सुखाचा शोध

आपल्यापैकी कोणासही आजतागायत सुखाची परिभाषा पूर्णपणे कळलेली नाही. त्यामुळे आपण आपआपल्या तर्क वितर्का प्रमाणे सुखाचा वेगवेगळा अर्थ लावत असतो. कोणी भौतिक श्रीमंतीशी सुखाला जोडतात. तर कोणी सेवाभावातून सुख अनुभवत असतात. तसेच कोणी त्यागाच्या परीसिमेतून दैवी सुखाचा आनंद घेतात. परंतू प्रत्येकास सुख व जगण्याचे समाधान पाहिजे असते. दु;खाला आनंदाने मिठी मारणारे बोटांवर मोजण्याइतकेच असतात. परंतू त्यांच्या तसे करण्यामागेही सूक्ष्मरीत्या सुखाचीच आस असते. खरे तर सुख हे आपल्या आयुष्यात पडलेले दान असते. परंतू ते समजून घेण्याकरीता आपल्यात पराकोटीचे शहाणपण असले पाहिजे. कारण आयुष्याच्या वाटेवर आलेल्या उतार चढावांनी आपले मन निरुत्साही झालेले असते. त्यामुळे मनाचा कल नेहमी दु:खाच्या दिशेने जास्त असतो. आपल्या बोलण्यात निराशाजनक वक्तव्याचा समावेश असतो. वागण्यात धाडसाची कमतरता जाणवते. आपण मरण येण्याअगोदरच मरणासन्न अवस्थेत जीवन जगत असतो. कायम परिस्थिती पुढे गुडघे टेकतो. आपल्या माणासांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या निभावण्यात कमी पडतो. अवाजवी अपेक्षांना बळी पडल्यामुळे गृहसौख्यास मुकतो. आपल्याला भौतिक समृद्धीची आसक्ती असते. आपल्या जगण्यात समाधान नसते. आपण अत्यंत आत्मकेंद्री होवून जीवन जगत असतो. तसेच स्वार्थाने व लालसेने बरबटलेले असतो. ह्याच सर्व गोष्टी पुढे जावून आपल्याच दु:खाचे कारण बनतात. त्याशिवाय सुख , समाधान व आपल्याला मानसिक शांतता बहाल करणाऱ्या गोष्टीही आपल्या अंतर्मनात दडलेल्या असतात. परंतू आपण मात्र आपल्याला दु:ख देणाऱ्या मार्गाचाच नेहमी आयुष्यात अवलंब करतो. तसेच आपले सुंदर जीवन नरकासमान बनवितो. जीवनप्रवासात येणाऱ्या समस्या, कर्तव्य व जबाबदार्यांच्या जाळ्यात असे अडकतो कि सुखाच्या गोड झऱ्याचा आस्वाद घेण्यासच अपात्र ठरतो. आपल्या विचारातील गरीबी ओसंडून वाहणाऱ्या निखळ सुखाला स्पर्श करू देण्यापासून आपल्याला थांबविते. आयुष्यात आपण शुद्धतेचा मार्ग आत्मसात केला पाहिजे. परंतू एकटे पडण्याच्या भीतीने आपण कधीही आपला महामार्ग घडवत नाही. तर गर्दी बरोबर वाटचाल करत राहतो. त्याचबरोबर ते करत असतांना स्वत:वर टीका करतो. इतरांबरोबर स्वत:ची तुलना करतो. स्वत:ला कमी लेखून अपमानित करतो. आपल्याच अंतर्मनाचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही. आपण आपल्याच विचारांना दुषित करतो. आपले स्वत:बरोबरचे नाते बिघडलेले असते. त्यामुळे आपल्याच माणसांना खोलवर समजून घेण्यात आपण असमर्थ ठरतो. अशाप्रकारे आपला जीवनप्रवास आपणच तयार केलेल्या दु:खाच्या वाटेवर सुरू असतो.  

   सुखाच्या शोधात असतांना आपण आपसूकच पैस्याच्या मोहात पडतो. कारण पैसा म्हणजे सुख हे समीकरण आपण मनोमन केलेले असते. परंतू सुख हे अत्यंत मौल्यवान आहे जे समाधानात असते. आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणार्यांच्या सहवासात असते. त्यांच्याशी केलेल्या संवादात असते. त्यांच्याबरोबर हसण्यात असते. एकमेकांना समजून घेण्यात असते. आपुलकीत, प्रेमात व आशीर्वादात असते. ते कितीही जमापुंजी खर्च करून विकत घेता येत नाही. पैसा खर्च करून आपण आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकतो. परंतू आपण त्यामुळे सुखी होवूच ह्याची शाश्वतीही नसते. तरीही पैसे कमाविण्याच्या शर्यतीत सुखाची संकल्पना आपल्या मनाच्या पृष्ठभागावर असली पाहिजे. कारण पैस्याचे आपल्या आयुष्यात काय व किती महत्व आहे हे आपल्याला कळले नाहीतर आपण पैस्यालाच सर्वस्व समजू लागतो. आपली स्वावलंबी नसलेली व लग्न झालेली बहिण तिच्या आर्थिक विवंचने पुढे गुडघे टेकून आई वडीलांच्या मालमत्तेत असलेल्या आपल्या भागाची मागणी करते तेव्हा जीवाभावाचे असलेले बहिण भावाचे नाते कट्टर शत्रुत्वात बदलते. आयुष्यभर एकमेकांचे तोंड न बघण्याचा ते निर्णय घेतात. कारण त्या नात्यात पैस्यासंबंधीत व्यवहार येताच नात्यातील प्रेमाला तडा जातो. मनं कोरडी पडतात. अशावेळी ते एकमेकांच्या परिस्थितीला समजू शकत नाही. कारण प्रेम तिथेच टिकून राहते जिथे नात्यात आदर व सुरक्षित अंतर कायम असते. अशाप्रकारे जेव्हा प्रेमाला नाममात्र का होईना स्वार्थाचा लवलेश लागतो तेव्हा त्या नात्यामधून केवळ दु:खच आपल्या वाट्याला येत असते. म्हणूनच भौतिक समृद्धी बरोबरच आपल्यात मनाचा मोठेपणाही असणे गरजेचे असते. तरच तेथून सुखाचा उगम होवू शकतो. लग्नसमारंभाच्या निमित्ताने जेव्हा सर्व कुटूंब एकत्र येते तेव्हा प्रत्येक जण आपल्या समृद्धीचे, प्रगतीचे प्रदर्शन मांडतात, एकमेकांशी तुलना करतात आणि एकमेकांविषयी मत बनवितात. परंतू एकमेकांची आपुलकीने विचारपूस करण्याची कोणासही गरज वाटत नाही. त्यामुळे एखाद्याच्या मनातील दु:ख भावनेच्या माध्यमातून मोकळे होण्यास वाव मिळत नाही. प्रगती करणे, समृद्धीत जीवन जगणे फारच उत्तम गोष्ट आहे परंतू स्वत:विषयी आपले मत चांगले आहे किंवा नाही हे पडताळून पाहणे सुख देणारे असते. जे आपल्याच जीवाभावाच्या माणसांशी औपाचारीकातेने वागण्यात नाही. भरजरी कपडे घालून मिरविण्यात नाही. ते खरे सुख आपल्या माणसांशी सखोल संवाद साधून त्यांची मनं मोकळी करण्यामध्ये असते. कोरड्या मनाने एकमेकांशी भेटण्यात नाही. तर आपल्या माणसांना जिव्हाळ्याचे व आधारयुक्त आलिंगन केल्यावर डोळे भरून येण्यात असते. जर जीवलगांशी घेतलेल्या  भेटी दरम्यान असे झाले नाहीतर त्या भेटी दु:खाचे कारण बनतात.   

   आपण आयुष्यात केलेल्या प्रगतीमुळे अहंकाराने आपले डोळे दिपवून टाकले तर आपण खऱ्या सुखाला मुकलो असा त्याचा अर्थ होतो. कारण आपण तसे करून त्या प्रगतिशी संलग्न होतो. त्याचप्रमाणे आपण तिला खरे सुख समजू लागतो. आपल्या त्या सुखाला कोणाचीही नजर लागू नये अशी भीती आपल्या मनात निर्माण होते. ही भीतीच आपल्याला सुखापासून वंचित ठेवते. कारण आयुष्यात प्रगती करून आपण आपली ओळख निर्माण केली असली तरी एक माणूस म्हणून तसेच अनेक नात्यांना जोडणारा दुवा म्हणून आपण कोणाचे काही देणे लागतो. तसेच त्या देण्यातून आपल्याला जे सुख लाभते त्या सुखापासून आपण स्वत:ला वंचित ठेवतो. तेव्हा केवळ आपल्या पुरते जगण्याला सुख समजू नये. मनाच्या मोठेपणाने पैस्याच्या स्वरूपात कोणास मदत करणे. कोणास भावनिक आधार देणे. सेवा करणे. परोपकाराचे जीवन जगणे हे आपल्या प्रवृत्तीतच असले पाहिजे. कारण आपण आयुष्यात जे काही मिळविले त्यापैकी काहीही आपल्या शेवटच्या क्षणी आपल्या बरोबर नेण्याची सोय उपलब्ध नाही. मग ते आता कोणा गरजूच्या किंवा वंचीताच्या उपयोगी पडले आणि त्यासाठी आपण माध्यम बनलो तर त्याहून मोठे सुख आणखी कोणते असू शकते. कारण आपली खरी धनदौलत व आपले सर्वस्व म्हणजे आपला वर्तमान क्षण असतो. त्याशिवाय आपला आणखी कशावरही हक्क नसतो. परंतू त्या क्षणाला आपण कशापद्धतीने जगतो त्यात खरे सुख दडलेले असते. जर आपल्याला वर्तमान क्षणाचे महत्व कळले तर आपण कोणत्याही मोहमायेत, अपेक्षेत, राग-लोभात, प्रतीस्पर्धांमध्ये अडकणार नाही. अशावेळी आपण त्या सुखाचा शोध लावण्यास सरसावू ज्यामुळे आपल्याला वर्तमान क्षण पूर्ण जागरूकतेने जगता येईल. त्याचप्रमाणे आपण इतरांना वाईट ठरविण्यात आपला वेळ वाया घालविणार नाही. तर आपल्यातीलच अनेक दोषांपासून स्वत:ला मुक्त करण्याचा विडा उचलू. आपण आपल्या माणसांना व त्यांच्या कामांना तुच्छ लेखणार नाही तर त्यांचे आपल्या जीवनातील महत्व जाणून घेवू. त्याचबरोबर त्यांची साथ मिळविण्यासाठी विनम्र व सहयोगापूर्ण होवू. आपण किती उच्च शिक्षित आहोत, आपण किती सुख समृद्धीत लोळत आहोत त्यापेक्षा आपले मन प्रेमाने व करुणेने व्यापलेले आहे किंवा नाही हे आपल्यासाठी जास्त महत्वाचे असेल. आपल्या माणसांबरोबर स्पर्धा लावून त्यांच्यापेक्षा दोन पावले समोर असण्यापेक्षा त्यांनाही प्रेरित करून पुढे जाण्याचे पाठबळ देणे आपल्याला जास्त आवडेल. सुख म्हणजे नक्की काय असते ते माहित नाही परंतू ते बाहेर कोठेही शोधून सापडत नाही. कारण ते आपल्यातच आहे. तेव्हा आपण दु:खाचा नाहीतर कायम सुखाचा स्त्रोत बनले पाहिजे. त्याचबरोबर आपण सुख जगू शकलो पाहिजे. 

   सुख पैस्याने विकत घेता आले असते तर फारच सोपे झाले असते. परंतू ते कष्टातून, इतरांच्या आशीर्वादातून, मनं जिंकून, हृदयाला स्पर्श करून मिळवावे लागते. ज्यांना सुखाची परिभाषा कळली त्यांचे जीवन भव्य व अजरामर होते. आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो कारण आपल्या इच्छा कधीही तृप्त होत नाहीत. परंतू आपण खऱ्या सुखाचा अर्थ समजू शकलो तर आपली तृष्णा आपोआप शांत होईल आणि आपल्या प्राणांस मुक्ती मिळेल. जन्माला आल्यापासून मनुष्य सुखाच्या शोधात असतो. परंतू तो इच्छा आकांक्षा लालसा स्वार्थ ह्यांच्या मायाजाळात अडकतो आणि त्यातच सुखाचा शोध घेवू लागतो. तिथे लवकरच त्याचा भ्रमनिराश होतो. कारण एवढी तगमग करून देखील आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्याचे हात रिकामेच असतात. कारण मानसिक समाधाना शिवाय मिळवलेली ख्याती, धनदौलत हे त्याला कवडीमोलाचे वाटू लागते. तेव्हा आपण आपल्या गरजा सीमित ठेवण्यात, आपल्या कशाही काळात सृष्टी वरचा आपला विश्वास ढळू न देण्यात, सृष्टीच्या अदृश्य शक्ती पुढे कायम नतमस्तक राहून प्रार्थनेचे महत्व जाणून घेण्यात व विनम्र व्यक्तीमत्वात जगण्यात सुखाचा उगम असतो. तसेच त्या सुखाचा कधीही अंत होत नाही कारण त्याची मर्यादा आकाशाला गवसणी घालणारी असते. 

1  जीवनप्रवासाचा आनंद घेण्यात सुख असते. 

   जीवनाचा प्रवास करत असतांना आनंदी राहणे ही आपली निवड असली पाहिजे. आपला असा समज असतो कि सर्वकाही मनासारखे झाल्यावर आपण सुखी होवू. आपण भौतिक समृद्धीचे मालक बनलो तर आपण सुखी होवू. आपल्यापाशी मुबलक पैसा आला कि आपण सुखी होवू. आपले बिघडलेले नातेसंबंध सुधारले कि आपण सुखी होवू. असे करून आपण आपले सुखी राहणे कायम उद्या वर ढकलत असतो. किंवा आपले सुखी राहणे हे इतरांवर व परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे आपण पूर्णपणे कधीही सुखी होवू शकत नाही. कारण आपल्या सुखाला सामाजिक नियमांच्या, औपचारीकतेच्या मर्यादा लागलेल्या असतात. परंतू सुख हे लहान लहान गोष्टींमध्ये सामावलेले असते. ह्याची आपल्याला जाणीव होईस्तोवर आपण जीवनाच्या शेवटच्या टोकावर उभे असतो. त्याचप्रमाणे सर्वकाही हातातून सुटत जाण्याच्या जाणीवेने हताश झालेलो असतो. जीवन जगण्याचे एक मुलभूत तत्व आहे आणि ते म्हणजे सुख वाटा आणि सुखी व्हा. त्यानुसार आपण जर स्वत:वर लक्ष केंद्रित केले तर आपली सुखी राहण्याची मक्तेदारी पूर्णपणे आपली असेल. जोपर्यंत आपल्याला सुखाचा खरा अर्थ कळणार नाही तोपर्यंत आपल्या माध्यमातून कोणीही सुखी होवू शकत नाही. तेव्हा सर्वप्रथम आपल्या जीवनप्रवासातील विविध अनुभवांना आनंदाने जगले पाहिजे. कारण अनुभवांशिवाय आपल्या जीवनरूपी पुस्तकाची पाने कोरीच राहतील. आपण कोणत्याही तुलनांमध्ये न फसता आपण जे काही करतो त्या कामावर पूर्णपणे मन एकाग्र करून त्या कामास प्रतिष्ठा प्राप्त करून दिली पाहिजे. आपण आपल्याशी जुळलेल्या माणसांच्या मनात स्थान निर्माण करू शकलो पाहिजे. आपण आपले जीवन संयमाने व चिकाटीने जगले पाहिजे. आपण इतरांच्या जीवनात सुखाचे दोन क्षण देवू शकलो पाहिजे. आपण पुढे सरसावणाऱ्या प्रत्येक क्षणात सुख शोधले पाहिजे. 

2  वर्तमान क्षण जगण्यात सुख असते. 

   काळ गतिमान असून तो झपाट्याने पुढे सरसावत आहे. आपल्याला तो  क्षण हातून निसटण्याअगोदर त्याला जगता आला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला तो क्षण जागरूकतेने जगता आला तर आपले जीवन सर्वदृष्टीकोनाने सुंदर होते. परंतू आपण मात्र अपेक्षांमध्ये गुंतून त्या क्षणाला दु:खात लोटतो आणि सुखापासून वंचित ठेवतो. अशाप्रकारे प्रत्येक मागे पडणारा क्षण दु:खमय असला तर भूतकाळाच्या आठवणी ह्या क्लेशकारक होत जातात. तसेच त्यांचे पडसाद वर्तमान क्षणावरही पडतात. त्यामुळे आपल्या मनात भविष्याबद्दलची चिंता आपोआपच निर्माण होते. जीवनात वेळेला महत्व देणे हे आपले आद्य कर्तव्य असले पाहिजे. कारण गेलेली वेळ पुन्हा परत आणता येत नाही. तेव्हा गोष्टी कोणत्याही कारणांनी पुढे ढकलणे, चुकांप्रती जागरूक राहून त्यांना वेळोवेळी दुरुस्त न करणे, स्वत:मध्ये सुधारणा न आणणे, वाईट सवयींच्या आहारी जाणे ह्या गोष्टी आपल्या वर्तमान क्षणावर दुष्परिणाम करत असतात. त्यामुळे आपण जीवनाचा पुरेपूर आनंद घेवू शकत नाही. परंतू आपण जर परिस्थिती विरुद्ध, माणसांविरुद्ध तक्रारी न करता आपल्या कर्तुत्वावर पूर्ण लक्ष केंद्रित केले तर आपला दृष्टीकोन सकारात्मक होवून व आपण त्या क्षणास समर्पित होवून त्याला सुखमय करू शकतो. आपल्या माणसांच्या भावनांची, इच्छा आकांक्षांची जबाबदारी आपल्या भक्कम खांद्यांवर समर्थपणे पेलून आपण सुखी जीवनाचे शिल्पकार होवू शकतो. इतरांना केलेल्या मदतीची प्रत्येक वेळी पैस्याने किंमत न ठरविता आपल्या माणुसकीने परिपूर्ण वागण्यात आणखी भर घालून सुखी होवू शकतो. आपल्या मनातील आपुलकीने, प्रेमाने व करुणेने इतरांच्या हृदयात स्थान मिळवू शकतो. एखाद्याने केलेल्या कठोर परिश्रमांचा मोबदला त्वरीत व अत्यंत आदराने चुकवून उत्साही होवू शकतो. वर्तमान क्षण हा आपल्या जीवनातील सर्वात महत्वपूर्ण क्षण असतो. तो जर आपण समाधानाने, जागरूकतेने व आनंदाने जगलो तर आपले जीवन खऱ्या अर्थाने सुखाने समृद्ध होत जाते.  

3  बिकट परिस्थितीतही आपल्या माणसांना उमेद हारू न देण्यात सुख असते. 

   प्रतिस्पर्धांच्या ह्या काळात स्वत:ला टिकवून ठेवणे व सिद्ध करणे मानसिक रीत्या थकवून टाकणारे असते. आज विद्द्यार्थी दशेतील मुलांचे अनेक कारणांनी मनोबल खचलेले असते. त्यामुळे त्यांचा आत्महत्येस प्रवृत्त होण्याचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ऐन उमेदीच्या काळात त्यांच्यासाठी जगणे इतके कष्टदायक का होते कि मृत्यूला कवटाळणे त्यांना अगदी सोपे वाटू लागते. हा गंभीर प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळत असावा. परंतू आपण आपल्या घरात त्या विषयाशी निगडीत कोणती काळजी घेतो हे फार महत्वाचे आहे. बाहेरचे जग चढाओढीन्नी व प्रतिस्पर्धांनी कठोर झालेले आहे. निदान घरात मात्र यश अपयशापेक्षा आपल्या माणसांच्या भावना, त्यांचे परिश्रम आणि त्याही पेक्षा महत्वाचे त्यांचे जीवन असले पाहिजे. आपल्याला आपल्या माणसांना आपुलकीने व प्रेमाने सावरता आले पाहिजे. त्यांच्या खचलेल्या मनोधैर्यास पुन्हा धाडस बांधता आले पाहिजे. त्यांना काहीही करून उमेद हारू देण्यापासून वाचविले पाहिजे. तरच आपण त्यांचे बहुमूल्य जीवन वाचवू शकतो. घराच्या उंबरठ्याच्या आत मधले जग आपल्या माणसांसाठी जीवनदायी असले पाहिजे. त्यांची इतरांशी तुलना करून, त्याना धारेवर धरून, त्यांना गृहीत धरून, त्यांना घरातील समस्यांमध्ये गुरफटवून त्यांच्या आत्मविश्वासावर घाला घालणे योग्य नाही. उलट घरातून त्यांच्यात इतका विश्वास भरला गेला पाहिजे कि ते त्यांना पाहिजे त्या क्षेत्रात आपली छाप सोडू शकतील. प्रत्येक घराने आपल्या माणसांना त्यांच्यातील क्षमतांची पदोपदी आठवण करून दिली, त्यांचे कौतुक केले तर ते आपल्या कर्तुत्वाने बाहेरच्या जगावर असा प्रभाव टाकतील कि त्या सुखाने आपले मन भरून पावेल. 

4  आपल्या माणसांच्या नजरेत आपल्यासाठी सम्मान बघण्यात सुख असते. 

   आपण आपल्या गुणांनी व क्षमतांनी बाहेरचे जग जिंकू शकतो. परंतू आपल्या माणसांची मनं जिंकण्यासाठी आपल्याला त्यांच्या भावना समजून घेणे महत्वाचे असते. कारण वेळोवेळी त्यांना आपल्या भावनिक आधाराची आवश्यता असते. एखादे भावनिक कारण उराशी बाळगून आपण जेव्हा जीवनात प्रगती करतो तेव्हा आपण आपल्या माणसांच्या नजरेत आपल्यासाठी सम्मान बघतो. घरातील मुलं आपल्या आई वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात. परंतू जेव्हा आई वडील आपल्या मुलांच्या इच्छे खातर व त्यांनी संकट काळात दिलेल्या मोलाच्या साथीची जाणीव ठेवून आयुष्यात मोठे ध्येय गाठण्याचा निर्णय घेतात. तसेच अथक परिश्रमांनी ते यश आपल्या पदरात पाडून घेतात. तेव्हा मुलांच्या नजरेत त्यांचे स्थान उंचावते. त्याचप्रमाणे आई वडील जेव्हा आपल्या मुलांना चांगले जीवन देण्यासाठी त्यागाची परिसीमा गाठतात तेव्हा मुलं त्यांच्या पुढे नकळतपणे नतमस्तक होतात. आई वडील असोत किंवा मुलं त्यांनी एकमेकांना एक माणूस म्हणून समजून घेतले पाहिजे. त्यांच्याकडून झालेल्या चुकांना गुन्हा नाहीतर एक संधी म्हणून एकमेकांनी पाहिले पाहिजे. त्यांनी एकमेकांची मदत केली व स्वीकारलीही पाहिजे. त्यांनी स्वत:ला व एकमेकांना मोठ्या मनाने माफ केले पाहिजे. आई वडीलांनी मुलांना जन्म देवून जग दाखविले त्यामुळे ते वंदनीय आहेतच तरीही आपल्या कर्तुत्वाची छाप सोडून त्यांनी आपल्या मुलांच्या नजरेत साम्मानास पात्र बनले पाहिजे. तेव्हाच ते त्यांच्यासाठी एक आदर्श निर्माण करू शकतात. तेव्हाच आई वडील व मुलांच्यात अतूट बंध निर्माण होतात व सम्मानही वाढतो. 

   सुखाची अनुभूती होण्यासाठी एखाद्याने आपुलकीने व प्रेमाने आपल्या हृदयाला स्पर्श केला पाहिजे, कोणाच्या मायेने आपण गहिवरलो पाहिजे, कोणाच्या कौतुक केल्याने आपल्यात विश्वास जागृत झाला पाहिजे, कोणाच्या पाठबळाने आपल्यात यश गाठण्याचा उत्साह संचारला पाहिजे अशाप्रकारे सुख म्हणजे अंतर्मनात निर्माण झालेली सुखद भावना असते जी स्पर्शाने, डोळ्यातील पाण्याने, मोलाच्या साथीने, आपुलकीने , प्रेमाने व्यक्त होते. तेव्हा सुख हे बाहेरच्या जगात शोधू नये कारण खऱ्या सुखाचा उगम आपल्यातच होतो आणि आपल्यातूनच त्याचा प्रसारही होतो. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *