
घर ही अशी संकल्पना आहे जिथे चैतन्य व माणसांमधील एकोपा ह्या गोष्टींना फार महत्व असते. कोणत्याही घरास ह्या दोन्ही गोष्टी तेव्हाच लाभतात. जेव्हा त्यांच्याशी निगडीत इतर गोष्टींचे संतुलन व मर्यादा घरातील सदस्यांकडून राखल्या जातात. परंतू अनेक नकारात्मक कारणांमुळे त्या गोष्टींना तडा जातो. घर निष्प्राण करण्यास त्या कारणीभूत ठरतात. कारण त्या घरातील माणसांच्या मनात उदासीनतेने घर केलेले असते. त्यांची मनं दुखावली गेलेली असतात. घरातील सात्वीकतेस अंधश्रद्धेने ग्रासलेले असते. निस्वार्थ प्रेमाला अपेक्षांचे ग्रहण लागलेले असते. घरातील मर्यादा भंग पावलेली असते. माणसांच्या मनातील राग द्वेषाने घराच्या भिंती अबोल झालेल्या असतात. घर सुख समृद्धी व भरभराटी पासून वंचित झालेले असते. घरातील माणसांमध्ये आपसात गमती जमतीच्या व निरागस हास्याच्या बैठकी होणे बंद झालेले असते कारण त्यांच्यातील संवाद संपलेला असतो. अशाप्रकारे अनेक कारणांनी घराला निराशाजनक वातावरणाचा सामना करावा लागत असतो. जर त्या घरास पूर्ववत नवचैतन्य मिळवायचे असेल. तर त्या घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या वर्तनाकडे लक्षकेंद्रीत केले पाहिजे. त्याचबरोबर स्वत:चे परीक्षण करून स्वत:मधील दोष जे त्या घरातील आनंदास मातीमोल करण्यास कारणीभूत आहेत. त्यांना ठरवून दूर करण्याची जबाबदारी सर्वस्वी स्वत:कडे घेतली पाहिजे.
ज्या घरात स्त्रियांचा आदर व सम्मान राखला जात नाही. अशाठीकाणी धार्मिकता टिकून राहू शकत नाही. कारण स्त्रिया अंतर्मनाने घराशी एकरूप झालेल्या असतात. त्या अत्यंत प्रेमाने व निस्वार्थ भावाने आपले स्वप्नातले घर उभारतात. त्यात मनाच्या शुद्धतेने संस्कारांचे सिंचन करतात. स्त्रिया एखाद्या झोपडीतही नंदनवन उभारू शकतात. परंतू त्यांना आपुलकीने जपणाऱ्या व त्यांच्या असण्याला महत्व देणाऱ्या आपल्या माणसाची सोबत पाहिजे असते. त्या आपल्या संसारासाठी वेळ पडल्यास उपाशी राहू शकतात. किंवा चटणी भाकरीवर समाधानी राहू शकतात. परंतू त्यांच्या कष्टांची दाखल घेणारी हक्काची व्यक्ती त्यांना पाहिजे असते. स्त्रिया आपले सर्वस्व अर्पण करण्यास स्वखुशीने तयार होतात. परंतू त्यांच्या भावनांचे मोल करणारा व सर्वतोपरी सुरक्षा प्रदान करणारा जोडीदार त्यांना पाहिजे असतो. त्या कोणत्याही अटी शिवाय आपले जीवन व्यतीत करू शकतात. परंतू त्यांच्या मनातील गुज शब्दाविना समजून घेणारा मनकवडा सोबती त्यांना पाहिजे असतो. त्या हलाखीच्या परिस्थितीचा हसत हसत सामना करू शकतात. परंतू त्यांच्यासाठी स्वत:ची प्रगती करणारा जीवनसखा त्यांना पाहिजे असतो. स्त्रिया आपल्या निरागस भावना आपल्या हक्काच्या माणसावर बिम्बवीतात. त्यामागे त्यांचा कोणताही स्वार्थी हेतू नसतो. परंतू जेव्हा घरातील माणसे स्त्रियांच्या मन भावनांचा सखोल विचार करणे बंद करतात. तेव्हा ते घर हळूहळू निष्प्राण होवू लागते.
ज्या घरातील पुरूष त्यांच्या अहंकारास इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त महत्व देतात. आपल्या वागण्याने घरात दहशतीचे वातावरण पसरविण्यात त्यांना अघोरी आनंद होत असतो. अशा घरांमध्ये कौटुंबिक सौख्यास ग्रहण लागते. पुरुषांचे पुरुषत्व ह्यातच असते कि त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या कुटूम्बास भावनिक आधार देवून व आपुलकीने सांभाळले पाहिजे. घरातील त्यांची वर्तणूक त्यांच्या स्थानाला साजेशी असली पाहिजे. पुरुषांनी आपल्या जोडीदाराच्या व मुलांच्या नजरेत आपल्यासाठी आदर दिसावा म्हणून कर्तुत्ववान बनले पाहिजे. त्यांनी आपल्या कुटूंबावर कोणताही दबाव न टाकता त्यांची साथ मिळविण्यासाठी विनम्र झाले पाहिजे. आपल्या माणसांना प्रेरित करण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन व त्यांच्या आवडी निवडी कडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तसेच त्यांना आनंदी करण्यासाठी आश्चर्यचकीत करणाऱ्या खास योजनांची अंमलबजावणी केली पाहिजे. कुटूंबाच्या सुखासाठी स्वत:चे आत्मपरीक्षण करून स्वत:मध्ये काही दोष आढळल्यास त्यांना दूर करण्याचा निश्चय करून परीवर्तनाकडे स्वखुशीने पाउल उचलले पाहिजे. घरात एखाद्या यंत्रमानवा सारखे न वागता समजूतदारपणे व प्रेमाने वागले पाहिजे. घरास सर्वदृष्टीकोनातून सुरक्षा प्रदान करून जोडीदाराशी सर्व गोष्टींची पारदर्शकता ठेवली पाहिजे. आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्य पूर्ण करतांना मनात दयाभाव ठेवला पाहिजे. पुरूष म्हंटला कि थोडाफार अहंकार त्यास शोभून दिसतो. परंतू अहंकारामुळे आपल्याच घरावर नांगर फिरविण्यात काहीच शाहाणपणा नाही. त्यापेक्षा पुरुषांनी आपल्या मनात एक हळवा कोपरा ठेवून आपल्या कुटूंबास मायेने जोपासावे. अन्यथा आपल्याच घरादारास निष्प्राण करण्यास ते स्वत:च कारणीभूत ठरतील.
आजच्या जगात नात्यांना औपचारीकतेने व भौतीकवादाने सांभाळण्याचे चलन आले आहे. त्यामुळे भावना, आपुलकी, प्रेम ह्या गोष्टींचे महत्व आपोआपच कमी झाले आहे. ह्याची प्रचीती आपल्याला आयुष्याच्या वळणावर वेळोवेळी होत असते. एकमेकांशी जुळून राहण्यासाठी आज अमाप माध्यमे असूनही प्रत्येकाचा प्रवास एकाकीपणे सुरू असतो. जो ह्या कठोर व नाटकी जगाचा एक भाग बनतो तो कायम असंख्य माणसांनी वेढलेला असतो. परंतू जो खऱ्या प्रेमाच्या व आपुलकीच्या शोधात निघाला त्याला काहीही निष्पन्न होत नाही. लोकांना त्याचे वागणे विचित्र वाटते. त्याला एकटे पाडून हसण्याचा व संवादाचा विषय बनविले जाते. त्याच्या मनातील वेदना कोणीही समजू शकत नाही. परंतू त्याला सल्ले देण्यास अनेक जण उभे राहतात. किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला त्याच्या परिस्थितीवर सोडून देण्यात येते. जेव्हा त्या व्यक्तीची अशाप्रकारे कोंडी करण्यात येते. तेव्हा ती व्यक्ती मनाने खचते. कारण त्या व्यक्तीच्या मनात चाललेली भावनांची वादळे उधाणलेली असतात. आतल्या आत थैमान घालत असतात. आणि कधीकधी त्या व्यक्तीस आपले जीवन संपविण्याच्या दिशेनेही घेवून जावू शकतात. त्यावेळी फक्त त्या व्यक्तीला त्याच्या विचलीत झालेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यास मदत करणाऱ्याची आवश्यकता असते. काही खास निमित्ताने एकत्र आलेली आपली माणसे पुन्हा आपल्या जगात परत फिरतात. परंतू कोणासही त्या व्यक्तीच्या मनातील वेदनांची भनकही लागत नाही. जर आपल्या आसपास एखाद्या आपल्याच माणसाची अशी केवीलवाणी अवस्था झालेली असतांना. जर आपण त्या व्यक्तीस धारेवर धरत असू किंवा त्या व्यक्तीबद्दल मत बनवून वागत असू तर घर आणि आपली माणसे ह्यांचे जीवनात काहीच महत्व असू शकत नाही. त्याचप्रमाणे मनं इतकी दुरावलेली असतांना सर्वांनी केवळ शरीराने एकत्र येण्यामागेही काहीच अर्थ उरत नाही. माणूस ह्या जगातून गेल्यावर त्याच्या जाण्याचे दु:ख व्यक्त करण्यासाठी सर्वजण एकत्र येतात. परंतू तोच माणूस जीवित असतांना जेव्हा कोणाच्या तरी भावनिक आधारासाठी तळमळत असतो. तेव्हा कोणीही त्याचा आधार बनत नाही. जर आपण नात्यांना इतके वरवर घेत असू तर घराची संकल्पना पूर्णपणे मोडकळीस आल्या शिवाय राहणार नाही.
घरात स्त्रियांचे जे स्थान असते त्याला बऱ्याचदा गंभीरतेने घेतल्या जात नाही. परंतू स्त्री ही घरास लाभलेली विशेष देणगी असते. कारण आपल्या घरासाठी तिने केलेल्या त्यागाची व कष्टांची तुलना होणे शक्य नाही. स्त्रिया अनेक नात्यांच्या चौकटीत राहून घरातील माणसांशी जुळलेल्या असतात. परंतू त्यांच्या हृदयातील माया व त्यांना सृष्टीने बहाल केलेले मातृत्वाचे लेणे हीच त्यांची खरी ओळख असते. तेव्हा घरातील स्त्रियांना गृहीत धरणे, त्यांना निर्जीव वस्तू प्रमाणे वागणूक देणे, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे अत्याचार करणे व त्यांच्या भावनांचा अनादर करणे हे कोणत्याही घरासाठी अत्यंत महागात पडू शकते. कारण जेव्हा आपण घराबाहेर असतो. तेव्हा संध्याकाळी घरात एक दिवा लावून घर प्रकाशाने उजळवून टाकणारी एक स्त्री घरात नसेल. तर घर अंधकारात कायमचे हरवून जाते. तेव्हा त्या पुण्यवान हातांचा कधीही आपल्याकडून अपमान होता कामा नये. त्या हातास आपल्या हातात घेण्या मागचा सखोल अर्थ प्रत्येक पुरुषास कळलाच पाहिजे. आपल्या घरातील स्त्रियांच्या अंतकरनातून निघालेले आशीर्वाद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी आपल्या अहंकारास मूठमाती देवून विनम्रता व आपुलकीचे भाव पत्करण्याची तयारी दाखविली पाहिजे. तरच त्यांच्या कर्तुत्वास यशाचे फळ प्राप्त होईल. परंतू ज्या घरातील पुरूषांना वेळेचे महत्व नसते, ज्यांच्या पाशी दूरदृष्टी नसते, ज्यांना आपल्या जबाबदाऱ्याची पूर्णपणे जाणीव नसते, आणि जे पूर्णपणे आत्मकेंद्री असतात अशा घरात सुख नांदत नाही. कारण दाबावपूर्ण वातावरणामुळे घरातील माणसांची मनं होरपळलेली असतात. जेव्हा घरात अशाप्रकारचे मानसिक वेदनांचे साम्राज्य पसरलेले असते. तेव्हा त्या घराने श्वास घेणे थांबविलेले असते.
1 . घराच्या उंबरठ्याच्या आत मर्यादांचे उल्लंघन
घर जरी चार भिंतींनी उभारले गेले असले तरी माणसांच्या असण्याने त्याला जिवंतपणा येतो. आपण आपल्या आवडी निवडीनी घरास सजवतो. घराचा कानाकोपरा स्वच्छ ठेवतो. त्यामागेही आपले मंगलमय विचार असतात. घराच्या अंगणास शोभा यावी म्हणून सडा सारवण करतो. हे सर्व करत असतांना आपल्या मनातील विचार घरातील माणसांच्या प्रगतीच्या दिशेने, सुख समृद्धी व भरभराटीच्या दिशेने, आरोग्याच्या दिशेने झेप घेत असतात. अशाप्रकारे उत्तम विचार, प्रेम विश्वास व कर्तुत्वाने घराचे नंदनवन होत असते. परंतू घरातील वारे विरुद्ध दिशेने वाहू लागले कि ह्या मर्यादांचे उलंघन होते. पुरुषांचे कर्तुत्ववान असणे व आपल्या घरास सुरक्षा प्रदान करणे त्या घराच्या नावलौकिकात भर घालते. परंतू त्या पुरुषास वेळेचे महत्व कळले नाही. त्याने आपल्यावर अवलंबून असणाऱ्या आपल्या कुटूम्बीयांना ओझी असल्याप्रमाणे भासवून दिले. घरात कोणत्याही कारणाने क्लेश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर घरातील वातावरणात तणाव निर्माण होतो. तसेच घरातील स्त्रियांनी त्यांच्या घरातील स्थानाचे महत्व जाणून वागले तर घर कधीही मर्यादा सोडत नाही. कारण आपल्या शालीनतेने घराचे पावित्र्य जपणे हे सर्वस्वी घरातील स्त्रीच्या हाती असते. जेव्हा घरातील प्रत्येक सदस्यास त्यांच्या जबाबदारी ची स्वत:हून जाणीव असते. तेव्हा ते घर विश्वासास पात्र ठरते. त्याचप्रमाणे जेव्हा घर अशाप्रकारच्या लहान लहान परंतू अति महत्वपूर्ण गोष्टींनी समृद्ध असते. तेव्हा घरातील सकारात्मक उर्जा बाहेरच्या जगातही प्रतीबीम्बीत होते. जर आपल्या घरातून ह्याची प्रचीती येत नसेल तर घराच्या उंबरठ्याच्या आत मर्यादांचे उलंघन झाले आहे असे समजावे.
2 . मनातील भावनांची कोंडी करण्याचा प्रयत्न
आपल्या मनात भावनांचे साम्राज्य असते. त्याचबरोबर त्या भावना वेळोवेळी व्यक्त होणेही महत्वाचे असते. आपुलकीने केलेली भावनांची आदान प्रदान नात्यास आजीवन टिकवून ठेवते. तसेच नात्यांमधला अपेक्षांचा डोंगर कमी करून त्या नात्यास मैत्रीत रुपांतरीत करते. परंतू जेव्हा अनेक कारणांनी घरात तणाव पूर्ण वातावरण निर्माण होते तेव्हा सर्वप्रथम भावनांची कोंडी होते. कारण माणसा माणसातील संवाद संपतो. त्यामुळे त्यांच्यात गैरसमजांना पाळमू ळ फुटतात. नात्याची सुंदरता जपली जात नाही. कोणासही आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी भावनिक व मानसिक आधार मिळत नाही. अशावेळी घरात स्मशान शांतता पसरते. प्रत्येक जण मनातल्या मनात कुढत असतो. प्रत्येकास खूप बोलायचे असते परंतू ऐकण्यास मात्र कोणीही तयार नसते. घरात होणाऱ्या लहान लहान वाद विवादांचे गंभीर भांडणात रूपांतरण होते. त्यामुळे देवालयाला रणांगणाचे स्वरूप प्राप्त होते. घरातील देवघरात ठेवलेल्या देवांच्या मुर्त्यांची नित्यनियमाने पूजा अर्चना केली जाते. परंतू आपल्याच माणसांच्या हृदयातील वेदनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते. ज्या ठिकाणी अशाप्रकारे भावनांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण त्याआड आपल्या कमतरता लपवीन्याचा कोणाचातरी स्वार्थी हेतू असतो. अशाठीकानी घराची सकारात्मकता भंग पावते. कारण मनं समाधानी असणे व समाधानी मनातून आशीर्वाद बाहेर पडणे बंद झालेले असते. अशाप्रकारे एखाद्याच्या भावनांची कोंडी करणे हे त्या घरास निष्प्राण करण्यास कारणीभूत असलेले अत्यंत निष्ठूर कारण असते.
3 . शब्दांचा वरवरचा खेळ
बऱ्याचदा कोणत्याही नात्यात दुरावा ह्यामुळे निर्माण होतो कि त्यात आपुलकी व हक्काच्या जागी मन राखण्यासाठी जपून जपून शब्दांचा वापर केल्या जातो. समोरच्याला समजून घेण्या ऐवजी त्याच्या क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला जातो. नात्यास औपाचारीकतेने हाताळले जाते. तसेच त्या नात्यातील स्वातंत्र्य हिरावून त्याला अपेक्षांच्या चौकटीत बसविले जाते. अशाप्रकारे त्या नात्यात तणाव निर्माण होतो. कारण जेव्हा दोन वेगवेगळी व्यक्तीमत्व असलेल्या जीवांमध्ये नाते जन्म घेवू लागते तेव्हा सखोल समजूतदारपणा अपेक्षित असतो. जेणेकरून नाते निभावण्यासाठी कोणाचीही फरफट होता कामा नये. त्याचबरोबर दोघांच्याही व्यक्तीगत नात्याबरोबर त्याना आपआपल्या स्वत:बरोबरच्या नात्यालाही न्याय देता आला पाहिजे. जेव्हा आपल्या जोडीदारास स्वत:बरोबर वेळ घालवायचा असल्यास त्या संबंधी गैरसमज न करता जोडीदाराची ती गरज आपल्याला समजून घेता आली पाहिजे. जेव्हा शब्दांची आवश्यकता नाही तेव्हा केवळ आपल्या कृतींनी व समजून घेण्याने जोडीदाराची साथ निभावता आली पाहिजे. जेव्हा कोणत्याही घरांमध्ये आपल्या माणसांची मानसिकता अशाप्रकारे सांभाळली जात नाही. तेव्हा काही काळानंतर नाते निरस होवू लागते. त्यासोबत प्रेम व आपुलकी शिवाय ते घर निष्प्राण होवू लागते.
4 . मत्सर व अहंकाराचे साम्राज्य
कुटूंब प्रमुखाचे मन प्रेमाने व आपुलकीने व्यापलेले असले पाहिजे. त्याचप्रमाणे कुटूंब ही सर्वस्वी आपली जबाबदारी समजून त्याने कुटूम्बास भावनिक व आर्थिक सुरक्षा प्रदान केली पाहिजे. त्यासाठी तो अहंकारी नाही तर विनम्र असला पाहिजे. तरच तो आपल्या कुटूंबाचे मन जिंकण्यात यशस्वी होवू शकतो. त्याचबरोबर त्याने आपली प्रगती करण्यासाठी झटले पाहिजे. त्याने कोणत्याही कधीही न बदलता येवू शकणाऱ्या सवयींमध्ये न अडकता कायम परिवर्तनशील राहिले पाहिजे. स्वत:च्या चुका मनापासून मान्य करून त्यासाठी त्याला दिलगीरी व्यक्त करता आली पाहिजे. त्याला आपल्या माणसांवर कोणताही दबाव न टाकता प्रोत्साहित करता आले पाहिजे. त्याने स्वत:ला आदर्शवादाच्या चौकटीत बसवून आपल्या माणसांसोबतच्या संबंधांमध्ये औपचारिकता न आणता त्यांच्या मनातील घालमेली, भीती ह्या गोष्टींना त्यांच्या जागी राहून समजून घेतले पाहिजे. तसेच प्रत्येकवेळी त्याने त्यांना भारी भरकम सल्ला न देता केवळ प्रेमाने त्यांच्या डोक्यावर मायेने हात ठेवून त्यांच्या मनातील वेदना शांततेने जाणून घेतल्या पाहिजे. अशाप्रकारे एक कुटूंब प्रमुख कर्तव्यदक्ष नेतृत्व करणारा असला पाहिजे. तसे झाले नाहीतर कुटूंब एकसूत्र राहत नाही. आणि प्रत्येकजण ज्याला जी दिशा योग्य वाटेल त्या दिशेने चालू लागतो. घरात विचारांची एकजूट राहत नाही आणि घरं निष्प्राण होतात.
आयुष्यभर प्रत्येकास घराची ओढ ह्यासाठी असते कारण घरात जे वेगळेपण आहे ते अन्य कोठेही मिळत नाही. आणि ते वेगळेपण केवळ निस्वार्थ प्रेमाने निर्माण झालेले असते. जेव्हा आपण आयुष्याप्रती आपली कर्तव्य पूर्ण करण्यासाठी जगाचा सामना करण्यास निघतो. तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला ह्या महत्वपूर्ण गोष्टीची प्रचीती येते. जग फसवे आहे, जग कठोर आहे, जग आपल्या मनास भुरळ पाडणारे आहे परंतू घरास केवळ प्रेम जिव्हाळा आपुलकी ह्या गोष्टी कळतात. घर आपल्याला स्वातंत्र्यही देते तरीही संस्कारांच्या नाजूक तारेने बांधूनही ठेवते. म्हणूनच आपण जगाच्या पाठीवर कोठेही असलो तरी आपली पावले नकळतपणे आपोआप घराकडे वळतात. तेव्हा प्रत्येकाच्या मनात घराची संकल्पना कायम अशीच राहिली पाहिजे. कोणत्याही विपरीत गोष्टींनी घराने आपले प्राण गमावता कामा नये.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)