
युवावस्था हा मनुष्याच्या जीवनाचा अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. कारण युवावस्थेतील ह्या काळात माणसात पटीने हिंमत, उमेद व गगनचुंबी स्वप्न असतात. आपल्या आयुष्याला हवे तसे वळण देण्यासाठी युवक झंझावातासारखे बेभान झालेले असतात. युवावस्थेच्या ह्या सुवर्ण काळात युवकांना सर्वकाही शक्य वाटत असते. त्यांच्यासाठी अशक्य ते काहीच नसते. परंतू युवकांचा हा जोश देशप्रेमासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, स्त्रियांच्या रक्षणार्थ तसेच अन्याय अत्याचाराच्या विरोधात कठोर पावले उचलण्यासाठी आणि कुटूंबाप्रतीच्या जबाबदार्या यथासांग पार पाडण्यासाठी उपयोगी पडला तरच युवावस्थेचा हा काळ त्यांना सुयोग्य दिशेने घेवून जातो. अन्यथा समाजात दहशत पसरवीणे, मुलीबाळींवर अत्याचार करणे, चोर्या गुंडागर्दी अशाप्रकारच्या अवमार्गाने जाणार्या युवकांचा झुंड हा जगण्याची दिशा हरवीलेला युवकवर्ग असतो.
आजचा युवकवर्ग हा सर्वाधिक मानसिक लढायांचा सामना करतांना दिसतो. कारण त्यांच्या आयुष्यात कोणताही देशव्यापी हेतू नसतो. तर तो केवळ त्यांच्या जीवनापुरता सिमीत झालेला असतो. त्याचप्रमाणे हा युवकवर्ग त्यांचे मानसिक स्वास्थ्य दुबळे करणार्या प्रतिस्पर्धांच्या चाक्यातही भरडला जात असतो. कधी कळत नकळतपणे, कधी जीवनशैलीचा भाग म्हणून तर कधी जोरजबरदस्तीने युवक प्रतिस्पर्धांमध्ये ओढले जातात. ज्याप्रमाणे एकदा गर्दीत शिरलो कि आपल्याला थांबता येत नाही. पुढे चालत रहावे लागते त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धांचेही असते. प्रतिस्पर्धांमुळे आपली प्रगती होणे निश्चित असते. परंतू त्या प्रगतीने आपण कधीही पूर्णपणे समाधानी होत नाही. कारण एकदा निर्माण झालेली ही मनातील चढाओढीची भावना आपले आयुष्यच व्यापून टाकते. आपल्याला नेहमी कोणाच्यातरी पुढे निघून गेल्याचा आनंद तर कधी मागे पडल्याच्या दु:खाचा उन सावल्यांचा खेळ खेळावा लागतो. त्यामुळे आपली मानसिक शांतता विचलीत होते. अशावेळी युवक स्वत:ला सतत कोठेतरी व्यस्त ठेवण्यास झटत असतात. ते त्यांच्या मनात निर्माण होणार्या भावनांकडे तसेच त्यांची काळजी करणार्या माणसांच्या बोलण्याकडेही दुर्लक्ष करतात. कारण त्यांनी कारकिर्दीत उच्चांक गाठण्याचा स्वत:शी पक्का निर्धार केलेला असतो.
स्वातंत्र्या पूर्वीच्या काळात युवकवर्गातील अनेक क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या त्या धगधगत्या अग्नीकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांनी त्यांचे जीवन एका देशव्यापी चळवळीसाठी समर्पीत केले होते. त्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास हा तडपत्या तेजासारखा त्यांच्या मुखमंडलावर तसेच त्यांच्या कार्यातून झळाळत असे. ते तेज आताच्या पिढीतील युवकवर्गाच्या चेहर्यावरून मात्र गायब झालेले आहे. कारण ते व्यक्तीगत जीवनातील लढाया लढत असतांना स्वत:ला हरवून बसले आहेत. त्यांच्या आयुष्याचा कोणताही महान हेतू नसल्याने त्यांच्या अंगी असलेला पराक्रम धाडसीपणा सिद्ध करण्यास त्यांना वावच मिळत नाही.
जेव्हा कुटूंबाच्या गरजा भागवीण्यास पालक सक्षम नसतात तेव्हा कुटूंबाची दैनावस्था होते. त्या कारणांवरून घरात विकोपास जाणारे वादविवाद घरातील युवकांच्या मनावर आघात करतात. बरेचदा अशाप्रकारची कारणे युवकांना घरातून पलायन करण्यास कारणीभूत ठरतात. असे आयुष्यात हवालदील झालेले युवक मोठ्याप्रमाणात ग्रामीण भागातून शहराकडे वळतात. शहरात येवून उदरनिर्वाहासाठी वाममार्गाचा अवलंब करतात. त्याचप्रमाणे शहरातील बेघर वर्गातील युवकही मोठ्याप्रमाणावर व्यसनांच्या आहारी गेलेले असतात. बसस्थानक, रेल्वेस्थानकासारख्या लोकांचा मोठा जमाव असलेल्या ठिकाणी ते खिसा कापणे लूटपाट करण्याची कामे करत असतात. असेच युवक गुंडागिरी करणारा समूह तयार करून अनेक अनौपचारीक कामे करत असतात. स्त्रियांच्या अंगावरचे दागिने पळवीणे, मुलींची छेड काढणे तसेच शहरातील एखाद्या भागात जवळ शस्त्र बाळगून दहशत पसरवून सामान्य माणसांचे जगणे हैराण करतात.
असे युवक निरक्षर व संस्कार विहीन असतात. कारण ते एका दुर्लक्षीत बालपणाचे शिकार असतात. बालवयात त्यांच्या भाग्याला जे असुविधाजन्य जगणे आलेले असते. तसेच आयुष्याने त्यांना जी वाट दाखवीली असते. त्यामुळे लोकांकडून झालेले पराकोटीचे अपमान मुकाट्याने पचवीण्याची त्यांना सवय लागलेली असते. ते मनातील भावना व्यक्त करू शकत नसल्याने त्यांच्या अंतर्मनात समाजाप्रती कटुता निर्माण होते. अशाप्रकारे समाजाने त्यांना जे दिले त्याचीच परतफेड करण्यास ते त्यांच्या युवावस्थेत निघालेले असतात. त्यांच्या स्वभावात निर्माण झालेली ही विकृती कोठे ना कोठे समाजाचीच देण असते.
त्याचप्रमाणे युवावर्गावर वाईट संगतीचेही दुष्परीणाम होत असतात. जसे बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्यांनी केळीची पाने फाटून जातात. याउलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्यालाही चंदनाचा सुगंध येतो. तसेच रामाच्या सहवासाने हनुमान धन्य झाले. श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जून सर्वश्रेष्ठ योद्धा झाला. याउलट दुर्योधनाच्या सहवासाने सर्वश्रेष्ठ भीष्म व कर्णाचाही नाश झाला. अशाप्रकारे संगतीचा असर होवून हळूहळू आपले विचार श्रेष्ठ किंवा दुषीत होत जातात. त्याचप्रमाणे आजचा युवकवर्ग त्याला पडणार्या प्रश्नांची उत्तरे बाहेरच्या जगात शोधत असतो. जिथे त्या प्रश्नांची त्याला अपेक्षीत अशी उत्तरे मिळत असतात. तीच संगत त्याला हवीहवीशी व योग्य वाटू लागते.
मोबाईल हे देखील आजच्या युवावर्गास दिशाभूल करणारे एक मोठे माध्यम आहे. मोबाईलच्या रुपात सर्वप्रकारची माहिती त्यांच्या खिशात दिवसरात्र असते. जी काही प्रमाणात उपयोगी, काही अनुपयोगी तर काही त्यांची दिशाभूल करणारी सुद्धा असते. युवकांच्या नजरा चोवीस तास मोबाईलमध्ये खिळलेल्या असतात. त्या वेडापायी ते कौटुंबिक वातावरणात रमत नाहीत. त्याचबरोबर ते स्वत:पासूनही लांब होत जातात. बाथरूमला जातांना त्यांच्या हातात मोबाईल असतो. जेवण करतांनाही त्यांच्या हातात मोबाईल असतो. अशाप्रकारे स्वत:ला व्यस्त ठेवण्याची त्यांना इतकी सवय झालेली असते कि दोन मिनीटांचा जरी वेळ मिळाला तरी त्यांचा मोबाईल खिशातून बाहेर येतो. कारण ते मनाने स्थिर नसतात. त्यांच्या वयाशी संबंधीत स्वभावातील चढउतार, त्यांना मिळणारे नकार, पदरात पडणारे अपयश त्यांच्या मनाला विचलीत करतात. अशावेळी कोणी आपल्याला समजून घेईल किंवा नाही ह्या गोष्टीची भितीही त्यांच्या मनात असते. त्यामुळे ते सतत मोबाईलच्या जगात स्वत:ला गुंतवून घेत असतात.
त्याचप्रमाणे सोशल मिडीया हे एक असे फसवे जग आहे. ज्यात आपल्याला स्वत:साठीच जागा नसते. सोशल मिडीयाच्या मार्फत युवकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात किंवा नाही माहित नाही. परंतू त्यांच्या मनातील वेदनांवर मात्र नक्कीच फुंकर घातली जाते. सोशल मिडीयावर युवकांना त्यांच्या विचारांवर तसेच त्यांच्या विषयांवर मिळणारे लाईक व कमेंट त्यांना आतून सुखावणारे असतात. जर ते त्यांना मिळाले नाही तर अनेक युवक निराशेस बळी पडून स्वत:हून मृत्यूला कवटाळतात. परंतू युवकांनी स्वत:ला त्याच्या अतिशय आहारी जाण्यापासून वाचवीले. तर मात्र सोशल मिडीया त्यांना योग्य दिशाही दाखवू शकतो. मोबाईल व सोशल मिडीयाद्वारे चुकीचे विषय आत्मसात केल्याने युवक त्यांच्या अंतर्मनाचा आवाज ऐकू शकत नाहीत. जर त्यांनी सातत्याने स्वत:बरोबर उत्कृष्ठ वेळ घालवीला तर त्यांना स्वत:विषयी अशी माहिती मिळेल ज्यापासून ते आजपर्यंत वंचीत होते. परंतू बाहेरच्या जगात वाजवीपेक्षा जास्त फसल्याने त्यांना स्वप्नातही कधी आत्मज्ञान प्राप्त होवू शकत नाही.
युवकांना मार्गावरून भटकवीणारे आणखी एक कारण म्हणजे त्यांचे युवावस्थेतील प्रेम संबंधही असतात. कधी कधी केवळ शारिरीक आकर्षणाला ते प्रेम समजत असतात. तसेच त्याच्या आहारी जावून स्वत:च्या आयुष्याचे नुकसान करवून घेतात. कारण प्रेमाचा खरा अर्थ समजण्यास त्यांचे वय परीपक्व झालेले नसते. तरिही त्यावर ते इतके गंभीर होतात कि कधिकधी त्यांचा शिक्षणाचा काळ तसेच कारकिर्दीचा काळही त्यामागे संपुष्टात येवू शकतो.
अशाप्रकारे अनेक कारणांनी युवापिढी भरकटत चालली आहे. युवावस्था पुन्हा येत नाही. तेव्हा जीवनाचा मजा घेतला पाहिजे. असे म्हणत नशा करणे, प्रेमसंबधात गुंतून पडणे, वाईट संगत अशा गोष्टींनी आपला ऐन उमेदीचा काळ युवक वाया घालवीतात. परंतू युवकांनी हा युवावस्थेचा काळ जागृकतेने जगला तर त्यांच्या आयुष्यातील हा महत्वपुर्ण कालावधी अर्थपुर्ण होवू शकतो. त्यांनी त्यांच्या दिनचर्येच्या प्रत्येक क्षणास शिस्तबद्ध केले. तसेच कोणतेही काम करतांना त्यांच्या परीणामांची जाणीव ठेवली. तर ते त्यांनी ठरवीलेल्या ध्येयाच्या पुर्ततेच्या ठिकाणी नक्कीच पोहचू शकतील. अन्यथा युवकांचा येणारा भविष्यकाळ त्यांची दिशाभूल करणारा असेल.
1. युवकांनी गरिबीपासून पळण्याची नाही तर गरिबीमुक्त जीवनाची दिशा ठरवावी
गरिबी ही आयुष्यातील एक परिस्थीती किंवा काळ असतो. तो जगत असतांना अशी वेळ आपल्यावर का ओढवली. त्यामधून आपण कोणता धडा शिकलो. तसेच ह्यापुढे अशी वेळ पुन्हा आपल्यावर येवू नये म्हणून कोणती भक्कम पावले आपण उचलतो. हे फार महत्वाचे असते. तेव्हा गरिबी ओढवली म्हणून पळ काढण्याची दिशा अवलंबने हे अत्यंत दुर्दैवी असते. त्याचबरोबर गरिबी ही एकटी येत नाही तर बर्याचदा ती माणसाच्या बुद्धीमत्तेवर व स्वाभिमानावर घाला घालते. तसेच माणसाला चुकीच्या मार्गांचा अवलंब करण्यास भाग पाडते. अशावेळी आपल्या संस्कारांची भिंत कमकुवत असली तर मात्र पावले डगमगू शकतात. युवकांनी अशा परिस्थीतीत आपली नितीमत्ता जागृत ठेवावी. व्यसनाधीन होणे, घरातून पलायन करणे, कुटूंबाचा विचार न करणे म्हणजे गरिबीपासून पळण्यासारखे असते. परंतू ते जगाच्या पाठीवर कोठेही गेले तरी गरिबी त्यांचा पिच्छा पुरवतच राहील. कारण गरिबीपासून मुक्त होण्यासाठी असलेली दिशा त्यांना ठाऊकच नसते. जी गोष्ट आपल्यातच समावलेली आहे ती बाहेर शोधून सापडत नाही. तेव्हा युवकांनी परिस्थीती कशीही असली तरी स्वाभिमानाचे जगणे कधिही सोडू नये. स्वत:मधील कलाकौशल्यांना आणखी तीक्ष्ण व आपल्या विचारांना मजबूत करून परिस्थीतीवर मात करावी.
2. युवकांनी चुकीची संगत अंगीकारण्यापेक्षा स्वत:वर लक्षकेंद्रीत करावे
युवकांवर त्यांच्या कुटूंबाची, समाजाची तसेच देशाची मोठी जबाबदारी असते. तेव्हा त्यांचे प्रत्येक पाऊल कर्तव्यदक्षतेकडे वळले पाहिजे. युवावस्थेचा काळ मनुष्याच्या जीवनातील अत्यंत नाजूक काळ असतो. त्या काळात पडलेले एकही चुकीचे पाऊल आपल्याला सर्वनाशाच्या दरीत ढकलते. तर योग्य मार्गावर पडलेले पाऊल आपल्या आयुष्याचे सोने करते. आयुष्यात झालेल्या चुकांनी आपले संपुर्ण आयुष्यच उध्वस्त होते असे नाही. तर चुकांना समजून घेवून हुशारीने त्यामधून बाहेर पडणे हेही आपल्या अनुभवांच्या गाठोड्यात आणखी भर घालत असते. चुकीची संगत म्हणजे केवळ जुआरी, व्यसनी, तसेच आपल्या कारनाम्यांनी समाजाला हैराण करणार्यांसोबत संगत करणे असाच होत नाही. तर ज्यांच्याशी आपले विचार जुळत नाहीत, जे आपल्यावर दबाव टाकतात तसेच ज्यांना आपली किंमत नसते अशांसोबत राहणेही आपल्या पथ्यावर पडणारे असते. म्हणून जेव्हा आपल्याला कोणतिही योग्य साथ लाभत नाही तेव्हा स्वत:कडे मात्र दुर्लक्ष करू नये. अशावेळी युवकांनी आपल्या मनाचा थांग गाठला पाहिजे. त्यांना त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे केवळ तिथेच मिळू शकतात.
3. युवकांनी शिक्षणाबरोबर अवांतर वाचनाकडेही आवड निर्माण करावी.
शिक्षण हे आजच्या युवापिढीच्या हातातील धारधार शस्त्र आहे. ह्या शस्त्राचा उपयोग त्यांना नितीमत्तायुक्त सकारात्मक जीवन जगण्यास होतो. आजचे युवक विद्द्यार्थी जास्तीत जास्त व प्रतिस्पर्धा लावून गुण मिळवीण्यासाठी जोरदार अभ्यास करतात. तसेच त्यामागचा उद्देश एकच असतो तो म्हणजे उत्तम नोकरी मिळवीणे. केवळ उत्तम नोकरीच्या दिशेने चाललेली ही घोडदौड युवकांच्या निष्पापपणाचा गळा आवळते. कारण त्यांचा हा प्रवास त्यांना मानसिकरित्या थकवीणारा असतो. परंतू जर युवकांनी अवांतर वाचनाचीही स्वत:ला सवय लावली तर विवीध उत्कृष्ठ पुस्तकांच्या माध्यमातून त्यांना जीवनमुल्यांचा आधार मिळेल. संस्कृतीचेही महत्व त्यांना कळेल. हे अवांतर वाचन त्यांना जीवनातील विवीधप्रकारच्या वळणावर योग्य मार्गदर्शन करेल. त्यांचे एक खंबीर व कणखर व्यक्तीमत्व घडवीण्यात मदत करेल. तसेच युवकांची पावले जीवनाचे प्रतिनिधीत्व करण्याच्या दिशेने पडतील.
4. युवकांनी सोशल मिडीयाचा योग्य उपयोग करून घ्यावा
सोशल मिडीयाच्या बाबतीत अनेकांच्या मनात गैरसमज असतात. कारण बराच मोठा युवावर्ग त्यावर विनाकारण वेळ वाया घालवितांना दिसतो. जसे सिनेकलाकारांच्या आयुष्याशी निगडीत माहिती मिळविणे. तसेच अशाच प्रकारच्या अनेक गोष्टी ज्यांचा आपल्या आयुष्याशी काही एक संबंध नसतो. त्यांच्यामागे आपला बहुमूल्य वेळ युवक खर्ची घालत असतात. त्याचबरोबर त्यांच्या जीवनशैलीशी स्वत:ची मनोमन तुलना करून स्वत:च्या पदरात निराशा पाडून घेतात. ज्यामुळे स्वत:चे नुकसान करून घेण्यास ते सर्वस्वी स्वत:च कारणीभूत ठरतात. परंतू सोशल मिडीयावर युवक त्यांचा एक उत्कृष्ठ वेळही घालवू शकतात. त्यांना त्यांच्यातील कलाकौशल्यांना त्या माध्यमातून जगासमोर आणता येवू शकते. जेथून त्यांना पैसे कमविण्याचा स्त्रोतही निर्माण करता येवू शकतो. त्यांनी त्यांच्याशी निगडीत काही समस्या किंवा प्रश्न तिथे मांडल्यास लोकांचा प्रतिसाद मिळून समस्येचे निराकरण होवू शकते. त्यांच्या डोक्यातील काही खास व्यवसाय योजना त्यांना युवकांच्या जगाशी वाटता येवू शकतात. अशाप्रकारे युवक सोशल मिडीयाला त्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे साधन बनवू शकतात.
युवकांनी त्यांच्या आयुष्यात असलेल्या अडचणींचा पुर्णपणे स्विकार करावा. कारण अडचणीशिवाय आयुष्याची कल्पना होवू शकत नाही. जर त्या आहेत तर त्यामागे नक्कीच काहितरी उद्देश असतो. कारण कधिकधी त्यामधूनही आयुष्याला सकारात्मक कलाटणी मिळते. जर आपण अडचणींच्या डोळ्यात डोळे घालून सामोरे गेलो तर त्यामधून यशस्वीरित्या मार्ग काढत जीवनाला अर्थपुर्ण बनवू शकतो. तेव्हा युवकांनी कायम आपल्या ध्येयावर लक्षकेंद्रीत करावे. कारण हेच त्यांच्यासाठी ध्यानसाधना करण्यासारखे आहे.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)