही. तसेच कोणी त्यांच्या अशाप्रकारच्या सहकार्याच्या भरवश्यावर जीवनात प्रगतीही करू शकत नाही. म्हणूनच इतरांच्या आयुष्यात महत्वपूर्ण भूमिका निभावीन्यासाठी सर्वप्रथम स्त्रियांनी स्वत:बरोबर उभे राहण्याचे धाडस केले पाहिजे. 

4 स्त्रियांनी आत्मविश्वास मिळविण्यासाठी आपली ओळख निर्माण करावी 

   स्त्रियांनी युगांपासून आपल्या हक्कांसाठी लढा दिलेला आहे. तसेच आज त्या लढ्याचे मधुर फळ त्यांच्या पदरात पडले आहे. तेव्हा स्त्रियांनी त्यांना मिळालेल्या स्वातन्त्र्याचा स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. आपल्या आंतरिक शक्तीला जागृत केले पाहिजे. पडद्याच्या मागच्या भूमिकेत राहून आपल्या स्वप्नांचा त्याग करण्या पेक्षा. स्वत:ला समर्पणाची देवता असे घोषित करण्यापेक्षा. त्याचप्रमाणे स्त्री पुरूष अशा भेदाभावात गुंतण्यापेक्षा त्यांनी स्वत:कडे एक माणूस म्हणून ताठस्थपणे पाहिले पाहिजे. त्यांना त्यांच्या जीवनात जे काही करण्याची इच्छा आहे ते करण्यासाठी त्यांनी आपले जीवन पणास लावले पाहिजे. कारण त्याही कोणासाठी भक्कम आधारस्तंभ बनू शकतात परंतू त्यांच्या मागेही कोणीतरी पडद्यामागची भूमिका बजावणारा असला पाहिजे. स्त्रिया समाजाचा महत्वपूर्ण भाग आहेत. तेव्हा त्यांनी स्वत:मध्ये आत्मविश्वास जागविण्यासाठी आपले अस्तित्व उभारले पाहिजे. 

   जेव्हा एखादा पुरूष त्याच्या जीवनात काही करण्यास सक्षम नसतो तेव्हा त्याला घालून पाडून बोलण्यात येते. स्त्रियांप्रमाणे हातात बांगड्या घालण्याचे त्याला सल्ले दिले जातात. कारण बांगड्या घातलेले स्त्रियांचे हात कमजोर असतात. असे पुरुषी अहंकाराने ग्रासित लोकांना वाटत असते. परंतू बांगड्या घातलेल्या त्याच हातांनी आपल्या आईने आपल्या लहानपणी आपल्याला आधार दिलेला असतो. त्याच हातांनी आपल्याला दंडीत करून आपल्यावर संस्कार केलेले असतात. हे विसरून चालणार नाही. त्याचबरोबर आपण मोठे झाल्यावर आपल्या जोडीदाराचे बांगड्यांनी सजलेले हात जेव्हा आपल्याला सावरण्यासाठी आपल्या खांद्यांवर असतात. तेव्हा आपल्यात दहा हत्तींचे बळ येते. म्हणूनच स्त्रियांच्या पाठीम्ब्याला व त्यांच्या पडद्यामागच्या भूमिकेला गृहीत धरणे आणि महत्व न देणे म्हणजे माणसाची मोठी वैचारिक घसरण आहे. जर कोणतीही स्त्री एखाद्या पुरुषात तिच्या भावनांची, तिच्या वेळेची गुंतवणूक करत आहे. तर ह्याचा अर्थ ती त्याच्या यशस्वी होण्यासाठी खूप मोठी किंमत चुकवत आहे. तेव्हा तिच्या समर्पनास व्यर्थ जावू न देता स्वत:च्या उन्नतीबरोबर तिलाही सक्षम बनविण्याची जबाबदारी त्या पुरुषाने आपल्या खांद्यांवर घेतली पाहिजे.    

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *