
समाजात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अनेक जातीधर्मांना, वंचितांना त्याचबरोबर स्त्रियांनाही मोठा संघर्ष करावा लागला. स्त्रियांचा संघर्ष तर पुरुषी मानसिकतेशी आजतागायत सुरूच आहे. समाजातील पुरुषी मानसिकता जी स्वत:ला स्त्रियांच्या तुलनेत वरचढ समजते. ती युगा नु युगांपासून चालीरीती व रूढी परंपरांच्या आडून स्त्रियांना जिवंतपणीच नरकयातना देत आली आहे. तरीसुद्धा स्त्रियांनी अनेक अग्नीदिव्यान्ना पार करत आपले समाजातील स्थान नुसते टीकवूनच ठेवले नाहीतर त्या स्थानाला दर्जाही प्राप्त करून दिला आहे. त्यांच्यातील क्षमता ज्यांना न्याय मिळत नव्हता. तसेच त्या क्षमता जगासमोर येवू नयेत म्हणून स्त्रियांना घराच्या चार भितींच्या आड अपमानास्पद वागणूक देवून त्यांची त्या
दृष्टीकोनातून मानसिकता घडविली जात होती. मग ती पती निधनानंतर स्त्रियांची सती जाण्याची प्रथा असो. बालविवाह असो. बालविधवेच्या स्वरूपातील कठोर जीवन असो. स्त्रियांचे शिक्षणापासून वंचित जीवन असो. त्याचप्रमाणे स्त्री व पुरुषातील पराकोटीचा भेदभाव असो जो स्त्रियांना त्यांचा सम्मान व एक माणूस म्हणून असलेल्या हक्कापासून परावृत्त करण्यास कारणीभूत आहे. तरीही स्त्रिया ह्या सामाजिक अविचारी चिखलातून एखाद्या सुंदर कमळाच्या फुलाप्रमाणे रुबाबादारपणे बाहेर पडल्या आहेत. स्त्रियांच्या जीवनातील वेदना समजून घेवून त्या कमी करता याव्या म्हणून स्त्रीशिक्षणाला महत्व आले. कारण शिक्षण घेतल्याने स्त्रिया जागृत होतील व समाजाने घडविलेली त्यांची मानसिकता त्या तोडू शकतील हा क्रांतीकारी उद्देश त्यामागे होता. ह्या महान कार्यातही समाजसुधारक स्त्रिया अग्रेसर होत्या. त्याच गोष्टीतून आज समाजात उच्च शिक्षित स्त्रियांची मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. समाजात आलेल्या ह्या मोठ्या बदलासाठी ज्यांनी आपले प्राण पणास लावून योगदान दिले त्यांचे स्मरण आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या हृदयात राहिले पाहिजे. इतिहासाच्या पानांवर त्यांची नावे सुवर्णाक्षरात नोंदली गेली असली तरी आपण आपल्या विचारात व आपल्या आचरणात त्यांना जागृत ठेवले पाहिजे. कारण दुष्ट मानसिकता कधीही पूर्णपणे संपुष्टात येत नाही. ती सूक्ष्मरूपात जीवित राहते आणि वारंवार उफाळून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते. त्या मानसिकतेने पुन्हा समाज व्यापला जावू नये म्हणून समाजसुधारकांच्या त्या ज्वलंत विचारांना आपल्या विचारात समाविष्ट करणे व जागृत ठेवणे अनिवार्य आहे.
जर आपण आपल्या घरातील आपल्या आजी व आईच्या जीवनावर गांभीर्याने दृष्टीकटाक्ष टाकला तर आपल्याही मनात त्यांच्या करीता अनेक प्रश्न उठतील. परंतू ज्याची उत्तरे शोधणे सोपे नसते अशा क्लिष्ट प्रश्नांवर आपण कधी नजरही टाकण्याचा प्रयत्न करत नाही. कारण त्यासाठी आपल्यापाशी धाडस व वेळ ह्या दोन्ही गोष्टी असाव्या लागतात, ज्यांची आपल्या जीवनात कायमच कमतरता असते. आपण आपल्या आई व आजीला मान सन्मानाच्या व आदर्शवादाच्या सर्वोच्च शिखरावर नेवून बसवितो. ज्यामुळे त्यांना गृहीत धरणे आपल्याला सोपे जाते. परंतू त्यांच्या स्थानावर स्वत:ला ठेवून त्यांची अवस्था समजून घेण्याइतके सोपे कार्य करणे मात्र आपल्यासाठी फारच कठीण होते. आपल्याप्रमाणेच इतर घरांमध्येही स्त्रियांच्या प्रश्नांवर असलेला कोरडा दृष्टीकोन त्यांचे जीवन आणखीच जटील करत असतो. त्यामुळे त्या आपल्या समस्यांशी आप आपल्या पद्धतीने आजीवन एकट्याच झुंज देत राहतात. त्यामुळेच स्त्रियांचे जीवन म्हणजे संघर्षांचा परिपाक असतो. आज असंख्य स्त्रिया मानसिक व भावनिक अत्याचारासारख्या गुन्ह्यांना बळी पडत आहेत. ज्यांच्या विषयी त्यांना कोठेही मोकळेपणाने वाच्यताही करता येत नाही. आपबितीचे स्पष्टपणे कथन करून त्यासाठी कोणाकडे मदतही मागता येत नाही. म्हणूनच अत्याचार करणाऱ्यास कायद्यान्वये कोणतीही शिक्षा ठोठावली जावू शकत नाही. काही स्त्रिया अशाप्रकारच्या परिस्थितीला दररोज तोंड देत असतात. तसेच त्यालाच आपले प्रारब्द्ध समजून त्यातच सुख मानून आपले आयुष्य व्यतीत करत असतात. तर काही स्त्रिया एकटेपणाच्या आयुष्याचा स्वीकार करण्यास तयार होतात. कारण स्त्रियांच्या ठायी असलेले मातृत्व त्यांच्यात दयाभाव जागृत करत असते. ज्यामुळे अत्याचार्यांना क्षमा करणे, कधीतरी त्यांच्यात बदल येईल ही आशा बाळगुन त्यांना वारंवार संधी देणे, त्यांच्यासाठी त्याग करणे, मनात कृतज्ञता बाळगणे ह्या सामोपचाराच्या पळवाटा त्या जीवनभर शोधत असतात. परंतू त्यांच्यातील ह्या विशेशतांना मात्र त्यांचा कमकुवतपणा समजला जातो.
पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांचे प्रत्येक क्षेत्रात पुरूषांना आव्हान देणे. तसेच उंबरठ्याबाहेरच्या जगात बाजी मारणे प्रत्येकच पुरुषास सहजा सहजी पचविणे शक्य होत नाही. कारण पुरुषी अहंकारास तो जोरदार तडाखा असतो. त्यामुळे कित्येक स्त्रियांना आपल्या अस्तित्वासाठी पुरुषी विरोधाचा नेटाने सामना करावा लागतो. आजही स्त्रियांचे घराबाहेर पडून आपल्या ध्येयासाठी झटणे वाटते तितके सोपे नाही. कारण घर व बाहेर अशा दोन्ही ठिकाणी उत्तमरीतीने सादरीकरण करणे हे त्यांची केवीलवाणी तारांबळ उडविणारे असते. कधीकधी तर घरातील अन्य स्त्रीयांकडूनही सहयोगाची अपेक्षा करणे म्हणजे त्यांच्या करीता निराशेस आमंत्रण देण्यासारखे असते. स्त्रियांमधील कौशल्यांना घरात आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. परंतू त्यांच्या अस्तित्वाचा ठसा उमटविण्याच्या हेतूने त्यांच्यातील गुणांना व क्षमतांना प्रोत्साहन दिले जात नाही. स्त्रिया आपले बालपण आई वडीलांसाठी जगतात. त्यानंतरचे आयुष्य त्या स्वत:च्या कुटूम्बासाठी जगातात. असे करता करता त्यांचे संपूर्ण आयुष्य निघून जाते परंतू स्त्रियांना कोणीही समजून घेवू शकत नाही. त्यामुळे स्त्रिया कितीही आयुष्यभर कष्ट करत राहिल्या तरी त्यांना आयुष्याच्या शेवटी निराशेचा सामना करावा लागतो. कारण आपण कशासाठी जगलो आणि एवढे कष्ट करून काय मिळविले हा त्यांच्या मनाला भंडावून टाकणारा प्रश्न कायमच त्यांची शांतता भंग करत असतो.
स्त्रिया आपल्या घरासाठी व आपल्या माणसांसाठी आयुष्यभर निस्वार्थपणे समर्पित असतात. कारण त्या भावनाशील असतात व कुटुंब ही त्यांची भावनिक दुर्बलता असते. ज्या स्त्रिया केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत असतात त्या स्त्रियांना ”फक्त गृहिणी” असे संबोधले जाते. कोणत्याही स्त्रीचे असे नामकरण झाल्यानंतर बहुतेक घरांमध्ये तिला गृहीत धरण्यास सुरवात होते व तिची किंमत करणे सोडून दिले जाते. त्याचप्रमाणे तुला एक काम वेळेत करता येत नाही, घरी राहून तु करते काय, तुला साधे घर सांभाळनेही जमत नाही अशाप्रकारची बोचणारी वाक्ये ऐकवून त्यांच्या आत्मसम्मानाला वारंवार दुखावले जाते. तु काहीच कामाची नाहीस असे म्हणून त्यांचा आत्मविश्वास तोडण्यात येतो. तरीही स्त्रिया आपल्या व्यक्तीगत स्वप्नांचा व क्षमतांचा ध्यास न घेता आपले अवघे जीवन अशा माणसांसाठी समर्पित करतात ज्यांना त्यांच्या त्यागाची जराही पर्वा नसते. त्या आपली कर्तव्ये निभावण्यासाठी गरज पडल्यास स्वत:कडे कमीपणा घेतात. परंतू स्वत:ला महत्व प्राप्त करून देण्यासाठी कधीही त्यांच्यातील दुर्गेच्या स्वरूपास पाचारण करत नाहीत. त्या आपल्या जोडीदाराच्या सर्व इच्छांचे निमूटपणे पालन करणे आपले कर्तव्य समजतात. परंतू तरीही काही पुरूष परस्त्री मध्ये आपले मन गुंतवण्यास निघतात. तसेच त्यासाठीही ते घरातील स्त्रिलाच दोष देत असतात. अशावेळी स्त्रिया स्वत:ला पूर्णपणे असुरक्षित समजत असतात. कारण त्यांचा त्यांच्या जोदीदारावरचा विश्वास तुटलेला असतो. आज कित्येक स्त्रिया अशाप्रकारच्या शोषणाला बळी पडत आहेत. परंतू प्रत्येकीलाच ह्या गोष्टींना वाचा फोडणे जमत नाही. अशावेळी त्या मानसिक घुसमट सहन करत आयुष्य जगत राहतात. किंवा त्यामधून बाहेर पडण्यासाठी आजीवन असफल प्रयत्न करत राहतात. आपण मात्र त्यास एका लढ्याचे नाव देवून दुरूनच होणाऱ्या घटनांची पडताळणी करत राहतो.
ज्या स्त्रिया मजूर वर्गाशी निगडीत आहेत त्यांचे पोट त्यांच्या हातावर व अंगमेहनतीवर अवलंबून असते. घरात चूल पेटावी म्हणून त्यांना दररोज घर सांभाळून उन्हातान्हाची पर्वा न करता कष्ट करावे लागतात. बाहेरच्या जगात त्यांच्या पेशास व त्यांना किती आदर मिळत असेल ह्याची खात्री देता येत नाही. त्याचबरोबर त्यांच्या घरातील वातावरणही त्यांचे मानसिक स्वास्थ्य जपणारे नसते. कारण मजूर वर्गातील बहुतांश पुरूष व्यसनी असतात. त्यांनाही जीवन चालविण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. तसेच त्यांच्या गाठीशीही लोकांनी घालून पाडून बोलल्याचे असंख्य अनुभव असतात. त्यामुळे ते मनाने खचलेले असतात. अशावेळी ते आपल्या मनातील वेदना शमविण्यासाठी मादक पदार्थांचा आधार घेत असतात. त्यामुळे त्यांना काही क्षणांसाठी खऱ्या जीवनाचा विसर पडतो. परंतू कधीकधी नशेत असतांना त्यांचा पुरुषी अहंकार त्यांना घरातील स्त्रियांवर अत्याचार व शारीरिक हिंसा करण्यास प्रवृत्त करत असतो. स्त्रियांना अपशब्दात शिवीगाळ करून ते आपले मन हलके करत असतात. त्यामुळे त्या स्त्रियांना अतिशय मानसिक ग्लानीस सामोरे जावे लागते. तरीही संसाराचे रहाटगाडगे आपल्या जबाबदार खांद्यांवर घेवून त्या आयुष्याची वाटचाल करत राहतात. कधीकधी पुरुषांचे हे व्यसन त्यांच्याच भरल्या संसाराची राखरांगोळी करण्यास कारणीभूत ठरते. स्त्रियांच्या संयमाची मात्र ती अत्यंत कठोर परीक्षाच असते.
स्त्रिया आपल्या संसाराशी भावानांनीच नाहीतर कर्तुत्वानेही जुळलेल्या असतात. आपल्या माणसांना जपणे व त्यांची सर्वतोपरी काळजी घेणे त्यांना आंतरिक समाधान प्राप्त करून देणारे असते. परंतू ते करत असतांना त्यांनी आपल्यातील क्षमता व सम्भावनांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कारण एक माणूस म्हणून ज्या हेतू पुरस्सर त्यांचा जन्म झालेला असतो. त्या दिशेने त्यांच्या हातून निरंतर कर्म घडत राहणे अनिवार्य असते. जेव्हा घरातील सदस्यांकडून त्यांना पुरेसा सहयोग मिळत नाही. त्यांच्या असण्याची किंमत केली जात नाही. त्यांच्यातील स्त्रित्वाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जातो. तेव्हा स्त्रियांनी आपल्या हक्कासाठी लढणे आवश्यक असते. स्वत:मध्ये आत्मप्रेम जागृत करून आपल्या कामांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी झटणे महत्वाचे असते. तेव्हाच त्या एकेदिवशी स्वत:ला जगासमोर सिद्ध करू शकतील. तसेच संपूर्ण स्त्रीवर्गाचे प्रतिनिधीत्व करू शकतील. त्यासाठी त्यांनी स्वत:मधील क्षमतांना आणखी तिक्ष्ण करून पुढे जाण्यासाठी स्वत:च स्वत:ला प्रोत्साहित केले पाहिजे. हे जग अत्यंत स्वार्थी व आत्मकेंद्री आहे. जो इथे दुर्बल ठरतो त्याच्यावर वर्चस्व स्थापित केले जाते. म्हणूनच स्त्रियांनी कायम आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या सम्मानासाठी व माणूस म्हणून हक्क मिळविण्यासाठी निकरीने लढा दिला पाहिजे. जेणेकरून कोणाचीही त्यांच्या भावनांना तुच्छ समजून त्यांचा अनादर करण्याची हिम्मत होणार नाही. त्याचप्रमाणे त्यांच्यातील सरस्वतीस वंदन केले जाईल. त्यांच्यातील दुर्गेपुढे पुरुषी अहंकार गळून पडेल. तसेच त्यांच्यातील लक्ष्मीच्या स्वरूपास घरादारास आलेले चैतन्य समजले जाईल.
1. चुकलेले पालकत्व
स्त्री पुरूष असमानता निर्माण होण्यास आई वडील मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतात. कारण पुढची पिढी कशी घडावी. त्यांच्यात कोणते बदल आणले जावेत. जे समाजाच्या व स्त्रियांच्या हिताचे ठरतील. हे जर त्यांच्या दूरदृष्टीत व विचारात नसतील तर त्यांनी त्यांच्या मुलांच्या केलेल्या संगोपनात व संस्कारातही ते दिसत नाहीत. त्यामुळेच आजच्या काळात संत महात्मे व थोर पुरूष घडत नाहीत. कारण आजची पिढी लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबवलेल्या वर्चस्व स्थापित करणे व मात करण्यासारख्या चढाओढीच्या विचारांनी समृद्ध होवून वयात येते. त्यातल्या त्यात ह्या पुरूषप्रधान संस्कृतीत पुरुषी मानसिकता अजूनही संपुष्टात आलेली नाही. त्यामुळे घरातील स्त्रियांच्या क्षेत्राचा मान न राखणे. स्वत:ला त्यांच्या स्थानावर ठेवून त्यांच्या दुविधा समजून न घेणे. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांच्या मनातील शुद्ध हेतूस जाणीवपूर्वक झिडकारने. स्त्रियांचा सम्मान न करणे. हे प्रकार घडणे थांबलेले नाही. कारण आजच्या युगात स्त्रिया कितीही स्वतंत्र जीवन जगतांना दिसत असल्या तरी घराच्या चार भिंतीत मात्र त्या मोठ्या प्रमाणात भावनिक व मानसिक अत्याचाराचा सामना करत आहेत. हेच चुकलेल्या पालकत्वाचे दुष्परिणाम आहेत.
2. स्त्री पुरूष भेदभाव
स्त्रिया व पुरुषांमध्ये फरक करणे ही गोष्ट देखील बऱ्याच मोठ्या कालावधी पासून पिढ्या न पिढ्यांमध्ये रुजलेली जख्खड मानसिकता आहे. ज्याचा जाच स्त्रियांना अजूनही होत आहे. स्त्रिया जेव्हा केवळ चूल आणि मुल ह्या संकल्पनेत अडकल्या होत्या. तेव्हा त्यांना आपल्या मर्जीनुसार वाकवणे पुरूषांना सहज शक्य होते. परंतू आताच्या स्त्रिया घरासोबतच आपल्या कारकीर्दीच्या जगातही खऱ्या उतरत आहेत. त्याचबरोबर स्त्रियांशी संबंधीत अनेक पेशांमध्ये पुरुषही अग्रेसर आहेत. त्याचबरोबर काही पुरुषही आपल्या घरातील स्त्रियांना प्रोत्साहन देण्या सोबतच त्यांच्या कामात मदतीचा हात पुढे करत आहेत. तरीही पुरुषी मानसिकतेने ग्रसित लोकांमध्ये जागरूकता आलेली नाही. त्यामुळे स्त्रियांना तारेवरची कसरत करून आपल्या असण्याला महत्व प्राप्त करून द्यावे लागत आहे. अशा स्त्रियांसाठी रोजचे जगणेही एक लढा असतो. कारण त्यांना एखाद्या यंत्राप्रमाणे कार्यरत राहावे लागते. त्यांच्या भावनिक जगाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते. ज्या स्त्रीयांमुळे घराचे घरपण जपले जाते. तसेच ज्यांच्या केवळ असण्याने घरास चैतन्य प्राप्त होते. त्यांच्याच मनातील जगण्याचे समाधान हिरावून व चेहऱ्यावरचे स्मित पळवून कोणाच्याही पदरात खरे सुख येवू शकत नाही.
3.स्त्रियांची शारीरिक दुर्बलता
स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत शारीरिक दृष्टीने शक्तीशाली नसल्या. तरी त्यांची आंतरिक शक्ती भावनांमध्ये सामावलेली असते. म्हणूनच स्त्रियांचे भावनिकरीत्या कणखर असणे महत्वाचे असते. तेव्हाच त्यांच्या विचारांना व बुद्धीस चालना मिळू शकते. पुरूषांचा असा समज असतो कि स्त्रिया त्यांच्या इतकी कठीण कामे करण्यास सक्षम नसतात. परंतू ज्या स्त्री मधील मातृत्व व स्वाभिमान जागृत होतो ती स्त्री दुर्गेचा अवतार धारण करते. त्याचप्रमाणे ज्या स्त्रीच्या मनात अन्याय , अत्याचाराविरूद्ध पेटून उठण्याची ठिणगी निर्माण होते. त्या स्त्रीची जिद्द हीच तिची खरी ताकद असते. कारण शरीराची दुर्बलता ही कमकुवत विचारांमधून येत असते. परंतू विचारांची ताकद कमकुवत शरीरासही दहा हत्तींचे बळ प्रदान करत असते. शिवकालीन हिरकणी नामक गवळण त्याचप्रमाणे झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्या देखील स्त्रियाच होत्या परंतू त्यांच्या आंतरिक शक्तीने त्यांना बलाढ्य बनविले. त्यामुळे त्यांनी ते करून दाखविले जे एका स्त्रीच्या दृष्टीने असंभव वाटत होते. परंतू आजही शारीरिक ताकदीच्या तुलनेवरून स्त्री पुरुषात भेदभाव करण्यात येतो. कामावरही पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी वेतन मिळते. त्याचबरोबर घरातही पुरूष स्त्रियांना आपल्या हिंसेचे शिकार बनवू शकतात कारण स्त्रियांच्या आंतरिक शक्तीचा त्यांना तडाखा बसलेला नसतो.
4. स्त्रियांचे समर्पण
स्त्रियांचे समर्पण हे देखील स्त्रियांच्या आंतरिक शक्तीची ताकद असते. स्त्रिया निस्वार्थ सेवाभावाने आपल्या जोडीदाराची व कुटूम्बाची काळजी घेत असतात. त्यासाठी आपल्या व्यक्तीगत जीवनाचा त्याग करतात. परंतू त्या प्रेमाची व त्यागाची सखोलता समजून घेण्यासाठी त्याच तोडीची माणसे पाहिजे असतात. अन्यथा एका स्त्रीचे जीवन निरर्थकपणे वाया जाते. म्हणूनच स्त्रित्वाचा सम्मान करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी पती पत्नीच्या नात्यात एकमेकांसाठी सम्मान असला पाहिजे. नाहीतर त्यांच्यापैकी एक मालक व दुसरा सेवक म्हणून गणला जातो. ज्याठिकाणी किंवा ज्या गोष्टीमध्ये स्त्रियांचे समर्पण व उर्जा प्रवाहित होते त्या सर्व गोष्टी यशाची शिखरे पादाक्रांत करतात. कारण प्रत्येक स्त्री ही शक्तीचे स्वरूप असते. तिचा उच्च कोटीचा प्रामाणीकपणा हेच त्याचे प्रतिक आहे. स्त्रियांच्या समर्पनास क्षुल्लक समजून व त्याचा आदर न राखून कोणत्याही पुरुषाचे मातीमोल होणे ठरलेले आहे. कारण स्त्रियांच्या अंतर्मनातून निघणाऱ्या शुभआशीर्वादांशिवाय पुरुषाच्या कर्तुत्वास सृष्टीही मान्यता देत नाही.
ज्या स्त्रिया फक्त गृहिणी आहेत. त्यांच्या कामातून पैश्याच्या स्वरूपात कोणताही मोबदला येत नसल्याने. त्यांच्याकडे घरच्यांचे दुर्लक्ष होण्याची व त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतू ज्या स्त्रिया नोकरी वर्गातील आहेत त्यांचीही परिस्थिती काही वेगळी नाही. बऱ्याचदा त्यांचेही भावनिक व मानसिक शोषण होतांना दिसते. कारण स्त्रियांना एक माणूस म्हणूनच कमी महत्व दिले जाते. त्याचप्रमाणे गृहिणी असणाऱ्या स्त्रियांना प्रोत्साहन दिले जात नाही कारण घरातील त्यांच्या योगदानाची व सेवेची घरातील माणसांना सवय झालेली असते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या स्थानावरून कोणत्याही निमित्ताने हलणे कोणासही मान्य नसते. स्त्रियाही त्या कितीही स्तराच्या पुरुषी मानसिकतेस बळी पडत असल्या. तरी आपल्या डोळ्यांवरची माणुसकीची पट्टी सोडायला तयार नसतात. त्यामुळे त्यांची अवस्था तळ्यातील साचलेल्या पाण्यासारखी होते. ज्यात त्यांच्यातील साहस बाहेर येण्यास वाव नसतो. त्यामुळे त्यांना कधीही त्यांच्या ध्येयाचे आकलन होवू शकत नाही. ध्येयच नसल्यामुळे त्यांच्यासाठी लढणे व संघर्ष करणे ह्या गोष्टींना काडीचाही अर्थ उरत नाही. एक स्त्री असून देखील ह्या गोष्टींची जागरूकता नसणे खरे तर हाच स्त्रियांच्या अस्तित्वाचा खऱ्या अर्थाने लढा असतो.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)