
एकोणिसाव्या शतकात बहुतांशी लोक सरकारी नोकर्या करत असतांना दिसत असत. फार कमी म्हणजे विशिष्ट समाजातील लोकच व्यवसायांशी जुळलेले असायचे. तेव्हा जास्तीत जास्त घरांमध्ये पुरूष एकटा कमविणारा असायचा कारण घरातील स्त्रिया गृहिणीचे कर्तव्य पार पाडत असत. परंतू तरिही घरात आर्थिक नियोजन हे इतके सुनियोजीत असायचे कि एकट्या कमविणार्याच्या अत्यंत कमी वेतनातही संपुर्ण कुटूंब सुख समाधानाने जीवन व्यतीत करीत असे. कारण एका मध्यम वर्गीय कुटूंबास अंथरून पाहून पाय पसरण्याचे महत्व चांगलेच ठाउक असते. त्या अनुषंगाने महिन्याकाठी वेतनाच्या स्वरूपात येणार्या उत्पन्नाचे नियोजन अत्यंत बारकाईने करण्यात येत असे. ज्यात भविष्यासाठी पैस्याची बचत ही ठरलेली असायची. कारण त्यामागे ही दूरदृष्टी असायची कि अडचणीच्या वेळी सर्व सोंगं आणता येतात परंतू पैस्याचे सोंग आणता येत नाही. तेव्हा तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा तहान लागल्यावर पाणि तयार असले पाहिजे. हा दृष्टीकोन अत्यंत हितावह होता आणि आताही आहे. निरंतर होणारी पैस्याची बचत ही थेंबे थेंबे तळे साचे ह्या म्हणीप्रमाणे असते. जी आणिबाणीच्या प्रसंगी आपला भक्कम आधार बनते.
जेव्हा कोणत्याही घरात उत्पन्नाचा स्त्रोत अस्थिर असतो. अशावेळी घरात कायम आर्थिक अडचणी येत असतात व त्यावरून कुटूंबियांमध्ये आपसात क्लेषपुर्ण वातावरण असते. कारण घरात येणार्या उत्पन्नाने कोणाच्याही इच्छांचे समाधान होत नाही. मनातील आकांक्षांना मारून जगावे लागते. कोणालाही काहिही वेळेत मिळत नाही. घरात येणाऱ्या अस्थिर उत्पन्नामुळे जीवनाचे संतुलन बिघडते आणि त्याचा नात्यांवरही वाईट परिणाम होतो. त्यातल्या त्यात जर आपल्याला बचत करण्याची सवय नसेल तर आर्थिक परिस्थिती हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता असते. जीवन जगण्याची ही चुकीची पद्धत आपल्या आयुष्याला ग्रहण लावते. तेव्हा आयुष्यात आर्थिक नियोजन करणे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यासाठी घरात स्थिर उत्पन्नाचा स्त्रोत असणे फार महत्वाचे आहे. आताच्या काळात पैस्याला फार महत्व आहे. त्याच्याशिवाय कोणत्याही विचाराला पाळंमुळं फुटणे अगदी अशक्य आहे. भक्कम आर्थिक नियोजनाशिवाय सुखी संसाराची स्वप्न बघता येत नाही. कारण त्यावरच सर्वकाही अवलंबून असते.
आजच्या काळात बहुतांशी घरात पती-पत्नी दोघेही कमविणारे असतात. त्यामुळे उत्पन्नाचे दोन स्त्रोत असतात. त्याचबरोबरआर्थिक नियोजन करणे आणखीच सोपे होवून जाते. अशापद्धतीने एक मध्यमवर्गीय कुटूंबही उच्च जीवनशैली चा उपभोग घेवू शकते. त्याचबरोबर आर्थिक बचतीमुळे भविष्य सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घरातील सदस्यांचा आत्मविश्वासही उंचावलेला असतो. जर दोघांपैकी एकाचे स्थिर व दुसर्याचे अस्थिर उत्पन्न असले तरिही जास्तीत जास्त बचत केल्याने जीवनप्रवासात कोणत्याही अडचणी येत नाहीत. महिन्याकाठी येणाऱ्या मिळकतीचे उत्तम नियोजन व जास्तीत जास्त बचतीची सवय ही संतुलीत जीवनशैलीची गुरूकिल्ली आहे.
जेव्हा घरात स्थिर उत्पन्न येते मग ते कमी का असेना त्या घरातील आर्थिक व्यवस्था ही नियोजनबद्ध असते. त्यात पैस्याच्या बचतीपासून ते गुंतवणुकीपर्यंत, किरकोळ खर्चांपासून ते अचानक ओढवणार्या प्रसंगांपर्यंत सर्व गोष्टी समाविष्ट होतात. त्यामुळे कमी उत्पन्नातही सगळे सुखी समाधानी असतात. कारण त्या नियोजनात घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या गरजांचा विचार करण्यात येतो व त्याची तयारीही करण्यात येते. त्या घरात लक्ष्मी नांदते. कधिही पैस्याची चणचण भासत नाही. एकंदरीत ते घर सुखाची ग्वाही देते.
परंतू ज्या घरात व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्न येते ते उत्पन्न ठराविक स्वरुपाचे नसते. त्यासोबत व्यवसायाच्या स्वरुपावर त्याची अस्थिरता अवलंबून असते. अशा ठिकाणी आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रीत केले गेले नाही तर कुटूंबावर बिकट परिस्थिती ओढवण्याची शक्यता असते. कारण कोणताही व्यवसाय हा सर्वस्वी आपल्या कौशल्यांवर अवलंबून असतो. जर आपण आपल्या कौशल्यात नवीन तंत्रज्ञानाची भर घातली नाही तर काळनुरूप आपला व्यवसाय मागे पडण्याचीही शक्यता असते. आणि त्याचा सरळ आपल्या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होतो. अशावेळी आर्थिक नियोजन कमकुवत असल्यास कुटूंबावर आर्थिक असुरक्षेचे वातावरण निर्माण होते. ज्यामुळे घरातील शांतता भंग पावते. नात्यांमधील पारदर्शकता संपुष्टात येते. त्याचबरोबर त्याचा घरातील माणसांच्या मानसिकतेवर दुष्परीणाम होतो. कधिकधी आजारपण ओढवण्याची शक्यता असते. परंतू जर घरातील सदस्यांना परिस्थितीची पुर्ण जाणीव देवून त्यांच्या सल्ल्याने अस्थिर व ठरावीक नसलेल्या उत्पनातूनही बचत करण्याची सवय लावल्यास आणि त्यासाठी वर्तमानकाळात स्वत:ला तडजोडीची सवय लावल्यास जीवनात ओढवणार्या आणिबाणीच्या प्रसंगांसाठी आपली पुर्ण तयारी करता येवू शकते.
आपला संसार सुखी करावयाचा असल्यास जीवनात येणार्या आर्थिक समस्यांना गृहीत धरणे योग्य नाही. अशाप्रकारची पहिली चुक ही शेवटची चुक असली पाहिजे. त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करणे म्हणजे जाणून बुजून स्वत:वर संकट ओढवून घेण्यासारखे असते. तेव्हा घरात स्थिर उत्पन्न देणार्या उत्पन्नाच्या साधनांना जास्त प्रादान्य दिले गेले पाहिजे. त्यातल्या त्यात आर्थिक नियोजनाला जीवनात अधिकाधीक महत्व देण्यात आले पाहिजे. अन्यथा आपण पोकळ श्रीमंतीला कवटाळून बसतो आणि गरज पडल्यास दुसर्यांपुढे हात पसरावे लागतात. आपले जीवन कर्जबाजारी होवून जाते आणि हे सर्व आपल्याच चुकांचे परिणाम असतात.
1. मानसिक स्वास्थ्य सकारात्मक राहते.
पैसा हा सर्वस्व नसला तरिही सगळी भौतिक सुखं त्याच्या अवतीभवती फिरत असतात. कोणाला आश्चर्यचकीत करणारी भेट द्यायची असेल, कोणाचा वाढदिवस साजरा करावयाचा असेल, कोणाच्या मनाचा कल आपल्या बाजूने वळवायचा असेल तर त्यासाठी पैसा खर्च करावा लागतो. पैसा हे एक महत्वाचे माध्यम आहे ज्यामुळे नाती सुखावतात आणि मानसिक स्वास्थ्य सकारात्मक ठेवतात. त्यासाठी आपल्यापाशी जीवलग नाती असली पाहिजे व त्यांना आनंद देण्याची प्रबळ इच्छा आपल्या मनात असली पाहिजे. सर्वप्रथम हा विचार आपल्या मनात रुजतो आणि त्यानंतर त्याच्या तयारीच्या हेतूने आर्थिक नियोजनास सुरवात होते. ही प्रक्रिया अत्यंत आनंद देणारी असते. कारण तयारी करत असतांना आपले मन त्या क्षणांची कल्पना करत असते. जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीस ती भेट देवू. तेव्हा त्याच्या चेहर्यावर किती आनंद असेल. नुसत्या ह्या विचारानेही आपले मन भारावून जाते. अशाप्रकारे आर्थिक नियोजन व बचत ह्या महत्वाच्या गोष्टींनी आपला आत्मविश्वास वाढतो. आणि पैस्याशी जुळलेला अतिशय नाजूक विषय मार्गी लागल्यामुळे आपले मानसिक स्वास्थही उत्तम राहते.
2. जीवनाचा आनंद घेता येतो.
प्रत्येक मनुष्य आर्थिक स्वरूपात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीकोनाने शिक्षण घेतो. आणि जास्तीत जास्त पैसा कसा कमावता येईल हा विचार करतो. जेणेकरून जगातील सर्व सुखांचा आस्वाद त्याला घेता यावा. परंतू आपण कमवीलेल्या मिळकतीवर केवळ आपलाच अधिकार नसतो. तेव्हा त्या मिळकतीचे चार भागात विभाजन झाले पाहिजे. एक म्हणजे आपले कुटूंब, दुसरे म्हणजे मदतीचा हेतू, तिसरे म्हणजे बचत किंवा आर्थिक नियोजन आणी चौथे म्हणजे आपण. ह्यापैकी जो भाग कुटूंबाकरीता व भविष्य सुरक्षीत करण्याच्या दृष्टीकोनातून विभाजीत करण्यात येतो. त्यामुळे आपण भविष्यात जीवनाचा मनमुराद आनंद घेवू शकतो. कुटूंबासोबत घालवीलेल्या वेळा गोड आठवणींच्या रुपात मनात साठवून ठेवण्यासाठी वर्षातून कमीत कमी एकदा तरी ट्रीपचा आनंद घेवू शकतो. मनाप्रमाणे खरेदी करता येवू शकते. कौटूंबिक स्नेहसंमेलनाचा बेत आखता येवू शकतो. घरातील स्त्रियांना त्यांच्या आवडीचा दागिना देवून त्यांचे मन जिंकता येवू शकते. अशाप्रकारे आर्थिक नियोजनामुळे जीवनाचा आनंद घेणे सोपे होते.
3. गृहसौख्यात भर पडते.
घरात आर्थिक संतुलन बरोबर नसले तर घरातील शांतता भंग पावते. आपसात मतभेद निर्माण होतात. त्यामागे कमकुवत आर्थिक नियोजन हे सर्वात मोठे कारण असते. आपल्या जीवलगांचा आपल्यावरचा विश्वास द्वीगुणीत व्हावा सोबत पदोपदी त्यांच्या सहकार्याची व आशिर्वादांची साथ आपल्याला मिळावी असे वाटत असेल तर सर्वप्रथम आपली त्यांच्या प्रती असलेली कर्तव्य, जबाबदार्या वेळोवेळी पार पाडणे. तसेच त्यांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षांना मागण्यांचे नाव न देता निरपेक्ष प्रेमाने व आपुलकीने आजीवन निभवत राहणे आवश्यक असते. तरच नाती आणखी घट्ट होतात. त्यासाठी मजबूत आर्थिक नियोजनाची गरज भासते. महिन्या अखेरीस घरात जी मिळकत येते त्याचा एक भाग अशाप्रकारच्या दुरदृष्टीने बचत केल्यास आपल्या जीवलगांचे यशाचे बहुमूल्य क्षण, वाढदिवस, कुटूंबासमवेत ट्रीपचे आयोजन तसेच आपल्या जोडीदाराचे मन जपून ते क्षण सोनेरी क्षणांमध्ये बदलता येवू शकतात. आणि त्यामुळे गृहसौख्यात भर पडत जाते.
4. स्वत:चा अभिमान वाटतो.
जर आपण एक कुटूंबप्रमुख आहोत तर आपल्या खांद्यांवर कुटूंबाच्या गरजांच्या पुर्ततेची तसेच त्यांना सर्वतोपरी आनंदी ठेवण्याची जबाबदारी असते. जो कुटूंबप्रमुख त्याच्यावरच्या ह्या जबाबदारीस त्याच्या आयुष्यात प्राथमिकता देतो तो सर्वप्रथम स्वत:मध्ये आत्मप्रेम जागृत करतो. कारण आपल्या कुटूंबास सर्वार्थाने आनंदी ठेवायचे असल्यास आपले मानसिक व शारिरीक स्वास्थ्य उत्तम राहणे महत्वाचे आहे ह्याची त्याला जाणीव होते. त्यानंतर तो स्वत:च्या प्रगतीची कास धरतो. कारण त्यामागे कुटूंबाच्या अपेक्षांना पुरे पडणे हा विचार तर असतोच. त्यासोबत आपल्या प्रगती करण्याने तो घरातील माणसांच्या मानसिक स्वास्थ्याला जपत असतो. कुटूंबप्रमुख प्रगतीशील असल्यास कुटूंब निश्चींत तर असतेच सोबत त्यांना स्वत:ही प्रगती करण्याची प्रेरणा मिळत असते. त्याचप्रमाणे कुटूंबप्रमुखाकडे दुरदृष्टी असते. आयुष्याच्या पुढच्या काळात घडणार्या घडामोडी, अचानक कुटूंबावर होणारा आघात, लग्नसमारंभ, मुलांचे शिक्षण इतकेच नाहीतर एक कुटूंबप्रमुख म्हणून जर कधि त्याच्यावरच अनपेक्षीतपणे जीवनमरणाचा प्रसंग उद्भवला तर त्या अनुषंगाने वेळ हातात असतांनाच बचतीच्या स्वरूपात आर्थिक नियोजन करून ठेवतो. अशाप्रकारे एक आदर्श कुटूंबप्रमुख जिवीत असतांना आपल्या कुटूंबासोबत आनंदात जीवन व्यतीत करतो. त्याचबरोबर त्याच्या गेल्यानंतर कुटूंबाची कोणत्याही प्रकारे आबाळ होवू नये म्हणून जिवंतपणीच सर्व तयारी करून ठेवतो. जी व्यक्ती अशाप्रकारचे नियोजनबद्ध जीवन जगते त्या व्यक्तीला स्वत:चा अभिमान वाटतो. आणि कुटूंबालाही त्याचा अभिमान वाटतो.
घरात स्थिर उत्पन्न देणारा स्त्रोत असणे ही महत्वाची बाब आहे. त्यामुळे आपण अंधारात चाचपडत नाही. आपली दिशा स्पष्ट होते. त्यात पोकळ श्रीमंतीला थारा नसतो तर खर्याखुर्या आयुष्याला सामोरे जाणे असते. जिथे कुटूंबातील प्रत्येकजण मिळकतीसाठी काहि ना काही काम करत असतो. आणि कुटूंबाच्या भरणपोषणास जमेल तसा हातभार लावत असतो. अशा कुटूंबातील माणसे स्वाभिमानाने जगतात व त्यांच्या आत्मविश्वासापुढे त्यांच्या जीवनात येणार्या अडचणीही हात टेकतात.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)