जीवनाचे मुल्यमापन

 जीवन सुंदर आहे. किंबहुना ज्याला जीवनाचा खरा अर्थ कळला तो इतरांच्या जीवनाला मुल्य जोडून जीवनाला आणखीच सुंदर बनवीतो. परंतू आजच्या काळात जो तो प्रत्येक गोष्टीत आपला नफा शोधत असतो. त्या गोष्टीं मागचा समाजव्यापी व राष्ट्र्व्यापी दृष्टीकोन बघण्यास कोणाकडेही वेळ नाही. तरूण पिढी शिक्षणाचे क्षेत्र निवडतांना  त्याची आता किती मागणी आहे हा विचार सर्वप्रथम करत असते. त्याचप्रमाणे नोकरी मिळण्याची शाश्वती, सामाजिक प्रतिष्ठा आणि इच्छा आकांक्षा व स्वप्नांची यादी ह्या सर्व गोष्टींचाही सारासार विचार केला जातो. एकंदरीत त्या शिक्षणाचा त्यांच्या आयुष्याला पूरेपूर उपयोग व्हावा एवढाच सीमित व आत्मकेंद्री त्यांचा  हेतू असतो.

  जगात फार कमी असे लोक असतात जे एका महान हेतू साठी शिक्षणाचे  क्षेत्र  निवडतात. ते इतरांच्या आयुष्यातील वेदना बघून व्याकूळ होतात. तसेच घेतलेल्या शिक्षणाच्या आधाराने परोपकाराच्या मार्गावर चालू लागतात. कोणी डॉक्टर होवून ग्रामीण भागातील लोकांना कमीत कमी शुल्कात सेवा प्रदान करतात. कोणी मिल्ट्रीत प्रवेश घेवून देशसेवेसाठी स्वत:चे योगदान देतात. कोणी ग्रामीण भागात मतीमंद मुलांना सुशिक्षीत करण्यासाठी झटतात. कोणी आपल्या जन्म घेण्यासाठी कृतज्ञ राहून आपल्या देशबांधवांची आपल्या हातून विवीध मार्गाने सेवा व्हावी अशा परोपकारी विचारांनी भारावलेले असतात. परंतू असे विचार आता फारच दुर्मीळ झालेत. कारण असे विचार आपल्या मनात जोपासण्यासाठी इतरांच्या वेदनांची कळ आपल्याला जाणवावी लागते. त्याचबरोबर उंच स्तरीय स्वाभिमान हृदयात असावा लागतो. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात क्रांतीकारकांच्या अंगी तो मानी कणखर बाणा होता. म्हणूनच ते त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याचा त्याग करून देशव्यापी चळवळीत सहभागी होवू शकले. देशबांधवांच्या वेदना संपुष्टात आणण्यासाठी गरज पडल्यास उपाशी राहूनही ज्ञानार्जन करत राहीले. आपल्या हातून घडणारे प्रत्येक कार्य देश हितार्थ घडावे असेच त्यांना वाटत असे. त्यामुळे ज्ञानार्जनाच्या मागचा व्यापक दृष्टीकोन ते स्वत:च्या स्वार्थापुरता सिमीत करू शकले नाहीत. म्हणूनच आपल्या सेवेतून व त्यागातून ते देशबांधवांच्या जीवनात मुल्य जोडण्यास यशस्वी ठरले.

  आज समाजात पैस्याने श्रीमंत असलेल्यांची भर पडली आहे. कारण जगण्यात स्पर्धांची तीव्रता वाढली आहे. संपत्तीचा साठा करून भौतिक श्रीमंती वाढवीणे हा शक्तीशाली हेतू लोकांच्या विचारात रूजत चालला आहे. कारण भौतिक श्रीमंतीवरून समाजात माणसाची प्रतिष्ठा ठरवीण्यात येवू लागली आहे. कोणत्याही पेश्याच्या मागची सेवेची भावना जावून त्यास पैसे लुटण्याचे साधन बनवीले गेले आहे. ज्याच्यापाशी जास्तीत जास्त पैसा खर्च करण्याची क्षमता आहे त्यास उत्तमातल्या उत्तम सेवेचा लाभ घेता येतो. परंतू जो पैस्याने कमजोर आहे त्याला इलाजावाचून प्राण गमवीण्याचीही वेळ येते. कारण पैस्याला कोणाच्या बहुमूल्य प्राणांपेक्षा जास्त महत्व प्राप्त झाले आहे. माणसा माणसातील माणुसकीचे नाते लोप पावत चालले आहे. त्यामुळेच समाजात गरीब श्रीमंतीची दरी निर्माण झाली आहे. एखाद्या माणसाला त्याच्या आंतरीक गुणांवरून महत्व दिल्या जात नाही. तर त्याची श्रीमंती, जात धर्म ह्यावरून त्याच्या माणूस असल्याचे मुल्यमापन केले जाते.  इतरांसाठी धावून जाणे, मदत करणे, सेवा करणे ह्या गोष्टींवरचा विश्वास कमी होतांना दिसतो. कारण आज प्रत्येक गोष्ट विकली जाते आणि ती पैस्याने खरेदी केली जाते. कोणिही इतरांच्या गरजांचा विचार करत नाहीत. तर सर्वप्रथम स्वत:च्या आरामदायक जीवनशैलीचा विचार करत असतात. आपल्यामुळे इतरांना त्रास झाल्यास त्याची त्यांना कदापीही पर्वा नसते. परंतू इतरांमुळे आपल्याला झालेला त्रास खपवून घेतला जात नाही. परंतू माणूसकी जपण्यास कोणत्याही मोठ्या उलाढालींची आवश्यकता नसते. आपल्या वागन्या बोलण्याचे इतरांवर काय परीणाम होतात. फक्त ह्याचा विचार करायचा असतो. आपल्या वर्तनाने कोणाचे मन दुखावले जाणार नाही हे ध्यानात ठेवायचे असते. ह्याच साध्या सरळ मार्गाने इतरांच्या जगण्यात मुल्य जोडत जायचे असते.

   आज माणसाने आपल्या स्वार्थीपणाच्या सिमा ओलांडल्या आहेत. ज्यात त्याचे हीत नाही अशा कोणत्याही गोष्टी कितीही माणुसकीशी निगडीत असल्या तरी तो करत नाही. त्याचे सर्व विचार स्वत:च्या सभोवताल फिरत असतात. फक्त मी वर येवून थांबतात. परंतू ह्या भव्य सृष्टीत माणूस मात्र एक सुक्ष्म कण आहे. अशा असंख्य सुक्ष्म कणांना मिळून माणसांचे विश्व निर्माण झाले आहे. ह्याचा अर्थ हा होतो कि त्यामधला प्रत्येक कण महत्वाचा आहे. मग माणसा माणसा मध्ये ही भिन्नतेची दरी कशी निर्माण झाली. स्वत:चा विचार करत असतांना माणूस इतका स्वार्थी का होतो. प्रत्येकाला त्यांच्या मधला मी इतका महत्वाचा का वाटतो. अशी अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.

  एक चिमणी तिचे व तिच्या पिल्लांचे पोट भरण्यासाठी संपुर्ण दिवस धडपडत असते. परंतू दुसर्‍या दिवसाचा विचार करून ती काहिही साठवीण्याचा प्रयत्न करत नाही. कारण तिला विश्वास असतो कि उद्द्याही तिच्या कष्टांना प्रतिसाद मिळेल आणि ती आपल्या पिल्लांचे पोट भरू शकेल. परंतू मनुष्य भवीष्याचा विचार करतो. भवीष्य सर्वदृष्टीकोनाने सुरक्षीत रहावे ह्यासाठी अतोनात संपत्तीचा साठा करतो. परंतू आयुष्याच्या कठिण काळात ही साठवीलेली संपत्ती त्याच्या  तेव्हाच कामात येते. जेव्हा तिच्याबरोबर आशिर्वादांची संपत्तीही त्याच्या गाठिशी असते. परंतू आशिर्वादांची संपत्ती मिळवीण्यासाठी वेळ पडल्यास भौतिक श्रीमंतीचा मोह सोडावा लागतो. परोपकारासाठी तिचा त्याग करावा लागतो. आज जे वंचीत जीवन जगत आहेत, शिक्षण रहीत आहेत, ज्यांच्या जीवनात मुलभूत गरजांचा तुटवडा आहे. अशांना उपयोगी पडण्यासाठी त्या धनाचा वापर करावा लागतो. तेव्हाच आशिर्वादांचे सकारात्मक वलय आपल्याला प्राप्त करता येवू शकते. संपत्ती साठवीण्यामागेही जर परोपकाराचे कारण असेल तर अती उत्तम आहे. कारण त्यामुळे वंचीतांचे कल्याणच होईल. परंतू केवळ उच्च स्तरीय जीवनशैली जगण्यासाठी तसेच समाजात प्रतिष्ठा मिरवीण्यासाठी संपत्ती साठवीली जात असेल. तर मात्र त्यात वैचारीक दारीद्र्यच दिसून येते. तेव्हा माणूस म्हणून माणसाच्या कामी येणे हेच इतरांच्या जगण्याला मुल्य जोडण्याचे कार्य आहे.

   अनेक लोकांना आपल्या किंवा आपल्या प्रियजनांच्या जीवनास मुकावे लागते. कारण उत्तम इलाज करण्यास ते आर्थिकरीत्या सक्षम नसतात. तिथे गरीब श्रीमंतीची दरी दिसून येते. आज आधुनिकीकरण, वाढते तंत्रज्ञान, नवनवीन गोष्टींचा शोध तसेच भौतिक श्रीमंतीचा लोभ ह्या सर्व गोष्टींनी जगण्याला इतके व्यापले आहे की तिथे कोठेही माणुसपणास जागा उरलेली नाही. जणुकाही माणसाच्या शरीरात हृदयाऐवजी यंत्रच बसवीले आहे असे वाटते. कारण त्यात प्रेम दया करुणा ह्यांना स्थान नाही. केवळ प्रत्येक गोष्टीसाठी किंमत मोजण्याची भाषा वापरली जाते. परंतू अजूनही सुदैवाने बोटांवर मोजण्याइतक्या लोकांमध्ये माणुसकी संबंधीत जागृकता आहे. तेव्हा त्यांनी माणुसकीचा हा ध्वज असाच उंच ठेवला पाहिजे. त्यामुळे वंचीतांच्या वेदना कोणाच्या तरी कानावर पडत राहतील. त्यांनाही माणूस म्हणून सन्मानाने जीवन जगता येईल. कारण तेही कला कौशल्यांनी निपुण असतात. परंतू समाजात त्यांच्या गुणांना प्रोत्साहन मिळत नाही. आपल्यापैकी प्रत्येकाने मानव सेवा हीच इश्वर सेवा समजावी आणि त्यांच्या आयुष्यात माणुसकीच्या नात्याने मुल्य जोडावीत.

1. विचारांना कृतीत आणून इतरांच्या आयुष्यात मुल्य जोडावीत

  ज्या विचारांचे आपण समर्थन करतो. त्यांना आपल्या जगण्यात आणण्याचे धाडस आपल्यात असले पाहिजे. कारण विचार आचरणात आणल्याशिवाय कोणाच्याही विश्वासास आपण पात्र ठरणार नाही. त्याची सुरवात आपण स्वत:पासून व आपल्या घरापासून करावी. आपण जर पालक आहोत तर बर्‍याचदा आपल्या मुलांवर आपल्या विचारांचे दडपण आणण्याचा प्रयत्न करतो. त्यांना धाक दाखवून आपल्याला हवं ते त्यांच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतू जर आपले नियम तसेच विचार आपल्याच कृतीतून आपण अंमलात आणले तर मुलांवर बळजबरी करण्याची वेळच येणार नाही. मुलांच्या मनात आपल्यासाठी आदर निर्माण होईल. तसेच त्या गोष्टींना आपल्या आयुष्यात पुढे न्यावयाचे किंवा नाही हे ठरवीण्याचे स्वातंत्र्यही त्यांच्याकडे राहील. अशापद्धतीने आपण आपल्या कृतीतून आपल्या कुटूंबात तसेच समाजातही मोठे बदल घडवून आणू शकतो.

2. आपली भूमिका प्रामाणिकपणे निभावून इतरांच्या आयुष्यात मुल्य जोडावीत 

  काही घरांमध्ये आई ही गृहिणी असते. वर्षोनु वर्षे ती ह्या कामास निभावत आलेली असते. परंतू एका मर्यादेनंतर ती मानसिक उदासीनतेस बळी पडते. कारण तिने तिच्या कामांना मनापासून स्विकारलेले नसते. त्यामुळे प्रामाणिकपणे ती त्या कामांना न्याय देत असली तरीही त्यांना ती प्रतिष्ठा प्राप्त करून देवू  शकलेली नसते. काळानुसार त्यात बदल घडवून स्वत:च्या व्यक्तीगत वेळेस तिने उत्पादनक्षम बनवीलेले नसते. तसेच तिच्या कडे दूरदृष्टी नसल्याने त्या कामांना तिने कमीपणाचे समजून आपला आत्मविश्वासही गमवलेला असतो. कारण कामांचे स्वरूप बदलून तिने स्वत:ला क्रियाशील केलेले नसते. अशाप्रकारे कोणतेही काम फक्त एक कर्तव्य म्हणून आपण आजीवन करत राहिलो. तरी त्याला सन्मानीत बनवू शकत नाही. परंतू एखादे काम करण्यामागचा आपला उद्देश  स्पष्ट असला व ते काम आपण इमान ओतून करत राहिलो. तर तिथे आपल्याला आदराचे स्थान निर्माण होते. त्याचबरोबर इतर लोकही त्यामधून प्रेरीत होवून स्वत:चे आयुष्य उत्तम घडवीतात. तसेच आपल्या समर्पणास कायम लक्षात ठेवतात. अशाप्रकारे आपले काम लहान असो अथवा मोठे त्यास समर्पणाच्या भावाने केल्यास आपण इतरांच्या आयुष्यात मुल्य जोडू शकतो.

3. इतरांच्या वेदना जगून  त्यांच्या आयुष्यात मुल्य जोडावीत

  आपण सर्वजण माणुस म्हणून जन्मास आलेलो असलो. तरी गरीब श्रीमंतीच्या भेदभावामुळे, शारिरीक अपंगत्वामुळे तसेच जातीधर्मावरून आपल्यात दरी निर्माण झालेली असते. आपण आपल्या अशा बांधवांच्या  वेदना समजून न घेता ते सर्वसामान्यांप्रमाणे नाहीत म्हणून त्यांना कमकुवत समजतो. त्यांना आपल्यापासून लांब ठेवून हसण्याचा विषय बनवीतो किंवा त्यांचा तिरस्कार करतो. परंतू वंचीतांच्या वेदना फार कमी लोक समजून घेतात, त्यांना जगतात आणि त्यावर समाधान काढण्यासाठी आयुष्यभर झटत असतात. कारण त्यांच्या हृदयात करुणा असते. आपल्याच काही बांधवांना दैवाने काही कारणांनी वंचीत ठेवले असले. तरी त्यांचे जगणे सोपे व्हावे म्हणून प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना दिशा देण्याचे माणूसकीने युक्त कार्य बोटांवर  मोजण्याइतके लोक करत असतात. अशाप्रकारे एक माणुस म्हणून अन्य माणसाच्या समस्या अडचणी दूर करण्यासाठी भक्कम पावले उचलून आपण इतरांच्या आयुष्यात मुल्य जोडू शकतो.   

4. संस्कारांचा वारसा जोपासून  इतरांच्या आयुष्यात मुल्य जोडावीत

   संस्कार हे आपली मानसिकता घडवीतात. कारण ते आपल्या कोवळ्या मनावर कायमचे कोरले जावेत म्हणून ठरवून केले जातात. त्यामागे ठरावीक उद्देश असतो. ज्याप्रमाणे संतांनी त्यांच्या काळात अभंगातून तसेच दोहे साकारून आजच्या पिढीसही योग्य दिशा दाखवीली. कारण त्यांच्याकडे अगाध दृष्टीकोन होता. म्हणूनच ते खर्‍या अर्थाने सुसंस्कृत होते. त्याचप्रमाणे जे संस्कार आपण आपल्या नंतरच्या पिढीवर करतो. ते त्यांना प्रगतीच्या मार्गावर नेणारे तर असलेच पाहिजे. त्यासोबत माणुसकी जोपासणारे असले पाहिजे. स्वाभिमानाने जगण्यास प्रवृत्त करणारे असले पाहिजे. परोपकाराचा अर्थ समजावून सांगणारे असले पाहिजे. जगणे अर्थपुर्ण बनवीणारे असले पाहिजे. तरच ते पिढ्या न पिढ्यांचा उद्धार करतील. तसेच त्यांना आत्मकेंद्रीत होवून जगण्यापासून परावृत्त करून समाजहितासाठी पावले उचलण्यास प्रवृत्त करतील. अशाप्रकारे उत्तम संस्कार आपल्या लहानग्यांच्या मनावर बिंबवून आपण त्यांच्या आयुष्यात मुल्य जोडू शकतो.

   इतरांच्या आयुष्यात मुल्य जोडणे हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे. कारण त्यासाठी आपल्या हृदयात करुणा असली पाहिजे. आपण निभावलेल्या प्रामाणिक भुमिकेने कोणास जगण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. आपण करत असलेल्या कार्यास आपण प्रतिष्ठा प्राप्त करून देवू शकलो पाहिजे. आपल्याला इतरांच्या वेदना जगता आल्या पाहिजे. कोणतेही कार्य करतांना समर्पणाचे भाव असले पाहिजे. तेव्हा समाजनिर्मीत कोणत्याही न बदलणार्‍या नियमांवरून कोणाच्याही जीवनाचे मुल्यमापन करू नये. माणसाने माणसास केवळ एक माणुस म्हणून समजून घ्यावे. हेच इतरांच्या आयुष्यात मुल्य जोडण्याचे श्रेष्ठ कार्य आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *