
साधारणपणे दोन व्यक्तीमध्ये आपसात संवाद होण्यासाठी किंवा संभाषण होण्यासाठी भाषेची गरज भासत असते. कारण त्याशिवाय आपल्यात विचारांची आदान-प्रदान होणे अशक्य असते. आपण लहान असतांना जेव्हा बोबडे बोल उच्चारने शिकतो. तेव्हा सुद्धा त्याची सुरवात आपल्या मातृभाषे पासून होते. परंतू त्याही पूर्वी आपण प्रेमाची, मायेची, वात्सल्याची अबोल भाषा अवगत केलेली असते. जी आपल्या आईच्या स्पर्शातून आपल्याला कळालेली असते. त्याचप्रमाणे जी आईच्या लाड-कौतुकातून आपल्या जीवनाची गोड सुरवात करत असते. तसेच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिच्या आठवणींच्या स्मरणाने आपल्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. तर कधी आपल्या पाठीवर शाब्बासकीची थाप पडते. एक अशी भाषा जी बोलाणाराही कोणी नसतो आणि आपल्याला ऐकूही येत नाही. परंतू तरीही अंतर्मनाच्या माध्यमातून आपण तिला अनुभवत असतो. कारण त्यामागे दडलेले अतुलनीय प्रेम आपल्या हृदयाला स्पर्श करत असते.
आपल्याला जगाशी जुळण्यासाठी वेगवेगळ्या भाषा बोलता येणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे भाषेच्या ज्ञानामुळे आपण जगाच्या काना-कोपर~यात पोहोचण्याचा विचारही करू शकतो. शिक्षणाच्या माध्यमातून विविध भाषा शिकत जाण्याच्या मागचा हेतू देखील हाच असतो. भाषेवर प्रभुत्व असल्याने आपल्याला आपल्या कारकीर्दीत अडथळा निर्माण होत नाही. आपण जगभर आपल्या ध्येयाची मूळ पसरवू शकतो. कारण भाषा बोलता येत असल्याने लोकांपर्यंत आपले ज्ञान विस्तारीत करता येवू शकते. म्हणूनच आज इंग्रजी भाषेस अतोनात महत्व प्राप्त झाले आहे. त्याच दृष्टीकोनाने घरा-घरांमध्ये मुलांना इंग्रजी भाषेचे शिक्षण देण्याचे चलन आले आहे. त्यासाठी कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसातील दैनंदिन संवादही इंग्रजीतूनच केले जातात. मुलांना मोठे करत असतांना पालकांकडून केवळ इंग्रजी भाषा बोलता येण्यावर जास्तीत जास्त दबाव टाकण्यात येतो. त्यासाठी त्यांना महागड्या इंग्रजी शाळांमधून शिक्षण दिले जाते. आणि मुले सराईतपने इंग्रजी बोलू लागली कि पालकांना गड सर केल्यासारखा भरभरून आनंदही होतो. कारण उत्तम इंग्रजी बोलता येणे हा त्यांना सामाजिक प्रतिष्ठेचा भाग वाटत असतो. त्याचप्रमाणे माणुसकीला जपणारी प्रेमाची अबोल भाषा आपल्या मुलांना बोलता यावी. असे कटाक्षाने प्रत्येक पालकास वाटणेही आवश्यक आहे.
आपले विविध भाषांवर प्रभुत्व असणे हे आपल्या आत्मविश्वासात भरच घालत असते. तरीही आपली मातृभाषा ही आपल्यासाठी सन्माननीय असते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण परदेशात असतो. तसेच आपल्या माणसांच्या आठवणीने व्याकुळ झालेलो असतो. तेव्हा जर क्वचित कोणाच्या तोंडून आपल्याला आपली भाषा ऐकावयास मिळाली तर आपल्या आनंदास सीमा उरत नाही. ह्यावरून हे लक्षात येते कि आपण कितीही जगाला आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला तरी आपण आपल्या घरात व आपल्या माणसांमध्येच विसावतो. कारण मायेच्या माणसांचा जिव्हाळा फक्त आपल्याला घरातच मिळतो. त्याचप्रमाणे जगातील प्रत्येक भाषेचा मुलभूत पाया म्हणजे प्रेम असते. त्याचबरोबर प्रेमाची अबोल भाषा संपूर्ण सृष्टीस अवगत असते. कारण प्रेमाची भाषा सभ्यतेचे आचरण करण्यास शिकविते. तसेच ती कधी सेवेतून, कधी त्यागातून, कधी दयेतून, कधी काळजी घेण्यातून, कधी समजून घेण्यातून, कधी मदतीतून तर कधी विश्वासातून व्यक्त होत असते. दोन व्यक्तींच्या आपसातील संबंधातूनही तिचे स्वरूप कळते. कारण दोघांपैकी एक आंधळा किंवा मुकबधीर असल्यास केवळ संवादापुरती भाषा वापरून चालत नाही. तर भाषेसोबत अंतकरणातील ओलाव्याचीही आवश्यकता असते. तरच एक माणूस म्हणून समोरच्याला समजून घेण्यात आपण कमी पडत नाही. त्या व्यक्तीच्या शारीरिक अपंगत्वा पलीकडे जावून आपण त्याला समजून घेवू शकतो. अशाप्रकारे दोन व्यक्तींमधील संबंधात त्यांच्यातील उणीवा, पेशा, जात-धर्म, गरीब-श्रीमंत असे अडथळे निर्माण होत नाहीत. तर हृदयाला स्पर्श करणारी माणुसकीची भाषा वाढीस लागते.
निसर्गाचे जर आपण निरखून निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल कि निसर्ग हा बहुगुणांनी समृद्ध आहे. आपण त्याच्याकडून विशालता, संयम, चिकाटी, सखोलता, शिस्तबद्धता, नियमबद्धता, निरपेक्षता, तठस्थता अशा सर्वव्यापी गुणांना आत्मसात केले पाहिजे. कारण निसर्गाकडून लाभलेले हे बहुमूल्य जीवन एकेदिवशी निसर्गाकडेच परत जाणार आहे. तेव्हा आपला जीवनप्रवास नैसर्गिक गुणांनी समृद्ध करून तसेच शाश्वत सत्याचा स्वीकार करूनच आपण जीवनाकडे पाहिले पाहिजे. तरच आपण कोणत्याही परिस्थितीत तठस्थ राहून विचार करू शकतो. अन्यथा पावलोपावली दु:खाचा अनुभव घेवून आपले जगणे अवघड होते. निसर्गाचा भाग असलेल्या इतर घटकांना आपल्यासारखे भाषेच्या माध्यमातून व्यक्त होता येत नाही. निसर्गाच्या ह्या किमयेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कारण त्यांना समजून घेण्यासाठी त्यांच्यात व आपल्यात केवळ संवाद होणे हेच एकमेव माध्यम नाही. तर निरीक्षणातून व अबोल प्रेमातून आपण त्यांना समजू शकतो. कारण त्या भाषेत स्पर्श असतो तसेच काळजी घेणेही असते. आपण आपल्या अंतर्मनात प्रेम जागृत केल्यास त्यांच्या वेदना आपल्या काळजास भिडू शकतात. आपण त्यावर उपाय योजना करून त्यांची मनापासून निगा राखण्याच्या माध्यमातून आपले प्रेम त्यांच्या पर्यंत पोहोचवू शकतो.
काही निर्दयी लोक आपल्या घरातील पाळीव प्राण्यास त्याच्या पासून काही अपाय झाल्यास त्याला विष देवून जीवानिशी मारून टाकतात. त्या निर्दोष प्राण्यास आपल्या जीवनातून घालवून देण्याचा तो अत्यंत सोपा उपाय त्यांना वाटत असतो. त्याचप्रमाणे आपल्या घराच्या बाल्कनीत लावलेली शो ची रोपटी जी आपल्या भौतिक प्रतिष्ठेत भर घालण्यासाठी असतात. कारण आपल्या पाशी त्यांना बघण्यास, त्यांना गोन्जारन्यास तसेच मायेचा स्पर्श करण्यास वेळ नसतो. त्यांना आलेली फळ व फुल बघून आपल्याला कौतुक वाटत नाही. आपल्या शरीरात जे प्राण जीवन आहे तेच निसर्गातील प्रत्येक सजीव घटकात सुद्धा असते. तेव्हा त्यांच्या सांनिद्ध्यात वेळ घालवून, त्यांना पोषक तत्वे देवून व त्यांना संगीत ऐकवूण हळूवारपणाने जपले पाहिजे. प्रेमाची ही अबोल भाषा आपण अंगीकारली तर निसर्गातील प्रत्येक घटकाशी आपले घनिष्ट नाते निर्माण होवू शकते. वाघ सिंह ह्यासारख्या हिंसक प्राण्यांनाही केवळ आपल्या प्रेमाने व विश्वासाने जर जिंकता येत असेल तर घरातील पाळीव प्राण्यांना विष टाकून संपविण्याची पावलं उचलतांना आपल्याला काहीच कसे वाटत नाही. आपण आपल्याच मनात भीतीचे, स्वार्थाचे व अमानुषपणाचे सावट निर्माण करतो. जे आपल्या हृदयातील प्रेमावर मात करते. आणि आपण त्या निरागस प्राण्यांपेक्षा जास्त हिंसक होवून त्यांचा नायनाट करण्याचा सोपा मार्ग निवडतो.
नुकत्याच जन्मलेल्या बाळाला त्याच्या आईच्या हृदयाचे ठोके परिचित असतात. काही कळत नसतांनाही तो फक्त आईच्या स्पर्शालाच प्रतिसाद देत असतो. कारण जन्म घेण्यापूर्वी तो तब्बल नऊ महिने केवळ आईशीस जुळलेला असतो. म्हणूनच आई व बाळा दरम्यान अतूट बंध निर्माण होतात. जेव्हा तो ह्या अनोळखी जगात पहिले पाउल ठेवतो. तेव्हा आई व्यतिरीक्त अन्य कोणासही ओळखत नाही. त्या नऊ महिन्यात तो आईशी तिच्या कल्पनेतून, तिच्या अबोल प्रेमाच्या भाषेतून, तिला लागलेल्या डोहाळ्या मधून संपर्कात असतो. म्हणूनच जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा एका स्त्रीचाही आई म्हणून पुन्हा जन्म होतो. आईच्या सामर्थ्याला व क्षमतांना सीमा नसते हेच अंतर एका सामान्य स्त्रि व एका आईत असते. आई ही देवाची विलक्षण निर्मिती असते. कारण आई व बाळाचे नाते अतूट विश्वासावर विसंबून असते. आई नऊ महिने आपल्या उबदार कुशीत बाळाला सुरक्षा प्रदान करत असते. आपल्या आहारातून त्याचे भरण पोषण करत असते. हा मोलाचा विश्वास घेवूनच बाळ ह्या जगात जन्म घेते व आजीवन त्याच विश्वासास जगात शोधत असते. परंतू आईच्या विश्वासाची व तिच्या अबोल प्रेमाची सर कशालाही येत नाही. ह्या गोष्टीची प्रचीती त्याला पदोपदी होत असते. म्हणून आई त्याच्यासाठी कायम सर्वात श्रेष्ठ असते व त्याच्या जीवनात तिचे एकमेव स्थान असते.
आज आपण आधुनिक जगात वावरत आहोत. तेव्हा विकसित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक भाषा बोलता येण्याचे कौशल्य आपण अवगत करू शकतो. तसेच आपली भाषा अन्य प्रांतातील किंवा देशातील भाषेत भाषांतरीत करून आपले ज्ञान, आपले विचार व समस्या जगापर्यंत पोहोचवू शकतो. परंतू प्रेमाची भाषा अबोल असते. तिला कोणत्याही तंत्रज्ञानाची आवश्यकता नसते. कारण ती सेवाभावातून सर्व प्राणीमात्रा पर्यंत पोहोचविता येते. तिला सेवेतून आपल्या व्यक्तीगत स्वार्थाच्या हस्तक्षेपाशिवाय एखाद्या व्रताप्रमाणे अनुग्रहित करता येते. तिला निरपेक्ष मदतीतून जनमानसांपर्यंत पोहोचविता येते. तिला शिक्षणाचा वारसा असे स्वरूप देवून तळागळातील लोकांपर्यंत पोहोचविता येते. तिला विश्वासाच्या स्वरूपात मना मनात जागृत करता येते. तिला आनंद बनवून प्रत्येकाच्या आयुष्यात पेरता येते. अशाप्रकारे प्रेमाची भाषा वेगवेगळ्या स्वरूपात व वेगवेगळ्या मार्गांनी मोलाचे कार्य करत असते. ती अबोल असली तरी संपूर्ण सृष्टी तिला समजू शकते. जी केवळ बोलण्यातून नाही तर ऐकण्यातून, निरीक्षणातून, स्पर्शातून समजली जाते. म्हणून तिचे स्थान कायम श्रेष्ठ असते. ती आपल्या सभ्य आचरणावर लक्ष केंद्रित करते. माणसा माणसातील माणुसकीचे नाते जपते. ती माणसाची ओळख माणुसकीने करते. जातीभेदावरून, गरीब श्रीमंती वरून, माणसाच्या पेशावरून, वर्ण भेदावरून गणना करत नाही. म्हणून प्रेमाची अबोल भाषा तंत्रज्ञानाशिवाय व तिचे कोणतेही शिक्षण घेतल्याशिवाय प्रत्येकास कळते.
1 . प्रेमाची अबोल भाषा ही दृढ विश्वासावर आधारीत असते.
प्रेम हा शब्दच इतका व्यापक आणि प्रगाढ आहे कि त्यामुळे प्रत्येकाच्या मनात विश्वास निर्माण होतो. हा अतूट विश्वासच कोणत्याही नात्यास श्रेष्ठ बनवित असतो. मग ती व्यक्ती इतरांच्या नजरेत असभ्य असली, बेजबाबदार असली तरी आपले अबोल प्रेम तिच्या खोलवर दडलेल्या खर~या रूपाची पारख करण्यास चुकत नाही. त्या व्यक्तीने आपले अस्सल व्यक्तीमत्व जगापासून लापावीन्यामागेही असंख्य कारणे असतात. त्या कारणांची शहानिशा केवळ प्रेमाच्या अबोल भाषेनेच होवू शकते. जगाने वाईट असे घोषित केलेल्या व्यक्तीस मात्र अबोल प्रेम व्यक्त करण्याच्या विविध भाषा ठाऊक असतात. प्रेमाखातर जगणे व प्रेमासाठी स्वत:ला पुन्हा एकदा सभ्यतेच्या मार्गावर आणणे. तसेच प्रेमालाच आपल्या आयुष्याचे महत्वपूर्ण ध्येय समजून ते पूर्ण करण्यासाठी धडपडत राहणे. ह्याशिवाय त्या व्यक्तीस कोणतेही भानच उरत नाही. प्रेमाची अबोल भाषा आसक्ती, अपेक्षा अशा गोष्टींना दूर सारून केवळ काळजी घेवून व भावनांना जपून नाते जोपासते. तसेच जीवावरचे संकट आले असतांनाही हातातील आपल्या माणसाच्या हाताची पकड सैल होवू देत नाही. जीवन मरणाच्या पलीकडे जावून अंतर्मनाशी अंतर्मनाचे ऋणानुबंध जोडले जातात. म्हणूनच प्रेमाची भाषा अबोल भासते.
2 . प्रेमाची अबोल भाषा जीवनास व्रताचे स्वरूप देते.
प्रेमास कोणत्याही व्यक्तीच्या शरीर रूपात असल्याने किंवा नसल्याने काहीही फरक पडत नाही. कारण प्रेमाची अबोल भाषा खोलवर रुजलेली असते. शरीरास मृत्यू येणे हे शाश्वत सत्य स्वीकारूनच प्रेम पुढे जात असते. जोडीदाराचा मृत्यूच्या मागच्या कारणासही आपल्या उर्वरीत जीवनात व्रतासारखे घेतले जाते. त्या कारणांवर तोडगा काढण्यासाठी आपल्या संपूर्ण जीवनाचा त्याग करण्यात येतो. ह्या अबोल प्रेमाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ‘दशरथ मांजी’ हे गृहस्थ होते. ज्यांनी विशाल पहाडास खोदून मार्ग बनविला. त्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याची तब्बल वीस वर्ष हे अतिशय कठीण कार्य कोणाच्याही मदतीशिवाय निरंतर सुरू ठेवले. त्यामागे केवळ एकच प्रेरणा होती ती म्हणजे त्यांची मृत पत्नी. तिच्या मृत्यूच्या मागचे कारणही तो पहाडाच होता. पत्नीच्या मृत्यूमुळे व्यथित होवून त्या गृहस्थांनी निर्जीव पहाडास आव्हान केले. आणि तहान भुकेची, उन पावसाची पर्वा न करता निर्धाराने पहाडास चिरून मार्ग बनविला. त्या गृहस्थांच्या ह्या अत्यंत धाडसी कृत्याने त्यांना अजरामर केले. प्रेमाची अबोल भाषा कधीही संपुष्टात येत नाही ती कायम जिवंत असते आणि प्रेरणा देत असते हे उदाहरण त्याचे प्रतीक आहे.
3 . प्रेमाची अबोल भाषा प्रवाहाला बदलण्याचे आव्हान स्वीकारते.
प्रवाह हा आपल्यासाठी आरामस्थितीचे क्षेत्र निर्माण करत असला तरी आपला महामार्ग निर्माण करण्यास आपल्याला तीव्र मज्जाव करत असतो. त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध जावून काही करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. एकप्रकारे हा क्रांती आणण्यासाठी दिलेला लढा असतो. जो जातीपातीने बरबटलेल्या भ्रामक समजुती, रूढी परंपरा, कर्तबगार मुलींच्या आयुष्याला ग्रहण लावणारी हुंडा पद्धती, मुलींना स्वबळावर उभे राहण्यापासून थांबविणारी पुरुषप्रधान संस्कृती ह्या सर्व गोष्टींच्या विरोधात असतो. प्रेमाच्या भाषेत अशा प्रवाहाला वेढून असलेल्या गोष्टींचा विरोध करण्याची क्षमता असते. कारण प्रेमाची भाषा अबोल असली तरी सामर्थ्यशाली असते. तसेच ती निरीक्षण करते, गोष्टींना सखोल समजून निर्णय घेते आणि बदलांचे होणारे दूरगामी उत्तम परिणाम तिला ठाऊक असतात. प्रेमाची अबोल भाषा हिम्मत प्रदान करते. तसेच निष्ठूर झालेली मन प्रेमाने वितळवून कोणत्याही गोष्टीचा शेवट आनंददायी करते.
4 . प्रेमाची अबोल भाषा स्वपरिवर्तनास महत्व देते.
प्रेमाची अबोल भाषा व्यक्त करण्याच्या विविध मार्गांमध्ये स्वकृतीतून व स्वपरिवर्तनातून आपल्या माणसात अपेक्षित बदल घडवून आणण्याचा मार्ग सर्वात जास्त प्रभावी असतो. कारण आपल्या माणसावरची अपार माया आपल्याला त्याला वाममार्गावर जातांना बघू देत नाही. तसेच त्याच्याप्रती कठोरही होवू देत नाही. अशावेळी फक्त एकच मार्ग आपल्या समोर उरतो तो म्हणजे अपेक्षित परिवर्तन स्वत:मध्ये आणणे. ही आपल्या व्यक्तीमत्वाची परीक्षाच असते. त्यामागे एक पवित्र उद्देश असतो. जो तडीस गेला कि आपले आपल्या माणसाप्रती असलेले कर्तव्य व आयुष्य सत्कारणी लागते. कारण त्यामधून मिळालेले मानसिक सुख हे आणखी कशातही सापडत नाही. जिथे हिंसा व बळजबरीचे मार्ग उपयोगी पडत नाहीत. तिथे हा प्रेमाचा व शांततेचा मार्ग असरकारक असतो. कारण हिंसेच्या स्वरूपात शिक्षा देण्याने शरीरास यातना होतात. परंतू आत्मसम्मानास तडा जातो. स्वपरिवर्तनाचा मार्ग मात्र आत्मसम्मान व आत्मविश्वास ह्या दोन्ही गोष्टी राखतो. म्हणूनच प्रेमाची ही अबोल भाषा मोठ मोठी परिवर्तने आणण्यास कारणीभूत ठरते.
प्रेमाची अबोल भाषा ही संपूर्ण सृष्टीची भाषा आहे. तिच्या अस्तित्वाने शांततेतही ध्वनी निर्माण होतो. मनाला शब्द फुटतात. डोळे बोलू लागतात. स्पर्शातील संवेदना जाणवू लागते. आई व बाळ एकमेकांपासून दुरावल्यास त्याची व्याकुळता वातावरणात पसरते. त्यामुळेच प्रेमाची भाषा सर्वव्यापी व अजरामर होते. मृत्यू तिला संपवू शकत नाही. कोणतेही वादळ तिला थोपवू शकत नाही. कोणत्याही दुष्ट प्रवृत्तींना, अमानुष चालीरीतीन्ना ती घाबरत नाही. ती धाडसी असते. प्रवाहाच्या विरुद्ध जावून आपला महामार्ग बनविते. कारण ती विनम्रतेतील महानता जाणते. म्हणून प्रेमाची अबोल भाषा सर्व भाषांमध्ये श्रेष्ठ असते.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)