
अनादी काळापासून प्राणि हे माणसाचे मित्र राहिले आहेत. त्याचप्रमाणे माणसाने त्यांचा वेगवेगळ्या कामांसाठी उत्तमरीतीने वापरही केलेला आहे. पूर्वी जेव्हा वाहतुकीच्या साधनांचा शोध लागला नव्हता. तेव्हा घोडा, बैलगाड्या ह्यांच्या सहाय्याने लोक एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जात असत. तसेच शेती करण्यासाठी बैलाचा व गाढवाचा वापर करण्यात येत असे. माल वाहतुकीसाठीही गाढवांचा वापर केल्या जात असे. तसेच राज्यांच्या सिमा वाढविण्यासाठी राजे महाराज्यांमध्ये होणार्या युद्धातही घोडा व हत्ती ह्या प्राण्यांचा उपयोग होत असे. अशाप्रकारचे माणसाचे प्राण्यांशी मैत्रीपुर्ण नाते राहिलेले आहे. प्राणि माणसास अनेक गोष्टीसाठी उपयोगी तर आहेतच. त्याचबरोबर त्यांच्यामुळे पर्यावरणाचे संतुलनही राखले जाते. प्राण्यांच्या उपयोगाव्यतिरीक्त त्यांच्याशी संबंधीत बरीच जागरूकता आता समाजात वाढलेली आहे. त्यामुळे त्यांच्याशी जुळलेले अनेक जोड व्यवसायही राबविले जातात. प्राण्यांच्या संरक्षणासाठी देखील अनेक संस्था जोमाने काम करतांना दिसतात. त्यांच्या निस्वार्थ कार्यातून प्राण्यांच्या उपयोगाबरोबरच त्यांच्या प्रती दया व करुणा दाखवीन्याचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणूनच प्राण्यांचे आरोग्य व त्यांचे सुरक्षित जीवन ही व्यक्तीगत पातळीवर प्रत्येकाने आपली जबाबदारी समजली पाहिजे. आपल्या जीवनात निदान एका तरी प्राण्यास तणाव रहित जीवन देवून आपण त्यांच्या साठी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. आपण निसर्गाचे देणे लागतो आणि प्राणी सुद्धा निसर्गाचा एक महत्वपूर्ण भाग असतात. ह्या गोष्टीची आपण पदोपदी जाणीव ठेवली पाहिजे. तेव्हा वेगवेगळ्या मार्गांनी आपण त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. प्राणी आपल्यासारखे बोलू शकत नसले तरी आपल्या त्यांच्या प्रती सकारात्मक दृष्टीकोनाने व प्रेमाने आपण त्यांच्या विश्वासास पात्र ठरतो. तसेच तेही आपल्यापेक्षा दुप्पट सकारात्मकतेने आपल्याला प्रतिसाद देत असतात. त्याचबरोबर त्यांच्यात आणि आपल्यात स्वारस्य निर्माण होते कधीही न संपण्यासाठी.
अजूनही प्राण्यांशी निगडीत काही अंधश्रद्धा प्रचलीत आहेत. प्राण्यांच्या रंगावरून त्यांना शुभ अशुभ ठरवीण्यात येते. अंधश्रद्धेचे कारण समोर करून मोठ्या प्रमाणावर प्राण्यांच्या कत्तलीही करण्यात येतात. जसे काळी मांजर रस्त्यात आडवी गेली कि अशुभ मानन्यात येते. जादुटोण्याच्या संशयावरून काळी कोंबडी तसेच काळ्या बकरीचा बळी देण्यात येतो. काळ्या रंगाच्या कुत्र्यास दररोज जेवण देणे शुभ मानन्यात येते. अशाप्रकारे माणसाने आपल्या स्वार्थी कारणांसाठी व आपल्या बचावाचे कारण समोर करून प्राण्यांचा गैरउपयोगही करून घेतला आहे. परंतू शुभ अशुभ ह्या आपल्या मनाच्या भ्रामक व विकृत कल्पना आहेत. जो जन्मास आला त्याचे एकदिवस जाणे निश्चीत आहे. तेव्हा प्राण्यांना त्यासाठी कारणीभूत समजणे हे खर्या अर्थाने आपल्या अशिक्षीत असण्याचे लक्षण आहे.
प्राण्यांचा सहवास हा आपल्यासाठीही आणि प्राण्यांसाठीही हितकारक आहे. त्यामागचे कारण हे आहे कि जेव्हा आपण एखाद्या प्राण्यास पाळण्याचे ठरवितो तेव्हा त्या प्राण्यास आश्रय मिळतो. त्याला जगण्यासाठी आवश्यक असणारे जेवण मिळण्याची पुर्ण शास्वती असते. त्यामुळे तो एक निर्धास्त जीवन जगू शकतो. तसेच प्राण्यांचा सहवास हा आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो. कारण प्राणि हे आपल्या प्रेमाला प्रतिसाद देतात. आपल्याला घराशी बांधून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असते. कारण ते आपण घराबाहेर पडल्यावर आपल्या वाटेकडे डोळे लावून बसतात. त्यांच्या आपल्या सोबत असण्याने आपल्या दिनचर्येस शिस्त लागते. कारण ते सर्वगोष्टींसाठी आपल्यावर विसंबून असतात. जेव्हा कोणत्याही कामास आपण आपल्यावरची जबाबदारी समजून अत्यंत निष्ठेने तिला निभवतो. तेव्हा जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनही आपोआपच गंभीर होत जातो. तसेच प्राणि त्यांच्या वर्तनातून नेहमी कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांच्या निस्वार्थ प्रेमाने ते आपले मन जिंकून घेतात. त्यांचे खट्याळपणे वागने तसेच काही गोष्टी शिकून घेणे हे अत्यंत कुतूहलपूर्ण व आपल्या मनास सुखावणारे असते.
कोणत्याही प्राण्यास आश्रय देतांना व त्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेतांना आपल्या हृदयात त्या प्राण्याविषयी दयाभाव व प्रेम असले पाहिजे. अन्यथा कधिकधी त्याला घरात घेतल्याचा आपल्याला पश्चाताप होवू लागतो. जेव्हा तो प्राणि आपले काही नुकसान करतो. अशावेळी बरेच लोक प्राण्यांना घरात घेवून त्यांना आपलेसे करतात. परंतू नंतर छोट्या मोठ्या कारणांनी त्रस्त होवून त्यांना रस्त्यावर बेवारस सोडून देतात. असे करणे म्हणजे त्या प्राण्याशी विश्वासघात करण्यासारखे आहे. जे अत्यंत घृणास्पद कार्य आहे. तेव्हा कोणाच्याही दबावात येवून किंवा शेजार्यांशी स्पर्धा करण्यासाठी महागातले महाग ब्रीड चे प्राणि आणून नंतर त्यांचा छळ करणे योग्य नाही. कारण त्यामुळे त्या मुक्या जीवांना त्रास सहन करावा लागतो. आणि त्यांचा मनुष्यजातीवरचा विश्वास उडतो.
घरात पाळीव प्राणि ठेवायचा असल्यास त्या एका विचाराच्या मागे कोणत्याही अटी नसाव्यात. किंवा कोणतिही सहानुभूतीची भावना नसावी. कारण तो सृष्टीने निर्माण केलेला जीव आहे तेव्हा त्याचा विचारही तिने केलेला असतो. जर आपल्याला प्राण्याची जबाबदारी अंगावर घ्यायचीच असेल तर फक्त आणि फक्त दयाभाव मनात असला पाहिजे. तसेच त्या जीवाचे पालन पोषण करण्याचे आपण माध्यम बनलो ह्यासाठी कायम कृतज्ञेचे भाव आपल्या हृदयात ठेवले पाहिजे.
प्राणि हे अत्यंत निष्पाप व निरागस असतात. ते कोणताही स्वार्थी हेतू ठेवून आपल्यावर प्रेम करत नाहीत. किंवा त्यांना आपल्या गरीब श्रीमंत असण्याचीही पर्वा नसते. तेव्हाच रस्त्यावर राहणार्या बेघर बांधवांसोबतही प्राणि असतात. प्राण्यांच्या निरागसपणामुळे त्यांच्या सभोवताल कायम सकारात्मक वलय असते. तसेच त्यांचा सहवास आपल्याला हवा हवासा वाटतो. प्राणि आणि लहान मुले जर एकत्र लहानाची मोठी झाली तर ती मुले सकारात्मक मानसिकतेची होतात. तसेच प्राण्यांच्या आसपास असल्याने मुलांची रोगप्रतिकारक शक्तीही उत्तम राहते. घरात कोणी आजारी व्यक्ती असल्यास प्राण्यांच्या सहवासाने त्यांना लवकरात लवकर बरे होण्यास मदत मिळते. प्राण्यांच्या अंगावरून प्रेमाने हळूवारपणे हात फिरवील्याने ऑक्सीटोसीन नावाचा हॉर्मोन क्रियाशील होतो. जो आपल्या मनात दया व प्रेम जागृत करण्यास मदत करतो. तेव्हा प्राण्यांचा सहवास हा आपल्याकरीता अनेक दृष्टीकोनातून महत्वाचा व हितकारक असतो.
प्राण्यांचे जग हे माणसांपेक्षा खुप निराळे आहे. माणुस मात्र कायमच संपुर्ण प्रकृतीवर आपला अधिकार स्थापीत करण्यास प्रयत्नशील राहीला. माणसाने निरनिराळी कारणे सामोर करून प्राण्यांच्या बेधूंद कत्तली केल्या. तरिही त्याविरोधात फार कमी वेळा भुमिका बजावली जाते. परंतू जर कोणत्या प्राण्याने मनुष्यावर हल्ला केला किंवा काही नुकसान पोहोचवीले. तर मात्र त्याच्या त्या वर्तनामागाची त्याची मानसिकता व त्याच्या आरोग्यविषयक समस्यांवर खोलवर विचार न करता त्याला जीवानिशी संपविण्यात येते. त्याचबरोबर त्या गोष्टीचा सोशल मिडीयाच्या माध्यमातून इतका प्रसार करण्यात येतो कि जनमाणसात प्राण्यांविषयी नकारात्मक समज पसरतो. हे अत्यंत दुर्दैवी आहे. प्राणिमात्रांवर प्रेम करणे, त्यांच्याशी मैत्री करणे ह्या संतांनी मनामनात पेरलेल्या विचारांचा आता मात्र आपल्याला विसर पडतांना दिसतोय. प्राण्यांवर दगड भिरकावून त्यांच्या मनात भिती पसरवीणे फार सोपे आहे. परंतू एक पोळी देवून मैत्रीचा हात पुढे करणे हे त्याहूनही सोपे आहे. तेव्हा कोणत्याही माणसाने स्वत:मधील राक्षशी प्रवृत्तीस बढावा न देता. आपल्या अंतकरणातील माणुसकीला नेहमी उंच ठेवावे. तसेच आपल्या येणार्या पिढ्यांना प्राणिमात्रांवर प्रेम करण्याचा मोलाचा धडा शिकवावा.
1. प्राण्यांच्या सहवासाने घरात सकारात्मक वातावरण राहते.
प्राणि निरागस तर असतातच त्यासोबत ते आपल्यावर अपार माया करतात. जेव्हा त्यांना सांभाळण्याची आपल्याला सवय नसते. तेव्हा त्यांच्यामुळे होणारी अस्वच्छता तसेच त्यांची कामे करणे आपल्याला अडचणीचे वाटते. परंतू जसजसे ते आपल्याबरोबर राहू लागतात. तसतसे आपल्या मनावर अधिराज्य गाजवू लागतात. तसेच आपल्या कुटूंबाचा एक सदस्य केव्हा बनतात हे आपल्याला कळतही नाही. बर्याचदा घरात लहान बाळ येताच कुत्रा किंवा मांजर पाळण्यात येते. बाळ आणि ते पिल्लू सोबत सोबत मोठे होतात. अशा बाळांच्या मनात प्राण्यांबद्दल भिती राहत नाही. त्यासोबत त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही उत्तम असते. त्याचबरोबर ते बाळ हसर्या स्वभावाचे असते आणि त्याच्या मनात प्राण्यांसाठी दयाभाव आपोआपच निर्माण होतो. ह्यावरून हे लक्षात येते कि घरात आनंदाचे व सकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी आपल्या आसपास स्वच्छ व निर्मळ मनाची माणसे तसेच प्राणि असणे अनिवार्य आहे. आपण गरीब आहोत किंवा भौतिक सुखसुविधांनी समृद्ध आहोत. ह्यावर ते अवलंबून राहत नाही. म्हणूनच प्राण्यांच्या सहवासाने घर प्रसन्न भासते.
2. शब्दावाचून मनाची भाषा कळण्याची कला अवगत होते.
प्राण्यांना केवळ अन्नपाणि देवून तसेच आश्रयास ठेवून त्यांचे मन जिंकता येत नाही. त्यांना वेळोवेळी समजून घेणेही तितकेच महत्वाचे असते. कारण ते आपल्यासारखे बोलू शकत नाही. अशावेळी त्यांच्या मनातले ओळखणे, त्यांच्या डोळ्यात उमटणारे भाव जाणून घेणे, त्यांच्या आपल्या पुढे व्यक्त होण्याच्या साईन लॅंग्वेज समजून घेणे फार महत्वाचे असते. त्याशिवाय आपण त्यांचे पालनपोषण करण्यास असफल ठरू शकतो. परंतू आपल्याला त्यांच्याविषयी काहिही कळू शकत नसले तरी एक अशी भाषा आहे जी प्रत्येक प्राणिमात्रास कळते ती म्हणजे प्रेमाची भाषा. जेव्हा आपले त्यांच्यावर निस्वार्थ प्रेम बसते. तेव्हा आपण त्यांच्या हावभावावरून त्यांना हवंनको ते सर्व समजू शकतो. त्यांना होणार्या वेदना आपण देखील अनुभवू शकतो. प्राणिही आपल्या प्रेमाच्या माणसासाठी वेळप्रसंगी अन्नपाण्याविना राहतात. वेळ पडल्यास आपला जीवही धोक्यात घालतात. अशाप्रकारे प्राण्यांच्या सहवासाने आपल्याला कोणाचे मन जाणून घेण्याची भाषा अवगत होते.
3. आपल्या दिनचर्येस शिस्त लागते.
पाळीव प्राणि हे सर्वस्वी आपल्यावर विसंबून असतात. तेव्हा त्यांना योग्य सवयी लावणे तसेच ठरलेल्या वेळेनुसार त्या सवयींचे पालन करणे ही आपली जबाबदारी असते. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये म्हणून फिरण्याच्या वेळा व जेवणाच्या वेळा काटेकोरपणे पाळणे आवश्यक असते. जेव्हा आपले कर्तव्य समजून अत्यंत कर्तव्यदक्षतेने त्या पाळण्याची आपल्याला सवय लागते. तेव्हा आपोआपच आपल्या दिनचर्येस शिस्त लागते. तसेच आयुष्यात शिस्त पाळणे हे प्रगतीच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे असते. शिस्तप्रिय जीवनाचे लाभ आपल्या भविष्यात लवकरच आपल्याला दिसतात. अशाप्रकारे प्राण्यांच्या सहवासाचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण फायदे होतात.
4. घरातील माणसांचे मानसिक व शारिरीक आरोग्य उत्तम राहते.
प्राणि घरातील माणसांच्या दिनचर्या तसेच त्यांच्या घराबाहेर पडण्याच्या व परत येण्याच्या वेळा अवगत करून घेतात. आपण घरी येताच ते मोठ्या प्रेमाने आपले स्वागत करतात. आपल्या घरी येण्याने झालेला आनंद ते वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात. त्याची आपल्याला इतकी सवय होते कि घरी येताच त्यांच्या स्वागताने आपला दिवसभर्याचा थकवा दूर पळतो. मानसिक तणाव कमी होतो आणि आपल्याला प्रसन्न वाटू लागते. त्याचा आपल्या आरोग्यावर उत्तम परीणाम होतो. प्राण्यांच्या आपल्या आसपास असल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे वारंवार येणारी आजारपणं कमी होतात. कॅंसरसारख्या क्लिष्ट रोगाने ग्रस्त रुग्णाने मांजराला जवळ घेवून त्याच्या पाठीवरून हळूवारपणे हात फिरवत राहिल्यास रुग्णाच्या मानसिकतेत बदल येवून त्याच्या आरोग्यात सकारात्मक परीवर्तन येण्यास मदत होवू शकते. एकंदरीत प्राण्यांचा सहवास हा आपल्याला प्रसन्न व आनंदी ठेवण्यास मदत करतो आणि त्यामुळे आपले आरोग्यही निरोगी राहते.
पाळीव प्राणि घरात ठेवण्यामागे केवळ दयेची भावना असली पाहिजे. ती असेल तर आपण महागड्या ब्रीड्मध्ये न फसता आपल्या घराच्या फाटकाबाहेर अन्न मिळण्याच्या आशेने बसलेल्या कुत्र्यास फाटकाच्या आत घेण्याची हिंमत करू शकतो. त्यास आश्रय देवू शकतो. तो रोगग्रस्त असल्यास त्याची सेवासुश्रुषा करू शकतो. आणि प्रत्येक प्राणिमात्रांवर प्रेम करू शकतो. त्यावेळी आपले हात त्यांना दगड फेकून मारण्यास उठणार नाहीत. तर त्यांच्या पोटात अन्नाचा कण जावा म्हणून किंवा त्यांची भूक शमविण्यासाठी आपल्या घासातला घास देण्यास उठतील. अशाप्रकारे प्राण्यांचा सहवास हा आपल्याला आपसात प्रेम वाटणे शिकवीतो.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)