
जागतिक अंधदिन …पांढरी काठी हा दिवस समाज किंवा जनजागृती निमीत्ताने जगभर पाळण्यात येतो. कारण आज ह्या काठीच्या सौजन्याने शरीराचा एक महत्वाचा अवयव निकामी असलेले हे आपले अंध बांधव त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या त्रुटीवर मात करत धाडसाने जीवन जगत आहेत. त्यासोबत आत्मनिर्भर होण्यासाठी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी सुद्धा होत आहेत. हे कित्येक अशा कुचकामी लोकांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे जे शरीराचे सर्व अवयव सुदृढ असूनही परावलंबी जीवन जगत असतात. तसेच त्यांच्या जीवनाच्या जबाबदार्या पार पाडण्यास असफल असतात. अशाप्रकारे ते एक उद्देश विहीन आयुष्य जगतात.
नेत्रहिन असणे म्हणजे जीवनात अंधकार असणे असा होत नाही. कारण सृष्टीचा न्याय निराळा असतो. सृष्टी एक दार बंद करते परंतू त्याच वेळी अनेक मार्ग आपल्यासाठी उघडत असते. नेत्रहीन बांधवांमध्ये सृष्टीचा हा चमत्कार बघावयास मिळतो. कारण त्यांची अन्य अवयवे ही जास्त संवेदनशील असतात. त्याचबरोबर त्यांचे अंतर्मन डोळ्यांची जागा घेत असते. मनाच्या डोळ्यांनी ते सर्वकाही बघू शकतात. आपल्या सारख्या कित्येक डोळस व्यक्तींची सौंदर्या बरोबर आसपासच्या विकृतीवरही नजर जाते. कारण जीवनप्रवासात अनेक कारणांनी आपले मन गढूळ झालेले असते. परंतू नेत्रहीनांना मात्र त्यांच्या चोहोबाजूंनी सर्वत्र सौंदर्य व चांगुलपणाच दिसतो. कारण त्यांचे मन निरागस असते. त्यामुळेच ते नेत्रहीन असूनही डोळस असल्यासारखे भासतात.
नेत्रहीन बांधवांनी त्यांचे आयुष्य स्वत:ला अपंग समजून घालविण्यात काहिच तथ्य नाही. कारण अनेक अंध बांधवांनी स्वत:मधील कलागुणांना प्रोत्साहन दिले आहे. तसेच कलाविश्वात स्वत:चा नाव लौकिक मिळवीला आहे. तर काहिंनी उच्च शिक्षण घेवून मोठ्या पदाच्या नोकर्या सुद्धा मिळवील्या आहेत. निसर्गाने त्यांच्या पदरात टाकलेल्या एका कमतरतेला त्यांनी जीवनात पुढे जाण्याचे कारण बनवीले आहे. त्याचबरोबर कशालाही न जुमानता स्वाभिमानाचे जीवन जगत आहेत.
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीस सर्वप्रथम भेटतो. तेव्हा त्या व्यक्तीच्या शारिरीक कमतरतेवर आपले प्रथम लक्ष जाते. त्यावरून त्या व्यक्तीविषयी आपले मत बनते. काहिसा असाच अनुभव अंध बांधवांनाही त्यांच्या दैनंदिन जीवनात येतो. कारण त्यांना भेटता क्षणी त्यांच्या अंधपणाला त्यांची दुर्बलता समजण्याची सर्वात मोठी चूक आपण करतो. तसेच सहानुभूतीपोटी त्यांना निरनिराळे सल्ले देत असतो. अशाप्रकारे बहुतांशी लोकांच्या मनात अंध बांधवांविषयी सहानुभूती जागृत होते. तर काही त्यांची हुशारी बघूण त्यांना चमत्कारीक समजू लागतात. परंतू फार कमी लोकांना ते आपल्या पैकीच एक वाटतात. खरेतर जेव्हा आपण त्यांना आपल्याप्रमाणे सामान्य समजू तेव्हाच त्यांच्याशी आपले वर्तनही सामान्य असेल. जेव्हा आयुष्यात कधि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तर आपल्याला त्यांच्यातील कौशल्य निदर्शनात येतील. त्याचप्रमाणे त्यांची बुद्धीमत्ता चपळ असते व ते अनेक कामे एखाद्या डोळस व्यक्तीप्रमाणे सराईतरित्या करू शकतात हे ही ध्यानात येईल.
डोळस व अंध ही भिन्नता आपल्या मनात अशी कोरलेली असते कि अशाप्रकारच्या किंवा अन्य शारिरीक अपंगत्वालाही समाजात दुबळेपणाच्या नजरेने पाहिले जाते. वास्तविकता मात्र निराळी असते. जेव्हा एखादा व्यक्ती अपंगत्व घेवून जन्मास येतो तेव्हा त्या अपंगत्वासोबत त्याच्यात अनेक विशेषता व पराकोटीचे मनोबलही असते. त्या आधारे तो त्याच्यातील त्या कमतरतेचा स्विकार करतो. त्याचप्रमाणे विविध मार्गांनी आपले जगणे सोपे करतो. परंतू जे शारिरीक रित्या सर्वार्थाने सुदृढ असतात तरिही त्यांच्यापाशी जीवनाला अर्थ प्राप्त करून देण्याचा विचार नसतो. त्यांना त्यांच्या वेळेची पर्वा नसते. ते बेशिस्तपणे वागत असतात. सामान्य दिनचर्येत वेळ वाया घालवितात. तसेच स्वत:ला अपयशाच्या दरीत ढकलून देतात. ह्यावरून हे लक्षात येते कि कोणतेही शारिरीक अपंगत्व व्यक्तीच्या प्रगतीच्या आड येत नाही. एक बळकट विचार व पुढे जाण्याची ओढ असल्यास प्रत्येकाची प्रगती ही होतेच.
नेत्रहिन व्यक्तीची मदत करणे, त्यांची काळजी घेणे हे आपल्यापैकी प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परंतू त्यांच्यातील त्रुटीस त्यांची लाचारी समजून त्यांना आपल्यावर विसंबून ठेवून परावलंबी बनविणे ही योग्य गोष्ट नाही. त्या अनुषंगाने ‘नॅब’ ह्या समाजसेवी संस्थेने अंध बांधवांचे जीवन सोयीस्कर व्हावे. ह्या हेतूने व त्यांना दैनंदिन कामात अडचणी येवू नयेत म्हणून ‘पांढरी काठी’ बहाल केली आहे. ह्या काठीद्वारे नेत्रहीन व्यक्ती त्यांच्या मार्गात येणार्या अडथळ्यांना ओळखून सतर्कता बाळगु शकतात. तसेच ही काठी समाजातील डोळस असलेल्यांना कर्तव्यदक्ष व सहृदय होण्याचा संदेश देते.
त्याचप्रमाणे नेत्रहीन विद्द्यार्थ्यांना सामान्य विद्द्यार्थ्यांच्या शाळा तसेच कॉलेजातून शिक्षण देणे हे त्यांच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. कारण त्यामुळे त्यांच्या मनात स्वत:विषयी कमीपणाच्या भावना निर्माण होवू शकतात. त्याऐवजी त्यांना अंध विद्द्यालयातून व त्यांच्यासाठी असलेल्या ब्रेल लिपी च्या माध्यमातून शिक्षण दिले गेल्यास ते त्यांच्या हुशारीला सिद्ध करू शकतील. आपल्याला डोळसपणाचे भाग्य लाभले आहे. तेव्हा आपण नेत्रहीनांच्या वेदना त्याप्रमाणात समजू शकत नाही. परंतू कधी स्वत:च्या डोळ्यांवर पट्टी बांधून पाहिली तर थोडेसे अंतर पार करणेही आपल्यासाठी कठीण होवून जाईल. तेव्हा आपण अंध बांधवांसाठी तात्पुरता नाही तर ठोस उपाय करावा. त्यांना स्वावलंबी व सुशिक्षीत बनवून त्यांच्या पुढच्या आयुष्यात भक्कमपणे उभे राहण्यास मदत करावी. कारण कोणिही कोणास आजीवन पुरत नाही. प्रत्येकाला आपल्या जीवनाचे शिल्पकार स्वत:च व्हावे लागते.
अंध बांधवांना आपल्यातीलच एक समजावे. त्यांच्या नेत्रहीन असल्याचा मनापासून स्विकार करावा. त्यांची मदत करण्याची संधी कधी लाभल्यास पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी नाही किंवा मनात सहानुभूती ठेवून नाही तर एक माणूस समजून मदत करावी. हाच ह्या जागतिक अंधदिना मागचा संदेश आहे.
1. अंध बांधवांसाठी प्रकाशदूत बनावे
प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा हा प्रश्न पडत असतो कि देवाने मलाच का दिलीत एवढी संकटं? मीच का, मलाच का हे प्रश्न भांडावून सोडणारे असतात. परंतू सृष्टीपाशी दुरदृष्टी आहे. कारण तिने कोणाला अपंगत्व, कोणाला रोगग्रस्त तर कोणाला अन्य काही अडचणी दिल्या आहेत. परंतू त्यासोबत त्या अडचणींना स्विकारण्याचे, त्यांच्यासोबत जगण्याचे तसेच त्यावर मात करण्याचे सामर्थ्यही बहाल केले आहे. परंतू जर आपण संकटांनी कोलमडून गेलो व पुढे जाण्याचे थांबलो तर आपल्यातच दडलेल्या ह्या सामर्थ्याचा शोध लावू शकणार नाही. परंतू जर निरंतर चालत राहण्याचा निर्णय घेतला तर मात्र मार्ग आपोआप उलगडत जातात.
नेत्रहीनांनाही सृष्टीने निरागस व निखळ मनाचे धनी बनविले आहे. ते मनाच्या डोळ्यांनी सर्वकाही अनुभवू शकतात व पाहू शकतात. परंतू आपण आपल्या आयुष्यात जोडीदाराची निवड करतांना शारिरीक सौंदर्यावर लक्ष केंद्रीत करतो. कोणताही अवयव निकामी नसावा ह्यासाठी आग्रही असतो. कारण मनाचे सौंदर्य ओळखण्यासाठी त्या व्यक्तीबरोबर काही काळ सोबत घालवावा लागतो. म्हणूनच आपल्या आयुष्यात अशा व्यक्तींना महत्वाचे स्थान देण्याचा मोठेपणा आपण दाखविला पाहिजे. किंवा जर आपल्या जोडीदारास दुर्दैवाने आयुष्यात अशा स्थितीस सामोरे जावे लागले. तर त्याची कधिही साथ सोडू नये. त्याच्याशी प्रामाणिक राहून निरपेक्ष प्रेमाने त्याचे धैर्य वाढवावे. अशा पद्धतीने त्याच्या अंधकारमय आयुष्यात प्रकाशदूत बनावे.
2. नेत्रहीनांविषयी मनात असलेली भिन्नतेची भावना पुसून टाकावी
अंध व्यक्तीस पाहताक्षणी आपल्या मनात त्यांच्यासाठी सहानुभूती निर्माण होते. कारण आपल्याला ते लाचार वाटतात. परंतू कोणाचिही अवस्था बघून त्याच्या प्रती सहानुभूती वाटणे व करुणेचे भाव जागृत होणे ह्या दोन गोष्टीत अंतर असते. सहानुभूतीच्या दृष्टीकोणातून आपण त्या व्यक्तीस मदत करू इच्छितो. परंतू मदत करतांना बर्याचदा त्यांच्या आत्मसम्मानाचा विचार करत नाही. कारण ती भावनेच्या भरात येवून केलेली मदत असते. परंतू करुणेच्या भावनेने केलेली मदत मात्र त्यांना आपण लाचार असल्याचे भासवत नाही. उलट त्यांचे मनोबल वाढविते. तेव्हा अंध व्यक्तीसाठी असलेली भिन्नतेची भावना मनातून काढून टाकावी व माणूस म्हणून त्यांच्या पाठिशी उभे रहावे. त्यांना सामान्य वागणूक द्यावी. जेणेकरून त्यांच्यातील सकारात्मकतेने आपल्यातही संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य येईल.
3. प्रत्येकास नेत्रदानाचे महत्व कळावे
नेत्रदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. जेव्हा आपण ह्या जगाचा निरोप घेवू त्यानंतर आपल्या शरिराचे काही अवयव काही गरजूंच्या जे काही कारणाने मृत्युशी झुंजत आहेत त्यांच्या कामी येवू शकतात. तसेच त्यामुळे त्यांना जीवनदान मिळू शकते. प्रत्येकाने हा विचार आपल्या मनात रुजवावा आणि स्वइच्छेने नेत्रदान करण्यास तयार व्हावे. त्यामुळे आपण ह्या जगाचा निरोप घेतल्यानंतरही इतर कोणाला आपल्या डोळ्यांनी जग बघता येईल. तसेच त्याच्या जीवनात प्रकाशाचे साम्राज्य पसरेल . 10 जून हा दिवस जागतिक दृष्टीदान दिवस म्हणून पाळण्यात येतो. त्यामधून हाच श्रेष्ठ विचार जनमानसात पोहोचविण्याचा उद्देश आहे. ज्यांना मधूमेह, कॅन्सर, ऐड्स ह्यासारखे आजार आहेत त्यांना वगळता प्रत्येकजण स्वखुशीने मरणोपरांत नेत्रदान करू शकतो. नेत्रदान करण्यामागे आपला विलक्षण विचार व कर्तव्य भावना असली पाहिजे. हीच माणुसकी आहे.
4. नेत्रहीनता म्हणजे लाचारी ह्या विचारांना मुठमाती द्यावी
सृष्टीने निर्माण केलेल्या जीवांना लाचार समजणे ही आपल्या विचारांची दयनीय अवस्था आहे. शारिरीक अपंगत्व घेवून जन्मास आलेल्या कोणत्याही जीवात विचारांची कणखरता असते. लाचारीची भावना मात्र आपल्या आसपासचे लोकच आपल्यात टाकत असतात. कारण समाजनिर्मीत साच्यात जे काही तंतोतंत बसते त्याचा स्विकार होत असतो आणि जे बसत नाही त्याला दुर्लक्षीत किंवा लाचार ठरविले जाते. नेत्रहीन बांधव ही सृष्टीची लेकरे आहेत. त्यांना डोळ्यांनी बघण्याचे सुख जरी लाभले नसले तरी त्यांची अन्य इंद्रीये ही जास्त संवेदनशील असतात. पांढरी काठी व ब्रेल लिपी मुळे त्यांच्या जीवनातील असुविधा कमी होण्यास व त्यांना शिक्षण घेण्यास मदत मिळाली. डोळस व्यक्तींच्या तुलनेत ते जास्त सकारात्मक दृष्टीकोण जीवनाप्रती ठेवतात. तेव्हाच ते त्यांच्या नेत्रहीन असण्यालाही सौभाग्य समजतात. आणि त्या कमतरतेला मनाने स्विकारून निरनिराळ्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यासाठी सदैव तत्पर असतात. संगीत क्षेत्रात रविंद्र जैन हे नाव अजरामर आहे. नेत्रहीन असूनही त्यांनी रामानंद सागर ह्यांच्या ‘रामायण’ ह्या मालिकेस अमर केले. मनुष्याच्या जीवनाचा एक हेतू असतो. कोणतेही शारिरीक अपंगत्व त्या हेतूस अस्तित्वात येण्यासाठी बाधा बनत नाही. तेव्हा नेत्रहीनता म्हणजे माणसा माणसातील भिन्नता अशा मागे पडलेल्या आपल्या विचारास आपण मुठमाती द्यावी. कधि नेत्रहीन व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्यांच्याशी गप्पा करून त्यांचे विचार जाणून घ्यावेत. तसेच माणुसकीच्या दृष्टीकोनातून कायम त्यांच्या मदतीसाठी तत्पर असावे.
नेत्रहिनता हे केवळ एक शारिरीक अपंगत्व आहे. त्याचा मनाशी काहिही संबंध नाही. जर नेत्रहीन असूनही त्या व्यक्तीचे विचार क्रांती आणणारे असतील व कर्तुत्व डोळस व्यक्तीसही लाजविणारे असले. तर त्यांचे अपंगत्व केवळ त्यांच्या शरिरापुरतेच मर्यादीत आहे. तसेच तो नेत्रहीन असूनही डोळस आहेत. परंतू जे ह्या जगाला आपल्या डोळ्यांनी बघू शकतात. परंतू त्यांच्याकडे दूरदृष्टी नाही ते मात्र डोळस असूनही नेत्रहीन आहेत.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)