आपले स्वत:बरोबरचे नाते

आपण जन्म घेताच आपल्या सभोवताल नात्यांचे असे जाळे असते जे आपल्याला प्रेमाची उब प्रदान करण्यास आतुर असते. आपली काळजी घेण्यापासून ते आपल्याला लहानाचे मोठे करण्यापर्यंत, आपल्यावर संस्कार करण्यापासून ते आपल्या जीवनाचा उत्तुंग प्रवास डोळे भरून बघण्यापर्यंत ही जीवाभावाची नाती आजीवन तत्पर असतात. त्यामुळे त्यांच्या काटेकोर निरीक्षणाखाली आपले एक अद्वीतीय व्यक्तीमत्व आकार घेवू लागते. ज्याचे खरे शिल्पकार बनण्यात आपल्या आई-वडीलांचा सर्वात मोठा वाटा असतो. कारण त्यांच्याच कल्पनेतून आपण घडलेलो असल्याने ते त्यांच्या हृदयाचा कस आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी लावत असतात. त्याचबरोबर आपल्या आसपासची सजीव निर्जीव सृष्टी, आपले गुरूजन तसेच समाजाचेही त्यात फार मोठे योगदान असते.

   आपल्या वाढत्या वयाबरोबर आपल्यात स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता वाढीस लागते. तेव्हापासून आपले स्वत:शी एक घनिष्ठ नाते निर्माण होण्यास सुरवात होते. आपल्या मनात आपले एक छोटेशे जग असते ज्यात हळूवार जन्म घेणारी स्वप्न असतात. बाहेर व्यक्त करण्याचे सामर्थ्य अजून आले नसले तरी आपली मतं असतात. मनातल्या मनात विवीध विषयावर आपला स्वत:शीच वार्तालाप सुरू असतो. स्वत:संबंधीत सर्व गुपीतं आपल्या मनातच दडलेली असतात. त्याचप्रमाणे आपल्यात विकसीत होत चाललेल्या आवडी निवडी तसेच क्षमतांची आपल्याला सावकाशपणे जाणीव होवू लागते. आपल्याला निरनिराळ्या गोष्टीत रस येवू लागतो. अशारितीने आपली स्वत:शी मैत्री होवू लागते.

  आपण जेव्हा आपल्या आत प्रवास करणे शिकतो तेव्हा आपल्या अंतर्मनाचा आवाज आपण ऐकू शकतो. म्हणूनच म्हणतात ऐकावे जणाचे आणि करावे मनाचे. कारण कोणत्याही हेतूवर मन एकाग्र केल्यास व निष्ठेने श्रम करत राहील्यास आपल्या अंतर्मनाचा आवाज आपले कायम मार्गदर्शन करत असतो. तसेच आपल्याला आपल्यातील बळकट व कमकुवत गुणधर्मांची पुरेशी जाणीवही असते. परंतू कधिकधी आपल्यातील अहंकार आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधतो. त्यामुळे आपण आपल्या मनाची भाषा समजून घेण्यास असमर्थ ठरतो.

   जग फसवे असते आणि ते क्षणोक्षणी आपल्या मनास भुरळ पाडते. त्यामुळे आपण स्वत:मध्ये परीपुर्ण असूनही जगाची साथ मिळवीण्यासाठी व आपल्या कोणत्याही कृत्यास जगाचे समर्थन मिळवीण्यासाठी कधिकधी स्वत:चीच नकळतपणे साथ सोडून देतो. तसेच आपल्या अस्सल व्यक्तीमत्वावर एक मुखवटा चढवून मिरवत असतो. कारण जगाचा हिस्सा बनण्यास आपले मन आतूर झालेले असते. जगाने केलेला स्विकार आपल्या मनाला दिलासा देणारा असतो. परंतू आपण स्वत:ला ह्या तात्पुरते सुख देणार्‍या मोहास बळी पडण्यापासून वाचवू शकलो. तर अंतर्मनाच्या मार्गदर्शनाखाली योग्य निर्णय घेण्याची क्षमता स्वत:मध्येच विकसीत करू शकतो.

   जेव्हा काही कारणांनी आपल्याला जगाची साथ लाभत नाही तेव्हा एकटे पडण्याच्या भितीने आपण भांबावून जातो. आपले अंतर्मन सदासर्वकाळ आपल्या बरोबर आहे. आपण एकटे नाही ही गोष्ट आपल्या मनास त्यावेळी कळत नाही. आपण स्वत:ला इतरांपेक्षा भिन्न समजू लागतो. त्याचा आपल्या मानसिक व शारिरीक आरोग्यावरही दुष्परीणाम होतो. आपले स्वत;साठीचे मत दुषीत होते. स्वत:शी निगडीत प्रत्येक गोष्टीवर टिका करण्याची आपल्याला सवय लागते. आपल्यात काही चांगले आहे ह्यावरचा आपला विश्वास उडतो. आपल्या कामावर लक्षकेंद्रीत न केल्याने व वारंवार स्वत:वर टिका केल्याने आपल्या कामाची उत्कृष्ठता ढासळते. खरेतर हे आपण आपल्या अंतर्मनाचा आवाज न ऐकण्याचे परीणाम असतात. आपले मन आपल्याला आपला खरा चेहरा दाखवीत असते. परंतू आपल्याला मुखवटा घालून वावरण्याची इतकी सवय झालेली असते कि मनाची किंमत आपल्याला कळत नाही. परंतू जीचे कळणे आपल्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटविण्यासाठी आवश्यक असते.

   सर्वप्रथम आपण आपल्या नजरेत स्वत:साठी सम्मान निर्माण करण्यासाठी झटले पाहिजे. कारण त्यामुळे आपल्याला आपल्या अस्सल व्यक्तीमत्वात जगणे सोपे होते. इतरांच्या नजरेने स्वत:ला बघण्यापेक्षा स्वत:च्या शुद्ध नजरेने व शुद्ध हेतूने आपले परीक्षण केले पाहिजे. आपण स्वत:ला इतके चांगले ओळखतो कि आपला आपल्याहून उत्तम मित्र अन्य कोणिही असूच शकत नाही. तेव्हा स्वत:साठी नेहमी सर्वोत्तम गोष्टींची निवड केली पाहिजे. आपल्या विचारांना तेजस्वीतेची धार असली पाहिजे. शरीरासोबत मनाचीही एकनिष्ठता जपली पाहिजे. आपल्या हातून आपल्या आत्मसम्मानात भर घालणारी कृत्ये घडली पाहिजे. आपल्या अंगी स्वाभिमानाचा दागिना मिरवला पाहिजे. आपण धाडसी व पराक्रमी असले पाहिजे. अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचे बळ आपल्यात असले पाहिजे. अशापद्धतीने कायम स्वत:च्या नजरेत उठण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे.

   त्याचप्रमाणे आपले आपल्याशी घट्ट नाते व्हावे ह्यासाठी स्वत:मध्ये आत्मप्रेम जागृत केले पाहिजे. स्वत:बरोबर जास्तीत जास्त वेळ घालविण्यासाठी एकट्याने एखादी योजना आखली पाहिजे. आपल्या कपड्यांच्या आवडी निवडी, आवडीच्या पदार्थांची यादी तयार करण्याचा आनंद घेतला पाहिजे. आपल्याला निसर्ग सान्निध्यात वेळ घालविण्याचे किंवा डोंगर चढण्याचे वेध आहेत का हे जाणून घेतले पाहिजे. कारण प्रकृतीचा कोणता रंग आपल्याला आकर्षीत करतो. आपला आवडता ऋतू कोणता हे सर्व स्वत:विषयी आपल्याला ठाऊक असणे आवश्यक आहे. आपण नेहमी इतरांच्या आवडीनिवडींना आपल्या समजत आयुष्य घालवत असतो. परंतू स्वत:च्या आवडीनिवडींची आपल्याला पर्वाही नसते. त्याचप्रमाणे चोवीस तास जो आपल्या अंतर्मनाशी आपला संवाद चाललेला असतो तो कसा आहे हे देखील आपल्यासाठी महत्वाचे असले पाहिजे. कारण त्यामुळेच  आपल्या आयुष्याला योग्य आकार येत असतो.

  आपल्या जीवनप्रवासात येणारे आपले वाढदिवस, तसेच कोणतेही यश प्राप्त केलेले  अभिमानाचे सोनेरी क्षण साजरे करत असतांना आपण आपल्या जीवाभावाच्या माणसांकडून मित्रमंडळींकडून अनेक अपेक्षा करत असतो. त्यांनाही तो दिवस लक्षात रहावा, त्यांनी त्या दिवसाला प्राथमिकता द्यावी अशी आपली तीव्र इच्छा असते. परंतू अशी अनेक कारणे असू शकतात कि ज्यामुळे त्यांना आपल्या त्या खास दिवसाचा विसर पडण्याची शक्यता असते. तेव्हा अशावेळी त्यांचे वागने मनाला लावून न घेता व मनात कोणतेही गैरसमज निर्माण होवू न देता गोष्टी समजून घ्याव्यात. आणि स्वत: आपल्या त्या विशेष दिवसाला खास बनविण्यासाठी काहीतरी विशेष करावे. जेणेकरून आपल्याला मानसिक समाधान लाभेल. स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी मनातील योजना प्रत्यक्ष घडवून आणावी. आपण स्वत:ला समाधानी करण्यात यशस्वी झालो. तर नक्कीच इतरांच्या आनंदातही मनापासून सामील होवून त्यांचा आनंद द्वीगुणीत करू शकतो.

  त्याचप्रमाणे आपले स्वत:शी अतुलनीय नाते असले पाहिजे. कधिही इतरांबरोबर स्वत:ची तुलना करून आपल्या अस्तित्वाचा अपमान करू नये. कारण आपण अद्वीतीय गुणांनी समृद्ध असतो. त्या गुणांवर लक्ष केंद्रीत करून जगात आपली ओळख निर्माण केली पाहिजे. अंगी स्वाभिमान बाळ्गून आपल्या आयुष्याला दिशा दिली पाहिजे. आपला सहवास हा आपल्याला सर्वात जास्त आवडणारा असला पाहिजे. आपल्याला स्वत:बरोबर आनंदी बघून अनेंकांच्या नजरा आपल्याकडे वेधल्या जातात. अशाप्रकारे आपण स्वत:बरोबरच्या आपल्या नात्याला योग्य न्याय दिला पाहिजे.

1. आपले स्वत:बरोबर मैत्रीचे नाते असले पाहिजे.

  मैत्री हे एक असे निस्वार्थ नाते असते ज्यात केवळ भावनांची देवाण घेवाण असते. हे नाते मनावरचे ओझे वाढविणारे नाही तर ओझे हलके करणारे असते. आपल्याला जीवनात खर्‍या मित्राची साथ लाभली असेल तर आणखी कशाचीही गरज भासत नाही. कारण भौतिक श्रीमंतीने जे सुख मिळत नाही ते खरी माणसे आयुष्यात असण्याने जगण्याचे मानसिक समाधान आपल्याला लाभते. तेव्हा आपले आपल्याशी कायम मैत्रीचे नाते असले पाहिजे. ज्याप्रमाणे आपण आपल्या मित्रास निरपेक्ष मदत करतो. त्याच्यावर हक्काने रागवतो. त्याच्या यशाच्या आनंदात मनापासून सहभागी होतो. त्याच्या कठीण काळात त्याला कधीही एकटे सोडत नाही. त्याचप्रमाणे स्वत:कडून अवाजवी अपेक्षा न बाळगता स्वत:च्या क्षमतांचा आपण सम्मान केला पाहिजे. कधिही स्वत:ला हतबल होवू देवू नये. आपण मिळवीलेल्या यशाची इतरांशी तुलना न करता त्याचा सोहळा साजरा करावा. तसेच स्वत:च्या आत्मसम्मानासाठी प्राण पणास लावावे.

2. आपण स्वत:च स्वत:ला प्रोत्साहीत केले पाहिजे

   बहुतांशी लोकांमध्ये ही प्रवृत्ती दिसून येते कि ते कायम स्वत:वर टिका करत असतात. प्रत्येक गोष्टीत स्वत:ची इतरांशी तुलना करतात. आणि हे सर्व करत असतांना ते स्वत:ला अत्यंत खालच्या स्तराला घेवून जातात. किंवा स्वनिर्मीत आदर्शवादाचे शिकारही होतात. अशा अवस्थेत मात्र त्यांची कोंडी होण्याची शक्यता असते. कारण आदर्शवादाच्या चौकटीत राहून त्यांना इच्छा असूनही जगण्याचा आनंद घेता येत नाही. तर दुसर्‍या परिस्थितीत ते इतरांकडून प्रोत्साहनाची अपेक्षा करतात. त्यांचे आयुष्यात पुढे जाणे व प्रगती करणे इतरांवर विसंबून असते. परंतू स्वत:ची अशी अवस्था करून घेणे म्हणजे स्वत:चेच खुप मोठे नुकसान करून घेण्यासारखे आहे. त्यापेक्षा आपल्या जीवलगांची आपल्याकडून असलेली उमेद तसेच आपल्या स्वप्नांशी जुळलेल्या आपल्या भावना आपल्याला कायम प्रगती करण्यास प्रोत्साहीत करत असतात. तेव्हा त्यावर लक्ष केंद्रीत करणे व स्वत:च स्वत:ला प्रोत्साहन देत राहिल्याने आपले स्वत:शी नाते घट्ट होत जाते.

3. स्वत: स्वत:चे मार्गदर्शक असावे.

  आपल्या आयुष्यात आपले पालक तसेच आपले गुरूजन हे आपल्यासाठी सगळ्यात महान मार्गदर्शक असतात. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आपले जीवन भरकटू लागते व दिशाहीन होते. असे असतांनाही आपला जीवनप्रवास हा स्वत:बरोबरच सुरू असतो. त्यात आपल्याला अनेक चांगले वाईट अनुभव येत असतात. जे आपल्याला धडे देत असतात. आणि ते धडे गिरवता गिरवता आपल्या विचारांना, आपल्या जीवन जगण्याला परीपक्वता येत जाते. म्हणूनच आपल्याला जीवनात येणारे अनुभव सुद्धा आपले उत्तम मार्गदर्शन करतात. कारण त्यावेळी आपल्या अंतर्मनाचा आवाज आपल्याला दिशा दाखवत असतो. आपले अंतर्मन आपल्याशी प्रामाणिक असते. आणि ते आपल्याला परिस्थितीचा खरा चेहरा दाखवीते. तेव्हा आपले आपल्याशी कायम मार्गदर्शकाचे नाते असले पाहिजे.

4. आपले स्वत:च्या मनावर उपचार करणारे नाते असावे

  आपण लहानाचे मोठे होत असतांना आपल्या मनावर अनेक गोष्टींनी तसेच घटनांनी आघात होत असतात. आयुष्यात पुढे जात असतांना मनातील भावना मोकळ्या होण्यास वाव मिळत नाही. आणि त्याचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर दुष्परीणाम होत जातो. अशावेळी आपण वर्तमान परिस्थितीस योग्य न्याय देवू शकत नाही. कारण आपण भूतकाळात झालेल्या आघातांनी निराशेला व खिन्नतेला बळी पडतो. म्हणून स्वत:मध्ये आत्मप्रेम जागवून वेळोवेळी स्वत:च्या मनावर उपचार करत राहणे आवश्यक असते. कारण जर आपण स्वत:बरोबर आनंदी नसलो तर आपल्याशी जुळणार्‍या माणसांनाही आपण आनंदी ठेवू शकत नाही. आपण त्यांच्याकडे अपेक्षेच्या नजरेने बघतो. आणि अपेक्षा नेहमीच दु:खाचे कारण ठरतात. तेव्हा मनातील भावनांप्रती कायम जागृत असले पाहिजे. तेव्हाच आपले आपल्याशी उत्तम नाते जुडू शकते.

  आपण स्वत:ला आपल्याला मिळालेल्या जीवनमुल्यांच्या आधारे स्वातंत्र जीवन जगू द्यावे. कारण जीवनमुल्ये आपल्याला कधिही भटकू देत नाहीत. आपल्याला आनंदाचा क्षण इतका सखोल जगता यावा कि डोळ्यात आनंदाश्रू तरळू लागतील. जीवनात दु:खी करणार्‍या क्षणांनी आपले अंतकरण भरून यावे. जीवनमार्गावर चालत असतांना कोणाला तरी मोलाची साथ देता द्यावी. जीवलगांशी भांडतांना त्यामागे निस्वार्थ प्रेम असावे. भावनेत कायम स्वत:साठी आदर असावा. जेव्हा आपल्याला जीवनप्रवासात आलेल्या निराशा गुरफटून टाकतात तेव्हा मनाच्या कोपर्‍यात आशेचा किरणही असावा. अशापद्धतीने आपण स्वत:च्याच अस्तित्वात एकरूप व्हावे.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *